शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

वेचताना... : कट्यार काळजात घुसली

अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणार्‍या कौशल्यांनंतर माणसाने सर्वप्रथम विकसित केलेले कौशल्य असावे ते गाण्याचे. मनोरंजनाचे दालन माणसाने सर्वप्रथम खुले केले ते गाण्याचे दार उघडूनच.

एखादे आवडते गाणे, आवडती धून गुणगुणला नाही असा माणूस सापडणे दुर्मिळ. अगदी आपला आवाज बेसूर आहे हे पक्के ठाऊक असलेली आमच्यासारखी माणसे निदान बाथरुममध्ये – जिथे समोर कुणी नसल्याने भिडस्तपणा आड येत नाही – तरी अधेमधे आपला गळा तासून पाहतात.

कट्यार काळजात घुसली

एक-दोन आठवड्यापूर्वी मुकेशने गायलेले ‘जाने कहाँ गये वो दिन’च्या ताना मारून पाहात होतो.

हे गाणे भलतेच दगाबाज आहे, निदान माझ्यासाठी तरी. ‘जाने कहाँ ग_’ नंतरचा जो उठाव– की तान की मींड की काहीतरी– आहे तो मला नेहमीच दगा देऊन जातो. म्हणजे असं की गातो खरा, पण पुढची ओळ पुरी घेऊन, ते कडवे संपेतो आपली पट्टी दहा मैल तरी सरकली आहे हे ध्यानात येई. म्हणजे आपल्या ‘आदत’ नि ‘जिगर’चा काहीही उपयोग न होता ‘हिसाबा’त गडबड होतेच आहे हे लगेच समजून येई.

मग कुणीतरी तज्ज्ञाने सांगितले की म्हणे हा ‘शिवरंजनी’ नावाचा राग आहे आणि तू म्हणतोस ती मींड शुद्ध धैवतावरून दोन्ही निषादांना स्पर्श न करता वरच्या षड्जावर जाते. मला सुरभान असले तरी स्वरज्ञान नसल्याने हे काही आपल्याला समजले नाही. ते जे काही असेल ते असो.

पण त्या दिवशी कसे कुणास ठाऊक तो ‘ए’ (किंवा वरचा षड्ज) नेमका सापडला, आणि तो असा लागला की त्यावरच थांबलो. आसपासचं सगळं एकदम स्तब्ध झाल्याचा भास झाला. उरलेली ओळ पुरी करून समेवर यायला जमते का याची खात्री करून पहायची गरजच वाटली नाही, ‘मी तुला नेमका सापडलो’ याचे सर्टिफिकेट घेऊनच तो आला होता.

असा एक सूर सापडल्याने होणारा आनंद जर इतका मोठा असेल, तर ज्यांना सारेच सूर वश आहेत, नव्हे त्यांच्या अधीन आहेत, त्यांची काय चैन असेल असा विचार माझ्या मनात नेहमीच डोकावतो. त्या सर्वांचा खच्चून हेवा वाटतोच, पण दुसरीकडे त्यांच्यामुळेच आपल्याला गाण्याची संगत लाभते म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञही असतो. आणि त्यांचा तो ठेवा त्यांनी व्यवस्थित सांभाळावा, वृद्धिंगत करावा ही आपलीही जबाबदारी जाणवत राहते आणि गळ्यात नसला तरी मनात तो सूर राहावा म्हणून त्याची संगत कधीच सोडावीशी वाटत नाही.

असा सुरांचा मोहक दंश जर योग्य वयात झाला नि त्या डसण्यातून जी बाधा होते ती अलौकिक अशीच असते. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातल्या सदाशिवला तो सूर सापडतो पंडित भानुशंकरांच्या गाण्यातून. त्या सुरांनी वेड लावलेला तो दहा-बारा वर्षांचा मुलगा, त्यांच्या अनुपस्थितीतही अनेक वर्षे सांभाळून ठेवतो आणि अखेर घरच्या जबाबदारीतून मुक्त होताच पहिली धाव घेतो ते पंडितजींकडे. तिथून पुढे त्याच्या गायनविद्येच्या – किंवा कविराज बाँकेबिहारीच्या शब्दात सांगायचे तर ‘गायनकलेच्या’ – ध्यासाचा प्रवास उलगडत जातो.

मराठी संगीत नाटकांच्या परंपरेत संगीत हा ज्यांचा अविभाज्य भाग आहे अशी मोजकीच जी नाटके आहेत त्यातील ‘कट्यार काळजात घुसली’ हे एक, कदाचित सर्वाधिक लोकप्रिय देखील. या नाटकाचा विषय निघाला की आठवतात ते डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेले खाँसाहेब. वसंतराव म्हणजे ‘कट्यार...’ आणि ‘कट्यार...’ म्हणजे वसंतराव हे जणू समीकरणच बनून गेले आहे. आणि त्यामुळे ‘कट्यार...’ हे खाँसाहेबांचे नाटक आहे असा समज रुजून बसला आहे. हे रसिकांचे सुदैव असले तरी माझ्या मते नाटकाचे दुर्दैव आहे!

कारण मुळात हे नाटक आहे ते सदाशिवचे, त्याच्या संगीतप्रेमाचे आणि त्याच्या त्या प्रेमावर प्रेम करणार्‍या – खुद्द खाँसाहेबांसह – चार जिवांचे. हे नाटक म्हणजे ‘सुष्टांच्या संघर्षाची गोष्ट' आहे. यातले कोणतेच पात्र खलप्रवृत्तीचे नाही, फक्त प्रसंगोत्पात त्यांची कृती वा विचार इतरांना गैरसोयीचे वा चुकीचे वाटू शकतात इतकेच.

आपल्या घराण्याचा हुनर परक्या घराण्याच्या शागीर्दाकडे जाऊ नये ही घराण्याच्या दृष्टीने पाहिले तर सदिच्छा, जबाबदारीही! (दृष्टीकोन महत्त्वाचा; कोणत्याही निर्णयाला दृष्टीकोन महत्त्वाचा असतो, सार्वकालिक सत्य असे काही नसते हे बहुसंख्य लोक ध्यानीच घेत नाहीत म्हणून हा खुंटा हलवून बसवतो आहे.) ती हुनर चोरून नेण्याचा प्रयत्न करणार्‍या सदाशिववर 'एक खून माफ' असलेली कट्यार चालवून ती पार पाडावी अशी खाँसाहेबांची इच्छा होते खरी. पण ‘मौसिकी से मुहब्बत’ ही ‘घराने की जिम्मेदारी’पेक्षा वरचढ तर ठरतेच, पण मुळातच सद्भावना घेऊन जगणारे मन शरीराला अशी हिंसक कृती करू देत नाही.

नाटकातला अखेरचा प्रसंग अर्थातच चरमसीमेचा, क्लायमॅक्सचा. त्यात ‘क्यूं अब्बाजान, फिरसे पाँव में चोट आयी?’ या झरीनाच्या प्रश्नाला ‘नहीं बेटी! पाँव मे नहीं– पाँव मे नहीं— ’ असे उत्तर घायाळ झालेले खाँसाहेब देतात तेव्हा त्यांची ती चोट वाचक/प्रेक्षकालाही – खाँसाहेबांना जाणवली तिथेच – जाणवते आणि एखाद्या संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यातून सहजपणे पाझरून जाते.

- oOo -

या नाटकातील एक वेचा: एक घायाळ द्रोणाचार्य

---
संबंधित लेखन:
या नाटकाचे विस्तृत परिशीलन ‘रमतारामाच्या विश्रांतीस्थळी’: भाग १ आणि भाग २
---


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा