भूमिका

’वेचित चाललो’ ही संचयनी एका व्यक्तीच्या वाचनात आलेल्या पुस्तकातील उल्लेखनीय उतार्‍यांचे/वेच्यांचे संकलन आहे. प्रत्येक वेचा वेगवेगळ्या कारणाने उल्लेखनीय असू शकतो. कुठे खिळून ठेवणारे शब्दचित्र असेल, कुठे बटबटीत न होता व्यक्त झालेल्या भावनांचा नात्यांचा आविष्कार असेल, कुठे एखाद्या सामान्यांच्या जगण्याशी निगडित प्रश्नांचा मागोवा घेतलेला असेल तर कुठे एखाद्या मूलगामी प्रश्नांचा वेध घेतलेला असू शकतो. तो तो वेचा त्या त्या पुस्तकाचा प्रातिनिधिक आहे असे मुळीच नाही. येथे निवडलेल्या काही वेच्यांबद्दल थोडे विवेचन ’वेचताना...’ या शीर्षकाखाली समाविष्ट केले आहे. परंतु हे सर्वच वेच्यांबद्दल आहे असे मात्र नाही.

येथे निवडलेले पुस्तक किमान वाचनीय असल्याची शिफारस नक्की करतो आहे. पण यातील पुस्तकांच्या वर्ण्यविषयांची व्याप्ती पाहता, वाचकाला प्रत्येक पुस्तक अथवा वेचा पसंत पडेलच असे नाही. आपापल्या आवडीनिवडी, पूर्वग्रह, दृष्टीकोन आदी अनेक कारणांनी कुठे सहमती, कुठे असहमती राहणारच. तरी 'वाचावे आणि वेचावे' पंथाचे वारकरी असण्यास काही अडचण असू नये.

महत्वाचे:
हे केवळ संकलन, संचयनी, अथवा ब्लॉग आहे. यावरुन पुस्तकांची कोणतीही खरेदी-विक्री अथवा सशुल्क/नि:शुल्क देवाणघेवाण होत नाही, करण्याचा मनोदयही नाही! यावर उल्लेख झालेली पुस्तके अवश्य खरेदी करा असे आवर्जून सांगताना त्यात आमचा कोणताही व्यावहारिक अथवा आर्थिक स्वार्थ निगडित असू नये याची पुरेपूर दक्षता घेण्यासाठी, कुणी एक वितरक अथवा पुस्तक-विक्रेत्याची शिफारसदेखील येथे करण्यात येत नाही. पुस्तक विक्रेत्याकडे अनुपलब्ध असेल, तर पुस्तकाच्या प्रकाशकाशी संपर्क साधता यावा यासाठी प्रकाशनांची नावेही समाविष्ट केलेली आहेत.

Monday, October 9, 2017

विचारांच्या मूल्यमापनाची परिमाणे

('पं. नेहरु: एक मागोवा' - डॉ. न. गो. राजूरकर, प्रा. नरहर कुरुंदकर)

हटवादीपणाने व आग्रहाने अमुकच एक सत्य आहे असे आपण कसे म्हणू शकू? नेहरुंना असे वाटे की, सर्व प्रश्नांवर आपण आपले मन खुले ठेवले पाहिजे. विचारांचा हा मोकळेपणा वैज्ञानिक दृष्टीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे विविध प्रश्नांकडे ठोकळेबाजपणे पाहण्याची कम्युनिस्टांची पद्धत त्यांना चुकीची वाटे. साचेबंद विचार करुन आपण फक्तच चुकीचा विचार करतो, इतकेच नाही तर जनतेने योग्य मार्गाने विचार करावा, त्यांची विचारक्षमता वाढावी यालाही आपण अडथळे करतो. भारतीय कम्युनिस्टांविषयी तर त्यांच्या मनात विशेष राग होता. भारतासमोर कोणते प्रश्न आहेत आणि ते कसे सोडवावे लागतील याबाबत कम्युनिस्टांना संपूर्णपणे अज्ञान आहे, असे नेहरुंना वाटे. भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या आधारे हिंदुस्थान समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. नेहरुंना असे वाटे की, भारतातील परिस्थिती आधी समजून घ्यावी आणि या परिस्थितीच्या संदर्भात मार्क्सच्या तत्त्वज्ञानातील कोणता भाग व्यवहार्य आहे हे ठरवावे. १९ व्या शतकात युरोपात जी राजकीय आणि आर्थिक परिस्थिती होती तिच्या आधारे मार्क्सवादाचे चिंतन चालू आहे. दरम्यान परिस्थिती पुष्कळच बदललेली आहे. विसाव्या शतकात निर्माण झालेले प्रश्न निराळे आहेत. विसाव्या शतकातील भारतासारख्या अविकसित देशात मार्क्सचे चिंतन पुष्कळसे अप्रस्तुत होते. हे जर कळाले नाही तर मग आपण वास्तवापासून आणि वैज्ञानिकतेपासून खूपच दूर जातो.

नेहरुंनी कम्युनिस्टांना पुन:पुन्हा एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांचे म्हणणे असे आहे की, १९ व्या शतकातील मार्क्स विसाव्या शतकात आता पूर्णपणे कालबाह्य झालेला आहे. इतर कम्युनिस्ट विचारवंत - विशेषतः लेनिन - विसाव्या शतकाच्या अगदी आरंभीच्या काळात विचार करत होता. ज्या परिस्थितीत, ज्या वातावरणात, जे प्रश्न डोळ्यांसमोर ठेवून ही माणसे विचार करत होती, ती परिस्थिती, ते प्रश्न आता संपूर्ण बदललेले आहेत. विशेष म्हणजे मार्क्सवाद्यांसमोर युरोप आणि अमेरिकेचे प्रश्न होते. त्यांनी आशिया-आफ्रिकेच्या संदर्भात विचार केलेला नाही. म्हणून भारतासारख्या अविकसित देशाचा विचार करताना ते सारेच प्रश्न संपूर्णपणे गैरलागू होतात.

मार्क्सही शेवटी आपल्या काळाचे अपत्य होता. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडत होती, या औद्योगिक क्रांतीच्या आरंभावस्थेत त्याने केलेले चिंतन त्या काळच्या दृष्टीने अतिशय योग्य होते. पण इंग्लंडमधील असह्य असणारे १९व्या शतकाच्या मध्यावरचे अनैसर्गिक जीवन हा काही जीवनाचा स्थायीभाव नव्हे. ते सर्वत्रच तसे असणार नाही. इंग्लंडमध्येही नेहमीच तसे राहिलेले नाही. १९ व्या शतकाच्या मध्यावर उभ्या असणार्‍या इंग्लंडच्या संदर्भात मार्क्सचे विचार बरोबर असू शकतील; परंतु या विचारांचा आजच्या अविकसित जगातील प्रश्न सोडवायला फारसा उपयोग नाही. भारतासमोर असणारे प्रश्न भारताच्या संदर्भात समजून घेतले पाहिजेत आणि वर्तमान जगाच्या संदर्भात हे प्रश्न सोडविले पाहिजेत. आपले प्रश्न विसरून जाऊन आणि वर्तमान जग विसरून जाऊन मार्क्सच्या विवेचनाच्या आधारे प्रश्न सोडविण्याचा उद्योग फारसा यशस्वी होणारा नव्हे. काळ बदलला म्हणजे नुसते प्रश्नच बदलत नाहीत; ते सोडविण्याच्या पद्धती बदलतात. मार्क्सच्या विचारावर अवलंबून राहणे हे याचे उत्तर नव्हे.

नेहरुंचे असेही म्हणणे होते की, मार्क्सने अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक प्रवाहांचे अतिशय योग्य आणि यथार्थ मूल्यमापन केले होते; परंतु जे प्रवाह नव्याने अस्तित्वात येत होते त्यांची जाणीव मार्क्सला झाली नाही. हे नवे प्रवाह अस्तित्वात आल्यामुळे जुने चित्र काही प्रमाणात बदलत होते. मार्क्सने त्याचा विचार केला नाही. अर्थात याबद्दल मार्क्सला दोषी धरण्यात अर्थ नाही. कारण ज्या वेळी त्याचे चिंतन आणि लेखन चालू होते, त्यावेळी अस्तित्वात असलेली परिस्थिती आधारासाठी घेऊनच मार्क्सला विचार करणे भाग होते, आपले निर्णय देणे भाग होते. हे मार्क्सचे विवेचन घडून गेल्यानंतरच्या काळात जर नवे घटक अस्तित्वात आले असतील तर त्याचा विचार करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. मार्क्सच्या काळात राजकीय लोकशाही अस्तित्वातच नव्हती. प्रौढ मतदानावर आधारलेल्या लोकशाहीचा उदयही मार्क्सच्या नंतरच्या काळात अस्तित्वात आलेली सर्वात महत्त्वाची घटना आहे. जोपर्यंत ही लोकशाही अस्तित्वात नव्हती, तोपर्यंत घटनात्मक आणि लोकशाही मार्गाने समाजजीवनात बदल घडवून आणणे शक्यच नव्हते आणि त्यामुळे सशस्त्र क्रांतीशिवाय मार्क्ससमोर समाजपरिवर्तनाचा दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. सशस्त्र क्रांती हा क्रांतीचा एकमेव मार्ग हे जे मार्क्सचे प्रतिपादन, ते सार्वत्रिक नाही. ज्या कालखंडात मार्क्स वावरत होता त्या कालखंडातील परिस्थितीच्या आधारे घेतलेला तो निर्णय आहे.मार्क्सनंतरच्या काळात जगातील वेगवेगळ्या देशांत जनतेला व्यापक प्रमाणात मतदानाचा अधिकार मिळाला. या व्यापक मतदानामुळे शासनाच्या स्वरूपातच मूलभूत बदल होऊन जातात. जनतेच्या हाती आलेली मतदानाची शक्ती हे एक महत्त्वाचे हत्यार आहे. समाज परिवर्तन आवश्यक दिशेने घडवून आणण्यासाठी आता जनता प्रभावीरित्या शासनावर दडपण आणू शकते. ही घटना मार्क्सच्या डोळ्यांसमोर नव्हती; मार्क्सला या घटनेची कल्पनाही करता आली नाही.

मार्क्सनंतरच्या काळात अजून काही घटना राजकीय क्षेत्रात प्रविष्ट झाल्या; त्यांचाही विचार आपण करायला पाहिजे. या घटना म्हणजे मजुरांच्या आणि शेतकर्‍यांच्या प्रचंड संघटना होत. ही संघटित असणारी शक्ती एक नवीनच परिस्थिती निर्माण करते. मजुरांच्या संघटना अस्तित्वात असल्या म्हणजे त्यांचे अस्तित्व हेच सधन वर्गावर एक फार मोठे दडपण असते. शासन करणारा वर्ग आणि सधन समाज त्यांना काही प्रमाणात या नव्या वस्तुस्थितीशी मिळतेजुळते घेणे भाग असते. यामुळे आर्थिक लोकशाहीचा प्रारंभ होतो. मार्क्सिस्टना असे वाटले की, भांडवलाशाहीच्या विकासाबरोबर काही जणांच्या हातात सत्ता आणि संपत्तीचे केंद्रीकरण होऊन जाईल; पण तसे घडले नाही. मार्क्सवादी लोक औद्योगिक क्रांतीच्या संदर्भात विचार करत होते. त्यांना पुढे येणार्‍या घटना दिसू शकल्या नाहीत. सत्ता आणि संपत्ती काही जणांच्या हाती केंद्रित होण्याऐवजी सत्तेचा पाया व्यापक झाला आणि म्हणून शासनावर जनतेचे दडपण वाढत गेले. संपत्ती काहीजणांच्या हातात केंद्रित झाली; पण उरलेल्या समाजात दारिद्र्य आणि बेकारी वाढली नाही. उलट सार्वमतावर आधारलेली लोकशाही आणि मजूर संघटना यांच्या संमिश्र प्रभावामुळे मजुरांच्या हाती काही सवलती पडल्या. त्यांचे जीवनमान व परिस्थिती काही प्रमाणात सुधारली. म्हणजे समाजाचे जे दोन गटांत विभाजन व्हायला हवे होते ते झालेच नाही. दारिद्र्य आणि बेकारीचा फैलाव यालाही नियंत्रण बसले. संपत्तीच्या केंद्रीकरणालाही आळा बसला. जे घडेल हे मार्क्सचे भाकित होते ते फारच थोड्या प्रमाणात घडले. कारण नवे निर्माण झालेले घटक आपापल्या क्षेत्रात प्रभावी होतच होते.

सामाजिक न्याय आणि समाजपरिवर्तनाची इच्छा यांना राजकीय परिस्थितीमुळे नवी गती प्राप्त झाली. सातत्याने परिस्थितीत मूलभूत बदल होत आहेत. या घटना घडत असताना राजकारणात नव्या पद्धतीच्या संघटना अस्तित्वात येत आहेत. तंत्रशास्त्रात क्रांतिकारी बदल होत आहेत. हे बदल मार्क्सलाच काय पण १९व्या शतकात कोणालाच जाणवणे शक्य नव्हते. ज्या काळात मार्क्स जन्माला आला, त्या काळात एक टंचाईची परिस्थिती होती. सर्वांच्या गरजेला पुरेसे होईल एवढे उत्पादनच उपलब्ध नव्हते. जे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही त्याचे न्याय्य वाटप कसे करावे हा महत्त्वाचा प्रश्न होता. यातून नवे ताण आणि सर्व प्रकारचे संघर्ष उदयाला येत होते. सर्वांच्या गरजा पूर्ण होऊ शकतील इतके उत्पादन उपलब्ध नसले म्हणजे आक्रमणाची प्रवृत्ती बळावते. जे बलवान आणि सधन असतात ते मिळेल ते ताब्यात घेतात. त्यामुळे उरलेल्या दुबळ्या आणि गरीब सर्वसामान्य जनतेला विविध प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. त्यामुळे सबल आणि दुर्बल, सधन आणि गरीब असा संघर्ष निर्माण होतो. गरजेच्या मानाने आवश्यक असलेले उत्पादन ज्या प्रमाणात कमी असेल त्या प्रमाणात हा संघर्ष अधिक तीव्र असतो. पण आता हा संदर्भच बदललेला आहे.आधुनिक काळात वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे भौतिक समृद्धी जनतेच्या आटोक्यात आली आहे. ज्या प्रमाणात उत्पादन वाढत होते आणि या वाढीचे प्रमाण गरजांशी मिळतेजुळते होत जाते, त्या प्रमाणात संघर्षाचे प्रमाण कमी होत जाते. संघर्ष मावळतच जातो. जगातील अनेक देशांत ते प्रत्यक्ष घडून येत असताना आपल्याला दिसत आहे.

अमेरिकेतील संयुक्त संस्थाने हे नव्या काळात याचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. आपली उत्पादन क्षमता अमेरिकेने प्रचंड प्रमाणात वाढवीत नेली आहे. त्यामुळे ते सगळ्याच उत्पादनाचे एक बलशाली केंद्र झाले आहे. अमेरिकेतील अब्जाधीश आणि सर्वसामान्य गरीब माणूस यांच्यातील फरक मोठा आहे हे मान्य केले, तरी या सर्वसामान्य माणसाचे सर्वसामान्य जीवनमान खूप उंचावलेले आहे. ज्याला मार्क्सवादी कल्पनेतला कामगार असे आपण म्हणू तो अमेरिकेत शिल्लकच राहिलेला नाही. अमेरिकेत जे घडले आहे (ते) अगदी निराळे आहे. मार्क्सवाद्यांच्या भाकिताप्रमाणे जे घडायलाच हवे होते तसे घडलील नाही. भांडवलशाहीच दरम्यानच्या काळात बदललेली आहे. ती दर क्षणी बदलत आहे. भांडवलशाहीतील संपत्ती गोळा करण्याची प्रेरणा तीच आहे. मिळेल ती सत्ता हातात घेण्याची प्रेरणा तशीच चालू आहे. नफ्याची प्रेरणा आहे, एकेका उत्पादनाच्या क्षेत्रावर एकाधिकार गाजविण्याची प्रवृत्ती आहे; पण याही भांडवलशाहीत सामाजिक न्यायाची प्रेरणा आहे, जनतेचे जीवनमान सुखावह करण्याची इच्छा याही पद्धतीत दिसून येत आहे.

राजकीय क्षेत्रात प्रौढ-मतदानावर आधारलेली लोकशाही आणि वैज्ञानिक क्षेत्रात विकसित झालेले तंत्रज्ञान या दोहोंच्या संदर्भात मार्क्सवादाचा संपूर्ण फेरविचार करणे आता आवश्यक झाले आहे; कारण वर्तमान जगाचे प्रश्न असे आहेत की, त्यांचा विचार करणे मार्क्सला शक्यच नव्हते. म्हणून नेहरूंना असे वाटे की, आता मार्क्सच्या वचनांना आणि विचारांना चिकटून बसण्यात अर्थ राहिलेला नाही. त्यांच्या ठोकळेबाज आग्रहाला तर पूर्वीही अर्थ नव्हता. अनेक प्रश्नांबाबत मार्क्सवादी दृष्टीकोन हा नुसता अहितकारक नाही तर अर्थशून्यही झालेला आहे. या सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष करणारी पोथीनिष्ठा नेहरुंना अमान्य होती. ज्याला भोवताली आधार नाही त्याचे आंधळे प्रतिपादन करण्यात त्यांना रस नव्हता.

-oOo-

पुस्तकः पं. नेहरु: एक मागोवा
लेखकः डॉ. न. गो. राजूरकर, प्रा. नरहर कुरुंदकर
प्रकाशकः पद्मगंधा प्रकाशन
आवृत्ती दुसरी (२००८)
पृष्ठे ७८-८२

1 comment:

  1. प्रस्थापित मार्क्सवादी (म्हणजेच युरोप-केंद्रित) विचार हा भारताचे अफाट आणि व्यामिश्र वास्तव समजावून घेण्यास पुरेसा पडणार नाही हे उघडच आहे. पण तळागाळातल्या , शतकानुशतके वंचित असलेल्या सामाजिक गटाबद्दल विचार करणे/मांडणे हेच सध्या अन-फॅशनेबल ठरत नाही आहे का? आणि अशा माणसाला केंद्रस्थानी दुसरा कोणता विचार ठेवतो?

    ReplyDelete