आर.के. नारायण यांनी लिहिलेले 'मालगुडी डेज्' हे पुस्तक प्रचंड गाजले. 'दूरदर्शन'ने त्यावर त्याच नावाची एक मालिकाही केली. त्या मालिकेसाठी नारायण यांचे बंधू प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेल्या रेखाचित्रांमुळे ती मालिका आणि ते पुस्तक यांच्या लोकप्रियतेत भरच पडली. मालगुडी या एकाच गावातील विविध व्यक्ती, घटना, परिसर, बदलत्या जगाच्या तिथे उमटणार्या पाऊलखुणा, त्यातून तिथे बदलत जाणारे विश्व, अगदी लहान मुलापासून ते इंग्रजी साहेबाकडे कारकुनी करणार्या नव-बूर्ज्वा समाजाचे वेधक चित्रण त्या पुस्तकाने केले.
मराठीतूनही असाच प्रयोग झाला, पुस्तक म्हणून तो बर्याच अंशी यशस्वी झाला. परंतु मालगुडी डेज् प्रमाणे माध्यमांतराचा कळसाध्याय मात्र त्याला लाभला नाही. जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या 'सारे प्रवासी घडीचे' या पुस्तकातून भेटलेली कोकणातील माणसे, त्यांच्या जगण्याचे आधार किंवा त्यांचा अभाव, जातीव्यवस्थेचे ताणेबाणे, पोटाला दोन वेळचे अन्न जेमतेम मिळवत असणार्या/नसणार्या साध्यासुध्या माणसांचे विलक्षण पीळ, त्यांचे पूर्वग्रह आणि हेवा-असूयादि गुणवैशिष्ट्ये, पुरोगामित्वाच्या तसंच राजकीय स्वातंत्र्याचे वारे वाहात असताना त्यांच्या जगण्यात उठणारे तरंग इ. अनेक अंगांना स्पर्श करत हे पुस्तक पुढे जाते.
याला मी निव्वळ पुस्तक म्हणतो आहे, कथासंग्रह किंवा कादंबरी म्हणत नाही. कारण रूढार्थाने हे दोन्हींमधे बसते किंवा बसत नाहीदेखील. खरंतर या पुस्तकाची अनेक वर्षांनी आठवण झाली ती अशाच फॉर्ममधील गणेश मतकरी यांनी अर्वाचीन, महानगरी समाजावर लिहिलेल्या 'खिडक्या अर्ध्या उघड्या' या पुस्तकामुळे. या फॉर्ममधे म्हटलं तर प्रत्येक प्रकरण हे स्वतंत्र आहे. त्याच्याकडे एक स्वतंत्र कथा म्हणून पाहता येते. परंतु त्याचबरोबर त्या कथांमधे काही पात्रे सामायिक आहे, अन्य कथांमधे घडलेल्या घटनांचा सांधा तिथे जुळलेला आहे. त्या अर्थी ते कादंबरीच्या जवळ जाते. पण त्याचवेळी एकत्रितपणे एक कादंबरी म्हणून उभे राहात नाही.
पुस्तकाचा घाट पाहिला तर ते माझ्यापुरते ते व्यक्तिप्रधान दिसते, किंवा माझा तसा दृष्टीकोन आहे असे म्हणू. त्यात कथानकाच्या प्रवाहाला तितके ठळक स्थान नाही. दळवींनी एक एक व्यक्ती ठाशीवपणे उभी केली आहे. केवळ उल्लेखाने येऊन गेलेल्या व्यक्तींची संख्या नगण्य. तसंच त्या व्यक्तीसंदर्भात घडलेल्या घटना वा घटनाप्रवाह ध्यानात राहण्याऐवजी तुमच्या मनात उभे राहते ते त्या त्या व्यक्तीचे व्यक्तिचित्र. हाफम्याड तात्या, पावट्या, नरु, बाबल्या मडवळ, बागाईतकर मास्तर, अमृते मास्तर, आणि मुख्य म्हणजे आबा आणि बाबुली हे दोन जमीनदार, यांचे नाव घेताच त्यांचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते. या अचाट व्यक्तिरेखा एकदा तरी साकार समोर याव्यात अशी इच्छा मनात उभी राहते.
'सारे प्रवासी घडीचे'ची पुन्हा एकवार आठवण झाल्यावर यातील एखादा वेचा 'वेचित चाललो'साठी घ्यावा असे ठरवले. विकत घेतलेली माझी चौथी प्रतही गायब झाल्याचे ध्यानात आल्यावर एका मित्राकडून घेऊन आलो. जसजसे पुन्हा वाचत गेलो तस तसे यातून एक वेचा निवडणे किती जिकीरीचे आहे हे ध्यानात येऊ लागले.
नक्की काय घ्यायचे? 'आपूच्या शाळेचा पहिला दिवस', 'अंगविक्षेपांसह म्हणायचे गाणे आणि त्यात आलेला विक्षेप', बाबल्या मडवळाचे भकास जिणे, परंपरेबरोबरच अधिकाराचा चतुराईने वापर करून कुळांवर वर्चस्व ठेवून असणारे आबा, बापाचे छत्र हरवलेल्या अत्रंगी नरुचे वारे भरले जगणे, आपद्धर्म म्हणून केशा चांभाराला लोकल बोर्डावर निवडून आणतानाही कटाक्षाने अस्पृश्यता पाळणारे आबा, डॉ. रामदास यांचे पूर्णान्न ...?
एकाहुन एक उतारे निवडले नाहीत, तोवर हा नको दुसरा घेऊ असे डोक्यात येई. अखेर एकुण पुस्तकाचा तोंडवळा बर्यापैकी पकडणारा हा उतारा सापडेतो महिना गेला. विस्ताराने मोठा असल्याने दोन ठिकाणी मधले तपशील वगळले आहेत.
-oOo-
या पुस्तकातील एक वेचा: माणसे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा