सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

वेचताना... : शाश्वताचे रंग

सर्वसामान्य व्यक्ती एखादे पुस्तक वाचल्यानंतर ते 'आवडले किंवा आवडले नाही किंवा ठीक आहे' अशा तीन सर्वसाधारण श्रेणींमधे प्रतिक्रिया देते. फार थोडे जण त्याबाबत अधिक नेमकेपणाने बोलू शकतात. पुस्तकाबद्दल बोलणे-लिहिणे ही सर्वसाधारणपणे 'समीक्षा' या भारदस्त नावाखाली होते आणि त्याचे लेखकही तसेच भारदस्त साहित्यिक व्यक्तिमत्व असावे लागते. आणि ते लेखनही बहुधा भारदस्त शब्दांची पखरण करत, अप्रचलित अशा परदेशी तज्ज्ञांच्या हवाल्याने लिहावे लागते, असा काहीसा समज दिसतो. 

पण या दोन टोकांच्या मधे काहीच नसते का? 'पुस्तक मला जसे दिसले तसे' म्हणजे सर्वस्वी सापेक्ष अशा मूल्यमापनाची परवानगी नाही का? असेल तर असे कुणी लिहिते का आणि लिहीत असेल तर ही मधली स्पेस कशा तर्‍हेने भरली जाते?' असे प्रश्न मला पडले होते.

शाश्वताचे रंग

मग मला पुस्तक-परिचय या निव्वळ वर्तमानपत्री भरताडामुळे बदनाम झालेल्या प्रकाराचा शोध लागला. पण परिचयामधे अनुस्यूत असलेला तटस्थपणाही झुगारून देऊन त्या पुस्तकाशी माझे जे काही नाते प्रस्थापित झाले असेल त्याच्या प्रभावाखाली सर्वस्वी सापेक्ष, माझ्या आकलनापुरते असे मला काही सांगता येणार नाही का? 

मग 'रसग्रहण' आणि 'परिशीलन' या दोन प्रकारांचा शोध लागला. पहिला प्रकार हा काहीसा 'स्वान्त सुखाय' आहे तर दुसर्‍यात अभ्यासाच्या बांधिलकीचा भाग अधिक यावा लागतो असे दिसते. मग 'अशा प्रकारचे लेखन कितपत होते?' हे तपासू जाता हा प्रकार मराठीत अगदीच काही दुर्मिळ नाही असे लक्षात आले. पण दुर्दैव असे की हा प्रकार बरेचदा वर्तमानपत्री स्तंभाच्या स्वरूपात दिसत असल्याने 'लेख' या सबगोलंकार वर्गवारीखाली ढकलून दिला जातो. यात शब्दमर्यादेत करुन दिलेला 'पुस्तक-परिचय' मी जमेस धरत नाही. ज्यात मूळ पुस्तकाबद्दल लिहित असताना वाचक/लेखक स्वतःही डोकावतो असे लेखन मला अभिप्रेत आहे.

असे लेखन दुर्मिळ नसले, तरी अशा प्रकारची पुस्तके मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतील. कविता हा काव्यप्रकार याबाबत जरा सुदैवी आहे असे म्हणावे लागेल. अरुणा ढेरेंसारख्या कवयित्रीने इतरांच्या कवितांचे, लोकगीतांचे सुंदर परिशीलन करणारे बरेच लेखन केले आहे नि त्याची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. याशिवाय माझ्या वाचण्यात आलेले 'तो प्रवास सुंदर होता' हे कुसुमाग्रज ऊर्फ वि.वा. शिरवाडकर यांचे त्यांचे बंधू के. रं. शिरवाडकर यांनी लिहिलेले साहित्यिक-चरित्र आणि विजय पाडळकर यांनी प्रसिद्ध रशियन कथाकार-नाटककार 'अन्तोन चेखव'वर त्याच फॉर्ममधे लिहिलेले 'कवडसे पकडणारा कलावंत' हे एक पुस्तक.

पण या सार्‍यांचे पूर्वसुरी म्हणावे असे ज्येष्ठ कथाकार विद्याधर पुंडलिक यांनी लिहिलेले 'शाश्वताचे रंग' हे सर्वात उत्तम म्हणावे असे पुस्तक. यात निव्वळ लेखनाबद्दलच नव्हे तर लेखकाबद्दल आणि कपाळावर फुकाची आठी असलेल्या आणि आपण 'मोठे' झालो असे समजणार्‍यांच्या मते केवळ लहानांसाठीच ज्यांच्या फिल्म असतात असे लॉरेन आणि हार्डी यांच्यावरही पुंडलिक मनापासून लिहितात. त्यांच्या सोबत झालेले आपले मैत्र उलगडून दाखवतात. 

या 'अभिजात चक्रम' जोडगोळी खेरीज अभिजाततेच्या कल्पनांना सुरुंग लावणारा डोस्टोव्हस्कीच्या 'क्राईम अ‍ॅन्ड पनिशमेंट' मधला रॉस्कोल्निकॉफ, कामूच्या 'आऊटसायडर' मधला पराया, नाटकाच्या क्षेत्रातही नेमके हेच करणार्‍या आयनेस्कोचे 'र्‍हिनसोरस' हे नाटक, टॉलस्टॉयची अना कारेनिना, इतालियन लेखक ग्वेरेसीचे डॉन आणि पेपोन, अफाट कादंबरी लेखक हेमिन्ग्वे हे आणि यांच्यासारख्या परदेशी साहित्यिकांसोबतच बापूसाहेब माट्यांसारख्या देशी विचारवंतांचाही ते वेध घेत आहेत.

डोस्टोव्हस्कीच्या 'क्राईम अ‍ॅन्ड पनिशमेंट' मधला रॉस्कोल्निकॉफ आणि खुद्द डोस्टोव्हस्की यांच्यावर त्यांनी 'दिशांताकडून' या शीर्षकाचा लेख लिहिला आहे. त्रयस्थपणे न लिहिता जणू या रॉस्कोल्निकॉफशी संवाद साधतो आहे अशा धाटणीत लिहिल्यामुळे या लेखाला एक सापेक्षतेची आणि आपुलकीची मिती मिळाली आहे. सर्वसाधारण समाजाच्या दृष्टीने विकृत ठरलेल्या या व्यक्तिमत्वाबद्दल नि त्याच्या भवतालाबाबत आपल्या अनुभवांबद्दल पुंडलिक बोलताहेत.

-oOo-

या पुस्तकातील एक वेचा: दिशांताकडून


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा