शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

वेचताना... : कट्यार काळजात घुसली

अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणार्‍या कौशल्यांनंतर माणसाने सर्वप्रथम विकसित केलेले कौशल्य असावे ते गाण्याचे. मनोरंजनाचे दालन माणसाने सर्वप्रथम खुले केले ते गाण्याचे दार उघडूनच.

एखादे आवडते गाणे, आवडती धून गुणगुणला नाही असा माणूस सापडणे दुर्मिळ. अगदी आपला आवाज बेसूर आहे हे पक्के ठाऊक असलेली आमच्यासारखी माणसे निदान बाथरुममध्ये – जिथे समोर कुणी नसल्याने भिडस्तपणा आड येत नाही – तरी अधेमधे आपला गळा तासून पाहतात.

कट्यार काळजात घुसली

एक-दोन आठवड्यापूर्वी मुकेशने गायलेले ‘जाने कहाँ गये वो दिन’च्या ताना मारून पाहात होतो.

हे गाणे भलतेच दगाबाज आहे, निदान माझ्यासाठी तरी. ‘जाने कहाँ ग_’ नंतरचा जो उठाव– की तान की मींड की काहीतरी– आहे तो मला नेहमीच दगा देऊन जातो. म्हणजे असं की गातो खरा, पण पुढची ओळ पुरी घेऊन, ते कडवे संपेतो आपली पट्टी दहा मैल तरी सरकली आहे हे ध्यानात येई. म्हणजे आपल्या ‘आदत’ नि ‘जिगर’चा काहीही उपयोग न होता ‘हिसाबा’त गडबड होतेच आहे हे लगेच समजून येई.

मग कुणीतरी तज्ज्ञाने सांगितले की म्हणे हा ‘शिवरंजनी’ नावाचा राग आहे आणि तू म्हणतोस ती मींड शुद्ध धैवतावरून दोन्ही निषादांना स्पर्श न करता वरच्या षड्जावर जाते. मला सुरभान असले तरी स्वरज्ञान नसल्याने हे काही आपल्याला समजले नाही. ते जे काही असेल ते असो.

पण त्या दिवशी कसे कुणास ठाऊक तो ‘ए’ (किंवा वरचा षड्ज) नेमका सापडला, आणि तो असा लागला की त्यावरच थांबलो. आसपासचं सगळं एकदम स्तब्ध झाल्याचा भास झाला. उरलेली ओळ पुरी करून समेवर यायला जमते का याची खात्री करून पहायची गरजच वाटली नाही, ‘मी तुला नेमका सापडलो’ याचे सर्टिफिकेट घेऊनच तो आला होता.

असा एक सूर सापडल्याने होणारा आनंद जर इतका मोठा असेल, तर ज्यांना सारेच सूर वश आहेत, नव्हे त्यांच्या अधीन आहेत, त्यांची काय चैन असेल असा विचार माझ्या मनात नेहमीच डोकावतो. त्या सर्वांचा खच्चून हेवा वाटतोच, पण दुसरीकडे त्यांच्यामुळेच आपल्याला गाण्याची संगत लाभते म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञही असतो. आणि त्यांचा तो ठेवा त्यांनी व्यवस्थित सांभाळावा, वृद्धिंगत करावा ही आपलीही जबाबदारी जाणवत राहते आणि गळ्यात नसला तरी मनात तो सूर राहावा म्हणून त्याची संगत कधीच सोडावीशी वाटत नाही.

असा सुरांचा मोहक दंश जर योग्य वयात झाला नि त्या डसण्यातून जी बाधा होते ती अलौकिक अशीच असते. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातल्या सदाशिवला तो सूर सापडतो पंडित भानुशंकरांच्या गाण्यातून. त्या सुरांनी वेड लावलेला तो दहा-बारा वर्षांचा मुलगा, त्यांच्या अनुपस्थितीतही अनेक वर्षे सांभाळून ठेवतो आणि अखेर घरच्या जबाबदारीतून मुक्त होताच पहिली धाव घेतो ते पंडितजींकडे. तिथून पुढे त्याच्या गायनविद्येच्या – किंवा कविराज बाँकेबिहारीच्या शब्दात सांगायचे तर ‘गायनकलेच्या’ – ध्यासाचा प्रवास उलगडत जातो.

मराठी संगीत नाटकांच्या परंपरेत संगीत हा ज्यांचा अविभाज्य भाग आहे अशी मोजकीच जी नाटके आहेत त्यातील ‘कट्यार काळजात घुसली’ हे एक, कदाचित सर्वाधिक लोकप्रिय देखील. या नाटकाचा विषय निघाला की आठवतात ते डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेले खाँसाहेब. वसंतराव म्हणजे ‘कट्यार...’ आणि ‘कट्यार...’ म्हणजे वसंतराव हे जणू समीकरणच बनून गेले आहे. आणि त्यामुळे ‘कट्यार...’ हे खाँसाहेबांचे नाटक आहे असा समज रुजून बसला आहे. हे रसिकांचे सुदैव असले तरी माझ्या मते नाटकाचे दुर्दैव आहे!

कारण मुळात हे नाटक आहे ते सदाशिवचे, त्याच्या संगीतप्रेमाचे आणि त्याच्या त्या प्रेमावर प्रेम करणार्‍या – खुद्द खाँसाहेबांसह – चार जिवांचे. हे नाटक म्हणजे ‘सुष्टांच्या संघर्षाची गोष्ट' आहे. यातले कोणतेच पात्र खलप्रवृत्तीचे नाही, फक्त प्रसंगोत्पात त्यांची कृती वा विचार इतरांना गैरसोयीचे वा चुकीचे वाटू शकतात इतकेच.

आपल्या घराण्याचा हुनर परक्या घराण्याच्या शागीर्दाकडे जाऊ नये ही घराण्याच्या दृष्टीने पाहिले तर सदिच्छा, जबाबदारीही! (दृष्टीकोन महत्त्वाचा; कोणत्याही निर्णयाला दृष्टीकोन महत्त्वाचा असतो, सार्वकालिक सत्य असे काही नसते हे बहुसंख्य लोक ध्यानीच घेत नाहीत म्हणून हा खुंटा हलवून बसवतो आहे.) ती हुनर चोरून नेण्याचा प्रयत्न करणार्‍या सदाशिववर 'एक खून माफ' असलेली कट्यार चालवून ती पार पाडावी अशी खाँसाहेबांची इच्छा होते खरी. पण ‘मौसिकी से मुहब्बत’ ही ‘घराने की जिम्मेदारी’पेक्षा वरचढ तर ठरतेच, पण मुळातच सद्भावना घेऊन जगणारे मन शरीराला अशी हिंसक कृती करू देत नाही.

नाटकातला अखेरचा प्रसंग अर्थातच चरमसीमेचा, क्लायमॅक्सचा. त्यात ‘क्यूं अब्बाजान, फिरसे पाँव में चोट आयी?’ या झरीनाच्या प्रश्नाला ‘नहीं बेटी! पाँव मे नहीं– पाँव मे नहीं— ’ असे उत्तर घायाळ झालेले खाँसाहेब देतात तेव्हा त्यांची ती चोट वाचक/प्रेक्षकालाही – खाँसाहेबांना जाणवली तिथेच – जाणवते आणि एखाद्या संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यातून सहजपणे पाझरून जाते.

- oOo -

या नाटकातील एक वेचा : एक घायाळ द्रोणाचार्य

---

या नाटकाचे विस्तृत परिशीलन ‘रमतारामाच्या विश्रांतीस्थळी’: भाग १ आणि भाग २


हे वाचले का?

सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

एक घायाळ द्रोणाचार्य

सदाशिव: माझी शेवटची इच्छा! ठीक आहे. सांगतो. तुम्ही ज्या आसनावर बसून गात होतात, त्याच आसनावर बसून मला गायचं आहे. एकदा. या हवेलीत नोकर म्हणून वावरताना अनेकदा तुमचा रियाज ऐकला. पण कधी खुल्या आवाजात मोकळ्या मनानं ते गाऊ शकलो नाही. मनाच्या गाभार्‍यात घुमणारे ते मुके सूर मुखातून बाहेर पडायला उतावीळ झाले आहेत. खाँसाहेब, आपण समोर बसून माझं गाणं ऐका- तुम्हाला ते आवडलं तर उराशी जपलेलं माझं स्वप्न अंशतः तरी खरं होईल, मी कृतकृत्य होऊन आनंदानं तयार होईन ती कट्यार काळजात झेलून घ्यायला–

उस्तादः और अगर नहीं जँचा तो? नही पसंद आया तो?

सदाशिव: आपणासारख्या अधिकारी व्यक्तीला माझं गाणं आवडलं नाही तर ‘कट्यारीशिवाय’ मरेन मी! कारण जिवंत राहण्याचं काही प्रयोजनच उरणार नाही!

उस्तादः माषाल्ला! क्या मिजाज़ पाया है लौंडेने! आखरी दम तर मुजोरी और सीना जोरी! बैठ यहाँ! (काठीने बैठक दाखवतात.)

उस्मानः (हतबुद्ध होऊन) लेकिन चचाजान–

उस्तादः (गर्जून) खामोष! उस्मान-चाँद हा आता आम्हां दोघांतला मामला आहे. तुम उपर जाव बेटे... अपनी दीदी के पास बैठो. खबरदार! जो बगैर इजाज़त यहाँ आए.

[चाँद-उस्मान अस्वस्थपणे वर जातात. सदाशिव तानपुरा उचलून गाऊ लागतो.]

भूला भटका पथहारा
अब शरण तुम्हारी आया || धृ.||
कह दो हे गुरू कहाँ मिलेगी
चरण-कमल की छाया || १ ||

दीन दुखी जो द्वार तुम्हारे
आए दोनो हाथ पसारे
माथेपर ना लगे कलंक
अब तो शीष झुकाया ||२||

[ त्यातूनच खाँसाहेबांच्या रियाजातील ‘सुरत पिया की’ चीज सुरू करतो. दुसर्‍या अंकात म्हटलेला भाग म्हणून थांबतो]

कट्यार काळजात घुसली

उस्ताद: रुको नहीं बेटे! किसी के दिलमें प्यास पैदा करना और फिर उसे अधूरीही छोडकर... गाओ... आगे गाओ–

सदाशिव: पण या पुढला अंतरा त्या दिवशी तुम्ही गायला नाहीत. आता मला आपण तो शिकवाल तर...

उस्तादः (कठोर स्वरात) नहीं... हरगिज नहीं.

सदाशिव: ठीक आहे... मग माझ्या अल्प-मतीनं जुळविलेला अंतरा ऐका...

[त्या चीजेचा पुढला अंतरा गाऊन दाखवितो.]

उस्तादः वाहवा! बहोत अच्छे! गजबका दिमाख है तेरा– मजा आ रहा है... ये ऐसा अंदाज़ पहले कभी सुना नहीं था! ‘जीते रहो बेटा, गाते रहो’...

[ तो आशीर्वाद ऐकू सदाशिव गहिवरतो आणि नमस्कार करून तानपुरा खाली ठेवतो.]

उस्तादः रुको नहीं बेटे! गाओ, कुछ देर और गाओ...

सदाशिव: क्षमा करा. माझी शेवटची इच्छा पूर्ण झाली.

उस्तादः मगर हमारी जो तसल्ली नहीं हुई... गाओ सदाशिव!

सदाशिव: (आसनावरून उठत) नको खाँसाहेब!

उस्तादः (कडाडून) हमारा हुक्म है...

सदाशिव: (आवेशाने) हुकूम? मी आपणाला गुरू मानलं असलं तरी आपण मला शिष्य मानलं नाही... हा हुकूम... ही आज्ञा पाळण्याचं माझ्यावर बंधन नाही... मी स्वतंत्र आहे... (कळवळून) कारण मी निराधार आहे... एक स्वप्न होतं ते ही काही प्रमाणात सफल झालं. आता कुणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुणाशीही नातं उरलं नाही माझं. आता आम्ही दोघंच... मी आणि ती कट्यार! खाँसाहेब, मी तयार आहे!

उस्तादः बेटे! हम मिन्नत करते हैं! फिरसे उठाओ तानपुरा...

सदाशिव: खाँसाहेब, मी तयार आहे, उचला हात आणि चालवा कट्यार...

उस्तादः (संतापून) बदतमीज! किसी गुश्ताखी हमनें आजतक... (गहिवरून) बेटे! किसीके दिलमें प्यास पैदा करना और उसे अधूरी छोडकर... देख सदाशिव, तेरी और कोई मुराद हो तो बता देना... पूरी कर दूँगा... मगर एक बार और...

सदाशिव: ठीक आहे! गाईन! एका अटीवर. आपण शागीर्द म्हणून माझा स्वीकार कराल? खर्‍या अर्थाने माझे गुरू व्हाल?

उस्तादः (अगतिकपणे ओरडून) नहीं! नहीं! उतनी बात छोडकर और कोई चीज माँग ले!

सदाशिव: जशी मुरलीधराची इच्छा! मग एक तर माझी वाट सोडा किंवा कट्यार चालवा.

उस्तादः (कळवळून) ए परवरदिगार! ये जिद, ये हठीलापन, चलाऊंगा बेटे कटार! यहाँ सामने आ [प्रकाशयोजना तालबद्ध रीतीने अनुक्रमे मंद आणि प्रखर होऊ लागते.] ये रोशनी क्यूं धुंद हुई? कुछ धीमीसी लग रही है– सम्भालना बेटे– मेरा हाथ उठ रहा है– काँप रहा है– क्योंकी बुढापा आ रहा है– और पैर में कुछ... कहाँ खडा है तू– मैं (त्याला धरून कट्यारीचा हात उगारतात– कट्यार गळून पडते– ते हताश होतात– आपल्या आसनाचा आधार घेतात.) कटार क्या चलाऊं लौंडे? कटार तो तूने चलायी ज़िंदगीभर, मेरी आँखोके सामने नहीं आना– कविराज ले जाईये इस कम्बख्त को.

[ सदाशिव त्यांची कट्यार उचलून त्यांच्या पायांशी ठेवतो. जाऊ लागतो. त्या वेळेपर्यंत झरीना, चाँद, उस्मान, जिन्यात आलेले.]

सदाशिव: कविराज, क्षमा करा! तुमची अपेक्षा अपूर्ण राहिली, माझ्या स्वप्नासारखीच...

कविराजः सदाशिव, वाईट वाटून घेऊ नकोस. ही तुझी शोकांतिका नाही. द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा मागितली तेव्हा एकलव्यानं आपला अंगठा कापून दिला. डोळ्यांत टिपूस न आणता. एकलव्याचा नुसता हात जखमी झाला- विद्रूप झाला– पण द्रोणाचार्य मात्र अंतर्बाह्य जखमी झाले– आयुष्यभर तळमळत राहिले, हळहळत राहिले.

झरीना: (भिंतीवरची तसबीर काढून घेत) सदाशिव!

सदाशिव: हे काय झरीना– ही खाँसाहेबांची तसबीर...

झरीना: असू दे तुझ्याजवळ... तुझ्याच कष्टाच्या कमाईतून बनविलीस तू... गुरुदक्षिणा म्हणून... या हवेलीत तुझ्या कष्टांचा अपमान झाला! निदान या गुरुदक्षिणेचा व्हायला नको. “शुभास्ते पंथान:”

सदाशिव: खुदा हाफिज!

झरीना: उमाची भेट झाली तर माझा निरोप सांग... ज्याला आपण बागेतला पोपट समजत होतो, तो आता मोठा झाला आहे... गरुडासारखा. त्याची वाट कुणीही अडवू शकणार नाही यापुढं. “शुभास्ते पंथान:”

सदाशिव: खुदा हाफिज! [सदाशिव व कविराज जातात. खाँसाहेब काठीच्या आधारे उठून तिकडे जाऊ लागतात.]

उस्ताद: (भ्रमिष्टासारखे होत, स्वतःशी) चला गया? सदाशिव चला गया? (कळवळून, आकाशाकडे हात उचलीत) ए मालिक! मेरे आका! काश् ! तू मेरे घरानेमे एक ऐसा शागीर्द पैदा करता– तो मैं अलम् दुनिया को चुनौती देकर कहता–

[आवेगाच्या भरात घडवंचीला पाय लागून त्यांचा तोल जातो. त्यांचे किंचाळणे ऐकून झरीना धावत येऊन त्यांना आधार देते.]

झरीना: क्या हुआ अब्बाजान! फिर पाँव में चोट आई?

उस्तादः (तिला जवळ घेऊन आसवे ढाळीत) नहीं बेटी! पाँव मे नहीं– पाँव मे नहीं—

- oOo -

पुस्तकः कट्यार काळजात घुसली.
लेखकः पुरुषोत्तम दारव्हेकर.
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन.
आवृत्ती चौथी (२०१६).
पृष्ठे: ११६-११९


हे वाचले का?