सोमवार, ६ जुलै, २०२०

गाणारं व्हायलिन

मी पाश्चात्त्य संगीताचा फारसा भोक्ता नाही. त्यात त्यांचे वाद्यसंगीत सर्वस्वी वेगळ्या वळणाचे. त्यांचे क्लासिकल म्हणवले जाणारे संगीत सिंफनीच्या मार्गाने जाते, ज्यात अनावश्यक गलबला असतो नि मला पुरेसे तंद्री लावून ते ऐकणे शक्य होत नाही. सुरांच्या लडी, आवर्तने उलगडत श्रोत्याला कवेत घेत जाणारे गाणे ऐकण्याची सवय असलेल्या मला, सदोदित गाण्याचा टेम्पोशी खेळ करत आघातांच्या सहाय्याने ’Awe, Wow’ प्रतिक्रिया वसूल करु पाहणारे ते गाणे रुचत नाही. ’सुंदर मी होणार’ मधला सुरेश म्हणतो तसे आपल्याला ’सुरांचे पांघरुण घेऊन गुपचून पडून राहावेसे वाटते’. पण हे लेकाचे अध्येमध्ये अलेग्रो का काय म्हणतात त्याचे दणके देऊन त्या तंद्रीतून बाहेर खेचून काढू पाहतात असा माझा अनुभव आहे.

भारतीय वाद्यसंगीताच्या बाबतही मी तसा गायकी अंगाच्या वाद्यवादनाचा चाहता आहे. आपल्याकडे जे आलाप-जोड-झाला प्रकारातले वाद्यवादन होते ते मला फारसे पसंत पडत नाही. त्यातला फक्त आलाप ऐकून मी सोडून देत असतो. जोड आणि झाला मध्ये वादक हमखास ’जनता को खुश कर डालो’ मोडमध्ये जाऊन ’मंगलगाणी’ ऐवजी तबल्यासोबत ’दंगलगाणी’ ऐकवू लागतो असा अनुभव आहे.

एखाद्या रागसंगीताच्या मैफलीत क्वचित कधी तरी वादक एखादे नाट्यपद ऐकवून जातो इतकेच. पण ते ही ’जाताजाता’ या सदरात. एक स्वतंत्र कलाप्रकार अथवा परफॉर्मन्स म्हणून वाद्यांवर गाणी वाजवण्याचा प्रकार प्रभाकर जोग यांच्या ’गाणारं व्हायलिन’ वगळता आणखी कुणी हाताळलेला दिसत नाही. गाणे वाजवणे हा वाद्यवादकांना कमीपणा आणणारा प्रकार वाटतो की काय हे विचारुन घेतले पाहिजे.

पाश्चात्त्य गानसंगीताचा विचार केला, तर त्यात पॉप, रॅप, रॉक वगैरे अनेक अवतारांची सरमिसळ दिसते खरी. पण भारतीय पद्धतीचे शब्दाला घट्ट असलेले, प्राधान्य देणारे गाणे स्वतंत्रपणे ऐकवणे हा प्रकार फारसा सापडला नाही. पण विविध चित्रपटांतून अशी गाणी - भारतातील चित्रपटांइतकी भरताड नसली तरी - ऐकायला मिळतात. पण चित्रपटाच्या इतर धबडग्यात ती बारकाईने ऐकली जातात असे नाही. याचे कारण भारतीय चित्रपटांसारखे हे गाणे एक स्वतंत्र तुकडा म्हणून चित्रित करण्याचा फारसा प्रघात नाही. तेव्हा गाण्यासोबतच समोर घडणार्‍या घटनांकडे लक्ष द्यावे लागत असल्याने त्याच्या आस्वादात थोडी बाधा येते.

पण माझ्यासारख्याला उपयुक्त असा प्रकार मला अलिकडे सापडला तो म्हणजे ’कव्हर आर्टिस्ट्स’चा. एखाद्या गायकाने गायलेले नि गाजवलेले गाणे, किंवा एखाद्या चित्रपटातले गाणे आपल्या आवडीच्या वाद्यावर वाजवणे, त्याचा कार्यक्रम करणे वा सीडी बनवणे याला ’कव्हर करणे’ असा वाक्र्पचार प्रचलित आहे.

असे कलाकार मेट्रो स्टेशन, आठवडी बाजारात अथवा एखाद्या मॉलमध्ये अशाच कलाकारांसाठी मोकळ्या ठेवलेल्या जागेत आपली कला सादर करत असतात. समोर एक डबा ठेवलेला असतो. जाताजाता यांचे गाणे ऐकणारे लोक यथाशक्ती त्यात पैसे टाकून त्यांच्या कलेला दाद देत असतात. याच सोबत बाजूला एखाद्या छोट्या ब्रीफकेसमध्ये अथवा फोल्डेबल टेबलवर त्या कलाकाराच्या सीडींची चळत ठेवलेली असते. किंमतीचा बोर्ड असतो. ज्याला हवी असेल त्याने सीडी उचलावी नि पैसे तिथे टाकावेत. कलाकार त्यासाठी आपले सादरीकरण थांबवत नाही.

कारोलिना प्रोत्सेंको या अकरा वर्षांच्या छोट्या मुलीने व्हायलिनवर वाजवलेले ’सिन्योरिटा’ ऐकले आणि मी त्या पोरीच्या प्रेमात पडलो. त्या पोरीनेच मला कव्हर या प्रकाराकडे आकृष्ट केले. यापूर्वी वेगवेगळ्या वाद्यांवर वाजवलेली गाणी ऐकण्याचा प्रयत्न केला होता. पण काही प्रमाणात पियानो वगळता इतर वाद्यांवरील असे प्रयोग मला फारसे रुचले नव्हते. पण या छोटीच्या परफॉर्मन्समुळे व्हायलिन हेच आपले वाद्य (ऐकण्याचे हो) हे मी निश्चित केले. पुढे आणखी काही उत्तम परफॉर्मन्सेस सापडलेही.

सोबत जोडलेला व्हिडिओ आहे तो त्या 'सिन्योरिटा’चाच. कारोलिनाने याचे बरेच स्ट्रीट परफॉर्मन्स केलेले दिसतात. एक-दोघांबरोबर सह-वादनही केले आहे. एकुणात तिचे विशेष आवडीचे गाणॆ असावे. माझ्यासारख्या करकरीत वस्तुनिष्ठ माणसालाही मंत्रमुग्ध करुन ते गाणे पुन्हा पुन्हा ऐकायला लावले म्हणजे, त्या गाण्यावर तिचे उत्तम प्रभुत्व प्रस्थापित झाले आहे असे म्हणायला हरकत नाही.

पाश्चात्य संगीतात गायकांना गाण्याबरोबर परफॉर्मन्स कडेही लक्ष द्यावे लागते. त्यांचे कार्यक्रम हे स्टेज-शोच असतात. त्यामुळे त्यांना नृत्य-दिग्दर्शकाची सोबत लागते, नेपथ्य लागते, झगमगते दिवे, नाट्यमय प्रवेश वगैरे क्लृप्त्या लढवाव्या लागतात. एकुणात सारा नटवा मामला असतो.

पण या पोरीला रस्त्यावर आपली कला सादर करताना पाहा. लय तिच्या अंगातच आहे. तिला वेगळ्या नटव्या परफॉर्मन्सची गरज नाही. ते व्हायोलिन तिच्या शरीराचा भागच आहे. (असेच आणखी एक-दोन कव्हर-आर्टिस्ट नंतर सापडले. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.) ती लय, ते तादात्म्य ज्याला सापडले तो खरा कलाकार. मग त्याला बहुधा इतरांच्या स्तुती, टीकेची पर्वा राहात नसावी. बस्स आपले हत्यार उचलावे, सुरांना आमंत्रण द्यावे नि मैफल सुरु करावी.

कलाकाराने आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी कुण्या संपादकाच्या मर्जीने चालणार्‍या वृत्तपत्र, नियतकालिकाचे किंवा कुणाच्या भांडवलावर उभ्या असलेल्या आणि फायद्याचे चोख गणित करणार्‍या थिएटर अथवा व्यासपीठाचे मोहताज नसावे. जमिनीच्या तुकड्यावर एक कोपरा पकडून त्याने आपल्या कलेत रममाण व्हावे. हरफनमौला वृत्तीने ती धुंदी अनुभवावी, पिटुकल्या डोळ्यांतही कुतूहल जागवावे. प्रेक्षकांनी साक्षीभावाने ती अनुभवत तिला दाद द्यावी. आणि मुख्य म्हणजे ती देताना कलाकार हा याचक आणि आपण दाते अशी भावना मनात न आणता ’काही द्यावे काही घ्यावे’ या भावनेने द्यावी.

द्रव्य आणि भोगक्षमतेपलीकडे, लालसा सोडून माणसांनी कधीतरी माणसांसारखे वागावे...

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा