गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

जेरुसलेम: सौंदर्यवती आणि वेश्या

इसवी सन पूर्व ८४१मध्ये जेझबेलची कन्या राणी अथालीया हिने जेरुसलेमची सत्ता काबीज केली. तिने डेव्हिड कुळातल्या सर्व राजकुमारांना ( तिच्या स्वतःच्या नातवंडांना) ठार मारून टाकलं. फक्त जेहोआश नावाच्या एकाच बाल राजकुमाराला तिच्या तावडीतून वाचवलं गेलं. ’बुक ऑफ किंग्ज द्वितीय’ या पुस्तकातून आणि उत्खननात सापडलेल्या नव्या पुराव्यांतून आपल्याला जेरुसलेममधल्या तेव्हाच्या जीवनाची थोडीशी कल्पना येते.

जेरुसलेम

ते छोटंसं बाळ मंदिराच्या परिसरात दडवून ठेवलेलं होतं. त्याच वेळी वंशाने अर्धी फिनिशियन आणि अर्धी इस्राइली असलेली ही जेझबेल-कन्या स्वतःच्या राजधानीत बाल नावाच्या देवतेची आराधना करण्यात आणि वेगवेगळ्या देशांबरोबर व्यापार करण्यात गर्क झाली होती. जेरुसलेममध्ये जेमतेम इंचभर लांबीचं, हस्तिदंती डाळिंबावर बसलेलं एक सुंदर हस्तिदंती कबुतर सापडलं आहे. बहुतकरून जेरुसलेममधल्या एखाद्या आलिशान घराच्या सजावटीसाठी त्याचा उपयोग करण्यात आला असावा. डेव्हिडच्या नगरीच्या खाली असलेल्या खडकांतल्या तलावाभोवती फिनिशियन मातीत घडवलेले राजेशाही शिक्के सापडले आहेत. त्या शिक्क्यांना 'बुलै' असं नाव होतं. त्या शिक्क्यांवर तत्कालीन जहाजांची चित्रं आहेत. त्याचप्रमाणे पंख असलेला सिंहासनारूढ सूर्य अशी पवित्र चिन्हंसुद्धा आहेत. त्या शिक्क्यांसोबत तिथे १०,००० माशांची हाडंसुद्धा सापडली आहेत. ही हाडं बहुधा समुद्रप्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांनी भूमध्य समुद्रावरून येताना आणली असावीत; पण काही काळात जेझबेलप्रमाणेच अथालियाही लोकांच्या तिरस्काराचा विषय झाली. तिच्या मूर्तिपूजक धर्मगुरूंनी मंदिरात बाल आणि इतर देवतांची प्रतिष्ठापना केली. सहा वर्षांचा काळ गेल्यावर याहवेहच्या मंदिरप्रमुखाने जेरुसलेममधल्या मातब्बर सरदारांना एका गुप्त बैठकीला बोलवलं आणि छोटा राजकुमार जेहोआश जिवंत असल्याचं त्यांच्यापुढे उघड केलं. मग त्या छोट्या राजकुमारासमोर त्यांनी निष्ठेच्या शपथा घेतल्या. मग मंदिरप्रमुखाने सर्व रक्षकांना मंदिरात अजूनही साठवून ठेवलेले राजा डेव्हिडचे भाले आणि ढाली दिल्या आणि त्या मुलाचा सार्वजनिकरित्या राज्याभिषेक केला. त्या प्रसंगी सर्व लोकांनी 'राजा चिरायू होवो' अशा घोषणा दिल्या आणि तुताऱ्या वाजवून जल्लोष केला.

राणीने 'सैनिक आणि प्रजेने घातलेला हा गोंधळ' ऐकला आणि ती राजवाड्यातून तातडीने किल्ल्याच्या शेजारच्या मंदिरात आली. आता ते मंदिरही लोकांनी भरून गेल होतं. राणी ओरडली, 'दगा! दगा!'; पण सैनिकांनी तिला पकडलं आणि पवित्र पर्वतावरून फरफटत खाली नेऊन मंदिराच्या दाराबाहेर तिची हत्या केली. 'बाल' या देवतेची पूजा करणाऱ्या धर्मगुरूंना लोकांनी पकडून मारलं आणि त्या मूर्ती फोडून टाकल्या.

राजा जेहोआशने एकूण चाळीस वर्षं, म्हणजे इसवी सन पूर्व ८०१ सालापर्यंत राज्य केलं. त्यानंतर सिरियन राजाने जेरुसलेमवर हल्ला करून त्याला मंदिराच्या 'खजिन्यातलं सर्व सोनं' द्यायला भाग पाडलं; पण त्या राजाची हत्या झाली. त्यानंतर तीस वर्षांनी इस्राइलच्या एका राजाने जेरुसेलमवर हल्ला केला आणि मंदिर लुटलं. त्यानंतर मंदिराच्या वाढत्या संपत्तीमुळे ते आक्रमकांसाठी एक प्रकारचं आमीषच झालं.

तरीदेखील जेरुसेलमचं दुर्गम वैभव असिरियाच्या वैभवाशी स्पर्धा करू शकत नव्हतं. असिरियाचं साम्राज्य नव्या राजाच्या आधिपत्याखाली स्फूर्तीने भरू लागलं होतं आणि इतर राज्यांना गिळण्यासाठी नरभक्षक श्वापदाप्रमाणे सज्ज झालं होतं. असिरियन लोकांचा प्रतिकार करण्यासाठी इस्राइल आणि अराम-दमास्कसच्या राजांनी युती करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ज्यूडाचा राजा आहाझ याने असिरियाविरुद्धच्या युतीत सामील व्हायला नकार दिला तेव्हा इस्राइली आणि सिरियन लोकांनी जेरुसलेमलाच वेढा 'दिला, पण त्यांना नव्याने बांधलेल्या तटरक्षक भिंती तोडता आल्या नाहीत. उलट राजा आहाझने मंदिरातला खजिना आणि मदतीच्या याचनेचं पत्र असिरियाचा राजा तिसरा तिग्लाथ्पिलेसर याला पाठवून दिलं. इसवी सन पूर्व ७३२ साली असिरियन लोकांनी सिरियाचं राज्य स्वतःच्या राज्याला जोडून घेतलं आणि इस्राइलचा विध्वंस केला. जेरुसलेममध्ये बसलेला राजा आहाझ मात्र असिरियाला शरण जायचं की लढायच, याची चिंता करत राहिला.

आयझेया: जेरुसलेम, सौंदर्यवती आणि वेश्या

आयझेयाने राजाला सबुरीचा सल्ला दिला: याहवेह जेरुसलेमचं रक्षण करेल. आयझेया हा एक राजकुमार, धर्मगुरू आणि राजकीय सल्लागार होता. राजाला इमॅन्युएल (अर्थ - आपल्यात निवास करणारा ईश्वर) नावाचा एक पुत्र होणार असल्याचं आयझेयाने सांगितलं 'आपल्यामध्ये एक असं मूल जन्म घेईल' जे 'सर्वशक्तिमान ईश्वर, शाश्वत पिता, शांतीचा राजकुमार' असेल, जे 'चिरकाल शांतिपर्व' घेऊन येईल.

'बुक ऑफ आयझेया’ लिहिणारे कमीतकमी दोन लेखक आहेत. त्यातल्या एकाने दुसऱ्यानंतर २०० वर्षांनी त्या ग्रंथात भर टाकली. पहिला आयझेया हा केवळ प्रेषित नव्हता, तर तो दूरदर्शी कवीसुद्धा होता. असिरियन लोकांनी सारंकाही गिळंकृत करण्याचा आक्रमणवादी सपाटा लावला होता, पण त्या दिवसांतही मंदिराच्या विनाशानंतरच्या एका गूढ जेरुसलेममधलं जीवन कसं असेल, याची कल्पना करणारा तो पहिलाच माणूस होता. त्याने लिहून ठेवलंय, 'मला एका उंच सिंहासनावर बसलेला देव दिसला आणि त्याच्या प्रभेने सारं मंदिर भरून गेलेलं होतं... आणि सभागृहात सगळीकडे धूर पसरला होता.'

आयझेयाला 'पवित्र पर्वत' अत्यंत प्रिय होता. त्याच्या नजरेत ती एक लावण्यवती स्त्री होती, 'झायनच्या कन्येची टेकडी, जेरुसलेमची टेकड़ी', कधी सदाचारी, तर कधी वेश्या, सात्विकता आणि संस्कृती नसेल, तर नुसत्या जेरुसलेमवर मालकी असून काहीच अर्थ नाही. सारं काही नष्ट झालं आणि 'जेरुसलेमचा विध्वंस झाला', तरी एक नवं आध्यात्मिक जेरुसलेम अस्तित्वात असेलच. ते जेरुसलेम ’प्रत्येक मानवी निवाऱ्याच्या ठिकाणी वास करेल.' तो शिकवतो: प्रेम आणि दयाभाव; 'सत्कर्म करायला शिका; न्याय करा; पीडितांची पीडा दूर करा; अनाथांचा पुरस्कार करा; विधवांना न्याय मिळवून द्या.' आयझेयाला एक असामान्य साक्षात्कार झाला : 'उंच पर्वतांवर देवाचं वसतिस्थान प्रस्थापित होईल... आणि राष्ट्रांची त्याकडे ओढ असेल.' या दुर्गम आणि कदाचित पूर्णपणे पाडाव झालेल्या नगरीतले कायदे, तिथली जीवनमूल्यं आणि कहाण्या पुन्हा नव्याने जन्म घेतील. 'मग अनेक लोक पुढे येऊन म्हणतील, 'चला रे, आपण देवाच्या पर्वताकडे जाऊ. जेकबच्या देवाच्या निवासस्थानी जाऊ; आणि तो आपल्याला त्याचा मार्ग दाखवेल...' झायनमधून सगळीकडे देवाचा कायदा प्रस्थापित होईल आणि जेरुसलेममधून देवाची शिकवण सर्वत्र पसरेल. आणि मग तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करेल.' आयझेयाने एका गूढ कयामतच्या दिवसाचं भविष्य वर्तवलं. जेव्हा एक विधिवत् राजा- एक मसीहा अवतरेल : 'तेव्हा योद्धे त्यांच्या तलवारीचं रूपांतर नांगराच्या फाळात करतील आणि भाल्यांचं रूपांतर तण काढण्याच्या कोयत्यात करतील... त्यानंतर ते कधीही युद्ध करणार नाहीत. त्या दिवशी मृत लोक पुनर्जीवित होतील, 'लांडगे आणि कोकरं एकत्र नांदतील आणि बिबळ्या बकरीच्या पिलासोबत विश्रांती घेईल.'

या तेजस्वी कवितेत कयामतच्या दिवसाच्या ओढीबद्दल प्रथमच लिहिलं गेलं आहे. अगदी आजपर्यंत जेरुसलेमच्या इतिहासात ही ओढ जाणवते. आयझेयाने केवळ ज्यू धर्मालाच नव्हे, तर ख्रिश्चन धर्मालाही आकार दिला. येशू ख्रिस्ताने आयझेयाचा अभ्यास केला होता आणि येशूची शिकवण- मंदिराचा विध्वंस आणि जेरुसलेमची शाश्वत आध्यात्मिक संकल्पना ते तळागाळातल्यांचा कैवार - याच काव्यात्म दृष्टीतून आली आहे. स्वतः येशूकडे आवझेयाने भाकीत केलेला इमॅन्युएल म्हणून पाहिलं गेलं.

राजा आहाझ दमास्कसला गेला आणि त्याने तिग्लाथ्पिलेसरला लवून कुर्निसात केला. परतताना त्याच्यापाशी मंदिरात ठेवण्यासाठी असिरियन पद्धतीचा देव्हारा होता. ज्या वेळी तिग्लाथ्पिलेसर हा राजा इसवी सन पूर्व ७२७ साली मरण पावला त्या वेळी इस्राइल राज्याने उठाव केला, पण असिरियाचा नवा राजा दुसरा सार्गोन याने इस्राइलची राजधानी समारियाला तीन वर्ष वेढा घातला आणि सारं इस्राइलच गिळंकृत केलं. तिथल्या २७,००० लोकांना त्याने असिरियात पाठवून दिलं. या सगळ्या धुमश्चक्रीत इस्राइल या उत्तरेच्या राज्यातल्या बारापैकी एकूण दहा टोळ्या इतिहासातून जवळजवळ नामशेषच झाल्या.

सध्याचे ज्यू लोक उरलेल्या दोन जमातींचे वंशज आहेत. ते ज्यूडाच्या राज्याचे नागरिक या नात्याने जगले. आयझेयाने इमॅन्युएल म्हणून संबोधलेलं मूल म्हणजे राजा हेझेकिया होता. तो प्रेषित नव्हता, तरीही त्याच्याकडे राजकारणासाठी आवश्यक असलेल्या गुणांपैकी सगळ्यात मौल्यवान गुण होता- नशीब! त्याने उभारलेल्या जेरुसलेमचे थोडे थोडे पुरावे अजूनही मिळतात.

असिरियाविरुद्ध बंड करण्यासाठी राजा हेझेकियाने वीस वर्षं वाट पाहिली. प्रथम त्याने मंदिरातल्या मूर्त्या नष्ट केल्या, मंदिरातली कास्य धातूची सर्पमूर्ती तोडली, आणि प्रजेला पासोवर सण साजरा करण्याची आज्ञा दिली. त्याच्या लोकांनी साजरी केलेली पासोवर सणाची ती सुरुवातीच्या काळातली आवृत्ती होती. तेव्हा जेरुसलेम प्रथमच पश्चिमेकडच्या डोंगरावर पसरू लागलं होतं. उत्तरेकडच्या इस्राइल राज्याचा नि:पात झाल्याने जेरुसेलम शहर निर्वासितांनी भरून गेलं. बहुधा त्या निर्वासितांनी त्यांची प्राचीन पोथ्यापुस्तकं सोबत आणली असावीत. त्यात इस्राइलचा पुरातन इतिहास आणि आख्यायिका समाविष्ट असाव्यात. त्याच काळात जेरुसलेममधल्या विद्वानांनी ज्यूडाच्या परंपरा, चालीरीती आणि उत्तरेकडच्या जमातींच्या इस्राइली परंपरा आणि चालीरितींचं एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया चालू केली. त्याच सुमारास ग्रीक लोक होमरचं 'इलियड' हे महाकाव्य लिहून ठेवत होते. याच पोथ्यापुस्तकांमधून पुढे बायबलची निर्मिती झाली.

- oOo -

पुस्तक: जेरुसलेम: एक चरित्रकथा
लेखक: सायमन सीबग माँटफिअरी
अनुवाद: सविता दामले
प्रकाशक: डायमंड पब्लिकेशन्स
आवृत्ती पहिली.
वर्ष: २०१४.
पृ. ७७-८१.

टीपा:
१. इराण आणि इराकमध्ये राहणारे पुरातन ज्यू लोक त्या दहा जमातींचे वंशज असल्याचा दावा करतात त्या जमातींना अगोदर असिरियन लोकांनी आणि नंतर बॅबिलॉनी लोकांनीसुद्धा त्यांच्या मातृभूमीतून विस्थापित केलं. अलीकडेच झालेल्या जनुकीय संशोधनानुसार हे ज्यू लोक खरोखरच इतर ज्यू जमातीपासून २,५०० वर्षांपूर्वी विलग झाले असल्याचं सिद्ध झालं आहे. तरीसुद्धा गायब झालेल्या या इस्राइली जमातींना शोधण्याच्या अनावर ओढीने हजारो काल्पनिक कथांना आणि सिद्धान्ताना जन्म दिलेला आहे. या दहा जमाती अगदी अशक्य वाटणाऱ्या ठिकाणीसुद्धा 'सापडल्या' आहेत त्यामुळे त्यांत उत्तर अमेरिकेतले मूळचे आदिवासी आणि इंग्रज यांचासुद्धा समावेश झाला आहे.

२. डेव्हिडच्या शहराची तटबंदी आणि मंदिराची टेकडी यांच्या बाहेरच्या परिसरात नवीन उपनगर विस्तारली होती. मोरिया पर्वत आणि पश्चिमेची टेकडी यांच्या मध्ये असलेल्या टायरोपाएन दरीत माख्तेश हे उपनगर बसलं होतं, तर मित्रेश हे उपनगर पश्चिम टेकडीवरच वसलं होतं. आज तिथे ज्यू वस्ती आहे. त्या वेळी शहराच्या भोवताली थडगी बांधून त्यात मोठमोठ्या अधिकाऱ्यांचं मरणोत्तर दफन करत असत: 'या थडग्यांत राजाच्या (...) याहू नावाच्या राजदरबारातल्या साहाय्यकाला पुरण्यात आलं आहे.’ सिल्वान गावातल्या एका थडग्यावर असं लिहिलं आहे 'इथे सोनं, चांदी वगैरे काही नाही. फक्त त्याची आणि त्याच्या गुलाम पत्नीची हाडं आहेत जो कुणी हे थडगं उघडेल त्याला शाप लागेल.' पण त्या शापाचा काहीही परिणाम झाला नाही, ते थडगं लुटण्यात आलं. तिथे आजच्या घडीला कोंबड्याचं एक खुराडं आहे, पण प्रत्यक्षात हा राजसेवक हेझेकियाच्या दरबारातला असावा त्याने स्वतः साठी खूपच भव्य कबर बांधून ठेवली होती, म्हणून आयझेयाने त्याच्यावर टीका केली होती. त्या माणसाचं नाव बहुधा शेब्नायाहू असावं.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : जेरुसलेम: एक चरित्रकथा >>
---


हे वाचले का?

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२

पांढरपेशांच्या Quicksand Pit ची गोष्ट

काही वर्षांपूर्वी 'चाहूल' नावाचे एक नाटक आले होते. साहेबाने प्रमोशनच्या बदल्यात बायकोला आपल्याकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. प्रथम संताप, हताशा, नंतर स्वार्थलोलुप शरणागती या मार्गाने पतीची झालेली अधोगती आणि त्याच्या स्वार्थात मिसळलेला स्वार्थ जाणून पत्नीचीही त्या प्रस्तावाकडे होत जाणारी वाटचाल असा काहीसा प्रवास त्यात उलगडत जातो.

अलिकडेच 'रेगे' नावाचा एक मराठी चित्रपट आला होता. सुखवस्तू मध्यमवर्गीय अथवा उच्च-मध्यमवर्गीय घरातील दुबळ्या मनाच्या व्यक्तींना - विशेषत: तरुणांना - बाहुबलाचे असणारे आकर्षण (एक प्रकारचा स्टॉकहोम सिंड्रोम), त्या बाहुबलाने आपल्या अडचणी चुटकीसरशी सुटल्याने त्यावर बसलेली श्रद्धा आणि त्याची किंमत म्हणून त्या जाळ्यात कोळ्याच्या भक्ष्यासारखे फसत जाणॆ सुरेख मांडले होते. कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्यासमोर तो एकच शत्रू, शासक आणि भक्षक असतो, पण या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीला तो बाहुबली, त्याचे स्पर्धक आणि त्या दोघांचे सामायिक, मुख्य शत्रू - आणि त्या चित्रपटापुरते बोलायचे तर त्यांच्याच पातळीवरची - पोलिस यंत्रणा असे अनेक शत्रू निर्माण होतात. इच्छा असो अगर नसो, त्यांना सामोरे जावे लागते.

तीन चार वर्षांपूर्वी आपल्याकडे मोठ्या मूल्यांच्या नोटा रद्दबातल करण्याचा व्यापक आर्थिक, व्यावसायिक आणि (अन्यही) परिणाम घडवणारा निर्णय शासनाने घेतला होता. त्यातून काळा पैसा बाहेर येईल अशी ग्वाही सरकार आणि सरकार समर्थक देत होते. यात काळा पैसा हा रोकड स्वरूपात साठवून ठेवला जातो असा ठाम समज दिसत होता...

हे तीन परिच्छेद वाचल्यावर ’अरे बाबा, पण या तीनही गोष्टींचा परस्परांशी संबंध काय?’ असा प्रश्न बहुतेकांच्या मनात नक्की उमटला असणार. पण थांबा, या तिघांसोबत आणखी एक चौथा लिहितो आणि मग मुद्द्यावर येतो.

अलीकडेच ’ब्रेकिंग बॅड’ नावाच्या एका मालिकेबाबत बराच बोलबाला झाला आहे. एक तथाकथित पांढरपेशी व्यक्ती, एका दुर्धर आजाराने ग्रासलेली; ’केवळ कुटुंबियांच्या भावी आयुष्याची तरतूद करण्यासाठी’ आपल्या वैज्ञानिक ज्ञानाचा गैरवापर करुन अंमली पदार्थांचे उत्पादन, व्यवसाय करते. त्यासाठी त्याच्या सामाजिक स्तरात कल्पनाही केली जाणार नाही अशा पातळीवरचे गुन्हे करत जाते.

’केवळ कुटुंबासाठी’ म्हटल्यावर मला हटकून माझ्या आसपासचे अनेक बाप आठवतात. त्यांना पैसे मिळवण्याचा कैफ असतो. यशाची धुंदी हवी असते. विविध प्रकारच्या - समाजात मिरवता येतील अशा - जड वस्तूंचा संग्रह करण्याची लालसा असते. त्यासाठी ते कुटुंबियांकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. पण हे सारे करताना, ’हे सगळं कुणासाठी करतो आहे, तुमच्यासाठीच ना?’ असे विचारण्याचा शहाजोगपणाही त्यांच्याकडे असतो.

’ब्रेकिंग बॅड’मधील वॉल्टर मला असाच स्वार्थाला परमार्थाचे रूप देणारा वाटला. गुन्हेगारी मानसिकता, निर्ढावलेपण ही त्याच्यात मुळातच आहे. जगण्याच्या शर्यतीत मागे पडल्याने या ना त्या मार्गाने स्वत:ला सिद्ध करण्याची, यशाने नाही निदान पैशाने तरी सध्या पुढे गेलेल्यांना मागे टाकता येईल या ईर्षेनेच तो सारी नैतिकता गुंडाळून त्यात उतरलेला आहे.

पांढरपेशा समाजात असलेले muscle power (बाहुबल), money power (द्रव्यबळ) आणि अर्थातच political power (राजकीय बळ) या तीन सत्तांबाबत असलेले सुप्त आकर्षण हा एक रोचक मुद्दा आहे. एकाच वेळी ते आकर्षण आणि त्याच वेळी उघडपणे त्यांचा केलेला धिक्कार किंवा त्यांतील ढासळत्या मूल्यांबद्दल केलेला गजर, पण स्वहिताचा मुद्दा येताच अघोषितपणे, वैयक्तिक पातळीवर तडजोड करत त्यांना शरण जाणे- किंवा त्या व्यवस्थेचा भाग होत जाणे हे एकुण पांढरपेशा समाजाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. यांना एकाच वेळी नैतिकतेचा झेंडा मिरवायचा असतो आणि त्याचवेळी त्या नैतिकतेला धाब्यावर बसून मिळणारे फायदेही पदरी पाडून घ्यायचे असतात. त्यातून एक दांभिक रसायन तयार होते आणि ते त्या समाजाचा चेहरा होऊन राहते.

अलीकडे नेटफ्लिक्स’वर ओझार्क नावाची एक मालिका पाहण्यात आली आणि हे सारे आठवत गेले.

Scratch, wampum, dough, sugar, clams, loot, bills, bones, bread, bucks... money! That which separate the 'haves' from 'have nots'.

But what is money? It's everything if you don't have it, right? Half of all American adults have more credit card debt that savings. 25% have no savings at all. And only 15% of the population is on track to fund even one year of retirement. Suggesting what? That middle-class is evaporating? Or the American dream is dead? You won't be sitting there, listening to me, if the latter were true.

You see, I think most people just have a fundamentally flawed view of money! Is it simply agreed upon unit of exchange for goods and services? $3.70 per gallon of milk? Thirty bucks to cut your grass? Or is it an intangible? Security or happiness... peace of mind? Let me propose a third option. Money as a measuring device!

You see, the hard reality is how much money we accumulate in life is not a function of who's the president, or the economy, or bubbles bursting. Or bad breaks or losses. It's about the American work ethic. That one that made us the greatest country on the Earth. It's about bucking the media's opinion as to what constitutes a good parent. Deciding to miss the ball game, the play, the concert, because you have resolved to work and invest in your family's future. And taking responsibility for the consequences of those actions. Patience! Frugality! Sacrifice! When you boil it down, what do these things have in common? Those are choices!

Money is not peace of mind. Money is not happiness. Money is, at its essence... that measure of a man's choices!

वर जोडलेला व्हिडिओ ’ओझार्क’च्या पहिल्याच भागाची सुरुवात आहे. पैसा म्हणजे काय याचे सुरेख विवेचन त्यात केले आहे. But what is money? It's everything if you don't have it, right? हे बहुसंख्येच्या मनात पुरेपूर ठसलेले असते. आणि म्हणून जिवंत असेतो, मिळेल तितका, साधेल त्या मार्गाने पैसा मिळवत राहणे हे बहुतेकांचे साध्य होऊन बसते. पण या विवेचनाच्या अखेरीस येणारे वाक्य- "Money is not peace of mind. Money is not happiness. Money is, at its essence... that measure of a man's choices!" हेच माझ्या मते पैसा या संकल्पनेचे वास्तविक मूल्य आहे.

पण आपल्याला त्याचे आकलन होत नसते. झाले तरी त्याला नजरेआड करण्याकडेच बहुसंख्येचा कल असतो. आपण केलेली निवड, घेतलेले निर्णय यांचे दृश्य फलित म्हणजे मिळवलेला पैसा. पण तो निव्वळ पदरी पडला म्हणजे केलेली निवड, घेतलेले निर्णय योग्य वा वाजवी ठरले असे असते का? त्या निर्णयांची फलश्रुती अशी एकरंगी असते का? या प्रश्नांच्या उत्तरांना सामोरे जाणे आवश्यक असते. अनेकदा अप्रिय उत्तरे समोर ठेवणार्‍या या प्रश्नांकडे कानाडोळा करणे बहुसंख्य लोक पसंत करतात. पण कोंबडं झाकल्याने उजाडायचे राहात नाही तसे तुमच्या निर्णयातून निर्माण झालेली परिस्थिती, झालेले आनुषंगिक परिणाम वास्तवाचा भाग होत जात असतात. त्यापासून पळ काढणे बहुतेकांना शक्य होत नसते.

Ozark

तसे पाहिले तर 'ओझार्क' ही एक गुन्हेगार कथा आहे. गुन्हेगारी जगाची कथा म्हणजे सूडाचा प्रवास अथवा ’थेट कृती’चा वापर करुन लढवलेली स्पर्धा, प्रतिस्पर्ध्याला हिंसेचा वापर करुन नामोहरम करण्याचे, आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या गोष्टी असतात असा- हिंदी चित्रपट पाहून झालेला, समज असतो. जोडीला रोमान्स, फितुरी असली की मामला अधिक सेलेबल होतो.

समीक्षकांकडूनही थोड्या दखलीची अपेक्षा असेल तर कुठलेतरी शेक्स्पिअरचे नाटक पकडून त्याचे कथानक अंडरवर्ल्डमध्ये बसवून दिले की सगळेच समाधानी होतात. सदैव अतिसामान्य, विचारशून्य प्रेक्षक समोर ठेवून भांडवली मानसिकतेने चित्रपट आणि मालिकांचे रतीब आपल्याकडे घातलेले दिसतात. लिखित साहित्याचेही फार वेगळे नाही, त्यांची चलनी नाणी थोडी वेगळी आहेत इतकेच.

पण गुन्हेगारी जगाची कथा ही बौद्धिक डावपेचाची, अर्थकारणाची, व्यापार-उदिमाचे जग कवेत घेणारी असू शकते हे फारसे अपेक्षित नाही. त्यात राजकारण आले तरी केवळ भ्रष्ट राजकारण्यांच्या रूपात येते. धोरणात्मक डावपेच, त्यांचे कथानकात स्थान वगैरे तर विसराच.

’ओझार्क’ने एखाद्या पारंपरिक गुन्हेगार कथेच्या धाटणीपेक्षा थोडा वेगळा मार्ग निवडला आहे. पहिले म्हणजे ते गुन्हेगारीचे जग एका कुटुंबाला - ब्रेकिंग बॅड’ प्रमाणे केवळ कुटुंबप्रमुखाला नव्हे! - केंद्रस्थानी ठेवून पाहिले आहे. दुसरे, दैववादी दृष्टीकोन नाकारुन जगातील प्रत्येक घटिते, बदल हे आपल्या निर्णयांचे, पर्याय-निवडीचे फलित असते या मुद्द्यावर त्यात भर आहे. महत्त्वाचे म्हणजे निर्णय एकेकट्याचे असतात, तसेच काही जणांनी मिळून घेतलेले असतात. या सार्‍या निर्णयांचा परस्परांना छेद जातो, त्यांचे संमीलन होते, तेव्हा त्यातून घटिताची दिशा निश्चित होते. कथानकाच्या सुरुवातीला निवेदनरूपात आलेला, वर समाविष्ट केलेला ’पूर्वरंग’ पुढे पदोपदी प्रत्यय यावा इतका बिनचूक बसवला आहे. यात चलन, पैसा म्हणजे पर्याय-निवडीचे मोजमाप असते अशी व्याख्या केलेली आहे.

मार्टिन ऊर्फ ’मार्टी’ बऽर्ड हा आपल्या मित्रासोबत एक गुंतवणूक सल्लागार कंपनी चालवतो आहे. गुंतवणुकीचे विविध मार्ग, त्यातले चढ उतार, डावपेच, तो जाणून आहे. एका टप्प्यावर त्याच्या पार्टनरकडून नव्या गुंतवणुकीचा प्रस्ताव येतो. संभाव्य गुंतवणुकीचा आकडा पाहून मित्र हुरळून जातो. पण मार्टी मात्र त्यांच्या सार्‍या बॅलन्सशीट आणि गुंतवणुकीची पुरी माहिती घेतल्याखेरीज त्यांचे अकाउंट स्वीकारण्यास तयार नाही. त्याचा अभ्यास केल्यावर या गुंतवणूकदाराचा दाखवायचा व्यवसाय आणि प्रत्यक्श व्यवसायात फरक आहे आणि त्यांचे आर्थिक नियोजन ढिसाळ तसंच अनेक ठिकाणी संशयास्पद आहे असे त्याला दिसते. त्यावरुन हा प्रचंड गुंतवणुकीचा प्रस्ताव तो नाकारतो. मित्र अवाक् होतो.

पण मार्टीचा निर्णय अचूक असतो. हा प्रस्ताव घेऊन येणारा एका प्रसिद्ध ड्रग कार्टेलचा प्रतिनिधी आहे. मार्टीच्या ज्ञानाने आणि चिकाटीने तो प्रभावित झाला आहे. तो त्याचा पिच्छा सोडत नाही. यातून मिळणार्‍या प्रचंड पैशाचे आमिष समोर ठेवून तो विविध प्रकारे त्याला पटवू पाहतो. अखेर मार्टीही हुरळतो. तो प्रस्ताव त्याच्या पत्नीसमोर ठेवतानाही तो ’आपण तो अर्थातच नाकारला’ इथपासून सुरुवात करत, ’पण काय हरकत आहे.’ पर्यंत पोचतो. पत्नीही प्रथम दचकली तरी हळूहळू तिचेही मत अनुकूल होत जाते.

’शेवटी आपण काय फक्त त्यांचे पैसेच तर हाताळणार आहोत. त्यांच्या गुन्हेगारी विश्वाशी आपले काय देणेघेणे असणार नाही.’, ’एकदम इतके पैसे येतील की आयुष्याची ददात मिटेल.’, ’थोडे वर्षे केले तरी आपल्या गरजा भागवून उरतील इतके पैसे मिळतील.’ अशी ’चार वर्षे अमेरिकेत पैसे मिळवून भारतात परतू’, ’पुढील सात पिढ्या बसून खातील.’ वगैरे प्रचलित तर्कांच्या धर्तीचे तर्क देत दोघेही अखेर त्या चिखलात पहिले पाऊल टाकण्यास तयार होतात. व्यापक, जड, वास्तविक फायद्यासाठी नैतिकतेची पहिली पायरी उतरण्याचा पर्याय ते निवडतात... ’चाहूल’ मधल्या जोडप्याप्रमाणॆ.

Marty

मार्टीचे काम आहे ते ड्रम कार्टेलचा पैसा अधिकृत करण्याचे, ज्याला ’क्लीन करणे’ असे म्हटले जाते. हा रोकड स्वरूपात येणारा काळा पैसा विविध कायदेशीर व्यवसायांमधील गुंतवणुकींच्या माध्यमातून कायदेशीर करणे ही मार्टीची जबाबदारी आहे. ते जाळे त्याने विणले की अंमली पदार्थांच्या विक्रीतून कार्टेलने मिळवलेला पैसा निश्चिंतपणॆ, उघडपणे वापरु शकते. 

'काळा पैसा हा रोकड रूपात कुठेतरी साठवून ठेवलेला असतो' अशा भाबड्या समजात जगणार्‍यांनी या कारणासाठी ओझार्क अवश्य पाहावी. बेकायदेशीर, गुन्हेगारी व्यवसायाचा आधारवड हा असा त्यांच्या पैशाचे ’शुद्धिकरण’ करणारा पांढरपेशा वर्गच असतो, हे 'केवळ दांडगी शारीर-प्रकृती असलेला, दाढी वाढवलेला किंवा हातात कडे घातलेला कुणीही गुंड असतो, समाजविघातक असतो' असे समजणार्‍या भेकड सुखवस्तूंना समजू शकेल.

त्याअर्थी मार्टी आणि मार्टीसारखे लोक हे समाजाच्या दृष्टीने प्रत्यक्ष गुन्हेगारांपेक्षा मोठे गुन्हेगार मानायला हवेत. कारण ते त्या गुन्हेगारी यंत्रणेला एका व्यवस्थेत रूपांतरित करतात, स्थैर्य देतात. गुन्हेगारांना समाजात उजळ माथ्याने मिरवता येईल याची सोय करून देतात. आणि ही व्यवस्था उभी करताना ते पर्यटन स्थळांची सारी अर्थव्यवस्था - ज्यात कसिनो, बार, स्ट्रिप क्लब, वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थ वितरण यांच्यासह तथाकथित सभ्य माणसांच्या जगातील धर्मस्थळे, त्याच्याशी निगडित पुरवठा, निवास आदि व्यवस्था (ज्यातून धर्मस्थळ हे खरे तर पर्यटन स्थळ म्हणूनच विकसित केले जाते), तसंच खेळ, चित्रपटादी करमणुकीचे क्षेत्र यांनाही जाळ्यात आणून सोडतात. ही संघटित गुन्हेगारी अखेर सर्वसामान्यांच्या जगण्याची अप्रत्यक्ष नियंत्रक व्यवस्था होऊन बसते...

...आणि हे घडवून आणणार्‍या मार्टीकडे मात्र आपण कुटुंबवत्सल माणूस म्हणून पाहतो. कळत-नकळत त्याच्यासमोर आलेल्या अडचणींनी, त्याच्यावर येणार्‍या संकटांनी अस्वस्थ होतो, त्यांचे निवारण झाले की सुटकेचा निश्वास सोडतो. त्याने निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे पॅस्टर मेसन सारख्या सहृदयी व्यक्तीच्या आयुष्याची होणारी धूळदाण नजरेआड करतो, केवळ अपरिहार्य घटित (collateral damage) म्हणून सोडून देतो... आपल्यातही एक मार्टी दडून असल्याचेच ते लक्षण असते.

आजवर आपण पाहिलेल्या बव्हंशी गुन्हेगारी कथांमध्ये आणि ’ओझार्क’मध्ये एक फरक आहे. यातील कथानक हे एका कुटुंबाच्या प्रवासाची कहाणी म्हणून, त्याला केंद्र मानून मांडलेले असल्याने प्रेक्षक त्या कुटुंबाच्या नजरेनेच ते पाहतो आहे. त्यांच्या सुखदु:खाच्या संदर्भातच इतर सर्व गोष्टींचे, घटनांचे मूल्यमापन करतो आहे.

मार्टीने पैसे जिरवण्यासाठी निवडलेल्या ओझार्कचा इतिहासही रोचक आहे. १९२८ च्या जागतिक मंदीच्या काळात युनिअन इलेक्ट्रिक कंपनीने बांधलेल्या धरणामुळे ओझार्कमधील ते विशाल तळे तयार झाले आहे. मालिकेत असा उल्लेख आहे की रोजगार निर्मितीसाठी (आपल्याकडील रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर) बांधले गेले. थोडक्यात पैसा निर्माण करण्यासाठीच त्याची निर्मिती झाली. मार्टी आपल्या धन्याचा पैसा मुरवायला याच तळ्याभोवतीच्या अर्थव्यवस्थेचा वापर करतो आहे, ही संगती उल्लेखनीय आहे.

त्याचबरोबर पर्यटन स्थळी अंमली पदार्थ विक्रीचे मोठे जाळे (racket) असणे ओघाने आलेच. त्यामुळे ज्या ड्रग माफियांचा पैसा तिथे जिरतो आहे, त्यांचे स्थानिक स्पर्धकही तिथे आहेत. एका बाजूचा पैसा जिरवण्याचे उपाय शोधता शोधात मार्टी एक एक करुन इतर बेकायदेशीर, धोकादायक, अति-महत्त्वाकांक्षी आणि बेमुर्वत अशा व्यावसायिकांच्या जाळ्यातही गुरफटत जातो आहे. एक प्रश्न सोडवण्यासाठी शोधलेला उपाय त्याच्यासाठी नवी समस्या घेऊन येतो आहे. सुरुवातीच्या काळात, त्याने घेतलेल्या प्रत्येक निर्णयापाठी एक मृत्यू घडतो आहे. त्याला मार्टी थेट जबाबदार नसला तरी त्यांच्या तपासाचा माग पुन्हा पुन्हा त्याच्यापाशी येऊन भिडतो आहे. गुन्हेगारीचे जाळे त्याच्याभोवती एक एक फास टाकत त्याला जखडू लागते आहे.

अंमली पदार्थाचा व्यापार म्हणजे अर्थातच गुन्हेगारी, हिंसा, हत्या हे ओघाने आलेच. पण वर म्हटले तसे हिंसा अथवा हत्या एकरंगी असते असे मात्र नाही. केवळ वर्चस्वाची लढाई म्हणून वा शत्रूचा काटा काढण्यासाठीच हत्या होतात असे मुळीच नाही. हत्यांमध्ये क्षणिक क्षोभातून होणारी हत्या (डार्लिन’ने केलेली ’डेल’ची हत्या), आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी अपरिचिताची केलेली हत्या (’बडी’ने केलेली हत्या), कुणाचा परिचिताचा जीव वाचवण्यासाठी किंवा आपल्या स्वार्थाआड येऊ नये म्हणून जवळच्या व्यक्तीची केलेली हत्या (रूथने रस आणि बॉयडची केलेली हत्या) फसवणुकीचे प्रायश्चित्त म्हणून केलेली हत्या (ब्रूसची डेलने केलेली हत्या), एखाद्या निरपराध्याची केवळ तिसर्‍याच व्यक्तीवर दबाव टाकण्यासाठी केलेली हत्या (ब्रूसच्या गर्लफ्रेंडची डेल ने केलेली हत्या), त्याच प्रकारे हत्येचा मागमूस न ठेवता केलेली निरपराध व्यक्तीची हत्या (मेसनच्या पत्नीची स्नेल पती-पत्नींकरवी केली गेलेली अध्याहृत हत्या), आपल्याला हवी ती माहिती अनधिकाराने मागणी केल्याने न देणार्‍या सामान्य व्यक्तीची सहज केलेली हत्या (अ‍ॅटर्नीने डेलच्या खुनाच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजसाठी केलेली हत्या), आपल्या स्वार्थाला धक्का देणारे कृत्य - दुसर्‍या दबावाने, नाईलाजाने - केल्याबद्दल साथीदाराला दिलेले शासन (स्नेल कुटुंबाने स्ट्रिप-क्लब मालकाची केलेली हत्या) आणि परिस्थितीवश, अपघाताने घडलेली हत्या (मेसनचा मृत्यू) असे विविध हेतू दिसून येतात. हत्या हा सर्वात सोपा निवाडा आहे अशीच त्या जगाची शाळा शिकवते आहे. 'आपण फक्त पैशाचे व्यवहार करणार' म्हणणारा मार्टीच नव्हे तर त्याचे पुरे कुटुंबच त्या यंत्रणेच्या जाळ्यात रुतत जाते, त्यातले काही धागे स्वत:ही विणत जाते. एका टप्प्यावर अनाहुतपणे त्याच्याही हातून हत्या होते, तेव्हाच त्याच्या चेहर्‍यावर पस्ताव्याची पहिली खूण दिसते.

हत्यांच्या विविध जातकुळींप्रमाणॆ विविध जातकुळींचे गुन्हेगार आपल्याला भेटत राहतात. अध्याहृत, समोर न येणारा ड्रग लॉर्ड, त्याच्या व्यवहाराचा चेहरा असलेला डेल, गुन्हेगारीची ओल अंगाला लावून बाहेर आलेला बडी, व्यवसायवृद्धीऐवजी केवळ दहशतीवर खंडणीखोराच्या पातळीवर जगणारा कॉसग्रोव्ह हा त्याचा जुना मित्र, स्थानिक पातळीवर हेरॉईनचे उत्पादन आणि वितरण करणारे स्नेल दांपत्य, ड्रग लॉर्ड्च्या सार्‍या साम्राज्याला कायद्याच्या कचाट्यापासून दूर ठेवणारी त्याची अ‍ॅटर्नी (ही स्त्री आहे हा एक विशेष नोंदवून ठेवण्याजोगा मुद्दा), आणि त्याच्या पैशाला कायदेशीर चलनाच्या स्वरुपात मुरवणारा मार्टी. हे शेवटचे दोघे अस्सल अट्टल पांढरपेशे गुन्हेगार. यांच्याबरोबरच स्थानिक पातळीवर फुटकळ गुन्ह्यांबद्दल कुप्रसिद्ध असलेले लॅंगमोर कुटुंबिय. त्यात तुरुंगात असलेला केड आणि बापाच्या अनुपस्थितीत दोन काका आणि दोन पुतणे यांच्या कुटुंबाची विशीच्या आतच पोशिंदी होऊन बसलेली रूथ हे ही आहेत.

RuthLangmore

मार्टी हा पांढरपेशा जगातला, वैयक्तिक फायद्यासाठी त्याने गुन्हेगारी जगाची साथ धरली आहे. रूथचे नेमके उलट आहे. बौद्धिक बाजूचा पूर्ण अभाव असलेल्या कुटुंबात, गुन्हेगारी जगातच लहानाची मोठी झालेली रूथ मार्टीचे बोट धरून त्यातून बाहेर पडण्याची, पांढरपेशा जगात पाऊल टाकण्याची उमेद बाळगून आहे.

या मुलीचे व्यक्तिमत्व अतिशय गुंतागुंतीचे आहे. एका बाजूने ती केड लँगमोर या किरकोळ पण अस्सल दक्षिणी माज असलेल्या आपल्या बापाची मुलगी असल्याने अनेक लहान-मोठे गुन्हे तिच्यावर नोंदवले गेले आहेत. त्या परिसरात तिची ओळख गुन्हेगार म्हणूनच आहे. मार्टी प्रथम नाईलाजाने आणि नंतर तिच्या कामाच्या झपाट्याने तिच्यावर विसंबू लागतो, तेव्हा रूथही थोडी त्याच्यात गुंतत जाते. त्याच्यात आपल्या बापाला पाहू लागते.

तिचे बापाबद्दलचे नातेही काहीसे व्यामिश्र आहे. कदाचित लहानपणी ’माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट’ म्हणणार्‍या बालकाची ती वय वाढलेली आवृत्ती आहे. ती बेगुमान जगणार्‍या बापाकडे एक रोल मॉडेल म्हणून नकळत पाहते आहे. त्याला तुरुंगात भेटायला जाताना आवर्जून मेकप करुन जाणार्‍या रूथच्या त्या आकर्षणात हलकासा जांभळा रंगही मिसळला आहे.

फुटकळ गुन्हेगारी करणार्‍या बापाहून अधिक बुद्धिमान, अधिक मोठी कामे पार पाडणारा, अनेक बड्या प्लेअर्सना सांभाळत व्यावसायिक वाटचाल करणारा मार्टी तिला अधिक ’बापमाणूस’ वाटू लागला आहे. त्याचबरोबर तिला गुन्हेगारी शिक्का पुसून एक समाजमान्य रोजगार करण्याची संधी त्याच्यामुळेच मिळाली आहे. आपल्या सद्य जीवनातल्या खातेर्‍यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग तिला त्याच्या रूपाने दिसतो आहे.

प्रथम मार्टीची हत्या करुन त्याचे पैसे लुटण्याचा प्लान करणारी रूथ नंतर त्यामुळेच त्याच्या हत्त्येचा कट करणार्‍या तिच्या दोन्ही काकांचा काटा निष्ठुरपणे दूर करताना दिसते. तर दुसरीकडे आपल्या चुलत भावंडानाही आपल्या सोबतच या भणंग आयुष्यातून बाहेर काढण्याची तिची इच्छा आहे. त्यासाठी तिला मार्टीच्या मदतीची गरज आहे.

असे असले तरी ’मूळ स्वभाव जाईना’ या उक्तीनुसार ती कुवतीपेक्षा खूप मोठी उडी घेण्याचा प्रयत्न करते आहे, अवास्तव मागणी करते आहे. मार्टीकडून ती मान्य केली न गेल्याने नाराज होते आहे. एकाच वेळी अत्यंत खुनशी, बेडर, निर्ढावलेली ही मुलगी आई-बापांच्या छत्राविना वाढल्याने आणि दोन नालायक काकांमुळे अकाली जबाबदारी अंगावर पडल्याने तशी झाली, की तिच्या गुणसूत्रांतून आलेल्या वारशामुळे हे सांगणे अवघड आहे.

पण मार्टीला ठार मारण्यास गेलेल्या दोनही काकांचा निष्ठुरपणे मृत्यू घडवून आणल्यानंतर मार्टीच्या सहवासात ती कोसळते. त्याचे बरेवाईट झाले असते या कल्पनेने तिचा थरकाप होतो. एका परक्या व्यक्तीबाबत ही भावना आणि रक्ताच्या नात्यांतील सर्वात जवळच्या व्यक्तींचा सहज खून करणे अशा परस्परविरोधी गुणावगुणांचा तिच्यामध्ये संचय झालेला आहे.

आपल्याकडे लालसेने, लैंगिक आसक्तीने पाहणार्‍या आजोबाच्या वयाच्या म्हातार्‍याला थेट धडा शिकवण्याचे धाडस, तो बेगुमानपणा तिच्यात आहे; त्याचवेळी घरातील थोडीफार बुद्धी असलेल्या चुलत भावाकडून तिला कर्तृत्वाची अपेक्षा आहे. बापाच्या मृत्यूनंतर बेफिकिर, कडवट बनलेल्या त्याला पाहून तिच्या पोटात कालवाकालव होते. तिला त्याने शिकून मोठे व्हावे नि या खातेर्‍यातून बाहेर पडावे, असे मनापासून वाटते आहे. त्यासाठीच ती मार्टीच्या सहाय्याने आपली आर्थिक स्थिती भक्कम बनवून त्याच्या शिक्षणाची सोय करण्याची धडपड करते आहे... जेमतेम एकोणीस वर्षाच्या या पोरीच्या आयुष्याचा हा सारा गुंता आपलाही जीव घुसमटून टाकणारा आहे.

पण हे दोघे जरी प्रामुख्याने समोर येत असले तरी आधी म्हटल्याप्रमाणॆ या सार्‍या कथानचा केंद्रबिंदू आहे ते मार्टीचे कुटुंब. त्याच्या पत्नीच्या मार्टीसोबतच होणार्‍या नैतिकतेच्या स्खलनाचा उल्लेख वर आला आहेच. ’रेगे’मध्ये पाहिले तसे केवळ पाण्यात एक बुडी मारून बाहेर यावे असे समजणारा अनिरुद्ध रेगे आपण पाण्यात नाही तर Quicksand Pit मध्ये पाऊल टाकले आहे याचा अनुभव घेतो तसेच मार्टीच्या पत्नीचेही होते. रेगेच्या मृत्यूने त्याची ’सुटका’ लवकर होते, पण वेंडी मात्र हळूहळू त्यात रुतत जाते, सक्रीय सहभाग घेऊ लागते... निर्ढावते!

अशा स्थितीत मुलांपासून हे सारे दडवणॆ अर्थातच अशक्य होत जाते. शिकागो सारख्या महानगरातून ओझार्कसारख्या मोसमी व्यावसायिक आणि म्हणून अतिशय कमी वस्तीच्या दक्षिणी(!) गावात बंदुकांची मालकी अपरिहार्य. आणि मुलांना तिचे आकर्षणही सार्वत्रिकच. मुलींना बार्बी नि मुलांना खेळण्यातील बंदूक भेट देणे हा अगदी भारतासारख्या देशातही अलिखित नियम. या आकर्षणातून मार्टीच्या मुलाचा, जोनाचा, खर्‍या बंदुकीपर्यंतचा प्रवास ओघाने आलाच.

पण शिकारीमध्ये पहिले हरीण ठार मारल्यावर काहीशा संवेदनशील वयातला तो आयुष्यातल्या पहिल्या संभ्रमाचा सामना करतो आहे. एका क्षणी घरात घुसलेल्या पुंडावर बंदूक रोखलेल्या त्याला त्याच्या आईने त्याला हल्ला करणार्‍याला शूट करण्याची नजरेनेच केलेली खूण त्याला आठवते. अशा दोन प्रकारे हत्येचे समर्थन होऊ शकते, नव्हे ’खोटे कधी बोलू नये’ सांगणारी आईच एका प्रसंगात त्याला तसे सुचवते, याची अगदी लहान वयात झालेली जाणीव त्याला हादरवून सोडते आहे

पण असे असतानाही, आर्थिक गैरव्यवहार करणार्‍या बापाच्या पावलावर पाऊल टाकत चोरलेले पाच हजार डॉलर शेल कंपन्यांच्या आडून तो अगदी सराईतपणे जिरवतो आहे. इतकेच नव्हे तर बाराव्या वर्षी त्याने आत्मसात केलेले हे कौशल्य ’एकदाच वापरु हं’ (!) म्हणत त्याची आईही सहजपणे वापरुन घेते आहे. अचानक नव्या जगात येऊन पडल्याने सैरभैर झालेली मुलगी शार्लट सहजपणे मारुऽवानाच्या सेवनाच्या मार्गे जाते आणि हे समजूनही मार्टी जणू ’मुलगी मोठी झाली की डेटिंग करणार तसेच ड्रग्ज* घेणार’ हे गृहित धरुन त्याबाबत फारसे काही करताना दिसत नाही.

शिकागोमधील एक पांढरपेशे कुटुंब दक्षिणेतील गुन्हेगारी जगात मुरत मुरत जाते...

WendyWithAGun

-oOo-

उपसंहार:

काही आठवणी अथवा संगती या मजेशीर असतात. किचनमध्ये एखादे काम तन्मयतेने करत असताना लिव्हिंग रुममध्ये चालू असलेल्या टीव्हीवर चालू असलेल्या एखाद्या कार्यक्रमातील संवाद कानी पडत असतात. पुढे तेच काम करत असताना टीव्ही बंद असेल किंवा दुसराच कार्यक्रम चालू असेल तरी त्याची दखल न घेता मनात पूर्वी ऐकलेले ते संवाद मनात उमटू लागतात. एखाद्या खेळाडूच्या विक्रमाबद्दल बोलताना त्या नेमक्या क्षणी टीव्हीवर पाहिलेली जाहिरात आठवते. असेच काहीसे मिसौरी म्हटले की माझे होते.

वीणा गवाणकर यांच्या (तब्बल चव्वेचाळीस आवृत्त्या निघालेल्या) ’कार्व्हर’ या पुस्तकात मिसौरीतल्या डायमंड ग्रोव्हचा उल्लेख आहे. तेथील काही शिखरांची चित्रे छोट्या कार्व्हरने अतिशय यथातथ्य चितारल्याची दाद त्याला अपरिचित स्त्रीकडून मिळते असा तो हृद्य प्रसंग आहे. त्यामुळे मिसौरी, ओझार्क यांची माझ्या मनात त्या न पाहिलेल्या सौंदर्याशी सांगड घातली गेली होती. आता ओझार्क पाहिल्यावर ती तुटून गेली आहे. आता ओझार्क म्हटले की मला आपल्या बौद्धिक कौशल्यावर फाजील विश्वास ठेवून, धनलोभाने गुन्हेगारीच्या जाळ्यात गुरफटत जाणारा मार्टीच आठवत राहील. एका आवडलेल्या मालिकेने दिलेला हा नकारात्मक वारसा!

अलीकडचा वास्तववाद हा सौंदर्याची, विश्वासाची, स्निग्ध भावाची, माणुसकीची हत्या केल्यानेच का सिद्ध होतो ; जगण्यातले वास्तव हे सारे असे कुरूपच असते असे या साहित्यिकांना अथवा माध्यम-लेखकांना का वाटते?; वाचकाच्या अथवा प्रेक्षकाच्या तोंडावर हे असे जगण्यातले सडलेपण, ही विरूपता फेकूनच आपल्या लेखनाला दर्जेदार असल्याचे सर्टिफिकेट मिळते असा विश्वास त्यांना का वाटतो?; सद्गुण, निर्मिती, आपुलकी, बांधिलकी हे वास्तव नसते का?... हे मला सतत छळणारे प्रश्न पुन्हा एकवार माझ्यासमोर फेर धरुन नाचू लागतात.

---


हे वाचले का?

गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२

जागी झालेली मुले

काही वर्षांपूर्वी जीएंचे ’बखर बिम्म’ची वाचत असताना अचानक असं लक्षात की ’हां. हा एक माणूस काल्पनिका, परीकथा, पालक किंवा लाडू खाऊन ढिश्शुम करणारे हीरो वगैरे निव्वळ कल्पनासंचाराच्या पलिकडे जाऊन बिम्मच्या वास्तव-कल्पनेच्या तीरावरच्या जगाला भिडू पाहतो आहे. त्याला बिम्म समजला असेल, तर कदाचित त्याच्यामार्फत आपल्यालाही समजेल. मग एखाद्या बिम्म वा बब्बीचे म्हणणे मला अधिक नेमकेपणाने समजून घेता येईल.’ पण हाती येतो येतो आहे म्हणत असताना बिम्म निसटला नि गेली सात-आठ वर्षे कुठे तरी दडून बसला आहे.

बिम्मची काल पुन्हा आठवण झाली. याचे कारण म्हणजे बिम्मसारख्याच कुण्या एका बब्बीचा फोटो मिळाला. बिम्मला आपली भाषा सापडली होती, हिला आपली अभिव्यक्तीही सापडली असावी असे वाटू लागले. बिम्मची भाषा त्याच्या आईला समजत असली, तरी त्यातील अभिव्यक्तीबाबत ती सर्वस्वी अज्ञानी होती. पतंगाऐवजी स्वत:च मांजाला लटकून उडण्यातली गंमत तिला समजत असली, तरी त्यामागची आकांक्षा तिला समजली नव्हती. कुलुपाची किल्ली तिला ठाऊक होती, पण बिम्मसारखा ’या किल्लीचं कुलूप कुठे आहे?’ असा उलट प्रश्न तिला पडला नव्हता. कदाचित तिला तो हास्यास्पदही वाटला असेल. त्यामुळे बहुतेक वेळा बिम्मच्या चौकसतेला काहीतरी थातुरमातुर उत्तरे देऊन ती त्याला वाटेला लावत असे.

पण सर्वच आया अशा नसतात. एखाद्या सुज्ञ आईला असे वाटू शकते की, ’आपल्या मुलाची स्वत:ची अशी भाषा आहे. त्याला काय म्हणायचे आहे ते मला समजत नसेल कदाचित, पण ते निरर्थक नसेल. माझ्या नि त्याच्या भाषेमध्ये एखादा पूल उभा राहील तेव्हा ते कदाचित मला समजेलही. पण तोपर्यंत मला त्याची/तिची अभिव्यक्ती जपायला हवी. संस्कार, शिक्षण, परंपरा या नावाखाली तिला मारून-मुटकून माझ्या पठडीमध्ये बसवण्याचा अट्टाहास करता कामा नये” अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांतील जेनी सोरी ही अशीच एक आई.

२० जानेवारी २०१७ या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी, म्हणजे २१ जानेवारीला त्यांच्या वंशवादी, स्त्रीविरोधी वगैरे मागास मानसिकतेचा विरोध करण्यासाठी अमेरिकेतील स्त्रीवादी संघटनांनी देशव्यापी निदर्शने आयोजित केली होती. नॉर्थ कॅरोलायना राज्यातील मूर्‌सविल येथे राहणारी जेनी सोरी आणि तिचा नवरा सॅम हे दोघे त्या निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी जवळच्या शार्लट शहरी जाणार होते. तिथे नेण्यासाठी निषेध-फलक, घोषणा-फलक आपणच तयार करावेत असे दोघांनी ठरवले. डायनिंग टेबलवर पुठ्ठ्याचे तुकडे पसरून त्यावर घोषणा रंगवणे चालू होते.

The Woke Baby
Sam Sowry with his daughter, 'The Woke Baby'

इतक्यात जेनीच्या नऊ वर्षांच्या मुलाला काहीतरी आठवले आणि तो म्हणाला, ’आई आपल्या हातात जसे हे फलक असतील तसेच माझ्या छोट्या बहिणीच्याही हाती देण्यासाठी फलक तयार करायला हवेत ना?’ जेनी थबकली. इतक्यात त्या दोघांची दृष्टी टेबलखाली बसलेल्या तिच्या मुलीवर पडली. तिथे पडलेल्या एका पुठ्ठ्याच्या तुकड्यावर मन लावून ती काहीतरी लिहित होती. विविध रंगांचे खडू घेऊन बरेच तिने काही लिहिले होते.

अद्याप दोन वर्षांचीही नसलेल्या त्या छोटीला मुळाक्षरेही लिहिणे शक्य नव्हतेच. पण ’तिने जे लिहिले, त्यात तिला जे म्हणायचे आहे त्याचे प्रतिबिंब पडले असेल’ असे जेनीला वाटले. ’आपल्या विचारांच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य जसे आपल्याला आहे, तसेच तिलाही असायला हवे. या निमित्ताने त्या वयातील मुलांच्या विचारक्षमतेचाही आपण आदर करायला हवा' असे तिला वाटले. आपल्या अभिव्यक्तीचा एक भाग, एक तुकडा तिच्या हाती देण्यापेक्षा तिच्या हाती तिच्याच विचारांची अभिव्यक्ती दिसणे अधिक सयुक्तिक आहे’ असे तिने ठरवले. म्हणून दुसर्‍या दिवशी स्वत: रंगवलेला तो फलक घेऊनच ती छोटी आपल्या आईसोबत निदर्शनांमध्ये सामील झाली.

सर्व काही फोटोच्या पुराव्याने शाबीत करण्याच्या जमान्यामध्ये जेनीनेही निदर्शनांचे फोटो काढले. त्यात सॅमच्या खांद्यावर बसलेल्या त्या छोटीचा हा फोटोही होता. त्यामागची भूमिका लक्षात घेऊन त्या दोघांचा मित्र असलेल्या शॉन लेन्ट याने ते आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केले. अल्पावधीतच सॅमच्या खांद्यावर बसून स्वत:च रंगवलेला फलक घेतलेल्या त्या छोटीचा तो फोटो समाजमाध्यमांतून वेगाने पसरला. एकट्या शॉनच्या अकाऊंटवरून तो सुमारे वीस हजार वेळा शेअर करण्यात आला आणि बारा हजारहून अधिक लाईक्सचा धनी झाला.

जेनीच्या या छोटीचे लोकांनी Woke Baby असे नामकरण केले. Woke या शब्दाचा भाषिक अर्थ ’जागा झालेला’ असा असला, तरी सामाजिक संदर्भात त्याचा अर्थ ’वांशिक पूर्वग्रह, भेदाभेद आणि त्यांतून उगवणार्‍या शोषणाविरोधात जागरुक असलेला/असलेली’. युरपिय वंशाच्या गोर्‍यांच्या वर्चस्वाखालील अमेरिकेत आफ्रिकन, लॅटिनो आणि आशियाई वंशीयांच्या विरोधात होणारा भेदाभेद आणि अत्याचार यांच्या विरोधात हा शब्द विशेषत्वाने वापरला जातो.

समाजमाध्यमांत कोणत्याही बाबतीत असंख्य प्रकारची मते व्यक्त केली जात असतात. त्या परंपरेला अनुसरून काहींनी जेनीवर प्रसिद्धीलोलुपतेचा आरोप केला, कुणी निदर्शनांच्या ठिकाणी इतक्या लहान मुलीला नेऊन धोक्यात घातल्याबद्दल टीका केली. त्यावर जेनी म्हणते, "मला या कृतीतून काहीच संदेश वगैरे द्यायचा नाही. माझ्या मुलीच्या वयातील मुलांची मानसिकता ध्यानात घेता, कुठल्याही कौटुंबिक कामांत त्यांना सहभागी करुन न घेणे हा त्यांना त्यांच्या लहानशा जगातील मोठाच भेदभाव वाटू शकतो. तिला तसे वाटू नये, याच हेतूने मी तिला तो फलक घेऊन निदर्शनांमध्येही सामील करून घेतले."

मुळात ही निदर्शने ट्रम्प यांच्या काही असंवेदनशील विधानांचा निषेध करण्यामुळे आयोजित केलेली असल्याने, राजकीय भूमिकेतून अनेक रिपब्लिकन समर्थकांनी तिच्यावर टीकेचा भडिमार केला. पुढे एका प्रसिद्ध पोर्टलशी बोलताना जेनी म्हणाली, "मोठी झाल्यावर आमची मुले आमचीच राजकीय भूमिका स्वीकारतील की नाही हे मला अर्थातच ठाऊक नाही. परंतु ’ते जी भूमिका स्वीकारतील ती चारचौघात ठामपणे मांडण्याइतके धैर्य त्यांच्यामध्ये असायला हवे’ असे आम्हा दोघांना वाटते. या निदर्शनांमध्ये सामील होण्यातून मिळालेला अनुभव त्यांना उपयोगी पडेल असे आम्हाला वाटले."

JJKim
Jeff Kim with his son JJ

योगायोगाने शार्लटमधील त्याच निदर्शनांमधून आणखी एका Woke Baby चा फोटो प्रसिद्ध झाला. या मुलाचे नाव होते जेजे किम. जेजेची आई प्रिस्का किम हिने या निदर्शनांसाठी वॉशिंग्टन गाठण्याचे नियोजन केले होते. पण नंतर तिला वाटले की ’स्त्री-सक्षमीकरण हा स्त्रियांबरोबरच - किंबहुना त्याहून अधिक - पुरुषांनी समजून घेण्याचा विषय आहे’. म्हणून तिने आपल्या पतीलाही सोबत येण्याची विनंती केली. हे दोघे जेजेसह शार्लटमधील निदर्शनांतच सहभागी झाले. 

ज्याप्रमाणे जेनीच्या मुलाला आपल्या बहिणीच्याही हाती फलक हवा असे वाटले, तसेच प्रिस्काच्या बहिणीलाही असे वाटले की, ’आपल्या भाच्याला आपण या सार्‍या घडामोडीचा भाग आहोत असे वाटायला हवे.’ म्हणून तिने ’I love naps, but I stay woke.’ अशी घोषणा लिहून एक छोटा फलक त्याच्या हाती दिला होता.

या दोन जोडप्यांमध्ये आणखी एक समान दुवा होता. सॅम आणि प्रिस्का हे दोघेही ज्यांना ’पहिल्या पिढीचे स्थलांतरित’ म्हणतात अशा आई-वडिलांची अपत्ये. सॅमचे आई-वडिल व्हिएतनामवरुन स्थलांतरित झालेले, तर प्रिस्काची आई कोरियन. त्यामुळे त्या दोघांनाही त्या वांशिक भेदाभेदाचा सामना लहानपणापासून करावा लागला. त्यापलिकडे स्त्री असल्यामुळे प्रिस्काला ’ओरिएन्टल फ्लावर’ वगैरे शेरेबाजीलाही सामोरे जावे लागले होते. या विषमतेविरोधात ते स्वत: जसे उभे आहेत तसेच आपल्या मुलांनीही उभे राहावे अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणून त्या मार्गावर चालताना या woke babysना आपल्या सोबत घेतले आहे, त्यांना अधिक दूरचे दिसावे म्हणून खांद्यावर घेतले आहे.

जेनी प्रमाणेच प्रिस्कालाही तिच्या मुलाला निदर्शनांत सहभागी करून घेतल्याबाबत जाब विचारण्यात आला होता. प्रश्नकर्त्यांना तिने एकाच वाक्यात उत्तर दिले होते. ती म्हणाली, “A viral picture lasts for a day, but I hope JJ’s fight for human rights will last a lifetime.”

- oOo-

लेखासोबत जोडलेले फोटो https://www.charlottemagazine.com/येथून साभार.

जेनी आणि सॅम यांच्या विनंतीनुसार त्यांच्या दोनही मुलांची नावे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेली नाहीत.


यांसारखे आणखी:
    हासून ते पाहाणे >>


हे वाचले का?