शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

आयडेंटिटी

कणाद थांबला. त्याने दादांकडे पाहिलं. सुमीकडे पाहिलं. तो जरासा शंकित झाला. आपण जे काही बोलतोय, ते यांना समजतंय का? त्याच्या अनुभवाचा अर्थ लावायचा ते प्रयत्न करताहेत का? काही क्षण द्विधा मनस्थितीत गप्पच राहिला. मग म्हणाला "माणूस जीवनात तसा एकटाच असतो नेहमी. आणि हा एकटेपणा सुसह्य नसतो. त्यावर सतत मात करण्याचा प्रयत्न असतो व्यक्तीचा. पण कित्येक वेळा या एकटेपणाच्या भावनेतून सुटायला तुम्हाला स्वत्वावर मर्यादा घालाव्या लागतात. स्वत्व नाकारावं लागतं. दादा, तुम्ही एकटे पडले आहात. तुम्ही रूढीवादी विचारांचे, आचाराचे नाहीत, म्हणून तुम्ही तुमच्या जातीपासून दुरावला आहात. तुम्ही उच्च जातीशी जमवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते तुम्हाला जवळ करतात दुय्यम जातीचे म्हणून, आणि सोयीचे असेल तेव्हाच.

कबीरा खडा बाजारमें

बाहेरच्या समाजात व्यक्तीला जर आयडेंटिटी नसेल ना, तर ती व्यक्ती कुटुंबात अधिकार गाजवायला सुरुवात करते. पण अधिकाराचं नातं हे माणसांचं नातं नसतं. परस्परसन्मान, परस्परसंवाद नसेल तर कुटुंबातील नातंही तकलादू, कचकडी असतं. कदाचित काहीसं आकर्षक दिसेल पाहाणार्‍याला. परंतु जरा धक्का लागताच भंग पावणारं. तुकडे तुकडे होणारं. भारतीय समाजाच्या संदर्भात यावर उपाय आहे- मानवी संबंध आकारात आणा. कुटुंबात असो वा समाजात, वर्चस्ववादी संबंध नाकारा. सर्व लहानमोठ्या, नीचउच्च जातींतील व्यक्तींशी परस्परसन्मानाचं, संवादाचं नातं बांधा. याला काही पर्याय नाही, दादा."

दादा काहीच बोलले नाहीत. त्यांच्या मनात चाललेला गोंधळ त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. आता या प्रसंगाचा शेवट कसा करायचा? गजू आताच आला तर किती बरं होईल! कणाद विचार करत होता. सुमीने केलेल्या हालचालीमुळे त्यांच तिच्याकडे लक्ष गेलं. ती पुढे झुकली होती. त्याच्याकडेच रोखून पाहात होती. "कणाद, तुमच्या या त्रयस्थ आणि तटस्थ भूमिकेतून केलेल्या विश्लेषणाला अर्थ निश्चितच आहे. पण आमच्याबद्दल जे विश्लेषण तुम्ही केलं आहे तेच तुम्हालाही लागू पडतंय. दादांचा रोल तर काय, या सर्व नाट्यात दुय्यम होता. पण तुमची भूमिका तर प्रमुख होती. विशेषतः त्यांचा सर्वच डाव तुम्ही विस्कटून टाकला आहे. तुम्हालाही ते बाजूला ढकलून देणारच. केवळ तेवढंच नाही, तर तुम्हाला त्याबद्दल सजाही देणार. तसं सोडणार नाहीत ते तुम्हाला."

कणाद काही क्षण सुमीकडे डोळे विस्फारुन पाहात राहिला. आपलं बालपण आणि तारुण्यही घराच्या चार भिंतीआड घालवलेल्या या बाईला ही समज कुठून लाभलीय? चर्चा, सेमिनार्स, बौद्धिक चर्चासत्रे माहीतही नसलेल्या आणि स्वयंपाकघरात कित्येक वर्षे घालवलेल्या या सुमीला ही दृष्टी कशी मिळालीय?

त्याने एक दीर्घ सुस्कारा सोडला. मग काहीशा हताश स्वरात तो म्हणाला, "बरोबर आहे तुझं म्हणणं सुमी. पण या वाडीतील लोकांमध्ये मला कधीच स्थान नव्हतं. मी ते मिळवायचा प्रयत्नही केलेला नाही. मला त्यांनी सामावून घ्यावं अशी इच्छाच नव्हती माझी. ज्यांना मला 'माझी माणसं' म्हणता येतील अशी माणसं मी शोधली आहेत. हे ते जाणीवपूर्वक करतात असं नसेलही. ते थोडे असतील. पण ते लोक माझे आहेत. त्यामध्ये गजू आहे, बबन आहे, दादा आहेत, तू आहेस, माझी आई आहे, मी तर म्हणतो रंजनाताईही आहेत. त्यामुळे माझी सामाजिक गरज पुरी होते. निदान काही प्रमाणात तरी. सुदैवानं माझं असमाधान, माझी आत्मसंतुष्टता यांना वाट करून देण्यासाठी वयाने लहान, अवलंबून असलेल्या व्यक्तींवर अधिकार गाजवायला मला माझं कुटुंबच नाहीय. तसं कुटुंब असतं तर मी तशा प्रकारचा अधिकार गाजवला नसता अशी खात्री मी ही देऊ शकत नाही, सुमी."

"पण हे तुमचं पर्यायी सामाजिक जीवनही तकलादू असू शकतं. कुणी मनात आणलंच ते ते तोडूही शकतं. या व्यक्तींच्या संबंधांचा पाया ठिसूळ आहे असं नाही वाटंत तुम्हाला?"

तो बोलला नाही बराच वेळ. मग अगदी खोल आवाजात म्हणाला, "बरोबर आहे. आणि ते माझं भावविश्व तुटलं ना, तर मीही पराजितच होईन या लढाईत. पण तात्पुरता सुमा. मी परत परत माझ्याभोवती हे लहानसं का होईना, माझं विश्व शोधून काढेन. त्याला आकार देईन. माझे लोक शोधून काढेन. त्यांच्याशी नव्याने नातं निर्माण करेन. परत परत करत राहीन. अशा परित्यक्त, एकाकी व्यक्तींची या जातीय उतरंड असलेल्या समाजात काही कमी नाहीये. जेव्हा समाजात स्थित्यंतर घडत असतं ना, मन्वंतराचा काळ असतो ना, त्यावेळी समाजापासून तुटलेल्या, अशा व्यक्तींची संख्या वाढते. अशा स्थितीत, अशा एलिअनेटेड व्यक्तींचं सातत्यानं उत्पादन होतंच राहणार आहे सुमा. समाजातील कुठलाही स्तर, कुठलीही जात, कुठलाही वर्ग याला अपवाद नाही. प्रत्येक स्तरात, जातीत अशा व्यक्ती आकारास येतच राहणार. त्यांच्याशी नातं जोडत राहणं हाच उपाय आहे ना यावर?"

- oOo -

पुस्तक: कबीरा खडा बाजारमें
लेखकः दिनानाथ मनोहर
प्रकाशकः लोकवाङ्मय गृह
आवृत्ती पहिली (फेब्रुवारी २००८)
पृ. २७१-२७३.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा