गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

वेचताना... : सौरभ - १

चित्रपटाचा अवतार झाल्यानंतर, विशेषत: समाजमाध्यमांचा सुळसुळाट आणि मोबाईल क्रांतीनंतर डेटा स्वस्त झाल्यापासून, चित्रपटांबद्दल चारचौघात गप्पा मारताना केलेली शेरेबाजी, वैयक्तिक आवडनिवड ही ’परीक्षण’ म्हणून अवतरु लागली आहे. त्याचवेळी मुद्रित माध्यमांतून येणारी परीक्षणे बव्हंशी 'मोले घातले लिहाया’ प्रकारची असतात आणि त्याच्या शेवटी दिलेले रेटिंग पाहण्यापुरतीच चाळली जाऊ लागल आहेत.

सौरभ-१

दृश्य माध्यमांचा असा परिस्फोट झाल्यानंतर आता शब्दांना माघार घ्यावी लागत आहे. मुद्रित माध्यमांच्या इंटरनेट अवतारात तर आता काही रोजच्या जगण्यातील काही विषयांच्या स्तंभातून तर ’नाव छापून येते’ या एकमेव आनंदासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थिनींकडून ’जागाभरती’ केली जाते आहे. त्यामुळे अर्थातच सुमारांची सद्दी निर्माण झाली आहे. अशा वेळी शब्दांशी, त्याचसोबत विचार आणि निर्मितीशी इमान राखणारे लेखन अधिकाधिक दुर्मिळ होताना दिसते आहे.

पूर्वी बाजारात नव्याने आलेल्या पुस्तकांची चर्चा करणारे गट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेली नवी मालिका, नवा इंग्रजी वा परभाषिक चित्रपट यावर चर्चा करतात. पुस्तक वाचनातून आकलन नि आत्मसात होणारे ज्ञानच काय माहितीही या नव्या माध्यमांत अजून मूळ धरु शकलेली नाही. या माध्यमांमध्ये बव्हंशी मनोरंजनाचीच सद्दी दिसते. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाबाबत साधकबाधक चर्चा करणे, त्यातून काय मिळाले याचा वेध घेणे ही हळूहळू अस्तंगत होत जाणारी कला आहे.

बाजारात नव्यानेच आलेल्या पुस्तकाबाबत पूर्वी वाचक-चर्चा घडत. त्याची त्याच लेखकाच्या वा अन्य लेखकाच्या अन्य लेखनाशी तुलना केली जाई. ज्या वाचकाने पुस्तक विकत आणले त्याच्याकडून ते उसने नेऊन वाचले जाई, एकमेकांना त्याची शिफारसही होई. आता हा सामान्य-वाचक-संवादही विरुन जाताना दिसतो आहे. 

नवी पिढी तर ’वाचेन तर इंग्रजीच’ अशी भीष्मप्रतिज्ञाच करुन बसलेली दिसते. करियरमधील सतत ’मागे पडण्याच्या’ भीतीचाच अवतार म्हणजे 'हॅरी पॉटर'पासून 'गेम ऑफ थ्रोन्स'पर्यंत कुठल्याही मालिकेतले ताजे पुस्तक आपण वाचले नाही तर वाळीत टाकले जाऊ अशी भीती त्यांना वाटते की काय कुणास ठाऊक. थोडक्यात मराठी पुस्तकांचे वाचन आणि त्याचे परिशीलन ही बव्हंशी ज्येष्ठांची आणि समीक्षकांची जबाबदारी होऊन राहिली आहे.

एक दोन दशकांपूर्वीपर्यंत केवळ सामान्य वाचकच नव्हे तर अनेक उत्तम आणि श्रेष्ठ लेखक, संपादक, अभ्यासक आपल्या वाचनातील पुस्तकांबद्दल जाहीरपणे बोलत, लिहित असत. त्यातून त्या लेखकामागचा वाचकही समोर येई आणि सामान्य वाचकाला त्या त्या पुस्तकाकडे अथवा त्याच्या लेखकाकडे या लेखकाच्या दृष्टीकोनातून पाहता येई. एकुण वाचकसंस्कृतीला प्रवाही राखण्यात या 'बुक्स-ऑन-बुक्स' किंवा ’कॉलम-ऑन-बुक्स’चा मोठा वाटा आहे. (आता प्रथितयश मराठी वृत्तपत्रेही आणि नियतकालिकेही इंग्रजी पुस्तकांचीच परीक्षणे प्राधान्याने छापतात.) 

श्री. बा. जोशी यांचे ’गंगाजळी’चे चार खंड, प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार याचे ’पश्चिमप्रभा’, सतीश काळसेकरांचे ’वाचणार्‍याची रोजनिशी’ तसंच जी.एं.च्या पत्रांमधून आपण वाचलेल्या पुस्तकांबद्दल, त्यांच्या लेखकांबद्दल वाचायला मिळते. सादरीकरण-कला आणि दृश्यकलांच्या बाबतीत ज्ञानेश्वर नाडकर्णींचे ’अश्वत्थाची सळसळ’ हे याच प्रकारातले.

प्रसिद्ध संपादक गोविंद तळवलकर यांनीही ’ललित’ या नियतकालिकातून आपल्या वाचनानुभवाच्या आधारे एक सदर चालवले. समीक्षा अथवा परीक्षण या सबगोलंकार आणि पारंपरिक अशा स्वरुपाहून भिन्न अशा दृष्टीकोनातून या लेखनाकडे पाहता येते. काळसेकरांनी रोजनिशीतल्या नोंदीस्वरुपात, म्हणजे काहीशा वैयक्तिक अनुभवस्वरुपात मांडले, जीएंनी बव्हंशी वैयक्तिक पत्र-संवादातून काहीशा अनौपचारिक स्वरुपात कथन केले. तळवलकरांनी लेखनापेक्षा, किंवा लेखनाबरोबरच आपले लक्ष लेखकावर केंद्रीत केले आहे.

'सौरभ' हे त्यांचे सदर दोन खंडात संपादित केले आहे. त्यातील पहिल्या भागात प्रामुख्याने लेखकांबद्दलचे लेख आहेत. त्यात मला विशेष भावलेले लेख आहेत ते चार्ल्स डिकन्स हा प्रख्यात कादंबरीकार आणि आर्थर मिलर या नाटककारावरचे. पण यात सर्वात उत्तम वठलेला लेख आहे तो व्हॅसिली ग्रॉसमन या ज्यू-रशियन लेखकावरचा. उमर खय्यामवरील लेख माहिती म्हणून आवर्जून वाचण्याजोगा. याशिवाय ऑर्वेल, चेकॉव्ह, थॉमस पेन, गटे आदि लेखकांचाही समावेश आहे.

इथे निवडलेला उतारा आहे तो अ‍ॅलन बुलक या इतिहासकारावरच्या लेखातला, आणि हा वेचा आहे तो हिटलर नामे क्रूरकर्म्याबद्दलच्या अ‍ॅलन यांच्या आकलनाबद्दलचा. त्याअर्थी तो व्यक्तिचित्रामधील व्यक्तिचित्र प्रकारात मोडतो. व्यक्ती म्हणून हिटलरच्या प्रवृत्तीचा मागोवा आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे अ‍ॅलन यांचे आकलन आजच्या भारतीय परिस्थितीचीचेच नव्हे तर इतर अनेक देशांतील स्थितीचे भान देणारे ठरू शकेल.

- oOo -

या पुस्तकातील एक वेचा: क्रूरा मी वंदिले


हे वाचले का?

क्रूरा मी वंदिले

नवा पुरावा तपासल्यावर बुलक याना असे आढळले की, हिटलर हा केवळ सत्तेच्या अनावर लालसेने प्रवृत्त झाला असे जे मत आपण व्यक्त के होते ते पूर्णतः बरोबर नाही. तो ठराविक विचारसरणीने प्रेरित झाला होता. ही त्याची विचारसरणी त्याच्या माइन काम्फ या ग्रंथात प्रगट झाली होती आणि त्याच्या संभाषणांचा संग्रहही ती प्रगट करत होता. ही विचारसरणी वंशवादी होती आणि जर्मन जनतेला त्याने तिच्या जोरावर भारून टाकले. पण हे जर्मनीत कसे शक्य झाले याचेही उत्तर दिले पाहिजे. यामुळे बुलक यांनी आपल्या ग्रंथाची फेररचना केली. परंतु त्याचा मूळ गाभा बदलण्याची गरज नसल्यामुळे त्यांनी तो तसाच ठेवला. बुलक यांच्या ग्रंथास चाळीस वर्षे पूर्ण झाली तेव्हापर्यंत त्याच्या तीस लाख प्रती खपल्या होत्या. त्यानंतर आणखी वाढ झाली असेल. या ग्रंथामुळे बुलक यांचा जगभर नावलौकिक झाला आणि जे ऑक्सफर्ड विद्यापीठ प्राचीन काळच्या इतिहासास विशेष महत्त्व देत आले होते ते आधुनिक काळाच्या इतिहासासही तितकेच महत्त्व देऊ लागले.

सौरभ-१

बुलक यांनी हिटलरविषयक ग्रंथात केलेले विश्लेषण आजही मोलाचे आहे कारण नंतरच्या काळात अनेक देशांत लहानमोठे हिटलर तयार झाले. बुलक यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे की, हिटलरची हुकूमशाही वा जर्मनीचा आर्थिक वा सामाजिक इतिहास हा आपला विषय नाही, तर हिटलर ही व्यक्ती हा आहे. त्याची प्रवृत्ती काय होती, कोणत्या महत्त्वाकांक्षेने तो प्रेरित झाला होता आणि पहिल्या महायुद्धानंतरच्या जर्मनीतील परिस्थितीचा फायदा त्याने कसा उठवला व सत्ता काबीज केली याची चिकित्सा करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले. ते साध्य करण्यासाठी जर्मन समाज, त्याचा इतिहास इत्यादींची तपासणी त्यांनी केली.

हिटलर गरीब कुळात जन्मलेला होता. त्याला लहानपणीही बराच संघर्ष करावा लागला होता. त्याचा परिणाम वर्णन करताना बुलक यांनी म्हटले आहे हिटलरचा कोणावरही विश्वास नसे. आपल्यावरील निष्ठेची शपथ घेणारांवरही त्याचा विश्वास नव्हता. या अविश्वासास तुच्छतेची जोड मिळाली होती. सत्तेची आकांक्षा, असूया इत्यादींमुळे लोक प्रेरित झालेले असतात आणि अगदी क्षुद्र अशा साधनांचा वापर ते करतात असे हिटलरचे लोकांबद्दल मत होते. त्याच्या जवळच्या लोकांना तो या दृष्टीनेच वागवत होता. लोकांच्या या प्रवृत्तींचा वापर करून आपले उद्दिष्ट साध्य करणे म्हणजेच राजकारण अशी त्याची नंतर धारणा झालेली होती. हिटलर जेव्हा व्हिएन्नात झगडत होता तेव्हा त्याची काही मते तयार झाली होती. गरीब, दुबळे, अयशस्वी झालेले यांच्याबद्दल त्याला काही सहानुभूती नव्हती. पण त्याचबरोबर सामान्य लोकांत राहूनच राजकारण केले पाहिजे हे त्याला पटले होते. आपल्याला सर्वसत्ताधारी व्हायचे असेल तर हा वर्ग आड येणार नसून खरा अडथळा संघटित कामगारसंघटनांकडून होईल असे त्याचे ठाम मत झाले होते. त्यामुळे व्हिएन्नातील लोकशाही समाजवादी संघटनांबद्दल त्याला कमालीचा तिरस्कार होता. जनसमुदाय प्रेमाने नव्हे तर क्रौर्याने दिपतो व त्यामुळे त्यास आपल्या प्रभावाखाली आणता येते असेही त्याचे आणखी एक प्रमेय होते.

व्हिएन्नातच नव्हे तर हिटलरच्या तरुण वयातील ऑस्ट्रियात ज्यूविरोधी भावना तीव्र होती. हिटलरकडे तो वारसा आला होता आणि तो त्याने जपला व वाढवला. यामुळेच नंतरच्या काळात हिटलरने ऑस्ट्रिया ताब्यात घेतला तेव्हा त्याचे स्वागत करणारा फार मोठा समुदाय तयार होता. ज्यूंच्यामुळेच जर्मनीचा र्‍हास झाला असून त्या समाजाचा विच्छेदच केला पाहिजे असे त्याचे मत बनले होते आणि हाती सत्ता आल्यावर हिटलरने या दृष्टीने पाउले टाकून काही लाख ज्यू नष्ट केले. जनसमुदायाचे मानसशास्त्र हिटलने अभ्यासले होते व त्याने काही आडाखे बांधले होते. समुदायाच्या भावना भडकवायच्या असतील तर त्याच्यापुढे कोणता तरी खरा वा कल्पित शत्रू उभा करावा लागतो आणि हा शत्रूच अवनती घडवून आणत असल्याचे लोकांच्या मनावर सतत बिंबवणे आवश्यक असते. या सूत्रानुसार हिटलरने ज्यू समाजास मानले. त्याच्यामुळे पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला असे तो सांगत असे.

बहुविध पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींची निवड करून सत्ताधारी निवडण्यामुळे दुबळे नेतृत्व पुढे येते म्हणून अशा निवडणुकीस हिटलरचा विरोध होता. सामुदायिक नेतृत्व व कर्तृत्व यावर त्याचा विश्वास नव्हता. नियमित आपल्याला नेतृत्व करण्यासाठी जन्माला घातले असल्याची त्याची ठाम समजूत होती आणि आपल्याशिवाय जर्मनीचा उद्धार कोणाकडूनही होणार नाही अशी त्याची पक्की समजूत होती.

यासाठी त्याने आपल्या मार्गात आड येणाऱ्या पक्षांच्या व व्यक्तींच्या विरुद्ध प्रचाराची मोहीम उघडली. ती उघडताना अतिरेकी व हिंसक भाषा उपयोगी पडते असे त्याचे मत होते. शिवाय उखडून टाकू, नाहीसे करू, गाडून टाकू इत्यादी भाषा वापरली की लोकांत ती वापरणारा नेता हा बलिष्ठ असल्याची भावना निर्माण होते असे हिटलर मानत होता. यामुळे तो नुसती या प्रकारची भाषा वापरूनच थांबला नाही तर तो झपाटल्याप्रमाणे बोलत असे, किंचाळतही असे. या सर्वांचा सामान्य माणसावर परिणाम होत होता. भाषणात व प्रचारात वाटले तितके खोटे बोलण्यास त्यास काही दिक्कत वाटत नव्हती. खोटे बोलावेच लागते आणि खोटे बोलायचे तर अगदी टोकाचे खोटे बोलणे अधिक बरे असे तो मानत होता. विद्वेष पसरवणे सोपे असते आणि ते भावना भडकवण्यास उपयोगी पडते हे जाणून त्याने आपल्या प्रचाराचा रोख त्यावर ठेवला.

हिटलरला संघटित कामगार वा सामान्य लोक यांच्याबद्दल काही प्रेम नव्हते. पण त्यामुळे तो भांडवलदार, कारखानदार यांची तरफदारी करत नव्हता. तो त्यांनाही धमक्या देत होता. यामुळे हिटलर हा आपल्या हिताची जपणूक करणारा असल्याचा समज सामान्य लोकांत पसरण्यास मदत होत होतो. तथापि त्याच्या हाती सत्ता आली तेव्हा जर्मन कारखानदायविरुद्ध त्याने मोहिम काढली नाही. उलट त्यांना मोकळे रान दिले, पण ते देताना कारखानदार आपल्या दहशतीखाली राहतील याबद्दल त्याने कटाक्ष बाळगला. त्याचे आणखी एक सूत्र होते. ते असे की, लोकांत विचारांचा प्रसार करणे धोक्याचे असल्यामुळे त्यांच्यात श्रद्धा निर्माण करणे आवश्यक. विचाराशी मुकाबला करणे सोपे असते. पण श्रद्धेशी कठीण असते. तेव्हा आपल्या मागे येणार्‍या समुदायाला आपल्याशी बांधून ठेवायचे असेल तर त्याच्यात श्रद्धा निर्माण केली पाहिजे असा हिशेब करून त्याने आपले सर्व राजकारण आखले होते. सत्ता, व्यक्तिगत सत्ता व तीही अनिर्बंध सत्ता हे त्याचे उद्दिष्ट होते व त्यासाठी कसलाही विधिनिषेध तो पाळत नव्हता. बुलक म्हणतात, जर्मनीत तेव्हा जे विधिनिषेधशून्य लोक होते, त्यांनाही अचंबा वाटावा अशा रीतीने हिटलर वागत होता.

जगात अनेक क्रांत्या झाल्या. त्यांनी आपल्यापुढे ठेवलेली उद्दिष्टे यशस्वी झालीच असे नव्हे. पण त्यांनी काही विधायक उद्दिष्टे लोकांपुढे ठेवली, काही सर्जनशील, विधायक विचार मांडले. हिटलर जी क्रांती करू पाहात होता, तिने अशी कोणतीच उद्दिष्टे ठेवली नव्हती. त्याचा राष्ट्रीय समाजवाद हा विनाशकारी आणि विध्वंसक होता असा निष्कर्ष बुलक यांनी सबळ पुराव्यानिशी काढला आहे. परंतु त्यांचे म्हणणे असे की, जर्मनीत बिस्मार्कपासूनच राष्ट्रवादी भावनेचा अतिरेक होत होता आणि त्यामुळे जर्मन लोकांची मनोभूमिका तयार झाली होती. यास हिटलरने आक्रमकतेची जोड दिली आणि विद्वेष पसरवण्यावर भर दिला. यामुळे त्याने फक्त विध्वंस घडवून आणला, काही निर्माण केले नाही. सर्वच हुकूमशहांच्या मनोभूमिकेची ओळख यामुळे होऊ शकते.

-oOo-

पुस्तक: ’सौरभ - १’
लेखक: गोविंद तळवलकर
प्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती पहिली (२०१०)
पृ. ११८ - १२१.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : सौरभ - १ >>
---


हे वाचले का?