'आजची तरुण पिढी...' या वाक्र्पचाराने सुरू झालेली वाक्ये जवळजवळ प्रत्येक पिढीने आपल्या तरुणपणी, आपल्या मागच्या पिढीकडून ऐकलेली असतात इतका तो वाक्र्पचार सनातन आहे. पण यातला 'आज' म्हणजे नक्की कोणता, कुणाचा, कुठल्या स्थळाचा वर्तमानकाळ याबाबत मात्र ते वाक्य उच्चारणार्याच्या आणि ऐकणार्याच्या मनातील कल्पना प्रचंड सापेक्ष असतात. 'आजकालची तरुण पिढी' असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण अमेरिकेतील तरुण पिढीबाबत बोलत असतो की भारतातील, दिल्लीतील तरुणांबद्दल बोलतो की चेन्नईतील, मुंबईतील की मराठवाड्यातील एखाद्या खेड्यातील, फक्त तरुणांबद्दल बोलतो की तरुणींबद्दलही, याबाबत तसे काही काटेकोर नसतो. थोडक्याच या 'आज'चे अवकाश एक असले तरी प्रवाह वेगळे असतात. एकाच भूगोलावर वेगवेगळा 'आज' असणार्या व्यक्ती जगताना दिसतात. स्थलकालाच्या हिशोबाने ते एकत्र दिसतात खरे, पण 'त्यांचा 'आज' एकच असतो असे म्हणता येईल का?' या प्रश्नाचे निश्चित उत्तर देता येईल असे वाटत नाही. एकाच अवकाशातल्या अशा विविध वर्तमानांची गुंफण अनेक शक्यतांना जन्म देते. बनारसच्या प्राचीन शहराच्या पार्श्वभूमीवर निर्माण केलेला 'मसान' हा चित्रपट यापैकी काहींचा वेध घेतो.
साचेबद्ध हिंदी चित्रपटांच्या धबडग्यामधे एखादा चित्रपट आवर्जून पहावा असे वाटण्याचे प्रसंग फार क्वचित येतात. त्यातही चित्रपटाकडे कला म्हणून पाहणारे आणि माफक करमणूक म्हणून पाहणारे असे जे दोन 'प्रवाह' प्रेक्षकांतही दिसतात, त्या दोनही प्रकारच्या प्रेक्षकांकडून दाद मिळवण्याइतका कसदार चित्रपट फार क्वचित पहायला मिळतो. एरवी समीक्षकांनी नावाजलेल्या चित्रपटाकडे सर्वसामान्य प्रेक्षकांनी पाठ फिरवावी, किंवा रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या चित्रपटाचे सामान्यत्व सिद्ध करण्यात समीक्षकांनी आपली लेखणी झिजवावी, हेच वारंवार प्रत्ययाला येते आहे. 'मसान' मात्र या दोनही प्रवाहातील रसिकांना एकाच वेळी समाधान देऊन जातो आहे.
काशीमधे मृत्यू आला तर मोक्ष मिळतो अशी हिंदू समाजात श्रद्धा आहे. तेव्हा ती भूमी मरणाच्या वाटेची परिपूर्ती बनून राहिली आहे. मृत्यू नाही तरी निदान अंत्यसंस्कार, उत्तरपूजा काशीच्या घाटावर व्हावी अशी श्रद्धाळू हिंदूंची धारणा आहे. मोक्षाच्या आशेने काशीमधे मृत्यू शोधत येणार्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार्या - हिंदी वाक्प्रचार 'मुर्दा फूंकना' हा अधिक भेदक भासतो - डोंबाचा 'आज' वेगळा; तर त्याच उत्तरक्रियेचे सामान विकणार्या 'विद्याधर पाठक' याचे जग वेगळे. परंपरेच्या एकाच गंगेत भिन्न वेगाचे दोन प्रवाह असावेत तसे! त्यांच्या पैकी एक आहे जातीव्यवस्थेच्या उतरंडीवर परंपरेने सर्वोच्च स्थानी बसवलेला ब्राह्मण, तर दुसरा एखाद्या सजीव अस्तित्वाच्या विलयक्षणीच ज्याची आठवण होते असा कुणी एक डोंब.
संस्कृत पंडित, शिक्षक असलेला पाठक पत्नीच्या मृत्यूनंतर आपला शिक्षकी पेशा सोडून घाटावर अंत्यसंस्काराला लागणारे सामान विकण्याचे दुकान थाटतो तेव्हा डोंब आणि तो ब्राह्मण यांच्यातील भौगोलिक अंतर आणखी कमी होते आहे आणि तरीही त्या दोन जगण्याच्या प्रवाहांमधे अजून बरेच अंतर शिल्लक राहते आहे. दोघांच्या जगण्याच्या दृष्टीकोनातून ते सहजपणे समोर येते आहे. एकाच बनारसमधे जगणारे हे दोन वेगळे प्रवाह आहेत. दोघांचे आपापले 'आज' आहेत, एकाच शहरात राहूनही ते सर्वस्वी वेगळे आहेत. इतके जवळ असूनही त्यांचा कुठेही एकमेकांना छेद जात नाही.
पाठक हा ब्राह्मण, जातीव्यवस्थेच्या उतरंडीवर सर्वोच्च स्थानी असल्याने एक प्रकारची accomplishment किंवा इच्छित स्थानी पोचल्याची, एक प्रकारची स्थितीवादी प्रवृत्ती आहे. आसपासचे जग संपृक्त, समतोल अवस्थेला पोचले असल्याची त्याची भावना दिसते. म्हणून मुलीने बनारस सोडून, घर सोडून जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्याला आश्चर्य वाटते आहे. याउलट डोंबाची इच्छा मात्र आपल्या मुलाने शिकून सवरून या खातेर्यातून बाहेर पडावे अशी आहे.
दोघांत एक गोष्ट मात्र समान आहे, आणि ती म्हणजे दोन टोकावर राहूनही दोघांनाही पैशाहून आदर, मानसन्मान यांची महती अधिक वाटते. पाठक पूर्वी संस्कृत शिक्षक असल्याने त्याला तो मिळतोही. आणि म्हणूनच तो गमावण्याचा भयगंड त्याला व्यापून राहतो आहे. याउलट पुरेसा, कदाचित भरपूर पैसा मिळत असूनही (त्याची वर्षातून एकदा येणारी घाटावरच्या उत्पन्नाची एक दिवसाची बोनस पाळी एक लाखाला विकली जाऊ शकते) समाजात कवडीचाही मान नसलेल्या डोंबाला, आपण नाही तर निदान आपल्या मुलाने समाजात ज्याला प्रतिष्ठा आहे असा एखादा रोजगार निवडावा, अशी आस लागून राहिली आहे.
बनारस हे श्रद्धाळूंचे, परंपरेशी घट्ट नाळ जुळलेले शहर. पण असे असूनही मोबाईल, इंटरनेट, फेसबुक, यू-ट्यूब आणि त्या सार्याच्या अनुषंगाने येणारे पॉर्न साईट्सचे आकर्षण, हा नव्या जगाचा प्रवाहदेखील यात येऊन मिसळला आहे. देवी, दीपक आणि शालू हे एकाच प्रवाहाचे आणि ते म्हणजे ते खर्या अर्थाने नव्या स्वतंत्र जगाचे प्रतिनिधी. आपल्या आयुष्याचा विचार करणारे, आपले निर्णय आपणच घेणारे आणि कदाचित म्हणून कुटुंबाबद्दल, परंपरेबद्दल त्यांच्या मागच्या पिढीइतकी बांधिलकी नसलेले. पण तरीही निव्वळ तरुण पिढी आणि मागची पिढी अशी काटेकोर विभागणी करता येणार नाही. दीपकचाच थोरला भाऊ सिकंदर हा परंपरेने आलेल्या कामात वडिलांना इमानेइतबारे हातभार लावत असूनही त्यांच्या उपेक्षेचा धनी. याउलट अभ्यासात हुशार असलेला, मागच्या जगाचा उंबरा ओलांडून पुढच्या जगात पाऊल टाकू पाहणारा दीपक हा वडिलांच्या अभिमानाचा विषय आहे.
बनारससारख्या कर्मठ जगात कम्प्यूटर ट्रेनिंग क्षेत्रात नोकरी करणारी देवी पाठक ही स्वतंत्र बाण्याची स्त्री आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ओळख झालेल्या पॉर्नचा आस्वाद घेणारी, ते पाहून निर्माण झालेल्या 'जिज्ञासे'ची पूर्ती करण्यासाठी बेधडक पाऊल उचलणारी, आणि त्यातून समोर आलेल्या भागधेयाला न डगमगता सामोरे जाणारी.
देहभोगाबद्दलची जिज्ञासापूर्ती करताना आलेल्या अनुभवातून देवीचा करारीपणा, दृढनिश्चयी वृत्ती जरी बदलली नाही तरी त्यातून तिच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू नक्कीच बदलले आहेत. एखाद्याची सोबत आवडते, ज्याच्याशी केवळ बोलणे आवडते, फारतर त्याला केवळ देहभोगाच्या जिज्ञासापूर्तीसाठी जवळ करावे, इतपत मर्यादित दृष्टीकोन असलेली देवी बदलते.
त्याच्या मृत्यूनंतर आपण त्याच्या कुटुंबियांचे कुणीतरी आहोत, त्यांचे देणे लागतो किंवा निदान ज्यांना भेटणे हे आपले कर्तव्य आहे या विचाराने अस्वस्थ होते. त्यासाठी ती बराच आटापिटा करते, हो नाही करता त्यांना भेटतेही. यातून आईच्या मृत्यूनंतर वडिलांबाबत अढी राखून असलेल्या देवीच्या मनात नातेसंबंधांची किंचित जाणीव उमलल्याचे दिसते आहे. (पुढे कामाच्या ठिकाणी भेटलेल्या सहकारी मित्राच्या संदर्भात ती आणखी ओलावत जाते.) परंतु त्याचवेळी नवी नाती जोडण्याबाबत आता तिच्या मनात काहीशी भीती निर्माण झाली आहे. एका सुस्वभावी सहकार्याशी जुळू पाहणारे नातेही ती नाकारते आहे, 'हम अकेलेही ठीक हैं' या - कदाचित क्षणिक वैफल्यातून आलेल्या - निष्कर्षाप्रत पोचते आहे.
Film: Masaan (2015).
दीपक आणि शालू मात्र तिच्याहून काळात काहीसे मागे दिसतात. त्यांची टवटवीत प्रेमकहाणी महानगरी प्रेक्षकांना सत्तरीच्या दशकातल्या चित्रपटातील प्रेमकथांची आठवण करून देईल. त्यांच्या हाती फेसबुक, ऑडिओ एडिटर सॉफ्टवेअर, मोबाईल यासारखी अत्याधुनिक साधने आहेत पण त्यांच्या प्रेमाची जातकुळी मात्र अजूनही चित्रपटातील गाणी दिमतीला घेऊन प्रेमपत्रे लिहिणारीच, फक्त तंत्रज्ञानाच्या नव्या प्रवाहाचे बोट धरून फेसबुक, मोबाईल सारख्या नव्या माध्यमांतून व्यक्त होणारी. दीपकच्या प्रेमाच्या कल्पना आपल्या प्रेमपात्राला अडचणीच्या वेळी मदत करण्यात, इतर 'वाईट' प्रवृत्तीच्या तरुणांपासून रक्षण करण्याचे वचन देण्याइतक्या प्राथमिक पातळीवरच्या आहेत.एरवी हिंदी चित्रपटांतून दिसणार्या डॅशिंग नायकाऐवजी नायिकेला बुजलेला, बावचळलेला नायक पाहताना गंमत वाटते. लाडाकोडात वाढलेली, शायरीच्या जगात वावरणारी शालू त्या साहित्यिक जगातून ओळख झालेल्या स्वप्नाळू प्रेमाच्या वाटे जाऊ पाहणारी.
कॉलेजमधील एका दृश्यात प्राध्यापक दीपकच्या वर्गात 'सेंट्रीफ्यूगल फोर्स'(अवकेंद्री बल) आणि 'सेंट्रिपीटल फोर्स'(केंद्री बल) शिकवताना दिसतात. चित्रपटाच्या लेखक/दिग्दर्शकाने हा विषय सहजच निवडला की काही हेतूने असा थोडासा विचार करून पाहिला, तर असे लक्षात येते यापैकी पहिले केंद्रापाशी असलेल्या गोष्टींना परिघाच्या दिशेने बाहेर फेकू पाहते, तर दुसरे भवतालाला केंद्राकडे खेचून आणू पाहते. ही दोन बले विश्वात स्थैर्य राखण्यास मदत करतात असे मानले जाते. पहिल्याचा प्रभाव अधिक झाला, तर तर विरळ घनतेमुळे केंद्राचे अस्तित्वच नाहीसे होण्याचा धोका संभवतो. तर दुसर्याचा प्रभाव अधिक झाला सारे भवताल केंद्राभोवती एकवटून त्याचा स्फोट होण्याचा. नवता आणि परंपरा हे बनारसच्या त्या भूमीवर या दोन बलांचे प्रातिनिधित्व करताना दिसतात. वरवर पाहता बिनमत्त्वाचा भासणारा हा तपशील बनारसच्या परिस्थितीबाबत, कथेच्या पार्श्वभूमीबाबत काही भाष्य करून जातो आहे.
'पता नहीं.' हे तरुण पिढीचे घोषवाक्य असल्यासारखे चित्रपटात वारंवार ऐकू येत राहते. परिणामांचा विचार करताना, त्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना किंवा घडून गेल्या घटनांच्या परिणामांचे मूल्यमापन करताना देवीसह दीपक आणि शालू हे उत्तर सहजपणे देताना दिसतात. परिणामांचा फार खोल विचार न करता, कारणमीमांसा करत वेळ न दवडता, आपल्यातील आवेगाला, प्रेरणेला अनुसरून बेधडकपणे पावले टाकतात. आणि झाल्या परिणामांबाबतही फार विचार न करता थेट 'आता पुढे काय करायचे?' असा व्यावहारिक प्रश्न विचारत ही पिढी पुढे सरकताना दिसते. एका जागी खिळून राहण्याचे नाकारते. हजारो वर्षे एका केंद्राभोवती फिरत असलेल्या बनारसच्या समाजात आता सेंट्रीफ्यूगल फोर्सही काम करू लागला आहे. सफल मृत्यूच्या शोधात भारतभरातील लोक बनारसकडे मार्गक्रमण करत असताना देवी आणि दीपकसारखे तरुण जगण्याच्या नव्या मार्गांच्या शोधात बनारसच्या परिघाला ओलांडून बाहेरच्या दिशेने निघालेले दिसतात.
पण या बदलाचा गंधही पाठक यांना नाही. अजूनही कमावत्या मुलीच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्याला आपल्याच हाती आहे असे वाटते. आपण कुठला रोजगार निवडावा, किती पगाराची अपेक्षा ठेवावी हा निर्णय घेण्यास - नव्या परिस्थिती संदर्भात - देवीच अधिक लायक आहे, इतकेच नव्हे तर तो देवीचा हक्कही आहे हे जणूं त्याच्या गावीच नाही. इतकेच नव्हे तर तिच्या अंगलट आलेल्या 'जिज्ञासापूर्ती'मुळे आपले सुस्थिर जगच जणू उध्वस्त झाल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली आहे. तिने घाटावरच्या आपल्या दुकानात येणंदेखील त्याला अडचणीचं वाटू लागलं आहे. 'इतना बड़ा कांड करके बैठ गयी हो.', इथे बाप लाजेने मरू घातला आहे हे तुला समजत नाही का? असा त्याचा प्रश्न आहे.
त्यावर तिचे उत्तर 'कोई कांड नहीं किये हैं हम, ये सिर्फ आपका डर है.' हे दोघांच्या दृष्टीकोनातला फरक दाखवून देते आहे. तिच्या जगात तिच्या हातून जे घडलं त्याबाबत लाजेने तोंड लपवून हिंडावं असं काही नाही. जे घडून गेलं त्याबाबत अधिक विचार न करता पुढच्या आयुष्याचे निर्णय घेण्यास ती सरसावते आहे. 'जितनी छोटी जगह, उतनी छोटी सोच' असं म्हणून ती या सार्याला झटकून टाकते आहे. देवीचा हा दृष्टीकोन कदाचित महानगरी, सुखवस्तू तरुण पिढीला पटणारा. किंबहुना देवीचे पात्रच असे की तिच्याबाबत आपले मूल्यमापन हे आपल्या पार्श्वभूमीचे, आपल्या पूर्वग्रहांचे वा त्यांच्या अभावांचे प्रतिबिंब म्हणूनच पाहता येते.
चित्रपटाच्या लहान लहान तपशीलांची वीण जितकी घट्ट तितका तो अधिक एकजीव होतो आणि चांगले काही समोर आल्याचे समाधान देऊन जातो. 'मसान' मधे अशा छोट्या छोट्या तपशीलांवर बारकाईने काम केलेले दिसते आहे.
Film: Masaan (2015).
या प्रसंगामध्ये शालू दीपकला फोनवर शायरी ऐकवते आहे. रेलिंगला रेलून उभ्या असलेल्या दीपकच्या नजरेसमोर खाली घाटावर मृत्यूचा पसारा. शेर सांगून संपतो तरी दीपकला ते समजलेले नाही. ’फिर?’ तो विचारतो. ’फिर क्या, बस इतनाही’ शालू म्हणते. त्यांची प्रेमकहाणी तिच्याबाजूने अधुरीच राहणार हे सुचवणारे हे दोन संकेत.
घाटावर भेटायला आलेल्या 'पुरातत्त्वशास्त्रा'च्या विद्यार्थ्यांना 'घाटाचा इतिहास आणि संस्कृती' पाठक उलगडून सांगत असतानाच विद्यार्थी ते ज्ञान मोबाईल वर रेकॉर्ड करताना दिसतात. 'पहिले यहाँ सबकुछ जंगल था...' हे सांगत असतानाच त्यांच्या दुकानात काम करणारा छोटा 'घोंटा' दुकानाच्या भिंतीआडून हळूच डोकावतो, लगेचच त्यांच्या मोबाईलची रिंग वाजते. माणसाची आणि तंत्रज्ञानाची पुढची पिढी त्या जंगलाच्या काळाला मागे टाकून पुढे येत असल्याची सूचना मिळते. जिथे पाठक आपला व्यवसाय करतात, तो हरिश्चंद्र घाट हा काश्मीर प्रमाणे वादातला; मराठी आणि गुजराती वादाचे उत्तरप्रदेशातले केंद्रस्थान. दोनही भाषिक समुदायांनी आपल्याच पूर्वजांनी तो बांधल्याचा दावा केलेला. प्रत्येक राजाने आपल्या नावाचे बांधलेले घाट, प्रत्येक जातींचे आपापले घाट यातून विखंडित समाजालाही असलेली दीर्घ परंपरा दिसते.
काही दिवसात नोकरी लागेल असे दीपक घरात सांगतो, तेव्हा त्याची आई 'पण त्याला पैसेही द्यावे लागतील ना?' असं विचारते. तेव्हा तिच्या स्वरात कोणत्याही प्रकारची काळजी किंवा निषेधभावना जाणवत नाही. भ्रष्टाचाराची नवी परंपरा चूल नि मूल हेच विश्व असलेल्या तिच्याही जाणिवेत पक्की मुरलेली आहे. दुसर्या एका प्रसंगात इन्स्पेक्टर देवीच्या घरी पहिल्याने पाऊल ठेवतो, तेव्हा सोफ्यावर बसून तो टीवीचा रिमोट प्रथम हाती घेतो. तो रिमोट खेळवत असताना पुढची सूत्रे आपल्या हातात असल्याची सूचनाच तो देऊन ठेवतो आहे. पडद्यावर घाटावरच्या चितांचे जळते ढीग दिसत असताना पार्श्वभूमीवर शालू 'सितारोंको आँखोमें महफ़ूज रखना, बडी देर तक रात ही रात होगी | मुसाफिर हैं हम भी, मुसाफिर हो तुम भी, किसी मोड़ पर फिर मुलाक़ात होगी' हा शेर दीपकला फोनवर ऐकवताना दिसते. अशा छोट्या छोट्या तपशीलांची कलाबूत विणत चित्रपट आकार घेतो आहे.
एका प्रसंगी दीपकची आई त्याला 'जा पवित्र अग्नी लेके आ.' म्हणून आदेश देताना दिसते. डोंबाच्या घरात गॅस आहे, पण तो पेटवायचा तो चितेवरचा 'पवित्र' अग्नी आणूनच. हे एका बाजूचे प्रतीकात्मक आहे, तसेच बदलत्या परिस्थितीतही परंपरेचा पगडा घट्ट मानगुटी बसल्याचे लक्षण आहे. जेव्हा काडेपेटी, लायटर इ. हुकमी अग्नी निर्माण करणारी साधने उपलब्ध नव्हती तेव्हा स्मशानातच वास्तव्य करणार्या डोंबाला पेटत्या चितेचा अग्नी ही सहज उपलब्ध असणारी गोष्ट असेल, आणि म्हणून त्यावरून आणून चूल पेटवण्याची पद्धत पडून गेली असेल नि नकळत धार्मिक परंपरेचे रूप घेऊन बसली असेल. आज ज्याला गॅससारखे इंधन उपलब्ध आहे त्याला हुकमी अग्नी निर्माण करणारी साधनेही उपलब्ध आहेतच. पण आता सोयीऐवजी परंपरेचे रूप घेऊन येणारा चितेवरचा अग्नीच तो गॅस पेटवण्यासाठी वापरला जातो आहे. याचप्रमाणे वैदिक संस्कृतीमधे अग्निहोत्री ब्राह्मणाचे काम अहोरात्र अग्नि चेतवत ठेवण्याचे, जेणेकरून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तो त्याच्याकडून नेता यावा. परंतु त्याभोवती कर्मकांडाचे वलय उभारले जाऊन त्या आधारे अग्निहोत्रींचे सामाजिक स्थान उभे राहिले.
धर्मश्रद्धांनी माणसाचा उद्धार होतो, तो सन्मार्गी जातो असे म्हणताना, हजारो वर्षांची परंपरा असलेल्या शहरातील लोकांची मानसिकतेचे वास्तव एक दोन लहान प्रसंगातून दिसते. एखादी स्त्री सेक्सचा अनुभव घेते म्हणजे ती वेसवाच आहे, तिला कुणीही चालू शकतो असा पूर्वग्रह असलेले, बिनदिक्कतपणे तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करणारे, प्रसंगी त्यासाठी तिला ब्लॅकमेल करू पाहणारेही याच पवित्र भूमीत जन्माला येतात, ते कसे? समाजातील संस्कृतीचे ठेकेदार म्हणतात तसे हे बाहेरून येते, की तो ही त्याच संस्कृतीचा अनुल्लेखाने मारण्याचा संकेत असलेला अविभाज्य भागच आहे, असा विचार करावा लागतो.
पण या सार्या लहान लहान तपशीलांना सांधून घालणारा एक धागा म्हणजे चित्रपटाची पार्श्वभूमीच होऊन राहिलेला, वारंवार चित्रपटाचा पडदा व्यापून राहणारा गंगेचा तो प्रवाह. देवीच्या पात्राप्रमाणेच विविध दृष्टीकोनाच्या, पार्श्वभूमीच्या, विचाराच्या व्यक्ती याकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहू शकतील. एक नक्की, की एकप्रकारे तो सार्या चित्रपटाचा कॅनवासच बनला आहे. विविध प्रसंगांना त्याची पार्श्वभूमी आहे. अधेमधे त्यावरील पुलाला, पुलावरुन जाणार्या रेल्वेला सोबत घेऊन तो त्या कथानकात वेगवेगळे रंग भरतो आहे. तसा तो संथ आहे, काही हलके तरंग दिसतात पण एखाद्या साचल्या तळ्यासारखा पृष्ठभागी निवांत पहुडलेला तो जलाशय, हजारो वर्षे गतिरूद्ध होऊन बसलेल्या परंपरांसारखा. पण भविष्यात तो तसा राहीलच याची खात्री मात्र देता येणार नाही.
या प्रवाहात बुडी मारून त्यात फेकलेल्या पैशांपैकी जास्तीतजास्त पैसे जमा करण्याची स्पर्धा, पैसे लावून खेळला जाणारा जुगार, घाटावर खेळली जाते आहे. या संथ प्रवाहात बेगुमानपणे उड्या मारत झोंटासारखी लहान मुले त्यात खळबळ निर्माण करत आहेत, त्यात बुड्या मारून सर्वात जास्त पैसे शोधून आणण्यासाठी स्पर्धा करत आहेत. जे लहानांचे आहे तेच मोठ्यांबाबतही घडते आहे. एका बाजूने गंगेतून पैसे काढण्यासाठी आकांताने प्रयत्न करणारी, तो कैफ अनुभवणारी लहान मुले आणि दुसरीकडे अचानक निर्माण झालेल्या पैशाच्या गरजेमुळे हतबुद्ध झालेला आणि अखेर त्या जुगारालाच शरण जाण्याइतका अध:पतित झालेला विद्याधर पाठक!
या घाटावरच्या स्पर्धेतला संघर्ष, स्पर्धा संपूर्ण चित्रपटाला व्यापून राहते आहे. एका प्रसंगी लावलेले पैसे हरलेल्या, खिन्न बसलेल्या पाठकला जुगार चालवणारा विचारतो 'कतना हारे पंडितजी?'. पंडितजी उत्तर न देता फक्त एक सुस्कारा सोडतो. कारण किती हरलो याची मोजदाद अजून संपलेली नसते, या जुगारात हरलेल्या पैशांपेक्षा कितीतरी अधिक तो जगण्याच्या जुगारात हरलेला असतो, हरणार असतो. त्या एका सुस्कार्याचे मोल त्याने गमावलेल्या पैशाइतकेच नव्हे तर कदाचित भविष्यात त्याला गमवाव्या लागणार्या सामाजिक स्थानासह करायला हवे आहे.
त्याच वेळी दीपक आणि देवीसारखे तरुण जगण्याच्या नव्या प्रवाहात बुडी मारत त्या प्रवाहातून काही नवे हाती लागेल अशी उमेद बाळगून आहेत, त्यासाठी बनारसमधील जगण्याच्या संथ, स्थिर प्रवाहामधे खळबळ निर्माण करत आहेत.
चित्रपट म्हणजे केवळ गोष्ट चित्रित करणे नव्हे तर दृक् आणि श्राव्य अशा दोनही पर्यायांचा वापर करू देणारे ते कलेचे एक माध्यमही आहे. सामान्यपणे भारतीय चित्रपट कथा आणि मनोरंजनमूल्य याकडेच अधिक लक्ष देतात, या सर्वात शक्तिशाली कलामाध्यमाचा फारसा कलात्मक वापर करत नाहीत, अशी तक्रार चित्रपटकलेच्या क्षेत्रातील - संभावित आणि तथाकथित अशा दोन्ही - तज्ज्ञांची असते. 'मसान' एका सशक्त कथेला सादर करत असतानाच यातील काही अनुषंगांचा असा नेमका उपयोग करून घेताना दिसतो.
जेव्हा जेव्हा एक पुरुष आणि एक स्त्री एकत्र येतात तिथे पार्श्वभूमीवर फडकणारी धर्मध्वजा अथवा पताका त्यांच्या आसपास सतत असणार्या परंपरेर्या अस्तित्वाची जाणीव करून देते. जगण्यातल्या एखाद्या प्रवासाची सुरुवात वा अंत होतो, तेव्हा रेल्वे येते. एखादी व्यक्ती नवे पाऊल टाकते, जगण्यातली एखादी अप्रत्यक्ष सीमा ओलांडते त्या क्षणी महामार्गावरचे पुरी रुंदी व्यापणारे दिशादर्शक बोर्डस - जे कदाचित दोन शहरातील सीमेचे प्रातिनिधित्व करतात - दर्शन देऊन जातात. विविध टप्प्यांवर येणारे पूल, रेल्वे चित्रपटकथेला वेगवेगळे संदर्भ देऊन जात आहेत.
दृश्य बाजू प्रेक्षकांना सहजपणे दिसणारी, समजणारी. पण श्राव्य बाजू म्हणजे फक्त गाणी किंवा अतिकरूण प्रसंगाला वा वेगवान प्रसंगाला देण्याची फोडणी असाच आपला अनुभव असतो. पण दृश्याला पार्श्वभूमी देणारा ध्वनी त्यातील दृश्याला एक जास्तीची मिती देतो, त्याच्या आकलनाला वेगळे परिमाण देऊ शकतो हे मात्र आपल्या ध्यानात येत नाही. 'मसान'मधे याचा केलेला वापर विलक्षण समर्पक. देवी देहभोगाचा अनुभव घेण्याच्या तयारीत असताना पार्श्वभूमीवर नेमकी कुणी एक अतिउत्साही प्रेक्षक 'पाय घसरून' वाघाच्या पिंजर्यात पडून झालेल्या 'हादसा' अथवा अपघाताची बातमी ऐकू येत राहते. त्यातही पहिले चुंबन घेत असतानाच नेमका पार्श्वभूमीवर 'हादसा' हा शब्द ऐकू येतो. दुसरीकडे पोलिस अधिकारी देवीच्या घरी येऊन थडकतो तेव्हा पार्श्वभूमीवर टीवीवर चालू असलेली 'गंगेच्या प्रवाह बदलण्याने विस्थापित' झालेल्यांची कैफियत मांडणारी बातमी ऐकू येते आणि जीवनगंगेचा प्रवाहदेखील जागा बदलताना काही घरांची पडझड होणार असल्याचे सूचित करतो.
काळाच्या अक्षावर समांतर जाणारी दीपक आणि देवीची कथा स्थलाच्या मितीमधे एकत्र येते आहे. देवीचा खडतर प्रवास घाटावरच्या ज्या सज्ज्यावरून सुरू होतो, तिथूनच दीपक आपल्या नव्या जगाचा प्रवास सुरू करतो आहे. त्याच्या प्रेमपात्राची अंगठीच गंगेच्या माध्यमातून तिच्यापर्यंत पोहोचून अडचणीच्या प्रसंगी तिचा आधार होऊन राहते आहे. डोंब आणि पाठक या दोघांच्या जगात दोन प्रवाहांची वाट एकच असते, पण वाटचाल वेगळी राहते ! पुढच्या पिढीतील दीपक आणि देवीच्या जगात ती कदाचित सोबतीनेही होईल, कुणी सांगावं.
-oOo-
सुदैवाने मसान हा संपूर्ण चित्रपटही यू-ट्युबवर उपलब्ध आहे.
(प्रथम रमतारामाच्या विश्रांतीस्थळी आणि नंतर काही ऑनलाईन पोर्टल्स व दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेला हा लेख विषयसुसंगत म्हणून ’वेचित चाललो’ वर हलवला आहे. )
Great ... पुन्हा पाहीन
उत्तर द्याहटवा