सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

वेचताना... : शाश्वताचे रंग

सर्वसामान्य व्यक्ती एखादे पुस्तक वाचल्यानंतर ते 'आवडले किंवा आवडले नाही किंवा ठीक आहे' अशा तीन सर्वसाधारण श्रेणींमधे प्रतिक्रिया देते. फार थोडे जण त्याबाबत अधिक नेमकेपणाने बोलू शकतात. पुस्तकाबद्दल बोलणे-लिहिणे ही सर्वसाधारणपणे 'समीक्षा' या भारदस्त नावाखाली होते आणि त्याचे लेखकही तसेच भारदस्त साहित्यिक व्यक्तिमत्व असावे लागते. आणि ते लेखनही बहुधा भारदस्त शब्दांची पखरण करत, अप्रचलित अशा परदेशी तज्ज्ञांच्या हवाल्याने लिहावे लागते, असा काहीसा समज दिसतो. 

पण या दोन टोकांच्या मधे काहीच नसते का? 'पुस्तक मला जसे दिसले तसे' म्हणजे सर्वस्वी सापेक्ष अशा मूल्यमापनाची परवानगी नाही का? असेल तर असे कुणी लिहिते का आणि लिहीत असेल तर ही मधली स्पेस कशा तर्‍हेने भरली जाते?' असे प्रश्न मला पडले होते.

शाश्वताचे रंग

मग मला पुस्तक-परिचय या निव्वळ वर्तमानपत्री भरताडामुळे बदनाम झालेल्या प्रकाराचा शोध लागला. पण परिचयामधे अनुस्यूत असलेला तटस्थपणाही झुगारून देऊन त्या पुस्तकाशी माझे जे काही नाते प्रस्थापित झाले असेल त्याच्या प्रभावाखाली सर्वस्वी सापेक्ष, माझ्या आकलनापुरते असे मला काही सांगता येणार नाही का? 

मग 'रसग्रहण' आणि 'परिशीलन' या दोन प्रकारांचा शोध लागला. पहिला प्रकार हा काहीसा 'स्वान्त सुखाय' आहे तर दुसर्‍यात अभ्यासाच्या बांधिलकीचा भाग अधिक यावा लागतो असे दिसते. मग 'अशा प्रकारचे लेखन कितपत होते?' हे तपासू जाता हा प्रकार मराठीत अगदीच काही दुर्मिळ नाही असे लक्षात आले. पण दुर्दैव असे की हा प्रकार बरेचदा वर्तमानपत्री स्तंभाच्या स्वरूपात दिसत असल्याने 'लेख' या सबगोलंकार वर्गवारीखाली ढकलून दिला जातो. यात शब्दमर्यादेत करुन दिलेला 'पुस्तक-परिचय' मी जमेस धरत नाही. ज्यात मूळ पुस्तकाबद्दल लिहित असताना वाचक/लेखक स्वतःही डोकावतो असे लेखन मला अभिप्रेत आहे.

असे लेखन दुर्मिळ नसले, तरी अशा प्रकारची पुस्तके मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतील. कविता हा काव्यप्रकार याबाबत जरा सुदैवी आहे असे म्हणावे लागेल. अरुणा ढेरेंसारख्या कवयित्रीने इतरांच्या कवितांचे, लोकगीतांचे सुंदर परिशीलन करणारे बरेच लेखन केले आहे नि त्याची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. याशिवाय माझ्या वाचण्यात आलेले 'तो प्रवास सुंदर होता' हे कुसुमाग्रज ऊर्फ वि.वा. शिरवाडकर यांचे त्यांचे बंधू के. रं. शिरवाडकर यांनी लिहिलेले साहित्यिक-चरित्र आणि विजय पाडळकर यांनी प्रसिद्ध रशियन कथाकार-नाटककार 'अन्तोन चेखव'वर त्याच फॉर्ममधे लिहिलेले 'कवडसे पकडणारा कलावंत' हे एक पुस्तक.

पण या सार्‍यांचे पूर्वसुरी म्हणावे असे ज्येष्ठ कथाकार विद्याधर पुंडलिक यांनी लिहिलेले 'शाश्वताचे रंग' हे सर्वात उत्तम म्हणावे असे पुस्तक. यात निव्वळ लेखनाबद्दलच नव्हे तर लेखकाबद्दल आणि कपाळावर फुकाची आठी असलेल्या आणि आपण 'मोठे' झालो असे समजणार्‍यांच्या मते केवळ लहानांसाठीच ज्यांच्या फिल्म असतात असे लॉरेन आणि हार्डी यांच्यावरही पुंडलिक मनापासून लिहितात. त्यांच्या सोबत झालेले आपले मैत्र उलगडून दाखवतात. 

या 'अभिजात चक्रम' जोडगोळी खेरीज अभिजाततेच्या कल्पनांना सुरुंग लावणारा डोस्टोव्हस्कीच्या 'क्राईम अ‍ॅन्ड पनिशमेंट' मधला रॉस्कोल्निकॉफ, कामूच्या 'आऊटसायडर' मधला पराया, नाटकाच्या क्षेत्रातही नेमके हेच करणार्‍या आयनेस्कोचे 'र्‍हिनसोरस' हे नाटक, टॉलस्टॉयची अना कारेनिना, इतालियन लेखक ग्वेरेसीचे डॉन आणि पेपोन, अफाट कादंबरी लेखक हेमिन्ग्वे हे आणि यांच्यासारख्या परदेशी साहित्यिकांसोबतच बापूसाहेब माट्यांसारख्या देशी विचारवंतांचाही ते वेध घेत आहेत.

डोस्टोव्हस्कीच्या 'क्राईम अ‍ॅन्ड पनिशमेंट' मधला रॉस्कोल्निकॉफ आणि खुद्द डोस्टोव्हस्की यांच्यावर त्यांनी 'दिशांताकडून' या शीर्षकाचा लेख लिहिला आहे. त्रयस्थपणे न लिहिता जणू या रॉस्कोल्निकॉफशी संवाद साधतो आहे अशा धाटणीत लिहिल्यामुळे या लेखाला एक सापेक्षतेची आणि आपुलकीची मिती मिळाली आहे. सर्वसाधारण समाजाच्या दृष्टीने विकृत ठरलेल्या या व्यक्तिमत्वाबद्दल नि त्याच्या भवतालाबाबत आपल्या अनुभवांबद्दल पुंडलिक बोलताहेत.

-oOo-

या पुस्तकातील एक वेचा: दिशांताकडून


हे वाचले का?

रविवार, १८ डिसेंबर, २०१६

दिशांताकडून

रॉस्कॉलनिकोफ!

तुला प्रिय म्हणता येत नाही. प्रिय कुणाला म्हणायचं? जिथं एखादं नातं आहे, जवळचा धागा आहे तिथं. असा धागा तुझ्यामाझ्यात कुठं आहे?

त्यामुळे तुझ्याशी काय बोलावं हे कधी नीट कळलं नाही. इतकंच काय, पण असं बोलण्यापूर्वी सुरुवात कोणत्या शब्दात करावी हेसुद्धा बरोबर सुचत नाही.

एके काळी- विशेषतः तरुण वयात - तर तुझ्याशी अशा जिव्हाळ्यानं बोलणं अशक्य होतं!

शाश्वताचे रंग

तुझी कहाणी वाचली ते दोन दिवस अन् दोन रात्री मला अजूनही स्पष्ट आठवतात. छाती सारखी धडधडत होती! वाचताना एका जागी बसवत नव्हतं. हिंदू कॉलनीतल्या माझ्या खोलीत ताठ बसून, अंग आवळून, भिंतीला कसाबसा रेलून, येरझार्‍या घालून मी वाचत होतो. वाचताना एकदासुद्धा आडवा झालो नाही! जेवणखाण अन् चहापाणी करत होतो, पण त्यात कमालीचं नि:संगपण होतं. आपलं डोकं गरगरतंय- आपल्याला भ्रम होणार असं वाटंत होतं.

तुझी कहाणी संपली तेव्हा खोलीत स्वस्थ बसणं मला अशक्य झालं. बाहेर पडलो. दादरच्या हिंदू कॉलनीतले तेव्हाचे गॅसचे थरथरणारे दिवे, सळसळणारी झाडी, धुक्यात तरंगावीत तशी दिसलेली माणसं अन् नुसताच चालणारा मी - माझ्याजवळ माझे पाय आहेत हीच एक संवेदना... अजूनही ते क्षण कापले गेल्यासारखे अन् स्थिर, जागच्या जागी आहेत!

मी माझ्या एका मित्राकडे गेलो. वेळ रात्रीची- बाराची! त्याच्या दारावर थापा मारल्या. त्याने दार उघडले, डोळे चोळत घाबरून विचारले-

"काय रे?"

"काही नाही- सहज आलो होतो. मी इथेच झोपेन आता."

वय तेवीस. एम. ए. चे पहिले वर्ष. मनाची अवस्था काही कारणांमुळे दिशाशून्य. आज आता पन्नाशी ओलांडून पुढे गेलो आहे. विचार-भावनांना थोडासा प्रगल्भपणा आला आहे. तेव्हा वाटणारी तुझ्याबद्दलची भीती जवळ जवळ गेली आहे. पण अजूनही ती पूर्णपणे नाहीशी झालेली नाही. (नाहीतरी काही लोक तुझ्या मानसपित्याला 'अंधारपुत्रांचा जनक' आणि 'वेड्यांच्या इस्पितळाचा शेक्स्पिअर' म्हणतातच!)

तुझी आई! साठीची म्हातारी. 'आपल्या दरिद्री घरात आशेच्या एकाच किरणासारख्या असलेल्या, कॉलेजपर्यंत गेलेल्या या आपल्या तरुण पोराचं काय भयंकर झालं हे?' या चिंतेनं तिचा ऊर कितीतरी वेळा फुटून निघतो. पण सदोदित भीतीने तो कसाबसा सांधून ती तुला जवळ घेते. तुझ्या बहिणीची - 'दुन्या'ची - माया करडी असली तरी कमी नाही. पण तुझ्या विकृत अहंकाराची तिच्याही मनावर अशीच दहशत! तिची तुझ्याबद्दलची माया पाझरली- पण ती शेवटी शेवटी. तुझ्या आईला आणि बहिणीला प्रेमापायी पण तुझ्यासाठीच पाठीशी घेऊन , तुझ्या मागे सतत उभ्या असलेल्या आनंदी अन् मोकळ्याढाकळ्या स्वभावाच्या त्या राजुमिखिनचीही तीच गत. "मित्रांना मदत करण्यापलीकडे या मूर्ख माणसाला आयुष्यातलं काही समजत नाही." म्हणून तू जळजळीत नजरेनं त्याच्याकडे बघत राहतोस की हा तुझा एकमेव मित्रही तुझ्यापुढे नेहमी दचकलेला असतो- "They all want to be my fairy Gods. They even love me as if they hated. I hate them all!"

पण सोन्या! तुझ्यासारख्या गुन्हेगारावर प्रेम करणारी एकुलती एक ती साधीभोळी गरीब मुलगी! संसाराचा विस्कोट करणार्‍या दारुड्या बापाच्या घरासाठी स्त्रीत्वाचं आणि वेश्येचं दुहेरी दु:ख पत्करलेल्या या मुलीपुढे तू अखेरच्या क्षणी गुडघे टेकतोस आणि म्हणतोस- "In bowing before you, I bow before the entire suffering humanity." पण त्या अंतिम पश्चात्तापाच्या क्षणीही सोन्या तुझ्याजवळ येतच नाही.

"काय म्हणतोय हा? काय म्हणतोय हा?" असं मनातल्या मनात म्हणत ती थरथरत दूरच राहते!

एकाच वेळी मनात भयंकर भीती अन् खोल करुणा निर्माण करणारे तुझ्यासारखे दुसरे व्यक्तिमत्त्व नाही!

तळाशी भीती असलेलं, तुझ्याबद्दलचं प्रचंड कुतूहल अनेकांना आहे. याचं कारण तुझ्या प्रतिमेमागं तुझा मानसपिता डोस्टोव्हस्की आहे!

डोस्टोव्हस्की! (अनेक उद्गारचिन्हे!) एके काळचा लष्करातला अधिकारी. तरुणपणी बापाचा खून झालेला. नेहमी गळ्यापर्यंत कर्जात बुडालेला. त्यापायी अनेक वेळा गळफास घेऊन उभा राहिलेला. जुगार खेळून खेळून पुरा भणंग होऊनही त्याचा भन्नाट कैफ अंगात भिनलेला. पाच वर्षे तुरुंगात खडी फोडलेला. वारंवार येणार्‍या फेफर्‍यांनी सदोदित गळून गेलेला. रोजच्या जगापेक्षाही चित्रविचित्र स्वप्नांच्या गूढ अन् अज्ञात प्रदेशात, त्यातल्या गल्ल्याबोळात अन् दर्‍याखोर्‍यात वारंवार भटकणारा. वधस्तंभापर्यंत जाऊन केवळ एका मिनिटाच्या चुकामुकीने परत जीवनात ढकलला गेलेला. खर्‍या ख्रिश्चन धर्मानं (म्हणजे रशियातील) मानवजातीच्या उद्धाराचं कंकण बांधलेलं आहे अशी माथेफिरू श्रद्धा बाळगणारा...

अशा डोस्टोव्हस्कीनं अनेकांची मती गुंग केली आहे. ख्रिस्ताला पहिला अन् शेवटचा ख्रिश्चन मानणारा, 'सामान्य मानवजातीला आपल्या विराट पंजात दाबून धरणारा एक उंच महामानव पाहिजेच.' असं निडरपणे सांगणारा तो धिप्पाड नित्झे म्हणतो- " माणसाचं खरं मानसशास्त्र मी डोस्टोव्हस्कीकडून शिकलो!" माणसाचं मन वरवर दिसतं तसं नसतं, ते अथांग आहे, ही महासागरी जाणीव ज्याने आम्हाला जास्तीत जास्त भेदकपणे दिली त्या फ्रॉईडने तुझी स्वप्ने आपल्या विश्लेषणासाठी आव्हानपूर्वक निवडली आणि त्या स्वप्नांची पूर्ण गुंतागुंत आपल्याला समजत नाही अशी कबुलीही दिली! (फ्रॉईडचा हा शहाणपणा त्याच्या साहित्य-शाखेतील शिष्यांत मात्र नाही! लेखक-चरित्रातील विकृती आणि गंड शोधून त्याच्या साहित्याचे ते अन्वय लावीत बसलेले असतात- डोक्यातल्या उवा शोधत बसावे तसे!) खुद्द अनेक लहानमोठ्या लेखकांना तुझ्या या मानसपित्याबद्दल एका वेगळ्याच कारणासाठी आदरयुक्त भीती आहे. अ‍ॅमेझॉनच्या जंगलातले शिकारी आदिवासी आपल्या धनुष्याची दोरी जास्तीत जास्त ताणली जावी म्हणून आपल्या फुगीर छातीचं तकट छाटीत असत म्हणे! माणसाच्या अनुभवाच्या अफाट प्रदेशाच्या शेवटच्या सीमेपर्यंत आपल्या प्रतिभेचा बाण सणसणत जाऊन पडावा म्हणून या डोस्टोव्हस्कीने आपली छाती तशी छाटून घेतली होती. फार थोड्या लेखकांना स्वतःला असं रक्तबंबाळ करून घेता येतं. पण त्यांनी असं केलं तरी त्यांच्या प्रतिभेचा बाण दूर जाऊन पडेलच अशीही दुर्दैवाने खात्री नसते! कारण जसं जगणं तसंच लिहिलं जाणं हे साहित्यातलं एक अपूर्ण समीकरण आहे. डोस्टोव्हस्कीची छाटलेली छाती अशी की त्याने ते करून दाखवले! त्याचे पाय मातीखालच्या मातीत होते आणि मस्तक आकाशाच्या पलीकडे होते. त्याच्या लेखणीने ही मातीही आणली अन् 'वरचे' ऊनही तिच्यावर चमकले. स्वतः तो विकृतीच्या सळसळत्या नागांशी खेळला आणि त्याच्या लेखणीतही विकृतीचे तेच डंंख आले. अगदी अफलातून अवास्तव जीवन तो जगला आणि त्या दु:खभोगांची अवास्तवता त्याने आपल्या कादंबर्‍यातही इतक्या प्रभावीपणे आणली, की अवास्तवता ही कलेची एक मूलभूत अट आहे हे तुम्हा आम्हाला मान्य करावे लागले.

तर असा हा तुझा मानसपिता! तुझ्यात जे रक्त उतरलं आहे ते या असल्या जबरदस्त बापाचं. साहजिकच त्या रक्तातले काही गुण तुझ्याही रक्तात उतरले.

पण तुझ्याबद्दल अजूनही किंचित भीती वाटण्याचं आणखी एक कारण आहे. माणसाचं आयुष्य अन् समाजजीवन काही काही वेळा असं काही अगतिक, क्रूर आणि असह्य होऊन बसतं की, प्रत्येक साधारण माणसाच्या डोक्यात एक क्षणभरच का होईना, पण खुनाची कल्पना दबा धरून बसते. प्रत्येकाच्या डोक्यात हाती असलेल्या अदृश्य पिस्तुलाचा स्फोट होतो, एखादा सुरा लखलखून जातो किंवा कुर्‍हाडीचे कचकचते घाव घुमत राहतात. भीतीमुळे, तिरस्कारामुळे, संस्कारामुळे शहारून घालवलेला, विसरलेला, शरमेनं दाबलेला अन् विझवलेला हा खुनाचा क्षण तू पकडतोस. इतक्या सामर्थ्यानं, की ती खुनाची भयंकर फँटसीही खरी वाटू लागते. खुनाचे अतिशयोक्त आकार नैसर्गिक वाटू लागतात. खुनाची विकृती ही विलक्षण प्रमाणबद्ध वाटू लागते. आणि मग प्रत्येक संवेदनाक्षम वाचक, डोक्यात लपलेल्या त्या क्षणैक खुनाच्या आठवणीनं तुझ्या मूर्तीमागून चालत राहतो- दुरून का होईना, चालत राहतो!

पंचवीस वर्षांपूर्वी मी तुझ्या मागून चालत आलो तो असा!

- oOo -

पुस्तकः शाश्वताचे रंग
लेखकः विद्याधर पुंडलिक
प्रकाशकः सुपर्ण प्रकाशन
आवृत्ती पहिली (मार्च १९८६)
पृ. ८३ - ८७.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : शाश्वताचे रंग >>
---


हे वाचले का?

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

वेचताना... : कबीरा खडा बाजारमें

फेसबुकसारख्या सोशल मीडियावर असेल किंवा एकुणच माणसांच्या समाजात, एक नियम दिसतो की माणसाची ओळख ही प्रामुख्याने त्याच्या समाजाच्या संदर्भातच असते. एखाद्या नवीन व्यक्तीचा परिचय झाला की आडनाव विचारल्याखेरीज नि त्यावरून 'ती कोणत्या समाजाची असेल' याची मनातल्या मनात नोंद केल्या खेरीज बहुतेकांना परस्परांच्या मैत्रीच्या, नात्याच्या वाटेवर पुढचे पाऊल टाकणे अवघड होते. 

कबीरा खडा बाजारमें

एकदा एका गटाच्या खोक्यात तिला बसवले की मग तिळा उघड म्हणताच धाडकन शिळा दूर सरून भारंभार खजिना दिसावा तसे त्यांना होते. अधिक काही न विचारता त्या व्यक्तीबाबत बरेच काही आपल्याला समजल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. कारण ज्या गटात त्याला बसवले त्या गटाचे - गृहित! - गुणदोष त्याच्यातही आहेत असे मानले तरी बहुसंख्येला - परस्परविरोधी कारणाने कदाचित - ते मान्य होते... त्या व्यक्तीला मान्य असण्याची गरज नसते.

एकुणच व्यक्ती म्हणून कोणतीही स्वतंत्र आयडेंटिटी तुम्हाला नाकारली जाते, थोडीफार सवलत मिळाली तरी ती दुय्यम मानून बहुतेक प्रसंगी 'आम्ही तुम्हाला दिलेल्या' गटाला, त्याच्या हितसंबंधाला अनुसरून तुम्ही वागले पाहिजे असा समाजाचा हट्ट असतो. तुमचे आचारविचार स्वातंत्र्य वापरून तुम्ही काही वेगळे बोललात वागलात तरी ते खरे नाही, पवित्रा आहे. 'आतून ना आम्ही म्हणतो तस्सेच तुम्ही आहात.' असा ठाम समज बहुतेकांनी करून घेतलेला असतो. गटाच्या भूमिकेशी सुसंगत घेतलेली 'एक' भूमिका तुमची 'खरी भूमिका' असते आणि इतर हजारो प्रसंगी घेतलेली विसंवादी भूमिका हे साऽरे अपवाद असतात असे मानले जाते.

दिनानाथ मनोहरांची 'कबीरा खडा बाजारमें' ही कादंबरी ही दोन सर्वस्वी भिन्न प्रकृतीच्या 'व्यक्तीं'ची सामाजिक चढाओढीत झालेली फरफट आणि त्या चढाओढींच्या विविध अनुषंगांच्या आधारे उभे राहिलेले विविध व्यक्तींचे चित्रण करते. जात, धर्म, संघटना यांच्या प्रभावाखाली असलेल्या आणि एकाच वेळी परस्परविरोधी दिशांनी खेचल्या जाणार्‍या सामान्यांच्या झगड्याचे वास्तव समोर ठेवते. या कादंबरीबाबत विस्तृतपणे लिहिले जायला हवेच.

-oOo-

या कादंबरीतील एक वेचा: आयडेंटिटी


हे वाचले का?

आयडेंटिटी

कणाद थांबला. त्याने दादांकडे पाहिलं. सुमीकडे पाहिलं. तो जरासा शंकित झाला. आपण जे काही बोलतोय, ते यांना समजतंय का? त्याच्या अनुभवाचा अर्थ लावायचा ते प्रयत्न करताहेत का? काही क्षण द्विधा मनस्थितीत गप्पच राहिला. मग म्हणाला "माणूस जीवनात तसा एकटाच असतो नेहमी. आणि हा एकटेपणा सुसह्य नसतो. त्यावर सतत मात करण्याचा प्रयत्न असतो व्यक्तीचा. पण कित्येक वेळा या एकटेपणाच्या भावनेतून सुटायला तुम्हाला स्वत्वावर मर्यादा घालाव्या लागतात. स्वत्व नाकारावं लागतं. दादा, तुम्ही एकटे पडले आहात. तुम्ही रूढीवादी विचारांचे, आचाराचे नाहीत, म्हणून तुम्ही तुमच्या जातीपासून दुरावला आहात. तुम्ही उच्च जातीशी जमवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते तुम्हाला जवळ करतात दुय्यम जातीचे म्हणून, आणि सोयीचे असेल तेव्हाच.

कबीरा खडा बाजारमें

बाहेरच्या समाजात व्यक्तीला जर आयडेंटिटी नसेल ना, तर ती व्यक्ती कुटुंबात अधिकार गाजवायला सुरुवात करते. पण अधिकाराचं नातं हे माणसांचं नातं नसतं. परस्परसन्मान, परस्परसंवाद नसेल तर कुटुंबातील नातंही तकलादू, कचकडी असतं. कदाचित काहीसं आकर्षक दिसेल पाहाणार्‍याला. परंतु जरा धक्का लागताच भंग पावणारं. तुकडे तुकडे होणारं. भारतीय समाजाच्या संदर्भात यावर उपाय आहे- मानवी संबंध आकारात आणा. कुटुंबात असो वा समाजात, वर्चस्ववादी संबंध नाकारा. सर्व लहानमोठ्या, नीचउच्च जातींतील व्यक्तींशी परस्परसन्मानाचं, संवादाचं नातं बांधा. याला काही पर्याय नाही, दादा."

दादा काहीच बोलले नाहीत. त्यांच्या मनात चाललेला गोंधळ त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. आता या प्रसंगाचा शेवट कसा करायचा? गजू आताच आला तर किती बरं होईल! कणाद विचार करत होता. सुमीने केलेल्या हालचालीमुळे त्यांच तिच्याकडे लक्ष गेलं. ती पुढे झुकली होती. त्याच्याकडेच रोखून पाहात होती. "कणाद, तुमच्या या त्रयस्थ आणि तटस्थ भूमिकेतून केलेल्या विश्लेषणाला अर्थ निश्चितच आहे. पण आमच्याबद्दल जे विश्लेषण तुम्ही केलं आहे तेच तुम्हालाही लागू पडतंय. दादांचा रोल तर काय, या सर्व नाट्यात दुय्यम होता. पण तुमची भूमिका तर प्रमुख होती. विशेषतः त्यांचा सर्वच डाव तुम्ही विस्कटून टाकला आहे. तुम्हालाही ते बाजूला ढकलून देणारच. केवळ तेवढंच नाही, तर तुम्हाला त्याबद्दल सजाही देणार. तसं सोडणार नाहीत ते तुम्हाला."

कणाद काही क्षण सुमीकडे डोळे विस्फारुन पाहात राहिला. आपलं बालपण आणि तारुण्यही घराच्या चार भिंतीआड घालवलेल्या या बाईला ही समज कुठून लाभलीय? चर्चा, सेमिनार्स, बौद्धिक चर्चासत्रे माहीतही नसलेल्या आणि स्वयंपाकघरात कित्येक वर्षे घालवलेल्या या सुमीला ही दृष्टी कशी मिळालीय?

त्याने एक दीर्घ सुस्कारा सोडला. मग काहीशा हताश स्वरात तो म्हणाला, "बरोबर आहे तुझं म्हणणं सुमी. पण या वाडीतील लोकांमध्ये मला कधीच स्थान नव्हतं. मी ते मिळवायचा प्रयत्नही केलेला नाही. मला त्यांनी सामावून घ्यावं अशी इच्छाच नव्हती माझी. ज्यांना मला 'माझी माणसं' म्हणता येतील अशी माणसं मी शोधली आहेत. हे ते जाणीवपूर्वक करतात असं नसेलही. ते थोडे असतील. पण ते लोक माझे आहेत. त्यामध्ये गजू आहे, बबन आहे, दादा आहेत, तू आहेस, माझी आई आहे, मी तर म्हणतो रंजनाताईही आहेत. त्यामुळे माझी सामाजिक गरज पुरी होते. निदान काही प्रमाणात तरी. सुदैवानं माझं असमाधान, माझी आत्मसंतुष्टता यांना वाट करून देण्यासाठी वयाने लहान, अवलंबून असलेल्या व्यक्तींवर अधिकार गाजवायला मला माझं कुटुंबच नाहीय. तसं कुटुंब असतं तर मी तशा प्रकारचा अधिकार गाजवला नसता अशी खात्री मी ही देऊ शकत नाही, सुमी."

"पण हे तुमचं पर्यायी सामाजिक जीवनही तकलादू असू शकतं. कुणी मनात आणलंच ते ते तोडूही शकतं. या व्यक्तींच्या संबंधांचा पाया ठिसूळ आहे असं नाही वाटंत तुम्हाला?"

तो बोलला नाही बराच वेळ. मग अगदी खोल आवाजात म्हणाला, "बरोबर आहे. आणि ते माझं भावविश्व तुटलं ना, तर मीही पराजितच होईन या लढाईत. पण तात्पुरता सुमा. मी परत परत माझ्याभोवती हे लहानसं का होईना, माझं विश्व शोधून काढेन. त्याला आकार देईन. माझे लोक शोधून काढेन. त्यांच्याशी नव्याने नातं निर्माण करेन. परत परत करत राहीन. अशा परित्यक्त, एकाकी व्यक्तींची या जातीय उतरंड असलेल्या समाजात काही कमी नाहीये. जेव्हा समाजात स्थित्यंतर घडत असतं ना, मन्वंतराचा काळ असतो ना, त्यावेळी समाजापासून तुटलेल्या, अशा व्यक्तींची संख्या वाढते. अशा स्थितीत, अशा एलिअनेटेड व्यक्तींचं सातत्यानं उत्पादन होतंच राहणार आहे सुमा. समाजातील कुठलाही स्तर, कुठलीही जात, कुठलाही वर्ग याला अपवाद नाही. प्रत्येक स्तरात, जातीत अशा व्यक्ती आकारास येतच राहणार. त्यांच्याशी नातं जोडत राहणं हाच उपाय आहे ना यावर?"

- oOo -

पुस्तक: कबीरा खडा बाजारमें
लेखकः दिनानाथ मनोहर
प्रकाशकः लोकवाङ्मय गृह
आवृत्ती पहिली (फेब्रुवारी २००८)
पृ. २७१-२७३.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : कबीरा खडा बाजारमें >>
---


हे वाचले का?

मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

वेचताना... : सारे प्रवासी घडीचे

आर.के. नारायण यांनी लिहिलेले 'मालगुडी डेज्' हे पुस्तक प्रचंड गाजले. 'दूरदर्शन'ने त्यावर त्याच नावाची एक मालिकाही केली. त्या मालिकेसाठी नारायण यांचे बंधू प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेल्या रेखाचित्रांमुळे ती मालिका आणि ते पुस्तक यांच्या लोकप्रियतेत भरच पडली. मालगुडी या एकाच गावातील विविध व्यक्ती, घटना, परिसर, बदलत्या जगाच्या तिथे उमटणार्‍या पाऊलखुणा, त्यातून तिथे बदलत जाणारे विश्व, अगदी लहान मुलापासून ते इंग्रजी साहेबाकडे कारकुनी करणार्‍या नव-बूर्ज्वा समाजाचे वेधक चित्रण त्या पुस्तकाने केले.

सारे प्रवासी घडीचे

मराठीतूनही असाच प्रयोग झाला, पुस्तक म्हणून तो बर्‍याच अंशी यशस्वी झाला. परंतु मालगुडी डेज् प्रमाणे माध्यमांतराचा कळसाध्याय मात्र त्याला लाभला नाही. जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या 'सारे प्रवासी घडीचे' या पुस्तकातून भेटलेली कोकणातील माणसे, त्यांच्या जगण्याचे आधार किंवा त्यांचा अभाव, जातीव्यवस्थेचे ताणेबाणे, पोटाला दोन वेळचे अन्न जेमतेम मिळवत असणार्‍या/नसणार्‍या साध्यासुध्या माणसांचे विलक्षण पीळ, त्यांचे पूर्वग्रह आणि हेवा-असूयादि गुणवैशिष्ट्ये, पुरोगामित्वाच्या तसंच राजकीय स्वातंत्र्याचे वारे वाहात असताना त्यांच्या जगण्यात उठणारे तरंग इ. अनेक अंगांना स्पर्श करत हे पुस्तक पुढे जाते.

याला मी निव्वळ पुस्तक म्हणतो आहे, कथासंग्रह किंवा कादंबरी म्हणत नाही. कारण रूढार्थाने हे दोन्हींमधे बसते किंवा बसत नाहीदेखील. खरंतर या पुस्तकाची अनेक वर्षांनी आठवण झाली ती अशाच फॉर्ममधील गणेश मतकरी यांनी अर्वाचीन, महानगरी समाजावर लिहिलेल्या 'खिडक्या अर्ध्या उघड्या' या पुस्तकामुळे. या फॉर्ममधे म्हटलं तर प्रत्येक प्रकरण हे स्वतंत्र आहे. त्याच्याकडे एक स्वतंत्र कथा म्हणून पाहता येते. परंतु त्याचबरोबर त्या कथांमधे काही पात्रे सामायिक आहे, अन्य कथांमधे घडलेल्या घटनांचा सांधा तिथे जुळलेला आहे. त्या अर्थी ते कादंबरीच्या जवळ जाते. पण त्याचवेळी एकत्रितपणे एक कादंबरी म्हणून उभे राहात नाही.

पुस्तकाचा घाट पाहिला तर ते माझ्यापुरते ते व्यक्तिप्रधान दिसते, किंवा माझा तसा दृष्टीकोन आहे असे म्हणू. त्यात कथानकाच्या प्रवाहाला तितके ठळक स्थान नाही. दळवींनी एक एक व्यक्ती ठाशीवपणे उभी केली आहे. केवळ उल्लेखाने येऊन गेलेल्या व्यक्तींची संख्या नगण्य. तसंच त्या व्यक्तीसंदर्भात घडलेल्या घटना वा घटनाप्रवाह ध्यानात राहण्याऐवजी तुमच्या मनात उभे राहते ते त्या त्या व्यक्तीचे व्यक्तिचित्र. हाफम्याड तात्या, पावट्या, नरु, बाबल्या मडवळ, बागाईतकर मास्तर, अमृते मास्तर, आणि मुख्य म्हणजे आबा आणि बाबुली हे दोन जमीनदार, यांचे नाव घेताच त्यांचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते. या अचाट व्यक्तिरेखा एकदा तरी साकार समोर याव्यात अशी इच्छा मनात उभी राहते.

'सारे प्रवासी घडीचे'ची पुन्हा एकवार आठवण झाल्यावर यातील एखादा वेचा 'वेचित चाललो'साठी घ्यावा असे ठरवले. विकत घेतलेली माझी चौथी प्रतही गायब झाल्याचे ध्यानात आल्यावर एका मित्राकडून घेऊन आलो. जसजसे पुन्हा वाचत गेलो तस तसे यातून एक वेचा निवडणे किती जिकीरीचे आहे हे ध्यानात येऊ लागले.

नक्की काय घ्यायचे? 'आपूच्या शाळेचा पहिला दिवस', 'अंगविक्षेपांसह म्हणायचे गाणे आणि त्यात आलेला विक्षेप', बाबल्या मडवळाचे भकास जिणे, परंपरेबरोबरच अधिकाराचा चतुराईने वापर करून कुळांवर वर्चस्व ठेवून असणारे आबा, बापाचे छत्र हरवलेल्या अत्रंगी नरुचे वारे भरले जगणे, आपद्धर्म म्हणून केशा चांभाराला लोकल बोर्डावर निवडून आणतानाही कटाक्षाने अस्पृश्यता पाळणारे आबा, डॉ. रामदास यांचे पूर्णान्न ...?

एकाहुन एक उतारे निवडले नाहीत, तोवर हा नको दुसरा घेऊ असे डोक्यात येई. अखेर एकुण पुस्तकाचा तोंडवळा बर्‍यापैकी पकडणारा हा उतारा सापडेतो महिना गेला. विस्ताराने मोठा असल्याने दोन ठिकाणी मधले तपशील वगळले आहेत.

-oOo-

या पुस्तकातील एक वेचा: माणसे


हे वाचले का?