नवीन पोस्ट्सच्या सूचना मिळवण्यासाठी उजवीकडील स्तंभात असलेल्या Follow by Email पर्यायाचा वापर करुन आपला ईमेल पत्ता नोंदवा. किंवा त्याखालील 'Follow’ बटणाचा वापर करा.

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

वेचताना... : सौरभ - १

चित्रपटाचा अवतार झाल्यानंतर, विशेषत: समाजमाध्यमांचा सुळसुळाट आणि मोबाईल क्रांतीनंतर डेटा स्वस्त झाल्यापासून पाहिलेल्या चित्रपटांबद्दल चारचौघात गप्पा मारताना केलेली शेरेबाजी, वैयक्तिक आवडनिवड ही ’परीक्षण’ म्हणून अवतरु लागली आहे. त्याचवेळी मुद्रित माध्यमांतून येणारी परीक्षणे बव्हंशी 'मोले घातले लिहाया’ प्रकारची असतात आणि त्याच्या शेवटी दिलेले रेटिंग पाहण्यापुरतीच चाळली जाऊ लागल आहेत.

दृश्य माध्यमांचा असा परिस्फोट झाल्यानंतर आता शब्दांना माघार घ्यावी लागत आहे. मुद्रित माध्यमांच्या इंटरनेट अवतारात तर आता काही रोजच्या जगण्यातील काही विषयांच्या स्तंभातून तर ’नाव छापून येते’ या एकमेव आनंदासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थिनींकडून ’जागाभरती’ केली जाते आहे. त्यामुळे अर्थातच सुमारांची सद्दी निर्माण झाली आहे. अशा वेळी शब्दांशी, त्याचसोबत विचार आणि निर्मितीशी इमान राखणारे लेखन अधिकाधिक दुर्मिळ होताना दिसते आहे.

पूर्वी बाजारात नव्याने आलेल्या पुस्तकांची चर्चा करणारे गट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेली नवी मालिका, नवा इंग्रजी वा परभाषिक चित्रपट यावर चर्चा करतात. पुस्तक वाचनातून आकलन नि आत्मसात होणारे ज्ञानच काय माहितीही या नव्या माध्यमांत अजून मूळ धरु शकलेली नाही. या माध्यमांमध्ये बव्हंशी मनोरंजनाचीच सद्दी दिसते. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाबाबत साधकबाधक चर्चा करणे, त्यातून काय मिळाले याचा वेध घेणे ही हळूहळू अस्तंगत होत जाणारी कला आहे.

बाजारात नव्यानेच आलेल्या पुस्तकाबाबत पूर्वी वाचक-चर्चा घडत. त्याची त्याच लेखकाच्या वा अन्य लेखकाच्या अन्य लेखनाशी तुलना केली जाई. ज्या वाचकाने पुस्तक विकत आणले त्याच्याकडून ते उसने नेऊन वाचले जाई, एकमेकांना त्याची शिफारसही होई. आता हा सामान्य-वाचक-संवादही विरुन जाताना दिसतो आहे. नवी पिढी तर ’वाचेन तर इंग्रजीच’ अशी भीष्मप्रतिज्ञाच करुन बसलेली दिसते. करियरमधील सतत ’मागे पडण्याच्या’ भीतीचाच अवतार म्हणजे  'हॅरी पॉटर'पासून 'गेम ऑफ थ्रोन्सप'र्यंत कुठल्याही मालिकेतले ताजे पुस्तक आपण वाचले नाही तर वाळीत टाकले जाऊ अशी भीती त्यांना वाटते की काय कुणास ठाऊक. थोडक्यात मराठी पुस्तकांचे वाचन आणि त्याचे परिशीलन ही बव्हंशी ज्येष्ठांची आणि समीक्षकांची जबाबदारी होऊन राहिली आहे.

एक दोन दशकांपूर्वीपर्यंत केवळ सामान्य वाचकच नव्हे तर अनेक उत्तम आणि श्रेष्ठ लेखक, संपादक, अभ्यासक आपल्या वाचनातील पुस्तकांबद्दल जाहीरपणे बोलत, लिहित असत. त्यातून त्या लेखकामागचा वाचकही समोर येई आणि सामान्य वाचकाला त्या त्या पुस्तकाकडे अथवा त्याच्या लेखकाकडे या लेखकाच्या दृष्टीकोनातून पाहता येई. एकुण वाचकसंस्कृतीला प्रवाही राखण्यात या 'बुक्स-ऑन-बुक्स' किंवा ’कॉलम-ऑन-बुक्स’चा मोठा वाटा आहे. (आता प्रथितयश मराठी वृत्तपत्रेही आणि नियतकालिकेही इंग्रजी पुस्तकांचीच परीक्षणे छापतात.) श्री. बा. जोशी यांचे ’गंगाजळी’चे चार खंड, प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार याचे ’पश्चिमप्रभा’, काळसेकरांचे ’वाचणार्‍याची रोजनिशी’ तसंच जी.एं.च्या पत्रांमधून आपण वाचलेल्या पुस्तकांबद्दल, त्यांच्या लेखकांबद्दल वाचायला मिळते. सादरीकरण-कला आणि दृश्यकलांच्या बाबतीत ज्ञानेश्वर नाडकर्णींचे ’अश्वत्थाची सळसळ’ हे याच प्रकारातले.

प्रसिद्ध संपादक गोविंद तळवलकर यांनीही ’ललित’ या नियतकालिकातून आपल्या वाचनानुभवाच्या आधारे एक सदर चालवले. समीक्षा अथवा परीक्षण या सबगोलंकार आणि पारंपरिक अशा स्वरुपाहून भिन्न अशा दृष्टीकोनातून या लेखनाकडे पाहता येते. काळसेकरांनी रोजनिशीतल्या नोंदीस्वरुपात, म्हणजे काहीशा वैयक्तिक अनुभवस्वरुपात मांडले, जीएंनी बव्हंशी वैयक्तिक पत्र-संवादातून काहीशा अनौपचारिक स्वरुपात कथन केले. तळवलकरांनी लेखनापेक्षा, किंवा लेखनाबरोबरच आपले लक्ष लेखकावर केंद्रीत केले आहे.

'सौरभ' हे त्यांचे सदर दोन खंडात संपादित केले आहे. त्यातील पहिल्या भागात प्रामुख्याने लेखकांबद्दलचे लेख आहेत. त्यात मला विशेष भावलेले लेख आहेत ते चार्ल्स डिकन्स हा प्रख्यात कादंबरीकार आणि आर्थर मिलर या नाटककारावरचे. पण यात सर्वात उत्तम वठलेला लेख आहे तो व्हॅसिली ग्रॉसमन या ज्यू-रशियन लेखकावरचा. उमर खय्यामवरील लेख माहिती म्हणून आवर्जून वाचण्याजोगा. याशिवाय ऑर्वेल, चेकॉव्ह, थॉमस पेन, गटे आदि लेखकांचाही समावेश आहे.

इथे निवडलेला उतारा आहे तो अ‍ॅलन बुलक या इतिहासकारावरच्या लेखातला, आणि हा वेचा आहे तो हिटलर नामे क्रूरकर्म्याबद्दलच्या अ‍ॅलन यांच्या आकलनाबद्दलचा. त्याअर्थी तो व्यक्तिचित्रामधील व्यक्तिचित्र प्रकारात मोडतो. व्यक्ती म्हणून हिटलरच्या प्रवृत्तीचा मागोवा आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे अ‍ॅलन यांचे आकलन आजच्या भारतीय परिस्थितीचीचेच नव्हे तर इतर अनेक देशांतील स्थितीचे भान देणारे ठरू शकेल.

---

क्रूरा मी वंदिले

('सौरभ - १' - गोविंद तळवलकर )

नवा पुरावा तपासल्यावर बुलक याना असे आढळले की, हिटलर हा केवळ सत्तेच्या अनावर लालसेने प्रवृत्त झाला असे जे मत आपण व्यक्त के होते ते पूर्णतः बरोबर नाही. तो ठराविक विचारसरणीने प्रेरित झाला होता. ही त्याची विचारसरणी त्याच्या माइन काम्फ या ग्रंथात प्रगट झाली होती आणि त्याच्या संभाषणांचा संग्रहही ती प्रगट करत होता. ही विचारसरणी वंशवादी होती आणि जर्मन जनतेला त्याने तिच्या जोरावर भारून टाकले. पण हे जर्मनीत कसे शक्य झाले याचेही उत्तर दिले पाहिजे. यामुळे बुलक यांनी आपल्या ग्रंथाची फेररचना केली. परंतु त्याचा मूळ गाभा बदलण्याची गरज नसल्यामुळे त्यांनी तो तसाच ठेवला. बुलक यांच्या ग्रंथास चाळीस वर्षे पूर्ण झाली तेव्हापर्यंत त्याच्या तीस लाख प्रती खपल्या होत्या. त्यानंतर आणखी वाढ झाली असेल. या ग्रंथामुळे बुलक यांचा जगभर नावलौकिक झाला आणि जे ऑक्सफर्ड विद्यापीठ प्राचीन काळच्या इतिहासास विशेष महत्त्व देत आले होते ते आधुनिक काळाच्या इतिहासासही तितकेच महत्त्व देऊ लागले.

बुलक यांनी हिटलरविषयक ग्रंथात केलेले विश्लेषण आजही मोलाचे आहे कारण नंतरच्या काळात अनेक देशांत लहानमोठे हिटलर तयार झाले. बुलक यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे की, हिटलरची हुकूमशाही वा जर्मनीचा आर्थिक वा सामाजिक इतिहास हा आपला विषय नाही, तर हिटलर ही व्यक्ती हा आहे. त्याची प्रवृत्ती काय होती, कोणत्या महत्त्वाकांक्षेने तो प्रेरित झाला होता आणि पहिल्या महायुद्धानंतरच्या जर्मनीतील परिस्थितीचा फायदा त्याने कसा उठवला व सत्ता काबीज केली याची चिकित्सा करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले. ते साध्य करण्यासाठी जर्मन समाज, त्याचा इतिहास इत्यादींची तपासणी त्यांनी केली. 

हिटलर गरीब कुळात जन्मलेला होता. त्याला लहानपणीही बराच संघर्ष करावा लागला होता. त्याचा परिणाम वर्णन करताना बुलक यांनी म्हटले आहे हिटलरचा कोणावरही विश्वास नसे. आपल्यावरील निष्ठेची शपथ घेणारांवरही त्याचा विश्वास नव्हता. या अविश्वासास तुच्छतेची जोड मिळाली होती. सत्तेची आकांक्षा, असूया इत्यादींमुळे लोक प्रेरित झालेले असतात आणि अगदी क्षुद्र अशा साधनांचा वापर ते करतात असे हिटलरचे लोकांबद्दल मत होते. त्याच्या जवळच्या लोकांना तो या दृष्टीनेच वागवत होता. लोकांच्या या प्रवृत्तींचा वापर करून आपले उद्दिष्ट साध्य करणे म्हणजेच राजकारण अशी त्याची नंतर धारणा झालेली होती. हिटलर जेव्हा व्हिएन्नात झगडत होता तेव्हा त्याची काही मते तयार झाली होती. गरीब, दुबळे, अयशस्वी झालेले यांच्याबद्दल त्याला काही सहानुभूती नव्हती. पण त्याचबरोबर सामान्य लोकांत राहूनच राजकारण केले पाहिजे हे त्याला पटले होते. आपल्याला सर्वसत्ताधारी व्हायचे असेल तर हा वर्ग आड येणार नसून खरा अडथळा संघटित कामगारसंघटनांकडून होईल असे त्याचे ठाम मत झाले होते. त्यामुळे व्हिएन्नातील लोकशाही समाजवादी संघटनांबद्दल त्याला कमालीचा तिरस्कार होता. जनसमुदाय प्रेमाने नव्हे तर क्रौर्याने दिपतो व त्यामुळे त्यास आपल्या प्रभावाखाली आणता येते असेही त्याचे आणखी एक प्रमेय होते.

व्हिएन्नातच नव्हे तर हिटलरच्या तरुण वयातील ऑस्ट्रियात ज्यूविरोधी भावना तीव्र होती. हिटलरकडे तो वारसा आला होता आणि तो त्याने जपला व वाढवला. यामुळेच नंतरच्या काळात हिटलरने ऑस्ट्रिया ताब्यात घेतला तेव्हा त्याचे स्वागत करणारा फार मोठा समुदाय तयार होता. ज्यूंच्यामुळेच जर्मनीचा र्‍हास झाला असून त्या समाजाचा विच्छेदच केला पाहिजे असे त्याचे मत बनले होते आणि हाती सत्ता आल्यावर हिटलरने या दृष्टीने पाउले टाकून काही लाख ज्यू नष्ट केले. जनसमुदायाचे मानसशास्त्र हिटलने अभ्यासले होते व त्याने काही आडाखे बांधले होते. समुदायाच्या भावना भडकवायच्या असतील तर त्याच्यापुढे कोणता तरी खरा वा कल्पित शत्रू उभा करावा लागतो आणि हा शत्रूच अवनती घडवून आणत असल्याचे लोकांच्या मनावर सतत बिंबवणे आवश्यक असते. या सूत्रानुसार हिटलरने ज्यू समाजास मानले. त्याच्यामुळे पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला असे तो सांगत असे.

बहुविध पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींची निवड करून सत्ताधारी निवडण्यामुळे दुबळे नेतृत्व पुढे येते म्हणून अशा निवडणुकीस हिटलरचा विरोध होता. सामुदायिक नेतृत्व व कर्तृत्व यावर त्याचा विश्वास नव्हता. नियमित आपल्याला नेतृत्व करण्यासाठी जन्माला घातले असल्याची त्याची ठाम समजूत होती आणि आपल्याशिवाय जर्मनीचा उद्धार कोणाकडूनही होणार नाही अशी त्याची पक्की समजूत होती.

यासाठी त्याने आपल्या मार्गात आड येणाऱ्या पक्षांच्या व व्यक्तींच्या विरुद्ध प्रचाराची मोहीम उघडली. ती उघडताना अतिरेकी व हिंसक भाषा उपयोगी पडते असे त्याचे मत होते. शिवाय उखडून टाकू, नाहीसे करू, गाडून टाकू इत्यादी भाषा वापरली की लोकांत ती वापरणारा नेता हा बलिष्ठ असल्याची भावना निर्माण होते असे हिटलर मानत होता. यामुळे तो नुसती या प्रकारची भाषा वापरूनच थांबला नाही तर तो झपाटल्याप्रमाणे बोलत असे, किंचाळतही असे. या सर्वांचा सामान्य माणसावर परिणाम होत होता. भाषणात व प्रचारात वाटले तितके खोटे बोलण्यास त्यास काही दिक्कत वाटत नव्हती. खोटे बोलावेच लागते आणि खोटे बोलायचे तर अगदी टोकाचे खोटे बोलणे अधिक बरे असे तो मानत होता. विद्वेष पसरवणे सोपे असते आणि ते भावना भडकवण्यास उपयोगी पडते हे जाणून त्याने आपल्या प्रचाराचा रोख त्यावर ठेवला.

हिटलरला संघटित कामगार वा सामान्य लोक यांच्याबद्दल काही प्रेम नव्हते. पण त्यामुळे तो भांडवलदार, कारखानदार यांची तरफदारी करत नव्हता. तो त्यांनाही धमक्या देत होता. यामुळे हिटलर हा आपल्या हिताची जपणूक करणारा असल्याचा समज सामान्य लोकांत पसरण्यास मदत होत होतो. तथापि त्याच्या हाती सत्ता आली तेव्हा जर्मन कारखानदायविरुद्ध त्याने मोहिम राढली नाही. उलट त्यांना मोकळे रान दिले, पण ते देताना कारखानदार आपल्या दहशतीखाली राहतील याबद्दल त्याने कटाक्ष बाळगला. त्याचे आणखी एक सूत्र होते. ते असे की, लोकांत विचारांचा प्रसार करणे धोक्याचे असल्यामुळे त्यांच्यात श्रद्धा निर्माण करणे आवश्यक. विचाराशी मुकाबला करणे सोपे असते. पण श्रद्धेशी कठीण असते. तेव्हा आपल्या मागे येणार्‍या समुदायाला आपल्याशी बांधून ठेवायचे असेल तर त्याच्यात श्रद्धा निर्माण केली पाहिजे असा हिशेब करून त्याने आपले सर्व राजकारण आखले होते. सत्ता, व्यक्तिगत सत्ता व तीही अनिर्बंध सत्ता हे त्याचे उद्दिष्ट होते व त्या ्साठी कसलाही विधिनिषेध तो पाळत नव्हता. बुलक म्हणतात, जर्मनीत तेव्हा जे विधिनिषेधशून्य लोक होते त्यांनाही अचंबा वाटावा अशा रीतीने हिटलर वागत होता.

जगात अनेक क्रांत्या झाल्या. त्यांनी आपल्यापुढे ठेवलेली उद्दिष्टे यशस्वी झालीच असे नव्हे. पण त्यांनी काही विधायक उद्दिष्टे लोकांपुढे ठेवली, काही सर्जनशील, विधायक विचार मांडले. हिटलर जी क्रांती करू पाहात होता, तिने अशी कोणतीच उद्दिष्टे ठेवली नव्हती. त्याचा राष्ट्रीय समाजवाद हा विनाशकारी आणि विध्वंसक होता असा निष्कर्ष बुलक यांनी सबळ पुराव्यानिशी काढला आहे. परंतु त्यांचे म्हणणे असे की, जर्मनीत बिस्मार्कपासूनच राष्ट्रवादी भावनेचा अतिरेक होत होता आणि त्यामुळे जर्मन लोकांची मनोभूमिका तयार झाली होती. यास हिटलरने आक्रमकतेची जोड दिली आणि विद्वेष पसरवण्यावर भर दिला. यामुळे त्याने फक्त विध्वंस घडवून आणला, काही निर्माण केले नाही. सर्वच हुकूमशहांच्या मनोभूमिकेची ओळख यामुळे होऊ शकते.

-oOo-

पुस्तक: ’सौरभ - १’
लेखक: गोविंद तळवलकर
प्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती पहिली (२०१०)
पृ. ११८ - १२१

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

एव्हरिबडी लव्ज आँट सेरिना’एव्हरीबडी लव्ज रेमंड’ ही तशी आता जुनी मालिका, कौटुंबिक प्रवासातील घटना नि संबंधांमधील विनोदाचा हात धरुन चालणारी. सदैव सहानुभूतीच्या शोधात असलेला 'ममाज बॉय' रेमंड; त्याचा फायदा घेऊन (किंवा त्याला कारण असणारी) त्याला सदैव पदराआड राखू पाहणारी त्याची भोचक आई मेरी; बाप म्हणून आपल्या कर्तव्याबाबत बव्हंशी बेफिकीर असणारे आणि खाण्यात व भूतकाळात जगणारे रेमंडचे वडील फ्रँक आणि संसार हेच जीवितकार्य म्हणून मुलाबाळात रमलेली  रेमंडची पत्नी डेब्रा... हे कुटुंब मला बव्हंशी आपल्या भारतीय कुटुंबाचे प्रतिनिधीच वाटत आले आहे. 

सून ही नेहेमीच घरकामाच्या बाबत नालायक असते असा ठाम समज असलेली - जवळजवळ भारतीय म्हणावी अशी - सासू मेरी, आपल्या संसारात अशा सासूची सतत ढवळाढवळ, नवरा आईच्या मुठीत असल्याने हताशपणे सहन करणारी डेब्रा, आणि बायको म्हणजे हवे तेव्हा खायला देणारे आणि सेक्स मिळवण्याचे मशीन या पलिकडे फारसे विचार नसलेला तिचा नवरा रेमंड्स;  मुलगा-सून-बायको या त्रिकोणात बहुधा बेफिकीर असणारा फ्रँक नावाचा सासरा हे सारे बरेचसे ओळखीचे, अगदी 'पीपल नेक्स्ट डोअर' वाटावे असे कुटुंब! यांच्या आयुष्यात घडणार्‍या घटना, त्यांना सामोरे जावे लागलेल्या समस्याही अगदी अस्सल भारतीय वाटाव्यात अशा. तपशीलातील वेगळेपण वगळले तर मुळात सारे जगणे अस्सल भारतीय म्हणण्यात काडीचाही अतिरेक होणार नाही असे. 

कधीतरी अॅलीच्या - रेमंडच्या मुलीच्या-  शाळेतून आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या मुलाखतीवर आधारित निबंध लिहावा असा 'गृहपाठ' शाळेतून दिला जातो आणि शोध सुरु होतो अशा ज्येष्ठतम सदस्याचा. इथे फ्रँकला आठवण होते आपल्या कुण्या ’आँट सेरिना'ची. ही फ्रँकच्या वडिलांची बहिण. त्यांचे सारे कुटुंब इटलीहून अमेरिकेला स्थलांतर करत असताना तिकडेच राहिलेली. ती अविवाहित आणि इटलीत अशा ठिकाणी राहणारी की तिला स्वतःचा असा पत्ताही नाही, स्थानिक पोस्ट ऑफिसच्या नावेच तिचे पत्र पाठवावे लागते.
 
अनायासे या निमित्ताने फ्रॅंक अथवा मेरीबद्दल लिहिणे टळेल या धूर्त हेतूने डेब्रा अॅलीला तिकडे पत्र पाठवण्यास सांगते. उत्तर म्हणून तीन आठवड्यात खुद्द आँट सेरिनाच दत्त म्हणून हजर होते. आता ही साधीसुधी स्त्री गेली अनेक वर्षे इटलीत राहते आहे, तिला इंग्रजीचा गंध नाही. ती येते तेव्हा फक्त फ्रँक आणि मेरी हे दोघेच इतालियन भाषा जाणणारे असतात, ते देखील मुलांना न समजता भांडता यावे यासाठी त्या भाषेचा वापर करून सराव राखलेले. पण डेब्रा नि मुले मात्र या भाषेबाबत अनभिज्ञ आहेत.

आँट सेरिना येते ती सारे घरच ताब्यात घेते. ती निष्णात कुक आहे. तिच्या एकाहुन एक अफलातून रेसिपीज, तिने मुलांना शिकवलेली आणि त्यांनी सहजपणे आत्मसात केलेली इतालियन गाणी, घरातील मोठ्यांना आपल्या लाघवी स्वभावामुळे तिने बांधून घातलेले. यातून सारे बरोन कुटुंब पूर्वी कधी नाही इतके एकसंध होत एकमेकांच्या जवळ आलेले. जेमतेम आठवड्याभरात समोरासमोर राहणारी आणि सतत एकमेकांची उणीदुणी काढणारी फ्रँक-मेरी आणि रे-डेब्राची कुटुंबे एकजीव होऊन जातात.

कुठल्याशा एका फॅमिली फोटोवरून ध्यानात येते की आँट सेरेना ही या 'बरोन' फॅमिलीची नव्हे तर अन्य कुणा बरोन्सची आँट आहे. अचानक उघड झालेल्या या सत्याने सारेच भांबावतात नि खंतावतात ही. आँट सेरेनाच्या रक्ताच्या नात्यातील तिच्या कुण्या नातीबरोबर तिने जाताना या 'बरोन्स'ना मात्र काही जिवाभावाचे गमावल्याची खंत सतावत राहते. रक्ताचे नाते नसेल कदाचित पण ती आँटी त्यांची जिवाभावाची नातलग होऊन राहिली होती. कुटुंबव्यवस्थेचा अर्थ तिने त्यांन उलगडून दाखवला होता. घरच्या मुलांपासून ते तिसर्‍या पिढीपर्यंत सार्‍यांचेच तिच्याशी 'नाते' जुळले होते. ते तुटताना त्या 'बरोन्स'ची जी उलघाल होते ती केवळ त्रस्त करणारी. ती आँटी त्यांची रक्ताची नातलग नसेल पण सार्‍या कुटुंबाला बांधून घालणारा एक 'बंध' ठरली होती.

हिंदीमधे 'रिश्ते' आणि 'नाते' असे दोन भिन्न अर्थाचे शब्द आहेत. मराठी त्यामानाने थोडी कद्रू आहे. दोन्हींसाठी आपल्याकडे नाते असाच शब्द आहे. 'बंध' हा एक शब्द आहे पण तो फारच सबगोलंकार आहे. इथे आँट सेरेनाचे बरोन कुटुंबियांशी जे नाते जुळते ते 'रिश्ते' या वर्गीकरणात बसणारे नसले तरी भावनिक नात्यांच्या पातळीवर उतरणारे. छोट्या अॅलीचे आपल्या सख्ख्या आजोबांशी नसतील इतके ऋणानुबंध त्याच्या या कुण्या आँटीशी जुळलेले. ते तुटते तेव्हा अॅली आणि अन्य बरोन्सना जेव्हढा त्रास देते कदाचित तेवढाच त्रास तुम्हा आम्हा प्रेक्षकांना देते.

विस्कळित आयुष्यात कुठेतरी एखादे वळण येते जिथे आँट सेरिना भेटते नि असे काही घडते की सारे कुटुंब त्या हरवलेल्या धाग्यात ओवले जाते. ती आँट सेरिना निसटून जाते हे खरे पण तो धागा तुटू नये याची काळजी घ्यावी याचे भान मात्र जाता जाता देऊन जाते. अशी आँट सेरिना आवश्यक तेव्हा तुम्हा सार्‍यांच्या आयुष्यात भेटो ही सदिच्छा. आणि जेव्हा भेटेल तेव्हा ती तुमचीच आँट सेरिना असावी आणि तिला गमावण्याचे दु:ख तुमच्या वाट्याला येऊ नये ही देखील!मंगळवार, १४ जुलै, २०२०

लॉजिकस्तत्र दुर्लभ:

प्राचीन काळी माणूस जेव्हा जंगलवासी होता, त्याच्या करमणुकीचे मुख्य साधन होते गाणे. हे प्राथमिक स्वरुपाचे गाणे सुरावटीपेक्षा लय आणि सामूहिकता याला प्राधान्य देणारे असे. माणसाची शब्दसंपदा वाढली आणि भवतालाबद्दलची निरीक्षणे शब्दांमार्फत त्या भवतालापासून दूर असणार्‍यांपर्यंत पोचवू लागला. मग त्याला कधीतरी कल्पनाविस्ताराचा शोध लागला आणि पाहिले-अनुभवलेले मीठ-मसाला लावून इतरांना सांगू लागला. असे किस्से, कहाण्या शेकोटीभोवती रंगवलेल्या गप्पांमध्ये अधिक सहजपणे मिसळून गेल्या.

पण पुढे शब्दांची ताकद लक्षात आलेल्या काही चाणाक्ष लोकांनी हे मीठ-मसाला लावणे मनोरंजनापेक्षाही जनमत स्वार्थानुकूल करुन घेण्यासाठी वापरायला सुरुवात केली. पण ते फार पुढे, माणसाला सत्ता नावाच्या चेटकीणीने पछाडल्यानंतर. पण त्यापूर्वी जंगलवासीयांमध्ये शेकोटीभोवती रंगलेले हे किस्से हळूहळू सांस्कृतिक वारशामध्ये रूपांतरित होऊ लागले, त्या भूभागापासून दूर, त्या समाजा/टोळीपासून दूर अन्य भूभागावर पसरु लागले.

पुढे कदाचित ही गावगप्प (खरंतर शेकोटीगप्प) आहे हे पुढील पिढ्या विसरुन गेल्या आणि त्या कथा-किश्शांना इतिहासाचे रूप आले. शब्दाला छपाईची जोड मिळाल्यानंतर त्याला अधिक भक्कम आधार आला. त्या संकलित, छापील, शब्दांना अधिक वजन आले. (आजही छापलेले - आता डिजिटल सुद्धा, सगळे काही खरे मानून चालणारा वर्ग बहुसंख्येत आहे.) त्याचा आधार घेऊन काही चलाख लोकांनी त्याच्या भोवती आपल्या सोयीच्या व्यवस्थेचे जाळे विणायला सुरुवात केली. त्यासाठी त्यात आपल्या सोयीची भरही घातली, पण तो सर्वशक्तिमान देवाचा शब्द आहे असे बजावून त्याबद्दल आक्षेप घेणार्‍यांची तोंडे बंद करुन टाकली. माणसाने सुरुवातीला मनोरंजनासाठी शोधलेल्या कल्पनाविस्ताराने माणसाच्या आयुष्याला जखडून टाकणारी व्यवस्था उभी केली. पण हे फार गंभीर झाले.

एकुणात गावगप्पा हा सोशलायजेशन, सामाजिक अभिसरणाचा एक प्रमुख आधार आहे असे काही समाजशास्त्रज्ञ मानतात. उपस्थित नसलेल्या कुणाबद्दल तरी कुचाळक्या, गॉसिप करण्याने उपस्थित असलेल्यांच्या नात्यांमध्ये बंध बळकट होतात असे मानले जाते. पण या कुचाळक्या अथवा किस्से/गप्पा केवळ तेवढ्या गटापुरत्याच राहतात असे नाही. त्यांचा वापर तिथली कुणी दुसर्‍या एखाद्या गटात शिरकाव करुन घेण्यासाठी अथवा प्रस्थापित होण्यासाठी, आपले स्थान बळकट करण्यासाठी करुन घेतो आणि किस्सा कथेमध्ये, समजामध्ये रूपांतरित होतो. मग 'आकाशात देव आहे नि गण्याला पोर होत नाही याचे कारण तो गण्यावर नाराज आहे’ यावरही सहज विश्वास ठेवणारा समाज त्यांना आपल्या समजुतीचा भाग म्हणून सहज सामावून घेतो.

ऐकले ते खरे आहे का असा प्रश्न त्यांना पडत नाही. मग पुढचा पडताळा घेण्याचा विचार तर सोडूनच द्या. फारतर तो सांगणारा आपल्या दृष्टीने विश्वासार्ह आहे का इतपतच विचार केला जातो. तो ही सापेक्षच असणार हे उघड तर आहेच. शिवाय त्या विश्वासार्ह माणसाने ही गावगप्प त्याच्या दृष्टीने विश्वासार्ह असलेल्या अन्य कुणाकडून ऐकलेली असेल. पण या 'चुलत-विश्वासार्ह' माणसाच्या विश्वासार्हतेबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते.  विश्वासार्हतेच्या या साखळीत एक कल्पनारंजन करणारी अथवा स्वार्थप्रेरित छद्मवास्तवाची रुजवणूक करु इच्छिणारी व्यक्ती शिरली, की थेंबभर विषाने वेगाने पसरुन सारा पाणवठा विषमय करावा तसे या गावगप्प-प्रसाराचे होत असते... अरेच्या, परत गंभीर झाले.

काबाच्या दगडाखाली शिवलिंग आहे, मूळ अयोध्या भारतात नाही आमच्या थायलंडमध्ये होती, रेड इंडियनांच्या पूर्वी इथे आमचे कॉकेशन अमेरिकनच राहात होते ज्यांना रानटी इंडियनांनी क्रूरपणे हाकलले, चंद्रावर आमच्या देशातील कुण्या गुप्त सम्राटाचे साम्राज्य होते... वगैरे बाबी सांगोवांगीतून पसरत जातात, ऐकायला छान वाटतात, मग लोक खर्‍या मानून चालतात. पण एखादा जागरुक मनुष्य त्यांचा पडताळा घेऊ पाहतो तेव्हा या सार्‍या ’आम्ही सारे विश्वासार्ह’ गटातल्या कुणालाच याबाबत त्या समजापलिकडे काहीच ठाऊक नाही असे लक्षात येते. प्रत्येक जण मागच्याकडे बोट दाखवण्यापलिकडे काहीही पुरावा देऊ शकत नाही. अर्थात याने त्या गटाचे फार बिघडते असे नाही. इतक्या सार्‍यांना ते पटले आहे म्हणजे ते खरेच आहे, हा दीडशहाणा कोण लागून गेला आम्हाला विचारणारा’ असे समर्थन देऊन ते नव्या गावगप्पा वास्तव म्हणून पुढे सरकवू लागतात.

हा एक लहानसा संवाद ’ब्लॅक अ‍ॅडर’ नावाच्या एका बर्‍याच जुन्या मालिकेतला. मि. बीन म्हणून लोकप्रिय झालेला रोवान अटकिन्सन प्रमुख भूमिकेत होता. मला स्वत:ला हा नट फारसा आवडत नाही आणि मालिकाही फारशी आवडली नाही. पण ही मालिका ’अल्टरनेटिव्ह हिस्टरी’ अर्थात समांतर इतिहास या साहित्यिक प्रकारात मोडणारी आहे. ’असे न होता, तसे झाले असते तर’ प्रकारची. अशा स्वरूपाचे लेखन बहुधा पर्यायी जगाचा वेध घेणारे असते, गंभीर असते. पण ही मालिका त्याला विनोदी अंगाने सादर करते. हा कदाचित असा पहिलाच प्रयत्न असावा.

प्राचीन इंग्रजीमध्ये अ‍ॅडर म्हणजे साप. पण हा ब्लॅक अ‍ॅडर नेमका उलट प्रकारचा आहे, शेळपट आहे. राजाचा मुलगा असून त्याला कुणी खिजगणतीत धरत नाही. कधी समोर आला तर खुद्द त्याचा बाप त्याला ओळखत नाही. ’हा तुझा मुलगा’ अशी ओळख दिल्यावरच त्याला ते लक्षात येते. तो याचे नावही बहुतेक वेळा चुकीचे उच्चारतो. इतकेच काय एक-दोनदा तर तो याला मुलगी समजतो.

पण असा राजघराण्याच्या वळचणीतला बिनविषारी साप म्हणून जगत असला तरी तो मूर्ख नाही. खाली दिलेला संवाद पर्सी या त्याचा स्क्वायर अथवा मदतनीसाशी झालेला आहे. हा मदतनीस कुण्या उमरावाच्या इन्फन्टा नावाच्या मुलीच्या देखणेपणाचे वर्णन करुन त्याला लग्नासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर पर्सीने सांगितलेल्या त्यातल्या एका सांगोवांगीच्या गोष्टीवर अ‍ॅडर प्रश्न विचारतो आहे.

---
Percy: Oh my lord-
Adder: Yes-
Percy: You know, They say that the Infanta's eyes are more beautiful than the famous stone of Galvaston.
Adder: Hmm... The what?
Percy: The famous stone of Galvaston, my lord.
Adder:And... what's that exactly?
Percy: Well... it's a famous blue stone, and it comes... from Galvaston.
Adder: I see. And what about it?
Percy: Well, my lord, the Infantas' eyes are bluer that it.
Adder: I see. And have you ever seen this stone?
Percy: No, not as such... my lord. But I know couple of people who have, and they say it's very blue indeed.
Adder: And have these people seen Infanta's eyes?
Percy: I shouldn't think so, my lord.
Adder: --And neither have you.
Percy: No, my lord.
Adder: Then what you are telling me Percy, is that something you have never seen, is slightly less blue than something else you have never seen.
(म्हणजे थोडक्यात तू मला असं सांगतो आहेस की, 'तू न पाहिलेली एक वस्तू , तू न पाहिलेल्या दुसर्‍या वस्तूपेक्षा कमी निळी आहे.')
---
(’द ब्लॅक अ‍ॅडर’ या मालिकेतील "द क्वीन ऑफ स्पेन’स बीअर्ड" या एपिसोड मधून)

सोमवार, ६ जुलै, २०२०

गाणारं व्हायलिन
मी पाश्चात्त्य संगीताचा फारसा भोक्ता नाही. त्यात त्यांचे वाद्यसंगीत सर्वस्वी वेगळ्या वळणाचे. त्यांचे क्लासिकल म्हणवले जाणारे संगीत सिंफनीच्या मार्गाने जाते, ज्यात अनावश्यक गलबला असतो नि मला पुरेसे तंद्री लावून ते ऐकणे शक्य होत नाही. सुरांच्या लडी, आवर्तने उलगडत श्रोत्याला कवेत घेत जाणारे गाणे ऐकण्याची सवय असलेल्या मला, सदोदित गाण्याचा टेम्पोशी खेळ करत आघातांच्या सहाय्याने ’Awe, Wow’ प्रतिक्रिया वसूल करु पाहणारे ते गाणे रुचत नाही. ’सुंदर मी होणार’ मधला सुरेश म्हणतो तसे आपल्याला ’सुरांचे पांघरुण घेऊन गुपचून पडून राहावेसे वाटते’. पण हे लेकाचे अध्येमध्ये अलेग्रो का काय म्हणतात त्याचे दणके देऊन त्या तंद्रीतून बाहेर खेचून काढू पाहतात असा माझा अनुभव आहे.

भारतीय वाद्यसंगीताच्या बाबतही मी तसा गायकी अंगाच्या वाद्यवादनाचा चाहता आहे. आपल्याकडे जे आलाप-जोड-झाला प्रकारातले वाद्यवादन होते ते मला फारसे पसंत पडत नाही. त्यातला फक्त आलाप ऐकून मी सोडून देत असतो. जोड आणि झाला मध्ये वादक हमखास ’जनता को खुश कर डालो’ मोडमध्ये जाऊन ’मंगलगाणी’ ऐवजी तबल्यासोबत ’दंगलगाणी’ ऐकवू लागतो असा अनुभव आहे. क्वचित कधी तरी एखाद्या रागसंगीताच्या मैफलीत एखादा वादक एखादे नाट्यपद ऐकवून जातो इतकेच. पण ते ही ’जाताजाता’ या सदरात. एक स्वतंत्र कलाप्रकार अथवा परफॉर्मन्स म्हणून वाद्यांवर गाणी वाजवण्याचा प्रकार प्रभाकर जोग यांच्या ’गाणारं व्हायलिन’ वगळता आणखी कुणी हाताळलेला दिसत नाही. गाणे वाजवणे हा वाद्यवादकांना कमीपणा आणणारा प्रकार वाटतो की काय हे विचारुन घेतले पाहिजे.

पाश्चात्य गानसंगीताचा विचार केला, तर त्यात पॉप, रॅप, रॉक वगैरे अनेक अवतारांची सरमिसळ दिसते. पण भारतीय पद्धतीचे शब्दाला घट्ट असलेले, प्राधान्य देणारे गाणे स्वतंत्रपणे ऐकवणे हा प्रकार फारसा सापडला नाही. पण विविध चित्रपटांतून अशी गाणी - भारतातील चित्रपटांइतकी भरताड नसली तरी - ऐकायला मिळतात. पण चित्रपटाच्या इतर धबडग्यात ती बारकाईने ऐकली जातात असे नाही. याचे कारण भारतीय चित्रपटांसारखे हे गाणे एक स्वतंत्र तुकडा म्हणून चित्रित करण्याचा फारसा प्रघात नाही. तेव्हा गाण्यासोबतच समोर घडणार्‍या घटनांकडे लक्ष द्यावे लागत असल्याने त्याच्या आस्वादात थोडी बाधा येते.

पण माझ्यासारख्याला उपयुक्त असा प्रकार मला अलिकडे सापडला तो म्हणजे ’कव्हर आर्टिस्ट्स’चा. एखाद्या गायकाने गायलेले नि गाजवलेले गाणे किंवा एखाद्या चित्रपटातले गाणे आपल्या आवडीच्या वाद्यावर वाजवणे, त्याचा कार्यक्रम करणे वा सीडी बनवणे याला ’कव्हर करणे’ असा वाक्र्पचार प्रचलित आहे. असे कलाकार मेट्रो स्टेशन, आठवडी बाजारात अथवा एखाद्या मॉलमध्ये अशाच कलाकारांसाठी मोकळ्या ठेवलेल्या जागेत आपली कला सादर करत असतात. समोर एक डबा ठेवलेला असतो. जाताजाता यांचे गाणे ऐकणारे लोक यथाशक्ती त्यात पैसे टाकून त्यांच्या कलेला दाद देत असतात. याच सोबत बाजूला एखाद्या छोट्या ब्रीफकेसमध्ये अथवा फोल्डेबल टेबलवर त्या कलाकाराच्या सीडींची चळत ठेवलेली असते. किंमतीचा बोर्ड असतो. ज्याला हवी असेल त्याने सीडी उचलावी नि पैसे तिथे टाकावेत. कलाकार त्यासाठी आपला परफॉर्मन्स थांबवत नाही.

कारोलिना प्रोशेंको या अकरा वर्षांच्या छोट्या मुलीने व्हायलिनवर वाजवलेले ’सिन्योरिटा’ ऐकले आणि मी त्या पोरीच्या प्रेमात पडलो. त्या पोरीनेच मला कव्हर या प्रकाराकडे आकृष्ट केले. यापूर्वी वेगवेगळ्या वाद्यांवर वाजवलेली गाणी ऐकण्याचा प्रयत्न केला होता. पण काही प्रमाणात पियानो वगळता इतर वाद्यांवरील असे प्रयोग मला फारसे रुचले नव्हते. पण या छोटीच्या परफॉर्मन्समुळे व्हायलिन हेच आपले वाद्य (ऐकण्याचे हो) हे मी निश्चित केले. पुढे आणखी काही उत्तम परफॉर्मन्सेस सापडलेही.

सोबत जोडलेला व्हिडिओ आहे तो त्या 'सिन्योरिटा’चाच. या पोरीने याचे बरेच स्ट्रीट परफॉर्मन्स केलेले दिसतात. एक-दोघांबरोबर सह-वादनही केले आहे. एकुणात तिचे विशेष आवडीचे गाणॆ असावे. माझ्यासारख्या करकरीत वस्तुनिष्ठ माणसालाही मंत्रमुग्ध करुन ते गाणे पुन्हा पुन्हा ऐकायला लावले म्हणजे, त्या गाण्यावर तिचे उत्तम प्रभुत्व प्रस्थापित झाले आहे असे म्हणायला हरकत नाही.

पाश्चात्य संगीतात गायकांना गाण्याबरोबर परफॉर्मन्स कडेही लक्ष द्यावे लागते. त्यांचे कार्यक्रम हे स्टेज-शोच असतात. त्यामुळे त्यांना नृत्य-दिग्दर्शकाची सोबत लागते, नेपथ्य लागते, झगमगते दिवे, नाट्यमय प्रवेश वगैरे क्लृप्त्या लढवाव्या लागतात. एकुणात सारा नटवा मामला असतो. पण या पोरीला रस्त्यावर आपली कला सादर करताना पाहा. लय तिच्या अंगातच आहे. तिला वेगळ्या नटव्या परफॉर्मन्सची गरज नाही. ते व्हायोलिन तिच्या शरीराचा भागच आहे. (असेच आणखी एक-दोन कव्हर-आर्टिस्ट नंतर सापडले. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.) ती लय, ते तादात्म्य ज्याला सापडले तो खरा कलाकार. मग त्याला बहुधा इतरांच्या स्तुती, टीकेची पर्वा राहात नसावी. बस्स आपले हत्यार उचलावे, सुरांना आमंत्रण द्यावे नि मैफल सुरु करावी.

कलाकाराने आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी कुण्या संपादकाच्या मर्जीने चालणार्‍या वृत्तपत्र, नियतकालिकाचे किंवा कुणाच्या भांडवलावर उभ्या असलेल्या आणि फायद्याचे चोख गणित करणार्‍या थिएटर अथवा व्यासपीठाचे मोहताज नसावे.  जमिनीच्या तुकड्यावर एक कोपरा पकडून त्याने आपल्या कलेत रममाण व्हावे. हरफनमौला वृत्तीने ती धुंदी अनुभवावी, पिटुकल्या डोळ्यांतही कुतूहल जागवावे. प्रेक्षकांनी साक्षीभावाने ती अनुभवत तिला द्रव्यरूपाने दाद द्यावी. आणि मुख्य म्हणजे ती देताना कलाकार हा याचक आणि आपण दाते अशी भावना मनात न आणता ’काही द्यावे काही घ्यावे’ या भावनेने द्यावी. 

द्रव्य आणि भोगक्षमतेपलीकडे, लालसा सोडून माणसांनी कधीतरी माणसांसारखे वागावे...

-oOo-