इसवी सन पूर्व ८४१मध्ये जेझबेलची कन्या राणी अथालीया हिने जेरुसलेमची सत्ता काबीज केली. तिने डेव्हिड कुळातल्या सर्व राजकुमारांना ( तिच्या स्वतःच्या नातवंडांना) ठार मारून टाकलं. फक्त जेहोआश नावाच्या एकाच बाल राजकुमाराला तिच्या तावडीतून वाचवलं गेलं. ’बुक ऑफ किंग्ज द्वितीय’ या पुस्तकातून आणि उत्खननात सापडलेल्या नव्या पुराव्यांतून आपल्याला जेरुसलेममधल्या तेव्हाच्या जीवनाची थोडीशी कल्पना येते.
ते छोटंसं बाळ मंदिराच्या परिसरात दडवून ठेवलेलं होतं. त्याच वेळी वंशाने अर्धी फिनिशियन आणि अर्धी इस्राइली असलेली ही जेझबेल-कन्या स्वतःच्या राजधानीत बाल नावाच्या देवतेची आराधना करण्यात आणि वेगवेगळ्या देशांबरोबर व्यापार करण्यात गर्क झाली होती. जेरुसलेममध्ये जेमतेम इंचभर लांबीचं, हस्तिदंती डाळिंबावर बसलेलं एक सुंदर हस्तिदंती कबुतर सापडलं आहे. बहुतकरून जेरुसलेममधल्या एखाद्या आलिशान घराच्या सजावटीसाठी त्याचा उपयोग करण्यात आला असावा. डेव्हिडच्या नगरीच्या खाली असलेल्या खडकांतल्या तलावाभोवती फिनिशियन मातीत घडवलेले राजेशाही शिक्के सापडले आहेत. त्या शिक्क्यांना 'बुलै' असं नाव होतं. त्या शिक्क्यांवर तत्कालीन जहाजांची चित्रं आहेत. त्याचप्रमाणे पंख असलेला सिंहासनारूढ सूर्य अशी पवित्र चिन्हंसुद्धा आहेत. त्या शिक्क्यांसोबत तिथे १०,००० माशांची हाडंसुद्धा सापडली आहेत. ही हाडं बहुधा समुद्रप्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांनी भूमध्य समुद्रावरून येताना आणली असावीत; पण काही काळात जेझबेलप्रमाणेच अथालियाही लोकांच्या तिरस्काराचा विषय झाली. तिच्या मूर्तिपूजक धर्मगुरूंनी मंदिरात बाल आणि इतर देवतांची प्रतिष्ठापना केली. सहा वर्षांचा काळ गेल्यावर याहवेहच्या मंदिरप्रमुखाने जेरुसलेममधल्या मातब्बर सरदारांना एका गुप्त बैठकीला बोलवलं आणि छोटा राजकुमार जेहोआश जिवंत असल्याचं त्यांच्यापुढे उघड केलं. मग त्या छोट्या राजकुमारासमोर त्यांनी निष्ठेच्या शपथा घेतल्या. मग मंदिरप्रमुखाने सर्व रक्षकांना मंदिरात अजूनही साठवून ठेवलेले राजा डेव्हिडचे भाले आणि ढाली दिल्या आणि त्या मुलाचा सार्वजनिकरित्या राज्याभिषेक केला. त्या प्रसंगी सर्व लोकांनी 'राजा चिरायू होवो' अशा घोषणा दिल्या आणि तुताऱ्या वाजवून जल्लोष केला.
राणीने 'सैनिक आणि प्रजेने घातलेला हा गोंधळ' ऐकला आणि ती राजवाड्यातून तातडीने किल्ल्याच्या शेजारच्या मंदिरात आली. आता ते मंदिरही लोकांनी भरून गेल होतं. राणी ओरडली, 'दगा! दगा!'; पण सैनिकांनी तिला पकडलं आणि पवित्र पर्वतावरून फरफटत खाली नेऊन मंदिराच्या दाराबाहेर तिची हत्या केली. 'बाल' या देवतेची पूजा करणाऱ्या धर्मगुरूंना लोकांनी पकडून मारलं आणि त्या मूर्ती फोडून टाकल्या.
राजा जेहोआशने एकूण चाळीस वर्षं, म्हणजे इसवी सन पूर्व ८०१ सालापर्यंत राज्य केलं. त्यानंतर सिरियन राजाने जेरुसलेमवर हल्ला करून त्याला मंदिराच्या 'खजिन्यातलं सर्व सोनं' द्यायला भाग पाडलं; पण त्या राजाची हत्या झाली. त्यानंतर तीस वर्षांनी इस्राइलच्या एका राजाने जेरुसेलमवर हल्ला केला आणि मंदिर लुटलं. त्यानंतर मंदिराच्या वाढत्या संपत्तीमुळे ते आक्रमकांसाठी एक प्रकारचं आमीषच झालं.
तरीदेखील जेरुसेलमचं दुर्गम वैभव असिरियाच्या वैभवाशी स्पर्धा करू शकत नव्हतं. असिरियाचं साम्राज्य नव्या राजाच्या आधिपत्याखाली स्फूर्तीने भरू लागलं होतं आणि इतर राज्यांना गिळण्यासाठी नरभक्षक श्वापदाप्रमाणे सज्ज झालं होतं. असिरियन लोकांचा प्रतिकार करण्यासाठी इस्राइल आणि अराम-दमास्कसच्या राजांनी युती करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ज्यूडाचा राजा आहाझ याने असिरियाविरुद्धच्या युतीत सामील व्हायला नकार दिला तेव्हा इस्राइली आणि सिरियन लोकांनी जेरुसलेमलाच वेढा 'दिला, पण त्यांना नव्याने बांधलेल्या तटरक्षक भिंती तोडता आल्या नाहीत. उलट राजा आहाझने मंदिरातला खजिना आणि मदतीच्या याचनेचं पत्र असिरियाचा राजा तिसरा तिग्लाथ्पिलेसर याला पाठवून दिलं. इसवी सन पूर्व ७३२ साली असिरियन लोकांनी सिरियाचं राज्य स्वतःच्या राज्याला जोडून घेतलं आणि इस्राइलचा विध्वंस केला. जेरुसलेममध्ये बसलेला राजा आहाझ मात्र असिरियाला शरण जायचं की लढायच, याची चिंता करत राहिला.
आयझेया: जेरुसलेम, सौंदर्यवती आणि वेश्या
आयझेयाने राजाला सबुरीचा सल्ला दिला: याहवेह जेरुसलेमचं रक्षण करेल. आयझेया हा एक राजकुमार, धर्मगुरू आणि राजकीय सल्लागार होता. राजाला इमॅन्युएल (अर्थ - आपल्यात निवास करणारा ईश्वर) नावाचा एक पुत्र होणार असल्याचं आयझेयाने सांगितलं 'आपल्यामध्ये एक असं मूल जन्म घेईल' जे 'सर्वशक्तिमान ईश्वर, शाश्वत पिता, शांतीचा राजकुमार' असेल, जे 'चिरकाल शांतिपर्व' घेऊन येईल.
'बुक ऑफ आयझेया’ लिहिणारे कमीतकमी दोन लेखक आहेत. त्यातल्या एकाने दुसऱ्यानंतर २०० वर्षांनी त्या ग्रंथात भर टाकली. पहिला आयझेया हा केवळ प्रेषित नव्हता, तर तो दूरदर्शी कवीसुद्धा होता. असिरियन लोकांनी सारंकाही गिळंकृत करण्याचा आक्रमणवादी सपाटा लावला होता, पण त्या दिवसांतही मंदिराच्या विनाशानंतरच्या एका गूढ जेरुसलेममधलं जीवन कसं असेल, याची कल्पना करणारा तो पहिलाच माणूस होता. त्याने लिहून ठेवलंय, 'मला एका उंच सिंहासनावर बसलेला देव दिसला आणि त्याच्या प्रभेने सारं मंदिर भरून गेलेलं होतं... आणि सभागृहात सगळीकडे धूर पसरला होता.'
आयझेयाला 'पवित्र पर्वत' अत्यंत प्रिय होता. त्याच्या नजरेत ती एक लावण्यवती स्त्री होती, 'झायनच्या कन्येची टेकडी, जेरुसलेमची टेकड़ी', कधी सदाचारी, तर कधी वेश्या, सात्विकता आणि संस्कृती नसेल, तर नुसत्या जेरुसलेमवर मालकी असून काहीच अर्थ नाही. सारं काही नष्ट झालं आणि 'जेरुसलेमचा विध्वंस झाला', तरी एक नवं आध्यात्मिक जेरुसलेम अस्तित्वात असेलच. ते जेरुसलेम ’प्रत्येक मानवी निवाऱ्याच्या ठिकाणी वास करेल.' तो शिकवतो: प्रेम आणि दयाभाव; 'सत्कर्म करायला शिका; न्याय करा; पीडितांची पीडा दूर करा; अनाथांचा पुरस्कार करा; विधवांना न्याय मिळवून द्या.' आयझेयाला एक असामान्य साक्षात्कार झाला : 'उंच पर्वतांवर देवाचं वसतिस्थान प्रस्थापित होईल... आणि राष्ट्रांची त्याकडे ओढ असेल.' या दुर्गम आणि कदाचित पूर्णपणे पाडाव झालेल्या नगरीतले कायदे, तिथली जीवनमूल्यं आणि कहाण्या पुन्हा नव्याने जन्म घेतील. 'मग अनेक लोक पुढे येऊन म्हणतील, 'चला रे, आपण देवाच्या पर्वताकडे जाऊ. जेकबच्या देवाच्या निवासस्थानी जाऊ; आणि तो आपल्याला त्याचा मार्ग दाखवेल...' झायनमधून सगळीकडे देवाचा कायदा प्रस्थापित होईल आणि जेरुसलेममधून देवाची शिकवण सर्वत्र पसरेल. आणि मग तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करेल.' आयझेयाने एका गूढ कयामतच्या दिवसाचं भविष्य वर्तवलं. जेव्हा एक विधिवत् राजा- एक मसीहा अवतरेल : 'तेव्हा योद्धे त्यांच्या तलवारीचं रूपांतर नांगराच्या फाळात करतील आणि भाल्यांचं रूपांतर तण काढण्याच्या कोयत्यात करतील... त्यानंतर ते कधीही युद्ध करणार नाहीत. त्या दिवशी मृत लोक पुनर्जीवित होतील, 'लांडगे आणि कोकरं एकत्र नांदतील आणि बिबळ्या बकरीच्या पिलासोबत विश्रांती घेईल.'
या तेजस्वी कवितेत कयामतच्या दिवसाच्या ओढीबद्दल प्रथमच लिहिलं गेलं आहे. अगदी आजपर्यंत जेरुसलेमच्या इतिहासात ही ओढ जाणवते. आयझेयाने केवळ ज्यू धर्मालाच नव्हे, तर ख्रिश्चन धर्मालाही आकार दिला. येशू ख्रिस्ताने आयझेयाचा अभ्यास केला होता आणि येशूची शिकवण- मंदिराचा विध्वंस आणि जेरुसलेमची शाश्वत आध्यात्मिक संकल्पना ते तळागाळातल्यांचा कैवार - याच काव्यात्म दृष्टीतून आली आहे. स्वतः येशूकडे आवझेयाने भाकीत केलेला इमॅन्युएल म्हणून पाहिलं गेलं.
राजा आहाझ दमास्कसला गेला आणि त्याने तिग्लाथ्पिलेसरला लवून कुर्निसात केला. परतताना त्याच्यापाशी मंदिरात ठेवण्यासाठी असिरियन पद्धतीचा देव्हारा होता. ज्या वेळी तिग्लाथ्पिलेसर हा राजा इसवी सन पूर्व ७२७ साली मरण पावला त्या वेळी इस्राइल राज्याने उठाव केला, पण असिरियाचा नवा राजा दुसरा सार्गोन याने इस्राइलची राजधानी समारियाला तीन वर्ष वेढा घातला आणि सारं इस्राइलच गिळंकृत केलं. तिथल्या २७,००० लोकांना त्याने असिरियात पाठवून दिलं. या सगळ्या धुमश्चक्रीत इस्राइल या उत्तरेच्या राज्यातल्या बारापैकी एकूण दहा टोळ्या इतिहासातून जवळजवळ नामशेषच झाल्या१.
सध्याचे ज्यू लोक उरलेल्या दोन जमातींचे वंशज आहेत. ते ज्यूडाच्या राज्याचे नागरिक या नात्याने जगले. आयझेयाने इमॅन्युएल म्हणून संबोधलेलं मूल म्हणजे राजा हेझेकिया होता. तो प्रेषित नव्हता, तरीही त्याच्याकडे राजकारणासाठी आवश्यक असलेल्या गुणांपैकी सगळ्यात मौल्यवान गुण होता- नशीब! त्याने उभारलेल्या जेरुसलेमचे थोडे थोडे पुरावे अजूनही मिळतात.
असिरियाविरुद्ध बंड करण्यासाठी राजा हेझेकियाने वीस वर्षं वाट पाहिली. प्रथम त्याने मंदिरातल्या मूर्त्या नष्ट केल्या, मंदिरातली कास्य धातूची सर्पमूर्ती तोडली, आणि प्रजेला पासोवर सण साजरा करण्याची आज्ञा दिली. त्याच्या लोकांनी साजरी केलेली पासोवर सणाची ती सुरुवातीच्या काळातली आवृत्ती होती. तेव्हा जेरुसलेम प्रथमच पश्चिमेकडच्या डोंगरावर२ पसरू लागलं होतं. उत्तरेकडच्या इस्राइल राज्याचा नि:पात झाल्याने जेरुसेलम शहर निर्वासितांनी भरून गेलं. बहुधा त्या निर्वासितांनी त्यांची प्राचीन पोथ्यापुस्तकं सोबत आणली असावीत. त्यात इस्राइलचा पुरातन इतिहास आणि आख्यायिका समाविष्ट असाव्यात. त्याच काळात जेरुसलेममधल्या विद्वानांनी ज्यूडाच्या परंपरा, चालीरीती आणि उत्तरेकडच्या जमातींच्या इस्राइली परंपरा आणि चालीरितींचं एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया चालू केली. त्याच सुमारास ग्रीक लोक होमरचं 'इलियड' हे महाकाव्य लिहून ठेवत होते. याच पोथ्यापुस्तकांमधून पुढे बायबलची निर्मिती झाली.
- oOo -
पुस्तक: जेरुसलेम: एक चरित्रकथा
लेखक: सायमन सीबग माँटफिअरी
अनुवाद: सविता दामले
प्रकाशक: डायमंड पब्लिकेशन्स
आवृत्ती पहिली.
वर्ष: २०१४.
पृ. ७७-८१.
टीपा:
१. इराण आणि इराकमध्ये राहणारे पुरातन ज्यू लोक त्या दहा जमातींचे वंशज असल्याचा दावा करतात त्या जमातींना अगोदर असिरियन लोकांनी आणि नंतर बॅबिलॉनी लोकांनीसुद्धा त्यांच्या मातृभूमीतून विस्थापित केलं. अलीकडेच झालेल्या जनुकीय संशोधनानुसार हे ज्यू लोक खरोखरच इतर ज्यू जमातीपासून २,५०० वर्षांपूर्वी विलग झाले असल्याचं सिद्ध झालं आहे. तरीसुद्धा गायब झालेल्या या इस्राइली जमातींना शोधण्याच्या अनावर ओढीने हजारो काल्पनिक कथांना आणि सिद्धान्ताना जन्म दिलेला आहे. या दहा जमाती अगदी अशक्य वाटणाऱ्या ठिकाणीसुद्धा 'सापडल्या' आहेत त्यामुळे त्यांत उत्तर अमेरिकेतले मूळचे आदिवासी आणि इंग्रज यांचासुद्धा समावेश झाला आहे.
२. डेव्हिडच्या शहराची तटबंदी आणि मंदिराची टेकडी यांच्या बाहेरच्या परिसरात नवीन उपनगर विस्तारली होती. मोरिया पर्वत आणि पश्चिमेची टेकडी यांच्या मध्ये असलेल्या टायरोपाएन दरीत माख्तेश हे उपनगर बसलं होतं, तर मित्रेश हे उपनगर पश्चिम टेकडीवरच वसलं होतं. आज तिथे ज्यू वस्ती आहे. त्या वेळी शहराच्या भोवताली थडगी बांधून त्यात मोठमोठ्या अधिकाऱ्यांचं मरणोत्तर दफन करत असत: 'या थडग्यांत राजाच्या (...) याहू नावाच्या राजदरबारातल्या साहाय्यकाला पुरण्यात आलं आहे.’ सिल्वान गावातल्या एका थडग्यावर असं लिहिलं आहे 'इथे सोनं, चांदी वगैरे काही नाही. फक्त त्याची आणि त्याच्या गुलाम पत्नीची हाडं आहेत जो कुणी हे थडगं उघडेल त्याला शाप लागेल.' पण त्या शापाचा काहीही परिणाम झाला नाही, ते थडगं लुटण्यात आलं. तिथे आजच्या घडीला कोंबड्याचं एक खुराडं आहे, पण प्रत्यक्षात हा राजसेवक हेझेकियाच्या दरबारातला असावा त्याने स्वतः साठी खूपच भव्य कबर बांधून ठेवली होती, म्हणून आयझेयाने त्याच्यावर टीका केली होती. त्या माणसाचं नाव बहुधा शेब्नायाहू असावं.
---
संबंधित लेखन:
वेचताना... : जेरुसलेम: एक चरित्रकथा >>
---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा