शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)

(हा दीर्घ लेख दोन भागांत प्रसिद्ध होतो आहे. याचा पूर्वार्ध २५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाला आहे. तर हा उत्तरार्ध आज वर्षअखेरीस प्रसिद्ध होतो आहे.

मागील लेखार्धाच्या सुरुवातीलाच आलेल्या ओलाफच्या गाण्यात ’मेले कलिकी’ असा एक उल्लेख आला आहे, त्यामागचा इतिहासही मजेशीर आहे. प्रशांत महासागरातील हवाई बेटे ही अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या अधिपत्याखाली आहेत. तेथील बहुसंख्या ख्रिश्चन आहे. त्यामुळे ख्रिसमससह बहुतेक ख्रिस्ती परंपरेतील सण तिथेही साजरे केले जातात. पण फरक असा आहे, की ही बेटे अमेरिकेच्या मूळ भूमीपासून बरीच दक्षिणेला म्हणजे उष्ण कटिबंधात येतात. त्यामुळे अमेरिकेत डिसेंबरमध्ये सुरू होणारा हिवाळा तिथे आणखी काही आठवड्यांनी सुरु होतो. त्यामुळे ख्रिसमस काळात तिथे चक्क उष्ण हवामान असते. त्याचे प्रतिबिंब रॉबर्ट अलेक्स अ‍ॅंडरसन या गीतकाराच्या ’मेले कलिकीमाका’ या गाण्यात उमटलेले आहे.

हे मेले कलिकी अथवा कलिकीमाका काय भानगड आहे असा प्रश्न चटकन डोक्यात आला असेल. त्यामागे भाषिक कारण आहे! हवाई बेटांवरील लोकांची उच्चाराची पद्धत - मूळ स्थानिक भाषेच्या प्रभावामुळे - बरीच वेगळी आहे. त्यांना R आणि S या इंग्रजी अक्षरांचा उच्चार ठाऊक नाही. या दोन व्यंजनांचा उच्चार ते लोक साधारणपणे L आणि K सारखा करतात. यामुळे ’मेरी ख्रिसमस’चा उच्चार हा ’मेले कलिकीमाका’ असा होतो. थोडक्यात सांस्कृतिक प्रवाहाला इथे एक भाषिक वळणही मिळून गेले आहे.

अ‍ॅंडरसनचे गाणे सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आणि गायक बिंग क्रॉस्बीने बिंग क्रॉस्बीने (व्हाईट ख्रिसमस, विंटर वन्डरलॅंड या लोकप्रिय गाण्यांचा गायक) प्रथम गायले आहे. ते पुढे ख्रिसमसचे गाणे (Carol) म्हणून गणले जाऊ लागले.


Mele Kalikimaka
Songwriter: Robert Alexander Anderson
Singer: Bing Crosby
1950.

"Mele Kalikimaka” is the thing to say
On a bright Hawaiian Christmas day
That’s the island greeting that we send to you
From the land where palm trees sway

Here we know that Christmas will be green and bright
The sun will shine by day and all the stars at night
“Mele Kalikimaka” is Hawaii’s way
To say Merry Christmas to you

ख्रिसमस गीतांमध्ये काही गीते ही ’लेट इट स्नो’ म्हणणारी, हिमवर्षावाची अपेक्षा करणारी असतात. १९४५ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेच्या काळात हॉलिवूडमधील सॅमी कान आणि ज्यूल स्टाइन या गीतकार-संगीतकार जोडगोळीने ’लेट इट स्नो’ हे गाणे लिहिले होते. (ओलाफ ज्या चित्रपटात अवतरला त्या फ्रोझनमध्ये ’लेट इट गो’ या ध्रुवपदाचे एक गाणे आहे हा एक आणखी योगायोग.) फ्रॅंक सिनात्राने याचीच एक विस्तारित आवृत्ती गायलेली आहे. हे ’मेले कलिकीमाका’ त्या ’लेट इट स्नो’ला प्रत्युत्तर आहे असे काही लोक मानतात.

अमेरिकेच्या या सीमेवरुन आणखी पुढे जाऊन आफ्रिकेकडे वळलो तर तिथेही शिशिरान्त-उत्सवांचे धागे सापडतात. १९६६ मध्ये मौलाना कारेंगा याने आफ्रिकन-अमेरिकन जनतेसाठी ’क्वान्झा’ (Kwanzaa) या सणाची सुरुवात केली. या उत्सवामागे 'उमखोसी वोग्जेमा' या झुलूंच्या शिशिर-संपातोत्सवाची प्रेरणा आहे. युरपिय वंशीयांकडून सांस्कृतिक वारसा उधार घेण्याऐवजी आपल्या आफ्रिकन वारशाला, परंपरांना यातून उजाळा मिळावा असा यामागचा हेतू आहे. २६ डिसेंबर ते १ जानेवारी असा सात दिवस हा उत्सव साजरा होतो. अन्य शिशिर-संपाती उत्सवांप्रमाणेच याची अखेर ६ जानेवारीला करामु नावाच्या सहभोजनाने होते. क्वान्झा या स्वाहिली शब्दाचा अर्थ आहे ’पहिले फळ’. द. आफ्रिकेमध्ये हा पहिल्या फळांचा उत्सव शिशिर-संपातासोबत साजरा होतो. क्वान्झाच्या स्पेलिंगमध्ये शेवटी आणखी एक अक्षर जोडून आफ्रिकन परंपरेत महत्व असलेला सात अक्षरांचा मेळ साधला आहे. या उत्सवादरम्यान सात मेणबत्त्यांचा मनोरा प्रज्वलित केला जातो. यात सात मेणबत्त्या उत्सवाशी निगडित एकता, स्वावलंबन, सहकार्य, सहकार, निश्चय, सर्जन आणि श्रद्धा या सात तत्त्वांचे प्रतीक आहेत.

मेणबत्यांचा हा मनोरा ज्यू परंपरेतही आहे. तिथेही यात सात मेणबत्त्या असतात. त्यातील मधली मेणबत्ती हे ज्ञानवृक्षाचे तर इतर सहा फांद्या तर्कशास्त्र, गणित, विज्ञान, इतिहास व मानव्यशास्त्र, तत्त्वज्ञान आणि ज्ञानसंरक्षण या सहा ज्ञानशाखांचे प्रतीक आहेत. सात मेणबत्यांच्या मेनोराला सात दिवसांच्या आठवड्याचे प्रतीकही मानले जाते. सात आकडा हा नॉवेमधील ख्रिसमस महोत्सवातही डोकावून जातो. तिथे या उत्सवादरम्यान Bordstabelbekkels नावाने ओळखल्या जाणार्‍या सात प्रकारच्या कुकीज (आपल्या ब्रिटिश इंग्रजीमध्ये 'बिस्किटे') तयार केल्या जातात. ज्यूंच्या होनेका या सणाला सात नव्हे तर नऊ मेणबत्त्यांचा मेनोरा असतो. आठ दिवसांच्या या सणादरम्यान दररोज एक मेणबत्ती अधिक प्रज्वलित केली जाते. पहिली मेणबत्ती ही इतर आठ पेटवण्यासाठी वापरली जाणारी ’प्रेरक’ मेणबत्ती असते, ती पहिल्या दिवशी प्रज्वलित होते. ओलाफच्या गाण्यामध्ये आठ दिवस रोज एक मेणबत्ती लावण्याचा उल्लेख आहे तो या होनेकाचा आहे.

मध्ययुगीन काळात या उत्सवांमध्ये मनोरंजनासाठी एक तात्पुरता नेता निवडला जाई. तो त्या उत्सवाचा शासक, प्रशासक, संचालक किंवा राजा असे. सॅटर्नेलियामध्ये जनतेमधून एक 'सॅटर्नेलियाचा शासक अथवा राजा' (Saturnalicius princeps) निवडला जाई. त्या उत्सवापुरत्या सर्वांनी त्याच्या आज्ञा पाळणे, तो म्हणेल त्यानुसार सर्वांनी वागणे बंधनकारक असे. साधारणपणे ’Simon Says’ किंवा आपल्याकडची आवृत्ती म्हणजे ’शिवाजी म्हणतो...’ हा खेळ खेळतात तसा हा खेळ असे. युरपमध्ये ख्रिसमस-उत्सवामध्ये (Chrismastide) एक दिवस 'मूर्खांचा खाना' (Feat of Fools) साजरा केला जात असे. या उत्सवाचा म्होरक्या म्हणून इंग्लंडमध्ये 'अव्यवस्थेचा सरदार' (Lord of Misrule) जनतेमधून निवडला जात असे. स्कॉटलंडमध्ये यालाच अतार्किक अधिकारी (Abbot of Unreason) असे म्हटले जाई, फ़्रान्समध्ये याला ’मूर्खांचा राजपुत्र’(Prince des Sots) असे नाव होते. कॅथलिक ख्रिस्ती मंडळी साजरा करत असलेल्या कार्निव्हल या उत्सवातही एक ’किंग मोमो’ निवडला जातो, जो ’खा, प्या, मजा करा’ असे सांगणारा आनंदी राजा असतो. अशाच स्वरूपाच्या उत्सवासाठी चर्च ऑफ इंग्लंड 'बॉय बिशप' हा एक दिवसाचा बिशप निवडत असे. ’सेंट ल्युसिआ डे’ला निवडला जाणार्‍या तरूणीची निवड मात्र अशा तर्‍हेने राणी वा एक दिवसाची शासक म्हणून नव्हे, तर मूळ ल्यूसीचे प्रतिरूप म्हणून, श्रद्धाविषय म्हणून केली जाते.

ख्रिसमसच्या दिवसाच्या अलीकडील चार रविवार जमेस धरुन होणारा सुमारे महिनाभराचा काळ ख्रिस्ताच्या 'आगमनाचा काळ’(Advent) म्हणून साजरा केला जातो. या काळात दारावर सदाहरित वृक्षांच्या पानांचे नि फुलांचे एक चक्र (wreath) टांगलेले असते. याचा संबंधही ग्रीक तसंच रोमन खेळांमध्ये विजेत्याच्या शिरी चढवल्या जाणार्‍या पानांच्या मुकुटाशी जोडला जातो. पेगन म्हणजे बहुदेवतापूजक धर्मांमधून वर्तुळ हे चिरंतनाचे, काळाच्या पुनरावृत्तीचे प्रतीक मानले जात असे. त्यामुळे असे चक्र धारण करणे हा खेळाडूचा बहुमान मानला जाई. दुसरीकडे ख्रिस्ताच्या डोक्यावरील काटेरी मुकुटाचे प्रतीक म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते.

ख्रिसमस ट्री ही ख्रिसमस-उत्सवातील सर्वात अर्वाचीन परंपरा आहे हे सांगितले तर बहुतेकांना आश्चर्य वाटेल. ही परंपरा एकोणीसाव्या शतकात ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाने तिचा जर्मन पती प्रिन्स अल्बर्ट याच्या प्रेरणेने सुरु केली. सदाहरित वृक्षांच्या पानाचे चक्र (wreath) अथवा फांदी हे युरपियन शिशिर-संपात उत्सवातून आधीच प्रचलित होते. Mistletoe या सदाहरित, परजीवी वेलीचा समावेशही अनेक उत्सवांतून होता. आरोग्याच्या विविध समस्यांवरील उपचारांमध्ये या बहुगुणी वेलीचा वापर केला जात असे. कडक हिवाळ्यातही फळे देणारी ही वेल सर्जनशक्तीचे प्रतीक मानली जाई. म्हणून ग्रीक आणि रोमन उत्सवांमधून तिच्या छत्राखाली उभे राहून चुंबन घेण्याची प्रथा पडली. सदाहरित वृक्षाचे महत्व अति-उत्तरेकडील स्कॅंडिनेविअन देशांत अधिक असणे ओघाने आले. चिरंतनाचे प्रतीक असलेल्या अशा वृक्षाखाली परस्परांचे चुंबन घेणार्‍यांचे प्रेमही चिरंतन राहील ही कल्पना तिथे प्रथम उगवली. तिचा नॉर्डिक वंशीयांच्या फ्रिग्गा या देवतेशी संबंध जोडलेला आहे. तीच प्रथा ग्रीक व रोमन मंडळींनी आपल्या जीवनदायी वेलीसंदर्भात उचलली. ही प्रथा अठराव्या शतकाच्या आसपास ख्रिसमस-उत्सवात सामील झाली. ख्रिसमस ट्री आणि मिसलटो यांच्या सदाहरित असण्याचा संबंध पुढे देवाच्या नि देवपुत्राच्या चिरंतर प्रभावाशी जोडला गेला.

भिन्न भौगोलिक परिस्थितीमध्ये एकाच धर्मियांच्या चालीरीतींमध्ये फरक पडतो, त्यात जशा प्रादेशिक परंपरा मिसळून जातात, तशाच स्थानिक भौगोलिक, सामाजिक चालीरीतींना अनुसरून नव्या परंपराही निर्माणही होतात. काही परंपरा मात्र चक्क व्यावहारिक समस्यांना अनुसरूनही निर्माण झालेल्या आढळतात. ओलाफला सुरुवातीलाच भेट म्हणून मिळालेली साखरकाठी(candy cane) ही जर्मन परंपरा आहे. तिची गोष्ट मोठी गंमतीशीर आहे. ख्रिस्तजन्माशी निगडित गोष्टींवर आधारित नाट्यप्रवेश साजरे करणे हा अनेक देशांतील ख्रिसमस परंपरेचा भाग आहे. त्याला प्रदेशांनुसार, भाषांनुसार नावे वेगवेगळी आहेत, पण ख्रिस्तजन्माच्या गोष्टीला उजाळा देणे हा त्यांचा सामायिक उद्देश आहे.

पण कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात विक्षेप येतो तो लहान मुलांचा. आधीच चैतन्याचा अधिक आविष्कार असलेली मुले, सणाच्या वातावरणात अधिकच चळवळी होतात. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीतील कलोन शहरातील एका वृंदसंयोजकाने(choirmaster) या मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. त्याने एका स्थानिक मिठाईवाल्याला या मुलांना वाटण्यासाठी साखरकाठ्या बनवण्यास सांगितले. येशूच्या जन्मानंतर त्याला भेटायला आलेल्या मेंढपाळांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्याने त्या काठीला एका बाजूने बाक देण्यास सुचवले. या मखलाशीमुळे चर्चमध्ये त्या वाटण्यास चर्च प्रशासनाकडूनही त्याला सहज अनुमती मिळाली. चळवळ्या पोरांना अशा तर्‍हेने शांत बसवल्यानंतर त्याचा वाद्यवृंद आणि नाट्यप्रवेश सादर करणारे आपली कला शांतपणे सादर करु शकले. (अर्थात साखरेची जास्तीची मात्रा घेऊन घरी गेलेल्या मुलांनी त्यांच्या घरच्यांना दुप्पट वैताग दिला असणार. पण तो त्यांचा प्रश्न झाला. आपली समस्या दुसर्‍या कुणाच्या गळ्यात मारणे, आपला केर शेजार्‍याच्या दारी सरकवणे याला जगभर मोठी परंपरा आहे.) यशावकाश ही साखरकाठी ख्रिसमस परंपरेचा भाग बनली. हा प्रसंग, ही दंतकथा(?) १६७० मधील आहे, जेमतेम साडेतीनशे वर्षांपूर्वीची!

चित्रपटांनी आणि मुख्य म्हणजे भांडवलशाही उत्पादकांनी लोकप्रिय केलेला सांताक्लॉज हा ही ख्रिसमसचा जणू अविभाज्य भाग मानला जातो. ख्रिसमसच्या आदल्या रात्री मुलांनी सांतासाठी मोजे टांगून ठेवायचे. रात्री कधीतरी येऊन सांता त्यांना हव्या त्या भेटवस्तू त्यात ठेवून जातो, अशी आख्यायिका लहान मुलांना सांगितली जाते. मग आई-वडिलांनीच त्या भेटी त्यांच्यासाठी आणून ठेवायच्या हे ओघाने आलेच. या सांता-क्लॉजचा ख्रिस्ताच्या आयुष्याशी संबंध कुठेच दिसत नाही. मग हा आला कुठून असा प्रश्न पडतो. याचा उगम ग्रीसमध्ये आहे असे मानले जाते. तिथे सेंट निकोलस नावाचा एक सहृदयी गृहस्थ खरोखरच लहान मुलांना भेटी देऊन त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवित असे. बायझंटाईन साम्राज्यात (आजचे तुर्कस्थान) असा समज होता, की हा सेंट निकोलस गरीबांच्या घरावरच्या धुराच्या चिमणीतून पैसे आत टाकत असे. हे पैसे शेकोटीजवळ वाळत घातलेल्या मोज्यांमध्ये जमा होत असत. मग ६ डिसेंबरला या निकोलसच्या नावे सार्वजनिक भोजनाचा प्रघात पडला.

तिथून हा थेट नेदरलॅंड्समध्ये पोचला तो सिंटरक्लास या स्थानिक नावाने. आता त्याचा हिरवा पेहराव लाल झाला. आपल्या बोटीत भेटवस्तू भरुन प्रथम तो गावात पोहोचत असे नि आपल्या ’अमेरिगो’ नावाच्या घोड्यावरुन गावभर फिरुन त्या भेटी तो वाटत असे. अति-उत्तरेला स्कॅंडिनेवियामध्ये पोहोचल्यावर यथावकाश घोड्याचे रेनडिअरमध्ये आणि बोटीचे स्लेजमध्ये रुपांतर झाले. स्वीडनमध्ये या सांताचे रूप आणखी थोडे बदलले आहे. स्थानिक शेतकर्‍यांना साहाय्यक असणार्‍या तॉम्प्ते नावाच्या आत्म्याची नि बाहेरुन आलेल्या सांताची सरमिसळ होऊन यूलतॉम्तन नावाचा नवा अवतार प्रसिद्ध झाला आहे. मूळ तॉम्प्तेला मिळणारा तांदळाच्या खिरीचा प्रसाद आता या नव्या तीन फुटी सांताला देण्याची प्रथा रूढ झाली आहे.

हा सिंटरक्लास पुढे अमेरिकेला पोहोचला. वॉशिंग्टन आयर्विंग या तेथील लेखकाने या सिंटरक्लासचे शब्द-चित्र रेखाटले. त्यात त्याला हिरवा पायघोळ कोट वापरणार्‍या, पाईप ओढणार्‍या खलाश्याच्या रूपात रंगवले होते. सांता-क्लॉज हे नावही आयर्विंगनेच दिले. क्लेमंट क्लार्क मूर या कवीने ’The Night Before Christmas’ नावाची एक कविता लिहिली आहे, ज्यात आज दिसणार्‍या सांताचे रूप प्रथम रेखाटण्यात आले आहे. (’The Night Before Christmas’ ही कविता पुढे इतकी लोकप्रिय झाली की त्यावर आधारित असलेला एक भाग बर्‍याच चलच्चित्र(Animation) मालिकांमधून सापडतो.)

याला दृश्य रूपात आणण्याचे काम थॉमस नॅस्ट या अमेरिकन व्यंगचित्रकाराने केले आहे. कोका-कोला या प्रसिद्ध शीतपेयांच्या कंपनीने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून फरची कडा असलेला लाल पायघोळ कोट घातलेला, रेनडिअरच्या स्लेजवरुज प्रवास करणार्‍या सांताला घेऊन आपल्या पेयाची जाहिरात करायला सुरुवात केली. यातून त्यांचे पेय आणि सांता दोघेही लोकप्रिय होत गेले. हा सारा प्रवास अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातला आहे. म्हणजे प्राचीन समजल्या जाणार्‍या या प्रेमळ आजोबाचे वय जेमतेम दोनशे-अडीचशे वर्षे इतकेच आहे. आणि त्याला लोकप्रिय करण्यात भांडवलशाही जगाने निर्माण केलेल्या जाहिरात-तंत्राचा खूप मोठा वाटा आहे. किंबहुना ख्रिसमस हा धार्मिक असण्यापेक्षा राजकीय- आणि आता भांडवलशाहीच्या कृपेने - बहुतेक सर्वधर्मीय उत्सवांप्रमाणे, आर्थिक-उत्सव अधिक आहे. त्या निमित्ताने होणारी प्रचंड आर्थिक उलाढाल हीच आता त्यामागची प्रेरणा उरली आहे.

प्रत्येक परंपरा ही अशीच कुठेतरी, कुणीतरी जन्माला घालत असतो. आणि बरेचदा तिचा श्रद्धेशी वा देवाशी फारसा संबंधही नसतो. त्यामुळे त्यात बदल झाला, ती खंडित झाली तरी कोणतीही बाभळ बुडत नसते. किंबहुना कालप्रवाहात ते ओघाने, विविध कारणाने घडतच असते. पण हे विसरुन अस्मितेचे टेंगूळ उगवलेली खुजी माणसे, जरा एक सूतभर बदल झाला तरी भावना दुखावून घेतात, कांगावा करतात. परंपरेला अवास्तव महत्व देत तिच्यापुढे सार्वजनिक हिताचा बळी देतात. मूळ संदर्भाशी निगडित जिवंतपणाला ठार मारून त्याभोवती अलौकिकाचे, पावित्र्याचे प्रेतवस्त्र गुंडाळून त्याचे उत्सव साजरे करु लागतात. याशिवाय अनेकदा श्रद्धा-श्रेष्ठत्वाच्या चढाओढीत आपल्या श्रद्धेची उंची वाढवण्यासाठी माणसानेच तिच्या पायी चढवलेल्या उंच टाचेच्या वहाणा किंवा तिच्या शिरी चढवलेला शिरपेच वा मुकुट असेच या परंपरांचे स्वरूप असते.

तरीही काळाच्या ओघात कधी इकडून तिकडे, कधी तिकडून इकडे असा त्यांचा प्रवास चालूच असतो. परंपरांची अशी देवाणघेवाण सतत चालू असते. त्यामुळे विविध भूभागांवरील परंपरांमध्ये काही सामायिक आढळत जाते. यापैकी नक्की कुठली परंपरा आधी सुरू झाली हे सांगणे फार अवघड असते. एखादी परंपरा धार्मिक, आर्थिक अथवा राजकीय बळाच्या आधारे अधिकाधिक भूमी व्यापत जाते, तसतसे नव्या भूमीवरील अनेक स्थानिक परंपरांचे तिच्याशी संमीलन होत जाते. क्वचित केवळ आवड म्हणून, चूष म्हणून, कधी सामाजिक स्थान बळकट करण्यासाठी दुय्यम गटाच्या परंपराही स्वीकारल्या जातात, आत्मसात केल्या जातात. त्यांचा रंग बदलून सामावून घेतल्या जातात. तरीही त्यांचा मूळ रंग पुरा लपवता येत नाही. आर्थिक, राजकीय सत्तेच्या जोरावर अनेकदा शासकवर्ग आपल्या परंपरा जनतेवर लादत जातो. सांस्कृतिक अभिसरण असे अनेक अंगानी, अनेक वाटांनी होत असते.

'जगातले सारे काही श्रेष्ठ ते आमच्याकडेच निर्माण झाले नि तिथूनच इतरत्र पोचले' असा दावा केवळ अज्ञानमूलक आणि अहंकारीच असू शकतो. अशा एकांगीपणापासून दूर राहून तिच्याकडे बारकाईने पाहता आले, तर सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासातून उलट दिशेने राजकीय-धार्मिक आणि आर्थिक इतिहासाचे धागेदोरे शोधता येतात. इतिहासाच्या अभ्यासाला आणखी एक सशक्त प्रवाह येऊन मिळतो, माहितीचा नवा स्रोत खुला करतो. अशी सांस्कृतिक देवाणघेवाण माणसाच्या इतिहासातील राजकीय यशापयशांच्या, रणमैदानातील जय-पराजयांच्या अभ्यासापेक्षा अधिक महत्वाची मानली पाहिजे. प्राणिजगतामध्ये माणूस अधिक सामाजिक प्राणी मानला जात असेल तर त्याच्या जमातीमधील द्वेष आणि हिंसेपेक्षा बांधिलकीचा, स्नेहाचा, सहकार्याचा इतिहास अधिक अभ्यासनीय असायला हवा. पण सांस्कृतिक इतिहासातील अशा बांधिलकीच्या, परस्पर सहकार्याच्या, देवाणघेवाणीच्या गोष्टी पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचतच नाहीत, ही आपल्या इतिहास-अभ्यासाची शोकांतिका आहे. करुणेचे तत्वज्ञान सांगणार्‍या येशूच्या स्मरणार्थ साजरा होणारा ख्रिसमसही अशा हेकेखोर, द्वेषप्रेमी माणसांच्या कचाट्यातून सुटू शकलेला नाही.

इतक्या सार्‍या सणांना सोबत घेऊन येणारा डिसेंबर हा अनेक देश, वंश, धर्म, जमाती यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. त्यामुळे अलिकडच्या काळात निदान सार्वजनिक ठिकाणी ’Merry Christmas’ ऐवजी ’Seasons Greetings’ अथवा ’Happy Holidays’ म्हणून अभिवादन करण्याची पद्धत रूढ होते आहे. ही काहीशी सर्वव्यापी म्हणजे सेक्युलर पद्धत आहे. समोरची व्यक्ती कोणत्या परंपरेचे पालन करते, तिची पार्श्वभूमी काय याची माहिती नसताना, ख्रिसमसचे अभिवादन एकांगी ठरते अशी यामागची भूमिका आहे. परंतु ही पद्धत म्हणजे ख्रिश्चन परंपरा उखडून टाकण्याचा प्रयत्न आहे, असा कांगावा काही अतिरेकी मताच्या ख्रिस्ती व्यक्ती नि संघटना करत आहेत. पाच-सहा वर्षांपूर्वी स्टारबक्स या प्रसिद्ध कॅफेने डिसेंबरमध्ये ख्रिसमस-ट्रीचे चित्र असलेल्या कपांऐवजी साधे लाल कप देऊ केले, म्हणून या मंडळींनी बराच गदारोळ केला होता. उलट काही कट्टर ख्रिस्ती लोक ख्रिसमस-ट्री वगैरे सारख्या गैर-ख्रिस्तीच नव्हे तर पेगन परंपरांचा समावेश करण्यास विरोध करत आले आहेत. गॉस्पेल्समध्ये कुठेही ख्रिस्तजन्माचा उल्लेख नाही, त्यामुळे ख्रिस्तजन्माचा उत्सव साजरा करण्याचे काही औचित्य नाही, असा दावा करत हे कट्टरपंथी त्याचा विरोध करत होते. सतराव्या शतकात इंग्लंडमधील क्रांतीनंतर ख्रिसमस उत्सवावर बंदीही घालण्यात आली होती. पुढे यथावकाश ती उठवली गेली. ख्रिसमसचे इंग्लंडमध्ये पुनरुज्जीवन करण्यात चार्ल्स डिकन्स याच्या ’ए ख्रिसमस कॅरल’(१८४३) या प्रसिद्ध कादंबरीचा मोठा वाटा मानला जातो.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष थिओडर रुझेवेल्ट यांनीही व्हाईट हाऊसमध्ये ख्रिसमस ट्री सजवण्यास बंदी घातली होती. त्यांचा विरोध जसा धार्मिक होता तसाच पर्यावरणीय दृष्टीनेही होता. U.S. Forest Service ची स्थापना करुन लाखो एकर जमिनीवरील वृक्षसंपदा वाचवण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. (गाण्यामध्ये ओलाफ ’You cut down a tree and then you dress its corpse with candles’ असे उपहासाने म्हणतो आहे ते याच भूमिकेतून.)

डिसेंबरप्रमाणे ’मे सेलेब्रेशन्स’बाबतही सांगता येते. कॅथलिक ख्रिश्चन लोक संपूर्ण मे महिना येशूची माता व्हर्जिन मेरी हिचा उत्सव साजरा करतात. थोडे मागे जाऊन पाहिले, तर ग्रीक लोक असाच उत्सव 'अर्टेमिस' या त्यांच्या व्हर्जिन देवतेसाठी साजरा करत असतात. ही देवता आणि रोमन लोकांची 'डायाना' ही देवता एकच असे मानले जाते. (शिशिर-संपाताच्या बद्दल बोलत असताना मागील भागाच्या शेवटी रोमन देव सॅटर्न आणि ग्रीक देव क्रोनस यांचे एकरुपत्व तसंच सॅटर्नेलिया आणि क्रोनिआ यांच्यातील साम्याचा उल्लेख आलेला आहे.) रोमन देवता फ्लोरा हिच्या स्मरणार्थ इ.स.पूर्व तिसर्‍या शतकापासून 'फ्लोरालिआ' हा उत्सव साजरा केला जात असे. ज्यात तिच्या शिरी फुलांचा मुकुट असे. ही परंपराही इतर अनेक देवतांच्या उत्सवातही आहे. सेंट ल्युसिआच्या शिरी असलेला पानाफुलांचा मुकुट हे याचेच भावंड.

ख्रिस्ती धर्मीयांच्या राजकीय नि धार्मिक विजयानंतर त्यांची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी, विविध स्थानिक परंपरा नि उत्सवांना पर्याय देण्यासाठी ख्रिसमसची योजना झाली आहे. पण जुन्या परंपरा लोक सहजासहजी सोडत नाहीत, हे ध्यानात घेऊन नव्या धर्माने, शासनाने त्यांना हळूहळू सामावून घेत आपले असे रूप दिले. असे इतिहासात वारंवार घडले आहे. बहुतेक जेत्या जमाती, संस्कृती, धर्म याचप्रकारे नव्या भूमीत पाय रोवताना दिसतात. भारताच्या इतिहासातही अशी अनेक उदाहरणे सापडावीत. भारतातील वैष्णव परंपरा याच मार्गाने रुजली-वाढलेली आहे. त्यांचे इतरांना सामावून घेणे ख्रिसमसप्रमाणेच 'हपापाचा माल गपापा' प्रकारचे आहे. यशाच्या भाळी आपला टिळा लावण्यासारखे आहे. यात राम-कृष्णापासून अलिकडे पटेल-बोसांपर्यंतची उदाहरणे हेच सांगत आहेत.

त्यांची तथाकथित अवतार-कल्पना ही अशीच पूर्वीच्या नायकांना, देव-देवतांना पोटात घेण्यासाठी, त्यांच्यावर हक्क प्रस्थापित करण्यासाठी लढवलेली क्लृप्तीच आहे. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठोबाचे बहुजनांचा राजा, देव याकडून विष्णूचा अवतार याकडे होत गेलेले संक्रमण हे त्याचे सर्वात अर्वाचीन उदाहरण आहे. पदुबाई आणि तुळसा या विठ्ठलाच्या स्त्रियांच्या मृत्यूभोवती अनुल्लेखनीय अशा कथा रचून त्यांना विठोबाच्या भक्तांच्या बोलण्यातून चलाखीने हद्दपार केले गेले आणि त्याजागी रुक्मिणीची योजना करुन विठोबा-रखुमाईचा गजर प्रचलित केला. इतके पुरेसे नव्हते म्हणून सावळ्या विठ्ठलाला पांडुरंग (पांडु=पांढरा) असे विपरीत नाव दिले आहे. जगण्यासाठी एक वस्त्र नि एक वाडगा इतके पुरेसे समजणार्‍या साईबाबांचे ज्याप्रमाणे संगमरवरी पुतळे उभे राहतात, त्यांना सोन्याचे मुकुट नि सिंहासने असतात, तसेच काही दशकांत विठोबाच्या संगमरवरी मूर्ती उभ्या राहून त्याचे पांडुरंग हेच रूप पक्के होत जाईल. विठोबा लोकांच्या स्मृतीतून हळूहळू हद्दपार होत जाईल, जातिभेदविरहित समाजाचे स्वप्न घेऊन एकत्र आलेले विठोबाचे वारकरी हे केवळ वैष्णवांचा मेळा होऊन राहतील.

मुस्लिम, ख्रिस्ती यांचे बस्तान तलवारीच्या, राजकीय वर्चस्वाच्या आधारे बसवले असल्याने लादणे अधिक सोपे होते. वैष्णवविचार-विस्तार हा प्रामुख्याने माध्यमांच्या (पुराणे, ब्राह्मणे, परंपरा, सण इ.) आधारे झालेला आहे त्यात लादणे शक्य व्हावे इतकी भक्कम राजकीय ताकद क्वचितच एका राजाकडे होती. बौद्ध, वैष्णव, शैव (अगदी जैनही) वगैरेंचे सांस्कृतिक संघर्ष राज्यकर्त्यांनी क्वचितच दत्तक घेतले. त्या क्षेत्रातले नि या क्षेत्रातले संघर्ष कायम वेगळेच राहिले. इथे बौद्ध-सनातन धर्म, वैष्णव-शैव यांचे संघर्ष झाले नाहीत असे नाही. पण त्यांना क्रूसेड्स इतके व्यापक रूप आले नाही. ब्रह्मदेवाच्या पंथाचा निर्णायक पाडाव झाला पण तो शस्त्र-मार्गाने नाही. शैव-वैष्णव तुल्यबळ होते. त्यामुळे मागील परिच्छेदात उल्लेख केल्याप्रमाणे दशावतारासारख्या संकल्पनेच्या आधारे सारे श्रेष्ठ पुरुष आपल्या कळपात ओढून आपले सामाजिक बळ वाढवण्याचा प्रयत्न वैष्णवांनी केला नि तो बराचसा यशस्वीही झाला

शिकवणुकीचे, प्रबोधनाचे, नैतिक चौकटीचे एकाहुन अधिक स्रोत असले की त्यांच्या शिकवणुकीत विसंगती, परस्परविरोध निर्माण होऊ शकतो म्हणून अब्राहमिक धर्मांनी जुने विचार मोडीत काढण्यासाठी नि विसंगती टाळण्यासाठी परमेश्वर या संकल्पनेची निर्मिती केली. आता त्याने सांगितले तेच बरोबर, त्याच्या विरोधात जाईल ते सारे चूक अशी भूमिका घेणे सोपे झाले. यातून अनेक वाटांचा गोंधळ टाळून 'एक नि एकच देव नि त्याने सांगितलेली एक नि एकच वाट अंतिम' असे म्हणत स्थानिक पर्यायी विचार नष्ट करुन टाकण्याची सोय करुन ठेवली.

पण चालीरीती वा परंपरांचे तसे झाले नाही. कारण सामान्य माणसे विचारापेक्षा त्याच्या दृश्य रूपाला, कर्मकांडांना अधिक चिकटून असतात. त्यातील बदल त्यांना रुचत नाही. त्याविरोधात बंड करण्याची शक्यता अधिक असते. आपल्याकडील काही उदाहरणे घ्यायची झाली तर 'रस्त्यावर गणेशोत्सव नको' म्हटले तर किंवा 'वारी नको' म्हटले तर लोक चवताळून धावून येतात. पण विठोबाचा, विष्णूचा अवतार अथवा पांडुरंग बिनबोभाट होतो. 'श्रावणी शुक्रवारी सवाष्ण जेवायला घालणे यामागचा विचार निदान नागर समाजात तरी आता कालबाह्य झाला आहे, ते कर्मकांड सोडा’ असे सांगितले तर, अगदी नोकरदार स्त्रियाही ’इतक्या पिढ्या काय मूर्ख होत्या का?’ किंवा आपल्या पुरुषांच्या पावलावर पाऊल टाकून ’आम्हालाच सांगता, हिंमत असेल तर त्यांना (म्हणजे मुस्लिमांना) सांगा की’ म्हणून गुरगुरतात. पण त्याचवेळी ’रोजगाराच्या दिवशी जमत नाही हो.’ म्हणून शुक्रवारऐवजी रविवार हा बदल स्वत:च करतात. मुळात एखाद्या गरजू स्त्रीला एकवेळचे पोटभर जेवण देणे हा मूळ हेतू बाजूला ठेवून आपल्याच आर्थिक स्तरातील एखाद्या सुखवस्तू स्त्रीला होटेलमध्ये भरपेट जेवण देतात. (पु.ग. सहस्रबुद्धे यांनी पन्नाहून अधिक वर्षांपूर्वी यावर ’नरोटीची उपासना’ नावाचा लेख लिहिला होता. आज त्यातील उदाहरणे बदलतील फारतर, पण विचार कालातीतच म्हणायला हवा.) आणि म्हणूनच ख्रिसमस हे नाव जरी धर्माचा वारसा म्हणून आले, तरी तो साजरा करण्यातील कर्मकांड मात्र बव्हंशी स्थानिकच राहिलेले दिसते.

ख्रिश्चन जगात जे स्थान शिशिर-संपात उत्सवाला आहे, तेच स्थान भारतात मेष-संक्रांतीला आहे. भारतातील अनेक प्रांतात सौर कालगणना स्वीकारलेली आहे. सूर्य मेष राशीत प्रवेश करतो त्या मेष-संक्रांतीला हे नवे वर्ष सुरू होते. त्यामुळे बहुसंख्य हिंदूंचा हा नववर्षदिन आहे. (गुढी पाडवा नव्हे!) या दिवशी तमिळनाडूमध्ये विविध भागात नि समाजात चितिराई विशु, वर्ष-पिराप्पू, पुतंडु हे सण साजरे होतात. केरळमध्ये ’विशु’चा सण साजरा होतो. कर्नाटकातील तुळुभाषिक भागातही विशु याच नावाने हा सण साजरा करतात. बंगालमध्ये पोहेला बोईसाख (पहिला वैशाख), उडिशामध्ये 'महाविशुभ संक्रांती' अथवा 'पना संक्रांती', तर आसाममध्ये 'बिहू'चा सण साजरा होतो. पंजाबमधील प्रसिद्ध बैसाखीचा सणदेखील याच दिवशी साजरा होतो.

भारतात सौर आणि चांद्र अशी दोन्ही प्रकारच्या दिनदर्शिका वापरात आहेत. (किंबहुना या दोन्हींचा एकत्रित वापर करुन भारतीय पंचांग सिद्ध होते) यांची विभागणी जशी प्रांतवार आहे तशीच जमाती, भाषिक गटांनुसारही आहे. आंध्र, तेलंगाणा आणि कर्नाटकाच्या काही भागात उगादि अथवा युगादि नावाने चांद्र-वर्षाची सुरुवात साजरी केली जाते. (म्हणून मग मेष-संक्रांतीला सौरमान-उगादि म्हटले जाते.) महाराष्ट्रात या दिवशी गुढी पाडवा साजरा केला जातो. उत्तर प्रदेशच्या अवध प्रांतासह काही भाग, मध्यप्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड ही मध्यभारतातील राज्येही याच दिवशी नववर्ष साजरे करतात. या काळात इथे ’चैत्र नवरात्र’ उत्सव साजरा केला जातो. सिंधी लोकांचा चेटीचंड (चेटी = चैत्र) उत्सव याच दिवशी साजरा केला जातो. गुजरात नि राजस्थानमध्ये मात्र नवे वर्ष दिवाळीमध्ये बलिप्रतिपदेला सुरु होते. तर सिक्कीम आणि लडाखमध्ये डिसेंबरमध्ये. असे थोडे अपवाद वगळता बहुतेक सौर नि चांद्र कालगणना स्वीकारणार्‍यांचे नववर्ष हे १५ मार्च ते १५ एप्रिल या एका महिन्यामध्ये साजरे होते. डिसेंबर हा ख्रिस्तीबहुल जगातील उत्सव-काळ असेल, तर मार्च-एप्रिल हा भारताचा उत्सव-काळ आहे. डिसेंबरचा उत्सवी काळ जसा पावसाळी(खरीप) पिकांच्या काढणीनंतर साजरा होतो, तसाच हा रबी हंगामाच्या अखेरीस साजरा होतो.

धर्म, देश, संस्कार, वंश कुठलाही असला तरी सर्वांना प्रकाश देणारा सूर्य एकच आहे. पृथ्वीगोलावर तुमचा देश वा गाव जिथे वसले असेल त्यानुसार दिवस वा तारीख वेगळी असेल, पण शिशिर-संपात म्हणजे सूर्याचे राज्य सुरु होण्याचा दिवस साजरा करण्याची पद्धत सर्वच देश, वंश, धर्माच्या अनुयायांमध्ये आहे. पृथ्वीच्या पाठीवरील जवळजवळ सर्वच देशांतील माणसांना वंदनीय असलेल्या सूर्याच्या - किंवा इतर सामायिक प्राकृतिक देवतांच्या - अशा उत्सवांच्या आधारे विश्वबंधुत्वाची कोणतीही भावना कधी निर्माण झाली होती असे दिसत नाही. क्षुद्र गोष्टींवर संघर्ष करण्याऐवजी, इतर माणसांच्या रक्तावर साम्राज्ये आणि मोठमोठी स्मारके उभारण्याऐवजी, हा धागा जोडून घेत 'मानव्याचे अंति एकच गोत्र’ आचरणात आणावेसे माणसाला वाटले नाही. माणसाच्या संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळात सर्वांनीच प्राकृतिक घटकांना देवत्व दिले होते, त्यांची पूजा केली होती, त्यांना साकडे घातले होते. माणूस नागर झाला आणि या देवतांना माघारी ढकलून सुखवस्तू नागर लोकांनी मनुष्यरूपातील देवांना ते स्थान बहाल केले. सूर्यपूजक आणि वायुपूजक यांनी आमचाच देव श्रेष्ठ म्हणत एकमेकांचे खून पाडल्याची नोंद नाही. पण माणसाप्रमाणेच देवांनाही हातापायांच्या जोड्यांसोबत एक मस्तक मिळाल्यापासून, त्यांचे अनुयायी मात्र एकमेकांच्या रक्ताच्या नद्या वाहवून आपल्या देवाचे श्रेष्ठत्व वा आपलाच शांततेचा धर्म अधिक प्रामाणिक असल्याचे सिद्ध करण्याचा आटापिटा करत असतात.

जे शहाणपण हाडामांसाच्या माणसांमध्ये नाही ते चलच्चित्रांच्या आभासी दुनियेत निर्माण करता/पाहता येते. सॅटरर्नेलियापासून ख्रिसमसपर्यंत, होनेका पासून डाँगजीपर्यंत, यूलपासून टोजीपर्यंत सर्वच सणांचा म.सा.वि. आहे बांधिलकी नि आपुलकी ! हे सारे सर्वांनी मिळून साजरे करण्याचे उत्सव आहेत. आणि म्हणून ’दॅट टाईम ऑफ इयर म्हणजे कुठला काळ हो?’ असे विचारणार्‍याला ओलाफ, एल्सा आणि आना यांनी त्या लघुपटाच्या अखेरीस उत्तर देऊनच ठेवले आहे.

When We're Together
Music and Lyrics: Elyssa Samsel and Kate Anderson 
Short: Olaf's Frozen Adventure 
2017.

...
When we are together
that's my favorite place to be

'cause when we're together
It's a holiday every night

And when we're together
then the season's bright

I don't need the bells to ring
I know when it's here

'cause when we're together
I could stay forever

And when we're together
It's my favorite time of year


एका गाण्यापासून सुरू झालेली विचाराची साखळी जिज्ञासेचे बोट धरुन कुठून कुठे पोहोचली...

एखाद्या गाण्यातील शब्दाने किंवा एखाद्या पुस्तकातील, चित्रपटातील एखाद्या उल्लेखाने अस्मितेची टेंगळे टरारून वर येत होणारा धुमाकूळ आपण वारंवार अनुभवतो. इतिहासामधून आपल्या सोयीचे प्रसंग, घटना उकरुन काढणे; तशा मिळाल्या नाहीत तर त्या सांगणारा खोटा इतिहास(?) लिहून बहुसंख्येच्या, झुंडीच्या, माध्यमबळाच्या आधारे तो ’खरा इतिहास’ म्हणून रुजवण्याचा प्रयत्न करणे, हा आपला 'चिरंतन वर्तमान’ आहे. मुख्य म्हणजे या तथाकथित इतिहासाला बहुसंख्येचे बळ देता यावे यासाठी, त्याच इतिहासातून वीरांबरोबरच सैतानांचा शोध लावून, लोकांना अधिक चटकन समजणारी शत्रूलक्ष्यी मांडणी केली जाते. गल्लोगल्ली, तसंच व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटरसारख्या समाज(?)-माध्यमांतून ढेकणांसारख्या बुजबुजाट झालेल्या स्वयंघोषित इतिहास-अभ्यासकांचे हे हुकमी हत्यार बनले आहे.

या सोयीच्या राजकीय, सामाजिक इतिहासाच्या मार्‍यापुढे सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाला जागाच उरत नाही. त्या सार्‍या उन्मादाच्या तुलनेत एका गाण्याने अशी अनेक संस्कृतींची सफर करुन आणल्याचा अनुभव अधिक सकारात्मक आहे. कुंपणे ओलांडून केलेली अशी जिज्ञासापूर्ती हा अस्मितेच्या आम्लपित्तावरचा अक्सीर इलाज आहे.

- oOo -

६. या लेखाच्या सुरुवातीला आलेले ’दॅट टाईम ऑफ इयर’ आणि हे शेवटचे ’व्हेन वी आर टुगेदर’ ही दोन गाणी ज्या Olaf's Frozen Adventure लघुपटामध्ये अंतर्भूत आहेत, त्या लघुपटाची त्याची क्रम न बिघडवता निम्म्या लांबीची बनवलेली आवृत्ती इथे पाहता येईल. पूर्ण लघुपट ’डिस्ने-हॉटस्टार’ अ‍ॅपच्या माध्यमातून पाहता येईल.

---


हे वाचले का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा