गुरुवार, २८ जुलै, २०१६

माय

भगीरथ खूप लहान असतानाच त्याची माय चंडी चेटकीण* होऊन गेली होती. मग या झपाटलेल्या चंडीला लोकांनी गावाबाहेर हाकलून दिलं. कारण अशा लहान मुलांवर करणी करणार्‍या चेटकिणीला मारून टाकता येत नाही. तिला मारलं तर गावातली पोरं जगत नाहीत. मोठ्यांवर चेटूक करणार्‍या डाइनीला जाळून मारून टाकतात, पण अशा 'बॉएन' चेटकिणीला मात्र जिवंत ठेवावं लागतं.

कथा पंचदशी

म्हणूनच चंडीची रवानगी रेल्वेलाईन पलीकडच्या माळरानावर झाली होती. दूरवर एका लहानशा कुडाच्या झोपडीत ती एकटीच रहायची.

भगीरथ मोठा झाला त्याच्या दुसर्‍या मायजवळ. ही यशी नावाची बाई त्याच्याबाबत अगदीच निर्विकार होती. ती ना त्याच्यावर प्रेम करे, ना द्वेष. स्वतःची माय काय चीज असते ते भगीरथला कधी कळलंच नाही. त्यानं फक्त माळरानावरच्या एका छातिम (सप्तपर्णी वृक्ष) वृक्षाखाली एक कुडाची झोपडी तेवढी पाहिली होती आणि त्या झोपडीत चंडी चेटकीण राहते असं ऐकलं होतं.

ही चंडी कुणाची जन्मदात्री असू शकते, असं वाटणंही शक्य नव्हतं. दुरून तिच्या लहानशा झोपडीवर झेंड्यासारखी लाल कापडाची चिंधी उडताना दिसायची. कधी कधी भर चैत्राच्या रणरणत्या दुपारी ती आपल्याच नादात हातातल्या टिनाच्या डबड्यावर काठीनं ढणढण आवाज करत तळ्याकडे जाताना दिसायची. तिच्या मागोमान एक कुत्रं.

चेटकिणीनं कुठंही जाताना टिनाचा आवाज करत जायचं असतं, कारण तिची नजर कुणावरही पडली तरी ताबडतोब ती त्याच्या अंगातलं सगळं रक्त शोषून घेते म्हणे!

म्हणूनच तर तिला एकटं राहावं लागतं. तिच्या टिनाचा आवाज ऐकू आला की सगळे आबालवृद्ध रस्ता सोडून निघून जातात.

एक दिवस, फक्त एकच दिवस, भगीरथनं मलिंदरला, म्हणजे त्याच्या बापाला त्या चेटकिणीशी बोलताना पाहिलं होतं.

"भगीरथ, वर बघू नको, खाली पहा." बापानं धमकावलं होतं.

चेटकीण त्या तळ्याच्या दलदलीतून धपाधप पावलं टाकत तळ्यापलीकडच्या काठाशी येऊन उभी राहिली. भगीरथनं ओझरतं पाहिलं, तळ्यातल्या पाण्यातलं त्या बाईचं प्रतिबिंब - लाल पातळ, रापलेला चेहरा आणि डोक्यावर जटांचा जुडा - आणि तिची ती वखवखीत नजर, जणू भगीरथला डोळ्यांनीच गिळून टाकेल की काय!

नाही, भगीरथनं तिच्याकडं डोळे उचलून पाहिलंच नाही.

भगीरथनं जसं त्या तळ्यातल्या पाण्यात तिचं प्रतिबिंब पाहिलं तसंच तिनंही त्याचं प्रतिबिंब पाहिलं होतं. शहारून भगीरथनं डोळे गच्च गिळून घेतले होते, बापाचं धोतर घट्ट धरून ठेवलं होतं.

"कशाला आली इथं?" भगीरथचा बाप तिच्यावर खेकसला होता.

"डोक्याला लावायला थेंबभर तेल नाही गंगापुत्र, घरात रॉकेल नाही, फार भीती वाटते ते मला एकटीला अंधारात."

चेटकीण रडत होती, पाण्यातल्या छायेत तिच्या डोळ्यातलं पाणी टिपकत होतं.

"का बॉ? या शनवारचा शिधा नाही भेटला?"

दर शनिवारी पाळीपाळीनं डोमपाड्यातला एकएक जण टोपली घेऊन जात असे. त्या टोपलीत तांदूळ, डाळ, मीठ, तेल ठेवून ती टोपली झाडापाशी ठेवायची आणि झाडाला साक्षी ठेवून 'यावेळचा शिधा दिला गं' असं ओरडून तिथून पळ ठोकून परत यायचं अशी पद्धत होती.

"भेटला, पण कुत्र्यानं खाऊन टाकला."

"पैसे पायजे का पैसे? घे पैसे-"

"पण मला कोण काय विकत देणार?"

"मीच घेऊन देईन विकत, पण जा आता. चालती हो इथनं-"

"मी एकटी नाही राहू शकत गंगापुत्र."

"मग चेटकीण कशाला झाली? चल नीघ म्हणतो ना-"

भगीरथच्या बापानं तिला हाकलण्यासाठी मूठभर चिखलाचा गोळा उचलला.

"गंगापुत्र, हा बेटा-"

एक गलिच्छ शिवी हासडत भगीरथच्या बापानं चिखलाचा गोळा तिला फेकून मारला - मग पळून गेली ती चंडी चेटकीण.

"बापा, तू चेटकिणीशी बोलला?"

भगीरथ खूप घाबरून गेला होता. चेटकिणीशी बोलणारं माणूस मरून जातं ना. भगीरथला वाटलं, आपला बाप आता मरणार. बापाच्या मरणाच्या कल्पनेनंही त्याच्या अंगातून वीज चमकून गेली. बाप मेला तर ती सावत्र आई आपल्याला घरातून हाकलून देईल हे नक्की.

"अरे बापू, ती चेटकीण असली तरी तुझी माय आहे."

- oOo -

पुस्तकः कथा पंचदशी
लेखक/अनुवादकः महाश्वेता देवी/वीणा आलासे
प्रकाशकः पद्मगंधा प्रकाशन
प्रथमावृत्ती (जानेवारी २०१२)
पृ. ६४-६६
---

*इथे चेटकीण हा शब्द वापरला आहे, तर याच कथेवर पुढे अमोल पालेकरांनी या कथेवर 'मातीमाय' नावाचा चित्रपट काढला त्यात 'लाव' असा शब्द वापरला आहे.

याच कथासंग्रहात समाविष्ट असलेल्या 'रुदाली' या कथेवर त्याच नावाचा हिंदी चित्रपटही निर्माण करण्यात आला आहे.


हे वाचले का?

शुक्रवार, २२ जुलै, २०१६

राडीनोगा

मांबा हा आफ्रिकेतला सर्वात भयानक साप मानला जातो. जगातल्या अतिविषारी सापांत त्याचा क्रम बराच वरचा आहे. पूर्ण वाढ झालेल्या 'मांबा'ची लांबी १० फुटांपेक्षा जास्त असते. अतिशय चपळ असलेला हा नाग तितकाच आक्रमकही असतो. तो अतिशय सावध असतो नि आसपास जराशी हालचाल झाली की तो झटकन आक्रमक पवित्रा घेतो. फणा उभारलेली, उघड्या तोंडातून जीभ बाहेर येते आहे, त्यातून येणारे त्याचे फुस्कारे हे दृश्य भल्याभल्यांच्या जीवाचा थरकाप उडवते. यास्थितीत तो कुठल्याही दिशेस हल्ला करू शकतो. या वेळची त्याची झेप भयावह असते. घोड्यावर बसलेल्या माणसावरही हल्ला करण्याची क्षमता या झेपेत असते. मांबाचं विष चेताहारी असतं. या विषाचे दोन थेंब शरीरात गेलं की ३० सेकंदात माणूस मरतो.

'मांबा'चा आफ्रिकन जनमानसावर इतका प्रचंड पगडा आहे, की कुणीही माणूस कुठलाही साप बघितला की त्याला 'हिरवा' किंवा 'काळा' मांबा दिसला असं सांगतो. 'हिरवा' नि 'काळा' हे रंग वेगळे असले तरी दोघांचं विष तितकंच विषारी असतं. फक्त काळा मांबा हिरव्या मांबापेक्षा अधिक भयानक दिसतो. पण त्यामुळं आफ्रिकेत वावरणारे 'सापपकडे' अशा मांबाच्या वार्तेकडे दुर्लक्ष करतात.

निसर्गपुत्र

या वेळी कुणीतरी बोशियरला मांबाची बातमी दिली. हा मांबा एका वाळवीच्या वारुळात अडकला होता. मांबा नि इतर साप हे बरेचदा अशा वारुळात विश्रांती घेतात. खाणं किंवा जोडीदार यांच्या शोधात ते बाहेर पडतात नि मग आपल्या ठराविक बिळात परततात. त्यामुळं बोशियर 'नक्की काय आहे?' हे बघायला त्या माणसाबरोबर निघाला.

त्या वारुळाला असंख्य बिळं होती. त्या बिळांमधे स्थानिक लोकांनी दगड भरले होते. आत जर एखादा मोठा साप असेल, तर तो बाहेर पडणं अशक्यच होतं. त्या वारुळाशेजारीच एक स्थानिक आफ्रिकन माणूस उभा होता.रानांवनांत खूप पावसाळे काढलेल्या त्या वृद्धानं त्या सापाचं वर्णन बोशियरला ऐकवलं. या सर्पराजाला आपण नेहमी बघतो, असंही त्यानं सांगितलं. तो मांबाच होता याबद्दल निदान त्या आफ्रिकन माणसाच्या मनात शंका नव्हती. हा मांबा अतिशय चिडका नि आक्रमक होता; नि असा मांबा त्या आफ्रिकनानं उभ्या आयुष्यात बघितलेला नव्हता. हे बोलणं चालू असताना इतर आणखी माणसं जमू लागली.

जवळच्याच तंबाखूच्या मळ्यांत काम करणारे सुमारे शंभराहून अधिक आफ्रिकन शेतमजूर, त्यांच्या पाठोपाठ गोर्‍या मळेवाल्यांचे ट्रक नि गाड्या येऊ लागल्या. या मंडळींनी त्या वारुळापासून दूर सुरक्षित अंतरावर मोक्याच्या जागा पकडून काय घडतंय ते पहायला सुरवात केली. ज्याच्या शेतात हे वारुळ होतं त्या मळेवाल्यानं आपल्या सर्व शेजार्‍यांना निरोप पाठवून हा तमाशा बघायचं आमंत्रण दिलं होतं.

"जगातला सर्वात विषारी साप पकडलेला बघण्यासाठी एवढे प्रेक्षक कुठेच हजर नसतील याची मला खात्री वाटते." असं नंतर बोशियर म्हणाला. बोशियरच्या आणि त्या वारुळाच्याही जवळ एक शस्त्रास्त्रांनी भरलेली मोटर उभी होती. या मोटरीत शॉटगन, पिस्तुलं आदी हत्यारांची रेलचेल होती. जर बोशियरनं साप पकडला तर काही प्रश्नच नव्हता. पण जर चुकून साप बोशियरला चावलाच तर "आम्ही तुला गोळ्या घालून तुझी वेदनांतून सुटका करू नि सूड म्हणून त्या सापालाही गोळ्या घालू." असं आश्वासन त्या मंडळींनी बोशियरला दिलं होतं. त्यांची समजूत घालून त्यांना दूर पिटाळण्यात बोशियरचा बराच वेळ खर्च झाला.

मग बोशियर जमलेल्या प्रेक्षकांकडे वळला. त्याला एका स्वयंसेवकाची मदत हवी होती. बोशियर वारुळ खणत असताना या स्वयंसेवकानं काठी घेऊन त्याच्या शेजारी उभं रहायचं होतं. या मागणीबरोबर तो जमाव शांत झाला. मग त्या सापाला वारुळात अडकवणारा म्हातारा हळूहळू पुढे आला. 'आपण कुठल्याही परिस्थितीत पळून जाणार नाही' असं त्यानं मान्य केलं. तो काठी घेऊन उभा राहिल्यावर बोशियरनं कुदळीनं ते वारुळ फोडायला सुरुवात केली. वाळवीच्या वारुळाचे दोन भाग असतात. त्यातलं बाहेरचं, माती लिंपून घट्टं केलेलं आवरण बोशियरनं फोडलं नि त्याचा पुढचा घाव आतल्या चिकण मातीच्या ओलसर ढेकळात घुसला. ते ढेकूळ बोशियरनं पाडताच वारुळाचा आतला भाग स्पष्ट दिसू लागला. धुरळा बसल्यावर त्या आतल्या भागात वेटोळं घालून बसलेलं ते प्रचंड मोठं धूड, त्याचं बाणासारखं डोकं, काळीभोर चंदेरी किनार असलेली बुबुळं यावरून हा साप मांबाच होता हे स्पष्ट होत होतं. बोशियरनं त्याच्या जंगली आयुष्यात बघितलेल्या मोठ्या सापांत हा मांबा 'सर्वात मोठ्या सापांपैकी एक' होता.

हे पाहताच बोशियरनं कुदळ खाली ठेवली आणि त्या मळ्याच्या मालकाला ढोसून तो साप बघायला जवळ आणलं. साप आपली दुहेरी जीभ बाहेर काढत हे सर्व पहात होता. "तो अतिशय दुष्ट साप होता. माझ्या मनात सापाबद्दल अशी भावना कधीच येत नाही; पण हा साप पाहताच तो घातकी नि दुष्ट आहे याची जाणीव अंगावर शिरशिरी उभी करून जात होती."

त्या शेतकर्‍यानं तो साप बघितला आणि त्याला कापरं भरलं. "हा साप पकडणं अशक्य आहे. मी त्याला गोळी घालतो!" तो बोशियरच्या कानात कुजबुजला. बोशियरलाही तसंच वाटत होतं. पण तरीही त्याला ते पटंत नव्हतं. त्यानं त्या मळेवाल्याला परत ट्रकजवळ सोडलं; आणि तो पुन्हा त्या वारुळाजवळ आला. मांबा बोशियरच्या हालचाली एकटक बघत होता. त्या सापाच्या नजरेत एक अनामिक भयकारी शक्ती होती. अशी विखारी नजर त्यापूर्वी बोशियरनं कधीच बघितली नव्हती. बोशियरचा आत्मविश्वास डळमळीत झाला.

मग बोशियरनं धीर एकवटून हातातली काठी सापाच्या दिशेनं पुढं सरकवली. साप झटक्यात मागे सरकला. त्याने जबडा वासला नि फुत्कार टाकला. त्या जबड्याच्या निळ्या आवरणावरचे ठिपके बोशियरला स्पष्ट दिसत होते.

"यावेळी माझ्या शेजारी उभ्या असलेल्या त्या वृद्धाकडं बघितलं. तो सुद्धा मोहपाशात अडकावा तसा त्या सापाच्या दृष्टीने स्थिरावला होता. ती सापाची नजर होतीच तशी जबरदस्त. पण समोरच्या सापाचं काहीतरी करणं भाग होतं. त्यामुळे काठीनं त्या सापाचं डोकं दाबून ठेवायाच प्रयत्न करायचं बोशियरनं ठरवलं. दोन तीनदा त्या काठीशी झटापट केल्यावर तो मांबा वारुळाच्या आतल्या भागात निघून गेला. मांबा आत जात असताना बोशियरनं त्याचं शेपूट धरायचा प्रयत्न केला, पण तो कात टाकण्याचा काळ होता; त्यामुळं बोशियरच्या हातात मांबाची मूठभर कात सुटून आली, नि साप आतल्या भागात निघून गेला.

बोशियरनं कुदळ हातात घेतली. आपल्या हातातली काठी त्या म्हातारबुवांच्या हाती दिली नि पुन्हा एकदा तो वारुळ खणण्याचा उद्योग सुरू केला. बराच वेळ अशी उकरा उकर केल्यावर बोशियर त्या वारुळाच्या गाभ्यापर्यंत पोचला. त्याचे वेळी मांबानं डोकं वर काढलं नि त्या धुरळ्यातच तो बोशियरच्या दिशेने झेपावू लागला. बोशियरनं घाई घाईनं त्या वृद्धाच्या हातातली काठी खेचून घेतली. बोशियरच्या आयुष्यातलं सर्पाशी सर्वात घातक युद्ध आता सुरू झालं होतंं. बोशियरच्या डोक्याच्या उंचीची फणा काढून तो मांबा बोशियरच्या दिशेनं झेपावत होता. प्रचंड संतापानं तो फुत्कार सोडत होता. प्रचंड जबडा वासून आपले दात दाखवत तो मांबा बोशियरवर झडप मारायचा. ती झडप चुकवायला बोशियर मग झटकन बाजूला उडी मारायचा. बोशियरला आता तो मांबाच फक्त दिसत होता. आजूबाजूला जमलेले लोक हे सर्व बघताहेत हे बोशियर पूर्णपणे विसरला.

असं होता होता बोशियरला हवी ती संधी मिळाली. त्या मांबानं मारलेली झडप उडी मारून बोशियरनं चुकवली नि त्यावेळेला मांबा तसाच जमिनीवर विसावला. तात्काळ बोशियरनं हातातली काठी त्या मांबाच्या मानेवर दाबली. डोकं उचलायचा मांबाचा प्रयत्न त्यामुळं अयशस्वी ठरला. बोशियरनं मांबाचं मुंडकं आता जमिनीवर दाबून धरलं नि काय घडतंय हे कळायच्या आता त्याची मान पकडली.

मांबा आता भयंकर खवळला. त्यानं शेपटीचे तडाखे बोशियरला हाणले. शेपटीनं बोशियरला विळखे घातले. तो इतकी जोरदार धडपड करत होता, की बहुधा हा मांबा आपल्या हातून सुटणार असं बोशियरला वाटू लागलं. त्यानं खरं म्हणजे दोन्ही हातांनी मांबाची मान पकडली होती, आपली सगळी ताकद एकवटून गच्च पकडली होती. कारण मांबा सुटलाच तर बोशियरचा अवतार त्या क्षणी संपणार होता याची बोशियरला कल्पना होती.

"आता आपला शेवट जवळ आला," असे विचार बोशियरच्या मनात येऊ लागले त्याच सुमारास त्या मांबाचं अंगं लुळं पडलं. तो दमला. त्यानं पराभव मान्य केला याचंच ते चिन्ह होतं. बोशियरनं त्या मांबाला एका कॅन्वासच्या थैलीत बंद केलं.

हळूहळू एक एक करुन ते प्रेक्षक बोशियरजवळ येऊ लागले. आता बोशियरची वाहवा होत होती. एक आफ्रिकन म्हातारी 'त्या सापाचा आत्मा अतिशय दुष्ट होता नि तो साप सामान्य नव्हता' असं सांगत असतानाच जवळच्या झाडीतून एक मनुष्य तिथं आला, नि 'एवढी गर्दी का जमलीय?' म्हणून विचारणा करू लागला.

आता काठी सांभाळणार्‍या वृद्धानं सभेची सूत्र हाती घेतली. त्या दिवशी सकाळी वारूळावर दगड ठेवून ते त्यानं स्वतः कसं बंद केलं इथपासून कथनाला सुरुवात झाली. हळूहळू हे कथन 'साभिनय' बनलं. कधी तो म्हातारा बोशियर बनायचा तर कधी मांबा. त्याच्या भोवती जमलेल्या लोकांचं वर्तुळ बनलं. मात्र या कथेत बोशियरनं साप हवेत असतानाच त्याची मानगूट पकडली होती. त्या बरोबर जमलेल्या सर्वांनी एकच प्रचंड जयजयकार केला नि ते सर्व एक सुरात 'रा ऽऽ डी ऽऽ नो ऽऽ गा ! रा ऽऽ डी ऽऽ नो ऽऽ गा !' असं ओरडू लागले. राडीनोगा याचा अर्थ 'सापांचा बाप'. त्या दिवसापासून बोशियर 'राडीनोगा' या नव्या नावानं ओळखला जाऊ लागला.

संपूर्ण आफ्रिकेच्या जंगलात 'राडीनोगा'ची कीर्ती पसरली. त्याच्याभोवती जिवंतपणीच दंतकथांचं वलय निर्माण झालं. एकदा तर 'राडीनोगा रागावलाय' या बातमीनं एका गावचा संपूर्ण बाजारच त्या दिवशी बंद करण्यात आला होता.

- oOo -

पुस्तकः निसर्गपुत्र (मूळ पुस्तकः 'द लायटनिंग बर्ड')
लेखक/अनुवादकः लायल् वॉटसन/निरंजन घाटे.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती दुसरी.
वर्ष: २००२.
पृ. ३१-३३


हे वाचले का?

शनिवार, १६ जुलै, २०१६

धंदा

सरदारजीनं चार आण्याचं नाणं दिलं. झिपर्‍याकडे पाच पैसे यावेळी असणं शक्य नव्हते आणि असते तरी त्यानं भवानीच्या वेळी ते काढले नसते. 'साब, पाच पैसा... छुटा नाय...', त्यानं आवाज केला. सरदारजीनं पुन्हा नुसती मान हालवून 'राहू दे' असं सुचवलं. आज झिपर्‍याचं तकदीर खरोखरंच जोरदार दिसत होतं. पहिल्याच माणसाने भवानी द्यावी आणि भवानीच्या गिर्‍हाईकानं पाच पैसे जादा सोडावे यापेक्षा अधिक मोठा असा शुभशकुन कोणता? झिपर्‍यानं ते नाणं ठोकळ्यावर ठोकलं, कपाळाला लावलं आणि खिशात ठेवलं.

झिपर्‍या

नंतर तर केवळ चमत्कारच घडला. सरदारजीचं संपण्याची जणू वाटच पाहत असल्याप्रमाणे शेजारच्या माणसानं आपण होऊन आपला बूट पुढे केला. आज झिपर्‍याचा धंदा बरकतीला येणार अशी स्पष्ट लक्षणं दिसंत होती. बाहेर पाऊस असो वा तुफान, असा चमत्कार कधी घडला नव्हता. झिपर्‍यानं त्या दुसर्‍याच्याही बुटाला मऊसूत घोळवून मोठ्या काळजीपूर्वक चमकावून काढलं आणि वीस पैसे खिशात टाकले. कुर्ल्याला गाडी पोचत असतानाच फलाटावरच्या गर्दीनं अंग चेचून निघण्याच्या आधीच झिपर्‍या सफाईनं खाली उतरला आणि धोपटी सावरीत कल्याण बाजूच्या पुलावर चढला. त्याची शोधक नजर इकडे तिकडे फिरत होती... पण त्याला फार काळ शोधावे लागले नाही.

कारण त्या ढगाखाली दडपून गेलेल्या दबल्या सकाळी तेवढ्या गर्दीतही पुलावरून ऐकू येणारे बासरीचे अस्वस्थ सूर कोठून येत होते बरे? त्या खिन्न वातावरणाला सुसंगत असे? एरवी झिपर्‍याला लहानग्या गंजूचं बासरी वाजवणं आवडायचं. आज मात्र हे सूर भलतेच जिव्हारी लागत होते आणि नकोसे वाटत होते. गंजूच्या धोपटीमधे कायम ही लाकडी बासरी असायची. काम नसेल, करमत नसेल, सोबतीला कुणी नसेल किंवा लत लागेल तेव्हा तो कुठल्याही स्टेशनाच्या खांबाला टेकून किंवा पुलाच्या कठड्याला रेलून त्या बासरीतून सूर काढीत रहायचा. गंजू दिसायला अगदीच लहानखोर, बोटं मात्र लांबसडक. त्याला बासरी वाजवणं कुणी शिकवलं नव्हतं. तोच आपण होऊन सिनेमातल्या धून ऐकून ऐकून शिकलेला. पण गंजू काही फक्त सिनेमाची गाणी वाजवायचा असं नव्हे. लहर लागेल तेव्हा तो वाटेल तशी बोटं फिरवायचा. त्यावेळचे सूर मात्र चटका लावणारे असायचे.

सुरांचा माग काढत झिपर्‍यानं गंजूला गाठलं आणि त्याच्या पाठीवर थाप टाकीत तो म्हणाला, 'ओय फोतर, कायको ये पिरपिर लगाई? जैसा कोई रो रहा हय-'

गंजू ओशाळं हसला आणि त्यानं झटकन आपली बासरी धोपटीत ठेवून दिली. तोवर खुळं हसत नार्‍याही हजर झाला होता आणि दाम्या पूर्वेच्या बाजूनं पूल चढून वर येत होता. जवळ येताच तो ओशाळं हसला आणि सुतकी आवाजात म्हणाला, 'उस्ताद, आज आपली खैर नाय-'

'अबे नय...' झिपर्‍या उसन्या उत्साहानं म्हणाला. एकुण वातावरण बघून त्याचेही हातपाय थंड झाले होते. 'अबे आपलं तं तकदीर उच्चीचं हाये आज. मूर्ताचे दोन गिरायकं. पाठोपाठ. विचारावंच लागलं नाय. आज आपुन धंदा करनार-'

'ओ उस्ताद, कायकू बात मारते-' त्याच्या उसन्याही उत्साहावर पाणी ओतत गंजू बोलला. 'कयसा धंदा बननार आज?'

एव्हाना भरून आलेलं आभाळ खाली ओथंबून आलं होतं. लोंबकळणारे काळे-कभिन्न जड ढग जमिनीवर टेकता की काय असं वाटत होतं. चारी बाजूंनी सन्नाटा दाटून आला होता. उजेड कमी झाला होता.

एकाएकी ढगांचा कडकडाट झाला. विजा चमकल्या. वारे वेगात वाहू लागले आणि मुसळधार पावसाची सर लागली. पाऊस आला ते बरं झालं असं वाटलं एवढा विलक्षण कडक तणाव हवेत आला होता. आता तो तणाव एकावर एक कोसळणार्‍या सरींमधे विरघळून जात होता. छपरावर, जमिनीवर, गाड्यांच्या टपावर वेगानं आदळणार्‍या पावसाच्या टपोर्‍या थेंबांचा एकच नाद रोंरावत होता, एकमेकांचं बोलणंही ऐकू येत नव्हतं. काही वेळानं वाराही वेडावाकडा वाहू लागला. पुलावर सुरक्षित जागी उभे असणार्‍यांनाही पावसाच्या तुषारांचे चारी बाजूंनी चाबकासारखे फटकारे बसू लागले. आता अंग वाचवण्यात काही अर्थ नव्हता. त्याच पुलावरून ते चौघेही कोसळत्या आभाळाकडे बघत नखाशिखांत भिजत उभे राहिले. गंजूचे उदास डोळे आणखी खोल गेल्यासारखे वाटू लागले आणि त्याच्या नकळत त्याचा हात आपल्या बासरीकडे गेला. पावसाकडे बघत तो उगाच सूर घोळवू लागला. त्या दणक्यात कोणाला ऐकूही येत नव्हतं.

तेवढ्यात डोक्याच्या केसापासून ते पायांच्या नखापर्यंत पाणी निथळत आहे अशा अवस्थेत पोंब्या आणि असलम आले. तशा अवस्थेतही असलम विडी फुंकत खू: खू: करत होता. पोंब्यानं मात्र आल्या आल्या हर्षभरानं आरोळी ठोकली, 'अहा ऽ ऽ ऽ हा हा ऽ ऽ'... हा .... हा ... आ ऽ ऽ ऽ ऽ हा... हा. हा ... क्या पानी हय, क्या बरसाद हय... अहाहाहा... क्या बादल हय, क्या बिजली हय...'

'और बोल, क्या बंबई हय-' असलमनं त्याची नक्कल करीत आरोळी ठोकली. 'क्या जमाना हय... क्या कमाना हय... वा: वा:'

तेवढ्यात पुन्हा एक वीज कडाडून गेली.

'देखो... देखो... क्या बिजली हय...' दाम्या ओरडला.

'अहाहा ऽ हा... मार डाला', असं ओरडून एक हात कमरेवर ठेवीत आणि एक हात नागासारखा डोलवत पोंब्या आनंदानं नाचू लागला. त्याचं सर्वांग निथळत होतं आणि तो हर्षयुक्त चीत्कार काढीत नाचत होता; ताल धरीत होता - 'हुई-हुई हय-हे... हुई-हुई-हय-हे-- हुई हुई-हा-हा...'

गंजूनं बासरी काढली नि तो तालावर सूर धरू लागला. पाऊस संपण्याची वाट बघत पुलावर उभी असलेली गर्दी हे बघून करमणूक करून घेत होती.

झिपर्‍याही मग त्यात सामील झाला. असलमला तर सिनेमातली हजार गाणी पाठ होती. तो हातवारे करीत गाऊ लागला:

ठैर जरा ओ जानेवाले
बाबू मिस्टर गोरे काले
कबसे बैठे आस लगाये
हम मतवाले पालिशवाले

पोंब्या तसा ठोंब्या होता. पण रंगात येऊन नाचू लागला की धमाल करतो. सिनेमातले नाचणारे त्याच्यापुढे झक मारतील. ब्रेक डान्स, भांगडा, कथ्थक, रॉक, तांडव... काय वाट्टेल तो नाचाचा प्रकार तो मोठ्या लीलेनं करीत असे. आता तर पावसाची नशा चढल्यासारखा हाय हुई करीत तो धमाल वार्‍यासारखा नाचत होता.

ते बघून दाम्याच्याही अंगात स्फुरण आलं. तो ओरडला 'अबे, गांडू... यहाँ क्या कर रह्या... चल नीचे खुले पानी में-' ते सर्व दडदडा जिने उतरून खाली आले. जिन्याखालच्या पानवाल्याच्या कनातीखाली त्यांनी आपल्या धोपट्या टाकल्या आणि आभाळ फाटल्यागत कोसळणार्‍या त्या पावसात उघड्यावर ते नाचू लागले. 'हुई...हुई... हुई... हा-' असा ताल धरत नार्‍या, झिपर्‍या, असलम, पोंब्या आणि दाम्या. गंजू वळचणीला उभा राहून बासरीचे सूर काढत होता. पोंब्या आणि असलम तर व्यावसायिक नर्तक असल्यासारखे मुक्त नाचत होते. पण सर्वात गंमत येत होती नार्‍याची. त्याला काही धड नाचता येत नव्हतं. तो आपले फदाफदा पाय हलवीत होता आणि खुळेपणानं वर हात हेलकावीत पाऊस अंगावर घेत आनंदानं हसत होता. लोकही त्याला हसत होते. मधून मधून तोंडात बोटं खुपसून तालासाठी शीळ घालत होते. वरून पाऊस बरसत होता आणि यांचं हे असं उघड्यावरचं हुंदडणं चालू होतं. काचा गच्चं बंद करून बसलेले ड्रायव्हर्स, रिक्षावाले, आजूबाजूचे दुकानदार आणि छत्र्या न आणल्यानं दुकानांच्या आणि पुलाच्या आडोशाला अडकलेले लोक हसत कौतुकानं या मुक्त पर्जन्यनृत्याकडे बघत होते. दुरून ओरडून दाद देत होते. काही शिट्याही वाजवत होते.

पाच-सहा मिनिटं असा तुफान गोंधळ घातल्यानंतर सारी मुलं थकून पुलाखालच्या आडोशाला आली. पावसाचे वेडेवाकडे सपकारे आता संपले होते. एका स्थिर गतीनं तो आता रिपरिपत कोसळत होता. सरीचा जोर कमी होईल या आशेपोटी दुकानांच्या वळचणींना उभे असलेले लोक कंटाळून आता बाहेर पडू लागले होते. डोक्यावर रुमाल किंवा वर्तमानपत्रांच्या घड्या, ब्रीफकेसेस धरीत धावत-भिजत स्टेशन गाठू लागले होते. रस्त्यांवर छत्र्यांचे ताटवे फुलले होते. फूटपाथच्या कडांना वेगानं पाणी वाढू लागलं होतं. काही ठिकाणी तर रस्त्यावर घोट्यापर्यंत पाणी आलं होतं. गच्च भरलेल्या बसेस फरारा आवाज करीत लाल पाणी आणि पावसाचे पडदे कापीत होत्या.

मुलं आता गप्प झाली होती. गंजूनं आपली बासरी धोपटीत ठेवून दिली.

अनिर्बंध कोसळणारा पाऊस बघून आलेल्या त्याच्या उधाणाला वाट मिळून गेली होती. आता जेव्हा पाऊस एका सुरात गंभीरपणे बरसू लागला तेव्हा सारी मुलं वळचणीला उभी राहून नुसतीच मिटीमिटी डोळ्यांनी पावसाच्या रेषांकडे बघत उभी राहिली. असलमनं त्याची विडी खिशातून काढली तेव्हा ती पूर्ण भिजून गेली होती. आता अशा या पावसात आपल्या बुटांना पॉलिश करून घेण्याचा वेडेपणा कोण करणार? वळचणीला ठेवलेले सदरे आणि धोपट्याही भिजल्या होत्या. मुलं आपापले शट पिळून काढू लागली. असलमनं पावसात उड्या मारत शेजारचं विडी-सिगारेटचं दुकान गाठलं. ओल्यागार पावसात धुराचा गरम झुरका छातीत जाऊन खळखळून खोकला आला तेव्हा कुठे त्याला बरं वाटलं.

पुलाखालच्या टी-स्टॉलचा मुच्छड मालक डोळे तांबारून या मुलांकडे मिस्किलपणे बघत होता. त्याने यांचा नाच आणि आरडाओरडा पाहिला होता. आत अंधारात स्टोव्हचा फर्रर्र असा आवाज येत होता. त्यावर चहाचं आधण उकळंत होतं. आपल्या मिशीवरून पालथं मनगट फिरवीत मालक उग्रपणे विचारता झाला, 'क्यंव बच्चे लोग, चाय पिओंगे?'

'नय साब, आज तो अभी भवानी बी होनेकी हय... ये बरसात में...'

सगळ्यांना उकळणार्‍या चहाचं आधण दिसत होतं. चहाचा गरम वाफाळ गंध नाकपुड्या सुखवीत होता. अशा बरसत्या ओल्या हवेत चहाला कोण नाही म्हणेल? मुच्छड डाफरला, 'अबे, हम पूछ रहे है, चाय पिओंगे क्या? भवानीकी बात कहाँ आयी? एऽ महादेव... सा गिलास चाय दे आधी हिकडं. जल्दी-'

मोठ्या कृतज्ञतेनं मुलांनी तो फुकटचा गरम गरम चहा पोटात रिचवला. जेव्हा चहा अगदी हवाहवासा वाटत होता आणि खिशात नवा पैसाही नव्हता तेव्हा अचानक तो असा मिळाला यापेक्षा दुसरा चमत्कार कोणता? काही न बोलता मुलांनी आपण होऊन वळचणीवरून धो-धो कोसळणार्‍या स्वच्छ पाण्यानं चहाचे पेले धुवून ठेवले.

चहावाल्याची दुनियादारी बघून असलमला तर भरून आलं. त्याच्या डोक्यावरून अजून पाणी निथळंत होतं. सदरा पूर्ण ओलाच होता आणि गारव्यानं तो थरथरत होता. त्यानं फटाफट चार शिंका दिल्या. एक कोरडी विडी पेटवून पुन्हा एकदा खळखळून खोकला काढला. घशात आलेला मोठा बेडका पावसात थुंकून टाकला आणि तो फिलॉसॉफी मारू लागला.

'देख पोंब्या, मयने कहा था नं? अरे दुनिया काय ऐसी-तैसी चीज नय. अबे, अल्लानं तुमाला पोट दिलं तर पोट भरायची सोय तोच करेल. मानूस उपाशी मरत नाय बघा. कुठून तरी पोटाची सोय होतेच. कोन ना कोन, कुटं तरी मदत करतोच, काय? अल्लाने चोच दिली तो वो दानाबी देताच हय. अब आज देखो, अपना धंदा कहाँ हुवा? आपुन तरी काय करनार. पन या पावसात च्या पाजनारा अल्लानं पाठवलाच की नाय? कुठून तरी येतंच अन्न पोटाला. त्यालाच फिकीर असते. आपुन काय मरनार नय. वो उपरसे सब देखता हय. गरीबोंके तरफ जादा देखता हय. क्यों उस्ताद? देखो, एक पिक्चर याद आया. अम्मीके साथ देखा था. क्या ना उस पिक्चरका? भूल गया. यही कुर्लामें देखा था. पुराना अंग्रेजी पिक्चर था. मगर उसमे डायलाग नहीं था. इतनी हसी आ रही थी, इतनी हसी आ रही थी की बस. अम्मी तो फूटफूटकर हसते हसते रोती थी. तो उस पिक्चर का हीरो था एक गरीब आदमी. उसका एक छोटा लडका. वो दोनो मिलके खाने का मिलाने के लिए अयसी धूम मचाते हय की पूछो मत... तो कहनेका मतलब...'

असलमच्या कथेत आणि तत्त्वज्ञानात कोणाला फारसा रस होता असं नाही. सगळे गप्प राहून ऐकत होते. पण त्यांची नजर होती रस्त्यावरच्या पावसाकडे. वर अंधारून आलेल्या आभाळाकडे. आकाशात करड्या ढगांचा जाड गालिचाच पसरला होता. त्यात कुठे फट दिसत नव्हती. पावसाचा जोर कमी होण्याची लक्षणं नव्हती. आणि जरी आज नंतर पाऊस थांबला तरी धंदा होणं शक्यच नव्हतं.

-oOo-

पुस्तकः 'झिपर्‍या'
लेखकः अरुण साधू
प्रकाशकः मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती तिसरी (जून २०१४)
पृ. ४२-४७.


हे वाचले का?

शनिवार, २ जुलै, २०१६

करड्या बछड्याचे जग

भर दुपारच्या प्रखर प्रकाशातून सरपटत गुहेत शिरणारी रानमांजरी बछड्याला दिसली. त्या क्षणी त्याच्या पाठीवरले सारे केस लाट उठल्याप्रमाणे पिंजारत उभे राहिले. समोर मूर्तिमंत भीती उभी आहे हे कळायला अंतःप्रेरणेची गरज नव्हती. आणि ते अपुरं वाटलंच तर दात विचकत तिचं फिस्कारणं आणि मग कर्कश आवाजात ओरडत किंचाळणं कोणाच्याही काळजाचं पाणी करायला पुरेसं होतं.

लांडगा

डिवचल्या गेलेल्या आत्मविश्वासाने करडा बछडा आईशेजारी उभा ठाकला, आवेशाने रानमांजरीवर भुंकला. पण त्याच्या प्रतिष्ठेची पर्वा न करता लांडगीने त्याला पाठी ढकललं. अरुंद, बुटक्या प्रवेशद्वारातून आत उडी घेणं रानमांजरीला शक्य नव्हतं. वेड्या रागाने ती सरपटत आत आली आणि लांडगीने झेप घेत तिला खाली चिरडलं. पुढे काय झालं ते बछड्याला नीट दिसलंही नाही. कर्णकर्कश भुंकण्याने, ओरडण्याने, आक्रोशाने गुहा भरून गेली. रानमांजरी तिच्या नखांनी, दातांनी बोचकारत, चावत होती तर लांडगी फक्त दातांनी प्रतिकार करत होती. एक भयंकर झटापट सुरू झाली होती.

एका क्षणी करडा छावाही झेपावला. रानमांजरीच्या मागच्या पायात त्याने दात रुतवले. हिंस्रपणे गुरुगुरतच तो तिच्या पायाला लटकला. त्याच्या वजनामुळे रानमांजरीच्या हालचालींचा वेग मंदावला. त्यामुळे आपली आई वाचली हे त्याला कळलंही नाही. बाजू बदलल्या. पण त्यामुळे तो त्या दोघींच्या वजनाखाली चिरडला. त्याची पकड सुटली. पुढल्याच क्षणी दोन्ही आया एकमेकांपासून दूर झाल्या. परत एकमेकाल भिडण्याआधी रानमांजरीच्या दणकट पंज्याचा फटका बछड्याच्या खांद्यावर बसला. हाडापर्यंत फाडत, मांसाच्या चिंध्या करत तिने बछड्याला गुहेच्या भिंतीवर भिरकावलं. त्या नंतरच्या गर्जनांत बछड्याच्या केविलवाण्या कर्कश किंकाळ्याही मिसळू लागल्या. पण ती झटापट एवढा वेळ चालली होती की रडणं आवरून परत एकदा शौर्याने झेपावण्याची संधी त्याला मिळाली. झटापट संपली तेव्हा परत एकदा रानमांजरीच्या मागल्या पायाला लटकत मिटल्या दातांतून तो हिंस्रपणे गुरगुरत होता.

रानमांजरी ठार झाली, पण लांडगी देखील खूप थकली होती. पहिल्यांदा तिने तिच्या बछड्याला कुरवाळलं, त्याचा जखमी खांदा चाटला. बरंच रक्त वाहून गेल्यामुळे अधिक काही करण्याएवढं त्राण तिच्यात उरलं नव्हतं. सारा दिवस आणि रात्र ती तिच्या वैर्‍याच्या प्रेताशेजारी न हलता पडून राहिली. पाणी प्यायला फक्त नदीवर जायची. तेव्हाही तिच्या हालचाली अगदी हळू व्हायच्या. वेदना तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसायची. परत बरं वाटेपर्यंत ते दोघं रानमांजरीचा फडशा पाडत होते. हळूहळू लांडगीच्या जखमा भरल्या. परत एकदा शिकारीसाठी ती बाहेर पडू लागली.

बछड्याचा खांदा अजून अवघडलेला होता. खांद्यावरल्या खोल जखमेमुळंए तो खूप दिवस लंगडत होता. पण आता जग बदललं होतं. आता त्याच्या मनातला कणखरपणा, त्याच्या चालीतील आत्मविश्वास स्पष्ट प्रकट होत होता. रानमांजरीबरोबरच्या लढतीआधी हा कणखरपणा त्याच्यात नव्हता. आता आयुष्याकडे अधिक हिंस्रपणे पाहण्याची ताकद त्याच्यात आली होती. तो लढला होता. वैर्‍याच्या मांसात त्याने दात रुतवले होते. आणि तो अजून जिवंत होता. आता त्याच्या प्रत्येक पावलात आव्हा होतं. त्या आव्हानाला उद्धटपणाचा पुसटसा रंगही होता. तरी अनेक रहस्यं, घाबरवणार्‍या अनाकलनीय घटनांची गुंतागुंत निर्माण करणार्‍या अज्ञाताचं त्याच्यावरलं दडपण जराही कमी झालं नव्हतं.

िकारीला निघालेल्या आईला सोबत करायला त्याने सुरुवात केली. ती सावज कसं पकडते, त्याला ठार कसं करते हे बघता बघता तो ही त्यात भाग घेऊ लागला आणि शिकारीच्या जगातला कायदा त्याला समजला. या जगात दोन प्रकारचे जीव असतात. काही त्याच्यासारखे आणि इतर 'बाकी सारे'. त्याच्यासारख्यांत तो स्वतः आणि त्याची आई होती. दुसर्‍या प्रकारात हलणारे, चालणारे इतर सारे प्राणी होते. या दुसर्‍या प्रकाराचंही त्याने वर्गीकरण केलं होतं. त्याच्यासारखे प्राणी शिकार करून ज्यांचं मांस खातात ते शाकाहारी किंव लहान लहान मांसाहारी प्राणी आणि दुसरे, त्याच्यासारख्यांची शिकार करून खाणारे किंवा त्याच्यासारख्यांकडून मारले जाणारे. आणि मग या वर्गीकरणातून कायदा निर्माण झाला. जीवनाचं उद्दिष्ट मांस होतं. जीवन म्हणजेच मांस होतं. जीवन जीवनावर जगत होतं. जगात खाणारे होते आणि खाद्य ठरणारे होते. कायदा होता 'खा किंवा खाद्य व्हा.' त्याने हा कायदा इतक्या स्पष्टपणे शब्दबद्ध केला नाही, त्याचे नियम अथवा तत्त्वे ठरवली नाहीत. त्याने त्या कायद्याचा विचारही केला नाही. त्या कायद्याचा विचारही न करता तो कायदा जगू लागला.

हा कायदा त्याचा चारही बाजूंना कार्यरत असलेला त्याला दिसत होता. त्याने रानकोंबडीची पिल्लं खाल्ली होती. ससाण्याने त्यांच्या आईलाही खाल्लं. ससाण्याने त्यालाही खाल्लं असतं. मोठं झाल्यावर त्याने ससाण्याला खायचा प्रयत्न केला होता. त्याने रानमांजरीचं पिल्लू खाल्लं होतं. स्वतः खाल्ली गेली नसती तर रानमांजरी त्याला खाणार होती. आणि हे असंच सतत चालू होतं. आजूबाजूला जगणारा प्रत्येक जीव जीवनाचा एक भाग होता. ठार मारणं हा त्याचा जीवनधर्म होता. मांस हेच त्याचं अन्न होतं. जिवंत मांस, वेगाने त्याच्या पुढे धावणारं किंवा हवेत उडणारं, कधी झाडावर चढणारं, नाहीतर जमिनीत दडणारं, काही वेळा सामोरं येऊन त्याच्याशी लढणारं, बाजी पलटून त्याच्या पाठी धावणारं.

करड्या बछड्याने माणसासारखा विचार केला असता तर 'वखवखलेली भूक' एवढाच आयुष्याचा सारांश त्याने काढला असता आणि अनेक प्रकारच्या भुकांनी व्यापलेली जागा म्हणजे जग, असं म्हटलं असतं. पाठलाग करणारी भूक आणि पळणारी भूक, शिकार करणारीम तशी सावज झालेली, खाणारी आणि खाद्य होणारी, आवेशपूर्ण आणि बेशिस्त, आंधळी आणि गोंधळलेली, वखवखून केलेल्या कत्तलीने अंदाधुंदी माजवणारी, दैवाधीन, निर्दय, अनियोजित, अविरत, कधीच न संपणारी भूक!

पण बछड्याचं डोकं माणसासारखं चालत नव्हतं. एवढा सारा गुंतागुंतीचा विचार करणं त्याला शक्य नव्हतं. एका वेळी एकच हेतू त्याच्या मनात यायचा. एका वेळी एकाच आसक्तीमागे धावणं त्याला कळत होतं. मांसाचा कायदा सोडला तर इतरही अगणित कायदे पाळणं त्याच्यासाठी आवश्यक होतं. त्यांच जग आश्चर्यांनी भरलेलं होतं. त्याचं उसळतं चैतन्य , त्याच्या शरीराचं झेपावणं हा एक आनंदानुभव होता. मांसामागे धावण्यात चित्तथरारक अनुभव होता. हर्षनिर्भर आत्मानंद होता. त्याचा राग आणि त्याच्या झटापटी त्या आनंदाचाच भाग होता. भीती आणि अद्भुत रहस्ये त्याचं आयुष्य घडवीत होती.

त्याच्या आयुष्यात सुख आणि समाधानही होतं. पोटभर मिळवणं, आळसावून उन्हात लोळणं अशा गोष्टी त्याच्या परिश्रमांचा, धडपडीचा मोबदला होता. खरंतर त्याचे परिश्रम, धडपड मोबदल्यासाठीच होती. त्याच्या आयुष्याचं कारणंच ते होतं. आणि कारणासाठी जगणं कुणालाही आनंदच देतं. त्यामुळे आजूबाजूला वैरभावाने भरलेल्या जगाबद्दल बछड्याची काडीएवढीही तक्रार नव्हती. अतिशय जिवंतपणे, स्वाभिमानाने आणि आनंदाने तो त्याचे जीवन जगत होता.

- oOo -

कादंबरी: 'लांडगा' ('व्हाईट फँग' या इंग्रजी कादंबरीचा अनुवाद)
लेखक/अनुवादक: जॅक लंडन/अनंत सामंत
प्रकाशकः मॅजेस्टिक प्रकाशन
आवृत्ती पहिली (१९९९)
पृ. ६७-७०.


हे वाचले का?

शुक्रवार, १ जुलै, २०१६

वेचित चाललो... कविता’वेचित चाललो’चे भावंड असलेला ’वेचित चाललो... कविता’ हा स्वतंत्र ब्लॉग आहे. ’वेचित चाललो’ वर ज्याप्रमाणे चित्रे, भाष्यचित्रे, छायाचित्रे, व्हिडिओज यांच्यासह गद्य वेचे संकलित केले आहेत, त्याच धर्तीवर तिथे फक्त कवितांचे संकलन केले आहे. 


परंतु हा ब्लॉग केवळ निमंत्रितांसाठीच खुला आहे. ज्या रसिकांना त्यावर प्रवेश हवा असेल त्यांनी आपले नाव, (आपला पूर्वपरिचय नसल्यास) अल्प परिचय व मुख्य म्हणजे ईमेल अड्रेस ramataram@gmail.com या इमेल अड्रेसवर पाठवून आपली विनंती नोंदवावी.

- oOo -


हे वाचले का?

पराभूत थोरवीच्या शोधात

(प्रस्तावनेतून...)

आपल्या सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक नेतृत्वाचा विचार करू जाता एक गोष्ट ठळकपणे जाणवते. या सगळ्या क्षेत्रात नेतृत्व फार लहान माणसांकडे आहे. त्यात पर्वतप्राय महत्तेचा माणूस कुणी दिसत नाही. आहेत त्या लहानलहान टेकड्या. त्यात पुन्हा घोटाळा असा आहे की, ह्या टेकड्यांनाही आपण हिमालय असल्याची स्वप्ने पडताना दिसतात. जुन्या काळातील डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड पद्धतीचे राजकारण मोठ्या प्रमाणावर खेळणार्‍या धुरंधरांना आपण स्वतः लोकमान्य आहोत असे वाटत असावे! पाचपन्नास गीते लिहिणार्‍यांना स्वतःला महाकवी म्हणून घेणे आवडते. चारसहा शब्द जुळवणार्‍यांना ज्ञानदेवांसारखे आपले कवित्व आहे असे वाटते. दोन संवाद लिहिणार्‍यांना आपण शेक्सपीयर किंवा बेकेट (रुचिप्रमाणे) आहोत असा सुखद भास होत असावा. एखाददुसर्‍या जिल्ह्यात थोडी संघटना बांधणार्‍यांना ह्या साठ कोटींच्या देशात आपण क्रांती घडवून आणित आहोत अशी स्वप्ने पडू लागतात. चार गावात चळवळ चालवणारांना या देशाचा जगन्नाथाचा रथ आपल्यामुळे पुढे चालला आहे असा भ्रम आहे. पंधराशे ओळींचा राजकीय लेख लिहिणारांना आपण प्रबोधनाचे उद्गाते आहोत - शक्य तर अखिल भारतीय - असा भास होतो आहे. सारांश, मोठेपणाच्या टेकड्या जागोजागी उभ्या राहिलेल्या आहेत…

उद्ध्वस्त धर्मशाळा

...त्याचा परिणाम म्हणजे विचाराचे दारिद्र्य. घोषणा नि धोपटशब्द (क्लिशे) ह्यात मराठी इतकी अडकून कधी पडली नव्हती. शब्द जड गोळे झाले आहेत. निव्वळ अर्थशून्य पाषाण. ते फक्त मोठ्यांच्या तोंडातून परिचित लयीत, परिचित लकबीत बाहेर पडत आहेत. असे वाटते की टाळ्यासुद्धा सवयीनेच परिचित लयीत, परिचित लकबीत वाजवल्या जात आहेत. आपमतलबी तत्त्वज्ञ हौतात्म्याचे पवाडे गात आहेत. स्वतःची तितकीच फसवणूक करून घेणारा एखादा कवि 'छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली. यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही' असे म्हणत न लाभलेल्या आनंदाचे उत्सव मांडित आहे.

अर्थात मोठेपण नाहीच असा याचा अर्थ नव्हे. परंतु ते बरेचसे (काही अपवाद वगळता) पराभूत मोठेपण आहे. कुठे चमक दिसलीच, कुठे खिळवून टाकणारा विचार दिसला, कुठे दूरवर कोपर्‍यात मुळे रुजलेली चळवळ दिसलीच तर ती बहुधा या पराभूतांमुळे आहे. ही मंडळी नवीन भविष्य निर्मू शकत नाहीत. परंतु आज ना उद्या नवीन भविष्य येईल एवढा आशावाद ही मंडळी जागा ठेवून आहेत. आजच्या यशस्वी लेखकांपेक्षा, राजकारणधुरंधरांपेक्षा, सामजिक प्रबोधनाच्या मिरासदारांपेक्षा बरेच मोठे ह्या मंडळींनी अनुभवलेले आहे. पराभूत असूनही, दुर्लक्षित असूनही.

या पराभूतांच्या जयजयकार करण्याचा माझा मनसुबा नाही. शेवटी पराभव हा पराभवच असतो. त्या पराभवाला अगदी तर्कसंगत स्पष्ट कारणे असतात. पराभवांपाठीमागे व्यक्तींची व त्या व्यक्ती ज्या सामाजिक शक्तींचे प्रातिनिधित्व करतात त्या शक्तींची कमजोरी असतेच. ती कमजोरी नाकारून जयजयकार करणे ही पुन्हा फसवणूकच. कारण अगदी साधे आहे. कमजोरांचे जयजयकार होत नसतात, होऊ नयेत. त्याने फक्त हळवेपणा येतो, दुसरे काही नाही! फक्त या प्रासादशिखरस्थ कावळ्यांच्या गर्दीत काही गरूड होते-आहेत ह्याचे भान ठेवावे…

...हॅना आरंट यांनी 'मेन इन डार्क टाईम्स' या पुस्तकात अशी कल्पना मांडली आहे की 'सामाजिक किंवा सांस्कृतिक जीवनात (असे वैचारिक ) झाकोळ मधून मधून येत असतात. या झाकोळाचे एक वैशिष्ट्य असे की नेत्र दिपवून टाकणारे मोठेपण कुठेच दिसत नाही. किंबहुना मोठ्यांचे क्षुद्रत्व फार चीड आणणारे असते. पण त्याचवेळी ह्या मोठेपणाच्या भाऊगर्दीत सरळसरळ सामना हरलेली काही पराभूत माणसे ठळकपणे दिसू लागतात. त्यांचे दुर्दैव असे असते की जरा थांबून पहात रहावे असे त्यांचे मोठेपण असते खरे, परंतु यशाच्या कल्पना बदलून टाकण्याची ताकद त्यांच्यात नसते. अवतीभवतीच्या कावळ्यांच्या गर्दीत हे उदास गरुड जबरा मोह घालतात ह्या शंका नाही…

ह्या झाकोळातली ही माणसे सारखी कुठल्या ना कुठल्या तरी कक्षेच्या शोधात असतात. बरेच वेळा अखेरपर्यंत त्यांना कक्षाच सापडत नाही. मौज अशी की त्यांना कक्षा सापडत नाही हे खरे पाहता त्यांच्या समाजाचेच अपयश असते. 'मिडिऑक्रिटिज्'चा ही एक जमाना असतो. त्या जमान्यात तीव्र संवेदनशीलता आणि द्रष्टेपणा यांचा बहुधा पराभव होत असतो. हे मी त्या पराभूतांचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणत नाही. ते होणे कदाचित अटळच असते. फक्त ह्या गरुडांच्या प्रकाशात बाकीच्या मिडिऑक्रिटिज् स्वच्छ नि स्पष्ट दिसायला लागतात हे महत्त्वाचे. 'खाली झेपावणे' हा दृष्टान्त ही मंडळी त्यांच्या आयुष्यात काही थोर परिवर्तन घडवून आणू शकली नाहीत हे समजावून देण्यापुरता उपयुक्त आहे. तथापि ज्या टकड्या हिमालयाचा दिमाख मिरवित असतात त्या टेकड्यांच्या तुलनेने हे 'खाली झेपावणे' तरीही आकाशगंगेच्या काठावरच असते. नंतर आलेल्या यशस्वी द्रष्ट्यांनी ह्या मधल्या पराभूतांची योग्य ती कदर करायची असते.

- oOo -

नाटक: 'उद्ध्वस्त धर्मशाळा'
लेखकः गो. पु. देशपांडे
प्रकाशकः पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती पहिली, पुनर्मुद्रण(१९९८)
पृ. ८-१०.


हे वाचले का?