फेसबुकसारख्या सोशल मीडियावर असेल किंवा एकुणच माणसांच्या समाजात, एक नियम दिसतो की माणसाची ओळख ही प्रामुख्याने त्याच्या समाजाच्या संदर्भातच असते. एखाद्या नवीन व्यक्तीचा परिचय झाला की आडनाव विचारल्याखेरीज नि त्यावरून 'ती कोणत्या समाजाची असेल' याची मनातल्या मनात नोंद केल्या खेरीज बहुतेकांना परस्परांच्या मैत्रीच्या, नात्याच्या वाटेवर पुढचे पाऊल टाकणे अवघड होते.
एकदा एका गटाच्या खोक्यात तिला बसवले की मग तिळा उघड म्हणताच धाडकन शिळा दूर सरून भारंभार खजिना दिसावा तसे त्यांना होते. अधिक काही न विचारता त्या व्यक्तीबाबत बरेच काही आपल्याला समजल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. कारण ज्या गटात त्याला बसवले त्या गटाचे - गृहित! - गुणदोष त्याच्यातही आहेत असे मानले तरी बहुसंख्येला - परस्परविरोधी कारणाने कदाचित - ते मान्य होते... त्या व्यक्तीला मान्य असण्याची गरज नसते.
एकुणच व्यक्ती म्हणून कोणतीही स्वतंत्र आयडेंटिटी तुम्हाला नाकारली जाते, थोडीफार सवलत मिळाली तरी ती दुय्यम मानून बहुतेक प्रसंगी 'आम्ही तुम्हाला दिलेल्या' गटाला, त्याच्या हितसंबंधाला अनुसरून तुम्ही वागले पाहिजे असा समाजाचा हट्ट असतो. तुमचे आचारविचार स्वातंत्र्य वापरून तुम्ही काही वेगळे बोललात वागलात तरी ते खरे नाही, पवित्रा आहे. 'आतून ना आम्ही म्हणतो तस्सेच तुम्ही आहात.' असा ठाम समज बहुतेकांनी करून घेतलेला असतो. गटाच्या भूमिकेशी सुसंगत घेतलेली 'एक' भूमिका तुमची 'खरी भूमिका' असते आणि इतर हजारो प्रसंगी घेतलेली विसंवादी भूमिका हे साऽरे अपवाद असतात असे मानले जाते.
दिनानाथ मनोहरांची 'कबीरा खडा बाजारमें' ही कादंबरी ही दोन सर्वस्वी भिन्न प्रकृतीच्या 'व्यक्तीं'ची सामाजिक चढाओढीत झालेली फरफट आणि त्या चढाओढींच्या विविध अनुषंगांच्या आधारे उभे राहिलेले विविध व्यक्तींचे चित्रण करते. जात, धर्म, संघटना यांच्या प्रभावाखाली असलेल्या आणि एकाच वेळी परस्परविरोधी दिशांनी खेचल्या जाणार्या सामान्यांच्या झगड्याचे वास्तव समोर ठेवते. या कादंबरीबाबत विस्तृतपणे लिहिले जायला हवेच.
-oOo-
या कादंबरीतील एक वेचा: आयडेंटिटी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा