हा एक लहानसा संवाद ’ब्लॅक अॅडर’ नावाच्या एका बर्याच जुन्या मालिकेतला. मि. बीन म्हणून लोकप्रिय झालेला रोवान अटकिन्सन प्रमुख भूमिकेत होता. मला स्वत:ला हा नट फारसा आवडत नाही आणि मालिकाही फारशी आवडली नाही. पण ही मालिका ’अल्टरनेटिव्ह हिस्टरी’ अर्थात समांतर इतिहास या साहित्यिक प्रकारात मोडणारी आहे. ’असे न होता, तसे झाले असते तर’ प्रकारची. अशा स्वरूपाचे लेखन बहुधा पर्यायी जगाचा वेध घेणारे असते, गंभीर असते. पण ही मालिका त्याला विनोदी अंगाने सादर करते. हा कदाचित असा पहिलाच प्रयत्न असावा.
प्राचीन इंग्रजीमध्ये अॅडर म्हणजे साप. पण हा ब्लॅक अॅडर नेमका उलट प्रकारचा आहे, शेळपट आहे. राजाचा मुलगा असून त्याला कुणी खिजगणतीत धरत नाही. कधी समोर आला तर खुद्द त्याचा बाप त्याला ओळखत नाही. ’हा तुझा मुलगा’ अशी ओळख दिल्यावरच त्याला ते लक्षात येते. तो याचे नावही बहुतेक वेळा चुकीचे उच्चारतो. इतकेच काय एक-दोनदा तर तो याला मुलगी समजतो. पण असा राजघराण्याच्या वळचणीतला बिनविषारी साप म्हणून जगत असला तरी तो मूर्ख नाही.
त्याचा पर्सी या त्याचा स्क्वायर अथवा मदतनीसाशी झालेला संवाद आहे. हा मदतनीस कुण्या स्पॅनिश उमरावाच्या इन्फन्टा नावाच्या मुलीच्या देखणेपणाचे वर्णन करुन त्याला लग्नासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर पर्सीने सांगितलेल्या त्यातल्या एका सांगोवांगीच्या गोष्टीवर अॅडर प्रश्न विचारतो आहे.
पण तरीही त्या न पाहिलेल्या आपल्या वाग्दत्त वधूच्या आगमनाची तो आतुरतेने वाट पाहतो आहे. आणि अशा केवळ सांगोवांगीच्या स्तुतीच्या - आणि राजकारणाच्या सोयीच्या - आधारे जमवलेल्या या सोयरिकीचा परिणाम काय होऊ शकतो हे दाखवणारा हा विनोदी प्रसंग.
Serial: Blackadder (BBC Studios)
Episode: Queen of Spains Beared (1983).
Percy: You know, They say that the Infanta's eyes are more beautiful than the famous stone of Galvaston.
Adder: Hmm... The what?
Percy: The famous stone of Galvaston, my lord.
Adder: And... what's that exactly?
Percy: Well... it's a famous blue stone, and it comes... from Galvaston.
Adder: I see. And what about it?
Percy: Well, my lord, the Infantas' eyes are bluer that it.
Adder: I see. And have you ever seen this stone?
Percy: No, not as such... my lord. But I know couple of people who have, and they say it's very blue indeed.
Adder: And have these people seen Infanta's eyes?
Percy: I shouldn't think so, my lord.
Adder: --And neither have you.
Percy: No, my lord.
Adder: Then what you are telling me Percy, is that something you have never seen, is slightly less blue than something else you have never seen.
(म्हणजे थोडक्यात तू मला असं सांगतो आहेस की, 'तू न पाहिलेली एक वस्तू , तू न पाहिलेल्या दुसर्या वस्तूपेक्षा कमी निळी आहे.')
प्राचीन काळी माणूस जेव्हा जंगलवासी होता, त्याच्या करमणुकीचे मुख्य साधन होते गाणे. हे प्राथमिक स्वरुपाचे गाणे शब्द नि सुरावटीपेक्षा लय आणि सामूहिकता याला प्राधान्य देणारे असे. माणसाची शब्दसंपदा वाढली आणि तो भवतालाबद्दलची निरीक्षणे शब्दांमार्फत त्या भवतालापासून दूर असणार्यांपर्यंत पोचवू लागला. मग त्याला कधीतरी कल्पनाविस्ताराचा शोध लागला आणि पाहिले-अनुभवलेले मीठ-मसाला लावून इतरांना सांगू लागला. असे किस्से, कहाण्या शेकोटीभोवती रंगवलेल्या गप्पांमध्ये अधिक सहजपणे मिसळून गेल्या.
पण पुढे शब्दांची ताकद लक्षात आलेल्या काही चाणाक्ष लोकांनी हे मीठ-मसाला लावणे मनोरंजनापेक्षाही जनमत स्वार्थानुकूल करुन घेण्यासाठी वापरायला सुरुवात केली. पण ते फार पुढे, माणसाला सत्ता नावाच्या चेटकीणीने पछाडल्यानंतर. पण त्यापूर्वी जंगलवासीयांमध्ये शेकोटीभोवती रंगलेले हे किस्से हळूहळू सांस्कृतिक वारशामध्ये रूपांतरित होऊ लागले, त्या भूभागापासून दूर, त्या समाजा/टोळीपासून दूर अन्य भूभागावर पसरु लागले.
पुढे कदाचित ही गावगप्प (खरंतर शेकोटीगप्प) आहे हे पुढील पिढ्या विसरुन गेल्या आणि त्या कथा-किश्शांना इतिहासाचे रूप आले. शब्दाला छपाईची जोड मिळाल्यानंतर त्याला अधिक भक्कम आधार आला. त्या संकलित, छापील, शब्दांना अधिक वजन आले. (आजही छापलेले - आता डिजिटल सुद्धा, सगळे काही खरे मानून चालणारा वर्ग बहुसंख्येत आहे.)
त्याचा आधार घेऊन काही चलाख लोकांनी त्याच्या भोवती आपल्या सोयीच्या व्यवस्थेचे जाळे विणायला सुरुवात केली. त्यासाठी त्यात आपल्या सोयीची भरही घातली, पण तो सर्वशक्तिमान देवाचा शब्द आहे असे बजावून त्याबद्दल आक्षेप घेणार्यांची तोंडे बंद करुन टाकली. माणसाने सुरुवातीला मनोरंजनासाठी शोधलेल्या कल्पनाविस्ताराने माणसाच्या आयुष्याला जखडून टाकणारी व्यवस्था उभी केली. पण हे फार गंभीर झाले.
एकुणात गावगप्पा हा सोशलायजेशन, सामाजिक अभिसरणाचा एक प्रमुख आधार आहे असे काही समाजशास्त्रज्ञ मानतात. उपस्थित नसलेल्या कुणाबद्दल तरी कुचाळक्या, गॉसिप करण्याने उपस्थित असलेल्यांच्या नात्यांमध्ये बंध बळकट होतात असे मानले जाते.
पण या कुचाळक्या अथवा किस्से/गप्पा केवळ तेवढ्या गटापुरत्याच राहतात असे नाही. त्यांचा वापर तिथली कुणी दुसर्या एखाद्या गटात शिरकाव करुन घेण्यासाठी अथवा प्रस्थापित होण्यासाठी, आपले स्थान बळकट करण्यासाठी करुन घेतो आणि किस्सा कथेमध्ये, समजामध्ये रूपांतरित होतो. मग 'आकाशात देव आहे नि गण्याला पोर होत नाही याचे कारण तो गण्यावर नाराज आहे’ यावरही सहज विश्वास ठेवणारा समाज त्यांना आपल्या समजुतीचा भाग म्हणून सहज सामावून घेतो.
ऐकले ते खरे आहे का असा प्रश्न त्यांना पडत नाही. मग पुढचा पडताळा घेण्याचा विचार तर सोडूनच द्या. फारतर तो सांगणारा आपल्या दृष्टीने विश्वासार्ह आहे का इतपतच विचार केला जातो. तो ही सापेक्षच असणार हे उघड तर आहेच. शिवाय त्या विश्वासार्ह माणसाने ही गावगप्प त्याच्या दृष्टीने विश्वासार्ह असलेल्या अन्य कुणाकडून ऐकलेली असेल.
पण या 'चुलत-विश्वासार्ह' माणसाच्या विश्वासार्हतेबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. विश्वासार्हतेच्या या साखळीत एक कल्पनारंजन करणारी अथवा स्वार्थप्रेरित छद्मवास्तवाची रुजवणूक करु इच्छिणारी व्यक्ती शिरली, की थेंबभर विषाने वेगाने पसरुन सारा पाणवठा विषमय करावा तसे या गावगप्प-प्रसाराचे होत असते...
काबाच्या दगडाखाली शिवलिंग आहे मूळ अयोध्या भारतात नाही आमच्या थायलंडमध्ये होती, रेड इंडियनांच्या पूर्वी इथे आमचे कॉकेशन अमेरिकनच राहात होते ज्यांना रानटी इंडियनांनी क्रूरपणे हाकलले, चंद्रावर आमच्या देशातील कुण्या गुप्त सम्राटाचे साम्राज्य होते... वगैरे बाबी सांगोवांगीतून पसरत जातात, ऐकायला छान वाटतात, मग लोक खर्या मानून चालतात.
पण एखादा जागरुक मनुष्य त्यांचा पडताळा घेऊ पाहतो तेव्हा या सार्या ’आम्ही सारे विश्वासार्ह’ गटातल्या कुणालाच याबाबत त्या समजापलिकडे काहीच ठाऊक नाही असे लक्षात येते. प्रत्येक जण मागच्याकडे बोट दाखवण्यापलिकडे काहीही पुरावा देऊ शकत नाही. अर्थात याने त्या गटाचे फार बिघडते असे नाही. 'इतक्या सार्यांना ते पटले आहे म्हणजे ते खरेच आहे, हा दीडशहाणा कोण लागून गेला आम्हाला विचारणारा’ असे समर्थन देऊन ते नव्या गावगप्पा वास्तव म्हणून पुढे सरकवू लागतात.
- oOo -