काही वर्षांपूर्वी जीएंचे ’बखर बिम्म’ची वाचत असताना अचानक असं लक्षात की ’हां. हा एक माणूस काल्पनिका, परीकथा, पालक किंवा लाडू खाऊन ढिश्शुम करणारे हीरो वगैरे निव्वळ कल्पनासंचाराच्या पलिकडे जाऊन बिम्मच्या वास्तव-कल्पनेच्या तीरावरच्या जगाला भिडू पाहतो आहे. त्याला बिम्म समजला असेल, तर कदाचित त्याच्यामार्फत आपल्यालाही समजेल. मग एखाद्या बिम्म वा बब्बीचे म्हणणे मला अधिक नेमकेपणाने समजून घेता येईल.’ पण हाती येतो येतो आहे म्हणत असताना बिम्म निसटला नि गेली सात-आठ वर्षे कुठे तरी दडून बसला आहे.
बिम्मची काल पुन्हा आठवण झाली. याचे कारण म्हणजे बिम्मसारख्याच कुण्या एका बब्बीचा फोटो मिळाला. बिम्मला आपली भाषा सापडली होती, हिला आपली अभिव्यक्तीही सापडली असावी असे वाटू लागले. बिम्मची भाषा त्याच्या आईला समजत असली, तरी त्यातील अभिव्यक्तीबाबत ती सर्वस्वी अज्ञानी होती. पतंगाऐवजी स्वत:च मांजाला लटकून उडण्यातली गंमत तिला समजत असली, तरी त्यामागची आकांक्षा तिला समजली नव्हती. कुलुपाची किल्ली तिला ठाऊक होती, पण बिम्मसारखा ’या किल्लीचं कुलूप कुठे आहे?’ असा उलट प्रश्न तिला पडला नव्हता. कदाचित तिला तो हास्यास्पदही वाटला असेल. त्यामुळे बहुतेक वेळा बिम्मच्या चौकसतेला काहीतरी थातुरमातुर उत्तरे देऊन ती त्याला वाटेला लावत असे.
पण सर्वच आया अशा नसतात. एखाद्या सुज्ञ आईला असे वाटू शकते की, ’आपल्या मुलाची स्वत:ची अशी भाषा आहे. त्याला काय म्हणायचे आहे ते मला समजत नसेल कदाचित, पण ते निरर्थक नसेल. माझ्या नि त्याच्या भाषेमध्ये एखादा पूल उभा राहील तेव्हा ते कदाचित मला समजेलही. पण तोपर्यंत मला त्याची/तिची अभिव्यक्ती जपायला हवी. संस्कार, शिक्षण, परंपरा या नावाखाली तिला मारून-मुटकून माझ्या पठडीमध्ये बसवण्याचा अट्टाहास करता कामा नये” अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांतील जेनी सोरी ही अशीच एक आई.
२० जानेवारी २०१७ या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. त्याच्या दुसर्याच दिवशी, म्हणजे २१ जानेवारीला त्यांच्या वंशवादी, स्त्रीविरोधी वगैरे मागास मानसिकतेचा विरोध करण्यासाठी अमेरिकेतील स्त्रीवादी संघटनांनी देशव्यापी निदर्शने आयोजित केली होती. नॉर्थ कॅरोलायना राज्यातील मूर्सविल येथे राहणारी जेनी सोरी आणि तिचा नवरा सॅम हे दोघे त्या निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी जवळच्या शार्लट शहरी जाणार होते. तिथे नेण्यासाठी निषेध-फलक, घोषणा-फलक आपणच तयार करावेत असे दोघांनी ठरवले. डायनिंग टेबलवर पुठ्ठ्याचे तुकडे पसरून त्यावर घोषणा रंगवणे चालू होते.
इतक्यात जेनीच्या नऊ वर्षांच्या मुलाला काहीतरी आठवले आणि तो म्हणाला, ’आई आपल्या हातात जसे हे फलक असतील तसेच माझ्या छोट्या बहिणीच्याही हाती देण्यासाठी फलक तयार करायला हवेत ना?’ जेनी थबकली. इतक्यात त्या दोघांची दृष्टी टेबलखाली बसलेल्या तिच्या मुलीवर पडली. तिथे पडलेल्या एका पुठ्ठ्याच्या तुकड्यावर मन लावून ती काहीतरी लिहित होती. विविध रंगांचे खडू घेऊन बरेच तिने काही लिहिले होते.
अद्याप दोन वर्षांचीही नसलेल्या त्या छोटीला मुळाक्षरेही लिहिणे शक्य नव्हतेच. पण ’तिने जे लिहिले, त्यात तिला जे म्हणायचे आहे त्याचे प्रतिबिंब पडले असेल’ असे जेनीला वाटले. ’आपल्या विचारांच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य जसे आपल्याला आहे, तसेच तिलाही असायला हवे. या निमित्ताने त्या वयातील मुलांच्या विचारक्षमतेचाही आपण आदर करायला हवा' असे तिला वाटले. आपल्या अभिव्यक्तीचा एक भाग, एक तुकडा तिच्या हाती देण्यापेक्षा तिच्या हाती तिच्याच विचारांची अभिव्यक्ती दिसणे अधिक सयुक्तिक आहे’ असे तिने ठरवले. म्हणून दुसर्या दिवशी स्वत: रंगवलेला तो फलक घेऊनच ती छोटी आपल्या आईसोबत निदर्शनांमध्ये सामील झाली.
सर्व काही फोटोच्या पुराव्याने शाबीत करण्याच्या जमान्यामध्ये जेनीनेही निदर्शनांचे फोटो काढले. त्यात सॅमच्या खांद्यावर बसलेल्या त्या छोटीचा हा फोटोही होता. त्यामागची भूमिका लक्षात घेऊन त्या दोघांचा मित्र असलेल्या शॉन लेन्ट याने ते आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केले. अल्पावधीतच सॅमच्या खांद्यावर बसून स्वत:च रंगवलेला फलक घेतलेल्या त्या छोटीचा तो फोटो समाजमाध्यमांतून वेगाने पसरला. एकट्या शॉनच्या अकाऊंटवरून तो सुमारे वीस हजार वेळा शेअर करण्यात आला आणि बारा हजारहून अधिक लाईक्सचा धनी झाला.
जेनीच्या या छोटीचे लोकांनी Woke Baby असे नामकरण केले. Woke या शब्दाचा भाषिक अर्थ ’जागा झालेला’ असा असला, तरी सामाजिक संदर्भात त्याचा अर्थ ’वांशिक पूर्वग्रह, भेदाभेद आणि त्यांतून उगवणार्या शोषणाविरोधात जागरुक असलेला/असलेली’. युरपिय वंशाच्या गोर्यांच्या वर्चस्वाखालील अमेरिकेत आफ्रिकन, लॅटिनो आणि आशियाई वंशीयांच्या विरोधात होणारा भेदाभेद आणि अत्याचार यांच्या विरोधात हा शब्द विशेषत्वाने वापरला जातो.
समाजमाध्यमांत कोणत्याही बाबतीत असंख्य प्रकारची मते व्यक्त केली जात असतात. त्या परंपरेला अनुसरून काहींनी जेनीवर प्रसिद्धीलोलुपतेचा आरोप केला, कुणी निदर्शनांच्या ठिकाणी इतक्या लहान मुलीला नेऊन धोक्यात घातल्याबद्दल टीका केली. त्यावर जेनी म्हणते, "मला या कृतीतून काहीच संदेश वगैरे द्यायचा नाही. माझ्या मुलीच्या वयातील मुलांची मानसिकता ध्यानात घेता, कुठल्याही कौटुंबिक कामांत त्यांना सहभागी करुन न घेणे हा त्यांना त्यांच्या लहानशा जगातील मोठाच भेदभाव वाटू शकतो. तिला तसे वाटू नये, याच हेतूने मी तिला तो फलक घेऊन निदर्शनांमध्येही सामील करून घेतले."
मुळात ही निदर्शने ट्रम्प यांच्या काही असंवेदनशील विधानांचा निषेध करण्यामुळे आयोजित केलेली असल्याने, राजकीय भूमिकेतून अनेक रिपब्लिकन समर्थकांनी तिच्यावर टीकेचा भडिमार केला. पुढे एका प्रसिद्ध पोर्टलशी बोलताना जेनी म्हणाली, "मोठी झाल्यावर आमची मुले आमचीच राजकीय भूमिका स्वीकारतील की नाही हे मला अर्थातच ठाऊक नाही. परंतु ’ते जी भूमिका स्वीकारतील ती चारचौघात ठामपणे मांडण्याइतके धैर्य त्यांच्यामध्ये असायला हवे’ असे आम्हा दोघांना वाटते. या निदर्शनांमध्ये सामील होण्यातून मिळालेला अनुभव त्यांना उपयोगी पडेल असे आम्हाला वाटले."
योगायोगाने शार्लटमधील त्याच निदर्शनांमधून आणखी एका Woke Baby चा फोटो प्रसिद्ध झाला. या मुलाचे नाव होते जेजे किम. जेजेची आई प्रिस्का किम हिने या निदर्शनांसाठी वॉशिंग्टन गाठण्याचे नियोजन केले होते. पण नंतर तिला वाटले की ’स्त्री-सक्षमीकरण हा स्त्रियांबरोबरच - किंबहुना त्याहून अधिक - पुरुषांनी समजून घेण्याचा विषय आहे’. म्हणून तिने आपल्या पतीलाही सोबत येण्याची विनंती केली. हे दोघे जेजेसह शार्लटमधील निदर्शनांतच सहभागी झाले.
ज्याप्रमाणे जेनीच्या मुलाला आपल्या बहिणीच्याही हाती फलक हवा असे वाटले, तसेच प्रिस्काच्या बहिणीलाही असे वाटले की, ’आपल्या भाच्याला आपण या सार्या घडामोडीचा भाग आहोत असे वाटायला हवे.’ म्हणून तिने ’I love naps, but I stay woke.’ अशी घोषणा लिहून एक छोटा फलक त्याच्या हाती दिला होता.
या दोन जोडप्यांमध्ये आणखी एक समान दुवा होता. सॅम आणि प्रिस्का हे दोघेही ज्यांना ’पहिल्या पिढीचे स्थलांतरित’ म्हणतात अशा आई-वडिलांची अपत्ये. सॅमचे आई-वडिल व्हिएतनामवरुन स्थलांतरित झालेले, तर प्रिस्काची आई कोरियन. त्यामुळे त्या दोघांनाही त्या वांशिक भेदाभेदाचा सामना लहानपणापासून करावा लागला. त्यापलिकडे स्त्री असल्यामुळे प्रिस्काला ’ओरिएन्टल फ्लावर’ वगैरे शेरेबाजीलाही सामोरे जावे लागले होते. या विषमतेविरोधात ते स्वत: जसे उभे आहेत तसेच आपल्या मुलांनीही उभे राहावे अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणून त्या मार्गावर चालताना या woke babysना आपल्या सोबत घेतले आहे, त्यांना अधिक दूरचे दिसावे म्हणून खांद्यावर घेतले आहे.
जेनी प्रमाणेच प्रिस्कालाही तिच्या मुलाला निदर्शनांत सहभागी करून घेतल्याबाबत जाब विचारण्यात आला होता. प्रश्नकर्त्यांना तिने एकाच वाक्यात उत्तर दिले होते. ती म्हणाली, “A viral picture lasts for a day, but I hope JJ’s fight for human rights will last a lifetime.”
- oOo-
लेखासोबत जोडलेले फोटो https://www.charlottemagazine.com/येथून साभार.
जेनी आणि सॅम यांच्या विनंतीनुसार त्यांच्या दोनही मुलांची नावे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेली नाहीत.
यांसारखे आणखी:
हासून ते पाहाणे >>
वोक बेबी निमित्तानं खूप नव्या मुद्द्यांकडे निर्देश केला आहेस. आणि बिम्मला जोडून हे करायला सुचणं याबद्दल 2 मिसळ बक्षीस.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सोनाली
हटवाSir, you write so well. Thanks ! Dr. Asmita Phadke
उत्तर द्याहटवाThanks Dr. Phadke _/\_
हटवा