सचिन कुंडलकर यांचा 'गंध' पाहात होतो. त्यात मिलिंद सोमणने 'रावी के उस पार...' चे एक जेमतेम एक कडवे म्हटले आहे. त्यातल्या रावीऽऽऽ वरची ती मींड काळजावर घाव घालून गेली. दुसर्यांदा ऐकताना बेट्याने काय कमाल केली आहे असे वाटून गेले.
Film: Gandha (2009).
वाटलं हा केवळ सर्वसाधारण अभिनेता असलेला माणूस ही जागा अशी वेधक घेऊ शकतो, तर मूळ गाण्यात काय बहार येत असेल. मग मूळ गाणे शोधायला गेलो. पत्ता लागला मूळ गाणे रावी के 'इस' पार आहे, 'उस'पार नव्हे! याची गायिका उमराव ज़िया बेगम पाकिस्तानी आहे हे ध्यानात घेतले तर हा भेद समजून जातो. (कुंडलकरांनी हा बदल हेतुत: केला असावा का?)
रावी के इस पार, सजनवा रावी के इस पार प्रेम का दरिया, प्रेम की नैया प्रेम का चापू१, प्रेम खेवैया२ आजा कर के पार, सजनवा बूढे जागे, बालक जागे मेरे बालम ना, अबतक जागे जाग उठा संसार, सजनवा प्रेम पुजारी, बनकर आजा प्रेम भिखारी, बनकर आजा त्याग के सब संसार, सजनवा इस दुनियासे दूर रहेंगे प्रेम नशेमें चूर रहेंगे गाएंगे गीत मल्हार, सजनवा रावी के इस पार ---
२. खेवैया = नावाडी
ते ऐकले, गाणे उत्तम आहे यात शंका नाही, पण नेमकी ती मींड तिथे नाही. मींड घेतली आहे पण अगदीच अदखलपात्र अशी भासते, त्यात तो 'लगाव' नाही! गाण्यातले सूर थोडेफार समजत असले तरी स्वरांबाबत बालवाडीपर्यंतही न पोचलेल्या आम्हाला आता 'कट्यार...' मधले खाँसाहेब सदाशिवला 'दिलमें प्यास जगाना, और उसे अधूरी छोडकर जाना...' असं का म्हणाले असतील हे समजून जाते.
पण गाण्याच्या सुरावटीसोबतच त्यातील शब्दांकडे लक्ष गेले आणि त्यामागची भावना लख्खकन चमकून गेली. एक पाकिस्तानी गायिका आपल्या प्रेमिकाला 'रावी के इस पार’ यायला सांगते आहे, याला केवळ शृंगारिक दृष्टीने पाहता येणार नाही. धर्माच्या आधारावर फाळणी करुन जमिनीचे दोन तुकडे करत त्यासोबत असंख्य नात्यांचे बंध कचाकच तोडून टाकल्यानंतरची ती वेदना दिसते.
यावरुन मला माझ्या दृष्टीने ’रावी केस इस पार’ असलेल्या ग़ज़लसम्राज्ञी बेग़म अख्तर यांचा एक किस्सा आठवला. साधारण पन्नास-बावन्नच्या सुमारास कराचीमध्ये लष्करी अधिकार्यांच्या एका कार्यक्रमात त्यांनी ’हमारी अटरियापे आओ सजनवा, सारा झगडा खतम हो जाए’ हा दादरा गायला होता. याची निवड हेतुत: केली का असा प्रश्न विचारल्यावर बाई फक्त मंद हसल्या होत्या म्हणतात$.
दोन्ही तीरांवरुन मारलेली ही हाक अर्थातच कुणाच्या कानावर पडली नाही, पडली तरी कुणी मनावर घेतली नाही. कारण प्रेमापेक्षा द्वेषाचे पीक हे अधिक वेगाने वाढते, लवकर कापणीला येते आणि बाजारभावही चांगला मिळतो. तिथे गावकुसाबाहेर ठेवलेल्या दोन स्त्रियांच्या दुबळ्या हाकांना कोण विचारतो.
खूप काही देऊ शकणारे नेमके काही देत नाहीत आणि काहीवेळा फारसे काही हाती नसणारेच एखादे अमूल्य दान पदरी टाकून जातात. फक्त दाता कुणीही असेल तरी दान घेण्यासाठी पदर पसरून याचक होण्याइतके नम्र होता आले पाहिजे.
- oOo -
छापता छापता:मूळ गाणे कोणत्या वर्षीचे, त्याचा गीतकार/संगीतकार कोण याचा काहीच पत्ता लागला नाही. पण याच गाण्यावर केशवराव भोळे यांनी पं अनुज यांच्याकडून 'देखूं कबतक बांट’ ही बंदिश बांधून घेतली. १९३८ साली आलेल्या ’मेरा लडका’ या चित्रपटात ती शांता हुबळीकरांच्या आवाजात रेकॉर्ड झाली आहे. 'रावी के उस पार’ मारलेली हांक आणि त्याला 'देखूं कबतक बांट' हे मिळालेले उत्तर औचित्यपूर्ण ठरते.
गायिका: शांता हुबळीकर
संगीत: केशवराव भोळे
गीत: अनुज
चित्रपट: मेरा लडका (१९३८).
देखूं कबतक बांट, पियरवा देखूं कबतक बांट, तुम्हार पथराई अंखियां, देखत, ढूंढत एकही दिन मोरे, घर ना आवत खाली बांट निहार, पियरवा ॥१॥ जिया तडपत है, जिया धडकत है, दरस को तोरे, ललचाता मन है जीवन के आधार, पियरवा ॥२॥ सागर उठती दूर तरंगे तैरुं कहांसे, भारी उमंगे ब्याकुल मैं इस पार, पियरवा ॥३॥ भेंट हमारी अब कब होगी? प्रीतकी जोती मिलके जलेगी? डूबे सब संसार, जगतमें डूबे सब संसार, जगतमें ॥४॥ ---
-oOo-
$. अंबरीश मिश्र यांच्या ’शुभ्र काही जीवेघेणे’ या पुस्तकातील ’अख्तरीबाई’ या लेखातून
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा