सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

वेचताना... : परिव्राजक

गौतमीपुत्र कांबळे या लेखकाचे 'परिव्राजक' हे पुस्तक मला सुमारे दहा एक वर्षांपूर्वी मिळाले नि जीएप्रेमी असलेला मी त्याच्या प्रेमात पडलो. 

जीएंच्या पाउलखुणा जरी त्या लेखनात दिसत असल्या तरी त्यांनी घेतलेल्या वेगळ्या पार्श्वभूमीमुळे, जीएंप्रमाणेच त्यांच्या स्वतंत्र अशा भूमिकेमुळे, दृष्टिकोनामुळे यातील पाचही कथा वारंवार वाचत गेलो. वास्तवाचे नि कल्पिताचे सांधे जोडणार्‍या जीएंच्या दृष्टान्त कथांना वाट पुसतु जात असल्या, तरी सर्वच कथा वेगवेगळ्या असूनही एक सूत्र घेऊन येतात. निव्वळ विचारांबरोबरच तत्त्वज्ञानाचेही अधिष्ठान घेऊन उभ्या राहतात. 

परिव्राजक

जीए आणि कांबळे यांच्यात एक फरक मात्र दिसतो तो म्हणजे कांबळे यांच्या कथा एका निश्चित निरासावर पोचतात, जो बहुधा आशावादी आहे. अर्थात केवळ शेवट आशावादी असणे हे कथांचे श्रेय मी मानत नाही. हा फरक म्हणूनच नोंदवतो आहे.

सर्वच कथांमधे एक सूत्र असे दिसते की एक मुख्य गाभा पकडून साहित्य, संगीत, शिल्पकला यासंदर्भात तो तपासला जातो आहे. अर्थात उच्च कलामूल्य वगैरे हत्यारे घेऊन येणार्‍यांचा भ्रमनिरास होईल (तसा त्यांचा तो बहुधा होतोच, तेच बहुधा त्यांचे साध्य वा हेतूही असतो.) कारण हे तीनही केवळ संदर्भ म्हणून पाहायचे आहेत, त्यात नवनिर्मिती वगैरे शोधायची नाही. हे केवळ कथांच्या पार्श्वभूमीचे काम करत आहेत हे विसरता कामा नये. 

क्षुद्र परंपरांचा बडिवार, त्यांचे अर्थकारण, सत्ताकारण, सर्वसामान्यांची विचारविग्रहाप्रती असलेली उदासीनता, इतिहासाच्या ढिगार्‍याला विचारण्याचे नेमके प्रश्न सोडून केवळ कुतूहल शमवण्याची दिसणारी वृत्ती इ. गोष्टींना स्पर्श करत त्या कथा पुढे जात आहेत. परंतु दुर्दैवाने हे नेमके पकडून एका वेच्यात दाखवता येईल असा वेचा मला निवडणे शक्य झाले नाही हे आधीच कबूल करतो.

या पुस्तकातून मी तीन वेचे निवडले नि टाईप केले. कदाचित उरलेले दोन नंतर प्रकाशितही करेन. पण आज निवडलेला वेचा आहे तो बुद्धाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरचा. तो संवाद आहे. त्यात आक्षेप आहेत, प्रश्न आहेत नि त्यांची उत्तरे आहेत नि एक संभाव्य कारणमीमांसाही.

-oOo-

विशेष आभारः या पुस्तकाची माझी प्रत गहाळ झाल्यामुळे बेचैन असताना मित्रांना साद घातली नि अपेक्षेप्रमाणे एक मित्र पावला. हे पुस्तक मिळवून दिले याबद्दल 'शरद पाटील' या फेसबुकमित्राचेचे आभार.

---
या पुस्तकातील दोन वेचे:
राजपुत्र >>
नातं >>
---


हे वाचले का?

राजपुत्र

... अनीशाने थोड्या वेळाने डोळे उघडले तर समोरच ती भव्य मूर्ती आणि बाजूलाच शांत बसलेला नैसर. अनीशाच्या मनात एक प्रचंड खळबळ निर्माण झाली आणि ती म्हणाली,

'एक विचारू?'

'विचार.'

असे प्रत्युत्तर करून नैसर पुन्हा शांत. अनीशाही शांतच. बराच वेळ झाला तरी अनीशा काहीच बोलत नाही असे पाहून नैसर उगीचच अस्वस्थ झाला. आणि तरीही तो इतकंच शांतपणे पुन्हा म्हणाला,

'विचार, काहीही विचार.'

मग अनीशाने सगळी ताकद एकवटली आणि बोलायला सुरुवात केली.

परिव्राजक

"... या मूर्तीतील माणसाविषयी ... पूर्ण माणसाविषयी तू आता जी कथा सांगितलीस ती खोटी असली पाहिजे. म्हणजे असे बघ, त्याने आपले राज्यही सोडून दिले तेव्हा जर तो तरुण होता तर त्याचे माता-पिता म्हातारेच असणार की! मग त्याच दिवशी त्याने प्रथम एक म्हातारा पाहिला असे कसे म्हणता येईल? तसेच इतक्या दिवसांत त्याच्या राज्यात एकही मृत्यू झाला नसेल हेही संभवत नाही, किंवा एकही रोगी नसणे हे ही संभवत नाही किंवा एकही दरिद्री नसणे हे ही संभवत नाही. मग त्या एकाच दिवशी ही चारही दृश्ये प्रथमच पाहिली आणि म्हणून तो मानवाच्या या रूपाने इतका व्यथित झाला की त्याने सगळ्याचाच त्याग केला हे सारेच अतार्किक वाटते. आणि म्हणून तू सांगितलेली सगळी कथाच खोटी वाटते."

नैसरने एक क्षणभर अनीशाकडे पाहिले आणि म्हटले,

"खरोखरीच तू फार हुशार आहेस, खरोखरच तुझी शंका बरोबर आहे. पण सत्य हे केवळ तर्कानेच बांधून ठेवण्याइतकं दुबळं आणि मर्यादित असत नाही. मी तुला प्रथम सांगून टाकतो की मी सांगितलेली कथा खोटी नाही, ती खरीच आहे. हे बघ, तुला माहीत असेल की अलिकडेच सर्व जाणत्या जगाने जो एक नियम स्वीकारला तो एका चिंतकाला कसा सुचला? तर... तर त्याने एकदा एका झाडाचे एक फळ जमिनीवर खाली पडताना पाहिले, आणि पटकन त्याला शंका आली की ते फळ वर का गेले नाही, खालीच कसे आले? या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्याने जो सिद्धांत मांडला तो सर्व जगाने स्वीकारला. ... मात्र तेव्हा कोणी शंका घेतली नाही की, त्याने यापूर्वी झाडावरची फळे खाली पडताना पाहिली नव्हती का? का त्यापूर्वी सगळ्या झाडांची फळे आकाशात वर जात होती?"

नैसरच्या स्पष्टीकरणाने अनीशाचे समाधान झाल्यासारखे वाटले तरी तसे तिचे डोळे कबूल करेनात. तेव्हा नैसर म्हणाला,

"अनीशा, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. दिसतं खूप आपणाला, पण आपण ते सारेच पाहात नाही. अनेक म्हातारे, अनेक रोगी आणि अनेक प्रेतं, अनेक दरिद्री आज आपल्याला दिसतात. त्यापैकी आपण एकही पाहात नाही. आणि आपण यापैकी आजही जर म्हातारा / रोगी / प्रेत / दरिद्री पाहिला तर घर सोडून जाऊ."

नैसर दुसर्‍याच कोणत्या अपरिचित भाषेत बोलत आहे असे वाटून अनीशा फक्त त्याच्याकडे पाहात होती. नैसर आणखी खुलासा म्हणून सांगत होता.

"दिसणं आणि पाहाणं यात खूप अंतर आहे. एखादा म्हातारा पाहिल्यावर आपण तरुण आहोत याचा अभिमान शिल्लक राहणं म्हणजे त्या म्हातार्‍याच्या म्हातारपणाला न पाहणं होय. येथे तो म्हातारा फक्त आपणाला दिसला एवढाच त्याचा अर्थ. किंवा एखादा रोगी पाहिल्यावर आपण निरोगी आहोत याबद्दलचा गर्व शिल्लक राहात असेल तर तो रोगी फक्त दिसणंच म्हणता येईल, पाहाणं म्हणता येणार नाही. आणि एखादं प्रेत पाहूनही आपण जिवंत आहोत याबद्दलचा अहंकारच केवळ शिल्लक असेल तर ते प्रेतही दिसले असाच अर्थ होईल, पाहिले असे होणार नाही. आणि दरिद्री पाहून आपण धनवान असल्याचा आपणास गर्व होत असेल तर तो दरिद्रीही दिसला असा अर्थ होईल, पाहिला असा होणार नाही."

अनीशा मूक होती. ती नि:शब्द झाली. तिच्या अंगावर झर्रकन काटा उभा राहिला. दुसर्‍या रात्री* नैसरने सांगायला सुरुवात केली की,

"या राजपुत्राने राज्यत्याग केला त्याला आणखी एक कारण घडलं. ते कारणही तितकंच महत्त्वपूर्ण आहे."

नैसर सांगू लागला...

"तर राजपुत्राच्या राज्याच्या शेजारी आणखी एक राज्य होतं. या दोन्ही राज्यांच्या सीमा सतत वाहणार्‍या नदीने निश्चित केल्या होत्या. पण तरीही नदीला उन्हाळ्यात जरा पाणी कमी असे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या शेतीला पाणी देण्यावरून कधी कधी या दोन्ही राज्यात भांडणे होत.

एकदा उन्हाळ्याच्या दिवसात अशीच खूप भांडणे झाली. आणि शेजारच्या राजाने निर्णय घेतला की या समस्येचा कायमचा निकाल लावायचा. पण समस्येचा निकाल लावणे म्हणजे दुसर्‍या बाजूचा निकाल लावणे असाच अर्थ त्यांनी घेतला, आणि शस्त्रांनिशी तयार झाले. राजपुत्राच्या राज्यातही तीच भावना होती, किंबहुना दोन्हीही राज्यांची ही पाण्याची समस्या सोडविण्याची पद्धत एकच होती. आणि ती म्हणजे समस्येला धक्का न लावता दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना संपविण्यास सिद्ध झालेले... "

राजपुत्राला ही पद्धत मान्य नव्हती. तो आपल्या राज्यातील लोकांना, सैनिकांना पुन्हा पुन्हा समजावून सांगत होता की, ही पाण्याची समस्या सोडवण्याचा हा मार्ग नव्हे, यामुळे समस्या सुटणार नाही. उलट तिचे स्वरूप अधिक उग्र आणि जटिल बनेल. शस्त्राचा मार्ग बाजूला ठेवा. दोन्ही राज्यातील प्रमुखांनी एकत्र बसावे, चर्चा करावी. त्यातून दोघांनाही हितकारक मार्ग निघेल. तेव्हा सैनिकांचा प्रमुख हा प्रश्न लढूनच सुटू शकेल असं मानणारा होता. तो म्हणाला,

" हे बघ, तुला आमच्याबरोबर शस्त्र घेऊन लढलं पाहिजे. आता आम्ही सहन करणार नाही. मारू किंवा मरु."

"ते शक्य नाही. शस्त्राचा मार्ग मला पटत नाही."

'तो भित्रा, दुबळा आणि शस्त्र चालविता न येणारा होता काय?' अनीशाने मधेच विचारले. त्यावर नैसर पुढे सांगू लागला,

"नाही, तो निर्भय होता, सशक्त होता आणि विविध प्रकारच्या शस्त्रकलेत तो पारंगत होता. विशेषतः त्याचा विवाह ठरवण्याच्या वेळी त्याने दाखवलेले शस्त्रनैपुण्य श्रेष्ठ दर्जाचे होते."

"... तर सैनिकांचा प्रमुखही पुन्हा पुन्हा राजपुत्राला आपण लढलंच पाहिजे हे पटवून देत होता आणि राजपुत्रही आपली भूमिका सोडून द्यायला तयार नव्हता. "

मतभेद विकोपाला गेले आणि बैठक भरली. राजपुत्राला पुन्हा एकदा सर्वांनी सांगितले की,"

"तुला आमच्याबरोबर शस्त्र धारण केलं पाहिजे. आणि या समस्येच्या कायमस्वरूपी उपायासाठी तुला मारू किंवा मरू या जिद्दीने लढलंच पाहिजे."

त्या समूहाला उद्देशून मग राजपुत्र बोलला,

"मला तुमचा निर्णय अमान्य आहे, हे मी तुम्हाला पुन्हा एकदा निक्षून सांगतो. अरे, तुम्ही जरा डोळे उघडून पाहा तरी! मुळात प्रत्येक मनुष्य दु:खी आहे, शिवाय मृत्यू तर सर्वांनाच आहे. असे असूनही तुम्ही एकमेकांना नष्ट करण्यासाठी एकमेकांच्या विरुद्ध उभे राहू कसे शकता?"

यावर सैनिकांचा प्रमुख शेवटी रागानेच म्हणाला,

"तुला आमच्याबरोबर शस्त्र घेऊन लढण्यास सज्ज झालेच पाहिजे, नाही तर हे राज्य सोडून तुला जावे लागेल."

काही वेळ अत्यंत शांतता पसरली. कोणीच काही बोलत नव्हते. आता राजपुत्रापुढे सरळ सरळ दोन पर्याय होते. एक म्हणजे शस्त्र हातात घेणे आणि माणसांच्याच विरुद्ध लढणे आणि हे शक्य नसेल तर हे राज्य सोडून निघून जाणे.

राजपुत्राने राज्य सोडून जाण्याचा निर्णय घेतला. पत्नीशी विचारविनिमय केला आणि एकट्यानेच गृहत्यागाचा, राज्यत्यागाचा निर्णय घेतला. आणि त्याबरोबर हाही निर्णय घेतला की,

'अपुर्‍या पाण्यात मासे जसे तडफडतात त्याप्रमाणे माणसे दु:खात तडफडत असतानाही एकमेकांशी अगदी मृत्यूच्या दारातही वैर का करतात याचा शोध घेईन आणि त्यावर उपायही शोधीन.'

यावर अनीशा म्हणाली,

"अशाच एका राजाने आपले कर्तव्य म्हणून आपल्या पत्नीला एकटीलाच वनवासासाठी म्हणून अरण्यात सोडून दिल्याचे ऐकले होते. आता या तुझ्या राजपुत्राने आपल्या पत्नीला घरीच सोडले. आणि स्वतः अरण्यात निघून गेला. एकूण काय दोघांनीही आपापल्या पत्नींना सोडून दिले की!"

आज प्रथमच अनीशाच्या रूपाने स्त्री बोलत होती. नैसर शांतपणे म्हणाला,

"चुकतेस तू अनीशा. त्या दोघांची वरवर पाहता एकसारखी कृती वाटत असली तरी फरक आहेच. एक तर एक राजा राज्याच्या कर्तव्यापोटी पत्नीला अरण्यात सोडतो. आणि दुसरा एकूण मानवाच्या दु:खमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी राज्य सोडतो."

"... खरंतर राजपुत्रानं गृहत्याग केल्यानंतर खूप दिवस चिंतन केलं आणि माणसंच माणसांशी वैर करून दु:खी का बनतात याचे कारण शोधले. ते कारण नष्ट कसे करता येईल त्यासाठी निश्चित असा मार्ग शोधला. त्यानंतर असंख्य माणसं त्या मार्गानं चालू लागली. कोणत्याही राज्याच्या सीमा या मार्गाला अडवू नाही शकल्या. या मार्गाने चालणार्‍यांना कधीच नाही फुटले पाय, ना वासनेचे ना तृष्णेचे. म्हणूनच या राजपुत्राने सांगितलेल्या मार्गानं जाणार्‍या प्रत्येकालाच तो दोनच पाय असलेले पाहशील."

इच्छा होऊनही तिनं नैसरच्या डोळ्यात नाही पाहिलं. पण पुन्हा एकदा प्रचंड ताकदीनं तिनं विचारलं,

"मग मला सांग, तुझ्या राजपुत्रानं गृहत्याग करण्याचं खरं कारण कोणतं? ते पहिलं सांगितलंस ते की एक म्हातारा, रोगी, प्रेत आणि दरिद्री पाहिला म्हणून गृहत्याग केला की आता नंतर सांगितलंस ते की पाण्याच्या वादातून त्याला घर नि राज्यही सोडावं लागलं ते?"

नैसरने शांतपणे डोळे मिटले. एक सुस्कारा टाकला आणि हळूहळू डोळे उघडून त्या भव्य मूर्तीत स्वतःचे डोळे हरवून बसला. आणि अनीशाला उद्देशून म्हणाला,

"अनीशा, खरं सांगायचं तर त्या राजपुत्रानं घर आणि राज्य का सोडलं केवळ ते महत्त्वाचं नाहीच. महत्त्वाचं आहे ते घर सोडून त्यानं काय केलं ते. नाहीतर घर सोडणारे सगळेच... डोंगराच्या पोटात जिवंत दगड होऊन बसले असते, अगदी तू आणि मी सुद्धा!"

- oOo -

* क्षणी?

---

पुस्तकः 'परिव्राजक'
लेखकः गौतमीपुत्र कांबळे
प्रकाशकः सेक्युलर पब्लिकेशन
दुसरी आवृत्ती (२००९)
(पहिली आवृत्ती: एक्स्प्रेस पब्लिशिंग हाऊस,२००४)
पृ. ५७ - ६१.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : परिव्राजक >>
नातं>>
---


हे वाचले का?

रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

जबाब

पी. वाय. : ... कुळकर्णी, ह्याचा जबाब मात्र तुम्हाला द्यावा लागेल. बरीवाईट कशीही का होईना, एक इमारत आम्ही बांधत आणली आहे. तिला सुरुंग लावायला काही माणसं पेटून उठली आहेत. त्यांच्या बाजूला तुम्ही आहात का ह्याचा जबाब तुम्हाला देणं भाग आहे. खरा प्रश्न तो आहे. विचार करून उत्तरे द्या. या सगळ्या प्रकरणात आम्ही कुठं उभं राहायचं ते तुमच्या उत्तरावर अवलंबून आहे.

उद्ध्वस्त धर्मशाळा

तो: फार अवघड प्रश्न विचारलात पी. वाय. तुमची सगळी चौकशी याच दिशेने चालली आहे हे माझ्या कधीच लक्षात आलं होतं. पण पी. वाय., या प्रश्नाचं मी काय उत्तर देणार? मी मघाच तुम्हाला सांगितलं की आंधळ्या वायलन्सचा मी पुरस्कर्ता नाही. ते ही अर्धसत्य आहे. खरी गोष्ट अशी आहे की वायलन्सची मला भीतीच वाटते. मी रक्त अजून जवळून पाहिलेलंसुद्धा नाही... माणसाचं रक्त... ते सांडून शस्त्रांनी गनिमी युद्धाच्या मदतीनं इथं राजकीय उलथापालथ घडवून आणायची ह्याची कल्पनाही मी करू शकत नाही. हा मोठा देश आहे. ह्या सबंध देशाला कार्यप्रवण - कसलंही कार्य, हिंसक काय, अहिंसक काय... करायला फार थोर प्रतिभेचा माणूस पाहिजे. तो मी नव्हे हे मला पक्कं ठाऊक आहे…

बंदुका हाती घेऊनच क्रांती होऊ शकते हे म्हणायला, लोकांना सांगायला ठीक आहे... पण हे सांगणार्‍या माणसाला स्वतः हाती बंदूक घ्यावी लागते. ती घेतली नाही तर त्या सांगण्यावर कुणाचा विश्वास कसा बसणार?...

का तुम्हाला थिअरीचीच भीती आहे? पी. वाय., त्यात घाबरण्याजोगं काही नाही. थिअरी लिहिण्यात, तिची हुषार मांडणी करण्यात सगळा जन्म जातो! ह्या देशात जितके शब्दकामाठी सांपडतील तितके दुसरीकडे कुठे मिळायचे नाहीत. त्यांच्यापासून कसली भीती आहे? शब्दसुखी माणूस हा भित्रा असतो. तो इतरांनी क्रांती कशी करावी हे सांगेल. स्वतः काय करणार?...

हे ही नाटक थोडावेळ चालतं. मग या शब्दसुख्यांचं प्रचंड नैष्कर्म्य ध्यानात येतं. आणखी एक तत्त्वज्ञ इतिहासजमा होतो. पंचवीस लेख, एकदोन पुस्तकं आणि अगणित भाषणं ह्यापलिकडं त्याच्यापाशी दुसरं काही असंत नाही...

माझ्यापाशीही दुसरं काही नाही. किसानांना संघटित करायला मी कसा जाणार? त्यांची भाषासुद्धा मला समजत नाही. आम्ही या समाजात राहून परागंदा आहोत. परागंद्यांच्या हातून क्रांती होत नसते...

अशा परागंद्यांनी हाती शस्त्र घेऊन क्रांती करा असं सांगणं याला काही अर्थ नाही. इतरांचा तर सोडाच पण आमचाच आमच्यावर विश्वास नाही. पी. वाय., हे सगळं कबूल करण्याचा प्रामाणिकपणा माझ्यात आहे. मी कुणाला कशाला शस्त्र घ्यायला सांगीन्...पण असं सांगावसं वाटतं, अगदी जीव ओतून सांगावसं वाटतं - एक मोठा प्रलय घडावा आणि त्यात हे सगळं वाहून जावं असं वाटतं खरं. पर्वतप्राय आग लागावी आणि त्यात आजची व्यवस्था भस्मीभूत व्हावी असं वाटतं खरं. फार वेळा वाटतं…

तेव्हढं सांगायची, बोलायची माझी ताकद नाही. घोषणा मी ही करू शकेन. पण घोषणा म्हणजे विचार नव्हे. घोषणेला नुसता आवाज पुरतो... विचारांना आत्मबळ लागतं. ते माझ्यापाशी नाही…

आज आम्ही पराभूत असलोच तर ते त्यामुळं. मग काही नाही. संवयीपोटी चर्चा करतो. मान नेहमी वरती राहावी ह्यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही. ही व्यवस्था शत्रू आहे. त्या शत्रूशी कसं लढावं हे सांगता येत नाही. निदान त्या शत्रूच्या प्रलोभनांना बळी पडू नका एवढं सांगतो. मास्तर दुसरं काय सांगणार?...

[दमला आहे. ताण आता अगदी असह्य झाला आहे.]

पी. वाय., आश्चर्य याचं वाटतं की , इतक्या साध्या प्रपंचाची तुम्हाला भीती का वाटते? दहा माणसं ताठ उभं राहून मोडायला शिकतात ह्याची भीती का वाटते? पी. वाय. याचं उत्तर द्या.अगदी प्रामाणिकपणे सांगा. चार अभ्यास मंडळं, एखादं युनियन, एखादी संघटना, दहा-वीस ताठ माणसं यांची तुम्हाला भीती वाटते? पण का?

[जांभेकर आणि क्षीरसागर यांना काही बोलायचे आहे. पी.वाय. दोघांनाही परावृत्त करतात. परिस्थितीचे पुरते नियंत्रण आपल्या हातात आहे हे लक्षात येऊन-]

पी. वाय.: थांबा जांभेकर, तुम्ही नंतर बोला. गोंधळून गेला आहात. आणखी गोंधळात पडू नका.

[जांभेकरांना पी. वाय. च्या आत्मविश्वासाने झपाटून टाकले आहे.]

पी. वाय.: इतकं सगळं लख्ख बोललात आणि अखेरीस अगदी चुकीचा, बालिश प्रश्न विचारलात कुलकर्णी ! सगळं कबूल केलंत आणि ते करता करता एकदम गरीब होऊन गेलात! नाहीतर हा प्रश्न विचारला नसतात…

आम्ही भीत नाही... अजिबात नाही. जे तुम्हाला स्वच्छ कळलंय ते आम्हालाही कळलंय…

लढाई जिंकणाराला लढाई कळत नसते. ती कळणारे फक्त दोघं. एक लढाईत पोळणारा आणि दुसरा लढाईपासून पळणारा. श्रीधर विश्वनाथ, मी पळालेला आहे तो लढाई चांगली ठाऊक असल्यामुळे. वांझोटेपणानं जळून जायची माझी तयारी नव्हती, तुमची होती…

वांझोटं जळणार्‍यांची भीती इतकीच की त्यांच्यामुळं आमचं पलायन उघड होतं. पळून जाणार्‍यांना ते आवडंत नाही! तेव्हा ही भीती नव्हे. हा फक्त रुचीचा प्रश्न आहे. कळलं? आम्हाला असं नग्न करणार्‍यांनी त्याची किंमत द्यायलाच हवी... ती तुम्हाला द्यावी लागणार आहे…

मला वाईट वाटलं. श्रीधर विश्वनाथ, खरंच वाईट वाटतं कारण तुम्ही माझे मित्र आहात…

पण त्याचा इथे काय संबंध? तुमचीही सोय आम्ही करून ठेवली होती. तुमच्यासारख्यांची. 'त्याग', 'तळमळ', 'निरलस कार्य' हे शब्द तुमच्यासाठी राखून ठेवले होते. अट फक्त एक. काम करायचं. पायाला भेगा पडेपर्यंत चालायचं. फक्त लोकांना शत्रू कोण ते सांगायचं नाही. मग तुम्हाला बक्षिसं देण्याचं काम आम्ही केलं असतं. तुमची 'चिंतने' आम्ही पुस्तकरूपात छापली असती. 'सर्वेऽपि सुखिनः सन्तु' म्हणणारे थोर तत्त्वज्ञ केलं असतं. तुमच्या एकसष्टीला आणि पंचाहत्तरीला मी भाषणे केली असती. तुम्ही बोलला असता. तुमच्या शिष्यांनी तुमचे विचार शब्दांकित केले असते.

अट एकच. आम्ही शत्रू आहोत असं काही तोंडातून बाहेर पडू द्यायचं नाही.

- oOo -

नाटक: 'उद्ध्वस्त धर्मशाळा'
लेखकः गो. पु. देशपांडे
प्रकाशकः पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती पहिली, पुनर्मुद्रण (१९९८)
पृ. ५६ ते ५८.


हे वाचले का?