शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

दाद द्या अन् शुद्ध व्हा

...आणि तो आला.

सार्‍या प्रेक्षागृहाच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. 'अरेच्या, हाच का तो?' असा प्रश्न मनात उमटतो. कारण 'तो' शिडशिडीत, अंगातून वीज सळसळत असावी तसा चपळ, डोक्यावर गोल हॅट, पार्श्वभागापर्यंत लो़ळत गेलेला बटलर कोट, आडमाप ढगळ पँट, डोळ्यात सदाहरित चौकस नि मिश्किल नजर आणि उजव्या हातात या सार्‍यांना आपल्या तालावर नाचवणारी एक ओल्ड मॅन्स स्टिक.

हा वृद्ध पण तरीही हातात काठी नाही, अंगाने भरलेला, नेमक्या मापाचे कपडे, बो-टाय... हाच काय तो? त्याला ती क्षणभराची शांतता देखील असह्य होते, आज वयामुळे शारीरिक हालचाली तर मंद झाल्या आहेत. इतक्यात ती मानेची चिरपरिचित हालचाल होते नि गर्दीची खात्री पटते.... अरे हाच की तो. क्षणार्धात सारे सभागृह हर्षातिरेकाने उठून उभे राहते. त्याला नकोशा वाटलेल्या शांततेला मागे सारून टाळ्यांचा कल्लोळ उसळलाय. सारं सभागृह उत्स्फूर्तपणे उभे राहिले आहे. अधेमध्ये 'ब्रावो ब्रावो'चा उद्घोषही ऐकू येतोय. सावकाश पावले टाकीत तो पोडियम जवळ येतो तरी तो टाळ्यांचा गजर कमी होत नाही... त्याला आता बोलायचंय्... पण तरीही लोकांचा उन्मेष निवळलेला नाही...

आज असं चित्र कुठे दिसतं? एखाद्याला सन्मान, पारितोषिक वा पुरस्कार जाहीर व्हायचा अवकाश, तो/ती त्याला लायक कशी नाही हे त्याच्या क्षेत्राताले वा त्याच्याबाहेरचे - मुख्यतः खासगी आयुष्याशी निगडित - निकषांच्या आधारे तो त्याला लायक कसा नव्हता, दुसरा कुणी कसा त्याहून लायक होता, निवडीत आपपरभाव कसा झाला वगैरे सांगणारे स्वयंघोषित विद्वान अहमहमिकेने तोंड आणि लेखणी - आणि हल्ली कॅमेराही - वाजवायला सुरुवात करतात. स्पर्धा सारं काही चांगलं पुढे आणेल म्हणतात. मग हे काय झालं आपलं?

हा असा आदर, ते अलोट प्रेम आज एखाद्याला का मिळत नाही? 'हल्ली तसं कुणी नाहीच मुळी' हा दोष समोरच्यावर ढकलण्याचा उद्योग सोपा आहे. पण आपलीच त्याच्याबद्दलची ओढ, आस कमी झाली का असा प्रश्न मात्र आपण विचारत नाही. एका आयुष्यात कुवतीपेक्षा नि उपलब्ध वेळेत जमू शकेल त्यापेक्षा अधिकाधिक साधू पाहताना त्यातल्या कुठल्याच गोष्टीबाबत आस उत्पन्न व्हावी, प्रेम उत्पन्न व्हावे इतका वेळ देणे शक्य होत नाही. पण दोष 'आपला' कधी असणं शक्यच नाही. तेव्हा दोष मग समोरच्याच्या गुणवत्तेचा.

गोष्ट इथेच थांबत नाही. काही सुदैवी व्यक्तींना लोकांचे असे प्रेम मिळतेही, पण मग आता आपल्याला ते खुपते. 'असे असूच शकत नाही. इतके सुंदर, इतके हवेहवेसे वाटणारे काही असूच शकत नाही.' असं म्हणत आपण आपली हत्यारे घेऊन धावतो. मग आमच्या सारख्याच चिंतातुर जंतूंना बरोबर घेऊन अभिजाततेचे नवे आयाम, नवे निकष आम्ही निर्माण करतो. त्याच्या आधारे लोकांच्या 'लाडक्या व्यक्तिमत्वाला' आम्ही खलनायक बनवतो, त्याच्या चेहर्‍यावरचा मुखवटा ओरबाडून काढण्याच्या गर्जना करतो, त्याने समाजाची अभिरुची बिघडवली वगैरे म्हणू लागतो (पण आपण 'घडवली' म्हणतो ती तरी नक्की कशाच्या जिवावर याचे उत्तर शोधत नाही, देत नाही.)

दुसरीकडे 'लोकांना हेच हवं' आहे म्हणून हीन-अभिरुचीच्या नव-नव्या पातळ्यांवर खाली घसरत जातो. बहुसंख्येप्रती टोकाची पराङ्मुखता नि टोकाचा अनुनय या दोन परस्परविरोधी प्रवाहात विचक्षणपणे दोन्हीचे भान ठेवतच आपल्या कलाकृती, आपले विचार निर्माण करणार्‍यांचा 'मध्यमवर्ग' लुप्त होत चालला आहे. सामाजिक आर्थिक प्रतलातही एकुण समाजातूनच हा मध्यमवर्ग विलुप्त होत चालला आहे. तो हळूहळू वरच्या नि खालच्या वर्गात वाटला जात विलीन होऊन जाईल. मग राहील ती फक्त 'आहे रे' नि 'नाही रे' वर्गाची रस्सीखेच.

स्पर्धेच्या तत्त्वाने जगात जे जे उत्तम तेच टिकेल असे म्हटले जाते. पण त्याला मिळालेले अलोट प्रेम बिनमहत्त्वाचे, नि सारी नैतिक-अनैतिक प्रचारमाध्यमे नि दबावतंत्र वापरून मिळवलेल्या 'बाहुल्या' महत्त्वाच्या, या टप्प्यापर्यंत आपण आलो आहोत. अनेकांना ही 'प्रगती' वाटते, वाटो बापडी.

हसता-हसवता डोळ्यात कधी पाणी ठेवून जाणार्‍या, कधी अंतर्मुख होण्यास भाग पाडणार्‍या, काळ्या-पांढर्‍या रंगातील चौकटींना रुपेरी किनार देऊ करणार्‍या जिवंत मनाच्या माणसाला कुर्निसात.

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा