भूमिका

’वेचित चाललो’ ही संचयनी एका व्यक्तीच्या वाचनात आलेल्या पुस्तकातील उल्लेखनीय उतार्‍यांचे/वेच्यांचे संकलन आहे. प्रत्येक वेचा वेगवेगळ्या कारणाने उल्लेखनीय असू शकतो. कुठे खिळून ठेवणारे शब्दचित्र असेल, कुठे बटबटीत न होता व्यक्त झालेल्या भावनांचा नात्यांचा आविष्कार असेल, कुठे एखाद्या सामान्यांच्या जगण्याशी निगडित प्रश्नांचा मागोवा घेतलेला असेल तर कुठे एखाद्या मूलगामी प्रश्नांचा वेध घेतलेला असू शकतो. तो तो वेचा त्या त्या पुस्तकाचा प्रातिनिधिक आहे असे मुळीच नाही. येथे निवडलेल्या काही वेच्यांबद्दल थोडे विवेचन ’वेचताना...’ या शीर्षकाखाली समाविष्ट केले आहे. परंतु हे सर्वच वेच्यांबद्दल आहे असे मात्र नाही.

येथे निवडलेले पुस्तक किमान वाचनीय असल्याची शिफारस नक्की करतो आहे. पण यातील पुस्तकांच्या वर्ण्यविषयांची व्याप्ती पाहता, वाचकाला प्रत्येक पुस्तक अथवा वेचा पसंत पडेलच असे नाही. आपापल्या आवडीनिवडी, पूर्वग्रह, दृष्टीकोन आदी अनेक कारणांनी कुठे सहमती, कुठे असहमती राहणारच. तरी 'वाचावे आणि वेचावे' पंथाचे वारकरी असण्यास काही अडचण असू नये.

महत्वाचे:
हे केवळ संकलन, संचयनी, अथवा ब्लॉग आहे. यावरुन पुस्तकांची कोणतीही खरेदी-विक्री अथवा सशुल्क/नि:शुल्क देवाणघेवाण होत नाही, करण्याचा मनोदयही नाही! यावर उल्लेख झालेली पुस्तके अवश्य खरेदी करा असे आवर्जून सांगताना त्यात आमचा कोणताही व्यावहारिक अथवा आर्थिक स्वार्थ निगडित असू नये याची पुरेपूर दक्षता घेण्यासाठी, कुणी एक वितरक अथवा पुस्तक-विक्रेत्याची शिफारसदेखील येथे करण्यात येत नाही. पुस्तक विक्रेत्याकडे अनुपलब्ध असेल, तर पुस्तकाच्या प्रकाशकाशी संपर्क साधता यावा यासाठी प्रकाशनांची नावेही समाविष्ट केलेली आहेत.

Monday, August 21, 2017

एक घायाळ द्रोणाचार्य

('कट्यार काळजात घुसली' - पुरुषोत्तम दारव्हेकर)

सदाशिव: माझी शेवटची इच्छा! ठीक आहे. सांगतो. तुम्ही ज्या आसनावर बसून गात होतात, त्याच आसनावर बसून मला गायचं आहे. एकदा. या हवेलीत नोकर म्हणून वावरताना अनेकदा तुमचा रियाज ऐकला. पण कधी खुल्या आवाजात मोकळ्या मनानं ते गाऊ शकलो नाही. मनाच्या गाभार्‍यात घुमणारे ते मुके सूर मुखातून बाहेर पडायला उतावीळ झाले आहेत. खाँसाहेब, आपण समोर बसून माझं गाणं ऐका- तुम्हाला ते आवडलं तर उराशी जपलेलं माझं स्वप्न अंशतः तरी खरं होईल, मी कृतकृत्य होऊन आनंदानं तयार होईन ती कट्यार काळजात झेलून घ्यायला-

उस्तादः और अगर नहीं जँचा तो? नही पसंद आया तो?

सदाशिव: आपणासारख्या अधिकारी व्यक्तीला माझं गाणं आवडलं नाही तर 'कट्यारीशिवाय' मरेन मी! कारण जिवंत राहण्याचं काही प्रयोजनच उरणार नाही!

उस्तादः माषाल्ला! क्या मिजाज़ पाया है लौंडेने! आखरी दम तर मुजोरी और सीना जोरी! बैठ यहाँ! (काठीने बैठक दाखवतात.)

उस्मानः (हतबुद्ध होऊन) लेकिन चचाजान-

उस्तादः (गर्जून) खामोष! उस्मान-चाँद हा आता आम्हां दोघांतला मामला आहे. तुम उपर जाव बेटे... अपनी दीदी के पास बैठो. खबरदार! जो बगैर इजाज़त यहाँ आए.

[चाँद-उस्मान अस्वस्थपणे वर जातात. सदाशिव तानपुरा उचलून गाऊ लागतो.]
भूला भटका पथहारा
अब शरण तुम्हारी आया || धृ.||
कह दो हे गुरू कहाँ मिलेगी
चरण-कमल की छाया || १ ||
दीन दुखी जो द्वार तुम्हारे
आए दोनो हाथ पसारे
माथेपर ना लगे कलंक
अब तो शीष झुकाया ||२||
[ त्यातूनच खाँसाहेबांच्या रियाजातील 'सुरत पिया की' चीज सुरू करतो. दुसर्‍या अंकात म्हटलेला भाग म्हणून थांबतो]

उस्तादः रुको नहीं बेटे! किसी के दिलमें प्यास पैदा करना और फिर उसे अधूरीही छोडकर... गाओ... आगे गाओ-

सदाशिव: पण या पुढला अंतरा त्या दिवशी तुम्ही गायला नाहीत. आता मला आपण तो शिकवाल तर...

उस्तादः (कठोर स्वरात) नहीं... हरगिज नहीं.
सदाशिव: ठीक आहे... मग माझ्या अल्प-मतीनं जुळविलेला अंतरा ऐका...

[त्या चीजेचा पुढला अंतरा गाऊन दाखवितो.]

उस्तादः वाहवा! बहोत अच्छे! गजबका दिमाख है तेरा- मजा आ रहा है... ये ऐसा अंदाज़ पहले कभी सुना नहीं था! 'जीते रहो बेटा, गाते रहो'...

[ तो आशीर्वाद ऐकू सदाशिव गहिवरतो आणि नमस्कार करून तानपुरा खाली ठेवतो.]

उस्तादः रुको नहीं बेटे! गाओ, कुछ देर और गाओ...

सदाशिव: क्षमा करा. माझी शेवटची इच्छा पूर्ण झाली.

उस्तादः मगर हमारी जो तसल्ली नहीं हुई... गाओ सदाशिव!

सदाशिव: (आसनावरून उठत) नको खाँसाहेब!

उस्तादः (कडाडून) हमारा हुक्म है...

सदाशिव: (आवेशाने) हुकूम? मी आपणाला गुरू मानलं असलं तरी आपण मला शिष्य मानलं नाही... हा हुकूम... ही आज्ञा पाळण्याचं माझ्यावर बंधन नाही... मी स्वतंत्र आहे... (कळवळून) कारण मी निराधार आहे... एक स्वप्न होतं ते ही काही प्रमाणात सफल झालं. आता कुणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुणाशीही नातं उरलं नाही माझं. आता आम्ही दोघंच... मी आणि ती कट्यार! खाँसाहेब, मी तयार आहे!

उस्तादः बेटे! हम मिन्नत करते हैं! फिरसे उठाओ तानपुरा...

सदाशिव: खाँसाहेब, मी तयार आहे, उचला हात आणि चालवा कट्यार...

उस्तादः (संतापून) बदतमीज! किसी गुश्ताखी हमनें आजतक... (गहिवरून) बेटे! किसीके दिलमें प्यास पैदा करना और उसे अधूरी छोडकर... देख सदाशिव, तेरी और कोई मुराद हो तो बता देना... पूरी कर दूँगा... मगर एक बार और...

सदाशिव: ठीक आहे! गाईन! एका अटीवर. आपण शागीर्द म्हणून माझा स्वीकार कराल? खर्‍या अर्थाने माझे गुरू व्हाल?

उस्तादः (अगतिकपणे ओरडून) नहीं! नहीं! उतनी बात छोडकर और कोई चीज माँग ले!

सदाशिव: जशी मुरलीधराची इच्छा! मग एक तर माझी वाट सोडा किंवा कट्यार चालवा.

उस्तादः (कळवळून) ए परवरदिगार! ये जिद, ये हठीलापन, चलाऊंगा बेटे कटार! यहाँ सामने आ [प्रकाशयोजना तालबद्ध रीतीने अनुक्रमे मंद आणि प्रखर होऊ लागते.] ये रोशनी क्यूं धुंद हुई? कुछ धीमीसी लग रही है- सम्भालना बेटे- मेरा हाथ उठ रहा है- काँप रहा है- क्योंकी बुढापा आ रहा है- और पैर में कुछ... कहाँ खडा है तू- मैं (त्याला धरून कट्यारीचा हात उगारतात- कट्यार गळून पडते- ते हताश होतात- आपल्या आसनाचा आधार घेतात.) कटार क्या चलाऊं लौंडे? कटार तो तूने चलायी ज़िंदगीभर, मेरी आँखोके सामने नहीं आना- कविराज ले जाईये इस कम्बख्त को.

[ सदाशिव त्यांची कट्यार उचलून त्यांच्या पायांशी ठेवतो. जाऊ लागतो. त्या वेळेपर्यंत झरीना, चाँद, उस्मान, जिन्यात आलेले.]

सदाशिव: कविराज, क्षमा करा! तुमची अपेक्षा अपूर्ण राहिली, माझ्या स्वप्नासारखीच...

कविराजः सदाशिव, वाईट वाटून घेऊ नकोस. ही तुझी शोकांतिका नाही. द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा मागितली तेव्हा एकलव्यानं आपला अंगठा कापून दिला. डोळ्यांत टिपूस न आणता. एकलव्याचा नुसता हात जखमी झाला- विद्रूप झाला- पण द्रोणाचार्य मात्र अंतर्बाह्य जखमी झाले- आयुष्यभर तळमळत राहिले, हळहळत राहिले.

झरीना: (भिंतीवरची तसबीर काढून घेत) सदाशिव!

सदाशिव: हे काय झरीना- ही खाँसाहेबांची तसबीर...

झरीना: असू दे तुझ्याजवळ... तुझ्याच कष्टाच्या कमाईतून बनविलीस तू... गुरुदक्षिणा म्हणून... या हवेलीत तुझ्या कष्टांचा अपमान झाला! निदान या गुरुदक्षिणेचा व्हायला नको. "शुभास्ते पंथान:"

सदाशिव: खुदा हाफिज!

झरीना: उमाची भेट झाली तर माझा निरोप सांग... ज्याला आपण बागेतला पोपट समजत होतो, तो आता मोठा झाला आहे... गरुडासारखा. त्याची वाट कुणीही अडवू शकणार नाही यापुढं. "शुभास्ते पंथान:"

सदाशिव: खुदा हाफिज! [सदाशिव व कविराज जातात. खाँसाहेब काठीच्या आधारे उठून तिकडे जाऊ लागतात.]

उस्ताद: (भ्रमिष्टासारखे होत, स्वतःशी) चला गया? सदाशिव चला गया? (कळवळून, आकाशाकडे हात उचलीत) ए मालिक! मेरे आका! काश् ! तू मेरे घरानेमे एक ऐसा शागीर्द पैदा करता- तो मैं अलम् दुनिया को चुनौती देकर कहता-

[आवेगाच्या भरात घडवंचीला पाय लागून त्यांचा तोल जातो. त्यांचे किंचाळणे ऐकून झरीना धावत येऊन त्यांना आधार देते.]

झरीना: क्या हुआ अब्बाजान! फिर पाँवे में चोट आई?

उस्तादः (तिला जवळ घेऊन आसवे ढाळीत) नहीं बेटी! पाँव मे नहीं- पाँव मे नहीं--

-oOo-

पुस्तकः 'कट्यार काळजात घुसली'
लेखकः पुरुषोत्तम दारव्हेकर
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती चौथी (२०१६)
पृष्ठे: पान ११६-११९

No comments:

Post a Comment