शनिवार, ६ एप्रिल, २०१९

लोकशाही आणि स्वातंत्र्य

महाराज: कोणी कुणाच्या यातना कमी करु शकत नाही. कुठे होतो आम्ही आणि काय करून ठेवलंय आमचं- लोकशाही म्हणे!

दिदी: लोकशाहीचा काय संबंध आहे तुमच्या यातनांशी पपा-

महाराज: सांगितलं ना तुला दिदी, अनेक गोष्टींचा आहे. परवांचीच गोष्ट घे. आपल्या नंदनवाडीतून असेंब्लीत कोण निवडून आलाय ठाऊक आहे तुला? बंडा सावंत! -हा नंदनवाडीचा प्रतिनिधी! हा बंडा सावंत!

दिदी: बंडा! -बंडा म्हणजे आपल्याकडे शिदबा सावंत होता त्याचा मुलगा?

महाराज: त्याचा मुलगा! शिदबा मोतद्दाराचा मुलगा- हा नंदनवाडीचा प्रतिनिधी!

दिदी: हुशार होता लहानपणापासून-

महाराज: म्हणून हा राज्यकर्ता? -नंदनवाडीचा प्रतिनिधी! काय वाईट केलं होतं आम्ही नंदनवाडीचं? मुलांना फुकट शिक्षण होतं, अन्नछत्रं होती, पाठशाळा होत्या, शिल्पशाळा होत्या- आमच्या आश्रयावर शिकून नंदनवाडीच्या मुलांनी चार ठिकाणी नाव मिळवलं होतं. गावात तालमी होत्या, आखाडे होते, --काय नव्हतं?

दिदी: स्वातंत्र्य नव्हतं पपा-

सुंदर मी होणार

महाराज: स्वातंत्र्य? कशासाठी हवं असतं स्वातंत्र्य? सगळ्या सुखसोयी मिळाव्यात म्हणूनच ना?

दिदी: म्हणून नाही पपा- स्वातंत्र्य--- केवळ स्वातंत्र्यासाठी हवं असतं.

महाराज: उगाच कवींच्या भाषेत बोलू नकोस.

दिदी: पण पपा, लोकांना जे हवं ते मिळालं. त्यांना राज्य करावंसं वाटतं ना, करू द्यावं त्यांना ते!

महाराज: आणि खड्ड्यात पडू द्यावं- काय चाललंय हे? लोकशाहीच आहे ना जगभर आता? मग कशाला ही युद्धं आणि लढाया? कशाला इतके पक्ष, उपपक्ष, निवडणुका, मारामार्‍या, दंगेधोपे?

दिदी: असा महापूर येतो पपा नेहमीच. गंगेला पूर येतो ना, तसा लोकगंगेलाही येतो- त्यात ताठर युद्धखोर उन्मळून जातील. आणि गरीब, दीन लव्हाळ्यासारखे वाटणारे शांतताप्रिय लोक हळूहळू वर येतील- आणि तांडवानंतर शांतर झालेल्या प्रलयंकर शिवशंकराला म्हणतील, ’शंभुनाथ, आता तुमचं शांत नटेश्वराचं स्वरूप दाखवा. मग मूर्तिकार मूर्ती घडवतील, गायक गातील, कवी काव्य लिहितील-

महाराज: काव्य! हं! फावल्या वेळात करमणूक म्हणून ठीक आहेत ह्या कविता!

दिदी: पपा- (सात्विक त्वेषाने) कुणी सांगितलं तुम्हाला हे? कविता ही फावल्या वेळांतली करमणूक? जी दृष्टी आल्यामुळे पांगळ्याला देखील विराट विश्वाचं दर्शन बसल्याजागी होतं, ती कविता म्हणजे फावल्या वेळातील करमणूक?

महाराज: डोंट गेट एक्सायटेड माय् चाईल्ड! --पण ज्या रस्त्यातून आम्ही आणि आमचे पूर्वज हत्तीवरून मिरवीत गेलो, तिथून बंडा सावंताची- एका मोतद्दाराच्या मुलाची मिरवणूक जावी?

दिदी: महान भाग्याचा आहे बंडा! हत्तीच्या मिरवणुकी भाडोत्री सरंजाम मिरवीत जायचे पपा... बंडाला लोक डोक्यावर घेऊन नाचले असतील. सुवासिनींनी त्याला ओवाळलं असेल. शाहिरांनी त्याचे पोवाडे गायले असतील. त्याच्या आईनं- शिदबा मोतद्दाराच्या सावित्रीनं बंडाला मीठ-मोहर्‍या ओवाळल्या असतील. योगेश्वराच्या पुजार्‍यानं नारळ देऊन आशीर्वाद दिला असेल...

महाराज: तुला कुणी सांगितलं हे दिदी? अगदी शब्दन् शब्द खरा आहे यातला.

दिदी: मला दिसलं सगळं-

महाराज: तू कधी गेली होतीस वाड्याबाहेर?

दिदी: वाड्याबाहेर कशाला जायला हवं? स्वतंत्र नंदनवाडीचा पहिला प्रतिनिधी, त्याचं कौतुक होणार नाही तर काय गावाबाहेर महारोग्यासारखं राहिलेल्या महाराजांचं आणि राजपुत्र-राजकन्यांचं?

- oOo -

(ता.क. : ’महारोग्यासारखं’ या उपमेमध्ये थोडी गफलत आहे. महारोग्यांना समाजाने नाकारलेले असते, तर इथे उलट संस्थानिक इतर समाजाला महारोग्यांसारखे दूर ठेवतात.)

---

पुस्तक: 'सुंदर मी होणार'
लेखक: पु. ल. देशपांडे
प्रकाशक: श्रीविद्या प्रकाशन
आवृत्ती आठवी (१९९५)
पृ. २२ ते २४

---
संबंधित लेखन:
वेचताना... : सुंदर मी होणार >>
---


हे वाचले का?