शनिवार, १२ मार्च, २०२२

हासून ते पाहाणे

पुलं एके ठिकाणी म्हणतात, ’गाणार्‍याला नुसता गाता गळा असून भागत नाही, आधी एक गातं मन असावं लागतं. ते सदैव हसरं, गातं असावं लागतं. तरच गाणं संभवतं.’

त्याच धर्तीवर खळखळून हसण्यासाठी एक निर्व्याज आणि निर्भेळ मन असावं लागतं असं माझं मत आहे. खळखळून हसणे हा विनामूल्य वापरता येणारा असा तणावहारी उपचार आहे. पंचाईत अशी की असे हास्य आवंतून आणता येत नाही; हास्यक्लबवाले काहीही म्हणोत.

मिशेला मोर्ले आणि ब्रायन ओ’ड्रिस्कल

पाच-सहा वर्षांची एक मुलगी खळखळून हसताना काढलेले हे छायाचित्र चार-पाच वर्षांपूर्वी कुठेतरी सापडलं नि आमच्या कम्प्युटरच्या हार्ड-डिस्कमध्ये रुतून बसलं. तिच्या चेहर्‍यावर एक जिंकल्याचा, परिपूर्तीचा आनंद आहे. दोन्ही हात उंचावून तो आनंद ती व्यक्त करताना दिसते आहे. इतका निरभ्र आनंद कित्येक वर्षांत स्वत: अनुभवल्याचं आठवत नाही. आज माणसाच्या आनंदामध्ये नकळत आलेला अहंकाराचा गंड, इतर कुणाला मागे टाकल्याचा दर्प जेवल्यानंतर ताटाच्या तळाशी चिकटलेल्या खरकट्यासारखा लपलेला असतो.

या छोट्या मुलीचे नाव आहे मिशेला मोर्ले आणि हाती तो मोठ्ठा चषक घेऊन आला आहे तो आहे ब्रायन ओ’ड्रिस्कल. हा प्रसिद्ध आयरिश रग्बी खेळाडू आहे. या दोघांची ही भेट २०११ मधली.

मिशेला ही त्या वेळी किडनीच्या आजाराशी झुंजत होती. तिला आठवड्यातून तीन वेळा डायलिसिसची गरज पडे. तिला हा उपचार जिथे घ्यावा लागे, त्या टेम्पल स्ट्रीट हॉस्पिटलशी ब्रायन हा संलग्न होता. आपल्याकडे ’मेक अ विश फौंडेशन’ म्हणून एक संस्था आहे. हे लोक दुर्धर आजार असलेल्या, उपचारांनी गांजलेल्या रुग्णांची, कुटुंबियांना पुरी करता येणे अवघड आहे अशी एखादी महत्वाची इच्छा पुरी करण्याचा प्रयत्न करत असतात. टेम्पल स्ट्रीटच्या अशाच उपक्रमाशी ब्रायन संलग्न होता.

सहाव्या वर्षी मिशेलावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची (kidney transplant) शस्त्रक्रिया करण्यात आली. याच काळात तिचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हॉस्पिटलने ब्रायनशी तिची भेट घडवून आणली. नुकताच जिंकलेला हेनिकेन कप (युरपिय रग्बीच्या विजेत्यांना देण्यात येणारा चषक) सोबत घेऊन आलेल्या ब्रायनला पाहून मिशेलाची झालेली ही उस्फूर्त प्रतिक्रिया छायाचित्रकाराने अचूक टिपली आहे.

पण ही केवळ एकवेळची भेट न राहता त्या दोघांमध्ये छान मैत्रीही झाली. पाच-सात वर्षांनंतर ब्रायनने ’देन अ‍ॅंड नाऊ’ सदराखाली दोघांचे नवे छायाचित्र प्रसिद्ध केले. हे छायाचित्र इतके प्रसिद्ध झाले की या दोघांना काही चॅनेलवरील कार्यक्रमांतूनही बोलावण्यात आले.

पैकी एका कार्यक्रमात ’मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आला तेव्हा तो त्या चषकासोबतच बॉलही घेऊन आला होता. थोडे दूर उभे राहून त्याने मला तो चषकात फेकण्यास सांगितला. पहिल्याच प्रयत्नात मी यशस्वी झाल्यामुळे झालेला माझा आनंद मी व्यक्त करत असताना तो फोटो काढलेला आहे. मी एरवी ह्याला त्या भेटीपूर्वी ओळखत नव्हते. फॅन वगैरे तर नव्हतेच.’ असे सांगत मिशेलाने ब्रायनची फिरकी घेतली होती. त्यावर ब्रायननेही लटक्या रागाने, 'मी काळात मागे गेलो तर तुला अजिबात भेटणार नाही' असे जाहीर केले. या दोघांकडे पाहून मला फ़ादर दिब्रिटो आणि त्यांची इटलीतील छोटी मैत्रिण अ‍ॅना आठवून गेली.

पण सर्वच लहान मुलं निष्पाप, निर्व्याज असतात असं सरसकटीकरण करणेही योग्य नाही. मध्यंतरी फायटिंग ट्विन्स या शीर्षकाखाली एक पॅसिफायर एकमेकांकडून खेचून घेऊ पाहणार्‍या दोन जुळ्या मुलांचा व्हिडिओ पाहिला होता. त्याच्या अखेरीस त्यापैकी एक मूल दुसर्‍याला हाताने फटकावते. त्यानंतर आपला भाऊ रडू लागल्यावर त्याच्या चेहर्‍यावर दिसणारा खुनशी भाव मला हादरवून गेला होता. हे पोर जेमतेम बसू शकणारं, अजून चालूही न शकणारं होतं. त्यामुळे 'मिशेलाची ही निर्व्याजता सर्वच लहान मुलांत असते की, त्यात काय विशेष?'असे म्हणता येणार नाही.

द्वेषाच्या प्रसारापेक्षाही बांधिलकी, मैत्री, प्रेम या भावनांची जपणूक करणे अधिक महत्वाचे समजणारेही लोक असतात. भावनिकता म्हणजे दुबळेपणा असा मूर्खपणाचा समजही नसतो त्यांचा.

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा