गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

वेचताना... : सौरभ - १

चित्रपटाचा अवतार झाल्यानंतर, विशेषत: समाजमाध्यमांचा सुळसुळाट आणि मोबाईल क्रांतीनंतर डेटा स्वस्त झाल्यापासून, चित्रपटांबद्दल चारचौघात गप्पा मारताना केलेली शेरेबाजी, वैयक्तिक आवडनिवड ही ’परीक्षण’ म्हणून अवतरु लागली आहे. त्याचवेळी मुद्रित माध्यमांतून येणारी परीक्षणे बव्हंशी 'मोले घातले लिहाया’ प्रकारची असतात आणि त्याच्या शेवटी दिलेले रेटिंग पाहण्यापुरतीच चाळली जाऊ लागल आहेत.

सौरभ-१

दृश्य माध्यमांचा असा परिस्फोट झाल्यानंतर आता शब्दांना माघार घ्यावी लागत आहे. मुद्रित माध्यमांच्या इंटरनेट अवतारात तर आता काही रोजच्या जगण्यातील काही विषयांच्या स्तंभातून तर ’नाव छापून येते’ या एकमेव आनंदासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थिनींकडून ’जागाभरती’ केली जाते आहे. त्यामुळे अर्थातच सुमारांची सद्दी निर्माण झाली आहे. अशा वेळी शब्दांशी, त्याचसोबत विचार आणि निर्मितीशी इमान राखणारे लेखन अधिकाधिक दुर्मिळ होताना दिसते आहे.

पूर्वी बाजारात नव्याने आलेल्या पुस्तकांची चर्चा करणारे गट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेली नवी मालिका, नवा इंग्रजी वा परभाषिक चित्रपट यावर चर्चा करतात. पुस्तक वाचनातून आकलन नि आत्मसात होणारे ज्ञानच काय माहितीही या नव्या माध्यमांत अजून मूळ धरु शकलेली नाही. या माध्यमांमध्ये बव्हंशी मनोरंजनाचीच सद्दी दिसते. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाबाबत साधकबाधक चर्चा करणे, त्यातून काय मिळाले याचा वेध घेणे ही हळूहळू अस्तंगत होत जाणारी कला आहे.

बाजारात नव्यानेच आलेल्या पुस्तकाबाबत पूर्वी वाचक-चर्चा घडत. त्याची त्याच लेखकाच्या वा अन्य लेखकाच्या अन्य लेखनाशी तुलना केली जाई. ज्या वाचकाने पुस्तक विकत आणले त्याच्याकडून ते उसने नेऊन वाचले जाई, एकमेकांना त्याची शिफारसही होई. आता हा सामान्य-वाचक-संवादही विरुन जाताना दिसतो आहे. 

नवी पिढी तर ’वाचेन तर इंग्रजीच’ अशी भीष्मप्रतिज्ञाच करुन बसलेली दिसते. करियरमधील सतत ’मागे पडण्याच्या’ भीतीचाच अवतार म्हणजे 'हॅरी पॉटर'पासून 'गेम ऑफ थ्रोन्स'पर्यंत कुठल्याही मालिकेतले ताजे पुस्तक आपण वाचले नाही तर वाळीत टाकले जाऊ अशी भीती त्यांना वाटते की काय कुणास ठाऊक. थोडक्यात मराठी पुस्तकांचे वाचन आणि त्याचे परिशीलन ही बव्हंशी ज्येष्ठांची आणि समीक्षकांची जबाबदारी होऊन राहिली आहे.

एक दोन दशकांपूर्वीपर्यंत केवळ सामान्य वाचकच नव्हे तर अनेक उत्तम आणि श्रेष्ठ लेखक, संपादक, अभ्यासक आपल्या वाचनातील पुस्तकांबद्दल जाहीरपणे बोलत, लिहित असत. त्यातून त्या लेखकामागचा वाचकही समोर येई आणि सामान्य वाचकाला त्या त्या पुस्तकाकडे अथवा त्याच्या लेखकाकडे या लेखकाच्या दृष्टीकोनातून पाहता येई. एकुण वाचकसंस्कृतीला प्रवाही राखण्यात या 'बुक्स-ऑन-बुक्स' किंवा ’कॉलम-ऑन-बुक्स’चा मोठा वाटा आहे. (आता प्रथितयश मराठी वृत्तपत्रेही आणि नियतकालिकेही इंग्रजी पुस्तकांचीच परीक्षणे प्राधान्याने छापतात.) 

श्री. बा. जोशी यांचे ’गंगाजळी’चे चार खंड, प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार याचे ’पश्चिमप्रभा’, सतीश काळसेकरांचे ’वाचणार्‍याची रोजनिशी’ तसंच जी.एं.च्या पत्रांमधून आपण वाचलेल्या पुस्तकांबद्दल, त्यांच्या लेखकांबद्दल वाचायला मिळते. सादरीकरण-कला आणि दृश्यकलांच्या बाबतीत ज्ञानेश्वर नाडकर्णींचे ’अश्वत्थाची सळसळ’ हे याच प्रकारातले.

प्रसिद्ध संपादक गोविंद तळवलकर यांनीही ’ललित’ या नियतकालिकातून आपल्या वाचनानुभवाच्या आधारे एक सदर चालवले. समीक्षा अथवा परीक्षण या सबगोलंकार आणि पारंपरिक अशा स्वरुपाहून भिन्न अशा दृष्टीकोनातून या लेखनाकडे पाहता येते. काळसेकरांनी रोजनिशीतल्या नोंदीस्वरुपात, म्हणजे काहीशा वैयक्तिक अनुभवस्वरुपात मांडले, जीएंनी बव्हंशी वैयक्तिक पत्र-संवादातून काहीशा अनौपचारिक स्वरुपात कथन केले. तळवलकरांनी लेखनापेक्षा, किंवा लेखनाबरोबरच आपले लक्ष लेखकावर केंद्रीत केले आहे.

'सौरभ' हे त्यांचे सदर दोन खंडात संपादित केले आहे. त्यातील पहिल्या भागात प्रामुख्याने लेखकांबद्दलचे लेख आहेत. त्यात मला विशेष भावलेले लेख आहेत ते चार्ल्स डिकन्स हा प्रख्यात कादंबरीकार आणि आर्थर मिलर या नाटककारावरचे. पण यात सर्वात उत्तम वठलेला लेख आहे तो व्हॅसिली ग्रॉसमन या ज्यू-रशियन लेखकावरचा. उमर खय्यामवरील लेख माहिती म्हणून आवर्जून वाचण्याजोगा. याशिवाय ऑर्वेल, चेकॉव्ह, थॉमस पेन, गटे आदि लेखकांचाही समावेश आहे.

इथे निवडलेला उतारा आहे तो अ‍ॅलन बुलक या इतिहासकारावरच्या लेखातला, आणि हा वेचा आहे तो हिटलर नामे क्रूरकर्म्याबद्दलच्या अ‍ॅलन यांच्या आकलनाबद्दलचा. त्याअर्थी तो व्यक्तिचित्रामधील व्यक्तिचित्र प्रकारात मोडतो. व्यक्ती म्हणून हिटलरच्या प्रवृत्तीचा मागोवा आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे अ‍ॅलन यांचे आकलन आजच्या भारतीय परिस्थितीचीचेच नव्हे तर इतर अनेक देशांतील स्थितीचे भान देणारे ठरू शकेल.

- oOo -

या पुस्तकातील एक वेचा: क्रूरा मी वंदिले


संबंधित लेखन

1 टिप्पणी:

  1. हे वाचायला खूप आवडलं. असं वाटतंय, जरी हे त्यावेळी एका व्यक्तिसंदर्भात असलं तरी आजही लागूच आहे हे कळतंय, ते विलक्षण वाटतं आहे.
    ही पुस्तकं आता उपलब्ध नाहीत याचं वाईट वाटतंय, पण तू लिहिल्यामुळं कळलं तरी...

    उत्तर द्याहटवा