त्यांनी ‘चिमुकलीच कविता’ शिकवायला घेतली ती या वर्षातील शेवटचीच कविता होती. नव्हे, ती शाळेतीलच शेवटची कविता होती.
“यात एक ओळ फार झगझगीत आहे.” तातू हळूच म्हणाला. तो शेजारी बसला होता खरा, पण मनाने तो दूर कुठे तरी निघून गेला होता.
कविता संथपणे चालली होती. गोंडस नाजुक चिमणी बाला हळूहळू स्पष्ट होत चालली. केस सरळच, पण काही मात्र कुरळे. कच्च्या पोवळ्यांच्या चकत्या करून लावल्याप्रमाणे वर्खी नखे (नखे लाखिया, दात मोतिया, आणि स्तनाकार पेले... यांची जपानी रमलाची रात्र चिमुकलीच कविता मोठी झाल्यानंतरची) विशेष प्रतिकार न करता, पण फारसे न झंकारता आम्ही त्या संथ ओळी ऐकत होतो, मग कसलीच चाहूल न दाखवता ती ओळ आली व सारे अंग थरारून गेले. तिच्या हनुवटीवरील तीळ म्हणजे तिच्या पुण्याईचे गणित करत असता विधीने दिलेले दशांश चिन्ह कमळाच्या परागतंतूंतील एक विजेच्या झळाळीने उजळ झाल्याप्रमाणे मी अगदी बावरून गेलो व सारेच विसरलो.
नंतर बऱ्याच वर्षांची गोष्ट आहे. खऱ्या काव्याचे लक्षण कसे ओळखावे, हे आपल्यापुरते सांगताना ए. ई. हाउसमनने म्हटले आहे : एखादी ओळ आठवताच सारे अंग थरथरून येते. जर त्या वेळी मी दाढी करत असेन तर चेहऱ्यावरील केस एकदम ताठरतात. ही खूण त्याला पुरेशी आहे. Elfs and fairies shall dance no more... Brightness falls from the air, Queens have died young and fair...
एमिली डिकिन्सनला जाणवणारे लक्षण निराळे आहे : “खरी कविता वाचताना खोल कुठे तरी असा गारठा जाणवतो की विश्वातील सारी उष्णता जरी त्या क्षणी आपल्यात भरली, तरी तो नाहीसा होणार नाही असे वाटू लागते.”
तसल्या जातीचा एक लहान अनुभव मला आला, मास्तरांनी ती ओळ वाचली तेव्हा. गणितातील निर्जीव टिंबाला एका दशवर्षेच्या जीवनात निर्णायक रूप प्राप्त झाले. मास्तरांनी ती कविता अनेकदा शिकवली असेल, पण ते या ओळीवर थांबले. पुस्तकात बोट ठेवून ते खिडकीपाशी गेले, व तेथे किंचित रेंगाळून ते परतले. “या माणसाची भूकच वेगळी होती. त्याला एखादा पक्षी पाळायचा असता तर त्याला गरुड देखील निर्जीव वाटला असता, त्याने रूक पक्षीच मिळावायचा प्रयत्न केला असता !”
त्यानंतर मास्तर पुष्कळ बोलत राहिले. पण आता माझेच मन थाऱ्यावर नव्हते. दररोजच दिसणारा, खिडकीतून आलेला उन्हाचा पट्टा आज जास्तच का झळझळत आहे हे मला समजेना. पलीकडील ख्रिश्चन स्मशानभूमीतील झाडे स्तब्ध उभी होती खरी, पण त्यांचे सारे लक्ष माझ्याकडेच होते. कपाळाला एक लहान सुरकुती देऊन, मान किंचित वाकडी करून ब्रह्मदेव हे दशांश चिन्ह देऊन त्या मुलीचे भवितव्य ठरवण्याच्या विचारात आहे, आणि त्याच्या आज्ञेची वाट पाहत एक तेजस्वी टिंब त्याच्यासमोर तरंगत आहे, असे चित्र समोर अस्पष्ट दिसू लागले.
नंतर बऱ्याच काळाने माझ्या ध्यानात आले की, ते टिंब म्हणजे तिच्या हनुवटीवरील तीळ नव्हता, तर ती एका गोंदण्याची खूण होती. म्हणजे ते टिंब कुठे द्यायचे, हे जरी ब्रह्मदेवाने ठरवले होते, तरी त्याने अर्जुनाप्रमाणे एका गोंदणकाराला नाममात्र केले होते !
“आणखी एक ओळ जाता जाता तसेच चेटुक करून जाणारी आहे,” जागा झाल्याप्रमाणे तातू म्हणाला, “कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही.”
ही किमया होती ती मुख्यत्वेकरून कवीची, पण मला ती दातार मास्तरांकडून मिळाली म्हणून मला त्यांच्याविषयी कृतज्ञता होती.
दातार मास्तर मराठीप्रमाणे गणित देखील शिकवत. खरे म्हणजे शास्त्र आणि भूगोल सोडून सगळेच विषय त्यांनी केव्हा ना केव्हा तरी शिकवले होते. निरनिराळ्या रंगांच्या खडूंनी भरलेली पेटी उघडून भूमितीच्या तासाला ते हात चोळत फळ्यासमोर उभे राहिले की, आता येऊ दे समोर कोणतेही प्रमेय असा आवेश त्यांच्यात असे ! कधी तरी ते एक अजस्र लाकडी कंपास वर्गात आणत, व त्यात एका टोकात खडू अडकवून तो बाजूला ठेवून देत. इतक्या वर्षात त्यांनी तो वापरलेला मात्र आम्ही कधी पाहिला नाही. उलट हातात खडू धरून हात सैलपणे गोल फिरवून आपण सुरेख वर्तुळ काढू शकतो, असे ते आम्हांला अभिमानाने सांगत.
इतर सिध्दांत-प्रमेये सांगताना ते अनेकदा पायथागोरासच्या सिध्दांताचा उल्लेख करत. पण अनेक दिवस पायथागोरासची पाळी येईना. तो सिध्दांत बराच मोठा असल्यामुळे त्यासाठी दोन तास तरी सलग हवे असत. आमची उत्सुकता वाढतच गेली. पायथागोरास हा एक ग्रीक तत्त्वज्ञ होता, व त्याचा पुनर्जन्मावर विश्वास होता. कदाचित तो भारतात देखील येऊन गेला असेल. पृथ्वी एका स्थिर बिंदूभोवती फिरते, असा त्याचा विश्वास होता. त्याची देखील एक शाळा होती. पण एखादा विद्यार्थी मध्येच त्याचे शिकवणे सोडून गेला, तर त्याने दिलेली फी समारंभपूर्वक त्याला परत केली जात असे. तो गेल्यानंतर मात्र त्याच्या बसण्याच्या जागेवर थडग्यावर ठेवतात त्याप्रमाणे त्याचे नाव असलेला एक दगड ठेवला जात असे.
अशा पुष्कळशा गोष्टी मास्तरांनी सांगितल्या होत्या. त्याच्या नावावर असलेला सिध्दांत प्राचीन ईजिप्तमध्ये आधीच माहीत असावा. पण प्राचीन इतिहासात काही वेळा कुणाचे तरी श्रेय कुणाला तरीच दिले जाते. ज्याला आपण अरबी आकडे म्हणतो, ते खरे म्हणजे हिंदू आहेत(१). प्लेटो नावाच्या तत्वज्ञाने तर ज्यांना भूमितीची आवड नाही त्यांना आपल्या शाळेत प्रवेश नाही, असे जाहीरच केले होते. आमच्यापैकी बहुतेकांना प्लेटोने आपल्या शाळेची पायरी देखील चढू दिली नसती, कारण गणित म्हणजे आकडेमोड, भूमिती म्हणजे रेघामोड, व सगळे मिळून एक असह्य मानमोड एवढीच आमची कल्पना होती.
अखेर वेळापत्रकात मास्तरांनी थोडा बदल करून घेतला, व दोन तास सलग मिळवले. त्यांनी लग्नातील नवरदेवाप्रमाणे झगझगीत पिवळ्या रंगाचा एक काटकोन त्रिकोण बोर्डावर काढला. त्याच्या कर्णावर जांभळ्या रंगाचा चौरस उभा राहिला. बाजूच्या दोन रेषांवरील चौकोन अद्याप कच्चे असल्याप्रमाणे हिरवट रंगाचे होते. मग पांढऱ्या खडूने रचना तयार झाली. संथ आत्मविश्वासाने एकेक पायरी दाखवत मास्तरांनी असे दाखवले की दोन हिरव्या चौरसांची बेरीज जांभळ्या चौरसाइतकी आहे.
यापूर्वी मास्तरांनी अनेक सिध्दांत शिकवले होते. जे सिध्द करायचे होते, ते स्वच्छपणे पटवून दिले होते. त्या QED मध्ये एक काम पार पाडल्याचे व्यवहारी समाधान होते. पावलापुढे पाऊल टाकून रस्ता निभावला होता इतकेच. पण पावलांना कधी पंख फुटून खालचा रस्ता खालीच राहिला नव्हता. Where Kingfishers Catch Fire... खंड्या पक्ष्याच्या पंखावर सूर्यप्रकाश पडून निळी वीज झळाळली नव्हती. कधी लोलकांतून पाहिल्याप्रमाणे कसल्याच रंगरेषा उमटल्या नव्हत्या. मास्तरांनी खडूचे हात झाडले व खुर्चीत बसून त्यांनी तपकिरीची डबी उघडली.
मी बोर्डाकडे पाहत होतो. त्या क्षणी काय झाले कुणास ठाऊक, हादरल्यासारखे होऊन सगळा वर्गच वितळल्यासारखा झाला. समोर एक भव्य काळा पडदा, त्यावर जांभळा व हिरवा असे दोन चौरस हळदी त्रिकोणाभोवती झळाळत उजळले. दोन लहान चौरस भिरभिरत जांभळ्या चौरसात मिळून गेले. मग मोठा जांभळा चौरस थरथरत चंद्रज्योतीप्रमाणे फुटला. आणि त्याचे दोन नवे लहान लहान चौरस झाले. ते आता रोखठोक स्वतःच्या स्वतंत्र सत्याने प्रकट झाले होते. म्हणजे म्हटले तर एक, किवा दोन आणि खरे म्हणजे दोन एकच व एकच दोन हे सारे एकेक पायरी समजावून घेत, सारे स्वच्छपणे समजावून घेण्यापेक्षा सर्वस्वी निराळे होते. हा एक अणुसाक्षात्कार होता.
झेन बुध्दवादातील Satori, साक्षात्कार या अर्थी वापरली जाणारी Epiphany ही कल्पना, एका देवदत्त क्षणी मी व इतर जग यांतील दुरावा जळून जाऊन मी आणि माझे जग, I and it जाऊन I and Thou, हे सारे नंतर खूप वर्षानी वाचनात आले. तसला अनुभव घेण्याचे मला भाग्य कधीच लाभले नाही. पावले धुळीतच रखडत ठेचाळत राहिली. राजहंस कधीच खाली उतरले नाहीत. पण त्यांचे एक झरझर प्रतिबिंब मात्र मानसजलावर क्षणभर सरकून गेले. त्या क्षणी अशा तर्हेचा अत्यंत दुर्मिळ, मूल्यवान व अगदी कणरूप अनुभव मला स्पर्श करून गेला हे मात्र खरे. घंटा झाली व मी भानावर आलो. मास्तर निघाले, पण जाता जाता ते म्हणाले, “काय भोपळेबुवा, डुलकी लागली होती वाटतं? मी दोन प्रश्न विचारले तुला.”
एरवी मला थोडी शरम वाटली असती, पण त्या क्षणी मात्र मी अगदी निर्विकार, अलिप्त होतो. पुढचा तास आपटे मास्तरांचा होता. मी पुस्तके घेऊन ख्रिश्चन स्मशानभूमीत आलो. तेथे कोपऱ्यात जी दोन थडगी होती. त्यांच्यावर सपाट गुळगुळीत अशी मोठी फरशी होती. तेथे स्टीफन माळी काही तरी करत होता. आता माझी त्याच्याशी चांगलीच ओळख झाली होती. तो हसला व झाडणीने फरशीवर पडलेली वाळलेली पाने बाजूला करून तो दुसरीकडे गेला.
मी फरशीवर पसरलो. कसली बोच नाही, हाव नाही. हातमोजा उलटा केल्याप्रमाणे सगळेच वेगळे, उलटे झाले होते. त्या क्षणी देखील मनातील ती उत्कट नीरवता मला प्रकट करता आली नसती. इतक्या वर्षानंतर उरली आहे ती फक्त स्वतःलाच जाणवणारी आठवण.
अशा अनुभवाचा भव्यतेशी किंवा स्वतःच्या मोठेपणाशी काडीचाही संबंध नसतो. तसला अनुभव पॅसिफिक महासागर प्रथमच पाहिलेल्या कोर्टेझला (खरे म्हणजे बाल्बोआला) आला असेल. अणुबाँबचा पहिला चाचणी स्फोट पाहिल्यावर दशकोटी सूर्याची ओपेनहीमरला आठवण झाली व तो हरवून गेला. तर जेफरीसारख्या साध्या पत्रकाराला असला अनुभव तो एका टेकडीवरील उतरणीवर गवतात पसरला असता आला होता.
नंतर फार वर्षानंतरची गोष्ट आहे. एका महान साधकाची कॉलेजला भेट होती. स्टाफरूमसमोर गाडी थांबली. तेथेच एक रानझुडूप वाढले होते आणि जगण्याची ईर्षा दुर्दम्य असल्याप्रमाणे त्याला कोवळी, लालसर पाने फुटली होती. जवळून जाताना साधक एकदम थांबले. त्यांचे हातपाय थरथरू लागले व त्यांनी उपरणे तोंडावरून ओढून घेतले. ते समाधीत गेले होते. आम्ही त्यांच्या अशक्त देहाला उचलून पुन्हा गाडीत ठेवले, व गाडी थेट टोकापर्यंत नेली. थोड्या वेळाने ते परतले, तेव्हा पुन्हा ते झुडुपाजवळ आले. पण या वेळी त्यांनी त्याच्याकडे पाहिले देखील नाही. आता त्याची काही गरज उरली नव्हती. एका क्षणी ओळख पटून गेली होती.
त्यानंतर मी पायथागोरासचा सिध्दांत दोन-चार मित्रांना समजावून सांगितला. माझ्याजवळ योग्य ते शब्दच नसावेत. त्यांनी माना डोलावल्या. पोस्ट ऑफिस पाच वाजता बंद होते, पूना मेल सहा वीसला येते, असलीच माहिती मी देत असल्याप्रमाणे ते निर्विकार राहिले. दोघांनी तर तो सिध्दांत आपल्याला समजला आहे असे सांगितले. पण समजणे निराळे, जाणणे निराळे. एक लाल पान खुडून कपाळावर चिकटवणे निराळे. आतून काही तरी उसळून सर्वांगाला लाल लाल पाने फुटल्याप्रमाणे वाटणे निराळे, कदाचित माझ्यातच हा उणेपणा असावा. खुद्द मास्तरांना देखील हाच अनुभव पुन्हा हुकूमेहुकूम देता येणार नाही; कारण असला क्षण म्हणजे स्थळ, काळ आणि दैवी इशारा यांचा एक अगम्य स्फोट असतो. त्यानंतर काय ? त्यानंतर काय ? काय ? तर काही नाही. केवळ निःशब्दता, मूकता. विटगेन्स्टीनने हे बरोबर ओळखले. त्याबद्दल तो स्तब्ध राहिला. तेथे शब्दांची मिजास संपते, तत्त्वचर्चेचा दिमाख बेगडी ठरतो, आणि वटवटणारी जीभ निरर्थक चुकचुकणाऱ्या पालीप्रमाणे वाटते.
असले काही तरी क्षणिक, किरकोळ प्रथमच मला अनुभवाला आले होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे पहिले धूसर चित्र आणि हा क्षण यांत गणिताचाच स्पर्श होता. हनुवटीवरील दशांश चिन्ह भाग्य ठरविणारे होते, तर पायथागोरासच्या चौरसांनी एक नवीनच खिडकी किंचितकाल उघडली होती.
- oOo -
पुस्तक: माणसेः अरभाट आणि चिल्लर
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: परचुरे प्रकाशन मन्दिर
आवृत्ती पाचवी
वर्ष: मे २००७.
पृ. ४४-५०.
---
सदर वेच्यामधील मोठे परिच्छेद मोबाईलच्या छोट्या पडद्यावर वाचण्यास सुलभ व्हावेत या दृष्टीने मजकुरात कोणताही बदल न करता लहान-लहान परिच्छेदांमध्ये विभाजित केले आहेत.
---
(१). या विधानाला ‘आपल्याकडील समजूत’ वा एक अस्मिताजन्य गृहितक या खेरीज कोणताही आधार नाही. हे केवळ जीएंचे विधान म्हणून घ्यायचे. या आकड्यांना आजही हिंदू-अरेबिक न्यूमरल्स असेच म्हटले जाते. - ब्लॉगलेखक.