मंगळवार, २८ मार्च, २०१७

फासा आणि फास

[ मोठ्या मशीदीपुढचे पटांगण. तुघलक, शेख इमामुद्दिन आणि राजवाड्यावरचे काही चाकर. बाकी कोणीही नाही, प्रथम एक दीर्घ स्तब्धता ]

तुघलक: (मध्येच) ओफ्! अब मुझसे यह सह नही जा सकता!

इमामुद्दिन: लेकिन क्यौं, हुजूरे आलम? उलट, कुणी आलं नाही याची आपल्याला खुशी झाली पाहिजे.

तुघलक

तुघलक: शेखसाहेब, आमच्या प्रजेनं आपल्या भाषणाचा लाभ घेऊ नये अशी आमची मर्जी असती तर ही सभा ठरवण्याचा खटाटोप तरी आम्ही कशासाठी केला असता? आमच्या प्रजेनं मुकी मेंढरं राहावं हे आम्हाला नामंजूर आहे. इतकंच नव्हे तर आम्हीदेखील स्वतःला सर्वज्ञ समजत नाही. आपण आमच्यासंबंधात आज बोलणार आहा ते ऐकण्यासाठी आम्ही केव्हापासून उत्सुक आहो.

इमामुद्दिन: माझं भाषण ऐकताना हुजुरांची उत्सुकता राहील असं वाटत नाही. आपण जाणताच की आपण हजर आहा म्हणून आपल्या मनासारखं बोलणारी ही जबान नाही.

तुघलक: आम्ही जाणतो. शेख इमामुद्दिन यांचं धैर्य आणि नि:स्पृहता सारी दिल्ली जाणते. शेखसाहेब, आपल्यासाठी आम्ही जी तकलीफ घेतली ती आणखी कोणासाठी घेतली नसती. (टाळी वाजवतो. चाकर येतो. अभिवादन करतो.) धावत जाऊन वझीरांना आमचा निरोप दे की दरबारातले एकुण एक खान, सरदार- सर्वांना आम्ही इथं बोलावलं आहे - असतील तसे, अबके अब! दौडो.

इमामुद्दिन: हुजूरे आलम, आज्ञाधारक दरबार्‍यांपुढे भाषण देण्यासाठी मी इथं आलेलो नाही.

तुघलक: आणि यानंतर तर आम्ही दारोदार जाऊन प्रजेला विनंत्या करू शकत नाही. शेखसाहेब! खरंतर आज दरबारातच आम्ही हुकूम सोडायला पाहिजे होता. केव्हापासून आपण इथे येऊन दाखल आहोत आणि अद्याप एकहीजण फिरकत नाही.

इमामुद्दिनः हुजूरे आलम, आपणा दोघांच्या दिसण्यातल्या साम्याची प्रसिद्धी आहे. पण आपल्या विचारांत मात्र काडीचंही साम्य नाही. आपल्या लाचार लाळघोट्यांच्या गर्दीपुढे मी भाषण कशासाठी करू? मला लोकांशी बोलायचं आहे. जे शाही हुकूमाच्या बिनतक्रार तामिलीपलीकडे कृती करू शकतात, जे इस्लामसाठी आणि देशासाठी काही करु मागतात त्यांच्याशी मला बोलायचं आहे, त्यांना काही सांगायचं आहे. इथं या वेळी कोणी आलं नाही तरी फिकीर नाही. मीच उद्या भर बाजारात जाऊन उभा राहीन. तिथं भाषण करीन.

[तुघलक चाकराला जाण्याची खूण करतो. तो जातो.]

तुघलक: शेखसाहेब, आम्ही तुम्हाला एख गोष्ट सांगितली तर आपण विश्वास ठेवाल? इस्लामच्या शिकवणीविरुद्ध न जाण्याची कोशिश आम्ही आजवर मनापासून करीत आलो आहो-

इमामुद्दिन: यावर मीच काय, आपणदेखील विश्वास ठेवणार नाही, हुजूर. इस्लामच्या आज्ञांच्या आपण केलेल्या अवमानांची लागतील तेवढी उदाहरणं मी आपल्याला या वेळी हवी तर ऐकवू शकेन. आपण म्हणता, असा अपमान न व्हावा म्हणून आपण झटत आलात; तर मग ही उदाहरणं आपल्या नकळत आपल्या हातून घडली असं तर मी समजू नये ना? आपणासारख्या मशहूर व्यासंगी माणसाहातून तशी अपेक्षा करायला जागाच नाही. कदाचित आपण खरोखरी अज्ञानापोटी चुकत असाल; परंतु अज्ञानाच्या निराकरणासाठी आणि कुराणाचा योग्य मतलब सांगण्यासाठी मोठमोठे ज्ञानी सय्यद आणि उलेमा आहेत. आपल्या आमदानीत ते तुरुंगाच्या गजांआड असल्याचं ऐकतो.

तुघलक: कारण त्यांनी राजकारण खेळायला प्रारंभ केला. आम्ही ते कदापि चालू देऊ शकत नव्हतो. शेखसाहेब, धर्माज्ञा आम्ही स्वप्नातही मोडलेली नाही वा तिचा उपमर्द आम्ही केलेला नाही. कारण धर्म म्हणजे आम्हांला आमचा जणू श्वासोच्छ्वास वाटतो. विशेषतः जेव्हा भोवतालचा गडद अंधःकार आमच्या काळजात दाटून तेथला एकेक चिराग मालवू लागतो तेव्हा आमचा धर्म इस्लाम धर्म हाच आमचा एकच आधार, आमची आई, आमचा बाप असतो. तो आमचं सर्वस्व असतो. शेखसाहेब, आम्ही एकटे आहोत. आमच्या राज्यात लक्षावधी आहेत- मुस्लिम, हिंदू, जैन. आम्ही पूर्णपणे जाणतो की आमच्या राज्यात दुर्गुण आहेत, दुष्प्रवृत्ती आहेत, घाण आहे. पण माणसं करून ठेवतात ती घाण धुण्यासाठी खुदाला कशासाठी तकलीफ द्यायची.

इमामुद्दिन: कारण केवळ खुदाची शिकवण, केवळ शरीयत ही घाण दूर करु शकते. हुजूरे आलम, मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. अरबांनी दुनियेत सर्वभर इस्लाम नेला. सातशे वर्षे त्यासाठी ते धडपडले, लढले. त्यांनी त्यासाठी अपार खस्ता खाल्ल्या. आज ते थकले आहेत. गळले आहेत. परंतु त्यांनी केलेलं काम थांबून चालणार नाही आणि ते पुढं नेण्यासाठी इस्लामला आज हवा आहे कोणी नेता. आपण असे नेते होऊ शकाल. अलम दुनियेत आपल्या सामर्थ्याचा राजा आज नाही. अल्लाने आपल्याला काय दिलेलं नाही? सत्ता, वैभव, शौर्य, विद्वत्ता, बुद्धिमत्ता- हे ॠण आता आपण फेडलं पाहिजे.

तुघलक: शेखसाहेब, रांगत कोण किती दूरवर पोचणार? आणि आम्हाला तर फार मोठी मजल मारायची आहे. आम्हाला रांगून चालणार नाही. घोडदौडीनंच गेलं पाहिजे-

इमामुद्दिन: हे आपण कुराणाच्या मार्गदर्शनाशिवाय साध्य करू शकाल? सुलतान, आपण तर अल्लापरवरदिगर होऊ पाहता आहा. बापाच्या खुनाहून हे पाप फार भयंकर ठरेल.

तुघलक: केवळ पाखंडीच नवा अल्लापरवदिगर होऊ शकेल. आम्ही अल्लाचे केवळ बंदे गुलाम आहोत.

इमामुद्दिन: सही बात. लेकिन गुलाम कभी कभी मालिक बनना चाहता है!

तुघलक: वाह, शेखसाहेब, बहोत खूब! सत्पुरुषदेखील खोचदार जबान वापरू शकतो तर! पण आम्ही गुलामांविषयीची बात चांगली जाणतो. शेखसाहेब, आमचे आजोबा गुलामच होते. नंतर सुलतान बनले, पण राजकारणात. तुमचा आरोप इथे लागू होण्याजोगा नाही.

इमामुद्दिन: इस्लाम! राजकारण! सुलतान, सावध असा नाहीतर हे शाब्दिक भेदभाव आपणाला एक ना एक दिवस एका भयंकर संघर्षात ढकलतील!

तुघलक: आम्ही पूर्ण जाणून आहोत. आम्ही युनानी, चिनी ग्रंथांचं वाचन करीत होतो तेव्हाच्या आठवणी अजून आम्हाला आहेत. दुनियेला अमृत मिळवून देण्यासाठी विषाचा प्याला ओठाशी लावणारा सुकरात*; कवींचा धिक्कार करीत स्वतः सुंदर कविता लिहिणारा अफलातून; आणि अशा किती तरी विलक्षण ज्ञानातून आणि माहितीतून एका नव्या अद्भुत जगाचा आम्हाला लागत गेलेला शोध. तो लागत असताना अनुभवलेले रोमांच. ते जग अरबी भाषेत आम्हाला दिसलं नव्हतं. कुराणानं कधी ते दाखवलं नव्हतं. त्यानंतरचा आमच्या मनातला संघर्ष आम्ही विसरलो नाहीत. या संघर्षानं फाटून आमच्या मनाच्या काही काळ चिंध्या चिंध्या झाल्या. आणि आज आम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणं एकसंध व्हायचं असेल तर तेव्हा जे वाचलं ते सारं विसरलं पाहिजे, तेंव्हा आम्ही जेवढे वाढलो तेवढे स्वतःला छाटून घेतलं पाहिजे. आम्हालाच काय, परंतु आमच्या प्रजेलाही ठार आंधळं, बहिरं बनवलं पाहिजे. झरथुष्ट्र, बुद्ध यांना जे सत्य दिसलं ते आमच्यापासून दूर ठेवूनच आम्ही तिला कुराणनिष्ठ आणि इस्लामनिष्ठ बनवलं पाहिजे. आपण आमच्याकडून ही इस्लामनिष्ठा अपेक्षित असाल तर माफ करा आम्ही आपल्या अपेक्षा पुर्‍या करू शकणार नाही.

इमामुद्दिन: सुलतान, आपण ज्ञानी आहा. आपणापुरता हा तोल आपण कौशल्याने राखूही शकाल. परंतु राज्य म्हणजे एकच सुलतान नव्हे. सुलतानांची मालिका. आपल्या नंतरचे सुलतान हा तोल राखू शकतील याची काय हमी? आपले असे आपल्याएवढेच ज्ञानी वारस असतील तर ते दिसू देत की.

तुघलक: तसा वारस आज नाही. पण आम्ही निराश नाही. आम्ही ते शोधून काढू. आम्ही त्यांना घडवू. आमचं ज्ञान, आमचा विचार आम्ही त्यांच्यात रुजवू. शेखसाहेब, आज आमची प्रजा मुक्या जनावरांसारखी आहे; पण आम्ही तिच्यातून मानव तयार करणार आहो. कानपुरात तुम्हाला पुष्कळ सच्ची माणसं भेटली; इतकी की तुमच्या भाषणानं स्फुरण चढून त्यांनी कानपूर बेचिराख केलं. अजून तेथल्या आगी विझल्या नाहीत. आपण आता दिल्लीत आलात आणि आपलं स्फुरण चढवणारं वकृत्व ऐकण्यासाठी कावळाही हजर नाही. का? कारण येथले लोक घरोघर राहिले आहेत. तुम्ही त्यांना दिल्लीत नको आहात. का नको आहात, ठाऊक आहे? (स्तब्धता.) कारण त्यांना आता तुमचा शक येतो. आम्ही, खुद्द सुलतान आमचे सर्वांत प्रखर टीकाकार शेख इमामुद्दिन यांचं जाहीर भाषण स्वतः ठरवतो तेव्हा लोकांना शक येणारंच. सुलतानानं त्याच्या विरोधकाची सभा काय म्हणून ठरवावी? त्या अर्थी त्यांना वाटतं की काही डाव आहे. म्हणून या डावाला बळी पडायचं नाकारून ते घरोघर सुखात राहिले आहेत.

इमामुद्दिन: (स्तंभित) म्हणजे असा डावच होता तर-

तुघलक: नव्हता. आम्ही शपथपूर्वक सांगतो की ते काहीच आमच्या मनात नव्हतं.

इमामुद्दिन: नसेल, पण हे असंच घडणार याची कल्पना हुजुरांना नव्हती?

तुघलक: कल्पना नव्हती, वास होता. आमच्या प्रजेची आम्हाला आता पुरती ओळख आहे.

इमामुद्दिन: अच्छा, म्हणजे त्यांना असं वाटतं आहे की मी हुजुरांचा हस्तक आहे म्हणून! आणि असं घडणार हे माहीत असून आपण ही सभा बोलावलीत!

तुघलक: शेखसाहेब, आमच्यावर भरोसा ठेवा, आमच्या अपेक्षेनुसार किंवा अपेक्षेहूनही अधिक जे घडलं त्याबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत. त्यांना आता आपण आमचे हस्तकच वाटता. उद्या बाजारात जाऊन भाषणाला उभे राहिलात की आमचे हस्तक म्हणूनच तुमचं स्वागत होईल. मतलब तुमच्या ध्यानी एव्हाना आलाच असेल; तुम्ही मोठे सत्पुरुष; प्रत्यक्ष सुलतानाविरुद्ध स्पष्ट बोलून तुम्ही तुमचं धैर्य आणि नि:स्पृहता प्रत्यक्ष सिद्ध केलीत; पण आमच्या एका युक्तीने तुम्ही जनतेलेखी गडगडलात आणि आज आमचे हस्तक बनल्याचा आळ तुमच्यावर आहे. अशा प्रजेला तुम्ही दार-उल् इस्लामच्या पंथातील म्हणाल? कोणत्या निष्ठांनी ती जगते असं सांगाल? आजवरच्या सुलतानांनी तिची मनं ही अशी विकृत बनवून टाकली आहेत. तिच्या आत्म्याचा विचार करण्यापूर्वी आम्हाला प्रथम तिची मनं सुधारायची आहेत.

[दीर्घ स्तब्धता. मग शेख संथपणे तुघलकाच्या दिशेने चालू लागतो.]

इमामुद्दिन: हुजूरे आलम, आपली करावी तेवढी प्रशंसा या वेळी थोडीच ठरेल. आपला प्रयोग कल्पनेपलीकडे फत्ते झाला. मी त्यापासून योग्य तो धडा घेतला आहे. आपण मला आता इजाजत दिली पाहिजे.

तुघलक: इजाजत? आपण चालला तर नाहीत?

इमामुद्दिन: माझं इथलं काम हुजुरांनीच करुन टाकलं आहे. इतउप्पर सभेला न येणार्‍या लोकांपुढे भाषण न करण्यासाठी मी इथं अधिक थांबावं, अशी हुजुरांची नक्कीच अपेक्षा नसेल.

तुघलक: शेखसाहेब, आम्ही तुमची मदद चाहतो.

इमामुद्दिन: हुजूर, अधिक डाव नकोत-

तुघलक: डाव खेळण्याला वेळ कुठं आहे? आम्ही संकटात आहोत. अवधचे आइने उल्मुल्क या क्षणी दिल्लीवर चालून येत आहेत.

इमामुद्दिन: कोण? हुजुरांचा विश्वासू मित्र आइने उल्मुल्क? का? पण नको, का रे मला न कळणंच योग्य. ते राजकारण आहे आणि त्यात हुजुरांचाच अधिकार फार मोठा आहे. मी त्यात काय मदद करणार?

तुघलक: आम्हाला युद्ध नको आहे. परंतु आम्ही या वेळी दुसरं काय करू शकतो? आमचा दोस्त आमच्याविरुद्ध असा का फिरला, कसा फिरला तेही आम्हाला समजू शकत नाही. चौकशी करण्यासाठी गेलेले आमचे अधिकृत दूतही भेट न देता त्यानं परतवले आहेत (स्तब्धता.) परंतु शेख इमामुद्दिन यांची भेट मात्र तो नक्की घेईल. (शेख बोलू पाहतो परंतु तुघलक बोलत राहतो) देशातल्या दरेक मुसलमानाप्रमाणे आइने उल्मुल्कदेखील शेख इमामुद्दिन यांची फार कदर करतो. त्यांचा शब्द त्याला सच्चा वाटेल. म्हणून शेखसाहेब, आम्ही तुम्हाला सांगतो आहो, नव्हे, प्रार्थना करतो आहो. आमच्या वतीने आमचे दूत म्हणून आपण आइने उल्मुल्क यांची गाठ घेऊन युद्धाच्या मूर्खपणापासून त्यांना परावृत्त करू शकाल काय? एरवी युद्धात मुस्लिमांहातून मुस्लिम मारले गेल्याचं विपरीत दृश्य दुनियेला दिसेल. आम्ही केवळ आमच्यासाठी नव्हे, आमच्या मुस्लिम प्रजेसाठी आणि इस्लामसाठी ही विनंती आपणाला करतो आहोत.

[स्तब्धता]

इमामुद्दिन: हुजूर, आपल्या शब्दाविषयी मला विश्वास वाटत नाही.

तुघलक: शब्द खुशाल धिक्कारा शेखसाहेब, पण शब्दामागचा मतलब तर संशयातीत आहे ना? युद्ध घडल्यास मुस्लिमांहातून मुस्लिमांच्या मोठ्या कत्तली घडतील याविषयी तर दुमत असण्याचं कारण नाही? मध्यस्थीसाठी आपणासारख्या इस्लामनिष्ठ सत्पुरुषाला आणखी कोणतं कारण हवं? आपण आमच्यावर योग्य कृती न करण्याचा ठपका ठेवलात. कृतीची संधी आता आपल्याकडे चालून आली आहे. आपण ती नक्कीच अव्हेरणार नाही-

इमामुद्दिन: समजतं आहे मला, मी नाही म्हणूच शकत नाही.

तुघलक: तर मग होकार गृहीत धरून पुढील बंदोबस्त करायचा ना? वख्त थोडा उरला आहे.

इमामुद्दिन: पर्याय आहेच कुठे?

तुघलक: (एकेक शब्द) आपल्या या सहकार्याचा उतराई मी कधीच होऊ शकणार नाही (टाळी मारतो. चाकर येऊन अभिवादन करतो.) शाही दूताची विशेष सन्मानवस्त्रं घेऊन ये. ताबडतोब.

[चाकर जातो.]

इमामुद्दिन: म्हणजे वस्त्रं तयार तर नाहीत?

तुघलक: माफी असावी, शेखसाहेब, पण आपली संमती आम्ही गृहीतच धरली होती. प्रवासाची सर्व सज्जता आहे.

इमामुद्दिन: पण आइने उल्मुल्कला मी आपला हस्तक वाटणार नाही कशावरून? हा घडला प्रकार त्याच्या कानी साद्यंत जाण्याला काय उशीर?

तुघलक: शेखसाहेब, आइने उल्मुल्क बुद्दु नाही. आणि शिवाय त्याला हे कळण्याआत तुम्ही त्याला भेटणार आहात. वेळ थोडा उरला आहे आणि काळोख पडण्याआत निघावं लागणार आहे. कनौजच्या सपाटीशी त्याला गाठणं इष्टं आहे.

[चाकर सुवर्णाच्या ताटातून सन्मान-वस्त्रे घेऊन येतात. तुघलक ती घेऊन इमामुद्दिनकडे येतो. ]

इमामुद्दिन: (त्याला रोखत) शांतताच हवी असेल तर गाठ कोठे पडावी याला काय महत्त्व?

तुघलक: शांतता हवी आहे; परंतु युद्धाचा संभव नजरेआड करता येणार नाही. वाटाघाटी मोडल्यास आमची फौज मोक्याच्या जागी असावी लागेल.

इमामुद्दिन: सुलतान, आपल्या बुद्धिचातुर्याची ख्याती मला आता कोठे थोडी पटू लागली आहे.

तुघलक: आम्ही नालायक बुद्दु आहोत. तुम्ही आता ती वस्त्रं चढवावीत.

इमामुद्दिन: ठीक. [वस्त्रे चढवितो. तुघलक त्याच्या मस्तकावर शिरपेच ठेवतो. एकमेकांसमोर उभे. पोशाखांमुळे ते जास्तच एकमेकांसारखे वाटतात] आपल्याविषयी जरा अधिक विश्वास वाटला असता तर...

- oOo -

सुकरात = सॉक्रेटिस, ग्रीक तत्त्वज्ञ,
अफलातून = प्लेटो, ग्रीक तत्त्वज्ञ (डायलॉग्ज' चा लेखक)

---

पुस्तकः 'तुघलक'
लेखक/अनुवादकः गिरीश कार्नाड/विजय तेंडुलकर
प्रकाशकः पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती दुसरी (१९९९)
पृ. १९ - २५.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा