मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९

दोन बुटके

'द प्रिन्सेस' ही स्वत:ला मानवतावादी, निसर्गप्रेमी समजणाऱ्या पण प्रत्यक्षात अत्यंत स्वार्थी व व्यवहारी असणाऱ्या एका श्रीमंत जहागीरदारीणबाईची कथा आहे असे वरकरणी वाटते. माणसाची स्वत:विषयीची समज किती खोटी असू शकते आणि माणसाचे विचार व त्याची कृती यांत केवढी तफावत असू शकते याचे ही कथा उत्तम उदाहरण आहे. आपण फार दयाळू आहो, कनवाळू आहो, परमेश्वराने गरीबांची मदत करण्यासाठी आपली निवड केली आहे, असे प्रिन्सेसला प्रामाणिकपणे वाटते. दर दोनतीन महिन्यांनी ती चर्चच्या मठाला भेट देते. तेथे भेटवस्तू वाटते. ती येणार असे कळल्यापासून ती जाईपर्यंत चर्चचे सारेजण तिच्या तैनातीत असतात. तिला उत्तम जेवण दिले जाते. राहण्याची उत्तम सोय केली जाते. येथले पवित्र वातावरण, येथील शांतता, परमेश्वरी कृपेचे सान्निध्य हे आपल्या मनावर केवढे ठसलेले आहे हे ती वारंवार सांगत राहते. अशीच यावेळी ती चर्चच्या भेटीला आली आहे. तिच्यासाठी एक स्वतंत्र खोली दिली जाते. खोलीत प्रवेश केल्याबरोबर-'तिचे मन एका अनिर्वचनीय आनंदाने भरून जाते. येथल्या वातावरणात सायप्रसच्या झाडांचा मन मोहवणारा गंध आहे हे तिला जाणवते. ती आपला भूतकाळ विसरते, आपण फक्त एकोणतीस वर्षांचे आहोत हे विसरते. तिला वाटते की युगायुगापासून आपले या जगाशी नाते आहे. आपले खरे जग तर हेच आहे. ती संपत्ती, ते वैभव सारे खोटे, भ्रामक आहे. सत्य काही असेल तर हे पवित्र शांत आयुष्य...'

कवडसे पकडणारा कलावंत

सायंकाळच्या वेळी प्रिन्सेस बागेत जाऊन बसते. तिचे मन आनंदाने इतके तरी भरलेले असते की तिच्या डोळ्यातून अथू येतात. अशावेळी तिची एका डॉक्टरशी भेट होते. हा डॉक्टर पूर्वी तिच्या इस्टेटीवर तिचा एक कर्मचारी म्हणून राहत होता. आता तो दर शनिवारी येथील लोकांना तपासण्यास येतो. प्रिन्सेसला आठवते की ह्या डॉक्टरवर तिने खूप उपकार केलेले होते. डॉक्टरच का, इस्टेटीवरच्या साऱ्याच माणसांना तिने किती प्रेमाने वागविले ते देवच जाणतो. त्यांच्याविषयी किती माया होती तिच्या मनात! ती जुन्या आठवणी काढते. पण डॉक्टरला त्या आठवाव्या वाटत नाहीत याचे तिला आचर्य वाटते. ती त्या काळाविषयी खोदून खोदून त्याला विचारते.

डॉक्टरच्या आठवणीत भूतकाळाचे चित्र मात्र फार निराळे आहे. त्याच्या मनात तिच्याविषयी संताप आहे. तिच्या पुन्हा पुन्हा विचारण्याने तो चिडतो. म्हणतो की ती जे करीत होती ते सारे ढोंग होते. माणसाविषयी तिला प्रेम नव्हतेच. तिला फक्त आपल्या श्रेष्ठपणाची (आणि इतरांच्या कनिष्ठपणाची) जाणीव होती. तिची दयाळू कृत्ये निरपेक्ष नव्हती. त्यात उपकार करीत असल्याचा मोठा अहंकार होता. माणसांच्या समोर चार तुकडे फेकायचे आणि त्याबदल्यात त्यांना कायमचे उपकृत करून ठेवायचे हे तिचे तंत्र होते.

म्हाताऱ्या स्त्रियांसाठी प्रिन्सेसने एक आश्रम काढला होता, त्या आश्रमातले त्यांचे जिणे जनावरासारखे होते. शाळा काढल्या त्यांची स्थिती तशीच. डॉक्टर तिला सांगतो की जे जे समाजकार्य केल्याचा तिला गर्व आहे त्यात प्रेम आणि आपुलकीचा लवलेश नसल्यामुळे ते एक ढोंगच आहे. शिवाय तिच्या इस्टेटीवर काम करणाऱ्यांना ती किती दुष्टपणे वागवायची. डॉक्टरचे उदाहरण घ्या. दहा वर्षे तो तिच्याजवळ राहिला, तिची शुश्रूषा केली आणि अचानक एके दिवशी तिने त्याला कसलेही कारण नसताना कामावरून काढून टाकले. त्याचे साधे स्पष्टीकरणही द्यावेसे तिला वाटले नाही. डॉक्टरची बायको तीनदा तिची विनवणी करण्यासाठी गेली: पण प्रिन्सेस तिला भेटलीही नाही...

आणि आता धर्मकर्तव्याच्या नावाखाली ती येथे येते. का येते? आपल्या अहंकाराला खाद्य मिळावे म्हणून. येथे येऊन ह्या बिचाऱ्या माणसांना किती त्रास होतो याची तिला जाणीव नाही. चर्चच्या प्रमुखापासून सेवकापर्यंत साऱ्यांना हिच्या तैनातीत नाचावे लागते. त्यांची कामे सोडून तिच्या पुढेपुढेच करावे लागते. हे तिचे परमेश्वराविषयीचे प्रेम नाही. इतरांना त्रास देण्याचा आपल्याला हक्क आहे हे तिने गृहीत धरले आहे. कारण ती इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे...

डॉक्टरच्या मनात इतक्या वर्षापासून साचलेले तो ओकून टाकतो. आता त्याला तिची भीती नाही. पण प्रिन्सेस प्रचंड अस्वस्थ होते. किती कृतघ्न माणूस आहे हा. आपण आयुष्यभर लोकांचाच तर विचार करीत गेलो. त्यांचे भले व्हावे असे आपल्याला किती मनापासून वाटते! आणि हा क्षुद्र माणूस! आपल्यालाच स्वार्थी म्हणतो, मतलबी, खोटारडी म्हणतो. आपल्या पवित्र भावनांचा अपमान तिला सहन होत नाही. तिला रडू कोसळते. खरेच. दु:ख सहन करण्यात, रडण्यात किती सुख असते. ती वर आकाशात पाहते. तारे उगवलेले असतात. तिला वाटते आपल्या डोळ्यातले अश्रू पाहण्यासाठीच हे तारे उगवले आहेत...

ती आपल्या खोलीत येते. तोंड स्वच्छ धुऊन चेहऱ्यावर पावडर मारते. तिच्यासाठी स्वादिष्ट जेवण आणलेले असते. जेवताना तिचे मन शांत होते. तिला वाटते, डॉक्टरने आपल्याला दूषणे दिली तर काय झाले? सारे जग आपल्याला दूषणे देवो. आपण त्यांना क्षमा केली पाहिजे. शत्रूवरही प्रेम करा असे धर्म सांगत नाही काय! सारे वैभव सोडून आपण येथे येऊन राहू. मग मात्र सारेजण आपले पाय धरण्यासाठी येतील. पण आपण म्हणू की आता फार उशीर झाला आहे... त्या सुखद विचारात तिला कधीतरी झोप लागली.

सकाळी तिला परतायचे होते. तिची घोडागाडी तयार करून ठेवलेली होती. चर्चचे प्रमुख तेथील जोगिणी, सेवक सेविका सारे तिला निरोप द्यायला आलेले असतात. आश्चर्य म्हणजे तो कालचा डॉक्टरही हजर झालेला असतो. तो तिला पाहताच वाकून अभिवादन करून म्हणतो-
'प्रिन्सेस, मला माफ करा...काल मी मूर्खासारखे काहीतरीच बोललो...मला क्षमा करा.’

आणि ती क्षमाशीलवृत्तीने आपला हात पुढे करते. तो वाकून त्याचे हलकेच चुंबन घेतो.

एखाद्या मुक्त पक्ष्यासारखी ती घोडागाडीत येऊन बसते. साऱ्याकडे मोठ्या प्रेमाने पाहत ती आपला हात हलविते. पुन्हा एकदा अननुभूत अशा आनंदाने तिचे हृदय भरून गेले होते. खरेच, क्षमा करण्यात किती आनंद असतो! बगी वेगाने धावत असते, आजूबाजूचे शेतकरी वाकून तिला नमस्कार करीत असतात आणि प्रिन्सेसला वाटते की आपण जण ढगातूनच प्रवास करतो आहो.

"किती सुखात आहे मी!' ती मनाशी पुटपुटते. 'किती आनंदात!'

चेकाव्हची ही एक विलक्षण परिणामकारक कथा आहे. तीव्र उपहास आणि तरल काव्यात्मता यांचा असा एकत्रित उपयोग सहसा आढळत नाही. 'प्रिन्सेस' चे चित्रण उभे करताना तिच्या मनातील काव्यात्म भाववृत्ती अत्यंत ठळकपणे लेखक शब्दबद्ध करतो. पण त्याहीपलीकडे अवघड असे काम हे आहे की ही काव्यात्मता, हा तरलता, ही भावुकता खोटा आहे, दिखाऊ आहे, भ्रामक आहे हेही दाखवून देणे. आणि ते कामही चेकॉव्हने फार कौशल्याने केले आहे त्याचा उपहास येथे अगदी शिगेला पोहोचलेला आहे. या दृष्टीने चर्चमधे आल्यावरची 'प्रिन्सेस’ची चिंतने, तिचे निसर्गाविषयीचे काव्यमय विचार, तिची भावावस्था चेकॉव्ह कशी व्यक्त करतो हे पाहण्यासारखे आहे. अतिशय हळुवार शब्द वापरून तो ती सायंकाळ उभी करतो; पण त्याबरोबरच ह्या विचारामागचे मन हे सामान्य आहे याची जाणीव वाचकाला होत जाते. एकीकडे केवळ शब्दांत म्हणजे कलेत- कसा खोटेपणा लपून बसू शकतो हे दाखविता दाखविता जीवनातही तो कसा लपलेला असतो हेही चेकॉव्ह उघड करतो. मोहक शब्द म्हणजे कविता नव्हे. त्या रचनेमागची कवीची मनोवृत्ती महत्त्वाची असते. शब्द फसवे असू शकतात. अशी माणसाची कृत्येही!

आयुष्यभर इतरांवर उपकार करण्यात धन्यता मानणाऱ्या प्रिन्सेसला अनपेक्षितपणे आपल्याविषयीचे इतरांचे कठोर, कटू मत कळते. पण तिचा भ्रमनिरास होत नाही. तिच्या भोवतीचा भ्रमाचा पडदा एवढा घट्ट आहे की डॉक्टरचे तीक्ष्ण शब्दही तो पाहू शकत नाहीत. या भ्रमामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक आगळाच ताठरपणा येतो. सामर्थ्य येते. ह्या भ्रमाच्या घट्ट आवरणामुळेच ती बालिश वाटते पण खोटारडी वाटत नाहीत. क्रूर व नीच वाटत नाही. ती जे करते ते चांगलेच आहे असा तिचा ठाम विश्वास आहे. आत एक बाहेर एक असा कुटिलपणा तिच्याजवळ नाही. डॉक्टरची भेट होऊन गेल्यावर ती रडते. पण हे रडणे आपली चूक ध्यानात येऊन नव्हे तर आपल्याविषयी वाईट मत मनात ठेवून डॉक्टरने जी चूक केली आहे त्याबद्दल,डॉक्टरबद्दल. परमेश्वरा, पाप्यांना क्षमा कर....

व्यक्तीच्या मनातले विचार आणि त्याचे वर्तन यांच्यातील हे साम्य आहे की विरोध अशी एक गुंतागुंत चेकॉव्हने निर्माण करून ठेवली आहे. प्रिन्सेसच्या मनातील विचार चांगले आहेत आणि तिचे वर्तनही तिच्या दृष्टीने 'चांगलेच' आहे. पण डॉक्टरच्या दृष्टीने?

आता आपण सत्य आणि भ्रम यांच्या व्यक्तिनिष्ठ रूपांकडून, त्यांच्या वस्तुनिष्ठ रूपांकडे येऊ लागतो. जीवन व्यवहाराच्या दृष्टीने एखादे कृत्य फक्त करणाऱ्याला चांगले वाटून चालत नाही. ते समाजाच्या दृष्टीने, नैतिक दृष्टीनेही चांगले असावे लागते. (म्हणजे शेवटी चांगलेपणा हा देखील त्याच्या उपयोगावर अवलंबून असतो का? असा एक प्रश्न आपल्या मनात उभा राहतो आणि हेही ध्यानात येते की अशा प्रश्नाचे वस्तुनिष्ठ उत्तर असू शकत नाही.) डॉक्टरचे व्यक्तिचित्र रेखाटताना चेकॉव्हने त्यातही कशी गुंतागुंत करून ठेवली आहे हे पाहिले म्हणजे अगदी छोट्या अवकाशात केवढे विश्व चेकॉव्ह गोठवून ठेवू शकतो याची कल्पना येते. चेकॉव्ह हा स्वत: एक डॉक्टर आहे. पण म्हणून आपल्या सहानुभूतीचा पूर तो या पात्रावर लोटत नाही. त्याला डॉक्टरबद्दल सहानुभूती वाटते; पण त्यामुळे तो त्याला झुकते माप द्यायला मुळीच तयार नाही.

प्रिन्सेसच्या खानदानी व्यक्तिमत्वासमोर उभा केलेला डॉक्टर हा एक सामान्य आहे. त्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. कारण तो पूर्वी तिच्या नोकरीत होता, आज चर्चमधे नोकरी करतोय. त्याच्या मनात प्रिन्सेसविषयीया राग दडलेला आहे. पाच वर्षापूर्वी तिने त्याला विनाकारण नोकरीतून काढून टाकले म्हणून हा राग आहे. आणि मनात एखाद्याविषयी राग ठेवल्याने स्वत:चे मनच दूषित होतो असते. आत तो कुठेतरी व्यथित असतो आणि कुढत असतो. आज त्याला त्या अपमानाचा 'बदला' घेण्याची संधी मिळते आणि तो ताडताड तिला सुनावतो. तिच्यावर आरोप करतो. ही सारी सामान्यपणाचीच लक्षणे आहेत. त्याच्याजवळ तर काही भव्य विचारही नाहीत किंवा कृत्यातून ते दाखविण्याची इच्छाही नाही. तो एक साधा पोटार्थी माणूस आहे.

डॉक्टर प्रिन्सेसला तिच्या कृत्याबद्दल सुनावताना चेकॉव्हने त्याचे वर्णन केले आहे. तिचे एकेक दुष्कृत्य आठवून तो छद्मीपणाने हसतो. चेकॉव्ह लिहितो- 'त्याचे हास्य एखाद्या दुष्ट माणसासारखे वाईट आणि कठोर होते. तो दातओठ खात होता. त्याचा आवाज. त्याचा चेहरा, त्याचे हावभाव सारे दर्शवीत होते की त्याच्या मनात प्रिन्सेसबद्दल केवढी घृणा आहे. तो जे सांगत होता त्यात हसण्यासारखे काही नव्हते तरी सांगताना तो हसत होता. जणू त्याला आनंद झाला आहे.'

या ठिकाणी आपल्या (पुन्हा एकदा) लक्षात येते की चेकॉव्हला गरीब विरुद्ध श्रीमंत असा संघर्ष दाखविण्यात रस नाही. आपल्या गरीब पात्रालाही त्याने अनेक दोषांचा धनी केले आहे ते यासाठीच. चांगले आणि वाईट यातलाही हा संघर्ष नाही. कारण दोघांपैकी कुणीच पूर्णपणे चांगले किंवा वाईट नाही. आता विचार केल्यावर बाह्य तपशील बाजूला सारल्यावर आपण शेवटी खऱ्या 'चेकॉव्हिअन थीम' पाशी येऊन पोहोचतो.

हे सारे घडल्यावर देखील, दुसऱ्या दिवशी प्रिन्सेसला निरोप देताना डॉक्टर तेथे येतो. नुसता येत नाही तर तिची क्षमा देखील मागतो. सामान्य माणसाचे दुबळेपण हे कृतीतून अधोरेखित होते. आपल्या मनाला भिडते. खोलवर रुतते. डॉक्टरला ठाऊक असते की प्रिन्सेसचे चर्चच्या बिशपशीही फार चांगले संबंध आहेत आणि त्याला भीती वाटते की तिने जर आपली तक्रार केली तर ही नोकरीही आपल्याला सोडावी लागेल. म्हणून तो तिची क्षमा मागतो. या ठिकाणी डॉक्टरचे व्यक्तिमत्व ’ट्रॅजिक’ बनून जाते. भरडल्या जाणाऱ्या आणि त्या अन्यायाविरुद्ध बोलूही न शकणाऱ्या असंख्य सामान्य माणसांचा तो प्रतिनिधी बनून जातो.

आणि आता चेकॉव्हच्या कथेतले पात्र बनण्याचे भाग्य त्याला लाभते!

- oOo -

पुस्तक: ’कवडसे पकडणारा कलावंत’
लेखक: विजय पाडळकर
प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन
आवृत्ती पहिली (२००४)
पृ. ८५-८९.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा