गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१७

वेचताना... : एक होता कार्व्हर

'एका अर्वाचीन मराठी पुस्तकाची चाळीसावी(!) आवृत्ती मला परवा मिळाली.'

हे विधान ऐकून बहुतेक वाचक दचकतील. चटकन तुकोबाची गाथा अथवा तत्सम अध्यात्मिक किंवा सुलभ कामसूत्र या दोन टोकांपैकी एखाद्या प्रकारचे पुस्तक असेल असा तर्क करून बहुतेक जण मोकळे होतील. पण मी चटकन 'अर्वाचीन' या शब्दाचा वापर केला आहे हे निदर्शनास आणून देईन. 

हे पाहून बहुतेकांचा तर्क एखाद्या सेल्फ हेल्प प्रकारच्या पुस्तकाच्या अनुवादाकडे किंवा ’१००१ पाकक्रिया’ सदृश पुस्तकाकडे जाईल. पण हे दोन्ही तर्क चुकले आहेत असे मला सांगावे लागेल. अगदी अभ्यासक्रमाची पुस्तकेदेखील ठराविक काळानंतर बदलत असल्याने त्यांचे पुनर्मुद्रण देखील चाळीस वेळा होत नसावे. गुगल न करता तर्क करून पाहणाया बहुसंख्येला हे पुस्तक ओळखता येण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. काही जणांचा तर्क इतस्ततः धावून आला असेल. अगदी एक दोघांनीच कदाचित पुस्तक कोणते याचा तर्क केला असेल.

एक होता कार्व्हर

वाईट म्हणा, चांगली म्हणा मला एक खोड आहे. वाचत असताना पुस्तकातील काही उतार्‍यांवर मी खुणा करून ठेवतो. पुढे मागे संदर्भ म्हणून वापरायचे तर उपयोगात येते. या अधोरेखित करण्याचा आणखी एक फायदा असा की काही काळानंतर आपण जेव्हा ते पुस्तक पुन्हा हाती घेतो तेव्हा त्या अधोरेखितांबाबत आपली आजची भावना, आजचे मत काय हे अजमावून पाहताना मजा येते. बरेचदा असं होतं की तेव्हा महत्त्वाचा वाटलेला मजकूर आज तितका महत्त्वाचा, तितका अर्थपूर्ण वा भावपूर्ण किंवा लेखकाबद्दल प्रभावित करणारा वाटत नाही. कधी कधी तर तो मजकूर चक्क हास्यास्पद वाटतो, नि तेव्हा आपण याला अधोरेखित करावे असे आपल्याला काय दिसले होते याचे कोडे पडते. 

वर ज्या पुस्तकाच्या चाळीसाव्या आवृत्तीबाबत मी वर उल्लेख केला आहे त्याची दुसरी आवृत्ती - वीस-बावीस वर्षांपूर्वीची - माझ्याकडे अजून आहे. ते पुस्तक वाचताना अधोरेखित केलेला मजकूर मी आज जेव्हा वाचतो तेव्हा मला असं जाणवतं की तो मजकूर आजही मला समर्पक, कालसुसंगत वाटतो, तितकाच महत्त्वाचा वाटतो.

या बाबाची ही 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी' संपून हा आपल्या नियत द्रोणागिरीवर कधी टेकणार असा प्रश्न एव्हाना तुमच्या मनात नक्की उमटला असेल. पण थांबा. मला अजून एक शेपूट लावायचे आहे.

तुम्ही जर महाविद्यालयीन किंवा त्याहून मोठ्या वयाचे असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारून पहा.'एखाद्या शास्त्रज्ञाचे चरित्र वाचून आपल्याला किती महिने/वर्षे झाली?' माझी खात्री आहे की उत्तर महिन्यांमधे नव्हे, वर्षांमधे असेल. याचे सोपे कारण म्हणजे शास्त्रज्ञांची चरित्रे ही बाळबोध लिहायची आणि शाळेतील मुलांना मोटिवेट किंवा प्रोत्साहित करण्यासाठी द्यायची असतात असा आपला समज असतो. शाळा संपली की शास्त्रज्ञांच्या जिज्ञासू वृत्तीचा आपला संबंध संपतो. 

एव्हाना आईबापांनी "कर्मदरिद्री शास्त्रज्ञ वगैरे होण्यापेक्षा खणखण पैसे वाजवून घेणारा एंजिनियर, डॉक्टर किंवा अलीकडची चूष म्हणजे एमबीए होणे कसे 'डिमांडमधे' आहे." हे आपल्या बबड्या किंवा बबडीला पटवून दिलेले असते आणि हिंदी चित्रपटांतून आपले आदर्श शोधणार्‍या बबड्या/बबडींनी ते खळखळ न करता मान्य केलेले असते. अगदी शाळकरी पोराचे आईबाप देखील 'आमच्या बबड्याचे गीतेचे दोन अध्याय पाठ आहेत.' हे जितक्या आवर्जून आणि कौतुकाने सांगतात, त्याच्या शतांश प्रमाणातही आपल्या पोराने वाचलेल्या शास्त्रज्ञांबाबत बोलत नाहीत. विज्ञानविषयक पुस्तकांबाबत अथवा वैज्ञानिकांच्या चरित्राबद्दल बोलत नाहीत. देशातील भावी पिढीला 'घडवण्याचा' आपला हा दृष्टीकोन पाहता हा देश ज्ञान आणि भौतिक गरजा याबाबत कायमच परावलंबी का आहे याचे आश्चर्य वाटेनासे होते.

आता शास्त्रज्ञ म्हटल्यावर पुस्तक कोणते याबाबत अचूक तर्क करणार्‍यांची संख्या नक्की वाढली असेल. कारण गेल्या सुमारे तीस वर्षांत - आजच्या वेगवान युगात पाच वर्षांची एक पिढी असे मानले जात असल्याने - सहा पिढ्यांपैकी बहुतेक वाचकांनी हे पुस्तक वाचले असेल किंवा त्याबाबत नक्की ऐकले असेल. 

मी 'एक होता कार्व्हर' या पुस्तकाबद्दल बोलतो आहे. एका आईने आपल्या मुलाला झोपण्यापूर्वी गोष्ट सांगताना 'जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर' या शास्त्रज्ञाची गोष्ट सांगितली. त्या गोष्टीचा त्या आईच्या दोनही मुलांवर इतका खोल परिणाम झाला की ती गोष्ट पुस्तक रुपाने इतर मुलांपर्यंत पोचवावी असा आग्रहच त्यांनी धरला आणि त्यातून साकारलं हे अद्वितीय पुस्तक.

'शास्त्रज्ञाचे चरित्र' या शीर्षकाखाली येणारे पुस्तक नीरस, भावहीन आणि मख्ख तपशीलाने भरलेले असते, मुलांना त्या व्यक्ती आणि त्याच्या विषयात अजिबात रस निर्माण होऊ नये याच उद्देशाने लिहिल्यासारखे असते. 'एक होता...' या नियमाला सणसणीत अपवाद आहे याचे कारण ते कोण्या पोटार्थी, किंवा मोले घातले लिहाया' लेखकाने लिहिलेले नाही, एका आईने आपल्या मुलांना सांगितलेली 'गोष्ट' आहे ही. त्यामुळे त्यातील भाषा प्रवाही आणि प्रासादिक आहे, मुलांना गुंगवून ठेवणारी आहे. 

कार्व्हर यांच्या संशोधन तपशीलासोबत निव्वळ त्यांचे आईवडील कोण, त्यांचे घराणे वगैरे पारंपरिक मार्गाने न जाता, त्यांच्या जन्मापाशी असलेल्या विदारक सामाजिक परिस्थितीसह त्यांच्या पुढील वाटचालीशी निगडित अशा अनेक सामाजिक तपशीलांसह ते उभे आहे. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ झाल्यानंतरही त्यांना सहन करावे लागणारे वर्णभेदाचे चटके त्यांच्याप्रती सहानुभूती निर्माण करण्यासाठी नव्हे तर त्यांनी त्या परिस्थितीत 'विरोधाशिवाय केलेल्या विद्रोहा'ला सहज सोप्या भाषेत समोर ठेवणारे आहे. (आपल्या देशातील पुरोगामी म्हणवणार्‍यांनी आणि स्वतःला वंचितांचा प्रतिनिधी समजणार्‍यांनी त्याच्या अप्रोचचा अभ्यास करायला हवा असे मला राहून राहून वाटत आले आहे.) आणि म्हणूनच हे पुस्तक ज्यांनी वाचायला हवे असा वयोगट 'वाचता येऊ लागल्यापासून मरेपर्यंत केव्हाही.' असाच मी गृहित धरतो.

या पुस्तकातून निवडलेला आजचा वेचा हा खुद्द कार्व्हर यांच्याबद्दल नाही! तो आहे त्यांची सामाजिक पार्श्वभूमी आणि त्यांच्या कार्यक्षेत्राची पार्श्वभूमी विशद करणारा. यातले लहान लहान भू-राजकीय तपशील त्यांच्या समोरील आव्हानांचे स्वरूप उभे करतात. यातील सामाजिक भवताल आणि वारसा यांची तुलना भारतातील वंचित वर्गाच्या वाटचालीशीही करून पाहता येईल.

(या पुस्तकातील एक वेचा: http://vechitchaalalo.blogspot.com/2017/02/Carver.html)

(निवडलेला वेचा बराच मोठा असल्याने विषयाचा हेतू ध्यानात ठेवून हेतूशी सुसंगत नसलेला काही ठिकाणचा तपशील वगळला आहे. वगळलेल्या मजकुराची जागा '...' या चिन्हाने दर्शवली आहे.)


हे वाचले का?

स्वातंत्र्यग्रस्त

इ.स. १८६५ च्या डिसेंबर महिन्यात निग्रोंच्या स्वांतत्र्याला अधिकृत मान्यता देण्यात आली. अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट झाल्याचं घोषित करण्यात आलं.

ज्यांना फक्त हुकूमच ऐकायची सवय होती, कपाशीत राबणं एवढाच ज्यांच्या आयुष्याचा अर्थ होता, अशा अडाणी निग्रो गुलामांना कायद्याने (घटनेने) स्वतंत्र केलं. पण स्वातंत्र्य उपभोगण्याची क्षमता त्यांच्यात एकाएकी कशी येणार! अडीच शतकं गुलामीत घालवलेल्या या चाळीस लाख लोकांपुढे मिळालेल्या स्वातंत्र्याने गंभीर समस्या उभ्या केल्या होत्या.

ना अन्न, ना वस्त्र ना निवारा! भविष्यकाळासाठी तरतूद करायची असते हेही त्यांना कोणी शिकवलेलं नाही. प्रत्येक निग्रो विकला गेलेला. त्यामुळे कुटुंबव्यवस्था नाही. लग्नसंस्था नाही. यांच्या स्त्रिया म्हणजे मळेवाल्यांची मालमत्ता. कसलाच ठावठिकाणा नसलेला हा समाज मुक्त म्हणून रस्त्यावर आला.

रोगमुक्त करण्यासाठी शस्त्रक्रिया केली गेली. त्यानंतर रुग्णाची सेवा करायला, औषधोपचार करायला कोणी नाही अशी अवस्था!

एक होता कार्व्हर

स्वतंत्र म्हणून त्यांना आता गोर्‍यांच्या बरोबरीने जगायचं होतं. मधलं अंतर काटण्यासाठी उरी फुटेपर्यंत धावायचं होतं. या नवमुक्त समाजापुढे अनेक प्रश्न होते. राहत्या घरांचा प्रश्न. शिक्षणाचा प्रश्न. कुटुंबसंस्था निर्माण करण्याची गरज. जीवनमान उंचावण्याची आवश्यकता. एक ना अनेक.

कापूस-वेचणीपलिकडे दुसरं कसलंही कसब हाताला माहीत नाही. स्वतःच्या मालकीची जमीन नाही. शिक्षण नाही. नोकरी नाही. काही काही जण तर सत्तर-ऐंशीच्या घरातले. उभ्या आयुष्यात आपला मळा सोडून कुठेही न गेलेले. त्यांनी आता या सरत्या वयात जायचं कुठे! बहुतेक सारे आपल्या जुन्या मालकाकडे परतले. कोरभर अन्नाने त्यांना स्वातंत्र्याला महाग केलं होतं.

स्वातंत्र्य म्हणजे काय हे त्यांना पुरतेपणी कळलंच नव्हतं.शिक्षण, स्वातंत्र्य म्हणजे शारीरिक कष्टांतून मुक्तता एवढाच अर्थ त्यांनी लावला होता. दैनिक गरजा भागवण्यासाठी श्रम केले पाहिजेत, हे त्यांना पटत नव्हतं. ग्रीक, लॅटिन भाषा फाड्फाड बोलता येणं, बँकिंग, कॉमर्स विषय अभ्यासणं हेच मोठेपणाचं ते लक्षण समजत होते.

दक्षिणेत मळेवाल्यांनी राजकीय सत्ता काबीज केली होती. त्यांना आपले मळे पिकवायला गुलाम हवेच होते. गुलामगिरी ही दक्षिणी संस्कृतीचाच भाग बनली होती. या प्रथेला दक्षिणी राज्यांच्या कायद्याने संरक्षण दिलं. जुनं बायबल, प्राचीन ग्रीसमधील गुलामगिरीची प्रथा याच्या आधारे तिचं समर्थन होऊ लागलं. उत्तरेतील कापडाच्या गिरण्या दक्षिणेच्या कापसावर अवलंबून, त्यामुळे उत्तरीय गौरवर्णीय भांडवलदार कारखानदार या गुलामगिरीकडे सोयीस्करपणे डोळेझाक करीत होते.

यादवी युद्धात विजयी झालेल्या 'फेडरल सरकार'ने दक्षिणी राज्यांतून तथाकथित 'पुनर्रचना सरकारे' स्थापन केली. मुक्त गुलामांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने 'फ्रिडमन्स ब्यूरो' स्थापण्यात आले.

घटनेच्या १३ व्या दुरुस्तीच्या आधारे कायद्याने गुलामगिरीचा अंत झाला होता तरी दक्षिणेत काय किंवा उत्तरेस काय, निग्रोंचा दर्जा कनिष्ठच मानणारे गौरवर्णीय 'वांशिक समानते'च्या बाबतीत मूग गिळून होते. न्यूयॉर्क, शिकागो, डेट्रॉईट इ. मोठमोठ्या शहरांतूनही निग्रोंना पक्षपात सहन करावा लागत होता.

या पंक्तिप्रपंचावर, भेदाभेद करणार्‍या दक्षिणी कायद्यांवर बंदी घालण्याच्या हेतूने फ्रिडमन्स ब्यूरोने नवीन विधेयक मांडलं. 'अमेरिकन संघराज्यात जन्म पावलेली, तसेच संघराज्याच्या न्यायकक्षेत येणारी सर्व माणसं अमेरिकन संघराज्याचे नागरिक आहेत. तसेच ज्या घटक राज्यात ती राहतात त्यांचेही नागरिक आहेत.' या विधेयकामागचा हेतू एकच - निग्रोंच्या नागरिकत्वाच्या हक्काचं संरक्षण व्हावं.

१८६८ मध्ये अलाबामा, जॉर्जिया, फ्लोरिडा इत्यादी सात दक्षिणी घटकराज्यांना पुनश्च संघराज्यात समाविष्ट करून घेण्यात आलं. फ्रिडमन्स ब्यूरोचं विधेयक घटनेतील चौदावी दुरुस्ती म्हणून मान्य झालं.

नव्यानेच मताधिकार मिळालेल्या निग्रोंनी दक्षिणी राज्यांतील बर्‍याच विधिमंडळांतून मताधिकाराच्या दृष्टीने महत्त्वाचं स्थान मिळवलं. आपलं राजकीय भवितव्य उजळ करण्यासाठी युद्धोत्तर काळात दक्षिणेत स्थायिक झालेल्या उत्तरीय गोर्‍यांनीही बर्‍याच विधिमंडळांतून आघाडी मिळवली. निग्रो आणि ही उत्तरीय मंडळी यांच्या युतीपुढे मूठभर गोर्‍यांचं काही चालेना, आपली जुनी संस्कृती धोक्यात आली; नव्या राजवटीला आळा घालण्याचं कायदेशीर साधन आपल्या हाती नाही; ही कुचंबणा ध्यानी आल्यावर गौरकाय पूर्णपणे निराश झाले. मग त्यांनी बेकायदेशीर साधनांचा अंगीकार केला. हिंसाचार, घातपात, जाळपोळ. दक्षिण गजबजून गेली. यात होरपळून निघत होता निग्रो समाज.

यात भर म्हणून की काय अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने या चौदाव्या दुरुस्तीचा सोयीस्कर अर्थ लावला. फक्त फेडरल सरकार आणि प्रजाजनांचे अधिकार या संबंधापुरतीच ती दुरुस्ती मर्यादित ठरवली. दक्षिणेतील शाळा, वाहतुकीची साधनं, करमणुकीची ठिकाणं यातून वर्णभेद चालू ठेवण्यास मुभा दिली*. झालं, वर्णद्वेष्ट्यांचं फावलं. पद्धतशीरपणे वर्णभेद पाळला जाऊ लागला. अगदी फेडरल सरकारच्या सैन्यात, नोकरीत या वर्णभेदाला कायदेशीर अधिष्ठान मिळालं. एकूण काय तर १४ व्या दुरुस्तीमुळे निग्रोंना राजकीय समाज दर्जा मिळाला , परंतु सामाजिक समान दर्जा मिळाला नाही. वर्णभेद होता तसाच कडवा राहिला. राजकीय क्षेत्रात तो विधिमंडळ सदस्य होऊ शकत होता तरी बाकी सर्व क्षेत्रांत उपेक्षितच होता. निग्रो बांधवांच्या मतांवर निवडून आलेले काही उमेदवार मताधिकाराच्या जोरावर ले. गव्हर्नर, गव्हर्नर इत्यादी पदांवर नेमलेही जात. पण राजकीय कारकीर्द संपताच बहुतेक गव्हर्नर्सना उघड्यावर यावं लागे. पोटासाठी मजुरी करावी लागे. कारण त्यांच्यासाठी दुसरं कोणतंच क्षेत्र उपलब्ध नसे.
-

डॉ. वॉशिंग्टननी** त्यांच्या Up from Slavery या पुस्तकात असाच एक किस्सा सांगितला आहे-

ते एकदा दक्षिणेच्या दौर्‍यावर होते. एका ठिकाणी इमारतीचं बांधकाम चालू होतं. दुसर्‍या मजल्यावर गवंडी खालच्या माणसाला विटा आणण्याची जलदी करत होता.

"गव्हर्नर, जलदी कर. विटा आण."

डॉ. वॉशिंग्टनच्या कानावर ही हाकाटी दोन-चार वेळा आली. ते बुचकळ्यात पडले. ही काय भानगड आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी चौकशी केली. त्यांना समजलं, तो गव्हर्नर म्हणजे एक निग्रो होता. मागच्या निवडणुकीत तो निवडला गेला होता. काही दिवस त्याच्या राज्यात तो ले. गव्हर्नरच्या हुद्द्यावर होता. त्याची कारकीर्द संपल्यावर उपजीविकेसाठी आता तो विटा वाहात होता.

केवळ आपल्या बांधवांच्या मताधिकारावर विधिमंडळात निवडून गेलेल्यांची मुदत संपताच, सार्‍यांची नाही तरी बहुतेक निग्रो उमेदवारांची हीच अवस्था होती. शिक्षणाच्या अभावी, प्रशासनातील अनुभवाच्या अभावी अशा निग्रो उमेदवारांच्या हातून चुका होत त्या वेगळ्याच.

काही सुजाण, भल्या गोर्‍या लोकांना निग्रो समाजाची ही दु:स्थिती जाणवली. त्यांना स्वावलंबी, स्वयंप्रज्ञ बनवायचं असेल तर केवळ पुस्तकी शिक्षण उपयोगाचं नाही; धंदेशिक्षणही देणं आवश्यक आहे. श्रमप्रतिष्ठेवर भर दिला पाहिजे. योग्य संधी दिली गेली तर निग्रो मुलं शिक्षणात मागे पडणार नाहीत. त्यांची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता योग्य दिशेनं वापरली जाणं आवश्यक आहे; हे सारं ध्यानी घेऊन अशा शिक्षणसंस्था सुरू झाल्या.

यादवी युद्धाच्या काळात काळ्या पलटणीचं नेतृत्व करणार्‍या ज. आर्मस्ट्राँग यांनी व्हर्जिनियात Hampton Normal & Industrial Institute सुरू केली. अनेक निग्रो मुलांनी त्याचा लाभ घेतला. अनेक शिक्षक तयार झाले. दक्षिणेच्या अलाबामा राज्यातील टस्कगी खेड्यातून ज. आर्मस्ट्राँग यांना पत्र आलं. "आम्ही निग्रोंसाठी शाळा उघडत आहोत. एक गोरा शिक्षक पाठवा."

ज. आर्मस्ट्राँगनी उत्तर दिलं, "गोरा नाही, पण काळा शिक्षक पाठवत आहे. त्यांचं नाव बुकर टी. वॉशिंग्टन."
-

विपन्न अलाबामा

अलाबामा राज्यात १८३२ साली दोन हजार वस्तीचं एक छोटं खेडं नव्यानेच वसवलं गेलं. 'टस्कगी'. निम्मी वस्ती होती निग्रो गुलामांची. अर्धी उमर गुलामगिरीत काढून मुक्त झालेला ल्यूइस अ‍ॅडॅम्स आणि पूर्वायुष्यात गुलाम पदरी बाळगून असणारा गोरा जॉर्ज कॅम्पबेल या दोघांनी मिळून निग्रोंसाठी शाळा उघडायचं ठरवलं. त्याच शाळेसाठी त्यांनी ज. आर्मस्ट्राँगना पत्र पाठवलं होतं. ज. आर्मस्ट्राँगनी आपल्या हॅम्पटन संस्थेतून ज्ञानाची मशाल हाती घेतलेल्या ताज्या दमाच्या निग्रो तरुणाला, बुकर टी. वॉशिंग्टनला या शाळेसाठी पाठवलं.

४ जुलै १८८१ रोजी बुकर टी. वॉशिंग्टन यांनी टस्कगीत ज्ञानदीप प्रज्वलित केला-

Tuskegee Normal and Industrial Institute for Negros.

एक मोडकं, गळकं, जुनाट चर्च आणि तीस काळे विद्यार्थी - चौदा ते साठ या ऐसपैस वयोगटातले! बुकर टी. वॉशिंग्टन यांच्या शाळेचं हे प्राथमिक स्वरूप.

वॉशिंग्टननी एका विद्यार्थ्याला त्याची हकीकत विचारली. त्याने सांगितलं तो व्हर्जिनियात जन्मला. १८४५ साली अलाबामात विकला गेला.

वॉशिंग्टननी विचारलं, "तुम्ही किती जण होतात?"

"पाच जण. मी, माझा भाऊ अन् तीन खेचरं."

आपल्याला नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग कसा घ्यावा याची कल्पना निग्रो समाजाला नव्हती. अज्ञानाचं भयानक ओझं झुगारून देऊन साधं, सरळ, सहज जीवन कसं जगावं याचं शिक्षण त्यांना मिळणं आवश्यक होतं. ही जबाबदारी आपल्यासारख्या पदवीधरांची आहे, याची जाणीव उराशी बाळगून वॉशिंग्टन यांनी कंबर कसली.

"पद्धतशीरपणे काम पार पाडत राहण्याची, टप्प्याटप्प्याने ज्ञान आत्मसात करण्याची सवय या विद्यार्थ्यांना लावणं भाग होतं... गुलामीत कष्टच केले. आता मुक्त झाल्यावर ज्ञानार्जन करताना कष्ट करण्याची गरज काय असं म्हणणं म्हणजे सत्याला सामोरं जाण्यास नाकारणं...

उज्ज्वल पूर्वेतिहासाचं पाठबळ नाही. जिद्दीनं जगून नाव रोशन करावं असं मागे घराणं नाही. पूर्वजांचा धागा आईच्या मागे पोहोचत नाही... ही स्थिती आमच्या वंशजांपासून तरी बदलली गेली पाहिजे. त्यांना घराणं मिळालं पाहिजे. कुटुंब मिळालं पाहिजे. अभिमान वाटावा असे पूर्वज आमच्या रूपातून मिळाले पाहिजेत. आमच्याकडून त्यांना ज्ञानाचा वारसा मिळाला असं त्यांना अभिमानाने सांगता यावं... ही जबाबदारी आमच्यासारख्या पदवीधरांची आहे. राजकारणाचा मोह टाकून मी टस्कगीत दाखल झालो ते याचसाठी...**
-

१८८१ च्या अखेरीस वॉशिंग्टननी टस्कगी खेड्याबाहेरची १०० एकर जमीन ५०० डॉलर्सना विकत घेतली. अर्थात पैसे भरले ज. आर्मस्ट्राँगनी.

वर्षभरात विद्यार्थ्यांची संख्या पन्नासच्या घरात गेली. वॉशिंग्टन यांचं स्वप्न पन्नास पटींनी वाढलं. त्या पन्नास विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन त्यांनी शंभर एकर जमिनीवर आपलं स्वप्न उभारण्यास सुरुवात केली.

गुलामगिरीत- मग ती आर्थिक असो की सामाजिक- राबण्यापेक्षा आत्मोद्धारासाठी पडतील ते कष्ट उपसण्यात प्रतिष्ठा आहे, हे आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवण्यासाठी त्यांनी स्वतः हातात कुदळ, फावडं घेऊन धडे घालून दिले. मुळाक्षरांबरोबर धंदेशिक्षणाचे पाठ त्यांना गिरवायला लावले. सुतारकाम, गाद्या तयार करणं, चपला शिवणं, विटा भाजणं इत्यादी कामात त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना तयार केलं.
...

श्रम, शारीरिक कष्ट ही एवढी एकच गोष्ट निग्रोंकडे विकण्यासाठी होती. त्याच्याच आधारावर त्यांना आपलं अस्तित्व टिकवता येणार होतं. गोर्‍यांच्या बरोबरीने त्यांना हक्क मिळायला हवे होते. ते हक्क निग्रो निश्चितच मिळवू शकणार होते, यात शंका नव्हती. पण त्यासाठी आधी त्यांना आपलं अस्तित्व टिकवणं आवश्यक होतं. समानता भोगण्यासाठी लायकी वाढवणं आवश्यक होतं. आयुष्याच्या गरजा भागवण्यासाठी अंगी कसब हवं, कौशल्य हवं, विनिमयाचं काही साधन हवं, आयुष्य समृद्ध करणारी कारागिरी अंगी हवी.

उच्चभ्रू समाजाची भ्रष्ट नक्कल म्हणून कॉमर्स, बँकिंग चा अभ्यास करणारे पुस्तकवीर वॉशिंग्टनना नको होते. त्यांना हवे होते समाज घडवणारे शिक्षक. अंत्योदयासाठी कटिबद्ध होणारे पदवीधर. त्यासाठीच त्यांची धडपड चालू होती.
...

गुलामांच्या व्यापारावर बंदी घालणारा कायदा युरोपीय राष्ट्रांनी अमलात आणायला सुरुवात केल्यावर दलालांनी अमेरिकेच्या दक्षिणेत अवैध मार्गाने व्यापार सुरू केला. हे गुलाम म्हणजे आफ्रिकेतील अशिक्षित, अडाणी निग्रो. या निग्रोंच्याच शारीरिक बळावर दक्षिण अमेरिकेचं प्रचंड 'कापूस साम्राज्य' पोसलं जात होतं. जवळजवळ फुकटात पडणारं मनुष्यबळ आणि कापसाला मिळणारा भरमसाठ भाव, या दुहेरी फायद्यामुळे दक्षिणेकडचे गोरे शेतकरी गब्बर झाले होते. घराघरातून सोन्याचा धूर निघत होता. 'कापूस-सम्राट' दिवसादिवसांनी आपलं धन फुगवत होते आणि आफ्रिकेतून आणलेला निग्रो कणाकणाने झिजत होता. झिजता - झिजता कपाशीचं साम्राज्य विस्तारीत होता. कापसामुळे आणलेल्या सुबत्तेमुळे येथील शेतकरी आंधळा झाला होता. कपाशीचा हंगाम संपताच तो गुलामांना जंगलतोड करायला लावून जमीन तयार करायला लावीत होता- पुढच्या हंगामात अधिक जमीन कापसाच्या लागवडीखाली आणण्यासाठी. जंगल-तोडीनंतर जमिनीतील मुळंही उखडून जाळली जात. ही आग अपघाताने वेडीवाकडी पसरे आणि उरलीसुरली वनसंपत्ती स्वाहा करी.

कापूस-सम्राटांचा हा अधाशीपणा अलाबामा राज्याला भोवला. झाडांचा समूळ नाश केल्याने होणारे दुष्परिणाम अलाबामाला भोगावे लागले. कारण तेथील जमीन उताराची; त्यामुळे घोंघावणार्‍या वार्‍याने आणि पावसाच्या पाण्याने जमिनीचा वरचा सुपीक थर धुऊन नेला. जमिनीला पकडून ठेवायला झाडं होतीच कुठं! पर्जन्यमानात बदल झाला. हिमवर्षावाच्या रूपानं मिळणार्‍या सुखद ओलाव्याला ती जमीन मुकली. आता तिला तोंड द्यावं लागत होतं झोडपणार्‍या आणि आपल्याला ओरबाडून तुटून नेणार्‍या पावसाला! अलाबामाच्या सुपीक जमिनीची अतोनात धूप झाली. वनस्पतींचं नैसर्गिक खाद्य समुद्राच्या पोटात वाहून गेलं. मग ही उणीव भरून काढण्यासाठी भरमसाठ किंमतीची महागडी, व्यापारी-कृत्रिम खतं! पोटॅश, नत्र, फॉस्फरिक अ‍ॅसिड!

जमिनीची अशी धूप चालू असतानाच तिच्यातला उरला-सुरला कस 'खादाड-कापूस' शोषून घेत होता. त्याच्या लागवडीला खळ, अटकाव कसा तो नव्हताच. वर जमिनीमागून जमीन, शेतामागून शेत उजाड होत चाललेलं. सारा अलाबामा उजाड झाला! पण पैशाच्या धुंदीनं विचारांची कवाडं बंद झाली होती. भविष्याची फिकीर करायला कुणी तयारच नव्हता. सारे विनाशाकडे स्वतःच्या पायांनी वाटचाल करीत होते. डॉलर्स डोळ्यावर बांधून...

गेली अडीचशे वर्षे निग्रो गुलाम अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांच्या समृद्धीसाठी राबत होता. पण जमीन किंवा तिच्यापासून मिळणार उत्पन्न या दोन्हीलाही तो वंचित होता.

मुक्त झालेल्या निग्रोंना ठरल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबामागे चाळीस एकर जमीन आणि एक खेचर मिळालं असतं तर या समाजाचं जीवन थोडं तरी सुसह्य झालं असतं पण तसं न झाल्याने तो पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या पूर्वीच्याच धन्याकडे अन्नावारी राबत होता. त्याच्या इशार्‍यावर आपल्या झोपडीच्या उंबरठ्यापर्यंत कापूसच लावावा लागे. कापसाच्या इशार्‍यावर नाचणार्‍या या दक्षिणेत निग्रोंच्या हलाखीला पारावार उरला नाही. कापसाच्या एकमेव लागवडीमुळे अन्नाचा अभाव; त्यात भर जिवापाड कष्टाची! त्यामुळं तो आणखीनच खचला, पिचला निरुत्साही झाला. कापूस-सम्राटांच्या हावेची झळ निग्रोंपर्यंत मर्यादित न राहता गरीब 'गोर्‍या' शेतकर्‍यांच्या घराला भिडू लागली.

कोणे एके काळी समृद्ध आणि संपन्न असलेल्या अलाबामात आता सर्वत्र नजरेला पडत होता तो उध्वस्त दलित समाज आणि धुपलेली निकस जमीन. जमिनीचा कस शोषण करणारी पिके सातत्याने लावून, जंगलतोड करून आपला विनाशाचा मार्गच जणू त्यांनी आखून घेतला होता. सर्वनाशापासून अलाबामाला- नव्हे, सार्‍या दक्षिणेला वाचविण्यासाठी कोणा तरी तारणहाराची नितांत गरज होती.

- oOo -

* 'अमेरिकेची तोंडओळख (पृष्ठ ५९) - अनुवादः विजय तेंडुलकर
** Up from the Slavery - Dr. Booker T. Washington.
---

पुस्तकः 'एक होता कार्व्हर'
लेखकः वीणा गवाणकर
प्रकाशकः राजहंस प्रकाशन
आवृत्ती चाळीसावी (मे २०१६)
पृष्ठे: ६७ - ७९.


हे वाचले का?