रविवार, १३ डिसेंबर, २०२०

वेचताना... : अडीच अक्षरांची गोष्ट

रक्ताने किंवा कायद्याने बांधलेली नातीच फक्त प्रेमाची धनी नसतात. प्रेमाच्या अनेक छटा आसपास विखुरलेल्या दिसतात. नैसर्गिक प्रेरणेला विसरुन, एखाद्या हरणाच्या पाडसाला दत्तक घेणार्‍या सिंहिणीचा वीडिओ मी पाहतो, तेव्हा त्या नात्याच्या अगम्यतेने स्तिमित होत असतो. थेट भिन्नवंशीय प्राण्यांतील हे प्रेम दूरचे राहिले, पण माणसानेच कृत्रिमरित्या निर्माण केलेल्या गटांच्या भिंती भेदून जाणारे प्रेम, स्नेह, बंध, आत्मीयता, हे देखील हिंसेइतकेच, लैंगिकतेइतकेच आदिम आहेत. पण आजच्या स्वयंघोषित वास्तववादी साहित्यिकांच्या खिजगणतीतही ते नसतात. आदिम प्रेरणा नि जाणीवा म्हणत सदैव हिंसेचा, लैंगिकतेचाच वेध घेणे हीच प्रागतिक साहित्याची खूण का मानली जाऊ लागली आहे, हा प्रश्न मला वारंवार पडत असतो.

अडीच अक्षरांची गोष्ट
    
    

रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं,
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं,
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं,
मोराच्या पिसा-यातील अद्भुत लावण्यावर करावं,
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं,
प्रेम खड्गाच्या पात्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

-कुसुमाग्रज
	

"प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं सेम असतं."

असं म्हणणारे पाडगांवकर बाळबोध ठरवले जातात. भावनिकता हा आधार असलेले, सकारात्मक मानवी बंधांची कहाणी सांगणारे लेखन हे फक्त गृहिणींसाठी असते, नि ग्रेस वाचणे हेच काय ते प्रगल्भ साहित्यप्रेमीचे लक्षण मानले जाते; असे का? बहुसांस्कृतिक, बहुभाषिक, बहुआयामी देशातील साहित्याचे हे आयामही महत्वाचे का मानू नयेत? प्रेमाच्या गोष्टी काय फक्त हिंदी सिनेमांनीच सांगाव्यात असे थोडेच आहे?

बॉक्सर महंमद अलीची जगातील सर्वच शोषित वर्गांप्रती असलेली बांधिलकी, द्वेषाकडून प्रेमाकडे प्रवास झालेला कुणी प्राध्यापक, केवळ पत्रांतून व्यक्त झालेली व्यक्ती आपली आयुष्याची जोडीदार व्हावी असे वाटावे इतपत खात्री पटलेले दोघे, दहशतवादी बापाचा मार्ग झुगारुन त्या दहशतवादाचे बळी नि संभाव्य बळी यांच्याशी आपले नाते जोडून आपल्या 'रिडेम्शन’च्या वाटे चालणारा झाक...

दहशतवादी हल्ले हे जगातील माणसांच्या अंगवळणी पडलेली बातमी. निर्लेपपणे ’किती गेले’ हे वाचून आपण पान उलटतो. फारतर मुठी वळून अशांना फाशीच दिले पाहिजे म्हणून आवेशाने बोलतो. खरंतर बोलणार्‍याने त्यात काहीही गमावलेले नसते, तरीही त्याची त्या मृत व्यक्तींशी कुठेतरी बांधिलकी असते. कदाचित म्हणूनच तो वांझ, अविचारी का होईना पण व्यक्त होत राहतो. पण ज्याने/जिने अशा दहशतवादी हल्ल्यात काही गमावले आहे तिचा संताप, त्वेष कदाचित द्वेष कित्येक पट असेल असा समज असतो आणि बहुधा तसा तो असतोही. 

पण अशा नृशंस अशा हल्ल्यात आपले पाय गमावलेली 'जिल' मात्र दहशतवाद्यांवर वा त्यांच्या जमातीवर सूड घेण्याचे सोडून, त्यांच्या वस्तीत जाऊन तेथील युवकांशी संवाद साधते, त्यांना अतिरेकी विचारांपासून परावृत्त करते; 'त्यांचे नातेवाईक, जातभाई हे ही दहशतवादीच असणार’ या सर्वसामान्यांच्या मनांतील अतिरेकी भूमिकेला छेद देते. हे माणसाचे माणसावरचे कुठल्या पातळीवरचे प्रेम म्हणायचे?

या प्रत्येकाच्या प्रेमाची जातकुळी वेगळी, व्याप्ती वेगळी. यात प्रतवारी लावताच येणार नाही, कशाला लावायची? आपल्याच गुन्हेगारांना क्षमा करण्याइतके अलोट प्रेम, स्नेह राणी मारियाच्या आई-बहिणीच्या, जिलच्या मनात कुठून उगवतो, तो तुमच्या-आमच्या मनांत का दिसून येत नाही? द्वेषाची वात झर्रकन पेटते, पण स्नेहाचे वा प्रेमाचे बंध मात्र तितक्या सहज जुळत नाहीत, काही वेळा जुळलेले तट्‍कन तुटून जातात. जितकी ऊर्जा एखाद्या जमातीचा सरसकट द्वेष करण्यासाठी वापरतो, तिच्या दशांशानेही प्रयत्न असे बंध निर्माण व्हावेत म्हणून आपण करत नाही, ते का? ते आणि आपण इतके वेगळे कसे? असे प्रश्न पडले तर ती तुमच्या जिवंतपणाची खूण मानता येईल.

... म्हणून त्याच कवितेत पाडगांवकर शेवटी म्हणतातच, ’तुमचं आणि आमचं सेम नसतं’. पण तिथे रुद्राक्ष माळा नि कपाळी आठ्या घालून बसलेल्यांना पाडगांवकर असं बजावतात, तर इथे हेच वाक्य मला ’अडीच अक्षरांची गोष्ट’ मधील प्रेमिकांना सांगायचे आहे ते उलट दिशेने आणि नम्रतेने. आमच्यासारख्या सामान्यांचे बोटचेपे, माफक प्रेम तुमच्या प्रमाथी आणि विविध सीमांना ओलांडून जाणार्‍या प्रेमासारखं कसं असेल? राणी मारियाच्या आई नि बहिणीसारखे आपल्या मुलीच्या वा बहिणीच्या खुन्यालाच मुलगा वा भाऊ मानण्याइतकी क्षमाशीलता आमच्या मनात कुठून असणार?

पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रसिद्ध पटकथालेखक, कवी अरविंद जगताप म्हणतात, "प्रेमाला आपण एवढे नियम लावून दिलेत की ते नियम पाळण्यात सगळा वेळ जातो आणि प्रेम करायचं राहून जातं. पण काही माणसं हे नियम झुगारून देतात. त्यांना नियम झुगारण्यात रस नसतो खरंतर, विद्रोहाची आगही नसते. असतं ते फक्त प्रेम."

थोडक्यात यात चित्रपटातल्या अभिनिवेशी प्रेमाचा बाजार नाही, इतरांसमोर स्वत:ला सिद्ध करण्याची अहमहमिका वा परपुष्टता नाही, आहे फक्त 'माझ्या आयुष्यात माझी ही मागणी आहे' ही सहजता आणि तिच्यावरील निष्ठा. 

अलीकडे लव्ह-जिहाद हा शब्द फार वारंवार ऐकू येतो. आमचे दोन मित्र असे होते की ज्यांनी ’त्यांची’ एक मुलगी काढून आणणार’ अशी प्रतिज्ञा केली होती. एकाची ’त्यांची’ ची व्याख्या जातीय होती तर दुसर्‍याची धर्मीय. या शहरातील मुलींच्या सुदैवाने... किंवा शहाणपणानेही असेल, त्यांना ते जमले नाही नि ’विद्रोही प्रेम’ करण्याची त्यांची इच्छा फलद्रूप झाली नाही. सुदैवाने पाहण्या-दाखवण्याच्या कार्यक्रमातून त्यांची लग्ने सफल झाली... अन्यथा व्हॅलेंटाईन-डे च्या माथेफिरु विरोधकांमध्ये आणखी दोनने भर पडली असती!

राज कपूरचे सिनेमे रशियात एकेकाळी प्रचंड लोकप्रिय होते, तिथे त्याचे एक दर्शन व्हावे म्हणून अहमहमिका चाले. अमेरिकेसारख्या प्रगत देशांत कॅब चालवून पोट भरणारा एक अल्जिरियन ड्रायवर मी इंडियन आहे हे समजताच त्याच्या लाडक्या किशोरकुमारवर अर्धा तास माझ्याशी धबधबा बोलत होता, त्याला आवडलेल्या गाण्यांची उजळणी करत होता. भारतात आणि गाण्यांत राहून, गाण्यांवर प्रेम करुनही, एखाद्या भारतीय गायकावर इतकं अलोट प्रेम मीही केलं नसेल. आपले हिंदी चित्रपट इतक्या दूरवर नुसते पाहिले जातात असे नव्हे, तर तिथले लोक त्यातील गायकावर असे अलोट प्रेम करतात, हा अनुभव मला चांगलाच सुखद धक्का देऊन गेला होता. त्याचं नाव तेवढं विचारायचं राहून गेलं...

सुरुवातीला दिलेल्या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या शेवटी जे म्हटले आहे, त्यावर माझ्या बाळबोध, बालिश मनाचा तरी नक्की विश्वास बसतो. प्रगल्भ म्हणवणार्‍यांनीही विचार करुन पहावा.

प्रेम कुणावरही करावं
कारण
प्रेम आहे
माणसाच्या संस्कॄतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष

आणि

भविष्यकालातील
त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव ..... !

संस्कृती आता फक्त अस्मितेचे झेंडे फडकवण्यापुरती वापरली जाते, इतिहासात आपण वितण्डाची बीजे शोधतो, "भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा" हे ध्यानात घेणे तर आपण साफ विसरुन गेलो आहोत.

-oOo -

छापण्यापूर्वी:
(प्रदीप आवटेंचे हे लेखन एका दैनिकातून स्तंभ स्वरुपात प्रकाशित होत असताना त्यांना लिहिलेले हे पत्र...)


प्रिय प्रदीप,

रविवारच्या 'दिव्य मराठी - रसिक' मधील तुझा 'राचेल कोरी'वरचा लेख वाचला आणि भडभडून आले. त्याच सेरीजमधले इतर लेख एक एक करून वाचले आणि प्रत्येक वेळी तळापासून हललो. डोळ्यात आलेल्या पाण्याची मला कधीच लाज वाटत नाही. तटस्थता आणि भावनाशून्यता यात फरक न समजणार्‍यांना वाटत असेल तर वाटू दे बापडी. पण मुर्दाडांच्या जगात आपण अजूनही जिवंत असल्याचे ते लक्षण मानतो मी.

पण दुर्दैव असे की इतक्या आतड्याने लिहिलेले कधी वाचण्यातच येत नाही, कारण तसे लिहिण्याइतके संवेदनशील लोक कुठे हरवून गेलेत कुणास ठाऊक. सततच्या नकारात्मक आणि 'ब्रेकिंग न्यूज'च्या कलकलाटात सकारात्मक कामांकडे दुर्लक्ष होऊ नये असा आग्रह मी सतत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आणि वेगवेगळ्या लोकांकडे धरत असतो. बहुतेक वेळा पालथ्या घड्यांवर पाणी ओतल्याचाच अनुभव आला, अगदी भल्या भल्या पुरोगामी वा समाजसेवेचे कंकण बांधून उभ्या राहिलेल्यांबाबतही फारसा वेगळा अनुभव नाही. 

त्यासाठी मी 'जनगर्जना'मधे 'ऐलपैल' सुरू केली. पण त्यातील लेखन हे प्रामुख्याने माहिती स्वरूपाचे आहे. तुझ्या लेखनात विषयवस्तूबद्दलची जी आच आहे, जी ऊब आहे ती त्यात नाही. कधीकाळी ललित लेखन करताना अति भावनावश झाल्याने ते अर्ध्यावरच थांबवले होते. त्यावेळची मनस्थिती आज तुझे लेख वाचताना पुन्हा अनुभवली.

तुझी ती राचेल, तो झाक, ती लक्ष्मी, त्यानेच हत्या केलेल्या राणी मारियाच्या कुटुंबाने आपलासा करत पुन्हा जीवनसंमुख केलेला समुंदर, तिलाकम आणि काथिर, सारेच या जगात उपरे म्हणावे लागतील. मी या गटाचा, तू त्या गटाचा म्हणजे माझ्यासह आमच्या गटाच्या कुणीही तुझा द्वेष केला पाहिजे, तुझे नुकसान केले पाहिजे, तू न केलेल्या गुन्ह्याबद्दल तुझा सूड घेतला पाहिजे, तुझी हत्या केली पाहिजे इतकेच समजणार्‍या समाजात रहायला नालायक आणि तरीही त्यांचे रोल मॉडेल व्हायला हवेत असे. स्वतःची ओळख जमावात शोधणार्‍या कमअस्सल लोकांच्या निर्बुद्ध जमावात स्वतःची स्वतंत्र ओळख असू शकते, आपल्या दोन पायांवर उभे राहता येते, त्यासाठी समाजाच्या भुक्कड कुचकामी कुबड्यांची गरज नसते हे तोंडपाटीलकी ऐवजी कृतीतून सिद्ध करणारे.

कुठे सापडतात तुला ही माणसं... हजारो, लाखो उन्मादी नृशंसांच्या समाजात कुठल्या सांदीकोपर्‍यात असतात ही माणसं? कसा पोचतोस तू त्यांच्यापर्यंत? ब्रेकिंग न्यूज, पर्दाफाश, स्टिंग ऑपरेशन्स, बाष्कळ नि वांझ चर्चांचे फड यांत रमलेले लोक नि त्यातून टीआरपीचे, पैशाचे पीक काढणारी चॅनेल्स, फक्त भडकाऊ किंवा अश्लील मेसेजेसच पाठवण्यासाठी वापरले जाणारे मोबाईल, लोकानुरंजनाचे किंवा स्वतः सुखवस्तू जगत विद्रोहाची गाणी गाणार्‍यांचे लेखन छापणारे प्रकाशक या अशा व्यक्तींकडे ढुंकून पाहात नाहीत. 

सतत दुसर्‍याने काय करावे, काय खावे, काय प्यावे, कुठे बोलावे, कुठे बोलू नये याची चिंता करणारी आणि आपल्या चुकांना सामोरे जाण्याऐवजी एकमेकांच्या पाठीमागे लपू पाहणार्‍या क्षुद्र माणसांच्या दृष्टीने तर ही माणसे अस्तित्वातच नाहीत. त्यांचे रोल मॉडेल्स वाचिवीर, बोलभांड नेत्यांमधून किंवा अभिनेत्यांमधून येतात (आज या दोघांत फारसा फरक राहिलेला नाही हे आणखी दुर्दैव). त्यातच धुमाकूळ घालणार्‍या भांडवलशाही नावाच्या राक्षसाने व्यक्तिवादाला इतके भयानक पातळीवर रुजवले आहे की 'समाजाचा विचार मी का करावा, इतरांचा विचार मी का करावा?' असे निर्लज्जपणे म्हणत स्वार्थी आयुष्य जगू पाहणारी मंडळी त्याचवेळी जातीच्या, धर्माच्या जमावात सुरक्षिततेचा शोध घेत राहतात. यातली उघड विसंगती न समजण्याइतके बौद्धिकदृष्ट्या ते खुजे होऊन बसले आहे. अशा काळात, अशा समाजात तुला ही अशी माणसं सापडतात तरी कशी नि कुठं?

गंमत पहा. आपल्या वयात फार अंतर नसूनही कालपर्यंत तुला अहो जाहो चे संबोधन वापरत होतो तो आज किती सहजपणे एकेरीवर आलो. कदाचित जे आकांताने सांगू बघत होतो ते दुसर्‍या कुणाच्या डोक्यात उगवून आलेले पाहून समाधानी झालो असेन किंवा असे असेल की आपण एकटेच व्यर्थ कंठशोष करतो आहोत हे वैफल्य, याच वाटेवर आपल्याही पुढे कुणीतरी चालते आहे हे पाहून 'योग्य वाटेवर असल्याची' खात्री पटून थोडा आश्वस्त झालो असेन.

काही का असेना, स्वतःला जगाच्या कल्याणाचे ठेकेदार म्हणवणार्‍या अमेरिकेपासून, स्वतःच स्वतःला श्रेष्ठ संस्कृतीचे सर्टिफिकेट देऊन टाकणार्‍या भारतातही माणूसपण विसरून जनावराहून खालच्या पातळीवर उतरलेल्या जमावाचे थैमान चालू झाले असताना, तुझी ही मालिका माझ्यासारख्याला अजून जगण्यावरचा आपला विश्वास टिकवून धरायला मदत करते आहे. पण बहुसंख्येचे काय... त्यांना जिवंत राहण्याची चिंता आहे, त्यासाठी इतरांना मारण्याची, त्यांचे खच्चीकरण करण्याची चिंता आहे; जगण्याची चिंता करण्याची फुरसत नसावी बहुधा. तुझ्या या लेखनाने एखादा जरी 'बाटला' तरी सप्तसिंधूपर्यटनाचे पुण्य गाठीला लागले असे म्हणायला हरकत नसावी.

तुझा मित्र,
- मंदार
---
पुस्तकातील एक वेचा:दुसरा रस्ता
---


हे वाचले का?

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

रावी के दो किनारे

सचिन कुंडलकर यांचा 'गंध' पाहात होतो. त्यात मिलिंद सोमणने 'रावी के उस पार...' चे एक जेमतेम एक कडवे म्हटले आहे. त्यातल्या रावीऽऽऽ वरची ती मींड काळजावर घाव घालून गेली. दुसर्‍यांदा ऐकताना बेट्याने काय कमाल केली आहे असे वाटून गेले.

वाटलं हा केवळ सर्वसाधारण अभिनेता असलेला माणूस ही जागा अशी वेधक घेऊ शकतो, तर मूळ गाण्यात काय बहार येत असेल. मग मूळ गाणे शोधायला गेलो. पत्ता लागला मूळ गाणे रावी के 'इस' पार आहे, 'उस'पार नव्हे! याची गायिका उमराव ज़िया बेगम पाकिस्तानी आहे हे ध्यानात घेतले तर हा भेद समजून जातो. (कुंडलकरांनी हा बदल हेतुत: केला असावा का?)

रावी के इस पार, सजनवा
रावी के इस पार

प्रेम का दरिया, प्रेम की नैया
प्रेम का चापू, प्रेम खेवैया
आजा कर के पार, सजनवा

बूढे जागे, बालक जागे
मेरे बालम ना, अबतक जागे
जाग उठा संसार, सजनवा

प्रेम पुजारी, बनकर आजा
प्रेम भिखारी, बनकर आजा
त्याग के सब संसार, सजनवा

इस दुनियासे दूर रहेंगे
प्रेम नशेमें चूर रहेंगे
गाएंगे गीत मल्हार, सजनवा
रावी के इस पार
---
१. चापू = होडीचे वल्हे
२. खेवैया = नावाडी

ते ऐकले, गाणे उत्तम आहे यात शंका नाही, पण नेमकी ती मींड तिथे नाही. मींड घेतली आहे पण अगदीच अदखलपात्र अशी भासते, त्यात तो 'लगाव' नाही! गाण्यातले सूर थोडेफार समजत असले तरी स्वरांबाबत बालवाडीपर्यंतही न पोचलेल्या आम्हाला आता 'कट्यार...' मधले खाँसाहेब सदाशिवला 'दिलमें प्यास जगाना, और उसे अधूरी छोडकर जाना...' असं का म्हणाले असतील हे समजून जाते.

पण गाण्याच्या सुरावटीसोबतच त्यातील शब्दांकडे लक्ष गेले आणि त्यामागची भावना लख्खकन चमकून गेली. एक पाकिस्तानी गायिका आपल्या प्रेमिकाला 'रावी के इस पार’ यायला सांगते आहे, याला केवळ शृंगारिक दृष्टीने पाहता येणार नाही. धर्माच्या आधारावर फाळणी करुन जमिनीचे दोन तुकडे करत त्यासोबत असंख्य नात्यांचे बंध कचाकच तोडून टाकल्यानंतरची ती वेदना दिसते.

यावरुन मला माझ्या दृष्टीने ’रावी केस इस पार’ असलेल्या ग़ज़लसम्राज्ञी बेग़म अख्तर यांचा एक किस्सा आठवला. साधारण पन्नास-बावन्नच्या सुमारास कराचीमध्ये लष्करी अधिकार्‍यांच्या एका कार्यक्रमात त्यांनी ’हमारी अटरियापे आओ सजनवा, सारा झगडा खतम हो जाए’ हा दादरा गायला होता. याची निवड हेतुत: केली का असा प्रश्न विचारल्यावर बाई फक्त मंद हसल्या होत्या म्हणतात$.

दोन्ही तीरांवरुन मारलेली ही हाक अर्थातच कुणाच्या कानावर पडली नाही, पडली तरी कुणी मनावर घेतली नाही. कारण प्रेमापेक्षा द्वेषाचे पीक हे अधिक वेगाने वाढते, लवकर कापणीला येते आणि बाजारभावही चांगला मिळतो. तिथे गावकुसाबाहेर ठेवलेल्या दोन स्त्रियांच्या दुबळ्या हाकांना कोण विचारतो.

खूप काही देऊ शकणारे नेमके काही देत नाहीत आणि काहीवेळा फारसे काही हाती नसणारेच एखादे अमूल्य दान पदरी टाकून जातात. फक्त दाता कुणीही असेल तरी दान घेण्यासाठी पदर पसरून याचक होण्याइतके नम्र होता आले पाहिजे.

- oOo -

छापता छापता:

मूळ गाणे कोणत्या वर्षीचे, त्याचा गीतकार/संगीतकार कोण याचा काहीच पत्ता लागला नाही. पण याच गाण्यावर केशवराव भोळे यांनी पं अनुज यांच्याकडून 'देखूं कबतक बांट’ ही बंदिश बांधून घेतली. १९३८ साली आलेल्या ’मेरा लडका’ या चित्रपटात ती शांता हुबळीकरांच्या आवाजात रेकॉर्ड झाली आहे. 'रावी के उस पार’ मारलेली हांक आणि त्याला 'देखूं कबतक बांट' हे मिळालेले उत्तर औचित्यपूर्ण ठरते.

देखूं कबतक बांट, पियरवा
देखूं कबतक बांट, तुम्हार

पथराई अंखियां, देखत, ढूंढत
एकही दिन मोरे, घर ना आवत
खाली बांट निहार, पियरवा ॥१॥

जिया तडपत है, जिया धडकत है,
दरस को तोरे, ललचाता मन है
जीवन के आधार, पियरवा ॥२॥

सागर उठती दूर तरंगे
तैरुं कहांसे, भारी उमंगे
ब्याकुल मैं इस पार, पियरवा ॥३॥

भेंट हमारी अब कब होगी?
प्रीतकी जोती मिलके जलेगी?
डूबे सब संसार, जगतमें
डूबे सब संसार, जगतमें ॥४॥ 
--- 

-oOo-

$. अंबरीश मिश्र यांच्या ’शुभ्र काही जीवेघेणे’ या पुस्तकातील ’अख्तरीबाई’ या लेखातून


हे वाचले का?

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

वेचताना... : सुंदर मी होणार

पुल्देसपांड्यांना बहुतेक मराठी माणसे 'हशिवनारा बाबा' म्हणून ओळखतात, आमच्यासारखा एखादा त्यांना बोरकर-मर्ढेकरांच्या कविता जिवंत करणारा रसिक म्हणून ओळखतो. आपल्या आसपास बाकीबाब-आरती प्रभू-मर्ढेकर यांसारखे कवी आणि भीमण्णा-मन्सूरअण्णा-कुमार गंधर्व आणि प्रिय मित्र वश्या देशपांडे ऊर्फ वसंतखाँ अशा व्यक्ती आणि वल्लींना जमा करून आयुष्याचा काव्यशास्त्रविनोदाचा महोत्सव जगणारा अवलिया म्हणून ओळखतो. कुणी त्यांना आणीबाणीच्या काळातला साहित्यिकांचा एक आवाज म्हणून ओळखतो, परंतु त्या तुलनेत त्यांना नाटककार म्हणून तितकेसे ओळखले जात नाही. खरे तर हे अनाकलनीय आहे.

सुंदर मी होणार

कदाचित याचे एक कारण म्हणजे त्यांची बहुतेक नाटके ही अनुवादित वा रूपांतरित आहेत हे असू शकते. 'इन्स्पेक्टर जनरल' वरून अंमलदार, ’थ्री पेनी ऑपेरा'वर बेतलेले 'तीन पैशाचा तमाशा', ’पिग्मॅलियन'चे अस्सले देशी रूप 'फुलराणी' यांसारखी नाटके गाजली. पण 'तुझे आहे तुजपाशी' सारखे स्वतंत्रपणे (अनुवादित नसलेले) नाटकही लोकांनी डोक्यावर घेतले गेले.  ’एक झुंज वार्‍याशी’ तर नाट्यस्पर्धांमधून वीट यावा इतक्या वेळा सादर केले गेले.

याशिवाय 'वार्‍यावरची वरात', 'एका रविवारची कहाणी' आणि त्यांचा एकपात्री प्रयोग 'बटाट्याची चाळ' हे ही स्वतंत्रपणे गाजले. या जोडीला ’गुळाचा गणपती' सारखा ’सबकुछ पुलं' हा सुपरहिट चित्रपट करून चित्रपटसृष्टीतही मुलूखगिरी केली, जी थेट 'एक होता विदूषक' पर्यंत अधे-मध्ये चालू होती. असे असूनही सर्वसामान्यांना त्यांची मुख्य ओळख होती ती 'हशिवनारा बाबा' आणि स्वत:ला अभिजन म्हणवणार्‍या एका छोट्या गटाला संगीतप्रेमी म्हणून.

या सार्‍या गदारोळात दुर्लक्षले गेलेले एक अस्सल नाटक म्हणजे 'सुंदर मी होणार'. यात प्रथमच कुठेतरी थेट भावनिकतेचा सूर पुलंनी पकडला आहे. कदाचित याच कारणासाठी डॉ. लागूंना 'हे अजिबात आवडलेले नाही' असे स्पष्ट सांगावे लागले असे नाटक. रॉबर्ट आणि एलिझबेथ ब्राउनिंग यांच्या 'इम्मॉर्टल लव' या आत्मचरित्राचा गाभा पकडून उभे राहिलेले हे नाटक रंगभूमीशी संबंधित लोकांना आणि रसिकांनाही नेहेमीच 'व्हेरी अनपुलिश' म्हणून अनुल्लेखाने मारावेसे वाटले आहे. 

परंतु यात असलेली स्वातंत्र्याची आस, काही लहान लहान संकेतातून मांडले गेलेले त्याचे सूचन, संस्थानिकाच्या आधारे मांडलेले सत्तेचे रूपक, त्या सत्तेच्या दबावाखाली विकसित झालेली विविध व्यक्तिमत्त्वे, लोकशाहीच्या आगमनानंतर व्यावसायिकांच्या रुपाने तयार झालेली नवी संस्थाने, त्या चोख व्यवहारवादाच्या रेट्याखाली दबलेले स्वातंत्र्याची वैयक्तिक अनुभूती असणारे गाणे... असे छोटे- छोटे पदर घेऊन बहुपेडी वीण असलेले हे नाटक उभे राहते आहे.

मी पाहिलेल्या प्रयोगात 'न आवडलेले नाटक' असूनही त्यातील संस्थानिकाची मध्यवर्ती भूमिका नाकारून, वरवर पाहता दुय्यम दिसणारी भूमिका मागून घेऊन ती जीव ओतून सादर करणारे डॉ. लागू हे एक विलक्षण रसायन यातून सापडले. दीदी पहिल्याने आपली खोली सोडून आपल्या पायाने चालत बाहेर पडल्याच्या ’परिपूर्ती’च्या आनंदाने गहिवरुन आलेले डॉक्टर उभे करताना लागूंनी त्यांच्या डोळ्यातील पाणी प्रेक्षकांच्या डोळ्यातही आणून सोडले. 

केवळ ’धनाढ्य बापाचा मुलगा’ एवढीच ओळख असल्याने ’आपण नक्की काय करतो?’ असा न्यूनगंड असलेल्या व्यक्तीचे, ’तुम्ही काय करता?' या प्रश्नाला 'मी गातो!' हे उत्तर न कचरता, पुर्‍या आत्मविश्वासाने देण्याइतका प्रवास झालेला ’सुरेश', एरवी फक्त लोकानुरंजनात्मक भूमिका करणार्‍या प्रशांत दामलेने अचूक पकडला. सर्वात धाकटी, वरकरणी फुलपाखरी मनोवृत्तीची वाटणारी, पण भावांप्रमाणे आपली जाण गाडून न ठेवता तिला बंडखोरीपर्यंत कणखरपणे घेऊन जाणारी बेबी कविता मेढेकरांनीही यथातथ्य उभी केली. दोन प्रमुख पात्रांनी मात्र साफ निराशा केली. रवि पटवर्धन यांनी साकारलेली ’संस्थानिका'ची भूमिका आणि नाटकाचा केंद्रबिंदू असलेली दीदीची वंदना गुप्ते यांनी साकारलेली भूमिका अतिशय सामान्य होत्या. 

सरासरीपेक्षा अधिक शारीरिक उंची असलेल्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात अधिकाराची एक उपजत अशी धार अनाहुतपणे मिसळलेली असते हे खरे. तसेच आवाजावर हुकमत असलेली व्यक्ती त्याचा वास्तवात आपल्या आसपासच्या व्यक्तींवर एक प्रभाव पाडून वर्चस्व राखू शकते हे ही खरे. पण हे दोन्ही अंगभूत गुण असूनही त्या व्यक्तीला अधिकाराचा सूर अचूक सापडतोच असे नाही याची पुरेपूर जाणीव पटवर्धनांच्या संस्थानिकाने दिली. घरातील करड्या स्वभावाचा, हेकट नि एककल्ली बाप आणि अधिकाराची निव्वळ जाण असणाराच नव्हे तर तो निर्ममपणे, निष्ठुरपणे राबवणारा संस्थानिक यातील फरक त्यांना सापडला नाही. संस्थानिकाच्या अधिकार गाजवण्यात जी जरब असायला हवी ती अजिबात नव्हती. एक त्रागा करणारा बापच फक्त उभा राहिला. दुसरीकडे इतरांबाबत कठोर असणारा पण दीदीबद्दल मनात विशेष ममत्व असलेला बाप, हे त्याने मनात खोल दडवून ठेवलेले रूप त्यांना अजिबातच दाखवता आले नाही. पण कदाचित त्यांच्या मूळ व्यक्तिमत्वात, त्यांच्या अभिनयक्षमतेतच ते न्यून आहे असा माझा समज आहे.

दारव्हेकरांच्या ’कट्यार काळजात घुसली’ मध्ये सदाशिवचे एक अलवार स्वप्न आहे. आपली महत्वाकांक्षा काय हे सांगताना तो स्वत:मध्ये हरवून जात ते स्वप्न झरीनाला सांगतो. तितकेच हृद्य नि तसेच स्वत:पाशी हळुवारपणे जपलेले काही दीदीराजेंकडे आहे. करकरीत व्यवहारी व्यक्तिमत्वाच्या बापाला ते उलगडून सांगत असताना दीदी स्वत:च्या त्या आतल्या जगात हरवून जाताना दिसायला हवी. पण गुप्तेंनी टाईपरायटरवर शब्द टाईप करावेत तसे खाडखाड म्हटले. (नशीब शेवटी उठून कमांडिंग ऑफिसरला सॅल्युट ठोकला नाही.)

आत्मविश्वास हरवल्याने व्हीलचेअरला खिळलेली दीदीराजे ही कवयित्री आहे. कल्पनेच्या भरार्‍यांनी तिचे जग तिने निर्माण केले आहे. शारीरिक अवस्थेमुळे येऊ शकणार्‍या कडवटपणाचा लवलेशही तिच्यात नाही. उलट बापाने जरबेत ठेवलेल्या भावा-बहिणींचे आश्रयस्थान म्हणून ती त्या आईवेगळ्या मुलांच्या आईचीच भूमिका पार पाडते आहे. धनाढ्य बापाच्या व्यवहाराचे गम्य नसलेल्या; संगीताशी सलगीच नव्हे, तर त्यात आतडे गुंतवून बसलेल्या सुरेशला त्याच्या न्यूनगंडातून बाहेर पडण्यास ती प्रोत्साहित करते आहे. आणि त्याचवेळी त्याच्या सर्वस्वी विपरीत- बेबीपेक्षाही दोन पावले पुढेच असलेल्या, आपल्या चुलत बहिणीच्या अगोचरपणाच्या वर्तनाला सहजपणे सांभाळून घेते आहे. या सार्‍या जबाबदार्‍या सर्वांत मोठी बहीण म्हणून परिपक्वपणे पार पाडताना दिसते.

पण संजय भेटायला येणार म्हटल्यावर मात्र ती प्रथमच स्वत:साठी काही मिळावे म्हणून एकीकडे फुलून येते तर दुसरीकडे त्याबद्दल साशंक होऊन तिचा गोंधळ उडतो. इथे दीदीराजेचे प्रथमच मीलनोत्सुक स्त्रीमध्ये रुपांतर होते. गुप्तेंना हे रुपांतर साधले नाही. काहीसे स्वप्नाळू, काही धांदलीचे असे प्रश्न ती स्वत:च्या रुपाबद्दल विचारते त्यात मीलनोत्सुक स्त्रीचे कोवळेपण न दिसता पुन्हा एकवार टाईपरायटरचा खडखडाटच ऐकू आला. एकुण गुप्तेंच्या दीदीराजे एकसुरी, एकवाणीच उभ्या राहिल्या. इतक्या व्यामिश्र व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू उभे करण्यात त्या साफ अयशस्वी ठरल्या.

निवडलेला वेचा हा कथानकाच्या मूळ प्रवाहाचा एक संहत आविष्कार अथवा साररुपाने त्याला समोर ठेवणारा. संस्थानिकाचा भव्य वाडा, त्यात उपलब्ध असणारे सारे उपभोग, सुबत्ता पण तो तुरुंगासमान काचणारी त्याची पुढची पिढी. स्वातंत्र्याचा अभाव म्हणजे काय हे जाणवणारी संस्थानिकाची पिढी तर दुसरीकडे व्यावसायिक साम्राज्याच्या रूपाने लोकशाहीतील एक संस्थान उभे केलेल्या कोण्या सरसाहेबांच्या घरात जवळजवळ तीच स्थिती अनुभवणारा सुरेश. 

अशा परिस्थितीमध्ये ’व्हीलचेअर'वर बसलेली, वरकरणी पाहता परावलंबी भासणारी एक व्यक्ती केवळ जड पातळीवरच पाठीचा कणा ताठ असलेल्या इतरांच्या आयुष्याचा आधार बनून राहते, जगण्यातले सौंदर्य स्वच्छ दृष्टीने आणि मनाच्या सार्‍या खिडक्या उघड्या टाकून पाहते. आज भावनिकता म्हणजे मेलोड्रामा, आणि मेलोड्रामा म्हणजे निकस कला अशा अजब तर्कटाला चिकटून बसलेल्या स्वयंघोषित तज्ज्ञांचा सुळसुळाट झालेल्या काळात असे नाटक फक्त तुम्हा-आम्हा सामान्य प्रेक्षकासाठीच उरते. पण जिवंत मनात ते खोलवर उतरते, जगण्यावरील श्रद्धा बळकट करत नेते.

आज ८ नोव्हेंबरला भाईंचा जन्मदिवस. या निमित्ताने भाईंचे हे दुर्लक्षित नाटक पुन्हा एकदा पाहतोय. इच्छा असेल तर तुम्हीही सामील होऊ शकता. ’हशिवनारा बाबा’ कधी-कधी डोळ्यात पाणीही आणतो हा अनुभव पदरी पडतो का पाहा.

- oOo -

या पुस्तकातील एक वेचा: लोकशाही आणि स्वातंत्र्य


हे वाचले का?

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

काळात सांग काळात, काय ते झाले

’द बिग बॅंग थिअरी’ ही अतिशय गाजलेली आणि नुकतीच संपलेली विनोदी मालिका. यातील विज्ञानाचे चार पदवीधर अधून मधून तंत्रज्ञान वा विज्ञान याबाबत काही साधकबाधक, काही उद्बोधक चर्चा करत असतात. अशाच एक चर्चेदरम्यान कालप्रवासाच्या संदर्भात निर्माण झालेला हा भाषिक अथवा व्याकरणविषयक प्रश्न.

Howard: Something doesn't make sense. Look...

In 2015, Biff steals the sports almanac and takes the time machine back to 1955, to give it to his younger self. But as soon as he does that, he changes the future, so the 2015 he returns to would be a "different 2015", not the 2015 that Marty and Doc were in.

Leonard:
This is "Hot Tub Time Machine^" all over again. If future Biff goes back to 2015 right after he gives young Biff the almanac, he could get back to the 2015 with Marty and Doc in it. Because it wasn't until his 21st birthday that 1955 Biff placed his first bet.

Sheldon:
Wait. Whoa, whoa. Is “placed” right?

Leonard:
What do you mean?

Sheldon:
Is “placed” the right tense for something that would have happened in the future of a past that was affected by something from the future?

Leonard: (with little hesitation)
Had will have placed?

Sheldon:
That's my boy.

Leonard:
Okay, so, it wasn't until his 21st birthday that Biff had will have placed his first bet and made his millions. That's when he altered the timeline.

Sheldon:
Yeah, but he had will haven't placed it!

Howard:
What?!

Sheldon:
Unlike "Hot Tub Time Machine" this couldn't be more simple. When Biff gets the almanac in 1955, the alternate future he creates isn't the one in which Marty and Doc Brown ever use the time machine to travel to 2015. Therefore, in the new timeline, Marty and Doc never brought the time machine...

Leonard:
W-Wait...Is “brought” right?

Sheldon: (looks dumbfounded for a moment, and says hesitantly)
Marty and Doc never had have had brought...?

Leonard:
I don't know. You did it to me.

Sheldon:
Oh, I'm going with it. Marty and Doc never had have had brought the time machine to 2015. That means 2015 Biff could also not had have had brought the almanac to 1955 Biff. Therefore, the timeline in which 1955 Biff gets the almanac is also the timeline in which 1955 Biff 'never' gets the almanac...

And not just “never gets.”
never have,
never hasn't,
never had have hasn't.

Raj:
He's right*.

--------------------------------
^ A comedy film released in 2010, with a sequel in 2015.
*Remember, he is Indian! :)

कालप्रवास ही संकल्पना माणसाला नेहमीच मोहवत आलेली आहे. ’भूतकाळात केलेली एखादी चूक, घेतलेला निर्णय मागे जाऊन बदलून घेता आला तर काय बहार येईल’ असा विचार प्रत्येक व्यक्तिच्या मनात एकदा तरी तरळून जातोच. 

शास्त्रीयदृष्ट्या असा कालप्रवास शक्य आहे का यावर उहापोह चालू आहेच. तसे शक्य आहे म्हणणार्‍यांना ’शक्य नाही’ पार्टीचे लोक ’काळात मागे जाऊन तू तुझ्या आजोबाला लग्नापूर्वीच ठार मारलेस तर तुझा जन्मच कसा होईल?’ असा व्याघात (Paradox) समोर टाकून खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करतात. मग 'शक्य आहे’ वाली मंडळी त्यांच्या कालसंकल्पनेच्या मर्यादा दाखवून देतात. 

’फ्युचुरामा’ सारखी एखादी चलच्चित्र मालिका ’तूच तुझा आजोबा असू शकतोस’ असा चावट पेचही उभा करते. थोडक्यात जोवर शक्य नि अशक्य या दोनपैकी एक वैज्ञानिकदृष्ट्या निर्णायकरित्या सिद्ध होत नाही तोवर माणसाच्या कल्पनाशक्तीला भरपूर वाव आहे.

विज्ञानकथा लिहिणार्‍या लेखकांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करुन यातून विविध शक्यता तपासल्या आहेत. प्रसिद्ध विज्ञानकथालेखक एच. जी. वेल्सची ’द टाईम मशीन’ ही अतिशय गाजलेली कादंबरी. चित्रपटांच्या क्षेत्रात ’बॅक टु द फ्युचर’ हे एक ठळक उदाहरण. 

अलिकडे नेटफ्लिक्स, अमेजन प्राईम यांच्यासारख्या ’हवे तेव्हा कार्यक्रम पाहा’ प्रकारातल्या इंटरनेट-बेस्ड वाहिन्या सुरु झाल्यापासून कालप्रवासाच्या कल्पनेवर आधारिक अनेक मालिकाही प्रसिद्ध झाल्या. नुकतीच संपलेली ’डार्क’ असेल किंवा त्यापूर्वीची ’लॉस्ट’ किंवा ’ट्वेल्व मंकीज’ असेल, सध्या गाजत असलेली ट्रॅव्हलर्स असेल... अशा काही उत्तम मालिका या संकल्पनेवर आधारित आहेत.

पण कालप्रवासाचा वेध माणूस नेहमीच घटनांच्या/घटितांच्या अथवा घटनाक्रमाच्या संदर्भात घेत आलेला आहे. काळात मागे अथवा पुढे जाऊन माणसाने केलेल्या बदलाचा वर्तमानावर अथवा एकुणच कालप्रवाहावर आणि त्या कालप्रवाहाचा भाग असलेल्या व्यक्ती, समाज अथवा व्यवस्था यांच्यावरील परिणाम हा या सर्वांचा गाभा असतो. 

कथानकाच्या कुळीचा (genre) विचार करता एकुणात इंग्रजी आणि विशेषत: हॉलिवूड चित्रपट हे त्यांच्या लाडक्या थ्रिलर प्रकाराची मांडणी अधिक करतात. क्वचित विनोदाच्या अंगानेही मांडतात. पण आज आपण जसे एखाद्या खासगी वा सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनात बसून सहजपणॆ एका स्थानावरुन दुसर्‍या स्थानी सहजपणे ये-जा करतो तसे जर काळाबाबत होऊ लागले तर आपल्या संवाद भाषेवर काय परिणाम होईल असा विचार कोणत्याही लेखकाने आजवर केला नाही.

उदाहरणार्थ भविष्यात जाऊन आलेली एखादी व्यक्ती आपल्या मूळ ठिकाणी नि मूळ काळात परतून आली आणि आपल्या भविष्यातील अनुभवाबाबत बोलू लागली तर ते तिच्या दृष्टीने ’घडून गेलेले’ असल्याने भूतकालवाचक वाक्यरचना करेल, की ज्या काळाच्या तुकड्यामध्ये ती ते सांगते आहे त्याच्या संदर्भात अनुभवलेल्या घटनेचा काल भविष्यकाल आहे म्हणून भविष्यकालदर्शक वाक्यरचना करेल? तिढा असा की आपल्याकडे उपलब्ध असलेल्या व्याकरणातील भविष्यकाळाचा किंवा भूतकाळाच्या कोणत्याही प्रकाराचा (साधा, चालू, पूर्ण) आता लागू पडणार नाही.

’आजपासून दहा वर्षांनी मी पदवी परीक्षा पास झालो होतो.’ अशी काहीशी वाक्यरचना करावी लागेल. जी आजच्या व्याकरणाच्या नियमात बसणार नसली, तरी कदाचित कालप्रवास ही दैनंदिन घटना झाल्यानंतर व्याकरणाचे नियम वाढवून सामावून घेतली जाईल, आणि त्या समाजात सहज समजेलही.

- oOo -


हे वाचले का?

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

दाद द्या अन् शुद्ध व्हा

...आणि तो आला.

सार्‍या प्रेक्षागृहाच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. 'अरेच्या, हाच का तो?' असा प्रश्न मनात उमटतो. कारण 'तो' शिडशिडीत, अंगातून वीज सळसळत असावी तसा चपळ, डोक्यावर गोल हॅट, पार्श्वभागापर्यंत लो़ळत गेलेला बटलर कोट, आडमाप ढगळ पँट, डोळ्यात सदाहरित चौकस नि मिश्किल नजर आणि उजव्या हातात या सार्‍यांना आपल्या तालावर नाचवणारी एक ओल्ड मॅन्स स्टिक.

हा वृद्ध पण तरीही हातात काठी नाही, अंगाने भरलेला, नेमक्या मापाचे कपडे, बो-टाय... हाच काय तो? त्याला ती क्षणभराची शांतता देखील असह्य होते, आज वयामुळे शारीरिक हालचाली तर मंद झाल्या आहेत. इतक्यात ती मानेची चिरपरिचित हालचाल होते नि गर्दीची खात्री पटते.... अरे हाच की तो. क्षणार्धात सारे सभागृह हर्षातिरेकाने उठून उभे राहते. त्याला नकोशा वाटलेल्या शांततेला मागे सारून टाळ्यांचा कल्लोळ उसळलाय. सारं सभागृह उत्स्फूर्तपणे उभे राहिले आहे. अधेमध्ये 'ब्रावो ब्रावो'चा उद्घोषही ऐकू येतोय. सावकाश पावले टाकीत तो पोडियम जवळ येतो तरी तो टाळ्यांचा गजर कमी होत नाही... त्याला आता बोलायचंय्... पण तरीही लोकांचा उन्मेष निवळलेला नाही...

आज असं चित्र कुठे दिसतं? एखाद्याला सन्मान, पारितोषिक वा पुरस्कार जाहीर व्हायचा अवकाश, तो/ती त्याला लायक कशी नाही हे त्याच्या क्षेत्राताले वा त्याच्याबाहेरचे - मुख्यतः खासगी आयुष्याशी निगडित - निकषांच्या आधारे तो त्याला लायक कसा नव्हता, दुसरा कुणी कसा त्याहून लायक होता, निवडीत आपपरभाव कसा झाला वगैरे सांगणारे स्वयंघोषित विद्वान अहमहमिकेने तोंड आणि लेखणी - आणि हल्ली कॅमेराही - वाजवायला सुरुवात करतात. स्पर्धा सारं काही चांगलं पुढे आणेल म्हणतात. मग हे काय झालं आपलं?

हा असा आदर, ते अलोट प्रेम आज एखाद्याला का मिळत नाही? 'हल्ली तसं कुणी नाहीच मुळी' हा दोष समोरच्यावर ढकलण्याचा उद्योग सोपा आहे. पण आपलीच त्याच्याबद्दलची ओढ, आस कमी झाली का असा प्रश्न मात्र आपण विचारत नाही. एका आयुष्यात कुवतीपेक्षा नि उपलब्ध वेळेत जमू शकेल त्यापेक्षा अधिकाधिक साधू पाहताना त्यातल्या कुठल्याच गोष्टीबाबत आस उत्पन्न व्हावी, प्रेम उत्पन्न व्हावे इतका वेळ देणे शक्य होत नाही. पण दोष 'आपला' कधी असणं शक्यच नाही. तेव्हा दोष मग समोरच्याच्या गुणवत्तेचा.

गोष्ट इथेच थांबत नाही. काही सुदैवी व्यक्तींना लोकांचे असे प्रेम मिळतेही, पण मग आता आपल्याला ते खुपते. 'असे असूच शकत नाही. इतके सुंदर, इतके हवेहवेसे वाटणारे काही असूच शकत नाही.' असं म्हणत आपण आपली हत्यारे घेऊन धावतो. मग आमच्या सारख्याच चिंतातुर जंतूंना बरोबर घेऊन अभिजाततेचे नवे आयाम, नवे निकष आम्ही निर्माण करतो. त्याच्या आधारे लोकांच्या 'लाडक्या व्यक्तिमत्वाला' आम्ही खलनायक बनवतो, त्याच्या चेहर्‍यावरचा मुखवटा ओरबाडून काढण्याच्या गर्जना करतो, त्याने समाजाची अभिरुची बिघडवली वगैरे म्हणू लागतो (पण आपण 'घडवली' म्हणतो ती तरी नक्की कशाच्या जिवावर याचे उत्तर शोधत नाही, देत नाही.)

दुसरीकडे 'लोकांना हेच हवं' आहे म्हणून हीन-अभिरुचीच्या नव-नव्या पातळ्यांवर खाली घसरत जातो. बहुसंख्येप्रती टोकाची पराङ्मुखता नि टोकाचा अनुनय या दोन परस्परविरोधी प्रवाहात विचक्षणपणे दोन्हीचे भान ठेवतच आपल्या कलाकृती, आपले विचार निर्माण करणार्‍यांचा 'मध्यमवर्ग' लुप्त होत चालला आहे. सामाजिक आर्थिक प्रतलातही एकुण समाजातूनच हा मध्यमवर्ग विलुप्त होत चालला आहे. तो हळूहळू वरच्या नि खालच्या वर्गात वाटला जात विलीन होऊन जाईल. मग राहील ती फक्त 'आहे रे' नि 'नाही रे' वर्गाची रस्सीखेच.

स्पर्धेच्या तत्त्वाने जगात जे जे उत्तम तेच टिकेल असे म्हटले जाते. पण त्याला मिळालेले अलोट प्रेम बिनमहत्त्वाचे, नि सारी नैतिक-अनैतिक प्रचारमाध्यमे नि दबावतंत्र वापरून मिळवलेल्या 'बाहुल्या' महत्त्वाच्या, या टप्प्यापर्यंत आपण आलो आहोत. अनेकांना ही 'प्रगती' वाटते, वाटो बापडी.

हसता-हसवता डोळ्यात कधी पाणी ठेवून जाणार्‍या, कधी अंतर्मुख होण्यास भाग पाडणार्‍या, काळ्या-पांढर्‍या रंगातील चौकटींना रुपेरी किनार देऊ करणार्‍या जिवंत मनाच्या माणसाला कुर्निसात.

-oOo-


हे वाचले का?

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

वेचताना... : सौरभ - १

चित्रपटाचा अवतार झाल्यानंतर, विशेषत: समाजमाध्यमांचा सुळसुळाट आणि मोबाईल क्रांतीनंतर डेटा स्वस्त झाल्यापासून, चित्रपटांबद्दल चारचौघात गप्पा मारताना केलेली शेरेबाजी, वैयक्तिक आवडनिवड ही ’परीक्षण’ म्हणून अवतरु लागली आहे. त्याचवेळी मुद्रित माध्यमांतून येणारी परीक्षणे बव्हंशी 'मोले घातले लिहाया’ प्रकारची असतात आणि त्याच्या शेवटी दिलेले रेटिंग पाहण्यापुरतीच चाळली जाऊ लागल आहेत.

सौरभ-१

दृश्य माध्यमांचा असा परिस्फोट झाल्यानंतर आता शब्दांना माघार घ्यावी लागत आहे. मुद्रित माध्यमांच्या इंटरनेट अवतारात तर आता काही रोजच्या जगण्यातील काही विषयांच्या स्तंभातून तर ’नाव छापून येते’ या एकमेव आनंदासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थिनींकडून ’जागाभरती’ केली जाते आहे. त्यामुळे अर्थातच सुमारांची सद्दी निर्माण झाली आहे. अशा वेळी शब्दांशी, त्याचसोबत विचार आणि निर्मितीशी इमान राखणारे लेखन अधिकाधिक दुर्मिळ होताना दिसते आहे.

पूर्वी बाजारात नव्याने आलेल्या पुस्तकांची चर्चा करणारे गट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेली नवी मालिका, नवा इंग्रजी वा परभाषिक चित्रपट यावर चर्चा करतात. पुस्तक वाचनातून आकलन नि आत्मसात होणारे ज्ञानच काय माहितीही या नव्या माध्यमांत अजून मूळ धरु शकलेली नाही. या माध्यमांमध्ये बव्हंशी मनोरंजनाचीच सद्दी दिसते. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाबाबत साधकबाधक चर्चा करणे, त्यातून काय मिळाले याचा वेध घेणे ही हळूहळू अस्तंगत होत जाणारी कला आहे.

बाजारात नव्यानेच आलेल्या पुस्तकाबाबत पूर्वी वाचक-चर्चा घडत. त्याची त्याच लेखकाच्या वा अन्य लेखकाच्या अन्य लेखनाशी तुलना केली जाई. ज्या वाचकाने पुस्तक विकत आणले त्याच्याकडून ते उसने नेऊन वाचले जाई, एकमेकांना त्याची शिफारसही होई. आता हा सामान्य-वाचक-संवादही विरुन जाताना दिसतो आहे. 

नवी पिढी तर ’वाचेन तर इंग्रजीच’ अशी भीष्मप्रतिज्ञाच करुन बसलेली दिसते. करियरमधील सतत ’मागे पडण्याच्या’ भीतीचाच अवतार म्हणजे 'हॅरी पॉटर'पासून 'गेम ऑफ थ्रोन्स'पर्यंत कुठल्याही मालिकेतले ताजे पुस्तक आपण वाचले नाही तर वाळीत टाकले जाऊ अशी भीती त्यांना वाटते की काय कुणास ठाऊक. थोडक्यात मराठी पुस्तकांचे वाचन आणि त्याचे परिशीलन ही बव्हंशी ज्येष्ठांची आणि समीक्षकांची जबाबदारी होऊन राहिली आहे.

एक दोन दशकांपूर्वीपर्यंत केवळ सामान्य वाचकच नव्हे तर अनेक उत्तम आणि श्रेष्ठ लेखक, संपादक, अभ्यासक आपल्या वाचनातील पुस्तकांबद्दल जाहीरपणे बोलत, लिहित असत. त्यातून त्या लेखकामागचा वाचकही समोर येई आणि सामान्य वाचकाला त्या त्या पुस्तकाकडे अथवा त्याच्या लेखकाकडे या लेखकाच्या दृष्टीकोनातून पाहता येई. एकुण वाचकसंस्कृतीला प्रवाही राखण्यात या 'बुक्स-ऑन-बुक्स' किंवा ’कॉलम-ऑन-बुक्स’चा मोठा वाटा आहे. (आता प्रथितयश मराठी वृत्तपत्रेही आणि नियतकालिकेही इंग्रजी पुस्तकांचीच परीक्षणे प्राधान्याने छापतात.) 

श्री. बा. जोशी यांचे ’गंगाजळी’चे चार खंड, प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार याचे ’पश्चिमप्रभा’, सतीश काळसेकरांचे ’वाचणार्‍याची रोजनिशी’ तसंच जी.एं.च्या पत्रांमधून आपण वाचलेल्या पुस्तकांबद्दल, त्यांच्या लेखकांबद्दल वाचायला मिळते. सादरीकरण-कला आणि दृश्यकलांच्या बाबतीत ज्ञानेश्वर नाडकर्णींचे ’अश्वत्थाची सळसळ’ हे याच प्रकारातले.

प्रसिद्ध संपादक गोविंद तळवलकर यांनीही ’ललित’ या नियतकालिकातून आपल्या वाचनानुभवाच्या आधारे एक सदर चालवले. समीक्षा अथवा परीक्षण या सबगोलंकार आणि पारंपरिक अशा स्वरुपाहून भिन्न अशा दृष्टीकोनातून या लेखनाकडे पाहता येते. काळसेकरांनी रोजनिशीतल्या नोंदीस्वरुपात, म्हणजे काहीशा वैयक्तिक अनुभवस्वरुपात मांडले, जीएंनी बव्हंशी वैयक्तिक पत्र-संवादातून काहीशा अनौपचारिक स्वरुपात कथन केले. तळवलकरांनी लेखनापेक्षा, किंवा लेखनाबरोबरच आपले लक्ष लेखकावर केंद्रीत केले आहे.

'सौरभ' हे त्यांचे सदर दोन खंडात संपादित केले आहे. त्यातील पहिल्या भागात प्रामुख्याने लेखकांबद्दलचे लेख आहेत. त्यात मला विशेष भावलेले लेख आहेत ते चार्ल्स डिकन्स हा प्रख्यात कादंबरीकार आणि आर्थर मिलर या नाटककारावरचे. पण यात सर्वात उत्तम वठलेला लेख आहे तो व्हॅसिली ग्रॉसमन या ज्यू-रशियन लेखकावरचा. उमर खय्यामवरील लेख माहिती म्हणून आवर्जून वाचण्याजोगा. याशिवाय ऑर्वेल, चेकॉव्ह, थॉमस पेन, गटे आदि लेखकांचाही समावेश आहे.

इथे निवडलेला उतारा आहे तो अ‍ॅलन बुलक या इतिहासकारावरच्या लेखातला, आणि हा वेचा आहे तो हिटलर नामे क्रूरकर्म्याबद्दलच्या अ‍ॅलन यांच्या आकलनाबद्दलचा. त्याअर्थी तो व्यक्तिचित्रामधील व्यक्तिचित्र प्रकारात मोडतो. व्यक्ती म्हणून हिटलरच्या प्रवृत्तीचा मागोवा आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे अ‍ॅलन यांचे आकलन आजच्या भारतीय परिस्थितीचीचेच नव्हे तर इतर अनेक देशांतील स्थितीचे भान देणारे ठरू शकेल.

- oOo -

या पुस्तकातील एक वेचा: क्रूरा मी वंदिले


हे वाचले का?

क्रूरा मी वंदिले

नवा पुरावा तपासल्यावर बुलक याना असे आढळले की, हिटलर हा केवळ सत्तेच्या अनावर लालसेने प्रवृत्त झाला असे जे मत आपण व्यक्त के होते ते पूर्णतः बरोबर नाही. तो ठराविक विचारसरणीने प्रेरित झाला होता. ही त्याची विचारसरणी त्याच्या माइन काम्फ या ग्रंथात प्रगट झाली होती आणि त्याच्या संभाषणांचा संग्रहही ती प्रगट करत होता. ही विचारसरणी वंशवादी होती आणि जर्मन जनतेला त्याने तिच्या जोरावर भारून टाकले. पण हे जर्मनीत कसे शक्य झाले याचेही उत्तर दिले पाहिजे. यामुळे बुलक यांनी आपल्या ग्रंथाची फेररचना केली. परंतु त्याचा मूळ गाभा बदलण्याची गरज नसल्यामुळे त्यांनी तो तसाच ठेवला. बुलक यांच्या ग्रंथास चाळीस वर्षे पूर्ण झाली तेव्हापर्यंत त्याच्या तीस लाख प्रती खपल्या होत्या. त्यानंतर आणखी वाढ झाली असेल. या ग्रंथामुळे बुलक यांचा जगभर नावलौकिक झाला आणि जे ऑक्सफर्ड विद्यापीठ प्राचीन काळच्या इतिहासास विशेष महत्त्व देत आले होते ते आधुनिक काळाच्या इतिहासासही तितकेच महत्त्व देऊ लागले.

सौरभ-१

बुलक यांनी हिटलरविषयक ग्रंथात केलेले विश्लेषण आजही मोलाचे आहे कारण नंतरच्या काळात अनेक देशांत लहानमोठे हिटलर तयार झाले. बुलक यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे की, हिटलरची हुकूमशाही वा जर्मनीचा आर्थिक वा सामाजिक इतिहास हा आपला विषय नाही, तर हिटलर ही व्यक्ती हा आहे. त्याची प्रवृत्ती काय होती, कोणत्या महत्त्वाकांक्षेने तो प्रेरित झाला होता आणि पहिल्या महायुद्धानंतरच्या जर्मनीतील परिस्थितीचा फायदा त्याने कसा उठवला व सत्ता काबीज केली याची चिकित्सा करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले. ते साध्य करण्यासाठी जर्मन समाज, त्याचा इतिहास इत्यादींची तपासणी त्यांनी केली.

हिटलर गरीब कुळात जन्मलेला होता. त्याला लहानपणीही बराच संघर्ष करावा लागला होता. त्याचा परिणाम वर्णन करताना बुलक यांनी म्हटले आहे हिटलरचा कोणावरही विश्वास नसे. आपल्यावरील निष्ठेची शपथ घेणारांवरही त्याचा विश्वास नव्हता. या अविश्वासास तुच्छतेची जोड मिळाली होती. सत्तेची आकांक्षा, असूया इत्यादींमुळे लोक प्रेरित झालेले असतात आणि अगदी क्षुद्र अशा साधनांचा वापर ते करतात असे हिटलरचे लोकांबद्दल मत होते. त्याच्या जवळच्या लोकांना तो या दृष्टीनेच वागवत होता. लोकांच्या या प्रवृत्तींचा वापर करून आपले उद्दिष्ट साध्य करणे म्हणजेच राजकारण अशी त्याची नंतर धारणा झालेली होती. हिटलर जेव्हा व्हिएन्नात झगडत होता तेव्हा त्याची काही मते तयार झाली होती. गरीब, दुबळे, अयशस्वी झालेले यांच्याबद्दल त्याला काही सहानुभूती नव्हती. पण त्याचबरोबर सामान्य लोकांत राहूनच राजकारण केले पाहिजे हे त्याला पटले होते. आपल्याला सर्वसत्ताधारी व्हायचे असेल तर हा वर्ग आड येणार नसून खरा अडथळा संघटित कामगारसंघटनांकडून होईल असे त्याचे ठाम मत झाले होते. त्यामुळे व्हिएन्नातील लोकशाही समाजवादी संघटनांबद्दल त्याला कमालीचा तिरस्कार होता. जनसमुदाय प्रेमाने नव्हे तर क्रौर्याने दिपतो व त्यामुळे त्यास आपल्या प्रभावाखाली आणता येते असेही त्याचे आणखी एक प्रमेय होते.

व्हिएन्नातच नव्हे तर हिटलरच्या तरुण वयातील ऑस्ट्रियात ज्यूविरोधी भावना तीव्र होती. हिटलरकडे तो वारसा आला होता आणि तो त्याने जपला व वाढवला. यामुळेच नंतरच्या काळात हिटलरने ऑस्ट्रिया ताब्यात घेतला तेव्हा त्याचे स्वागत करणारा फार मोठा समुदाय तयार होता. ज्यूंच्यामुळेच जर्मनीचा र्‍हास झाला असून त्या समाजाचा विच्छेदच केला पाहिजे असे त्याचे मत बनले होते आणि हाती सत्ता आल्यावर हिटलरने या दृष्टीने पाउले टाकून काही लाख ज्यू नष्ट केले. जनसमुदायाचे मानसशास्त्र हिटलने अभ्यासले होते व त्याने काही आडाखे बांधले होते. समुदायाच्या भावना भडकवायच्या असतील तर त्याच्यापुढे कोणता तरी खरा वा कल्पित शत्रू उभा करावा लागतो आणि हा शत्रूच अवनती घडवून आणत असल्याचे लोकांच्या मनावर सतत बिंबवणे आवश्यक असते. या सूत्रानुसार हिटलरने ज्यू समाजास मानले. त्याच्यामुळे पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला असे तो सांगत असे.

बहुविध पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींची निवड करून सत्ताधारी निवडण्यामुळे दुबळे नेतृत्व पुढे येते म्हणून अशा निवडणुकीस हिटलरचा विरोध होता. सामुदायिक नेतृत्व व कर्तृत्व यावर त्याचा विश्वास नव्हता. नियमित आपल्याला नेतृत्व करण्यासाठी जन्माला घातले असल्याची त्याची ठाम समजूत होती आणि आपल्याशिवाय जर्मनीचा उद्धार कोणाकडूनही होणार नाही अशी त्याची पक्की समजूत होती.

यासाठी त्याने आपल्या मार्गात आड येणाऱ्या पक्षांच्या व व्यक्तींच्या विरुद्ध प्रचाराची मोहीम उघडली. ती उघडताना अतिरेकी व हिंसक भाषा उपयोगी पडते असे त्याचे मत होते. शिवाय उखडून टाकू, नाहीसे करू, गाडून टाकू इत्यादी भाषा वापरली की लोकांत ती वापरणारा नेता हा बलिष्ठ असल्याची भावना निर्माण होते असे हिटलर मानत होता. यामुळे तो नुसती या प्रकारची भाषा वापरूनच थांबला नाही तर तो झपाटल्याप्रमाणे बोलत असे, किंचाळतही असे. या सर्वांचा सामान्य माणसावर परिणाम होत होता. भाषणात व प्रचारात वाटले तितके खोटे बोलण्यास त्यास काही दिक्कत वाटत नव्हती. खोटे बोलावेच लागते आणि खोटे बोलायचे तर अगदी टोकाचे खोटे बोलणे अधिक बरे असे तो मानत होता. विद्वेष पसरवणे सोपे असते आणि ते भावना भडकवण्यास उपयोगी पडते हे जाणून त्याने आपल्या प्रचाराचा रोख त्यावर ठेवला.

हिटलरला संघटित कामगार वा सामान्य लोक यांच्याबद्दल काही प्रेम नव्हते. पण त्यामुळे तो भांडवलदार, कारखानदार यांची तरफदारी करत नव्हता. तो त्यांनाही धमक्या देत होता. यामुळे हिटलर हा आपल्या हिताची जपणूक करणारा असल्याचा समज सामान्य लोकांत पसरण्यास मदत होत होतो. तथापि त्याच्या हाती सत्ता आली तेव्हा जर्मन कारखानदायविरुद्ध त्याने मोहिम काढली नाही. उलट त्यांना मोकळे रान दिले, पण ते देताना कारखानदार आपल्या दहशतीखाली राहतील याबद्दल त्याने कटाक्ष बाळगला. त्याचे आणखी एक सूत्र होते. ते असे की, लोकांत विचारांचा प्रसार करणे धोक्याचे असल्यामुळे त्यांच्यात श्रद्धा निर्माण करणे आवश्यक. विचाराशी मुकाबला करणे सोपे असते. पण श्रद्धेशी कठीण असते. तेव्हा आपल्या मागे येणार्‍या समुदायाला आपल्याशी बांधून ठेवायचे असेल तर त्याच्यात श्रद्धा निर्माण केली पाहिजे असा हिशेब करून त्याने आपले सर्व राजकारण आखले होते. सत्ता, व्यक्तिगत सत्ता व तीही अनिर्बंध सत्ता हे त्याचे उद्दिष्ट होते व त्यासाठी कसलाही विधिनिषेध तो पाळत नव्हता. बुलक म्हणतात, जर्मनीत तेव्हा जे विधिनिषेधशून्य लोक होते, त्यांनाही अचंबा वाटावा अशा रीतीने हिटलर वागत होता.

जगात अनेक क्रांत्या झाल्या. त्यांनी आपल्यापुढे ठेवलेली उद्दिष्टे यशस्वी झालीच असे नव्हे. पण त्यांनी काही विधायक उद्दिष्टे लोकांपुढे ठेवली, काही सर्जनशील, विधायक विचार मांडले. हिटलर जी क्रांती करू पाहात होता, तिने अशी कोणतीच उद्दिष्टे ठेवली नव्हती. त्याचा राष्ट्रीय समाजवाद हा विनाशकारी आणि विध्वंसक होता असा निष्कर्ष बुलक यांनी सबळ पुराव्यानिशी काढला आहे. परंतु त्यांचे म्हणणे असे की, जर्मनीत बिस्मार्कपासूनच राष्ट्रवादी भावनेचा अतिरेक होत होता आणि त्यामुळे जर्मन लोकांची मनोभूमिका तयार झाली होती. यास हिटलरने आक्रमकतेची जोड दिली आणि विद्वेष पसरवण्यावर भर दिला. यामुळे त्याने फक्त विध्वंस घडवून आणला, काही निर्माण केले नाही. सर्वच हुकूमशहांच्या मनोभूमिकेची ओळख यामुळे होऊ शकते.

-oOo-

पुस्तक: ’सौरभ - १’
लेखक: गोविंद तळवलकर
प्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती पहिली (२०१०)
पृ. ११८ - १२१.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : सौरभ - १ >>
---


हे वाचले का?

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

एव्हरिबडी लव्ज आँट सेरिना

’एव्हरीबडी लव्ज रेमंड’ ही तशी जुनी मालिका, कौटुंबिक प्रवासातील घटना नि संबंधांमधील विनोदाचा हात धरुन चालणारी. सदैव सहानुभूतीच्या शोधात असलेला 'ममाज बॉय' रेमंड; त्याचा फायदा घेऊन (किंवा त्याला कारण असणारी) त्याला सदैव पदराआड राखू पाहणारी, सून ही नेहेमीच घरकामाच्या बाबत नालायक असते असा ठाम समज असलेली - जवळजवळ भारतीय सासू म्हणावी अशी त्याची भोचक आई मेरी; बाप म्हणून आपल्या कर्तव्याबाबत बव्हंशी उदासीन असणारे, मुलगा-सून-बायको या त्रिकोणात बहुधा बेफिकीर असणारे, आणि खाण्यात व भूतकाळात जगणारे रेमंडचे वडील फ्रँक, आणि संसार हेच जीवितकार्य म्हणून मुलाबाळात रमलेली, नवरा आईच्या मुठीत असल्याने हताशपणे सहन करणारी रेमंडची पत्नी डेब्रा... हे कुटुंब मला बव्हंशी आपल्या भारतीय कुटुंबाचे प्रतिनिधीच वाटत आले आहे.

अगदी 'पीपल नेक्स्ट डोअर' वाटावे असे कुटुंब! यांच्या आयुष्यात घडणार्‍या घटना, त्यांना सामोरे जावे लागलेल्या समस्याही अगदी अस्सल भारतीय वाटाव्यात अशा. तपशीलातील वेगळेपण वगळले तर मुळात सारे जगणे अस्सल भारतीय म्हणण्यात काडीचाही अतिरेक होणार नाही असे.

कधीतरी छोट्या अ‍ॅलीच्या- रेमंडच्या मुलीच्या- शाळेतून आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या मुलाखतीवर आधारित निबंध लिहावा असा 'गृहपाठ' दिला जातो आणि शोध सुरु होतो अशा ज्येष्ठतम सदस्याचा. इथे फ्रँकला आठवण होते आपल्या कुण्या ’आँट सेरिना'ची.

ही फ्रँकच्या वडिलांची बहिण. त्यांचे सारे कुटुंब इटलीहून अमेरिकेला स्थलांतर करत असताना तिकडेच राहिलेली. ती अविवाहित आहे आणि इटलीत अशा ठिकाणी राहणारी की तिला स्वतःचा असा पत्ताही नाही, स्थानिक पोस्ट ऑफिसच्या नावेच तिचे पत्र पाठवावे लागते. या निमित्ताने फ्रॅंक अथवा मेरीबद्दल लिहिणे अनायासे टळेल, या धूर्त हेतूने डेब्रा अ‍ॅलीला तिकडे पत्र पाठवण्यास सांगते.

उत्तर म्हणून तीन आठवड्यात खुद्द आँट सेरिनाच दत्त म्हणून हजर होते. आता ही साधीसुधी स्त्री गेली अनेक वर्षे इटलीत राहते आहे, तिला इंग्रजीचा गंध नाही. ती येते तेव्हा फक्त फ्रँक आणि मेरी हे दोघेच इतालियन भाषा जाणणारे असतात, ते देखील मुलांना न समजता भांडता यावे यासाठी त्या भाषेचा वापर करून सराव राखलेले. पण डेब्रा नि मुले मात्र या भाषेबाबत अनभिज्ञ आहेत.

आँट सेरिना येते ती सारे घरच ताब्यात घेते. ती निष्णात कुक आहे. तिच्या एकाहुन एक अफलातून रेसिपीज, तिने मुलांना शिकवलेली आणि त्यांनी सहजपणे आत्मसात केलेली इतालियन गाणी, घरातील मोठ्यांना आपल्या लाघवी स्वभावामुळे तिने बांधून घातलेले. यातून सारे बरोन कुटुंब पूर्वी कधी नाही इतके एकसंघ होत जाते. जेमतेम आठवड्याभरात समोरासमोर राहणारी आणि सतत एकमेकांची उणीदुणी काढणारी फ्रँक-मेरी आणि रे-डेब्राची कुटुंबे एकजीव होऊन जातात.

कुठल्याशा एका फॅमिली फोटोवरून ध्यानात येते की आँट सेरेना ही या 'बरोन' फॅमिलीची नव्हे, तर अन्य कुणा बरोन्सची आँट आहे. अचानक उघड झालेल्या या सत्याने सारेच भांबावतात नि खंतावतातही. आँट सेरेनाच्या रक्ताच्या नात्यातील तिच्या कुण्या नातीबरोबर तिने जाताना या 'बरोन्स'ना मात्र काही जिवाभावाचे गमावल्याची खंत सतावत राहते. 

रक्ताचे नाते नसेल कदाचित पण ती आँटी त्यांची जिवाभावाची नातलग होऊन राहिली होती. कुटुंबव्यवस्थेचा अर्थ तिने त्यांन उलगडून दाखवला होता. घरच्या मुलांपासून ते तिसर्‍या पिढीपर्यंत सार्‍यांचेच तिच्याशी 'नाते' जुळले होते. ते तुटताना त्या 'बरोन्स'ची जी उलघाल होते ती केवळ त्रस्त करणारी. ती आँटी त्यांची रक्ताची नातलग नसेल पण सार्‍या कुटुंबाला बांधून घालणारा एक 'बंध' ठरली होती.

हिंदीमधे 'रिश्ते' आणि 'नाते' असे दोन भिन्न अर्थाचे शब्द आहेत. मराठी त्यामानाने थोडी कद्रू आहे. दोन्हींसाठी आपल्याकडे नाते असाच शब्द आहे. 'बंध' हा एक शब्द आहे पण तो फारच सबगोलंकार आहे. इथे आँट सेरेनाचे बरोन कुटुंबियांशी जे नाते जुळते ते 'रिश्ते' या वर्गीकरणात बसणारे नसले, तरी भावनिक नात्यांच्या पातळीवर उतरणारे. छोट्या अ‍ॅलीचे आपल्या सख्ख्या आजोबांशी नसतील इतके ऋणानुबंध त्याच्या या कुण्या आँटीशी जुळलेले. ते तुटते तेव्हा अ‍ॅली आणि अन्य बरोन्सना जेव्हढा त्रास देते कदाचित तेवढाच त्रास तुम्हा आम्हा प्रेक्षकांना देते.

विस्कळित आयुष्यात कुठेतरी एखादे वळण येते जिथे आँट सेरिना भेटते नि असे काही घडते की सारे कुटुंब त्या हरवलेल्या धाग्यात ओवले जाते. ती आँट सेरिना निसटून जाते हे खरे, पण तो धागा तुटू नये याची काळजी घ्यावी याचे भान मात्र जाता जाता देऊन जाते. अशी आँट सेरिना आवश्यक तेव्हा तुम्हा सार्‍यांच्या आयुष्यात भेटो ही सदिच्छा. आणि जेव्हा भेटेल तेव्हा ती तुमचीच आँट सेरिना असावी आणि तिला गमावण्याचे दु:ख तुमच्या वाट्याला येऊ नये ही देखील!

- oOo -


हे वाचले का?

मंगळवार, १४ जुलै, २०२०

लॉजिकस्तत्र दुर्लभ:

हा एक लहानसा संवाद ’ब्लॅक अ‍ॅडर’ नावाच्या एका बर्‍याच जुन्या मालिकेतला. मि. बीन म्हणून लोकप्रिय झालेला रोवान अटकिन्सन प्रमुख भूमिकेत होता. मला स्वत:ला हा नट फारसा आवडत नाही आणि मालिकाही फारशी आवडली नाही. पण ही मालिका ’अल्टरनेटिव्ह हिस्टरी’ अर्थात समांतर इतिहास या साहित्यिक प्रकारात मोडणारी आहे. ’असे न होता, तसे झाले असते तर’ प्रकारची. अशा स्वरूपाचे लेखन बहुधा पर्यायी जगाचा वेध घेणारे असते, गंभीर असते. पण ही मालिका त्याला विनोदी अंगाने सादर करते. हा कदाचित असा पहिलाच प्रयत्न असावा.

प्राचीन इंग्रजीमध्ये अ‍ॅडर म्हणजे साप. पण हा ब्लॅक अ‍ॅडर नेमका उलट प्रकारचा आहे, शेळपट आहे. राजाचा मुलगा असून त्याला कुणी खिजगणतीत धरत नाही. कधी समोर आला तर खुद्द त्याचा बाप त्याला ओळखत नाही. ’हा तुझा मुलगा’ अशी ओळख दिल्यावरच त्याला ते लक्षात येते. तो याचे नावही बहुतेक वेळा चुकीचे उच्चारतो. इतकेच काय एक-दोनदा तर तो याला मुलगी समजतो. पण असा राजघराण्याच्या वळचणीतला बिनविषारी साप म्हणून जगत असला तरी तो मूर्ख नाही.

त्याचा पर्सी या त्याचा स्क्वायर अथवा मदतनीसाशी झालेला संवाद आहे. हा मदतनीस कुण्या स्पॅनिश उमरावाच्या इन्फन्टा नावाच्या मुलीच्या देखणेपणाचे वर्णन करुन त्याला लग्नासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर पर्सीने सांगितलेल्या त्यातल्या एका सांगोवांगीच्या गोष्टीवर अ‍ॅडर प्रश्न विचारतो आहे.

पण तरीही त्या न पाहिलेल्या आपल्या वाग्दत्त वधूच्या आगमनाची तो आतुरतेने वाट पाहतो आहे. आणि अशा केवळ सांगोवांगीच्या स्तुतीच्या - आणि राजकारणाच्या सोयीच्या - आधारे जमवलेल्या या सोयरिकीचा परिणाम काय होऊ शकतो हे दाखवणारा हा विनोदी प्रसंग.

Percy: You know, They say that the Infanta's eyes are more beautiful than the famous stone of Galvaston.

Adder: Hmm... The what?

Percy: The famous stone of Galvaston, my lord.

Adder: And... what's that exactly?

Percy: Well... it's a famous blue stone, and it comes... from Galvaston.

Adder: I see. And what about it?

Percy: Well, my lord, the Infantas' eyes are bluer that it.

Adder: I see. And have you ever seen this stone?

Percy: No, not as such... my lord. But I know couple of people who have, and they say it's very blue indeed.

Adder: And have these people seen Infanta's eyes?

Percy: I shouldn't think so, my lord.

Adder: --And neither have you.

Percy: No, my lord.

Adder: Then what you are telling me Percy, is that something you have never seen, is slightly less blue than something else you have never seen. (म्हणजे थोडक्यात तू मला असं सांगतो आहेस की, 'तू न पाहिलेली एक वस्तू , तू न पाहिलेल्या दुसर्‍या वस्तूपेक्षा कमी निळी आहे.')

प्राचीन काळी माणूस जेव्हा जंगलवासी होता, त्याच्या करमणुकीचे मुख्य साधन होते गाणे. हे प्राथमिक स्वरुपाचे गाणे शब्द नि सुरावटीपेक्षा लय आणि सामूहिकता याला प्राधान्य देणारे असे. माणसाची शब्दसंपदा वाढली आणि तो भवतालाबद्दलची निरीक्षणे शब्दांमार्फत त्या भवतालापासून दूर असणार्‍यांपर्यंत पोचवू लागला. मग त्याला कधीतरी कल्पनाविस्ताराचा शोध लागला आणि पाहिले-अनुभवलेले मीठ-मसाला लावून इतरांना सांगू लागला. असे किस्से, कहाण्या शेकोटीभोवती रंगवलेल्या गप्पांमध्ये अधिक सहजपणे मिसळून गेल्या.

पण पुढे शब्दांची ताकद लक्षात आलेल्या काही चाणाक्ष लोकांनी हे मीठ-मसाला लावणे मनोरंजनापेक्षाही जनमत स्वार्थानुकूल करुन घेण्यासाठी वापरायला सुरुवात केली. पण ते फार पुढे, माणसाला सत्ता नावाच्या चेटकीणीने पछाडल्यानंतर. पण त्यापूर्वी जंगलवासीयांमध्ये शेकोटीभोवती रंगलेले हे किस्से हळूहळू सांस्कृतिक वारशामध्ये रूपांतरित होऊ लागले, त्या भूभागापासून दूर, त्या समाजा/टोळीपासून दूर अन्य भूभागावर पसरु लागले.

पुढे कदाचित ही गावगप्प (खरंतर शेकोटीगप्प) आहे हे पुढील पिढ्या विसरुन गेल्या आणि त्या कथा-किश्शांना इतिहासाचे रूप आले. शब्दाला छपाईची जोड मिळाल्यानंतर त्याला अधिक भक्कम आधार आला. त्या संकलित, छापील, शब्दांना अधिक वजन आले. (आजही छापलेले - आता डिजिटल सुद्धा, सगळे काही खरे मानून चालणारा वर्ग बहुसंख्येत आहे.) 

त्याचा आधार घेऊन काही चलाख लोकांनी त्याच्या भोवती आपल्या सोयीच्या व्यवस्थेचे जाळे विणायला सुरुवात केली. त्यासाठी त्यात आपल्या सोयीची भरही घातली, पण तो सर्वशक्तिमान देवाचा शब्द आहे असे बजावून त्याबद्दल आक्षेप घेणार्‍यांची तोंडे बंद करुन टाकली. माणसाने सुरुवातीला मनोरंजनासाठी शोधलेल्या कल्पनाविस्ताराने माणसाच्या आयुष्याला जखडून टाकणारी व्यवस्था उभी केली. पण हे फार गंभीर झाले.

एकुणात गावगप्पा हा सोशलायजेशन, सामाजिक अभिसरणाचा एक प्रमुख आधार आहे असे काही समाजशास्त्रज्ञ मानतात. उपस्थित नसलेल्या कुणाबद्दल तरी कुचाळक्या, गॉसिप करण्याने उपस्थित असलेल्यांच्या नात्यांमध्ये बंध बळकट होतात असे मानले जाते. 

पण या कुचाळक्या अथवा किस्से/गप्पा केवळ तेवढ्या गटापुरत्याच राहतात असे नाही. त्यांचा वापर तिथली कुणी दुसर्‍या एखाद्या गटात शिरकाव करुन घेण्यासाठी अथवा प्रस्थापित होण्यासाठी, आपले स्थान बळकट करण्यासाठी करुन घेतो आणि किस्सा कथेमध्ये, समजामध्ये रूपांतरित होतो. मग 'आकाशात देव आहे नि गण्याला पोर होत नाही याचे कारण तो गण्यावर नाराज आहे’ यावरही सहज विश्वास ठेवणारा समाज त्यांना आपल्या समजुतीचा भाग म्हणून सहज सामावून घेतो.

ऐकले ते खरे आहे का असा प्रश्न त्यांना पडत नाही. मग पुढचा पडताळा घेण्याचा विचार तर सोडूनच द्या. फारतर तो सांगणारा आपल्या दृष्टीने विश्वासार्ह आहे का इतपतच विचार केला जातो. तो ही सापेक्षच असणार हे उघड तर आहेच. शिवाय त्या विश्वासार्ह माणसाने ही गावगप्प त्याच्या दृष्टीने विश्वासार्ह असलेल्या अन्य कुणाकडून ऐकलेली असेल.

 पण या 'चुलत-विश्वासार्ह' माणसाच्या विश्वासार्हतेबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. विश्वासार्हतेच्या या साखळीत एक कल्पनारंजन करणारी अथवा स्वार्थप्रेरित छद्मवास्तवाची रुजवणूक करु इच्छिणारी व्यक्ती शिरली, की थेंबभर विषाने वेगाने पसरुन सारा पाणवठा विषमय करावा तसे या गावगप्प-प्रसाराचे होत असते...

काबाच्या दगडाखाली शिवलिंग आहे मूळ अयोध्या भारतात नाही आमच्या थायलंडमध्ये होती, रेड इंडियनांच्या पूर्वी इथे आमचे कॉकेशन अमेरिकनच राहात होते ज्यांना रानटी इंडियनांनी क्रूरपणे हाकलले, चंद्रावर आमच्या देशातील कुण्या गुप्त सम्राटाचे साम्राज्य होते... वगैरे बाबी सांगोवांगीतून पसरत जातात, ऐकायला छान वाटतात, मग लोक खर्‍या मानून चालतात. 

पण एखादा जागरुक मनुष्य त्यांचा पडताळा घेऊ पाहतो तेव्हा या सार्‍या ’आम्ही सारे विश्वासार्ह’ गटातल्या कुणालाच याबाबत त्या समजापलिकडे काहीच ठाऊक नाही असे लक्षात येते. प्रत्येक जण मागच्याकडे बोट दाखवण्यापलिकडे काहीही पुरावा देऊ शकत नाही. अर्थात याने त्या गटाचे फार बिघडते असे नाही. 'इतक्या सार्‍यांना ते पटले आहे म्हणजे ते खरेच आहे, हा दीडशहाणा कोण लागून गेला आम्हाला विचारणारा’ असे समर्थन देऊन ते नव्या गावगप्पा वास्तव म्हणून पुढे सरकवू लागतात.

- oOo -


हे वाचले का?

सोमवार, ६ जुलै, २०२०

गाणारं व्हायलिन

मी पाश्चात्त्य संगीताचा फारसा भोक्ता नाही. त्यात त्यांचे वाद्यसंगीत सर्वस्वी वेगळ्या वळणाचे. त्यांचे क्लासिकल म्हणवले जाणारे संगीत सिंफनीच्या मार्गाने जाते, ज्यात अनावश्यक गलबला असतो नि मला पुरेसे तंद्री लावून ते ऐकणे शक्य होत नाही. सुरांच्या लडी, आवर्तने उलगडत श्रोत्याला कवेत घेत जाणारे गाणे ऐकण्याची सवय असलेल्या मला, सदोदित गाण्याचा टेम्पोशी खेळ करत आघातांच्या सहाय्याने ’Awe, Wow’ प्रतिक्रिया वसूल करु पाहणारे ते गाणे रुचत नाही. ’सुंदर मी होणार’ मधला सुरेश म्हणतो तसे आपल्याला ’सुरांचे पांघरुण घेऊन गुपचून पडून राहावेसे वाटते’. पण हे लेकाचे अध्येमध्ये अलेग्रो का काय म्हणतात त्याचे दणके देऊन त्या तंद्रीतून बाहेर खेचून काढू पाहतात असा माझा अनुभव आहे.

भारतीय वाद्यसंगीताच्या बाबतही मी तसा गायकी अंगाच्या वाद्यवादनाचा चाहता आहे. आपल्याकडे जे आलाप-जोड-झाला प्रकारातले वाद्यवादन होते ते मला फारसे पसंत पडत नाही. त्यातला फक्त आलाप ऐकून मी सोडून देत असतो. जोड आणि झाला मध्ये वादक हमखास ’जनता को खुश कर डालो’ मोडमध्ये जाऊन ’मंगलगाणी’ ऐवजी तबल्यासोबत ’दंगलगाणी’ ऐकवू लागतो असा अनुभव आहे.

एखाद्या रागसंगीताच्या मैफलीत क्वचित कधी तरी वादक एखादे नाट्यपद ऐकवून जातो इतकेच. पण ते ही ’जाताजाता’ या सदरात. एक स्वतंत्र कलाप्रकार अथवा परफॉर्मन्स म्हणून वाद्यांवर गाणी वाजवण्याचा प्रकार प्रभाकर जोग यांच्या ’गाणारं व्हायलिन’ वगळता आणखी कुणी हाताळलेला दिसत नाही. गाणे वाजवणे हा वाद्यवादकांना कमीपणा आणणारा प्रकार वाटतो की काय हे विचारुन घेतले पाहिजे.

पाश्चात्त्य गानसंगीताचा विचार केला, तर त्यात पॉप, रॅप, रॉक वगैरे अनेक अवतारांची सरमिसळ दिसते खरी. पण भारतीय पद्धतीचे शब्दाला घट्ट असलेले, प्राधान्य देणारे गाणे स्वतंत्रपणे ऐकवणे हा प्रकार फारसा सापडला नाही. पण विविध चित्रपटांतून अशी गाणी - भारतातील चित्रपटांइतकी भरताड नसली तरी - ऐकायला मिळतात. पण चित्रपटाच्या इतर धबडग्यात ती बारकाईने ऐकली जातात असे नाही. याचे कारण भारतीय चित्रपटांसारखे हे गाणे एक स्वतंत्र तुकडा म्हणून चित्रित करण्याचा फारसा प्रघात नाही. तेव्हा गाण्यासोबतच समोर घडणार्‍या घटनांकडे लक्ष द्यावे लागत असल्याने त्याच्या आस्वादात थोडी बाधा येते.

पण माझ्यासारख्याला उपयुक्त असा प्रकार मला अलिकडे सापडला तो म्हणजे ’कव्हर आर्टिस्ट्स’चा. एखाद्या गायकाने गायलेले नि गाजवलेले गाणे, किंवा एखाद्या चित्रपटातले गाणे आपल्या आवडीच्या वाद्यावर वाजवणे, त्याचा कार्यक्रम करणे वा सीडी बनवणे याला ’कव्हर करणे’ असा वाक्र्पचार प्रचलित आहे.

असे कलाकार मेट्रो स्टेशन, आठवडी बाजारात अथवा एखाद्या मॉलमध्ये अशाच कलाकारांसाठी मोकळ्या ठेवलेल्या जागेत आपली कला सादर करत असतात. समोर एक डबा ठेवलेला असतो. जाताजाता यांचे गाणे ऐकणारे लोक यथाशक्ती त्यात पैसे टाकून त्यांच्या कलेला दाद देत असतात. याच सोबत बाजूला एखाद्या छोट्या ब्रीफकेसमध्ये अथवा फोल्डेबल टेबलवर त्या कलाकाराच्या सीडींची चळत ठेवलेली असते. किंमतीचा बोर्ड असतो. ज्याला हवी असेल त्याने सीडी उचलावी नि पैसे तिथे टाकावेत. कलाकार त्यासाठी आपले सादरीकरण थांबवत नाही.

कारोलिना प्रोत्सेंको या अकरा वर्षांच्या छोट्या मुलीने व्हायलिनवर वाजवलेले ’सिन्योरिटा’ ऐकले आणि मी त्या पोरीच्या प्रेमात पडलो. त्या पोरीनेच मला कव्हर या प्रकाराकडे आकृष्ट केले. यापूर्वी वेगवेगळ्या वाद्यांवर वाजवलेली गाणी ऐकण्याचा प्रयत्न केला होता. पण काही प्रमाणात पियानो वगळता इतर वाद्यांवरील असे प्रयोग मला फारसे रुचले नव्हते. पण या छोटीच्या परफॉर्मन्समुळे व्हायलिन हेच आपले वाद्य (ऐकण्याचे हो) हे मी निश्चित केले. पुढे आणखी काही उत्तम परफॉर्मन्सेस सापडलेही.

सोबत जोडलेला व्हिडिओ आहे तो त्या 'सिन्योरिटा’चाच. कारोलिनाने याचे बरेच स्ट्रीट परफॉर्मन्स केलेले दिसतात. एक-दोघांबरोबर सह-वादनही केले आहे. एकुणात तिचे विशेष आवडीचे गाणॆ असावे. माझ्यासारख्या करकरीत वस्तुनिष्ठ माणसालाही मंत्रमुग्ध करुन ते गाणे पुन्हा पुन्हा ऐकायला लावले म्हणजे, त्या गाण्यावर तिचे उत्तम प्रभुत्व प्रस्थापित झाले आहे असे म्हणायला हरकत नाही.

पाश्चात्य संगीतात गायकांना गाण्याबरोबर परफॉर्मन्स कडेही लक्ष द्यावे लागते. त्यांचे कार्यक्रम हे स्टेज-शोच असतात. त्यामुळे त्यांना नृत्य-दिग्दर्शकाची सोबत लागते, नेपथ्य लागते, झगमगते दिवे, नाट्यमय प्रवेश वगैरे क्लृप्त्या लढवाव्या लागतात. एकुणात सारा नटवा मामला असतो.

पण या पोरीला रस्त्यावर आपली कला सादर करताना पाहा. लय तिच्या अंगातच आहे. तिला वेगळ्या नटव्या परफॉर्मन्सची गरज नाही. ते व्हायोलिन तिच्या शरीराचा भागच आहे. (असेच आणखी एक-दोन कव्हर-आर्टिस्ट नंतर सापडले. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.) ती लय, ते तादात्म्य ज्याला सापडले तो खरा कलाकार. मग त्याला बहुधा इतरांच्या स्तुती, टीकेची पर्वा राहात नसावी. बस्स आपले हत्यार उचलावे, सुरांना आमंत्रण द्यावे नि मैफल सुरु करावी.

कलाकाराने आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी कुण्या संपादकाच्या मर्जीने चालणार्‍या वृत्तपत्र, नियतकालिकाचे किंवा कुणाच्या भांडवलावर उभ्या असलेल्या आणि फायद्याचे चोख गणित करणार्‍या थिएटर अथवा व्यासपीठाचे मोहताज नसावे. जमिनीच्या तुकड्यावर एक कोपरा पकडून त्याने आपल्या कलेत रममाण व्हावे. हरफनमौला वृत्तीने ती धुंदी अनुभवावी, पिटुकल्या डोळ्यांतही कुतूहल जागवावे. प्रेक्षकांनी साक्षीभावाने ती अनुभवत तिला दाद द्यावी. आणि मुख्य म्हणजे ती देताना कलाकार हा याचक आणि आपण दाते अशी भावना मनात न आणता ’काही द्यावे काही घ्यावे’ या भावनेने द्यावी.

द्रव्य आणि भोगक्षमतेपलीकडे, लालसा सोडून माणसांनी कधीतरी माणसांसारखे वागावे...

-oOo-


हे वाचले का?

बुधवार, १ जुलै, २०२०

समीक्षकाचे स्वगत

थोडक्या पैशात चालवली जात असल्याने ’फुकट लिहिणार्‍यास प्राधान्य’ अशी पाटी लावून बसलेली पोर्टल्स तसंच वृत्तपत्रे, आणि फेसबुकसारखी समाजमाध्यमे यांच्या कृपेने चित्रपटांच्या समीक्षकांचे हल्ली भरघोस पीक आले आहे. चित्रपटाची कथा आपल्या शब्दांत सांगून, त्याला दिग्दर्शक, प्रमुख अभिनेत्यांच्या meta-data म्हणजे पूर्व-माहितीची जोड देऊन समीक्षक म्हणून मिरवणारे बरेच दिसू लागले आहेत. सोबत ’मीच पयला’ची अहमहमिका चालवणारे आणि ’बकवास आहे. पैसे फुकट घालवून नका’चे सल्ले न मागता देणारेही उगवले आहेत.

’मसान’सारख्या नितांतसुंदर चित्रपटाबद्दलही असला सल्ला वाचला होता. त्यावर मी तपशीलाने लिहिल्यावर ’आम्ही खरंच या दृष्टीने पाहिले नव्हते. आता पुन्हा पाहू.’ म्हणून कबुली देणारे एक-दोघे निघाले, नि लिहिल्याचे सार्थक झाले असे वाटून गेले. पण अशी खुल्या मनाने विचार करणारी माणसे विरळाच. खाली दिलेल्या उतार्‍यातील ईगो हा असा दुर्मिळ नमुना. एरवी आपल्यासारख्यांचा कंपू बनवून ’अहो रूपम् अहो ध्वनिम्’ पद्धतीने स्वत:चे म्हणणे रेटणारीच अधिक. अज्ञानींच्या बहुमताने ज्ञानालाही सत्याच्या स्थानावरुन खाली खेचता येते हा आता नित्य अनुभवाचा भाग झालेला आहे.

आणि या सर्वांवर कडी म्हणजे बहुसंख्य लोकांना आवडते ते सारे वाईट आहे, कम-अस्सल आहे हे आवर्जून सांगणारे ’उन्नत-नासिका’ समीक्षक तर आपली मोठी परंपराच घेऊन येतात. यांच्या समीक्षेत गोष्ट आणि माहितीसोबत वास्तववाद, नव-वास्तववाद, जादुई-स्वप्नवाद वगैरे जड-जड शब्दांची पखरण असते. ज्याने समीक्षेचे वजन वाढते बहुतेक. या चिरफाडीमध्ये, पोस्टमॉर्टेममध्ये चित्रपटाच्या अनुभवाशी नाते जोडण्याचे बिचारे विसरुन जातात.

अशा सर्वांसाठी रॅटटुई या चित्रपटातले हे स्वगत (जे त्या समीक्षकाने लिहिलेल्या एका रिह्व्यूचा भाग आहे) इथे शेअर करतो आहे.

रॅटटुई हा चित्रपट आपल्याकडील पंचतंत्राच्या कुळीतली कथा घेऊन आला आहे. गुणवत्ता नसून केवळ वारसा म्हणून मालकी/सत्ता हाती आलेले, गुणवत्ता असूनही हलक्या कुळातील असल्याने हक्काचे स्थान नाकारले गेलेले, त्यांना ते मिळते आहे असे दिसताच ते हिरावून घेण्याचा आटापिटा करणारे, अनुक्रमे लिंग्विनी, रेमी (उंदीर) आणि स्किनर ही तीन पात्रे तीन मानवी प्रवृत्तींची प्रतीके आहेत. या तिघांपलिकडे चौथे महत्वाचे पात्र आहे ते अंतोन ईगो. चित्रपटात ईगोला इतर तिघांइतके फुटेज मिळाले नसले तरी त्या पात्राचे महत्व कमी नाही. याचे कारण म्हणजे तो एका बाजूने त्याच्याशिवाय त्या कथेचा निरास होऊ शकत नाही आणि दुसरे म्हणजे त्या कथानकाचा तो एकप्रकारे सूत्रधार आणि निवेदकही आहे.

In many ways, the work of a critic is easy. We risk very little, yet enjoy a position over those who offer up their work and their selves to our judgment. We thrive on negative criticism, which is fun to write and to read. But the bitter truth we critics must face is that in the grand scheme of things, the average piece of junk is probably more meaningful than our criticism designating it so.

But there are times when a critic truly risks something and that is in the discovery and defense of the new. The world is often unkind to new talent, new creations. The new needs friends.

Last night, I experienced something new, an extraordinary meal from a singularly unexpected source. To say that both the meal and its maker have challenged my preconceptions about fine cooking is a gross understatement. They have rocked me to my core.

In the past, I have made no secret of my disdain for Chef Gusteau's famous motto, "Anyone can cook."But I realize only now do I truly understand what he meant. Not everyone can become a great artist, but a great artist can come from anywhere. It is difficult to imagine more humble origins than those of the genius now cooking at Gusteau's, who is, in this critic's opinion, nothing less than the finest chef in France. I will be returning to Gusteau's soon, hungry for more.

- Anton Ego

हा ईगो फूड-क्रिटिक अर्थात खाद्य-समीक्षक आहे. आपल्याकडे हा प्रकार फारसा नसला, तरी चित्रपटाची पार्श्वभूमी असलेल्या फ्रान्समध्ये माणसे जगण्याचा सर्वांगांनी उपभोग घेत असल्याने त्याची भूमिका महत्वाची आहे. आपल्याकडे चित्रपटाची तथाकथित वृत्तपत्रीय समीक्षा वाचून (खरंतर दिलेले रेटिंग पाहून) अनेक प्रेक्षक तो पाहावा की नाही हे ठरवतात. तसेच ईगोसारख्या चिकित्सक समीक्षकाचे मत वाचून चित्रपटातील पॅरिसमधले खवय्ये एखाद्या रेस्तरांमध्ये जावे की नाही, जाऊन कोणता पदार्थ खावा याबाबत निर्णय घेत असत. त्यामुळे शहरातील सर्व रेस्तरांमधील शेफ/कुक यांच्यात त्याचा दरारा होता. 

शेफ गुस्तोवच्या ’गुस्तोव्ज’ या रेस्तराचे रेटिंग ईगोने कमी केल्यामुळे त्याचा व्यवसाय डबघाईला येतो. त्यातून त्याची आर्थिक परिस्थिती ढासळते, परिणामी त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्याचा मृत्यू होतो. ईगोचा एक रिव्ह्यू काय करु शकतो याची ही झलक असते. अशा कठोरहृदयी ईगोचे हे खाली दिलेले स्वगत आहे ते रेमी या छोट्या उंदराबद्दल, त्याच्या भाषेत ’लिटल शेफ’बाबत.

गुस्तोवचे डबघाईला आलेले रेस्तरां रेमीच्या पाककौशल्याने पुन्हा उभारी धरते. अर्थात त्याचे श्रेय त्याचा चेहरा म्हणून मिरवणार्‍या लिंग्विनीकडे जाते. या नव्या रेस्तरां आणि शेफच्या मूल्यमापनासाठी ’मी तुमच्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येईन उद्या येईन’ अशी गर्भित धमकीवजा सूचना देऊन ईगो जातो. थोडक्यात आयत्यावेळच्या कारणांना जागा न ठेवता पदार्थ निवडीला आणि पाककौशल्य साधण्यास भरपूर वेळ देऊन आव्हान देतो.

सारे प्रसिद्ध पदार्थ सोडून रेमी त्याच्यासाठी ’रॅटटुई’ या खेडूत-खाण्याची निवड करतो तेव्हा त्याचे सहकारी आश्चर्यचकित होतात. ज्याप्रमाणे चित्रपटाचा संभाव्य प्रेक्षक ध्यानात घेऊन मांडणी केलेला चित्रपट लोकप्रिय होतो, त्याप्रमाणे खरा शेफ आपल्या ग्राहकाला अचूक जाणणारा असावा लागतो. त्याची संभाव्य आवडनिवड, चवीबद्दल त्याची अपेक्षा वगैरे बाबींचा ग्राहकाच्या प्रकृतीनुसार अदमास घेऊन त्या ग्राहकासाठी पदार्थ तयार करु शकतो तो खरा श्रेष्ठ शेफ ठरतो. रॅटटुई खायला घालून ईगोला त्याच्या बालपणात घेऊन जाणारा रेमी हे आव्हान जिंकतो ते त्यामुळे.

वाईट रिव्ह्यू लिहिण्यासाठी पेन परजून बसलेला ईगो आपला पराभव खुल्या मनाने मान्य करतो. हे करत असताना तो खाद्य-समीक्षक म्हणून बाजारातील पत गमावतो, प्रामाणिकपणाची किंमत मोजतो. म्हणून त्याचे हे स्वगत उल्लेखनीय ठरते.

-oOo-

जाताजाता:

चित्रपटाबद्दल लिहिताना फोलपट-मसाला ऊर्फ मेटा-डेटाची जोड नाही म्हणून या लेखनाला नापास करण्यासाठी ईगोप्रमाणेच पेन सरसावून बसलेल्यांसाठी थोडेसे.

या उतार्‍यामध्ये ज्याचे स्वगत आहे त्या ईगोला प्रसिद्ध अभिनेता पीटर ओ’टूल याचा आवाज दिला आहे. पीटर ओ’टूल म्हणजे ’लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या अतिशय गाजलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका केलेला अभिनेता... तब्बल आठ वेळा ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळूनही त्याच्यापासून वंचित राहिलेला!


हे वाचले का?

बुधवार, २४ जून, २०२०

पोर पोशिंदा जाह्‌लं

दृश्य माध्यमांमध्ये चलच्चित्रांचे अर्थात Animationचे माध्यम हे प्रामुख्याने लहान मुलांच्या करमणुकीसाठी आहे असा एक व्यापक गैरसमज आहे. सतत करमणूकप्रधान, ’विचार करायला लावू नका ब्वा’ म्हणत उथळ करमणुकीच्या शोधात असणार्‍यांना तेवढी एकच बाजू दिसते यात आश्चर्य नाही. 'परदेशी चित्रपट म्हणजे केवळ हॉलिवूड, आणि हॉलिवूड म्हणजे कृतक-हिरोंचे अशक्य, अतर्क्य कारनामे दाखवणारे किंवा भीती वा लैंगिकता विकून चार-चव्वल कमवू पाहणारे चित्रपट' हा समज जितका संकुचित, तितकाच हाही.

या माध्यमातही अनेक उत्तम आशयघन चित्रपट आणि लघुपट निर्माण केले जात आहेत. अनेक सकस, आशयघन आणि गंभीर विषयांवरील चित्रपटही यात समाविष्ट आहेत. ’ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाईज’सारख्या विषण्ण करणार्‍या चित्रपटापासून ’रॅटटुई’ सारखी पंचतंत्राच्या कुळीतील मॉडर्न कथा सांगणारे चित्रपट याच माध्यमात तयार झाले आहेत.

जन्मदात्री आई आणि मूल यांच्यातील नात्याबद्दल कवींपासून लेखकांपर्यंत आणि अतिभावनिक मराठी चित्रपट तसंच मालिकांपासून व्यक्तिस्वातंत्र्यवादी अमेरिकेतील ’सिंगल मदर’ या वास्तवाभोवती फिरणार्‍या चित्रपट आणि मालिकांपर्यंत... इतकं लिहिलं, बोललं आणि साकारलं जात आहे की त्या भाऊगर्दीमध्ये त्या नात्याचे सकस चित्र शोधणे कोळशाच्या खाणीत हिरा शोधण्यासारखे होऊन बसले आहे. मराठी भावकवितेच्या तेजीच्या काळात तर ’आई या विषयावर भावनेने थबथबलेली एखादी कविता समाविष्ट नसेल तर प्रकाशक काव्यसंग्रह छापायला नकार देत असे’ आम्ही गंमतीने म्हणत असू.

चलच्चित्रांच्या माध्यमातही- निदान लघुपटांच्या, मला असे काही चित्रपट सापडले. पण त्यात काही उल्लेखनीय आहेत. यापैकी ’बाओ’ या ऑस्करविजेत्या लघुपटाची ओळख माय लिटल् डम्पलिंग या आधी लिहिलेल्या पोस्टमध्ये करुन दिली आहे.

’पायपर’ची कथा आहे त्याच नावाच्या (आपल्याकडील टिटवीच्या जातीच्या) पक्ष्याची, एका मायलेकांची. हा पक्षी पाणथळ जागी वस्ती करणारा. पाण्यातील आणि लगतच्या गवतामधील किडे-मकोडे नि लहान जीव हे त्याचे अन्न. हे पायपर समुद्रकिनारी वस्ती असणारे आहेत. समुद्राच्या लाटा किनार्‍यावर येऊन आदळतात नि ओसरुन परत माघार घेतात. त्या माघार घेत असताना किनार्‍यावरुन पायपर पक्ष्यांची झुंड लगबगीने धावत सुटते आणि त्या लाटांच्या मार्‍याने किनार्‍यावर आणून टाकलेली कालवे, छोटे जीव गट्ट करते.

दुसरी लाट येताना दिसली की पाठ फिरवून किनार्‍याकडे धूम ठोकते. ती लाट ओसरु लागली की पुन्हा समुद्राकडे धाव घेते. अन्नापाठी होणारी तिची ही पळापळ, तिची आवर्तने हेच त्यांचे आयुष्य; खळ्याच्या खांबाला बांधलेल्या एखाद्या बैलाच्या गतीसारखे एका कक्षेत फिरणारे, पुनरावृत्त होत राहणारे.

माणसाच्या पोराच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की आईबापांनी दिलेले आयते अन्न गिळण्याची सवय सोडून पोराला स्वत:च्या हाताने खाण्याची सुरुवात करावी लागते. 'एक घास चिऊचा, एक घास काऊचा' करत पोराच्या नाकदुर्‍या काढत त्याला भरवणार्‍या आईलाही ’मेल्या दोन हात दिले आहेत ते वापर नि गिळ स्वत:’ असे एकदाचे म्हणावे लागते.

पण ते पोर तरीही अन्न कमावण्यासाठी आणि शिजवण्यासाठी आईबापांवर अवलंबून राहते. ’मला बाहेरच्या खोलीतच वाढून दे, कार्टून बघता बघता जेवेन’ म्हणत आणखी काही वर्षे काढते नि मगच स्वत:चे अन्न स्वत: कमावून खाण्यास सुरुवात करते.

प्राण्या-पक्ष्यांच्या पिलांना इतके आयतोबा होऊ देणे आईबापांना परवडत नाही. चालतं-फिरतं-उडतं झालं की आईबाप त्याला अन्न कमावण्याच्या तंत्राची शिकवणी चालू करतात नि लवकरात लवकर त्याने स्वतंत्र व्हावे याची खटपट करतात. पायपर मधली आईदेखील आता ही वेळ आली आहे हे पिलाला समजावू पाहते आहे. समुद्राच्या लाटेबरोबर येणार अन्न, ती लाट चुकवून, खाण्याचे तंत्र शिकवू पाहते आहे.

पहिल्याच लाटेच्या तडाख्याने घाबरगुंडी होऊन घरट्याकडे पिलोबा धूम ठोकतात. टरकून थरथरत बसलेल्या या पिलाला आई पुन्हा पुन्हा टोचून बाहेर काढते आहे. गवताआड लपू पाहणार्‍या पिलाला मान वाकडी करुन शोधणारी आई पाहून, ’लपंडाव’ खेळताना किंवा शाळेत जायचे नाही म्हणून लपून बसलेल्या मुलाला शोधणारी माणसाच्या पिलाची आई आठवून जाते.

दुसर्‍या प्रयत्नात कसाबसा त्या पिलूला एक शिंपला त्याला सापडतो. पण त्या शिंपल्याला जेमतेम चोच लावतो न लावतो तोच पुढची लाट येते आणि त्याला पुन्हा किनार्‍याकडे धूम ठोकावी लागते. तसे करतानाही त्याने किनार्‍यावर आधी पाहून ठेवलेल्या एका खडकाआड लपते. इतर पूर्ण वाढ झालेल्या पायपर्सना हे सुचलेले नाही. ते लाटेला चुकवत थेट किनार्‍याकडच्या वाळूकडेच धावत जात असतात. पिलू सामान्यांहून थोड्या तल्लख बुद्धीचं दिसतं आहे.

इतक्यात पायाखालून जाणारी शंखांची जोडी त्याला दिसते. आता हे ही हलणारे काही दिसते आहे, म्हणजे खाणे असावे असा त्याचा ग्रह झाला असावा. पण शंखातला प्राणी पिलाहून दहापट लहान असून भलताच आक्रमक असतो. खेकड्यासारख्या इवल्याशा नांग्यांनी तो पिलाच्या चोचीवर दोन फटकारे ठेवून देतो. कोणता सजीव आपले खाणे आहे आणि कोणते नाही हे ओळखण्याचे पिलाचे शिक्षण इथून सुरु होते.

बालसुलभ कुतूहलाने हा नवा प्राणी कोण म्हणून पिलू त्या शंखाचा पाठलाग करत समुद्राकडे जाते आहे. अचानक समोरचा तो प्राणी घाईघाईने स्वत:ला वाळूत बुडवून घेतो. आश्चर्यचकित झालेल्या त्या पिलाला विचार करण्यास उसंतच मिळत नाही. समोरुन येणारी लाट त्याला धोक्याची जाणीव करुन देते आणि प्रतिक्षिप्त क्रियेनेच तोही स्वत:ला वाळून खुपसून घेतो.

अंगावरुन जाणारी लाट त्याला पाण्याखालच्या जगाचे ओझरते दर्शन घडवते. तो खेकडा त्याला हलवून डोळे उघडायला लावतो. पाण्याच्या लाटेने वाळूवर वर आलेले असंख्य शिंपले त्याला दिसतात. त्या पाण्याखाली धोकादायक काहीच नाही उलट कालवांचे शिंपलेच शिंपले दिसल्याने आता त्याची भीती चेपली जाते. लाट ओसरुन जाताच सुटकेच्या आणि नवे काही गवसल्याच्या आनंदाने ते पिलू नाचरं होऊन जाते.

पाण्याची भीती दूर सारून उलट पाण्याखाली राहिलो तर कालवांची नेमकी जागा आधीच हेरुन ठेवता येते आणि लाट ओसरल्यावर नेमक्या जागी खोदून ते गट्ट करता येतात, हे पिलाच्या तल्लख बुद्धीला समजते. त्यातून दोन लाटांमध्ये मिळणारी उसंत अधिक अन्न जमा करुन देऊ शकते याची त्याला जाणीव होते आहे.

वय वाढून बसलेल्या त्याच्या मागच्या पिढीला खडकामागे लपून लाटेपासून बचाव करता येतो याची समज नव्हती, तशीच लाटांना न घाबरता अंगावर घेतले तर भरपूर अन्न कमी श्रमात जमा करता येते याचीही. साहजिकच पिलाच्या ’संस्कारा’त ती असण्याचे कारण नव्हते. खडकाआडची सुरक्षितता ही त्याच्या भीतीच्या प्रेरणेची प्रतिक्रिया म्हणून लागलेला शोध होता. तर लाटेखाली दडून अन्नाचा वेध घेण्याचे कौशल्य त्याच्या समाजाच्याबाहेरच्या कुणाकडून त्याने आत्मसात केलेले आहे. ’ज्ञान अथवा कौशल्य हे केवळ वारशानेच मिळते असे नव्हे तर ते निरीक्षणाने, आपल्या नात्यांचा पैस विस्तारल्यानेही मिळू शकते’ हे ज्ञान ते पिलू आपल्याला देऊन जाते आहे.

याआधी ओळख करुन दिलेल्या ’बाओ’मधील आई आणि पायपरमधील आई यांच्यात फरक आहे. ती आई सतत मुलाला आपल्या पंखाखाली ठेवू इच्छिते. तर पायपरची आई पिलाला स्वावलंबी बनवू पाहते आहे. माणसांमध्ये आणि पक्ष्या-प्राण्यांमध्ये हा महत्वाचा फरक राहतोच.

बाओची पार्श्वभूमी असलेल्या आशियाई- विशेषत: भारतीय समाजामध्ये मुलांना चटकन स्वतंत्र होण्याची पद्धत नाही. ’दहा पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती मिळवण्याचा’ किंवा ’मुलासाठी घर बांधून ठेवण्याचा’ प्रयत्न बाप करत असतो. स्वत: बाप झालेलं पोरगं अजूनही या ना त्या प्रकारे आपल्यावर अवलंबून आहे ही जाणीव, आशियाई आईबापांना आपल्या पालकत्वाचा पराभव न वाटता त्यांच्या अहंकाराला सुखावत असते.

याशिवाय प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे वाढत्या वयाबरोबर येणारी असुरक्षिततेची जाणीव मुलांच्या आधाराने दूर करण्याचा हेतूही साध्य होत असतो. ’तुला जमेल तितके शिकवले. आता इथून पुढे तू शीक, रोजगार कर, जोडीदार शोध, स्थलांतर करायचे की कसे... याचा विचार तुझा तू कर.’ म्हणत पुढचे निर्णय घेण्यास आपल्या मुलांना उद्युक्त करणे हे या संस्कृतीचा भागच नाही.

उलट दिशेने मुलांमध्येही आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर आईबापांना सोबत घेण्याची, त्यातून आपल्या निर्णयांना एकप्रकारे बाह्य आधार शोधण्याची वृत्ती दिसते. माझ्या मते यात एकप्रकारे आत्मविश्वासाचा अभाव दिसतो आणि संभाव्य अपयशात सोबती शोधून ठेवण्याची प्रवृत्ती. (खरंतर शोधायची गरज नाही, घरचेच असतात ते.)

अगदी व्यक्तिस्वातंत्र्याचे डिंडिम वाजवत अमेरिकेत सेटल झालेले भारतीय तरुण दांपत्यही मूल होण्याच्या वेळेस दोघांपैकी एकाच्या आईला मदतीस बोलावून घेते. एखाद्या मूळच्याच अमेरिकन दांपत्याप्रमाणे बाळंतपण आणि अपत्यसंगोपन याची पद्धतशीर माहिती करुन घेऊन आपली जबाबदारी आपणच पार पाडत नाहीत. त्यातुलनेत नुसतं स्वावलंबीच नव्हे, तर मागल्या पिढीचा पोशिंदा होणारं, त्यासाठी वारशावर किंवा संस्कारावर अवलंबून न राहता आपल्या नजरेचा पैस विस्तारुन नवे तंत्र शोधणारं पायपरचं हे पोरटं माणसांच्या पिलांपेक्षा बरंच कर्तृत्ववान म्हणायचं.

या लघुपटाचे वैशिष्ट्य म्हणजे आई आणि मूल (आणि तो लहान शंखधारी खेकडाही) यांच्या डोळ्यात दिसून येणारे नेमके भाव. पोरगं पाण्याला न घाबरता नाचरं होऊन वर खाण्याचा ढीग जमा करतानाचे त्याचे ते उद्योग किनार्‍यावरुन पाहणारी आई कृतकृत्य होऊन त्याच्याकडे पाहताना दिसते. त्या आईच्या डोळ्यातील ती भावना तुम्हाला स्पष्ट वाचता येते. इतके हे ते चित्र प्रत्ययकारी चितारले आहे. याशिवाय पहिल्या लाटेचा तडाखा खाऊन घरट्यात धूम ठोकलेल्या त्या पिलाच्या डोळ्यातील भीती, जमिनीतून हे काय वर येते आहे म्हणून नजरेत उमटलेलं कुतूहल, खडकामागून किंवा लाट ओसरुन गेल्यावर घरट्यातून डोकावताना दिसणारा सावधपणा... हे सारं त्या डोळ्यात पाहता येईल.

एकुणातच संगणकाच्या उदयानंतर चलच्चित्रांसाठी अतिशय प्रगत तंतज्ञान उपलब्ध होत असताना त्याचा इतका सुरेख वापर क्वचित पाहायला मिळतो. सुरुवातीला किनार्‍यावर धडकून जाणारी लाट मागे जे बुडबुडे सोडून जाते त्यात वाळूतील कालव्यांच्या वा खेकड्यांच्या घरात पाणी जाताना निर्माण झालेले बुडबुडे आणि लाटांनी निर्माण केलेल्या फेसातील बुडबुडे यांचा पोत वेगवेगळा पाहता येतो.

येणार्‍या लाटेपासून बचाव करण्यासाठी धावत सुटलेल्या थव्यात मागे राहिल्याने पुढे पळणार्‍या गर्दीचा अडथळा होऊन आपला वेग कमी राहील, आणि त्यामुळे लाटेचा फटकारा खाण्याचा धोका आहे असे दिसताच एकच पायपर - जणू नाईलाजाने - उडून थव्याच्या डोक्यावरुन पुढे जाऊन उतरतो. हा गोष्टीचा पूर्वरंग, अथवा नांदीही आहे. पायपर या उडू शकणार्‍या, पण न उडणार्‍या पक्ष्याची कथेमधील निवड समर्पक कशी हे या सेकंदभराच्या चित्राने स्पष्ट होते. कारण 'चालणार्‍या' पक्ष्यांच्या थव्यात आपली ’उडण्याची’ कुवत ओळखून उडण्याचे धाडस पुढे ते पिलू करणार असते.

यासोबतच आवाजांच्या वापराकडेही लक्ष द्यायला हवे. वेगवेगळ्या संदर्भात त्या आईच्या तोंडून येणारे आवाज ऐका. सुरुवातीला त्याला घरट्याबाहेर बोलावताना ऐकलेला आवाज आणि पहिल्या लाटेचा तडाखा खाऊन धास्तावून बसलेल्या पिलाला बोलावताना काढलेल्या आवाजातील सूक्ष्म फरक सापडतो का पाहा. दोनही वेळा ती त्याला खाण्याकडे, समुद्राकडे बोलावते आहे, पण दुसर्‍या प्रसंगी बोलावण्यासोबत ’काही होत नाही. मी आहे सोबत’ असा धीर देण्याचा हेतूही जाणवतो का पाहा. खाणे तिथे मिळणार नाही, इकडे ये सांगतानाचा आवाज, पोरं स्वतंत्र झालं तेव्हा तिच्या तृप्त नजरेला सोबत करणारा वरुन खाली नेणार्‍या स्वरांतून उमटलेला आवाज ऐका.

शेवटी ते बारकं येणार्‍या लाटेकडे धावत जातं तेव्हा किंचित मान वाकडी करून घशातून हलकासा नापसंतीचा सूर काढणारी आई पहा. इतकेच नव्हे तर पहिल्या लाटेचा तडाखा खाऊन घरट्यात जीव मुठीत धरुन बसलेलं पोरगं जेव्हा पुढच्या लाटेची गर्जना ऐकून घरट्यात गुडुप होताना त्याच्या तोंडून उमटलेला चीत्कार ऐका, लाटेच्या भीतीने घरट्यात गडप झालेल्या आणि अन्न आयते मिळणार नाही हे ध्यानात आलेल्या पिलाच्या पोटात भुकेने ’कोकलणारे कावळे’ ऐका...

शिकवण्यापेक्षा (teaching) शिकणे (learning) अधिक फलदायी असते, आनंददायी असते असे म्हटले जाते. पण तो केवळ शब्दाचा खेळ, इतरांच्या तोंडावर फेकण्याजोगा एक सुविचार इतकेच महत्व आपण त्याला देत असतो. तो विचार वास्तवदर्शी आहे हे समजण्यासाठी त्या छोट्याच्या नजरेने जग पाहता यायला हवे.

-oOo-

वर मूळ लघुपटाची लिंक दिलेली असली तरी त्याचा दर्जा फार उत्तम आहे असे म्हणता येणार नाही. शक्य झाल्याच उत्तम दर्जाची प्रत मिळवता आली तर पाहा. मला एका मुरलेल्या चित्रपटप्रेमी मित्राच्या कृपेने याहून चांगली प्रत उपलब्ध झाली. त्यातून काही आवडलेल्या फ्रेम्सचा एक स्लाईड-शो इथे जोडतो आहे.


हे वाचले का?

शुक्रवार, २९ मे, २०२०

जीवनाचे पोर्ट्रेट

गंभीर चेहर्‍याच्या आणि कधीही न हसणार्‍या, मोजके बोलणार्‍या आणि चार चौघांपासून फटकून राहात आपले वेगळेपण जपणार्‍या माणसालाच जगण्याबद्दलचा गंभीर विचार करणे शक्य होते असा एक समज उगाचच आपल्या समाजात पसरलेला दिसतो.

नाटकवाली मंडळी ही चित्रपटाला नि त्या संबंधित मंडळींपेक्षा स्वत:ला काकणभर (कदाचित हातभरही असेल) उंच समजतात, तर चित्रपटातून बाद झालेले अभिनेते/अभिनेत्रीच फक्त सीरियलमध्ये जातात, असं समजत चित्रपटवाले त्या क्षेत्रातील व्यक्तींना कमी लेखतात. 

एवढंच काय, इंटरनेट वरील चित्रपटांसंबंधी माहिती वाचून, स्वस्त झालेल्या कॅमेर्‍यांच्या सहाय्याने एक दोन थातुरमातुर शॉर्ट फिल्म्स बनवून, आपल्या प्रभावळीत त्या चार जणांना दाखवून ’अहो रूपम्‌ अहो ध्वनिम्‌’ या न्यायाने रेकग्निशन मिळवणारी, आणि तेवढ्या भांडवलावर वरील तीनही गटांना ’तद्दन व्यावसायिक’ म्हणून नाके मुरडणारी एक मोठी जमात असते. ती फेसबुकसारख्या फुकट मिळणार्‍या माध्यमांतून बरीच धुमाकूळ घालते. पण ते असो.

So...I think I scared you before. Umm... all that talk of ghosts and dying. All that adult stuff we were reading about. That's some pretty confusing adult stuff. So, uh, you know, I thought I would come up here, show you my painting, tell you what I think my play is about. Because I was thinking, umm..., that it might make us all feel a little bit better.

But you got to promise not to make fun of me, okay?

So, um...

Yeah, I painted this because I felt like the play was about life, you know? And life is full of color. And we each get to come along and we add our own color to the painting. You know? And even though it's not very big, the painting, you sort of have to figure that it goes on forever, you know, in each direction. So, like, to infinity, you know? 'Cause that's kind of like life, right?

And it's really crazy, if you think about it, isn't it, that, a hundred years ago, some guy that I never met came to this country with a suitcase. He has a son, who has a son, who has me.

So, at first, when I was painting, I was thinking, you know, maybe up here (points to upper right corner of the painting), that was that guy's part of the painting and then, you know, down here (points to the bottom left corner of the painting), that's my part of the painting.

And then I started to think, well, what if...

...we're all in the painting, everywhere?

And-and what if we're in the painting before we're born? What if we're in it after we die? And these colors that we keep adding, what if they just keep getting added on top of one another, until eventually we're not even different colors anymore? We're just... one thing... one painting!

I mean, my dad is not with us anymore. He's not alive, but he's with us. He's with me every day. It all just sort of fits somehow. And even if you don't understand how yet, people will die in our lives, people that we love. In the future. Maybe tomorrow. Maybe years from now.

I mean, it's kind of beautiful, right, if you think about it, the fact that just because someone dies, just because you can't see them or talk to them anymore, it doesn't mean they're not still in the painting. I think maybe that's the point of the whole thing.

There's no dying. There's no you or me or them. It's just us. And this... sloppy... wild, colorful, magical thing that has no beginning, it has no end... this right here...

I think, it's us!

---

केविन हा एका प्रसिद्ध टीव्ही सीरियलचा प्रमुख नट. भरपूर प्रसिद्धी आणि पैसा देणारी ही मालिका गुणवत्तादृष्ट्या सामान्य आहे असे समजत तो ती अर्धवट सोडतो, आणि आपण आता नाटकात जाणार असे जाहीर करतो. तसा खुशालचेंडू नसला, तरी बर्‍यापैकी भोगवादी आयुष्य जगणार्‍या केविनला आता तथाकथित श्रेष्ठींकडून रेकग्निशन हवे आहे. त्यासाठी तो आपल्या भावाच्या शहरात, लॉस एंजल्स येथे शिफ्ट होतो.

एकदा नाटकाचे स्क्रिप्ट वाचत असताना त्याच्या दोघी पुतण्यांना त्यात सामील करुन घेतो. या दोन्ही पुतण्यांचे वय आहे अनुक्रमे आठ आणि दहा. दुर्दैवाने नाटकात एके ठिकाणी मृत्यूबद्दल काही संवाद येतो. मुली अर्थातच कुतूहल म्हणून त्याबद्दल विचारू लागतात. 

एकुणच ’तारुण्याच्या’ मानसिकतेतून बाहेर न आलेला आणि मुलांसोबत कधीही न राहिलेला, त्यांच्याशी संवाद करताना वेगळे काही संवाद कौशल्य लागते याबाबत पूर्ण अनभिज्ञ असलेला केविन एखाद्या समवयस्काशी बोलावे तसा सहज बोलत राहातो. ’म्हणजे आमचे आईवडील पण मरणार का?’ या प्रश्नाला सहजपणे ’हो, तर काय. सगळेच मरणार.’ असे बोलून जातो. संवाद फिसकटतो आणि मुली झोपायच्या खोलीत निघून जातात.

आपल्याकडून घोटाळा झाला हे तर त्याला समजते. पण मुलांची समजूत कशी घालतात याचे ज्ञान वा अनुभव केविनकडे नाही. तरीही तो त्या मुलींकडे जातो. प्रथम त्यांची माफी मागतो. आणि सहजच आपण केलेले एक पेंटिंग दाखवतो. 

त्या पेंटिंगबाबत बोलता बोलता उथळ वाटणारा केविन बरेच काही समंजस बोलून जातो. त्या मुलींचे आजोबा त्याला म्हणत तसे सतत स्वत:च्या कुवतीबाबत शंका घेणारा, सदैव संभ्रमात असणारा केविन जेव्हा क्षणभर त्या संभ्रमातून बाहेर येतो तेव्हा त्याचे विचार इतके लख्ख उमटतात. आणि शब्दांच्या साहाय्याने जगण्याचे एक सुरेख पोर्ट्रेट तो त्या मुलींसमोर रेखाटतो.

संभ्रम... तो संभ्रम हा त्या तांब्या पितळेच्या भांड्यांवरच्या हिरव्या अनाकर्षक कीटणासारखा आहे. तो घासून काढला तर आतली देखणी भांडी लख्ख चकाकू लागतात.

- oOo -


हे वाचले का?

बुधवार, २७ मे, २०२०

हैरत से तक रहा था जहॉं-ए-वफा उसे (मास्टर मदन)

अगदी बालवयातच तत्कालीन अनेक गायकांची रेकॉर्डिंग्स तंतोतंत गाणार्‍या कुमार गंधर्वांचे Child Prodigy म्हणून कौतुक केले जात असे. ते आठ वर्षांचे असताना त्यांनी गायलेल्या ’रामकली’च्या रेकॉर्डने मला बेभान केले होते. खुद्द कुमारांनी प्रा. माधव मोहोळकर यांना दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, 'ती सारी पोपटपंची होती. इतरांची गायकी तंतोतंत गाणे म्हणजे गाणे नव्हे. गायकाची वाट स्वत:ची असायला हवी.' पुढे संगीत क्षेत्रात त्यांनी केलेली बंडखोरी आणि गायकीला दिलेली नवी वाट सर्वश्रुत आहेच.

पण कुमारांच्याही आधी आठ वर्षांच्या एका मुलाने ही उपाधी मिळवली होती. त्याने उत्तर भारतात तुफान मचवले होते. जेव्हा शब्दही धड उच्चारता येत नव्हते अशा वय वर्षे दोन असल्यापासून गायकीचे धडे गिरवणार्‍या या मुलाने आठव्या वर्षीच मैफलींमधून धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्याचवर्षी पहिली रेकॉर्डही दिली. धनत्तर संगीत-रसिक आणि राजे-नवाबांकडून त्याच्यावर कौतुक आणि पारितोषिकांची खैरात होत असे. तिशीच्या त्या दशकात त्याला ऐंशीपासून अडीचशे रुपयांपर्यंत मानधन मिळत असे. असंख्य पदके, पदव्या आणि धनाचा वर्षाव अल्पावधीतच या गायकावर झाला. त्याच्या मोजक्याच रेकॉर्डिंग्सनी संगीतरसिकांना वेड लावले.

रागसंगीतावर आधारित सहा आणि दोन पंजाबी गाणी अशी आठ रेकॉर्डिंग त्याने दिली. या रेकॉर्डिंग्समधील गायकीवरील हुकुमत पाहता, हा कलाकारही कदाचित पुढे कुमारांप्रमाणेच संगीताला एका वेगळ्या दिशेने नेणारा प्रेषित ठरला असता, असे म्हणता येईल.

परंतु हा अलौकिक प्रतिभेचा गायक त्याच्या तेराव्या वाढदिवसापूर्वीच विषप्रयोगाचा बळी ठरला.

'संगीत म्हणजे दैवी कृपा' वगैरे म्हणणार्‍यांच्या पेकाटात लाथ घालून असे विचारावेसे वाटते की ’भोxxx, तुझ्या त्या देवाला अशा प्रतिभेचे आयुष्य इतके कमी ठेवल्याबद्दल फैलावर का घेऊ नये?’ त्यापुढे ’जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला’ म्हणून त्याने मा. मदनला त्याच्याकडे बोलावून घेतले’ म्हणणार्‍याच्या पेकाटात आणखी एक लाथ हाणून ’म्हणजे तुझा तो हलकट देव इतका स्वार्थी आहे की इतरांना त्या गाण्याचा पुरेसा आस्वाद घेऊ न देता आप्पलपोटेपणाने स्वत:पुरते पाहतो?’ अशा कलाकारांच्या गुणवत्तेचे श्रेय या असल्या आप्पलपोट्या प्राण्याला द्यायची माझी बिलकुल तयारी नाही, आणि तसे ते देऊ पाहणार्‍या बैलबुद्ध्यांच्या वार्‍यालाही उभे राहण्याची इच्छाही.

मुंबईच्या एलफिन्स्टन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, संगीत मर्मज्ञ आणि स्निग्धहस्त लेखक प्रा.माधव मोहोळकर यांनी आपल्या 'मोहळ' या पुस्तकात मास्टर मदनवर एक सुरेख लेख लिहिला आहे. तो आवर्जून वाचावा असा.

या लेखात प्रा. मोहोळकरांनी अशी खंत व्यक्त केली होती की आज मदनच्या आठपैकी केवळ दोनच रेकॉर्डिंग आपल्याला उपलब्ध आहेत. पण त्यांच्या लेखानंतर आज चाळीस वर्षांनंतर तंत्रज्ञानाच्या कृपेने त्याची सर्व रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत. आणी ही सर्व आठ रेकॉर्डिंग्स Master Madan 8 Gems या लिंकवर उपलब्ध आहेत.

-oOo-


हे वाचले का?