शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)

(हा दीर्घ लेख दोन भागांत प्रसिद्ध होतो आहे. याचा पूर्वार्ध २५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाला आहे. तर हा उत्तरार्ध आज वर्षअखेरीस प्रसिद्ध होतो आहे.

मागील लेखार्धाच्या सुरुवातीलाच आलेल्या ओलाफच्या गाण्यात ’मेले कलिकी’ असा एक उल्लेख आला आहे, त्यामागचा इतिहासही मजेशीर आहे. प्रशांत महासागरातील हवाई बेटे ही अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या अधिपत्याखाली आहेत. तेथील बहुसंख्या ख्रिश्चन आहे. त्यामुळे ख्रिसमससह बहुतेक ख्रिस्ती परंपरेतील सण तिथेही साजरे केले जातात. पण फरक असा आहे, की ही बेटे अमेरिकेच्या मूळ भूमीपासून बरीच दक्षिणेला म्हणजे उष्ण कटिबंधात येतात. त्यामुळे अमेरिकेत डिसेंबरमध्ये सुरू होणारा हिवाळा तिथे आणखी काही आठवड्यांनी सुरु होतो. त्यामुळे ख्रिसमस काळात तिथे चक्क उष्ण हवामान असते. त्याचे प्रतिबिंब रॉबर्ट अलेक्स अ‍ॅंडरसन या गीतकाराच्या ’मेले कलिकीमाका’ या गाण्यात उमटलेले आहे.

हे मेले कलिकी अथवा कलिकीमाका काय भानगड आहे असा प्रश्न चटकन डोक्यात आला असेल. त्यामागे भाषिक कारण आहे! हवाई बेटांवरील लोकांची उच्चाराची पद्धत - मूळ स्थानिक भाषेच्या प्रभावामुळे - बरीच वेगळी आहे. त्यांना R आणि S या इंग्रजी अक्षरांचा उच्चार ठाऊक नाही. या दोन व्यंजनांचा उच्चार ते लोक साधारणपणे L आणि K सारखा करतात. यामुळे ’मेरी ख्रिसमस’चा उच्चार हा ’मेले कलिकीमाका’ असा होतो. थोडक्यात सांस्कृतिक प्रवाहाला इथे एक भाषिक वळणही मिळून गेले आहे.

अ‍ॅंडरसनचे गाणे सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आणि गायक बिंग क्रॉस्बीने बिंग क्रॉस्बीने (व्हाईट ख्रिसमस, विंटर वन्डरलॅंड या लोकप्रिय गाण्यांचा गायक) प्रथम गायले आहे. ते पुढे ख्रिसमसचे गाणे (Carol) म्हणून गणले जाऊ लागले.

"Mele Kalikimaka” is the thing to say
On a bright Hawaiian Christmas day
That’s the island greeting that we send to you
From the land where palm trees sway

Here we know that Christmas will be green and bright
The sun will shine by day and all the stars at night
“Mele Kalikimaka” is Hawaii’s way
To say Merry Christmas to you.

ख्रिसमस गीतांमध्ये काही गीते ही ’लेट इट स्नो’ म्हणणारी, हिमवर्षावाची अपेक्षा करणारी असतात. १९४५ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेच्या काळात हॉलिवूडमधील सॅमी कान आणि ज्यूल स्टाइन या गीतकार-संगीतकार जोडगोळीने ’लेट इट स्नो’ हे गाणे लिहिले होते. (ओलाफ ज्या चित्रपटात अवतरला त्या फ्रोझनमध्ये ’लेट इट गो’ या ध्रुवपदाचे एक गाणे आहे हा एक आणखी योगायोग.) फ्रॅंक सिनात्राने याचीच एक विस्तारित आवृत्ती गायलेली आहे. हे ’मेले कलिकीमाका’ त्या ’लेट इट स्नो’ला प्रत्युत्तर आहे असे काही लोक मानतात.

अमेरिकेच्या या सीमेवरुन आणखी पुढे जाऊन आफ्रिकेकडे वळलो तर तिथेही शिशिरान्त-उत्सवांचे धागे सापडतात. १९६६ मध्ये मौलाना कारेंगा याने आफ्रिकन-अमेरिकन जनतेसाठी ’क्वान्झा’ (Kwanzaa) या सणाची सुरुवात केली. या उत्सवामागे 'उमखोसी वोग्जेमा' या झुलूंच्या शिशिर-संपातोत्सवाची प्रेरणा आहे. युरपिय वंशीयांकडून सांस्कृतिक वारसा उधार घेण्याऐवजी आपल्या आफ्रिकन वारशाला, परंपरांना यातून उजाळा मिळावा असा यामागचा हेतू आहे. २६ डिसेंबर ते १ जानेवारी असा सात दिवस हा उत्सव साजरा होतो. अन्य शिशिर-संपाती उत्सवांप्रमाणेच याची अखेर ६ जानेवारीला करामु नावाच्या सहभोजनाने होते. क्वान्झा या स्वाहिली शब्दाचा अर्थ आहे ’पहिले फळ’. द. आफ्रिकेमध्ये हा पहिल्या फळांचा उत्सव शिशिर-संपातासोबत साजरा होतो. क्वान्झाच्या स्पेलिंगमध्ये शेवटी आणखी एक अक्षर जोडून आफ्रिकन परंपरेत महत्व असलेला सात अक्षरांचा मेळ साधला आहे. या उत्सवादरम्यान सात मेणबत्त्यांचा मनोरा प्रज्वलित केला जातो. यात सात मेणबत्त्या उत्सवाशी निगडित एकता, स्वावलंबन, सहकार्य, सहकार, निश्चय, सर्जन आणि श्रद्धा या सात तत्त्वांचे प्रतीक आहेत.

मेणबत्यांचा हा मनोरा ज्यू परंपरेतही आहे. तिथेही यात सात मेणबत्त्या असतात. त्यातील मधली मेणबत्ती हे ज्ञानवृक्षाचे तर इतर सहा फांद्या तर्कशास्त्र, गणित, विज्ञान, इतिहास व मानव्यशास्त्र, तत्त्वज्ञान आणि ज्ञानसंरक्षण या सहा ज्ञानशाखांचे प्रतीक आहेत. सात मेणबत्यांच्या मेनोराला सात दिवसांच्या आठवड्याचे प्रतीकही मानले जाते. सात आकडा हा नॉवेमधील ख्रिसमस महोत्सवातही डोकावून जातो. तिथे या उत्सवादरम्यान Bordstabelbekkels नावाने ओळखल्या जाणार्‍या सात प्रकारच्या कुकीज (आपल्या ब्रिटिश इंग्रजीमध्ये 'बिस्किटे') तयार केल्या जातात. ज्यूंच्या होनेका या सणाला सात नव्हे तर नऊ मेणबत्त्यांचा मेनोरा असतो. आठ दिवसांच्या या सणादरम्यान दररोज एक मेणबत्ती अधिक प्रज्वलित केली जाते. पहिली मेणबत्ती ही इतर आठ पेटवण्यासाठी वापरली जाणारी ’प्रेरक’ मेणबत्ती असते, ती पहिल्या दिवशी प्रज्वलित होते. ओलाफच्या गाण्यामध्ये आठ दिवस रोज एक मेणबत्ती लावण्याचा उल्लेख आहे तो या होनेकाचा आहे.

मध्ययुगीन काळात या उत्सवांमध्ये मनोरंजनासाठी एक तात्पुरता नेता निवडला जाई. तो त्या उत्सवाचा शासक, प्रशासक, संचालक किंवा राजा असे. सॅटर्नेलियामध्ये जनतेमधून एक 'सॅटर्नेलियाचा शासक अथवा राजा' (Saturnalicius princeps) निवडला जाई. त्या उत्सवापुरत्या सर्वांनी त्याच्या आज्ञा पाळणे, तो म्हणेल त्यानुसार सर्वांनी वागणे बंधनकारक असे. साधारणपणे ’Simon Says’ किंवा आपल्याकडची आवृत्ती म्हणजे ’शिवाजी म्हणतो...’ हा खेळ खेळतात तसा हा खेळ असे. युरपमध्ये ख्रिसमस-उत्सवामध्ये (Chrismastide) एक दिवस 'मूर्खांचा खाना' (Feat of Fools) साजरा केला जात असे. या उत्सवाचा म्होरक्या म्हणून इंग्लंडमध्ये 'अव्यवस्थेचा सरदार' (Lord of Misrule) जनतेमधून निवडला जात असे. स्कॉटलंडमध्ये यालाच अतार्किक अधिकारी (Abbot of Unreason) असे म्हटले जाई, फ़्रान्समध्ये याला ’मूर्खांचा राजपुत्र’(Prince des Sots) असे नाव होते. कॅथलिक ख्रिस्ती मंडळी साजरा करत असलेल्या कार्निव्हल या उत्सवातही एक ’किंग मोमो’ निवडला जातो, जो ’खा, प्या, मजा करा’ असे सांगणारा आनंदी राजा असतो. अशाच स्वरूपाच्या उत्सवासाठी चर्च ऑफ इंग्लंड 'बॉय बिशप' हा एक दिवसाचा बिशप निवडत असे. ’सेंट ल्युसिआ डे’ला निवडला जाणार्‍या तरूणीची निवड मात्र अशा तर्‍हेने राणी वा एक दिवसाची शासक म्हणून नव्हे, तर मूळ ल्यूसीचे प्रतिरूप म्हणून, श्रद्धाविषय म्हणून केली जाते.

ख्रिसमसच्या दिवसाच्या अलीकडील चार रविवार जमेस धरुन होणारा सुमारे महिनाभराचा काळ ख्रिस्ताच्या 'आगमनाचा काळ’(Advent) म्हणून साजरा केला जातो. या काळात दारावर सदाहरित वृक्षांच्या पानांचे नि फुलांचे एक चक्र (wreath) टांगलेले असते. याचा संबंधही ग्रीक तसंच रोमन खेळांमध्ये विजेत्याच्या शिरी चढवल्या जाणार्‍या पानांच्या मुकुटाशी जोडला जातो. पेगन म्हणजे बहुदेवतापूजक धर्मांमधून वर्तुळ हे चिरंतनाचे, काळाच्या पुनरावृत्तीचे प्रतीक मानले जात असे. त्यामुळे असे चक्र धारण करणे हा खेळाडूचा बहुमान मानला जाई. दुसरीकडे ख्रिस्ताच्या डोक्यावरील काटेरी मुकुटाचे प्रतीक म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते.

ख्रिसमस ट्री ही ख्रिसमस-उत्सवातील सर्वात अर्वाचीन परंपरा आहे हे सांगितले तर बहुतेकांना आश्चर्य वाटेल. ही परंपरा एकोणीसाव्या शतकात ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाने तिचा जर्मन पती प्रिन्स अल्बर्ट याच्या प्रेरणेने सुरु केली. सदाहरित वृक्षांच्या पानाचे चक्र (wreath) अथवा फांदी हे युरपियन शिशिर-संपात उत्सवातून आधीच प्रचलित होते. Mistletoe या सदाहरित, परजीवी वेलीचा समावेशही अनेक उत्सवांतून होता. आरोग्याच्या विविध समस्यांवरील उपचारांमध्ये या बहुगुणी वेलीचा वापर केला जात असे. कडक हिवाळ्यातही फळे देणारी ही वेल सर्जनशक्तीचे प्रतीक मानली जाई. म्हणून ग्रीक आणि रोमन उत्सवांमधून तिच्या छत्राखाली उभे राहून चुंबन घेण्याची प्रथा पडली. सदाहरित वृक्षाचे महत्व अति-उत्तरेकडील स्कॅंडिनेविअन देशांत अधिक असणे ओघाने आले. चिरंतनाचे प्रतीक असलेल्या अशा वृक्षाखाली परस्परांचे चुंबन घेणार्‍यांचे प्रेमही चिरंतन राहील ही कल्पना तिथे प्रथम उगवली. तिचा नॉर्डिक वंशीयांच्या फ्रिग्गा या देवतेशी संबंध जोडलेला आहे. तीच प्रथा ग्रीक व रोमन मंडळींनी आपल्या जीवनदायी वेलीसंदर्भात उचलली. ही प्रथा अठराव्या शतकाच्या आसपास ख्रिसमस-उत्सवात सामील झाली. ख्रिसमस ट्री आणि मिसलटो यांच्या सदाहरित असण्याचा संबंध पुढे देवाच्या नि देवपुत्राच्या चिरंतर प्रभावाशी जोडला गेला.

भिन्न भौगोलिक परिस्थितीमध्ये एकाच धर्मियांच्या चालीरीतींमध्ये फरक पडतो, त्यात जशा प्रादेशिक परंपरा मिसळून जातात, तशाच स्थानिक भौगोलिक, सामाजिक चालीरीतींना अनुसरून नव्या परंपराही निर्माणही होतात. काही परंपरा मात्र चक्क व्यावहारिक समस्यांना अनुसरूनही निर्माण झालेल्या आढळतात. ओलाफला सुरुवातीलाच भेट म्हणून मिळालेली साखरकाठी(candy cane) ही जर्मन परंपरा आहे. तिची गोष्ट मोठी गंमतीशीर आहे. ख्रिस्तजन्माशी निगडित गोष्टींवर आधारित नाट्यप्रवेश साजरे करणे हा अनेक देशांतील ख्रिसमस परंपरेचा भाग आहे. त्याला प्रदेशांनुसार, भाषांनुसार नावे वेगवेगळी आहेत, पण ख्रिस्तजन्माच्या गोष्टीला उजाळा देणे हा त्यांचा सामायिक उद्देश आहे.

पण कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात विक्षेप येतो तो लहान मुलांचा. आधीच चैतन्याचा अधिक आविष्कार असलेली मुले, सणाच्या वातावरणात अधिकच चळवळी होतात. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीतील कलोन शहरातील एका वृंदसंयोजकाने(choirmaster) या मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. त्याने एका स्थानिक मिठाईवाल्याला या मुलांना वाटण्यासाठी साखरकाठ्या बनवण्यास सांगितले. येशूच्या जन्मानंतर त्याला भेटायला आलेल्या मेंढपाळांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्याने त्या काठीला एका बाजूने बाक देण्यास सुचवले. या मखलाशीमुळे चर्चमध्ये त्या वाटण्यास चर्च प्रशासनाकडूनही त्याला सहज अनुमती मिळाली. चळवळ्या पोरांना अशा तर्‍हेने शांत बसवल्यानंतर त्याचा वाद्यवृंद आणि नाट्यप्रवेश सादर करणारे आपली कला शांतपणे सादर करु शकले. (अर्थात साखरेची जास्तीची मात्रा घेऊन घरी गेलेल्या मुलांनी त्यांच्या घरच्यांना दुप्पट वैताग दिला असणार. पण तो त्यांचा प्रश्न झाला. आपली समस्या दुसर्‍या कुणाच्या गळ्यात मारणे, आपला केर शेजार्‍याच्या दारी सरकवणे याला जगभर मोठी परंपरा आहे.) यशावकाश ही साखरकाठी ख्रिसमस परंपरेचा भाग बनली. हा प्रसंग, ही दंतकथा(?) १६७० मधील आहे, जेमतेम साडेतीनशे वर्षांपूर्वीची!

चित्रपटांनी आणि मुख्य म्हणजे भांडवलशाही उत्पादकांनी लोकप्रिय केलेला सांताक्लॉज हा ही ख्रिसमसचा जणू अविभाज्य भाग मानला जातो. ख्रिसमसच्या आदल्या रात्री मुलांनी सांतासाठी मोजे टांगून ठेवायचे. रात्री कधीतरी येऊन सांता त्यांना हव्या त्या भेटवस्तू त्यात ठेवून जातो, अशी आख्यायिका लहान मुलांना सांगितली जाते. मग आई-वडिलांनीच त्या भेटी त्यांच्यासाठी आणून ठेवायच्या हे ओघाने आलेच. या सांता-क्लॉजचा ख्रिस्ताच्या आयुष्याशी संबंध कुठेच दिसत नाही. मग हा आला कुठून असा प्रश्न पडतो. याचा उगम ग्रीसमध्ये आहे असे मानले जाते. तिथे सेंट निकोलस नावाचा एक सहृदयी गृहस्थ खरोखरच लहान मुलांना भेटी देऊन त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवित असे. बायझंटाईन साम्राज्यात (आजचे तुर्कस्थान) असा समज होता, की हा सेंट निकोलस गरीबांच्या घरावरच्या धुराच्या चिमणीतून पैसे आत टाकत असे. हे पैसे शेकोटीजवळ वाळत घातलेल्या मोज्यांमध्ये जमा होत असत. मग ६ डिसेंबरला या निकोलसच्या नावे सार्वजनिक भोजनाचा प्रघात पडला.

तिथून हा थेट नेदरलॅंड्समध्ये पोचला तो सिंटरक्लास या स्थानिक नावाने. आता त्याचा हिरवा पेहराव लाल झाला. आपल्या बोटीत भेटवस्तू भरुन प्रथम तो गावात पोहोचत असे नि आपल्या ’अमेरिगो’ नावाच्या घोड्यावरुन गावभर फिरुन त्या भेटी तो वाटत असे. अति-उत्तरेला स्कॅंडिनेवियामध्ये पोहोचल्यावर यथावकाश घोड्याचे रेनडिअरमध्ये आणि बोटीचे स्लेजमध्ये रुपांतर झाले. स्वीडनमध्ये या सांताचे रूप आणखी थोडे बदलले आहे. स्थानिक शेतकर्‍यांना साहाय्यक असणार्‍या तॉम्प्ते नावाच्या आत्म्याची नि बाहेरुन आलेल्या सांताची सरमिसळ होऊन यूलतॉम्तन नावाचा नवा अवतार प्रसिद्ध झाला आहे. मूळ तॉम्प्तेला मिळणारा तांदळाच्या खिरीचा प्रसाद आता या नव्या तीन फुटी सांताला देण्याची प्रथा रूढ झाली आहे.

हा सिंटरक्लास पुढे अमेरिकेला पोहोचला. वॉशिंग्टन आयर्विंग या तेथील लेखकाने या सिंटरक्लासचे शब्द-चित्र रेखाटले. त्यात त्याला हिरवा पायघोळ कोट वापरणार्‍या, पाईप ओढणार्‍या खलाश्याच्या रूपात रंगवले होते. सांता-क्लॉज हे नावही आयर्विंगनेच दिले. क्लेमंट क्लार्क मूर या कवीने ’The Night Before Christmas’ नावाची एक कविता लिहिली आहे, ज्यात आज दिसणार्‍या सांताचे रूप प्रथम रेखाटण्यात आले आहे. (’The Night Before Christmas’ ही कविता पुढे इतकी लोकप्रिय झाली की त्यावर आधारित असलेला एक भाग बर्‍याच चलच्चित्र(Animation) मालिकांमधून सापडतो.)

याला दृश्य रूपात आणण्याचे काम थॉमस नॅस्ट या अमेरिकन व्यंगचित्रकाराने केले आहे. कोका-कोला या प्रसिद्ध शीतपेयांच्या कंपनीने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून फरची कडा असलेला लाल पायघोळ कोट घातलेला, रेनडिअरच्या स्लेजवरुज प्रवास करणार्‍या सांताला घेऊन आपल्या पेयाची जाहिरात करायला सुरुवात केली. यातून त्यांचे पेय आणि सांता दोघेही लोकप्रिय होत गेले. हा सारा प्रवास अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातला आहे. म्हणजे प्राचीन समजल्या जाणार्‍या या प्रेमळ आजोबाचे वय जेमतेम दोनशे-अडीचशे वर्षे इतकेच आहे. आणि त्याला लोकप्रिय करण्यात भांडवलशाही जगाने निर्माण केलेल्या जाहिरात-तंत्राचा खूप मोठा वाटा आहे. किंबहुना ख्रिसमस हा धार्मिक असण्यापेक्षा राजकीय- आणि आता भांडवलशाहीच्या कृपेने - बहुतेक सर्वधर्मीय उत्सवांप्रमाणे, आर्थिक-उत्सव अधिक आहे. त्या निमित्ताने होणारी प्रचंड आर्थिक उलाढाल हीच आता त्यामागची प्रेरणा उरली आहे.

प्रत्येक परंपरा ही अशीच कुठेतरी, कुणीतरी जन्माला घालत असतो. आणि बरेचदा तिचा श्रद्धेशी वा देवाशी फारसा संबंधही नसतो. त्यामुळे त्यात बदल झाला, ती खंडित झाली तरी कोणतीही बाभळ बुडत नसते. किंबहुना कालप्रवाहात ते ओघाने, विविध कारणाने घडतच असते. पण हे विसरुन अस्मितेचे टेंगूळ उगवलेली खुजी माणसे, जरा एक सूतभर बदल झाला तरी भावना दुखावून घेतात, कांगावा करतात. परंपरेला अवास्तव महत्व देत तिच्यापुढे सार्वजनिक हिताचा बळी देतात. मूळ संदर्भाशी निगडित जिवंतपणाला ठार मारून त्याभोवती अलौकिकाचे, पावित्र्याचे प्रेतवस्त्र गुंडाळून त्याचे उत्सव साजरे करु लागतात. याशिवाय अनेकदा श्रद्धा-श्रेष्ठत्वाच्या चढाओढीत आपल्या श्रद्धेची उंची वाढवण्यासाठी माणसानेच तिच्या पायी चढवलेल्या उंच टाचेच्या वहाणा किंवा तिच्या शिरी चढवलेला शिरपेच वा मुकुट असेच या परंपरांचे स्वरूप असते.

तरीही काळाच्या ओघात कधी इकडून तिकडे, कधी तिकडून इकडे असा त्यांचा प्रवास चालूच असतो. परंपरांची अशी देवाणघेवाण सतत चालू असते. त्यामुळे विविध भूभागांवरील परंपरांमध्ये काही सामायिक आढळत जाते. यापैकी नक्की कुठली परंपरा आधी सुरू झाली हे सांगणे फार अवघड असते. एखादी परंपरा धार्मिक, आर्थिक अथवा राजकीय बळाच्या आधारे अधिकाधिक भूमी व्यापत जाते, तसतसे नव्या भूमीवरील अनेक स्थानिक परंपरांचे तिच्याशी संमीलन होत जाते. क्वचित केवळ आवड म्हणून, चूष म्हणून, कधी सामाजिक स्थान बळकट करण्यासाठी दुय्यम गटाच्या परंपराही स्वीकारल्या जातात, आत्मसात केल्या जातात. त्यांचा रंग बदलून सामावून घेतल्या जातात. तरीही त्यांचा मूळ रंग पुरा लपवता येत नाही. आर्थिक, राजकीय सत्तेच्या जोरावर अनेकदा शासकवर्ग आपल्या परंपरा जनतेवर लादत जातो. सांस्कृतिक अभिसरण असे अनेक अंगानी, अनेक वाटांनी होत असते.

'जगातले सारे काही श्रेष्ठ ते आमच्याकडेच निर्माण झाले नि तिथूनच इतरत्र पोचले' असा दावा केवळ अज्ञानमूलक आणि अहंकारीच असू शकतो. अशा एकांगीपणापासून दूर राहून तिच्याकडे बारकाईने पाहता आले, तर सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासातून उलट दिशेने राजकीय-धार्मिक आणि आर्थिक इतिहासाचे धागेदोरे शोधता येतात. इतिहासाच्या अभ्यासाला आणखी एक सशक्त प्रवाह येऊन मिळतो, माहितीचा नवा स्रोत खुला करतो. अशी सांस्कृतिक देवाणघेवाण माणसाच्या इतिहासातील राजकीय यशापयशांच्या, रणमैदानातील जय-पराजयांच्या अभ्यासापेक्षा अधिक महत्वाची मानली पाहिजे. प्राणिजगतामध्ये माणूस अधिक सामाजिक प्राणी मानला जात असेल तर त्याच्या जमातीमधील द्वेष आणि हिंसेपेक्षा बांधिलकीचा, स्नेहाचा, सहकार्याचा इतिहास अधिक अभ्यासनीय असायला हवा. पण सांस्कृतिक इतिहासातील अशा बांधिलकीच्या, परस्पर सहकार्याच्या, देवाणघेवाणीच्या गोष्टी पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचतच नाहीत, ही आपल्या इतिहास-अभ्यासाची शोकांतिका आहे. करुणेचे तत्वज्ञान सांगणार्‍या येशूच्या स्मरणार्थ साजरा होणारा ख्रिसमसही अशा हेकेखोर, द्वेषप्रेमी माणसांच्या कचाट्यातून सुटू शकलेला नाही.

इतक्या सार्‍या सणांना सोबत घेऊन येणारा डिसेंबर हा अनेक देश, वंश, धर्म, जमाती यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. त्यामुळे अलिकडच्या काळात निदान सार्वजनिक ठिकाणी ’Merry Christmas’ ऐवजी ’Seasons Greetings’ अथवा ’Happy Holidays’ म्हणून अभिवादन करण्याची पद्धत रूढ होते आहे. ही काहीशी सर्वव्यापी म्हणजे सेक्युलर पद्धत आहे. समोरची व्यक्ती कोणत्या परंपरेचे पालन करते, तिची पार्श्वभूमी काय याची माहिती नसताना, ख्रिसमसचे अभिवादन एकांगी ठरते अशी यामागची भूमिका आहे. परंतु ही पद्धत म्हणजे ख्रिश्चन परंपरा उखडून टाकण्याचा प्रयत्न आहे, असा कांगावा काही अतिरेकी मताच्या ख्रिस्ती व्यक्ती नि संघटना करत आहेत. पाच-सहा वर्षांपूर्वी स्टारबक्स या प्रसिद्ध कॅफेने डिसेंबरमध्ये ख्रिसमस-ट्रीचे चित्र असलेल्या कपांऐवजी साधे लाल कप देऊ केले, म्हणून या मंडळींनी बराच गदारोळ केला होता. उलट काही कट्टर ख्रिस्ती लोक ख्रिसमस-ट्री वगैरे सारख्या गैर-ख्रिस्तीच नव्हे तर पेगन परंपरांचा समावेश करण्यास विरोध करत आले आहेत. गॉस्पेल्समध्ये कुठेही ख्रिस्तजन्माचा उल्लेख नाही, त्यामुळे ख्रिस्तजन्माचा उत्सव साजरा करण्याचे काही औचित्य नाही, असा दावा करत हे कट्टरपंथी त्याचा विरोध करत होते. सतराव्या शतकात इंग्लंडमधील क्रांतीनंतर ख्रिसमस उत्सवावर बंदीही घालण्यात आली होती. पुढे यथावकाश ती उठवली गेली. ख्रिसमसचे इंग्लंडमध्ये पुनरुज्जीवन करण्यात चार्ल्स डिकन्स याच्या ’ए ख्रिसमस कॅरल’(१८४३) या प्रसिद्ध कादंबरीचा मोठा वाटा मानला जातो.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष थिओडर रुझेवेल्ट यांनीही व्हाईट हाऊसमध्ये ख्रिसमस ट्री सजवण्यास बंदी घातली होती. त्यांचा विरोध जसा धार्मिक होता तसाच पर्यावरणीय दृष्टीनेही होता. U.S. Forest Service ची स्थापना करुन लाखो एकर जमिनीवरील वृक्षसंपदा वाचवण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. (गाण्यामध्ये ओलाफ ’You cut down a tree and then you dress its corpse with candles’ असे उपहासाने म्हणतो आहे ते याच भूमिकेतून.)

डिसेंबरप्रमाणे ’मे सेलेब्रेशन्स’बाबतही सांगता येते. कॅथलिक ख्रिश्चन लोक संपूर्ण मे महिना येशूची माता व्हर्जिन मेरी हिचा उत्सव साजरा करतात. थोडे मागे जाऊन पाहिले, तर ग्रीक लोक असाच उत्सव 'अर्टेमिस' या त्यांच्या व्हर्जिन देवतेसाठी साजरा करत असतात. ही देवता आणि रोमन लोकांची 'डायाना' ही देवता एकच असे मानले जाते. (शिशिर-संपाताच्या बद्दल बोलत असताना मागील भागाच्या शेवटी रोमन देव सॅटर्न आणि ग्रीक देव क्रोनस यांचे एकरुपत्व तसंच सॅटर्नेलिया आणि क्रोनिआ यांच्यातील साम्याचा उल्लेख आलेला आहे.) रोमन देवता फ्लोरा हिच्या स्मरणार्थ इ.स.पूर्व तिसर्‍या शतकापासून 'फ्लोरालिआ' हा उत्सव साजरा केला जात असे. ज्यात तिच्या शिरी फुलांचा मुकुट असे. ही परंपराही इतर अनेक देवतांच्या उत्सवातही आहे. सेंट ल्युसिआच्या शिरी असलेला पानाफुलांचा मुकुट हे याचेच भावंड.

ख्रिस्ती धर्मीयांच्या राजकीय नि धार्मिक विजयानंतर त्यांची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी, विविध स्थानिक परंपरा नि उत्सवांना पर्याय देण्यासाठी ख्रिसमसची योजना झाली आहे. पण जुन्या परंपरा लोक सहजासहजी सोडत नाहीत, हे ध्यानात घेऊन नव्या धर्माने, शासनाने त्यांना हळूहळू सामावून घेत आपले असे रूप दिले. असे इतिहासात वारंवार घडले आहे. बहुतेक जेत्या जमाती, संस्कृती, धर्म याचप्रकारे नव्या भूमीत पाय रोवताना दिसतात. भारताच्या इतिहासातही अशी अनेक उदाहरणे सापडावीत. भारतातील वैष्णव परंपरा याच मार्गाने रुजली-वाढलेली आहे. त्यांचे इतरांना सामावून घेणे ख्रिसमसप्रमाणेच 'हपापाचा माल गपापा' प्रकारचे आहे. यशाच्या भाळी आपला टिळा लावण्यासारखे आहे. यात राम-कृष्णापासून अलिकडे पटेल-बोसांपर्यंतची उदाहरणे हेच सांगत आहेत.

त्यांची तथाकथित अवतार-कल्पना ही अशीच पूर्वीच्या नायकांना, देव-देवतांना पोटात घेण्यासाठी, त्यांच्यावर हक्क प्रस्थापित करण्यासाठी लढवलेली क्लृप्तीच आहे. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठोबाचे बहुजनांचा राजा, देव याकडून विष्णूचा अवतार याकडे होत गेलेले संक्रमण हे त्याचे सर्वात अर्वाचीन उदाहरण आहे. पदुबाई आणि तुळसा या विठ्ठलाच्या स्त्रियांच्या मृत्यूभोवती अनुल्लेखनीय अशा कथा रचून त्यांना विठोबाच्या भक्तांच्या बोलण्यातून चलाखीने हद्दपार केले गेले आणि त्याजागी रुक्मिणीची योजना करुन विठोबा-रखुमाईचा गजर प्रचलित केला. इतके पुरेसे नव्हते म्हणून सावळ्या विठ्ठलाला पांडुरंग (पांडु=पांढरा) असे विपरीत नाव दिले आहे. जगण्यासाठी एक वस्त्र नि एक वाडगा इतके पुरेसे समजणार्‍या साईबाबांचे ज्याप्रमाणे संगमरवरी पुतळे उभे राहतात, त्यांना सोन्याचे मुकुट नि सिंहासने असतात, तसेच काही दशकांत विठोबाच्या संगमरवरी मूर्ती उभ्या राहून त्याचे पांडुरंग हेच रूप पक्के होत जाईल. विठोबा लोकांच्या स्मृतीतून हळूहळू हद्दपार होत जाईल, जातिभेदविरहित समाजाचे स्वप्न घेऊन एकत्र आलेले विठोबाचे वारकरी हे केवळ वैष्णवांचा मेळा होऊन राहतील.

मुस्लिम, ख्रिस्ती यांचे बस्तान तलवारीच्या, राजकीय वर्चस्वाच्या आधारे बसवले असल्याने लादणे अधिक सोपे होते. वैष्णवविचार-विस्तार हा प्रामुख्याने माध्यमांच्या (पुराणे, ब्राह्मणे, परंपरा, सण इ.) आधारे झालेला आहे त्यात लादणे शक्य व्हावे इतकी भक्कम राजकीय ताकद क्वचितच एका राजाकडे होती. बौद्ध, वैष्णव, शैव (अगदी जैनही) वगैरेंचे सांस्कृतिक संघर्ष राज्यकर्त्यांनी क्वचितच दत्तक घेतले. त्या क्षेत्रातले नि या क्षेत्रातले संघर्ष कायम वेगळेच राहिले. इथे बौद्ध-सनातन धर्म, वैष्णव-शैव यांचे संघर्ष झाले नाहीत असे नाही. पण त्यांना क्रूसेड्स इतके व्यापक रूप आले नाही. ब्रह्मदेवाच्या पंथाचा निर्णायक पाडाव झाला पण तो शस्त्र-मार्गाने नाही. शैव-वैष्णव तुल्यबळ होते. त्यामुळे मागील परिच्छेदात उल्लेख केल्याप्रमाणे दशावतारासारख्या संकल्पनेच्या आधारे सारे श्रेष्ठ पुरुष आपल्या कळपात ओढून आपले सामाजिक बळ वाढवण्याचा प्रयत्न वैष्णवांनी केला नि तो बराचसा यशस्वीही झाला

शिकवणुकीचे, प्रबोधनाचे, नैतिक चौकटीचे एकाहुन अधिक स्रोत असले की त्यांच्या शिकवणुकीत विसंगती, परस्परविरोध निर्माण होऊ शकतो म्हणून अब्राहमिक धर्मांनी जुने विचार मोडीत काढण्यासाठी नि विसंगती टाळण्यासाठी परमेश्वर या संकल्पनेची निर्मिती केली. आता त्याने सांगितले तेच बरोबर, त्याच्या विरोधात जाईल ते सारे चूक अशी भूमिका घेणे सोपे झाले. यातून अनेक वाटांचा गोंधळ टाळून 'एक नि एकच देव नि त्याने सांगितलेली एक नि एकच वाट अंतिम' असे म्हणत स्थानिक पर्यायी विचार नष्ट करुन टाकण्याची सोय करुन ठेवली.

पण चालीरीती वा परंपरांचे तसे झाले नाही. कारण सामान्य माणसे विचारापेक्षा त्याच्या दृश्य रूपाला, कर्मकांडांना अधिक चिकटून असतात. त्यातील बदल त्यांना रुचत नाही. त्याविरोधात बंड करण्याची शक्यता अधिक असते. आपल्याकडील काही उदाहरणे घ्यायची झाली तर 'रस्त्यावर गणेशोत्सव नको' म्हटले तर किंवा 'वारी नको' म्हटले तर लोक चवताळून धावून येतात. पण विठोबाचा, विष्णूचा अवतार अथवा पांडुरंग बिनबोभाट होतो. 'श्रावणी शुक्रवारी सवाष्ण जेवायला घालणे यामागचा विचार निदान नागर समाजात तरी आता कालबाह्य झाला आहे, ते कर्मकांड सोडा’ असे सांगितले तर, अगदी नोकरदार स्त्रियाही ’इतक्या पिढ्या काय मूर्ख होत्या का?’ किंवा आपल्या पुरुषांच्या पावलावर पाऊल टाकून ’आम्हालाच सांगता, हिंमत असेल तर त्यांना (म्हणजे मुस्लिमांना) सांगा की’ म्हणून गुरगुरतात. पण त्याचवेळी ’रोजगाराच्या दिवशी जमत नाही हो.’ म्हणून शुक्रवारऐवजी रविवार हा बदल स्वत:च करतात. मुळात एखाद्या गरजू स्त्रीला एकवेळचे पोटभर जेवण देणे हा मूळ हेतू बाजूला ठेवून आपल्याच आर्थिक स्तरातील एखाद्या सुखवस्तू स्त्रीला होटेलमध्ये भरपेट जेवण देतात. (पु.ग. सहस्रबुद्धे यांनी पन्नाहून अधिक वर्षांपूर्वी यावर ’नरोटीची उपासना’ नावाचा लेख लिहिला होता. आज त्यातील उदाहरणे बदलतील फारतर, पण विचार कालातीतच म्हणायला हवा.) आणि म्हणूनच ख्रिसमस हे नाव जरी धर्माचा वारसा म्हणून आले, तरी तो साजरा करण्यातील कर्मकांड मात्र बव्हंशी स्थानिकच राहिलेले दिसते.

ख्रिश्चन जगात जे स्थान शिशिर-संपात उत्सवाला आहे, तेच स्थान भारतात मेष-संक्रांतीला आहे. भारतातील अनेक प्रांतात सौर कालगणना स्वीकारलेली आहे. सूर्य मेष राशीत प्रवेश करतो त्या मेष-संक्रांतीला हे नवे वर्ष सुरू होते. त्यामुळे बहुसंख्य हिंदूंचा हा नववर्षदिन आहे. (गुढी पाडवा नव्हे!) या दिवशी तमिळनाडूमध्ये विविध भागात नि समाजात चितिराई विशु, वर्ष-पिराप्पू, पुतंडु हे सण साजरे होतात. केरळमध्ये ’विशु’चा सण साजरा होतो. कर्नाटकातील तुळुभाषिक भागातही विशु याच नावाने हा सण साजरा करतात. बंगालमध्ये पोहेला बोईसाख (पहिला वैशाख), उडिशामध्ये 'महाविशुभ संक्रांती' अथवा 'पना संक्रांती', तर आसाममध्ये 'बिहू'चा सण साजरा होतो. पंजाबमधील प्रसिद्ध बैसाखीचा सणदेखील याच दिवशी साजरा होतो.

भारतात सौर आणि चांद्र अशी दोन्ही प्रकारच्या दिनदर्शिका वापरात आहेत. (किंबहुना या दोन्हींचा एकत्रित वापर करुन भारतीय पंचांग सिद्ध होते) यांची विभागणी जशी प्रांतवार आहे तशीच जमाती, भाषिक गटांनुसारही आहे. आंध्र, तेलंगाणा आणि कर्नाटकाच्या काही भागात उगादि अथवा युगादि नावाने चांद्र-वर्षाची सुरुवात साजरी केली जाते. (म्हणून मग मेष-संक्रांतीला सौरमान-उगादि म्हटले जाते.) महाराष्ट्रात या दिवशी गुढी पाडवा साजरा केला जातो. उत्तर प्रदेशच्या अवध प्रांतासह काही भाग, मध्यप्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड ही मध्यभारतातील राज्येही याच दिवशी नववर्ष साजरे करतात. या काळात इथे ’चैत्र नवरात्र’ उत्सव साजरा केला जातो. सिंधी लोकांचा चेटीचंड (चेटी = चैत्र) उत्सव याच दिवशी साजरा केला जातो. गुजरात नि राजस्थानमध्ये मात्र नवे वर्ष दिवाळीमध्ये बलिप्रतिपदेला सुरु होते. तर सिक्कीम आणि लडाखमध्ये डिसेंबरमध्ये. असे थोडे अपवाद वगळता बहुतेक सौर नि चांद्र कालगणना स्वीकारणार्‍यांचे नववर्ष हे १५ मार्च ते १५ एप्रिल या एका महिन्यामध्ये साजरे होते. डिसेंबर हा ख्रिस्तीबहुल जगातील उत्सव-काळ असेल, तर मार्च-एप्रिल हा भारताचा उत्सव-काळ आहे. डिसेंबरचा उत्सवी काळ जसा पावसाळी(खरीप) पिकांच्या काढणीनंतर साजरा होतो, तसाच हा रबी हंगामाच्या अखेरीस साजरा होतो.

धर्म, देश, संस्कार, वंश कुठलाही असला तरी सर्वांना प्रकाश देणारा सूर्य एकच आहे. पृथ्वीगोलावर तुमचा देश वा गाव जिथे वसले असेल त्यानुसार दिवस वा तारीख वेगळी असेल, पण शिशिर-संपात म्हणजे सूर्याचे राज्य सुरु होण्याचा दिवस साजरा करण्याची पद्धत सर्वच देश, वंश, धर्माच्या अनुयायांमध्ये आहे. पृथ्वीच्या पाठीवरील जवळजवळ सर्वच देशांतील माणसांना वंदनीय असलेल्या सूर्याच्या - किंवा इतर सामायिक प्राकृतिक देवतांच्या - अशा उत्सवांच्या आधारे विश्वबंधुत्वाची कोणतीही भावना कधी निर्माण झाली होती असे दिसत नाही. क्षुद्र गोष्टींवर संघर्ष करण्याऐवजी, इतर माणसांच्या रक्तावर साम्राज्ये आणि मोठमोठी स्मारके उभारण्याऐवजी, हा धागा जोडून घेत 'मानव्याचे अंति एकच गोत्र’ आचरणात आणावेसे माणसाला वाटले नाही. माणसाच्या संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळात सर्वांनीच प्राकृतिक घटकांना देवत्व दिले होते, त्यांची पूजा केली होती, त्यांना साकडे घातले होते. माणूस नागर झाला आणि या देवतांना माघारी ढकलून सुखवस्तू नागर लोकांनी मनुष्यरूपातील देवांना ते स्थान बहाल केले. सूर्यपूजक आणि वायुपूजक यांनी आमचाच देव श्रेष्ठ म्हणत एकमेकांचे खून पाडल्याची नोंद नाही. पण माणसाप्रमाणेच देवांनाही हातापायांच्या जोड्यांसोबत एक मस्तक मिळाल्यापासून, त्यांचे अनुयायी मात्र एकमेकांच्या रक्ताच्या नद्या वाहवून आपल्या देवाचे श्रेष्ठत्व वा आपलाच शांततेचा धर्म अधिक प्रामाणिक असल्याचे सिद्ध करण्याचा आटापिटा करत असतात.

जे शहाणपण हाडामांसाच्या माणसांमध्ये नाही ते चलच्चित्रांच्या आभासी दुनियेत निर्माण करता/पाहता येते. सॅटरर्नेलियापासून ख्रिसमसपर्यंत, होनेका पासून डाँगजीपर्यंत, यूलपासून टोजीपर्यंत सर्वच सणांचा म.सा.वि. आहे बांधिलकी नि आपुलकी ! हे सारे सर्वांनी मिळून साजरे करण्याचे उत्सव आहेत. आणि म्हणून ’दॅट टाईम ऑफ इयर म्हणजे कुठला काळ हो?’ असे विचारणार्‍याला ओलाफ, एल्सा आणि आना यांनी त्या लघुपटाच्या अखेरीस उत्तर देऊनच ठेवले आहे.

...
When we are together
that's my favorite place to be

'cause when we're together
It's a holiday every night

And when we're together
then the season's bright

I don't need the bells to ring
I know when it's here

'cause when we're together
I could stay forever

And when we're together
It's my favorite time of year.

एका गाण्यापासून सुरू झालेली विचाराची साखळी जिज्ञासेचे बोट धरुन कुठून कुठे पोहोचली...

एखाद्या गाण्यातील शब्दाने किंवा एखाद्या पुस्तकातील, चित्रपटातील एखाद्या उल्लेखाने अस्मितेची टेंगळे टरारून वर येत होणारा धुमाकूळ आपण वारंवार अनुभवतो. इतिहासामधून आपल्या सोयीचे प्रसंग, घटना उकरुन काढणे; तशा मिळाल्या नाहीत तर त्या सांगणारा खोटा इतिहास(?) लिहून बहुसंख्येच्या, झुंडीच्या, माध्यमबळाच्या आधारे तो ’खरा इतिहास’ म्हणून रुजवण्याचा प्रयत्न करणे, हा आपला 'चिरंतन वर्तमान’ आहे. मुख्य म्हणजे या तथाकथित इतिहासाला बहुसंख्येचे बळ देता यावे यासाठी, त्याच इतिहासातून वीरांबरोबरच सैतानांचा शोध लावून, लोकांना अधिक चटकन समजणारी शत्रूलक्ष्यी मांडणी केली जाते. गल्लोगल्ली, तसंच व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटरसारख्या समाज(?)-माध्यमांतून ढेकणांसारख्या बुजबुजाट झालेल्या स्वयंघोषित इतिहास-अभ्यासकांचे हे हुकमी हत्यार बनले आहे.

या सोयीच्या राजकीय, सामाजिक इतिहासाच्या मार्‍यापुढे सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाला जागाच उरत नाही. त्या सार्‍या उन्मादाच्या तुलनेत एका गाण्याने अशी अनेक संस्कृतींची सफर करुन आणल्याचा अनुभव अधिक सकारात्मक आहे. कुंपणे ओलांडून केलेली अशी जिज्ञासापूर्ती हा अस्मितेच्या आम्लपित्तावरचा अक्सीर इलाज आहे.

- oOo -

६. या लेखाच्या सुरुवातीला आलेले ’दॅट टाईम ऑफ इयर’ आणि हे शेवटचे ’व्हेन वी आर टुगेदर’ ही दोन गाणी ज्या Olaf's Frozen Adventure लघुपटामध्ये अंतर्भूत आहेत, त्या लघुपटाची त्याची क्रम न बिघडवता निम्म्या लांबीची बनवलेली आवृत्ती इथे पाहता येईल. पूर्ण लघुपट ’डिस्ने-हॉटस्टार’ अ‍ॅपच्या माध्यमातून पाहता येईल.

---


हे वाचले का?

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)

(हा दीर्घ लेख दोन भागांत प्रसिद्ध करतो आहे. याचा हा पूर्वार्ध आज २५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होतो आहे, तर उत्तरार्ध ३१ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल'. या दोन दिवसांचे औचित्य लेखांमध्येच स्पष्ट होईल. )

बॉलिवूड चित्रपटांच्या बहुसंख्य चित्रपटाच्या प्रेमींना चित्रपट म्हटले की ’कुणाचा चित्रपट?’ असा प्रश्न विचारण्याची सवय आहे. कारण चित्रपट हे हीरो अथवा हीरोईन म्हणून निवडलेल्या नट अथवा नटीच्या चाहत्यांच्या अंधप्रेमावरच अधिक चालतात. चित्रपटाचा हीरो शाहरुख खान आहे, संजय दत्त आहे किंवा कतरिना कैफ हीरोईन आहे म्हणून अधिक काही न विचार करता डोळे मिटून तिकिट काढणारे चाहते या चित्रपटसृष्टीचे आधार आहेत. टॉलिवूड म्हणून ओळखल्या जाणार्‍या तमिळ चित्रपटसृष्टीत तर या अभिनेत्यांची देवळे, फॅन-क्लब वगैरेपर्यंत प्रगती(?) झालेली आहे. हॉलिवूडची स्थितीही फार वेगळी आहे असे म्हणता येणार नाही.

त्यामुळे चित्रपटाबद्दल बोलताना तो अभिनेता वा अभिनेत्री आणि त्याची/तिची भूमिका/पात्र हेच केंद्रस्थानी राहते. पण अनेकदा असे होते, की चित्रपटाच्या पटकथेमध्ये दुय्यम असलेले पात्र साकारणारा एखादा तारकांकित नसलेला अभिनेता वा अभिनेत्री त्यात असा रंग भरते, की मुख्य पात्र नि ते साकारणार्‍या तारकांपेक्षा प्रेक्षकांच्या मनात तेच अधिक रुजते. मग यातून कुणी नवाजुद्दिन सिद्दिकी, कुणी संजय मिश्रा उदयाला येतो. त्याची स्वत:ची अशी ओळख निर्माण करतो.

या ’हॉली-बॉली’ परंपरेमध्ये गाजलेल्या चित्रपटांचे पुढचे भाग (Sequel) म्हणून नवा चित्रपट निर्माण करण्याला मोठी परंपरा आहे. त्याचप्रमाणे जुन्या गाजलेल्या चित्रपटांचा नवा अवतार(Redux) समोर आणण्यालाही. पण एखाद्या गाजलेल्या दुय्यम पात्राची कथा वेगळी काढून नवा चित्रपट - ज्याला spin-off म्हटले जाते - निर्माण करण्याची परंपरा नाही. परंतु चलच्चित्रांच्या(Animation) क्षेत्रात हे अनेकदा घडलेले आहे. इथे अभिनेते नसल्याने प्रभावशाली दुय्यम पात्रालाच स्वतंत्र ओळख देऊन नवा चित्रपट, नवी मालिका निर्माण केली जाताना दिसते.

वॉर्नर ब्रदर्सनी ससा-कासवाच्या पारंपरिक गोष्टींच्या आधारे दोन-तीन चलच्चित्र लघुपट सादर केले. त्यात सीसल नावाचे एक कासव बग्स नावाच्या सशाला कशा प्रकारे मात देते याच्या कथा रंगवल्या होत्या. पण प्रेक्षकांना सीसलपेक्षा बग्स नावाचा तो ससाच अधिक पसंत पडला. मग वॉर्नर ब्रदर्सनी सीसलसाठी योजलेला सारा धूर्तपणा नि चलाखपणा बग्सलाच देऊन सीसलला बाद करुन टाकले. १९३८ मध्ये जन्मलेला हा ससा आज ऐंशी वर्षांहून अधिक काळ चलच्चित्रप्रेमींचे मनोरंजन करतो आहे. पुढे बग्सच्या मालिकेत छाप पाडून गेलेल्या डॅफी या चिडक्या बदकालाही स्वतंत्र लघुपट आणि चित्रपट देण्यात आले.

प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गने स्थापन केलेल्या ’ड्रीमवर्क्स अ‍ॅनिमेशन’च्या ’मादागास्कर’(२००५) या चित्रपटाची कथा अलेक्स हा प्राणिसंग्रहालयातील सिंह आणि त्याचे मित्र असलेले प्राणी यांच्याभोवती फिरते. पण गंमत अशी झाली की यातील किंग ज्युलियन हा लेमर(Lemur) आणि चार पेंग्विन ही कथेमधील दुय्यम पात्रेच प्रेक्षकांना अधिक भावली. यांना केंद्रस्थानी ठेवून पुढे ’पेंग्विन्स ऑफ मादागास्कर’ (The Penguins of Madagascar) आणि ’ऑल हेल किंग ज्युलियन’ (All Hail King Julien) अशा चलच्चित्रमालिका तयार झाल्या नि लोकप्रिय झाल्या. 

किंग ज्युलियनबाबत तर असे सांगितले जाते की चित्रपटात जेमतेम दोन वाक्ये असलेले हे अति-दुय्यम पात्र होते. परंतु त्याला आवाज देण्यासाठी बोलावलेल्या साचा बॅरन कोह्‌न याने मुलाखतीदरम्यान त्या आपल्या मनाने काही भर घातली. निर्मात्यांना हा बदल आवडला आणि त्यांनी पटकथेमध्ये बदल करुन ज्युलियनला अधिक वाव दिला. पुढे ज्युलियनने आणखी धुमाकूळ घातला नि पाच-सहा सीझन्सची एक सीरीजच पदरी पाडून घेतली. मूळ चित्रपटात अधिक वाव असलेल्या अलेक्स सिंह, मार्टी झेब्रा, मेलमन जिराफ यांना हे भाग्य लाभले नाही.

२०१३ मध्ये आलेल्या डिस्ने स्टुडिओज्‌च्या ’फ्रोझन’(Frozen) या चित्रपटामधील 'ओलाफ' हा हिमबुटकादेखील त्यातील एल्सा आणि अ‍ॅना या दोघी बहिणींपेक्षा जास्त भाव खाऊन गेला. त्याला केंद्रस्थानी ठेवून 'वन्स अपॉन अ स्नो-मॅन' (Once Upon a Snowman) आणि ’अ‍ॅट होम विद ओलाफ’ (Olaf's Frozen Adventure) हे लघुपटही करण्यात आले आहेत. मागील वर्षी ’ओलाफ फ्रॉम होम’(At Home with Olaf) नावाची अतिलघुपटांची मालिका यू-ट्यूबवर सादर करण्यात आली. कोरोना निर्बंधांमुळे घरीच राहावे लागलेले तंत्रज्ञ आपापल्या वाट्याचे काम घरुनच पुरे करुन ते संकलित करुन हे अतिलघुपट सादर करत.

’ओलाफ्स फ्रोझन अड्वेंचर’ या लघुपटातील हे एक गाणे. त्याचे शीर्षक आहे ’दॅट टाइम ऑफ इयर’.

Happy, merry, holly, jolly season's greetings here
I'm wondering what your family does at that time of year
Love and joy and peace on Earth and tidings of good cheer
Do you have tradition things
For that time of year

Well, we hang up boughs of evergreen on every single doorway
Bake a giant cookie in the wavy shape of Norway
Go from door to door to door while singing with our choir

Hang up all your giant socks above an open fire
(That sounds safe)

So happy, merry yuletide carols, faithful friends are dear
Thanks for sharing what you do
At that time of year

(We'd better get a move on if we're gonna hit every house in the kingdom)

Jolly, merry, happy holly, on a midnight clear
I'm here to ask you what you do
At that time of year

Hi, shalom, happy solstice, fancy chandelier
I'm looking for tradition stuff
For that time of year

Well, we make our decorations out of flotsam and jetsam
Bake a yummy fruitcake, and you can't leave till you get some
(That one went right through me.)
Buy each other presents and then hide them very nimbly

Wait up for a chubby man to shimmy down your chimney

(Breaking and entering, ok on Christmas.)

Oh, happy, merry, mule-tide barrels, faithful glass of cheer
Thanks for sharing what you do
At that time of year

([gasps] Thank you.)

We knit scarves and sweaters and we wear our matching mittens
Don't forget the jammies that I knitted for my kittens
Eight nights in a row we light menorahs on our mantels
(You cut down a tree and then you dress its corpse with candles...? I love it.)

Anna and Elsa will have all that they need
I'll fill my sleigh here with the help of my steed
It'll be the best time of year
It's up to you
Up to me
Up to (mew)

Happy, merry, Mele Kaliki, holly, jolly, happy, tappy
A chubby man will soon appear and faithful friends, a tiny deer
And festive tidings, midnight clearing
( Did I leave this fruitcake here?)
At that time of year (mew)
---

१. उत्तर युरपमधील जर्मॅनिक(Germanic) जमाती साजरा करीत असलेला शिशिर-संपातोत्सव. युरपमधील बर्‍याच ख्रिसमस परंपरा या सणाकडून वारशाने आल्या आहेत असे मानले जाते.

२. ग्रीक, रोमन अधिपत्याखालील प्रदेशातील बहुदेवतापूजक (पेगन) धर्मियांचा संपातोत्सव. मूळ दिनदर्शिकेनुसार हा २५ डिसेंबरला साजरा होत असे. (काही अभ्यासकांच्या मते ख्रिस्तजन्माचा सण या उत्सवाशी जोडून घेता यावा म्हणून बदलण्यात आला.) नव्या ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार शिशिर-संपात २१ डिसेंबरला येत असला तरी उत्सवाचा दिवस २५ डिसेंबर हाच राखला आहे. थोडक्यात आता हा उत्सव संपात-दिनानंतर चार दिवस उशीराने साजरा होतो.

३. म्यूल-टाईड या शब्दाचे एकाहुन अधिक अर्थ दिसतात. यात बॅरल्सचा उल्लेख येत असल्याने याचा संबंध मद्याशी, निदान पेयसाठवणुकीच्या पिंपांशी येतो. काही ठिकाणी म्यूल-टाईड नावाच्या कॉकटेल’ म्हणजे मिश्र-पेयाचा उल्लेख दिसतो. परंतु असे पेय प्रत्यक्ष सेवनाच्या वेळीच तयार केले जाते, साठवून ठेवले जात नाही. कदाचित त्यासाठी आवश्यक असणारे द्रव्य असा या म्यूल-टाईडचा अर्थ असावा. या कॉकटेलची कृती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असली त्यात लाईम म्हणजे लिंबू आणि जिंजर म्हणजे आले यांचे रस हा सामायिक भाग दिसतो.

सुरुवातीला हे एक ख्रिसमसचे गाणे (carol) आहे असे वाटले होते. पण दुसर्‍यांदा पाहिले/ऐकले तेव्हा हे प्रकरण फारच वेगळं आहे असं लक्षात आलं. 'अ‍ॅलिस इन वंडरलॅंड’मधील अ‍ॅलिस जशी सशाच्या बिळात डोकावण्याच्या प्रयत्नात खोल खोल भिरभिरत जाते तसे झाले. एका सशाचा पाठलाग करता-करता एक सर्वस्वी नवे जगच तिच्यासमोर येते. परंपरांच्या शोधात ओलाफच्या मागे-मागे हिंडताना अगदी त्याच प्रकारचा एक अनुभव माझ्याही पदरी जमा झाला.

या गाण्यातल्या ओलाफला आरंडेल राज्यातील दोन राजकन्यांसाठी नवी परंपरा हवी आहे. ती शोधण्यासाठी- खरंतर जुन्यांतून वेचण्यासाठी, तो घरोघरी जातो आहे. प्रत्येकाला त्यांच्या परंपरेबाबत विचारतो आहे. तो स्वत: ’अजन्मा’ असल्याने कुठल्याही परंपरेचा वारसा त्याला मिळालेला नाही. त्याला स्वत:ला अशी एखादी वारस-परंपरा मिळाली असती, तर तीच कशी श्रेष्ठ आहे हे त्याने त्या दोघींना लगेचच पटवून दिले असते अशी शक्यता बरीच आहे. पण असे म्हणताना माणसाच्या वृत्तीचा आरोप मी एका सरळमार्गी हिमबुटक्यावर करतो आहे. हा कदाचित त्याच्यावर अन्यायही असेल. पण ते असो, मुद्दा आहे तो परंपरांचा.

आता हिवाळा म्हणजे ख्रिसमस आणि ख्रिसमस म्हणजे हिवाळा हे समीकरण इतके सार्वत्रिक आहे, की 'चार घरी जाऊन तुमची परंपरा कोणती याची विचारपूस करत बसण्याची गरज काय?' असा प्रश्न पडेल. ख्रिसमस म्हणजे चर्चमधील प्रार्थना, दारावरचे हिरवे चक्र, ख्रिस्तजन्माची गाणी आणि नाटुकली, सांता-क्लॉजने(?) आणलेल्या भेटवस्तू आणि कुटुंबासोबत चविष्ट जेवण... झाले की. पण खरंच असे असते का, सगळीकडे ख्रिसमसही नेमका असाच साजरा करतात का, करु शकतात का? सण एकच असला तरी तो साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये भौगोलिक, सामाजिक, कौटुंबिक पातळीवर फरक पडू शकतो का? 

उदाहरणच द्यायचे झाले तर बव्हंशी हिम आणि हिवाळ्याशी निगडित असलेला ख्रिसमस, ज्या भूभागावर डिसेंबरमध्ये चक्क उन्हाळा असतो, निदान हिमवर्षाव होतच नसतो ,अशा ठिकाणी कसा साजरा करतात? ज्या देशांत ख्रिसमस ट्री रुजवताच येत नाही, अशा देशांतील ख्रिश्चन त्याऐवजी काय करतात? आणि त्यांनी निवडलेला पर्याय हीच त्यांची परंपरा होऊन जाते का? आणि या पर्यायांची निवड नक्की कशी होते?...असे प्रश्न चौकस मनाला पडायला हवेत, मलाही पडले होते. ओलाफच्या पाठोपाठ फिरताना या प्रश्नांची उत्तरे सापडत गेली...

मुळात हिवाळा म्हणजे २५ डिसेंबर किंवा डिसेंबरचा (वर्षाचा शेवटचा) महिना म्हणजे ख्रिसमस हे अनन्य समीकरण चुकीचे आहे. ख्रिश्चनधर्मीय आणि त्यातही अमेरिकन मंडळींच्या प्रभावाखाली असलेल्या माध्यमांनी तसा आभास निर्माण केला आहे इतकेच. ख्रिसमस हा २५ डिसेंबरचा एकमेव सण तर नाहीच, पण तो पहिलाही नाही.

सेंट ल्युसीच्या स्मरणार्थ स्कॅंडिनेविअन म्हणजे उत्तर गोलार्धातील अत्युत्तरी भागातील देशांत साजरा केला जाणारा सेंट ल्युसिआ डे, रोमन परंपरांमधील सॅटर्नेलिआ, बहुदेवतापूजक (Pagan) धर्मांतील यूल, ज्यू धर्मियांचा होनेका, या पाश्चात्य जगातील सणांसोबतच चीन आणि जपानमधील डाँग-झी, इराणमधील शब-ए-याल्दा, जपानमधील टोजी, द.कोरियामध्ये बावीस-तेवीस डिसेंबरला साजरा होणारा 'धाकटा नव-वर्षदिन' म्हणजे डोंगजी (ही चिनी ’डाँग-झी’चीच आवृत्ती) हे आशियाई, बिगर-ख्रिस्ती अथवा बिगर-बिब्लिकल सण याच सुमारास साजरे केले जातात. त्याचबरोबर चित्रपटांतून वा अमेरिकाधार्जिण्या माध्यमांतून दिसणार्‍या ख्रिसमसहून वेगळ्या अशा काही परंपराही विविध ठिकाणी दिसतात. विशिष्ट ऐतिहासिक स्थानांशी निगडित असलेले इंग्लंडमधील स्टोनहेन्ज गॅदरिंग, आयर्लंडमधील न्यूग्रन्ज गॅदरिंग, इंग्लंडमधील ब्रायटन शहरातील ’बर्न द क्लॉक फेस्टिवल’, कॅनडामधील व्हॅंकुव्हर इथे भरणारा ’लॅंटर्न फेस्टिवल’, ग्वाटेमालामधील कॅथलिक सेंट थॉमसच्या स्मरणार्थ भरणारा ’सांतो तोमास फेस्टिवल’ ही अशी काही उदाहरणे.

थोडक्यात डिसेंबरचा उत्तरार्ध हा केवळ ख्रिस्ती मंडळींचा वा युरपिय मंडळींचा नव्हे, तर जगभरात अनेक देश, धर्म नि वंशांच्या सणाचा काळ आहे. कदाचित म्हणूनच ओलाफने गाण्याची सुरुवात मेरी ख्रिसमस म्हणून न करता हॅपी हॉलि(डेज) आणि सीझन्स ग्रीटिंग्सने केली आहे.

एकाच महिन्यात- खरेतर पंधरवड्यात जगभरात सगळीकडेच हे महत्वाचे उत्सव साजरे होण्यामागचे कारण काय असावे? अतिप्राचीन काळात माणसाने सुरु केलेल्या उत्सवांच्या, चालीरीतींच्या वाटा पुढे वेगळ्या झाल्या असाव्यात का? बिब्लिकल म्हटल्या जाणार्‍या धर्मांच्या काही चालीरीतींमध्ये साम्य असते हे समजण्याजोगे आहे. त्यांच्या समान वारशामधून आलेले सण वा उत्सव हे थोड्याफार फरकाने सारखेच असणार. पण जगाच्या कानाकोपर्‍यात, विविध भौगोलिक परिस्थितीमध्ये, विविध सांस्कृतिक पार्श्वभूमीवर, साधारण एकाच काळात इतके उत्सव साजरे होणे हा योगायोग नसावा.

थोडा मागोवा घेताच असे लक्षात आले, की मूळ शिशिर-संपात (winter solstice) भोवती हे सारे उत्सव बांधले गेले आहेत. कर्कवृत्ताच्या उत्तरेस जसेजसे वर जावे तसातसा हिवाळा अधिक तीव्र होत जातो. त्यामुळे त्या भागातील देशांमध्ये सर्वात मोठी रात्र संपून नव्या दिवसाची सुरुवात ही सूर्याच्या आगमनाची सुरुवात (advent) म्हणून साजरी केली जाते. इथून दिवस मोठा होत जातो नि रात्र लहान. आणि म्हणून या भूभागातील लोकांच्या दृष्टीने पुढील सहा महिने मागील सहामाहीपेक्षा अधिक सुखकारक असतात.

परंतु जगभरात ग्रेगोरियन दिनदर्शिका (Calendar) आधारभूत म्हणून स्वीकारण्यापूर्वी विविध दिनदर्शिका प्रचलित होत्या. त्या अर्थातच त्या-त्या देशाच्या भूगोलावरुन दिसणार्‍या तारामंडळ स्थितीच्या आधारे आखलेल्या होत्या. आणि म्हणून शिशिर-संपाताचा दिवस प्रत्येक दिनदर्शिकेनुसार वेगळा होता. 

उदाहरणार्थ १३ डिसेंबरला अतिउत्तरेकडील स्कॅंडिनेविअन देश नॉर्वे, स्वीडन आणि फिनलंड या देशातील स्वीडिश लोक साजरा करत असलेला साजरा करत असलेला 'सेंट ल्युसिआ डे' हा पूर्वीच्या दिनदर्शिकेनुसार येणारा शिशिर-संपाताचा दिवस आहे. ख्रिसमस-उत्सव पूर्वी पहिला रोमन सम्राट जुलिअस सीझरने प्रसारित केलेल्या जुलिअन दिनदर्शिकेनुसार साजरा होत असे, नि त्यानुसार शिशिर-संपात २५ डिसेंबरला येत असे.

आज जगभरात ग्रेगोरियन दिनदर्शिका आधारभूत म्हणून स्वीकारल्यावर हा दिवस २१ डिसेंबरला येतो. परंतु ख्रिसमस नि २५ डिसेंबर हे नाते न तोडता नव्या दिनदर्शिकेनुसारही तो २५ तारखेलाच साजरा केला जातो. ग्रेगोरियन कॅलेंडरच्या स्वीकारानंतर आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रसारानंतर बहुतेक ठिकाणी शिशिर-संपाताशी निगडित उत्सव ख्रिस्तजन्माच्या म्हणजे ख्रिसमसच्या सोबत साजरा जाऊ लागला आणि ख्रिसमस-उत्सवाचे शिशिर-संपाताशी नाते तुटले.

काही ठिकाणी हा नवा उत्सव जुन्या उत्सवदिनांपासून सुरु होऊन २५ डिसेंबरपर्यंत चालतो, तर काही ठिकाणी २५ डिसेंबरला सुरु होऊन जुन्या उत्सवदिनांपर्यंत चालतो. इंग्लंडमधील कॉर्नवॉल येथे २००७ पासून साजरा होणारा माँटोल फेस्टिवल ही शिशिर-संपात उत्सवांच्या यादीतील सर्वात अर्वाचीन भर आहे. स्थानिक कॉर्निश भाषेत माँटोल याचा अर्थच शिशिर-संपात असा आहे.

स्वीडन, नॉर्वे आणि फिनलंडच्या स्विसभाषिक भागात १३ डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा सेंट ल्यूसिआ डे हा सेंट ल्युसी/ल्युसिआ हिच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. ख्रिस्ती धर्म त्यागून रोमन श्रद्धामूल्यांचा स्वीकार करण्यास नकार दिल्याबद्दल रोमन शासकांनी तिला जिवंत जाळले होते. असं म्हटलं जातं की प्रथम तिला वेश्यालयात विकण्याची शिक्षा फर्मावली होती. पण अनेक माणसे नि गाड्या तिला तसूभरही सरकवू शकल्या नाहीत. मग तिथेच तिच्याभोवती लाकडे पेटवून तिला जाळण्यात आले. आणि त्या घटनेच्या स्मरणार्थ १३ डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी मोठी शेकोटी पेटवून तिला मानवंदना दिली जाते.

पण सेंट ल्युसी ही स्कॅंडिनेवियन नव्हे. ती सिसिली, म्हणजे इटलीमधील होती. ही तिथून स्कॅंडिनेवियामध्ये कशी पोहोचली असावी असा प्रश्न पडेल. तिच्या नावाचा, म्हणजे ल्युसिआ (Lux, Lucis) याचा अर्थ नॉर्स भाषेतील अर्थ आहे ’प्रकाश’. मूळ नॉर्स अथवा नॉर्डिक वंशीयांमध्ये शिशिर-संपाताचा (winter solstice) सण साजरा केला जात असे. त्या दरम्यान दुष्ट आत्म्यांना पळवून लावण्यासाठी आणि सूर्याला आपली दिशा बदलण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी मोठ्या शेकोट्या (bonfire) पेटवण्याची परंपरा होती. 

हा तपशील लक्षात घेतला मूळ नॉर्डिक सणालाच ख्रिस्ती कपडे चढवले आहेत हे लक्षात येते. मूळ बॉनफायरचा संदर्भ जोडण्यासाठी ही प्रकाशकन्या थेट इटलीतून आयात केली असावी. मूळ दिवसाचे महत्त्व कमी होऊ नये म्हणून १३ डिसेंबर ते २५ डिसेंबर असा तेरा दिवस ख्रिसमस-उत्सव (Christmastide) साजरा करत दोन्हींची सांगड घातली आहे. आणि या दरम्यान मूळ उत्सवातील अनेक परंपराही कायम राखल्या आहेत.

या उत्सवादरम्यान प्रत्येक गावात एक मुलगी सेंट ल्युसी म्हणून निवडली जाते. सेंट ल्युसिआला मानवंदना देण्यासाठी तिच्या नेतृत्वाखाली पांढर्‍या पायघोळ वस्त्रातील मुलींची मिरवणूक काढली केली आहे. या मिरवणुकीत या मुली पानाफुलांचे हिरवे चक्र शिरोभूषण म्हणून धारण करतात नि त्यात मेणबत्त्या खोवून सर्वत्र प्रकाशाची रुजवणूक करत जातात. (काही ठिकाणी व्हर्जिन मेरी अथवा मारियाच्या सन्मानार्थ काढल्या जाणार्‍या मिरवणुकीसाठी अशाच तर्‍हेने तरुण मुलीची निवड केली जाते.) प्रत्येक घरातीलही (शक्यतो) मोठ्या मुलीला ल्युसिआच्या रूपात सजवले जाते. या उत्सवा-दरम्यान कॉफी, जिंजर-बिस्किट्स आणि Lussekatter नावाचा बन अथवा पाव देऊन पाहुण्यांची, मित्रमंडळींची, आप्तांची सरबराई केली जाते. या सार्‍याच परंपरा मूळ नॉर्डिक उत्सवातील आहेत.

कॅलिफोर्नियातील स्पॅनिश मिशनर्‍यांनी बांधलेली चर्चेस भौमितिक कौशल्याचा वापर करुन अशा तर्‍हेने बांधली आहेत की शिशिर-संपाताच्या- म्हणजे २१ डिसेंबरच्या दिवशी सूर्यकिरणे नेमकी चर्चमधील अल्टारवर पडून त्याला आणि त्यावरील पवित्र वस्तू उजळून टाकतील. यातून ख्रिस्त हा सूर्यपुत्र असल्याचे स्थानिक सूर्यपूजक इंडियन जमातींच्या मनावर ठसवून त्यांना ख्रिस्ती धर्माकडे वळवणे सोपे झाले. स्थानिक इंडियन आणि ख्रिस्ती अशा दोनही परंपरांचा वारसा सांगणारा हा प्रकाशोत्सव (Illuminations) अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून साजरा होतो आहे. 

ग्वाटेमालामधील 'चिची’ या शहरात २१ डिसेंबरलाच साजरा होणारा सांतो तोमास फेस्टिवलही असाच ख्रिस्ती आणि स्थानिक मायन संस्कृतींचा मिलाफ घडवणारा असतो. एरवी कॅथलिक चर्चेस सेंट थॉमस डे ३ जुलै रोजी साजरा करतात. परंतु इथे मात्र तो शिशिर-संपाताच्या दिवशी साजरा होतो. याचे कारण स्थानिक मायन संस्कृतीमध्ये त्या दिवसाचे महत्व अनन्यसाधारण आहे. दक्षिण गोलार्धातील पेरू देशामध्ये जूनमध्ये शिशिर-संपाताच्या दिवशी इन्ती उत्सव (Inti Raymi) साजरा केला जातो. 

इन्का लोकांच्या प्राचीन केचवा (Quechua) भाषेत इन्ती म्हणजे सूर्य. यूल अथवा यूलटाईड हा प्राचीन उत्तर-युरोपियन जर्मॅनिक(Germanic) जमाती शिशिर-संपाताच्या वेळी त्यांच्या ओडिन (Odin) या देवाच्या सन्मानार्थ साजरा करत असत. ओंडक्याची शेकोटी (स्कॅंडिनेविअन bonfireचा अवतार), रानडुकराची शिकार (Asterix या प्रसिद्ध फ्रेंच चित्रकथामालिकेतील एक प्रमुख पात्र असलेला दांडगोबा Obelix हा रानडुकराची शिकार करण्यात निष्णात असतो. त्याचा संदर्भ हा असावा.), बोकडाच्या मांसाचे सेवन, नाच-गाणे असा हा कार्यक्रम बारा दिवस चाले. स्कॅंडिनेविअन देशातील 'सेंट ल्युसिआ डे’पूर्व पेगन उत्सव हाच असावा, वा यापासून प्रेरणा घेतलेला असावा.

इराणी उत्सव शब-ए-याल्दा याचे मूळ नाव शब-ए-चेल्ले. चेल्ले याचा अर्थ चाळीस. ज्याप्रमाणे बहुतेक ठिकाणी तीस दिवसांना महिना मोजला जातो, त्याप्रमाणे पर्शियामध्ये हिवाळा हा तीन चालीसांचा काळ मानला जातो. पहिला चालीसा चाळीस दिवसांचा, म्हणून मोठा चेल्ले आणि दुसरा ’छोटा चेल्ले’ हा वीस दिवसांचा (त्याचे वीस दिवस नि वीस रात्री मिळून चाळीस!) तिसरा उन्हाळ्याला जोडलेला असतो. यातील मोठ्या चेल्लेचा पहिला दिवस, खरेतर रात्र (शब) म्हणजे शब-ए-चेल्ले. डिसेंबरचा २०-२१ तारखेला हा उत्सव साजरा होतो. 

पुढे सीरियन ख्रिश्चन निर्वासितांना पर्शियाने आश्रय दिल्यानंतर त्यांनी आपला ख्रिसमस तिथे साजरा करायला सुरुवात केली. सीरियन भाषेत याल्दा म्हणजे जन्म. अगदी सुरुवातीच्या काळात ख्रिसमसदेखील ’Birth of the Invincible Sun’ किंवा अजेय सूर्याचा जन्मदिन म्हणून साजरा होत असे. ख्रिस्ती मंडळींनी दिलेला हा शब्द स्थानिक बिगर-ख्रिस्ती उत्सवात स्वीकारला गेला आणि शब-ए-चेल्ले हा शब-ए-याल्दा म्हणूनही ओळखला जाऊ लागला.

रोमन भाषेत Dies Natalis Solis Invicti (’Birth of the Invincible Sun’) किंवा Sol Invictus हा रोमन साम्राज्याच्या उत्तरकाळात साजरा होणारा महोत्सव. सॉल (Sol) म्हणजे सूर्याचा हा उत्सव नंतर ख्रिस्ती परंपरेमध्येही स्वीकारला गेला. काही अभ्यासकांच्या मते हाच पुढे ख्रिसमसमध्ये रुपांतरित झाला. हा रोमन उत्सव तेथील मित्राईझम(Mithraism) या पंथाच्या मित्र या देवाच्या उत्सवाचा अवतार आहे असाही एक दावा केला जातो. 

मित्राईझममध्ये मित्र म्हणजे सूर्य नव्हे, तर सूर्याचा एक साहाय्यक, असा उल्लेख आहे. आता मित्र म्हणजे सूर्य हा पारसिकांचाही देव. त्यामुळे त्याचा संबंध कदाचित पुन्हा शब-ए-चेल्लेशी असू शकतो. पारसिकांकडून बरेच शब्द संस्कृतमध्ये आले त्यात मित्र म्हणजे सूर्य हा ही एक. (अलीकडे सगळे इकडूनच तिकडे गेले असे समजण्याचा प्रघात आहे. ही सांस्कृतिक एक्स्प्रेस ’अप’ आहे की ’डाऊन’ हा मूल्यमापनाचा भाग सोडून देऊन आपण फक्त साम्य नोंदवून थांबू.) तेव्हा आता याचा संबंध भारतापर्यंतही येऊन पोहोचतो.

वर म्हटल्याप्रमाणे जुलिअस सीझरने प्रचलित केलेल्या जुलिअन कॅलेंडरनुसार हा शिशिर-संपाताचा दिवस २५ डिसेंबरला येत असे. त्यामुळे सॉल इन्व्हिक्टस त्या दिवशी साजरा केला जात असे. रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर आणि ख्रिस्ती धर्माच्या उदयानंतर याच उत्सवाला ख्रिसमसचे रूप दिले गेले. त्याचा संबंध ख्रिस्तजन्माशी नंतर जोडला गेला. 

सुरुवातीच्या काळात जन्मदिवस साजरा करणे ही पेगन(Pagan) म्हणजे जुन्या बहुदेवतापूजक धर्मीयांची परंपरा ख्रिश्चन धर्मीय पाळत नसत. त्यामुळे ख्रिस्तजन्माचा दिवस ही संकल्पना बरीच नंतर, म्हणजे पोप जुलियसच्या काळात समाविष्ट झाली.

वर उल्लेख केलेले बहुतेक सारे उत्सव- विशेषत: ख्रिसमसपूर्व उत्सव, सूर्यभ्रमणाखेरीज कृषी हंगामाशीही जोडलेले आहेत. हंगामाच्या अखेरीस धनधान्याची रेलचेल असणार्‍या काळात हे साजरे केले जातात. आपल्याकडे दीपावलीचा उत्सव हा ही खरीपाच्या कापणीनंतर साजरा केला जातो. विशेष म्हणजे तो ही पुन्हा प्रकाशाचाच उत्सव आहे. 

वर उल्लेखलेल्या इतर उत्सवांमध्ये आणि दिवाळीचा काळ यांच्यात साधारण सहा ते आठ आठवड्यांचा फरक पडतो. इतर सर्व देशांच्या तुलनेत भारत बराच दक्षिणेकडे आहे, हे लक्षात घेता भारतामध्ये हा उत्सवही अलिकडे येत असावा. पूर्वी कदाचित या उत्सवालाही सूर्यभ्रमणाचा संदर्भ असेलही. कालांतराने ख्रिश्चन राष्ट्रात ज्याप्रमाणे त्याला धार्मिक संदर्भ चिकटवले गेले, तसेच भारतात त्याला पौराणिक, धार्मिक संदर्भ दिले गेले असावेत.

प्राचीन काळी रोमन दिनदर्शिकेनुसार १७ डिसेंबरला सॅटर्नेलिआ (Saturnalia) हा सण साजरा केला जात असे. निर्मितीचा, संपत्तीचा, शेतीचा, पुनरुत्थानाचा आणि स्वातंत्र्याचा रोमन देव सॅटर्न याच्या सन्मानार्थ त्या दिवशी उत्सव साजरा होई. याचा संबंधही शिशिर-संपाताशी जोडलेला आहे. हा साधारण आपल्या दिवाळीसारखा शेती हंगामाच्या शेवटी साजरा केला जात असे. या दिवशी नाच, गाणे, खाणे-पिणे यांची रेलचेल असे. आप्तांना भेटवस्तू (presents) दिल्या जात. या काळात सर्व कामांना संपूर्ण सुटी दिलेली असे. 

याचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी गुलाम हे 'तात्पुरते स्वतंत्र’ होऊन या उत्सवात मालकांच्या बरोबरीने सहभागी होऊ शकत असत. हा सण निर्मितीशी संबंधित असल्याने लोक मेणापासून मेणबत्त्या, अनेक- विशेषत: फळांच्या, प्रतिकृतीही तयार करत आणि एकमेकांना भेट देत. पुढे ख्रिश्चन धर्माच्या आणि ख्रिसमसच्या आगमनानंतर हा उत्सव प्रथम तीन दिवस आणि नंतर सात दिवसांपर्यंत वाढवून ख्रिसमसला जोडून देण्यात आला.

Saturn या ग्रहाचा आपल्याकडे उल्लेख शनि म्हणून केला जात असला, तरी हा रोमन देव सॅटर्न हा आपल्याकडील शनिप्रमाणे उपद्रवी नाही. उलट तो अनेकगुणी देव मानला जातो. (ज्युपिटर, नेपच्यून, प्लुटो ही त्याची मुले. यांनाही सूर्याच्या ग्रहमंडळात स्थान मिळाले आहे.) हा निर्मितीचा, संपत्तीचा, शेतीचा, पुनरुत्थानाचा आणि स्वातंत्र्याचा देव मानला जातो. इ.स. पूर्व तिसर्‍या शतकात कार्थेज (सध्या ट्युनिशियामधील एक शहर) राज्यातील ग्रीक शासकांकडून रोमन लोकांना मोठा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर सॅटर्नेलिआमध्ये ग्रीक पद्धतीची काही कर्मकांडे समाविष्ट केली गेली. देवतांना बळी देणे, सामूहिक भोजनादी गोष्टी तेव्हा सुरू झाल्या. याशिवाय परस्परांना भेटल्यावर Io Saturnalia (आयो सॅटर्नेलिया) म्हणून अभिष्टचिंतन करणे हा नवा प्रघात सुरू झाला. Merry Christmas म्हणत ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्याची कल्पना इथूनच आलेली आहे.

सॅटर्नेलिया हा अर्वाचीन ख्रिसमसवर सर्वाधिक प्रभाव असलेला हा प्राचीन सण मानला जातो. Saturn हा रोमन देव हा पुन्हा मूळचा ग्रीक देव क्रोनस याची आवृत्ती आहे. क्रोनसचे स्थानिक पौराणिक व्यवस्थेतले स्थान आणि बरीचशी वैशिष्ट्ये सॅटर्नलाही देण्यात आली आहेत. जुलैमध्ये साधारणपणे वसंत-संपाताच्या सुमारास साजरा केला जाणार्‍या क्रोनिया या उत्सवाचेच सॅटर्नेलिया हे प्रतिरूप आहे. म्हणजे क्रोनियाचा प्रभाव सॅटर्नेलिआवर आणि त्याचा पुन्हा ख्रिसमसवर अशी ही साखळी आहे.

( क्रमश: )

- oOo -

४. बिब्लिकल धर्म = बायबलचा जुना करार श्रद्धेय मानणारे धर्म: ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्युडाइझम.

५. केलन्ड(kalend) म्हणजे प्रत्येक रोमन महिन्याचा पहिला दिवस. त्यावरुन वार्षिक दिनदर्शिकेला कॅलेन्डर म्हटले जाऊ लागले.

---

पुढील भाग: वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)


हे वाचले का?