रविवार, १८ डिसेंबर, २०१६

दिशांताकडून

रॉस्कॉलनिकोफ!

तुला प्रिय म्हणता येत नाही. प्रिय कुणाला म्हणायचं? जिथं एखादं नातं आहे, जवळचा धागा आहे तिथं. असा धागा तुझ्यामाझ्यात कुठं आहे?

त्यामुळे तुझ्याशी काय बोलावं हे कधी नीट कळलं नाही. इतकंच काय, पण असं बोलण्यापूर्वी सुरुवात कोणत्या शब्दात करावी हेसुद्धा बरोबर सुचत नाही.

एके काळी- विशेषतः तरुण वयात - तर तुझ्याशी अशा जिव्हाळ्यानं बोलणं अशक्य होतं!

शाश्वताचे रंग

तुझी कहाणी वाचली ते दोन दिवस अन् दोन रात्री मला अजूनही स्पष्ट आठवतात. छाती सारखी धडधडत होती! वाचताना एका जागी बसवत नव्हतं. हिंदू कॉलनीतल्या माझ्या खोलीत ताठ बसून, अंग आवळून, भिंतीला कसाबसा रेलून, येरझार्‍या घालून मी वाचत होतो. वाचताना एकदासुद्धा आडवा झालो नाही! जेवणखाण अन् चहापाणी करत होतो, पण त्यात कमालीचं नि:संगपण होतं. आपलं डोकं गरगरतंय- आपल्याला भ्रम होणार असं वाटंत होतं.

तुझी कहाणी संपली तेव्हा खोलीत स्वस्थ बसणं मला अशक्य झालं. बाहेर पडलो. दादरच्या हिंदू कॉलनीतले तेव्हाचे गॅसचे थरथरणारे दिवे, सळसळणारी झाडी, धुक्यात तरंगावीत तशी दिसलेली माणसं अन् नुसताच चालणारा मी - माझ्याजवळ माझे पाय आहेत हीच एक संवेदना... अजूनही ते क्षण कापले गेल्यासारखे अन् स्थिर, जागच्या जागी आहेत!

मी माझ्या एका मित्राकडे गेलो. वेळ रात्रीची- बाराची! त्याच्या दारावर थापा मारल्या. त्याने दार उघडले, डोळे चोळत घाबरून विचारले-

"काय रे?"

"काही नाही- सहज आलो होतो. मी इथेच झोपेन आता."

वय तेवीस. एम. ए. चे पहिले वर्ष. मनाची अवस्था काही कारणांमुळे दिशाशून्य. आज आता पन्नाशी ओलांडून पुढे गेलो आहे. विचार-भावनांना थोडासा प्रगल्भपणा आला आहे. तेव्हा वाटणारी तुझ्याबद्दलची भीती जवळ जवळ गेली आहे. पण अजूनही ती पूर्णपणे नाहीशी झालेली नाही. (नाहीतरी काही लोक तुझ्या मानसपित्याला 'अंधारपुत्रांचा जनक' आणि 'वेड्यांच्या इस्पितळाचा शेक्स्पिअर' म्हणतातच!)

तुझी आई! साठीची म्हातारी. 'आपल्या दरिद्री घरात आशेच्या एकाच किरणासारख्या असलेल्या, कॉलेजपर्यंत गेलेल्या या आपल्या तरुण पोराचं काय भयंकर झालं हे?' या चिंतेनं तिचा ऊर कितीतरी वेळा फुटून निघतो. पण सदोदित भीतीने तो कसाबसा सांधून ती तुला जवळ घेते. तुझ्या बहिणीची - 'दुन्या'ची - माया करडी असली तरी कमी नाही. पण तुझ्या विकृत अहंकाराची तिच्याही मनावर अशीच दहशत! तिची तुझ्याबद्दलची माया पाझरली- पण ती शेवटी शेवटी. तुझ्या आईला आणि बहिणीला प्रेमापायी पण तुझ्यासाठीच पाठीशी घेऊन , तुझ्या मागे सतत उभ्या असलेल्या आनंदी अन् मोकळ्याढाकळ्या स्वभावाच्या त्या राजुमिखिनचीही तीच गत. "मित्रांना मदत करण्यापलीकडे या मूर्ख माणसाला आयुष्यातलं काही समजत नाही." म्हणून तू जळजळीत नजरेनं त्याच्याकडे बघत राहतोस की हा तुझा एकमेव मित्रही तुझ्यापुढे नेहमी दचकलेला असतो- "They all want to be my fairy Gods. They even love me as if they hated. I hate them all!"

पण सोन्या! तुझ्यासारख्या गुन्हेगारावर प्रेम करणारी एकुलती एक ती साधीभोळी गरीब मुलगी! संसाराचा विस्कोट करणार्‍या दारुड्या बापाच्या घरासाठी स्त्रीत्वाचं आणि वेश्येचं दुहेरी दु:ख पत्करलेल्या या मुलीपुढे तू अखेरच्या क्षणी गुडघे टेकतोस आणि म्हणतोस- "In bowing before you, I bow before the entire suffering humanity." पण त्या अंतिम पश्चात्तापाच्या क्षणीही सोन्या तुझ्याजवळ येतच नाही.

"काय म्हणतोय हा? काय म्हणतोय हा?" असं मनातल्या मनात म्हणत ती थरथरत दूरच राहते!

एकाच वेळी मनात भयंकर भीती अन् खोल करुणा निर्माण करणारे तुझ्यासारखे दुसरे व्यक्तिमत्त्व नाही!

तळाशी भीती असलेलं, तुझ्याबद्दलचं प्रचंड कुतूहल अनेकांना आहे. याचं कारण तुझ्या प्रतिमेमागं तुझा मानसपिता डोस्टोव्हस्की आहे!

डोस्टोव्हस्की! (अनेक उद्गारचिन्हे!) एके काळचा लष्करातला अधिकारी. तरुणपणी बापाचा खून झालेला. नेहमी गळ्यापर्यंत कर्जात बुडालेला. त्यापायी अनेक वेळा गळफास घेऊन उभा राहिलेला. जुगार खेळून खेळून पुरा भणंग होऊनही त्याचा भन्नाट कैफ अंगात भिनलेला. पाच वर्षे तुरुंगात खडी फोडलेला. वारंवार येणार्‍या फेफर्‍यांनी सदोदित गळून गेलेला. रोजच्या जगापेक्षाही चित्रविचित्र स्वप्नांच्या गूढ अन् अज्ञात प्रदेशात, त्यातल्या गल्ल्याबोळात अन् दर्‍याखोर्‍यात वारंवार भटकणारा. वधस्तंभापर्यंत जाऊन केवळ एका मिनिटाच्या चुकामुकीने परत जीवनात ढकलला गेलेला. खर्‍या ख्रिश्चन धर्मानं (म्हणजे रशियातील) मानवजातीच्या उद्धाराचं कंकण बांधलेलं आहे अशी माथेफिरू श्रद्धा बाळगणारा...

अशा डोस्टोव्हस्कीनं अनेकांची मती गुंग केली आहे. ख्रिस्ताला पहिला अन् शेवटचा ख्रिश्चन मानणारा, 'सामान्य मानवजातीला आपल्या विराट पंजात दाबून धरणारा एक उंच महामानव पाहिजेच.' असं निडरपणे सांगणारा तो धिप्पाड नित्झे म्हणतो- " माणसाचं खरं मानसशास्त्र मी डोस्टोव्हस्कीकडून शिकलो!" माणसाचं मन वरवर दिसतं तसं नसतं, ते अथांग आहे, ही महासागरी जाणीव ज्याने आम्हाला जास्तीत जास्त भेदकपणे दिली त्या फ्रॉईडने तुझी स्वप्ने आपल्या विश्लेषणासाठी आव्हानपूर्वक निवडली आणि त्या स्वप्नांची पूर्ण गुंतागुंत आपल्याला समजत नाही अशी कबुलीही दिली! (फ्रॉईडचा हा शहाणपणा त्याच्या साहित्य-शाखेतील शिष्यांत मात्र नाही! लेखक-चरित्रातील विकृती आणि गंड शोधून त्याच्या साहित्याचे ते अन्वय लावीत बसलेले असतात- डोक्यातल्या उवा शोधत बसावे तसे!) खुद्द अनेक लहानमोठ्या लेखकांना तुझ्या या मानसपित्याबद्दल एका वेगळ्याच कारणासाठी आदरयुक्त भीती आहे. अ‍ॅमेझॉनच्या जंगलातले शिकारी आदिवासी आपल्या धनुष्याची दोरी जास्तीत जास्त ताणली जावी म्हणून आपल्या फुगीर छातीचं तकट छाटीत असत म्हणे! माणसाच्या अनुभवाच्या अफाट प्रदेशाच्या शेवटच्या सीमेपर्यंत आपल्या प्रतिभेचा बाण सणसणत जाऊन पडावा म्हणून या डोस्टोव्हस्कीने आपली छाती तशी छाटून घेतली होती. फार थोड्या लेखकांना स्वतःला असं रक्तबंबाळ करून घेता येतं. पण त्यांनी असं केलं तरी त्यांच्या प्रतिभेचा बाण दूर जाऊन पडेलच अशीही दुर्दैवाने खात्री नसते! कारण जसं जगणं तसंच लिहिलं जाणं हे साहित्यातलं एक अपूर्ण समीकरण आहे. डोस्टोव्हस्कीची छाटलेली छाती अशी की त्याने ते करून दाखवले! त्याचे पाय मातीखालच्या मातीत होते आणि मस्तक आकाशाच्या पलीकडे होते. त्याच्या लेखणीने ही मातीही आणली अन् 'वरचे' ऊनही तिच्यावर चमकले. स्वतः तो विकृतीच्या सळसळत्या नागांशी खेळला आणि त्याच्या लेखणीतही विकृतीचे तेच डंंख आले. अगदी अफलातून अवास्तव जीवन तो जगला आणि त्या दु:खभोगांची अवास्तवता त्याने आपल्या कादंबर्‍यातही इतक्या प्रभावीपणे आणली, की अवास्तवता ही कलेची एक मूलभूत अट आहे हे तुम्हा आम्हाला मान्य करावे लागले.

तर असा हा तुझा मानसपिता! तुझ्यात जे रक्त उतरलं आहे ते या असल्या जबरदस्त बापाचं. साहजिकच त्या रक्तातले काही गुण तुझ्याही रक्तात उतरले.

पण तुझ्याबद्दल अजूनही किंचित भीती वाटण्याचं आणखी एक कारण आहे. माणसाचं आयुष्य अन् समाजजीवन काही काही वेळा असं काही अगतिक, क्रूर आणि असह्य होऊन बसतं की, प्रत्येक साधारण माणसाच्या डोक्यात एक क्षणभरच का होईना, पण खुनाची कल्पना दबा धरून बसते. प्रत्येकाच्या डोक्यात हाती असलेल्या अदृश्य पिस्तुलाचा स्फोट होतो, एखादा सुरा लखलखून जातो किंवा कुर्‍हाडीचे कचकचते घाव घुमत राहतात. भीतीमुळे, तिरस्कारामुळे, संस्कारामुळे शहारून घालवलेला, विसरलेला, शरमेनं दाबलेला अन् विझवलेला हा खुनाचा क्षण तू पकडतोस. इतक्या सामर्थ्यानं, की ती खुनाची भयंकर फँटसीही खरी वाटू लागते. खुनाचे अतिशयोक्त आकार नैसर्गिक वाटू लागतात. खुनाची विकृती ही विलक्षण प्रमाणबद्ध वाटू लागते. आणि मग प्रत्येक संवेदनाक्षम वाचक, डोक्यात लपलेल्या त्या क्षणैक खुनाच्या आठवणीनं तुझ्या मूर्तीमागून चालत राहतो- दुरून का होईना, चालत राहतो!

पंचवीस वर्षांपूर्वी मी तुझ्या मागून चालत आलो तो असा!

- oOo -

पुस्तकः शाश्वताचे रंग
लेखकः विद्याधर पुंडलिक
प्रकाशकः सुपर्ण प्रकाशन
आवृत्ती पहिली (मार्च १९८६)
पृ. ८३ - ८७.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा