सोमवार, २२ मार्च, २०२१

'भारत - एक खोज' : छोट्या पडद्यावरचे कैलासलेणे

भारतीय माणूस भूतकालभोगी आहे. सर्जनशीलता आणि वैचारिकता या दोन्ही पातळ्यांवर असलेला आळस, आपापल्या गटाच्या सोयीनुसार सोयीचा इतिहास पाहण्याची सोय, आपला तो खरा नि ’त्यांचा’ तो खोटा अशी मखलाशी करण्याचा धूर्तपणा आणि मुख्य म्हणजे शालेय अभ्यासक्रमात असलेली पाठांतराची, केवळ विचारशून्य आत्मसात करण्याची सोय असलेला इतिहास हा विषय आपला लाडका असतो.

पण इतिहास म्हटले की आपण बव्हंशी राजकीय इतिहास अभ्यासत असतो. राजे-रजवाडे, लढाया, हार-जीत या घटनाप्रधान इतिहासाचे आपल्याला अधिक आकर्षण असते. त्यातून आपापले नेते नि झेंडे निवडून, इतरांना दुसर्‍या बाजूला ढकलून देत, वर्तमानातल्या सुरक्षित शाब्दिक लढाया खेळून, आपल्या भेकडपणाला भासमान शौर्याचे उपरणे घालायला लोकांना आवडते. यात इतिहासाची सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावहारिक बाजू बव्हंशी दुर्लक्षितच राहते.

नेहरूंच्या 'डिस्कवरी ऑफ इंडिया'वर आधारित 'भारत - एक खोज' ही मालिका बेनेगलांनी दूरदर्शनसाठी तयार केली. मुळातच अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तकाला बेनेगलांनी आणखी उंचावर नेऊन ठेवले. इतकी अभ्यासपूर्ण पटकथा पूर्वी कधी लिहिली गेली नसावी. केवळ मूळ पुस्तकावर अवलंबून न राहता, त्यातील कथावस्तूला अनुसरून भारतभरातील विविध कलापरंपरेतील कथानकांचा, संगीतप्रयोगांचा शोध घेत ही पटकथा साकार होते. कुठे सर्वसाधारण मालिकेप्रमाणे प्रत्यक्ष चित्रीकरण, कुठे कथकली सारख्या नृत्यपरंपरेचा, कुठे पंडवानीसारख्या कथनशैलीचा वापर करत कथानक मांडत जाताना, सर्व भारतातील परंपरांना कवेत घेत जाते.

इतक्या विचक्षणपणे, संशोधनपूर्वक नि कष्टाने सादर केलेल्या भारताच्या इतिहासाला द्यावी तितकी दाद थोडीच आहे. आज इतिहास म्हणजे केवळ राजकीय इतिहास असा समज रूढ होत असताना सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाची इतकी सुरेख सांगड घातलेली पहायला मिळणे दुर्मिळ आहे.

इथे शेअर केलेला भाग आहे भारतातील जमीनदारी व्यवस्थेवरचा. देश वा राष्ट्राची संकल्पना तेव्हा अस्तित्वात नव्हती. व्यवस्था औपचारिक नव्हती. शेतकरी, कारागीर हा सर्वात तळाचा वर्ग त्यात शेतकरी हा एकप्रकारे त्याच्या जमिनीला बांधलेला, भूदास! एक प्रकारचा वेठबिगारच. त्यांच्यावर छोटे जमीनदार, जमीनदार आणि अखेरीस या उतरंडीच्या टोकावर असलेला राजा अशी व्यवस्था होती. आपापल्या पातळीवर प्रत्येक नायक/शासक आपल्याला हवी तशी व्यवस्था बांधत असे. प्रत्येक टप्प्यावरील शासकांचे आपल्या वरील आणि खालील शासकांशी परस्पर-सहमतीने देवाण-घेवाणीच्या नियमांवर आधारलेले संबंध प्रस्थापित झालेले असत.

आजची लोकशाही व्यवस्था लग्न हा दोन सज्ञान व्यक्तींमधील करार आहे असे मानते. त्यासाठी त्या दोघांचा निर्णय पुरेसा असतो. पण या मूलभूत हक्काची त्या व्यवस्थेत काय स्थिती होती हे या भागात दिसते. 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया’तील निवेदन आणि मस्ती वेंकटेश अय्यंगार यांच्या ’चिन्नबसव नायक’ या कादंबरीतील काही भागाच्या आधारे याची मांडणी केली आहे.

नीट पाहिले तर मल्लिगे आणि सगुणाच्या कथानकात त्याकाळातील समाजात असलेली सत्तास्थाने दिसतात. प्रत्येक टप्प्यावर मल्लिगे एक पायरी चढून वरच्या अधिकार्‍याकडे गार्‍हाणे मांडताना दिसते. यात प्रथम दिवंगत हेगडे म्हणजे जमीनदार, त्याच्यानंतर त्याच्या अधिकाराचा वारसा मिरवणारी त्याची पत्नी, तिचे आदराचे स्थान असलेले स्वामी आणि अखेरीस तेथील नायक अथवा राजकीय सत्ता राखून असलेला शासक असे तीनही टप्पे अंतर्भूत होतात. अर्थ, धर्म नि राजकीय अशा तीनही सत्तांसमोर आपली मागणी रेटतच मल्लिगेला आपले ईप्सित साध्य करावे लागते. अशी सुदैवी मल्लिगे एखादीच, बहुतेक भूदासांना आपल्या मालकांच्या निर्णयासमोर मान तुकवावी लागते.

मालिकेचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे ऐतिहासिक राजे-रजवाड्यांचा इतिहास भरजरी करुन मांडण्याचा बाजारूपणा इथे टाळला आहे. या मालिकेसोबतच प्रसारित होत असलेल्या रामायण आणि त्यानंतर आलेल्या महाभारत या मालिकांशी तिची तुलना करता येईल. पोशाखीपणासोबतच त्या दोन मालिकांनी रुजवलेल्या आणि गेल्या एक-दोन दशकांत ऐतिहासिक, पौराणिक मालिकांत सुळसुळाट झालेल्या संस्कृतप्रचुर बोजड भाषेचा उसना वेष तिने पांघरलेला नाही. त्यामुळे इतिहासाच्या त्या भागाकडे अधिक स्पष्टपणे पाहता येते.

रोशन सेठ नेहरुंच्या भूमिकेत प्रास्ताविक नि उपसंहार करतात. त्यातून त्या त्या कथाभागाबाबत नेहरुंचे मूल्यमापन मांडले जाते. ओम पुरीसारख्या दमदार आवाजाच्या गुणी नटाचा आवाज निवेदनाची सुरेख पार्श्वभूमी देऊन जातो. भारतीय परंपरेतील अनेक गोष्टी नेहरूंच्या मूल्यमापनातून समोर येतात. आपल्या इतिहासाबाबत कृतज्ञ राहताना, त्यातील अभिमानाची स्थाने शोधतानाही, माणूस डोळस नि भानावर कसा राहू शकतो याचे एक दुर्मिळ उदाहरण समोर येते.

भारतातील गणव्यवस्था नि राजव्यवस्था, त्यांचे परस्परसंबंध, विरोध नि सहकार्य; वैदिक, बौद्ध नि जैन या तीन परंपरांचे साहचर्य नि संघर्षही; गुप्तांच्या सुवर्णकाळाबाबत बोलतानाही त्यावर असलेला कुषाणांचा प्रभाव नोंदवत जाणे; कलेचा विकास, राजकीय र्‍हासांची कारणे, संघर्षातून मिळवलेले शहाणपण आणि विजयातून गमावलेले बंधुभाव याबाबत नेहरूंसारख्या विचक्षण आणि बेनेगलांसारख्या डोळस माणसांच्या सहकार्यातून उभे राहिलेले हे लेणे. आपल्या सुदैवाने, प्रसारभारतीच्या कृपेने ही संपूर्ण मालिका यू-ट्यूबवर उपलब्ध आहे.

अधिक नोंदवण्याजोगे म्हणजे या अलौकिक महालाचे खांब असलेले कलाकार. मूळ संस्कृत ऋचांचे वसंत देव यांनी केलेले रसाळ अनुवाद नि वनराज भाटियांचे संगीत, अशोक पत्कींचे संगीत संयोजन, अजित कडकडे, रविंद्र साठे, चंद्रकांत काळे, कविता कृष्णमूर्ती यांचे गायन आणि सुमारे तीस वर्षांपूर्वीच्या तंत्राआधारेही नेत्रदीपक कामगिरी करणारे वी. के. मूर्ती यांचे छायाचित्रण. आजच्या माध्यमातील मालिकांचा सातत्याने होत चाललेला बाजारू अधःपात पाहता या दर्जाची मालिका भविष्यात तयार होणे अशक्यच दिसते.'ऐसा बालगंधर्व पुन्हा न होणे' च्या चालीवर 'ऐसी मालिका पुन्हा न होणे' असे म्हणावे लागेल.

अधिक पैसा नि विकसित तंत्रज्ञान यांच्या हातात हात घालून येणार्‍या विक्रीयोग्यतेला महत्व येते. यातून गुणवत्तेचा आग्रह अडगळीत पडत जातो. दारव्हेकरांच्या ’कट्यार काळजात घुसली’ या अलौकिक नाटकाचे भरजरी, बटबटीत आणि द्वेषमूलक प्रचारकी रूप त्याच नावाच्या मराठी चित्रपटात मांडले गेलेले आपण पाहिले. त्यामुळे आधुनिकतेतून गुणवत्तेचा उत्कर्ष नव्हे तर र्‍हासच होतो हे माझे मत, वेगवान तांत्रिक प्रगतीच्या गेल्या दोन-तीन दशकांत ’भारत एक खोज’च्या तोडीची एकही मालिका पाहण्यास न मिळाल्याने दृढ झाले आहे.

कौटुंबिक, गुन्हेगारी, विनोदी, पौराणिक आणि ऐतिहासिक या पाच विषयांपलिकडे भारतीय चॅनेल-मालिका फिरकत नाहीत. वैज्ञानिक विषयांवरची कोणतीही मालिका गेल्या तीस वर्षांत माझ्या पाहण्यात नाही. सायन्स फिक्शन मध्ये आपल्या ’एक त्राता दे रे बापा’ मानसिकतेला साजेशा ’शक्तिमान’चे नाव घ्यावे लागते यातच आपल्या मालिकांचा दर्जा ध्यानात यावा. नेटफ्लिक्स, अमेजन प्राईम, हुलू, व्हूट वगैरे ओटीटी सेवांनी इंग्रजी भाषिक कार्यक्रमांमध्ये जी कामगिरी केली ती हिंदी मालिकांना साधता आलेली नाही. त्यांचे विषय अजूनही विक्रियोग्य परिघातच पोहत आहेत. त्यातही तळापर्यंत बुडी मारण्याचे धाडस फारसे कुणी करताना दिसत नाही.

- oOo -

१. या भागात जरी भूदास्य अंतर्भूत असलेली जमीनदारी व्यवस्था समाविष्ट केलेली असली, तरी भारतात तीन प्रकारच्या जमीनदारी व्यवस्था दिसून येत असत. पं. नेहरुंनी त्यांच्या ’डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्येही त्यांचा उल्लेख केला आहे. उत्तर आणि मध्य भारतात एका प्रकारची, पूर्वेला बंगालमध्ये दुसर्‍या प्रकारची तर दक्षिणेत तिसर्‍या प्रकारची व्यवस्था होती असे वाचल्याचे स्मरते. सवडीने तो भाग शोधून त्यालाही ’वेचित...’ वर आणण्याचा प्रयत्न करेन.

२. युरप/अमेरिकेमध्ये निव्वळ ख्रिश्चन असणे ही ओळख नसते, कोणत्या चर्चचे हे सांगितल्यावरच ती पुरी होते. तसेच कर्नाटकात कोणत्या मठाचे वा स्वामींचे अनुयायी हे सांगावे लागते.

३. इंग्लंडच्या राजघराण्यातील व्यक्तिंना आपल्या लग्नसंबंधांना ’राणीच्या मंत्र्या’मार्फत संसदेची परवानगी घ्यावी लागते. ती नाकारलीही जाऊ शकते हे नुकतेच ’द क्राऊन’ या मालिकेतून समजले. हा एक प्रकारे उलट न्याय म्हणावा लागेल.

---

तळटीप: प्रसारभारती हे शासकीय मालकीचे माध्यम असल्याने, आणि ही मालिका नेहरुंचे नाव मिरवित असल्याने, नजीकच्या भविष्यकाळात ती गायब होण्याची शक्यता बरीच आहे. त्यामुळे त्यापूर्वी ती अवश्य पाहा, आणि शक्य झाल्यास डाउनलोड करुन ठेवा.


हे वाचले का?

गुरुवार, १८ मार्च, २०२१

परीकथा आणि वेदनेची वाट

१९व्या शतकाच्या सुरुवातीला लीमन फ्रॅंक बॉम नावाचा लहानसा पत्रकार शिकागोमध्ये काम करत होता. पत्रकारितेमध्ये येण्यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये नाट्यलेखक आणि निर्माता म्हणून बस्तान बसवण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता.

तरी अंगातली लेखकाची ऊर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. नीरस कंटाळवाण्या बातम्यांपेक्षा सर्जनशील लेखनाकडे त्याची ओढ होती. आपल्या चार मुलांना गोष्टी सांगताना तो रंगून जात असे. त्यातून त्याच्या कथेमध्ये एक काल्पनिक जग आकाराला येत होते. प्रत्येक कथनागणित त्यात नवे आकार नि रंग भरले जात होते. फ्रॅंकची पत्नी मॉड हिने हे सारे पुस्तकरूपात उतरवण्याचा तगादा लावला होता. पण फ्रॅंक ते फारसे मनावर घेत नव्हता.

अखेर एका निषादाने केलेल्या क्रौंचवधाने निर्माण झालेल्या करुणेतून रामायण-कथा अवतरावी तसेच काहीसे या पुस्तकाबाबतही घडले. चारही मुलेच असलेल्या मॉडला मुलीची आस होती. १८९८ मध्ये तिच्या भावाला, मुलगी झाली. मॉडला साहजिकच तिचा खूप लळा लागला. दुर्दैवाने मेंदूतील गुंतागुंतीमुळे ही भाची पाचच महिन्यात वारली. या घटनेचा मॉडच्या मनावर जोरदार आघात झाला. तिला बराच काळ मानसोपचाराला सामोरे जावे लागले.

तिच्या मनाला उभारी देण्यासाठी फ्रॅंकने आपली परीकथा अखेर कागदावर उतरवली. त्या परीकथेतील मुख्य पात्राला ’डोरोथी’ हे मॉडच्या भाचीचे नाव दिले. हे पुस्तकही त्याने आपल्या पत्नीलाच अर्पण केले. अमेरिकन पार्श्वभूमी असलेली ही पहिली परीकथा मानली जाते.

हे पुस्तक केवळ शाब्दिक कथा नव्हे तर चित्रकथा (Graphic Novel) म्हणून प्रसिद्ध झाले. फ्रॅंकच्या कथेला विल्यम डेन्स्लॉ याने चित्रकथेचे स्वरूप दिले होते.

फ्रॅंक आणि विल्यम या जोडगोळीने साकार केलेल्या ’द वंडरफुल विझर्ड ऑफ ओझ’ या पुस्तकाने इतिहास घडवला. वाचकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणार्‍या या कथेने दूरचित्रवाणी, संगीत, चित्रपट आणि नाटक या चारही क्षेत्रात मुसंडी मारली आहे.

OverTheRainbow
’ओव्हर द रेनबो’ गाताना ज्युडी गारलॅंड.

१९३९ च्या 'द विझर्ड ऑफ ओझ' या चित्रपटातील ‘Somewhere over the rainbow’ या गीताने गीत आणि संगीतासाठी Oscar पुरस्कार मिळवले. हेच गाणे पुढे १९८१ मध्ये 'ग्रॅमी हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट केले गेले. त्याशिवाय त्या चित्रपटातील आणखी काही सांगितिक तुकडे आणि प्रसंग यांचे संकलनही २००६ साली याच बहुमानासाठी निवडले गेले. दिग्गज दिग्दर्शक व्हिक्टर फ्लेमिंग आणि जॉर्ज ककर यांची नावे या चित्रपटाशी जोडली गेली आहेत.

’द विझर्ड ऑफ ओझ’चे रूपांतर असलेल्या टिन-मॅन (२००७) या लघु-मालिकेच्या रंगभूषेसाठी लिसा लव आणि रेबेका ली यांना Primetime Emmy पुरस्कार मिळाला आहे.

१९७४ मध्ये विल्यम ब्राऊन या लेखकाने समकालीन आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या संदर्भात फ्रॅंकच्या मूळ कथेची फेरमांडणी केली. चार्ली स्मॉल या गीत-संगीतकाराने The Wiz: The Super Soul Musical "Wonderful Wizard of Oz" या लांबलचक नावाने तिला संगीतिकेच्या रूपात रंगमंचावर आणले. १९७५ मध्ये रंगभूमी क्षेत्रातील ऑस्कर मानल्या जाणार्‍या Tony पुरस्कारांमध्ये तिने सर्वोत्कृष्ट संगीतिकेसह एकुण सात पुरस्कार पटकावून इतिहास घडवला.

अशा तर्‍हेने चारही क्षेत्रातील सर्वोच्च मानले जाणारे पुरस्कार पटकावून या कथामालिकेने ’EGOT’चा(१) दुर्मीळ मान मिळवला आहे.

या खेरीज बॉमच्या या कथामालिकेचा चाहता असलेल्या डेविड मॅक्झिन याने १९०३ मध्ये रंगभूमीवर आलेल्या ’द विझर्ड ऑफ ओझ’ या संगीतिकेवर आधारित दोन सीडीजचा संच संकलित केला होता. २०१६ साली विंटेज रेकॉर्डिंग विभागात या अल्बमला आणि डेविडला ग्रॅमी पुरस्काराचे मानांकन देण्यात आले होते.

ही कथा आणखी एका बाबतीत उल्लेखनीय ठरली. या कथानकामध्ये डोरोथी ही मुलगीच कथेची ’हीरो’ आहे हे स्वत:ला मानवी स्वातंत्र्याचे अग्रदल मानणार्‍या अमेरिकनांनाही रुचले नाही. १९०० साली हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्यावर बंदी घालण्याची जोरदार मागणी झाली. आणि अनेक राज्यात ती लादलीही गेली. १९२८ मध्ये अमेरिकेतील बहुतेक सार्वजनिक ग्रंथालयांनी ’देवाच्या व्यवस्थेशी प्रतारणा करणारे' हे पुस्तक आपल्या ग्रंथालयात ठेवण्यास नकार दिला. अगदी ५०च्या, ६०च्या दशकातही या पुस्तकाबाबत धर्मपंडितांचे नि सनातनी शिक्षकांचे धार्मिक भावनेचे बेंड ठसठसतच राहिले होते.

१९८६ मध्ये सात धर्मनिष्ठ ख्रिश्चन कुटुंबियांनी टेनेसीमधील शाळेवर दावा दाखल करुन हे पुस्तक अभ्यासक्रमातून रद्द करण्यास भाग पाडले. ’मानवी जीवन हे संपूर्णपणे देवाच्या अधीन असते’ या त्यांच्या धार्मिक समजाला यातील सहृदयी जादूगारिणींमुळे बाध येतो असा त्यांचा दावा होता. यातून मानवी स्वभाववैशिष्ट्ये ही भौतिक असतात, बदलता येतात असा सूर निघतो, आणि त्यातून सर्वशक्तिमान परमेश्वराच्या स्थानाला आव्हान दिले जाते असे त्यांचे म्हणणे होते. शेंडीपासून बेंबीपर्यंत ज्यांच्या धार्मिक भावना सतत दुखावत असतात अशा आपल्याकडच्या दिवट्यांचे हे भाऊबंद !

अमाप प्रसिद्धी मिळालेल्या या पुस्तकानंतर फ्रँकने ’लॅंड ऑफ ओझ’ मालिकेत एकुण चौदा पुस्तके लिहिली. पहिल्या पुस्तकाप्रमाणेच यातील काही पुस्तके चित्रपट, मालिका अथवा सांगितिकेच्या स्वरुपात साकार झाली. यापैकी 'ओझ्मा ऑफ ओझ' आणि 'द एमेराल्ड सिटी ऑफ ओझ' या दोन पुस्तकांवरुन लिहिलेल्या पटकथेवर ’द एमेराल्ड सिटी’ ही मालिका आधारित आहे. मूळ कथानकातील पात्रांचे रंग थोडेफार बदलून त्या परीकथेला व्यक्तीसंघर्षाचे नवे पैलू दिले आहेत. शिवाय विज्ञान आणि जादू यांच्यातील सुप्त संघर्षाचा एक धूसर धागाही त्यात मिसळून दिलेला आहे.

ही मालिका तिच्या पूर्वसुरींइतकी लोकप्रिय झाली नाही. परंतु तिच्या अखेरीस आलेल्या एका प्रसंगाने न्याय, निवाडा, सूड यांच्या संदर्भात एक वेगळा विचार समोर ठेवला. मालिकेच्या अखेरीस ओझ्माने विझर्डवर मिळवलेल्या विजयानंतर ती प्रासादाकडे येते त्यावेळचा हा प्रसंग आहे.

वेगवेगळ्या व्यक्तींमधील परस्पर संघर्षाच्या अखेरीस चार दिशांच्या जादूगारणींपैकी जिवंत राहिलेल्या दोघींनी ओझची परागंदा युवराज्ञी ओझ्मा हिला ओझची राणी म्हणून घोषित केले आहे. त्यावेळी विझर्डच्या बाजूने लढताना त्या युवराज्ञीच्या आई-वडिलांची हत्या करणारा, पण त्यावेळी अजूनही बालकच असलेल्या ओझ्माच्या डोळ्यात आपल्या मुलीला पाहून हत्या करण्यास न धजावलेला लायन आत्मसमर्पण करतो. आता राणीसमोर प्रश्न असतो तो त्याला शिक्षा सुनावण्याचा. ती ताबडतोब त्याच्या कुटुंबियांना हजर करण्याचा आदेश देते...

मानवी जीवनप्रवासाच्या सुरुवातीच्या काळात टोळ्यांच्या मानसिकतेमध्ये विरोधी टोळीतला कुणीही असला तरी ’पुरा तयाचा वंश खणावा’ अशी मानसिकता असे(२). तोच न्याय(?) होता. एका व्यक्तीला दुसर्‍या व्यक्तीबद्दल, एका टोळीला दुसर्‍या टोळीबद्दल भीतीची, अविश्वासाचीच भावना सर्वात प्रबळ असणारा तो काळ होता. स्वत:ला सुरक्षित राहायचे असेल तर इतरांना निखंदून काढले पाहिजे इतपतच बुद्धीचा विकास झालेला तो काळ होता. काहीही करुन प्रतिस्पर्धी टोळीचे बल खच्ची करावे, स्त्रिया नि बालके यांची सरसकट हत्या करावी, अन्यथा त्या स्त्रिया पुढे आणखी बालकांना जन्म देऊन प्रतिस्पर्ध्यांची संख्या नि बळ वाढवतील, ती बालके पुढे मोठी होऊन शस्त्रे परजून आपल्या टोळीला असलेला धोका आणखी वाढेल असा सोपा समज होता. आजही ही आदिम मानसिकता ’ते’ विरुद्ध ’आपण’ किंवा ’आम्ही’ या स्वरुपात अनेकांमध्ये दिसतेच.

पश्चिम दिशेची जादूगारीण असलेली ओझ्माची सहकारी- तिचे नावही वेस्ट असेच आहे - तिला तोच सल्ला देतेही. त्यानुसार ओझ्मा त्याच्या कुटुंबियांना हजर करण्याचा आदेश देते. त्यामुळे आता ओझ्माही त्याच्या कुटुंबियांसकट त्याला ठार मारणार यात कुणाच्या मनात शंकाच नसते. पण...

... ओझ्मा ही जादूगारीण आहे, सत्तेचे खेळ खेळणारी नृशंस सत्ताधारी नव्हे. पण ती जादूचा वापर करुन लायनच्या कुटुंबियांच्या स्मृतीकोषातून त्याची स्मृती पुसून टाकते, आणि त्याला परागंदा होण्याचा आदेश देते.

LionSurrenders
लायन शरणागती पत्करतो.

समोर उभे असलेले आपले कुटुंबिय आपल्याला ओळखतही नाहीत, आपले असे आता कुणी शिल्लक नाही ही वेदना तिने त्याला दिली आहे. आणि टोळीच्या मानसिकतेतून आपण बाहेर आल्याचे तिने दाखवून दिले आहे. तिने जरी त्या कुटुंबियांचा एक सदस्य त्यांच्याकडून काढून घेतला असला, तरी त्याचबरोबर ती गमावल्याची जाणीवही काढून घेतली आहे. त्यांना त्यांचे उरलेले आयुष्य जगताना कोणतीही जास्तीची वेदना तिने दिलेली नाही.

लायनला तिने दिलेल्या शिक्षेचा जाच हा फक्त त्यालाच होईल, त्याच्या सोबत इतर कुणी भरडले जाणार नाही याची काळजी घेतली आहे. आपले सारे बालपण कुटुंबाशिवाय, कुणाही ’आपल्या’ व्यक्तीच्या सोबतीशिवाय तिने काढले आहे. ते संदर्भहीन, जिव्हाळाहीन आयुष्य कदाचित मृत्यूहूनही वेदनादायी असेल हा तिचा होरा अनुभवातूनच आलेला आहे. त्याचा वापर करुन तिने शिक्षेची व्याप्ती फक्त गुन्हेगारापुरती ठेवताना त्याच्या कुटुंबियांना तिची यत्किंचितही झळ पोचणार नाही याची काळजी घेतली आहे.

न्याय आणि निवाडा या दोन कृतींमध्ये अनेकदा फरक दिसतो. राजेशाही, धर्मशाही, एकाधिकारशाही यांसारख्या लादलेल्या व्यवस्थांचे तर सोडाच, पण सर्वसामान्यांना किमान स्वातंत्र्य देऊ करणार्‍या लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थेकडून खरोखर न्याय मिळतोच असे नाही. त्याचे एक कारण म्हणजे न्याय ही संकल्पना आहे नि ती बरीचशी सापेक्ष आहे. याउलट निवाडा हा वस्तुनिष्ठ निकषांशी एकनिष्ठ राहिला, तर त्यातील सापेक्षतेचा परिणाम बराच कमी करता येतो. आणि म्हणून व्यवस्थांमध्ये न्यायव्यवस्था ही खरेतर निवाडा-व्यवस्था असते. त्यातून अनुकूल निवाडा मिळालेल्या बाजूलाही न्याय मिळाल्याची भावना होईलच असे नाही.

वेदनेतून उगम पावलेल्या कथेचा शेवट सूडात होऊच शकत नाही हे ओझ्माने (आणि फ्रॅंकनेही) ओळखले आहे. त्यामुळे ती लायनवर सूड घेत नाही, त्याच्या कृत्याची फक्त शिक्षा देते. हा फरक ज्याला जाणवतो त्याच्या संवेदना अजून जिवंत आहेत असे म्हणता येईल.

कुण्या जमातीतले लोक आपल्याला डोईजड होतील अशी निराधार भीती डोक्यात घेऊन, त्यातले दुबळे हेरून, झुंडीने घेरुन त्यांची हत्या करत आपले तथाकथित शौर्य साजरे करणार्‍यांची संख्या वाढत असताना, हे शहाणपण आसपास दिसणे दुर्मीळ झाले आहे. हजारो मैल दूर असलेल्या एखाद्या ठिकाणी ’त्यांच्या’ जमातीतील लहानगीवर बलात्कार करुन ’आपल्या’ लोकांनी तिची हत्या केली हे ऐकून कुत्सितपणे ’तिचं इवलसं गर्भाशय गेलं. खानेसुमारीची एक ओळ संपली.’ हे नेमाडेंच्या 'कोसला'मधील वाक्य भलत्याच संदर्भात उद्धृत करुन विकृत हास्य करणारेही इथे दिसतात.

शिक्षा आणि सूड यातील फरक ज्यांना उमगतो अशा वाचक/प्रेक्षकांना ओझ्माच्या निवाड्याचे महत्त्व कळेल. तुम्हा-आम्हाला तिच्याप्रमाणे कुणाच्या स्मृती पुसण्याची वा त्याच्या/तिच्या मनातील हिंसेचा डोंब विझवण्याची कला अवगत नाही. पण या निमित्ताने तिचा दृष्टिकोन आत्मसात करता आला तरी समाजपुरुषाच्या डोक्यावर फिरणार्‍या सूडचक्राची गती थोडी कमी करणे शक्य होईल.

- oOo –

(१) EGOT = एमी, ग्रामी, ऑस्कर आणि टोनी यांची आद्याक्षरे घेऊन केलेले संक्षिप्त रूप. त्यांची क्रमवारी अशी मांडली आहे की ई-गॉटचा उच्चार ही-गॉट (त्याने साध्य केले/मिळवले) या उच्चाराच्या जवळपास जातो आहे.

(२) इथे ’लॅरी गॉनिक’ या व्यंगचित्रकाराने त्याच्या मध्ययुगीन इतिहासाच्या पुस्तकात काढलेले एक चित्र आठवले, जे माझ्या मनात कायम कोरलेले आहे. त्यात मध्ययुगीन पती, पत्नी उभे आहेत. सामान्यपणे बोटावर कापल्याने वा लहानशी जखम झाल्याने माणूस प्रतिक्षिप्त क्रियेने बोट तोंडात घालतो तसे पत्नीने आपले एक बोट तोंडात धरले आहे. तिचा पती अतिशय तिला काळजीने विचारतो आहे, ’त्याला काय झाले? तुझे बोट कापले का?’ त्याचवेळी आसपास प्रतिस्पर्धी टोळ्यांच्या संहाराच्या खुणा विखरुन पडलेल्या दिसतात आणि त्या पतीने खांद्यावर घेतलेल्या भाल्याच्या टोकाला एक अर्भक ’टोचून’ ठेवले आहे. माणसाच्या मानसिकतेचे इतके मार्मिक विवेचन खंडीभर शब्दांनीही होऊ शकेल असे मला वाटत नाही.


हे वाचले का?

सोमवार, १५ मार्च, २०२१

इतिहासाचे अवजड ओझे ('Man in the iron mask' च्या निमित्ताने)

पारंपरिक शेती करणारा शेतकरी जमिनीचा पोत राखण्यासाठी आलटून-पालटून पिके घेत असतो. जमिनीतील रसद्रव्ये शोषून घेणारे खादाड पीक घेतल्यानंतर त्याचे पुनर्भरण करणारे दुसरे पीक घेतो. किंवा एक हंगाम तिला विश्रांती देण्यासाठी एखादे दुय्यम पीक घेतो.

ोक्याला भरपूर ताप देणारे, विचाराला चालना देणारे, प्रश्नांना व विश्लेषणाला जन्म देणारे पुस्तक वाचून झाल्यावर, चित्रपट वा मालिका पाहून झाल्यावर डोक्याला विश्रांती देण्यासाठी मी ही कार्टून पाहतो. कधीकधी ’आऽणि ते सुखाने नांऽदू लाऽगले’च्या समेवर संपणार आहे याची खात्री आहे अशी गुलगुलीत प्रेमकथा असलेले चित्रपट पाहतो. विपश्यना, ध्यान, स्तोत्रपठण या सर्वच प्रकारात जो काही काळ डोके बंद (आमच्या संगणकाच्या भाषेत सांगायचे तर फक्त रॅम(RAM) वापरायची प्रोसेसर नाही.) करण्याचा उद्देश असतो, तोच मी यातून साध्य करतो. पण हा नेहमीच यशस्वी होतो असे नाही.

करमणूक म्हणून वात्रट 'किंग ज्युलियन'च्या करामती पाहताना प्रत्येक एपिसोडमध्ये लेखकांनी आपल्या जगण्याच्या एकेका पैलूवर मार्मिक भाष्य केले आहे असे ध्यानात येते, संगणकपूर्व जमान्यातील डिस्ने चलच्चित्रपटात दिलेला ट्रॉली इफेक्ट किंवा लाईट सोर्स इफेक्ट दिसतो ('स्नोव्हाईट’ मध्ये घाबरलेला बुटका दार उघडून हळूच थरथरत्या हाताने कंदील आत सरकवतो तेव्हा दाराची सावली आणि त्याची स्वत:ची जमिनीवर पडलेली सावलीही तशीच थरथरते.) नि मग इतरत्रही असे तपशील शोधण्यासाठी आमचा डोक्यातला प्रोसेसर पुन्हा चालू होतो नि सगळं मुसळ केरात जातं.

’डार्क’ या कालप्रवासावरील एका अत्यंत गुंतागुंतीच्या मालिकेचा अखेरचा सीझन पाहण्याची पूर्वतयारी म्हणून मेंदूचे ’क्युरेटिंग’ करत होतो. ’सीरिज म्हणून बकवास आहे' हे आधीच समजल्याने 'आपले डोके चालू होणार नाही.’ असा विचार करुन छान जुन्या लोकांची गोष्ट-बिष्ट सांगणारी 'व्हर्साय' ही नेटफ्लिक्स वरील मालिका बघितली. नेहमीप्रमाणे आमची गाडी घसरली आणि त्यातील ’मॅन इन द आयर्न मास्क’ या उपकथानकात अडकून पडली.

चौदाव्या लुईने एका माणसाला सुमारे सदतीस वर्षे तुरुंगवासात ठेवले होते. त्याचा चेहरा कायम(?) लोखंडी पिंजर्‍याने जखडलेला होता. या गूढ मुखवट्याआडच्या चेहर्‍याचा वेध अनेकांनी घेतला आहे. ही व्यक्ती कोण हे अखेरपर्यंत गुलदस्त्यात राहिले. पण या रहस्याला अनेक फाटे फुटले.

वोल्तेअर, अलेक्झांडर दुमास यांच्यासारखा तत्त्वज्ञ आणि लेखकांनी यात उडी घेतली. या दंतकथेमध्ये कुठतरी व्हॅटिकनचा संबंधही सांगितला जातो. त्यामुळे याबाबतचे रोममधे प्रचलित असलेले समज, हॉलंड-नेदरलॅंडसमध्ये प्रचलित असलेल्या वदंता, फ्रान्समध्ये चौदाव्या लुईला ’लुई द ग्रेट’ मानणार्‍यांमध्ये असलेला समज आणि त्याला ’टायरन्ट’ म्हणजे क्रूरकर्मा समजणार्‍या गटामध्ये सांगितली जाणारी कथा... अशी अनेक प्रतिबिंबे दिसून येतात. या सार्‍याचा सांगोपांग वेध घेणार्‍या दोन लेखांचे दुवे खाली दिले आहेत.

पण हल्ली वाचण्यापेक्षा ’पाहणे’ अधिक पसंत केले जात असल्याने अभ्यासकही त्यांच्या शब्दांना दृश्य माध्यमात घेऊन जात आहेत. तर हौशी मंडळीही 'तरुभवताली तणकट' रुजवण्याचा आपला हक्क बजावत आहेत. त्यामुळे ’Real man behind the iron mask’, ’Who was the man behind the iron mask’ असे प्रश्न देऊन शोध घेतला तर यू-ट्युबवर अनेक व्हिडिओ सापडतील. (दुर्दैवाने ज्या 'व्हर्साय’मध्ये मी हा उल्लेख नि त्यासंबंधीच्या घटना व विवेचन पाहिले त्यातील प्रसंगांचा व्हिडिओ मात्र सापडला नाही.)

या ’मॅन इन द आयर्न मास्क’बाबत पाहिले, तर व्हॅटिकन आणि हॉलंड, ऑस्ट्रियाच्या राज्यकर्त्यांनी धूसरतेवर आपल्या स्वार्थाचा रंग चढवून प्रसारित केलेल्या आवृत्त्या प्रसिद्ध आहेत. वास्तवाच्या जवळ जाऊन अनुभवसिद्ध असल्याचा दावा केलेली, पण तरीही परमुखे ऐकलेलीच अशी वोल्तेअरची एक आवृत्ती आहे. लेखकाचे स्वातंत्र्य अंतर्भूत असलेली अलेक्झांडर दुमासची आवृत्ती, पुढे याच नावाच्या चित्रपटातून दिसलेली अन्य एक ललित आवृत्ती, या पलिकडे तपशीलांचे फरक दाखवणार्‍या कदाचित असंख्य मौखिक आवृत्त्या... कोणती खरी, नि कोणती खोटी याचा निवाडा वस्तुनिष्ठपणे करणे अशक्यच. विचाराने आळशी असलेले लोक, स्वार्थानुकूल किंवा ’खरी असावी असे वाटते’ म्हणून आहेच असे मानून पुढे जातात.

अशा एखाद-दुसर्‍या कथा/घटना यांबाबतच हे खरे असते असे नाही. एकुणच इतिहास हा रुजवलेलाच असतो. लिखित इतिहास हा एका बाजूने जेत्यांनी लिहिलेला असतो, त्यामुळे त्यांना धार्जिणा असतो असा एक समज आहेच. पण दुसरीकडे इतिहासाच्या धर्म, वंश, देश, विभागीय अशा आवृत्त्या असतात. त्यांचा परस्परांना छेद जात असतो. अमका इतिहास खरा आणि तमका इतिहास खोटा हे आपापल्या गटानुसार लोक ठरवत असतात.

बहुजन समाजात प्रचलित असलेला, ब्राह्मणांना गैरसोयीचा मौखिक इतिहास खोटा आहे असे ब्राह्मण समजत असतात. त्यांच्याकडे लिखित माध्यमांतून त्यांच्याच पूर्वजांनी लिहिलेला, त्यांच्या जमातीला सोयीचा इतिहास हाच खरा, असे त्यांचे गृहितक असते. उलट दिशेने आता कोणत्याही अभ्यासाशिवाय, केवळ ब्राह्मणी इतिहास खोडून काढण्यासाठी घरबसल्या लिहून काढलेला इतिहास ’खरा इतिहास’ आहे असे ’मानणारे’ अब्राह्मणी समाजात भरपूर सापडतात.

इस्लामचा मूळ पुरुष इस्माईल हा अब्राहमचा अनौरस पुत्र असल्याची कथा ’खरा इतिहास’ मानून ख्रिस्ती नि ज्यू मंडळी त्या धर्माचे दुय्यमत्व- आणि पर्यायाने आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व, सिद्ध होते असे मानतात. इतिहासातील सोयीचा काळ निवडून अमक्या देशातील तमका भूभाग हा आमचाच आहे असा दावा करत एखाद्या देशातील राज्यकर्ते त्यावर बळाने वा अन्य मार्गाने ताबा मिळवू पाहतात.

सोयीनुसार ऐतिहासिक पात्रांचे हीरो होतात, सैतान होतात; लेखणीच्या फटकार्‍यासरशी अपयशाच्या कथा देदिप्यमान विजयात रूपांतरित करुन रुजवल्या जातात. तुम्हाला आजवर शिकवलेला इतिहास खोटा आहे असे म्हणत नवे राज्यकर्ते, नव्याने बळ मिळालेले समाजघटक आपल्या सोयीचा नवा इतिहास ’खरा’ म्हणून शिकवू लागतात. या उलथापालथीमध्ये अतिशय सातत्य आहे.

वाईट इतकेच की एखादा देश त्या इतिहासाच्या कर्दमात रुतून बसतो. वर्तमान आणि भविष्याची उपेक्षा करून आपल्या यशाच्या कहाण्या इतिहासात शोधतो. त्यातल्या खर्‍या खोट्या मुद्द्यांवर त्या देशातील लोक एकमेकांची डोकी फोडतात. आमच्या नेत्याला चार पदव्या लावण्याऐवजी तीनच पदव्या लावून तुम्ही आमच्या समाजाचा अपमान केला आहे म्हणून गल्लीतल्या टिनपाट ब्रिगेड, संघटना, सेना यांचा सडकछाप नेता तावातावाने एखाद्या अभ्यासू लेखकाला शिव्या घालतो, त्याच्या लेखनावर बंदी घालण्याची मागणी करतो.

लेखकाला दोन मिनिटाचे फुटेज न देणारी चॅनेल्स नि वृत्तपत्रे या सडकछाप नेत्याची वक्तव्ये पुन्हा पुन्हा दाखवून या निमित्ताने समाजात कलागत लावून पुढच्या काही दिवसांची टीआरपीची बेगमी करु पाहतात.

भूतकालभोगी, आळशी, निर्मितीक्षमतेला शून्य किंमत देणार्‍या समाजाचे हे चित्र आहे.

इतिहास-कथेतले कोणते वास्तव नि कोणते भासमान या प्रश्नाचे उत्तर बहुतेक माणसे आपापल्या पूर्वग्रहांनुसारच शोधत असतात. पण ते तसे आहे हे बहुतेकांना मान्यच नसते. कारण एक काहीतरी बरोबर असते नि बाकी सारे चूक; त्यातही आपल्या गटाला सोयीचे ते बरोबर नि गैरसोयीचे ते चूक, अशी त्यांची पक्की खात्री असते. थोडक्यात पर्यायांपैकी एकाच बाजूला ते उभे असल्याने त्यांना त्याच्याकडे तटस्थपणे पाहाणे शक्य होत नसते.

इतिहास हा केवळ दृष्टीकोन असतो. अगदी अभ्यासकाने अभ्याससिद्ध म्हटलेला इतिहासातही त्याच्या स्वत:च्या दृष्टिकोनांचे, निवडलेल्या चौकटींचे, तो ज्या समाजगटाचे प्रातिनिधित्व करतो त्या गटाच्या हिताचे रंग मिसळलेले असतातच. पण ज्यात त्यांचा स्वार्थ कुठेही गुंतलेला नाही, असे वरील उदाहरणाप्रमाणे एखादे तटस्थ प्रकरण समोर ठेवले, तर इतिहासाची एकच आवृत्ती तंतोतंत खरी मानणे हा किती मूर्खपणा आहे हे कदाचित समजू शकेल.

इतिहास हा खरा किंवा खोटा नसतोच. तो फक्त सोयीचा वा गैरसोयीचा असतो इतकेच! इतिहासातून प्रेरणा वगैरे मिळते हे बनेल दावे आहेत; त्याभोवती आपल्या स्वार्थाचे उत्सव, मतपेटीची गणिते जमवू पाहणार्‍यांनी रुजवलेले. अक्षरश: अगणित पुतळे नि स्मारके उभारणे, ’खरा इतिहास कुठला नि खोटा कुठला’ प्रकारच्या वांझोट्या लढाया गल्लीबोळातल्या अर्ध्या चड्डीतल्या पोराटोरांनी लढवत जातीय नि धार्मिक अस्मितांच्या कर्णकटू पिपाण्या वाजवणे एवढेच साधले आहे. यापलिकडे इतिहासाने या देशात काहीही निर्माण केलेले नाही.

त्यामुळे आपल्या भूतकालभोगी देशाला इतिहासाच्या चिखलातून बाहेर काढून, आपल्या पुढच्या पिढीला रचनात्मक, निर्मितीक्षम कामाकडे वळवायचे असेल, तर शालेय अभ्यासक्रमातून इतिहास हा विषय वगळला पाहिजे. मुले सज्ञान झाल्यावर, विचाराची किमान पातळी विकसित झाल्यावर, महाविद्यालयातच इतिहासाचे शिक्षण दिले, तर शालेय जीवनात मेंदूत इतिहासज्वर चढून बसल्याने वास्तविक जगाला त्या दूषित दृष्टीने पाहू लागलेल्या मुलांचा बुद्धिभ्रंश काही प्रमाणात तरी कमी होईल. आणि इतिहासाचे अवजड ओझे वागवत चिणून पडलेली तरुणांची क्रिएटिव्हिटी, निर्मितीक्षमता जरा मोकळा श्वास घेऊन भविष्याचा वेध घेऊ शकेल.

एकेकाळी मार्क्सवादाचा प्रभाव असलेले पं. नेहरु पुढे त्यावर साधकबाधक विचार करत, त्याची बलस्थाने, त्यातील न्यूने यांवर बोट ठेवत तो पूर्णांशाने स्वीकारता येणार नाही या निष्कर्षावर आले.त्यासंबंधीचे एक विवेचन इथे वेचित चाललो वरच वाचता येईल.

इतिहासाचा वस्तुनिष्ठ आणि स्व-ला बाजूला ठेवून केलेला अभ्यास याच धर्तीवर असायला हवा. ज्या पृथ्वीवर तुम्ही उभे आहात तिचा आकार तुम्हाला पुरा दिसू शकत नाही. मग पायाखालच्या जमिनीला पृथ्वीचे प्रातिनिधिक रूप समजून तुम्ही पृथ्वी सपाट आहे असे समजू लागता. अंतराळात गेलात तर तिचा आकार तुम्हाला पूर्णपणे दिसू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला जमिनीचा आधार सोडावा लागतो. आर्किमीडिज ’मला पृथ्वीबाहेर उभे राहण्यास जागा द्या. मी पृथ्वी उचलून दाखवतो.’ म्हणाला, त्याचा मथितार्थ हा आहे.

अशा अभ्यासातून, अधिक पुराव्यांनी आपले दैवत वा प्रेयस दुय्यम ठरले तर ते मान्य करण्यातका मनाचा खुलेपणा त्या अभ्यासात राहू शकला पाहिजे. तरच त्याला अर्थ राहतो. अन्यथा इतिहासही आपल्या गटाला रुचणारी परीकथा म्हणूनच शिल्लक राहतो.

-oOo-

1. Versailles: What is the true story of the Man in the Iron Mask?
2. Who Was the Real Man in the Iron Mask? (National Geographic)
3. सदर दंतकथेचा(?) वेध घेणारा एक माहितीपट:


हे वाचले का?

गुरुवार, ११ मार्च, २०२१

छान छोटे वाईट्टं मोठे

स्वत:ची राष्ट्रभक्ती सिद्ध करण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग म्हणजे इतर कुणावर तरी राष्ट्रद्रोहाचा आरोप करणे.
- (Moronous ग्रहावरील एक प्राचीन म्हण )

अलीकडच्या काही वर्षांत या म्हणीचा प्रत्यय अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांपासून भारतापर्यंत अनेक देशांत प्रकर्षाने येऊ लागला आहे. राष्ट्रभक्तीच्या एका सकारात्मक भावनेला गल्ली-नाक्यावर विकल्या जाणार्‍या गजर्‍याचे स्वरूप आले आहे. जिला हवा तिने घ्यावा नि केसांत माळून मिरवावा

गजरा विकत घेण्यासाठी निदान चार पैसे खर्च करावे लागतात. पण देशभक्ती त्याहून स्वस्त क्रयवस्तू होऊन बसली आहे. यात पैसे खर्च न करता फक्त चार शब्द खर्च करुन भागते. आणि ते शब्द पानाच्या पिंकेसारखे एखाद्यावर थुंकून त्या मलीनतेकडे बोट दाखवून ’हा बघा राष्ट्रद्रोह’ म्हटले, की आपण आपोआप राष्ट्रभक्त होऊन देश नावाच्या मॉलमधील privileged customer होऊन बसतो... असा बहुतेकांचा समज असतो.

स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेमुळे जिंकण्याची ईर्षा निर्माण व्हावी, त्यातून इतर स्पर्धकांपेक्षा आपले उत्पादन अधिक दर्जेदार करण्याची अहमहमिका सुरू व्हावी, आणि ग्राहकाला अधिकाधिक दर्जेदार उत्पादने उपलब्ध व्हावीत असा मूळ हेतू आहे. परंतु वास्तव नेमके उलट दिसते. स्पर्धा ही गुणवत्तावाढीपेक्षा त्या उत्पादनांच्या किंमतींमध्ये अधिक होते. आणि किंमती कमी करण्याच्या स्पर्धेत गुणवत्तेच्या सुधारणेपेक्षा वेगळे, सोपे मार्ग वापरले जातात. 

मूल्य आणि किंमत यांतील फरक इतका स्पष्टपणे कधीच दिसून आलेला नव्हता. गुणवत्तेशी समप्रमाणात असलेल्या मूल्याची ऐशीतैशी करत केवळ किंमतीच्या स्पर्धेत उत्पादक उतरतात आणि ग्राहकाला lesser of the evil किंवा ’वासरांतील लंगडी गाय’ निवडण्याची वेळ येते. आणि ती तशी आली की स्पर्धा गुणवत्तेच्या बाबतीत संपृक्त पातळीवर पोहोचली असे समजायला हरकत नाही.

आता आपल्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्याऐवजी स्पर्धकाच्या गुणवत्तेबद्दल संभ्रम निर्माण करणे सुरु होते. थोडक्यात आपली रेघ मोठी करण्याचे कष्ट न घेता शेजारची रेघ खोडून लहान करण्याकडे लक्ष केंद्रीत केले जाते. कारण पुन्हा तेच. तो उपाय कमी खर्चिक असतो. मग ’इतर पेस्टमध्ये कोळसा आणि मीठ यांसारखे कडक पदार्थ असतात, त्यातून तुमच्या दातांवर चरे पडून त्यांची हानी होते.’ असा थेट, किंवा ’आमच्या उत्पादनात रसायने नाहीत’ असा तद्दन खोटा दावा करताना ’इतर स्पर्धक उत्पादनात असतात' आणि 'ती असणे म्हणजे काहीतरी भयंकर बाब आहे.’ असा अप्रत्यक्ष संशय निर्माण करणे सुरू होते.

सुरुवातीला उद्धृत केलेल्या काल्पनिक म्हणीची व्याप्ती सर्व देश, धर्म, समाज आणि भाषा व्यापून राहिली असल्याने तिला सर्वभाषिक, सर्वदेशीय, सर्वधर्मीयांनी आता आपापल्या भाषा-व्यवहारात सामावून घ्यायला हरकत नाही. कारण सामाजिक-राजकीय पातळीवरही परिस्थिती याहून वेगळी नसते. लोकशाहीच्या कृपेने आज जगातील बहुतेक देश आणि समाज बर्‍याच अंशी स्थिर आणि म्हणून प्रगतीशील झाले असले, तरी आदिम टोळी-मानसिकता त्यांच्या जाणिवेच्या तळाशी सुप्त स्वरूपात पहुडलेली असते. एखाद्या आणीबाणीच्या, अभावाच्या प्रसंगी दोषांचे खापर फोडायला कुण्या ’त्यांची’ गरज भासते, त्यावेळी ती उफाळून वर येते

एखाद्या राजकीय नेत्याला आपला गट वाढवण्याची गरज असते, तेव्हा तो या तळाशी पडलेल्या जाणिवेला हलवून जागे करतो. संघर्ष उभे करतो आणि त्यावर आपल्या स्वार्थाची पोळी सुखाने भाजून घेतो. अमेरिकेत ट्रम्प जेव्हा ’अमेरिका सोशलिस्टांच्या ताब्यातून सोडवा’ म्हणतात तेव्हा ते नेमके हेच करत असतात, मुस्लिम जिहादी जेव्हा 'काफर देशांत आपल्या पवित्र धर्माचे खच्चीकरण होत आहे' असे म्हणतात तेव्हा हेच करत असतात, आणि भारतातले हिंदुत्ववादी गणिताची ऐशीतैशी करत, ८४ टक्के हिंदूंचा देश 'लवकरच संपूर्ण हिरवा होणार आहे' असे म्हणतात, तेव्हाही नेमके हेच करत असतात.

या सार्‍यांकडे आपापली गुणवत्ता सुधारण्याचे उपाय नाहीत, ते निर्माण करण्याची त्यांची कुवत नाही. सकारात्मक, रचनात्मक विचारच त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांनी आपली रेघ मोठी करण्यापेक्षा शेजार्‍याची खोडून लहान करण्याचा सोपा उपाय स्वीकारलेला आहे. आणि अशा खोट्या प्रचाराला सर्वच देशांतील सामान्य सहज बळी पडत असल्याने द्वेषाची, तिरस्काराची अग्निकुंडे सतत धगधगत राहतात. आणि या द्वेषाच्या आगीत लहान मुले, अर्भकांचा बळी द्यायलाही ते मागेपुढे पाहात नाहीत. 

त्यांना फक्त 'आपले अधिक मेले की त्यांचे' एवढ्या तपशीलातच रस राहतो. प्रत्येक व्यक्ती ही त्यांच्या दृष्टीने केवळ एक मोजण्याचे एकक बनूनच राहिलेली असते. इतकेच काय त्यासाठी त्या लहान मुलांच्या हाती शस्त्रे किंवा त्यांच्या तोंडी आपल्या क्षुद्र प्रचाराला साहाय्यक असे शब्द घालण्यासही त्यांना काडीची लाज वाटत नाही.

शेल्डन हा एक नऊ-दहा वर्षांचा मुलगा. त्याच्या आवडीच्या ब्रेडची चव बदलली, आणि याचे कारण म्हणजे स्थानिक बेकरी आता कार्पोरेट कंपनीने ताब्यात घेतली नि उत्पादनाचे यांत्रिकीकरण केले हे त्याला समजते. त्या ब्रेडच्या 'उत्पादकांनी मूळ चव परत आणावी' अशी मागणी करण्यासाठी तो रिटेल स्टोअर समोर उभा राहून नागरिकांच्या सह्या गोळा करत असतो.

त्या छोट्या गावात बहुतेक त्याला परिचित; तरीही त्याला टाळून, मागच्या दाराने पळ काढतात, सही करण्याचे टाळतात. त्या एका सहीने त्यांचे काही बिघडणार असते असे नाही. पण तरीही त्या एका साध्या मागणीला पाठिंबा देण्याइतके धैर्य त्यांच्यात नाही. वरकरणी लोकशाहीचा गजर करणार्‍या समाजातील ही अदृश्य दहशत या निमित्ताने उघडी पडते. पुढे ती शेल्डनच्या कुटुंबातही प्रकर्षाने दिसून येते.

भांडवलशाही अर्थव्यवस्थेत काम करणार्‍या माध्यमांना निव्वळ बातम्या अथवा निव्वळ न्यूजमध्ये रस नसतो. त्यांना ’ब्रेकिंग न्यूज’ हवी असते. आणि ती मिळवण्यासाठी खर्‍या अर्थाने काही मोडावे लागले तरी त्यांची हरकत नसते. 'Tomorrow Never Dies' या बॉण्डपटातील Elliot Carver हा माध्यमसम्राट त्याच्या नव्या सॅटेलाईट वाहिनी-साखळीच्या उद्घाटनाला विशेष आणि सनसनाटी कव्हरेज देता यावे यासाठी दोन जागतिक महासत्तांमध्ये युद्धाची कलागत लावण्यासही कमी करत नाही.

इथेही शेल्डननेच बोलावलेल्या चॅनेलची प्रतिनिधी त्याला ’तुला कार्पोरेट कंपनी नको, मग काय कम्युनिस्ट व्यवस्था आणायची आहे का?’ असा प्रश्न विचारते. त्या व्यवस्थेत आपला जुना ब्रेड परत मिळेल एवढ्याच हेतूने तो ’हो’ म्हणतो. मग ती त्याची ’ब्रेकिंग न्यूज’ बनवते. त्या स्थानिक चॅनेलवर आता ती ’भयंकर’ बातमी पुन्हापुन्हा चालवली जाते. चॅनेलची लोकप्रियता (TRP)  कैकपट वाढते.

या शेल्डनहून बराच लहान म्हणजे दोन-तीन वर्षे वयाच्या तैमूर या करीना आणि सैफ यांच्या या मुलाला माध्यमांचा जाच सतत सहन करावा लागतो. एखाद्या बाहुलीसारखे व्यक्तिमत्व असलेल्या तैमूरचे फोटो काढण्यासाठी बातमीदार सतत त्याच्या मागावर असत. अति झाले तेव्हा ते मूलही एकदा वैतागून एका पत्रकाराच्या अंगावर ओरडले, ’नो... नो!’. झाले. लगेच ’तैमूर पत्रकारांवर ओरडला’ हीच बातमी फिरवण्यात आली. 

आता तो 'तैमूर' असल्याने ’त्या’ पार्टीतला. मग त्या एवढ्याशा पोराच्या द्वेषाने पछाडलेले ’इकडचे’ लोक सक्रीय होऊन समाजमाध्यमांवर त्याच्यावर आगपाखड करु लागले. स्वत: तीन लहान मुलांची आई असलेल्या एका स्वयंघोषित राष्ट्रभक्त स्त्रीने त्याची तुलना इतिहासातील तैमूरसोबत करत एकप्रकारे हाही तसाच क्रूरकर्मा निपजेल असा अंगुलिनिर्देश करणारी पोस्ट* लिहिली. यावरून अलान कुर्दी या परागंदा छोट्याचा समुद्रातच झालेला करुण अंत आणि त्यावर फ्रेंच नियतकालिक चार्ली हेब्दोने प्रसिद्ध केलेले अश्लाघ्य भाष्यचित्र आठवते.

द्वेषाने आंधळे झालेले, सतत 'आपण विरुद्ध ते’ या किडक्या मानसिकतेमध्ये राहणारे हे लोक लहान मुलांनाही त्यातून सोडत नाहीत, इतके विकृत पातळीवर उतरलेले दिसतात. इतकी किळसवाणी मानसिकता माणसात येते कुठून हेच मोठं कोडं आहे. जनावरेही अन्न आणि मादी या दोन साध्यांखेरीज इतर मुद्द्यावर कुणाशी संघर्ष करण्याच्या फंदात पडत नाही. ती यांच्यापेक्षा अधिक सुसंस्कृत म्हणावी लागतील.

शेल्डन टेक्सस या दक्षिणी राज्यात राहात असतो. अमेरिकेच्या यादवी युद्धात गुलामगितीच्या बाजूने उभ्या राहिलेला, सनातन प्रवृत्ती प्रबळ असलेला हा भाग. त्यात टेक्सस हे ’वेस्टर्न’पटात आपण पाहिलेल्या काऊबॉय संस्कृतीचे माहेरघर. तिथे व्यवस्थेच्या न्यायापेक्षा बंदुकीचा न्याय अधिक परिणामकारक असतो असे मानणारे पांढरपेशांतही बहुसंख्येने. ती बातमी पाहून सारे परिचित उलटतात. शाळेपासून शेजार्‍यांपर्यंत सारे शेल्डन कुटुंबाला टाळू लागतात. लोक शेल्डनच्या वडिलांच्या प्रिन्सिपलला फोन कर-करुन त्यांना नोकरीवरुन काढण्याची मागणी करु लागतात.

शेल्डनची आजी असेल, वडील असतील वा आई, यांच्यातील कुणालाही ’हा सारा मूर्खपणा आहे. कम्युनिजम म्हणजे काय हे त्याला समजण्याइतका त्याचा अभ्यास नाही. चॅनेल प्रतिनिधींनी पराचा कावळा करुन हा मूर्खपणा पसरवून दिला आहे.’ अशी ठाम भूमिका मांडून शेल्डनच्या पाठीशी उभे राहण्याचे धैर्य नाही. शेल्डनचे वडील प्रथम धावाधाव करुन तळघरात टाकून दिलेला अमेरिकन झेंडा काढून लावतात. त्याची आजी तर सार्‍या घरावरच लहान मोठे झेंडे लावते. टेप लावून देशभक्तीची गाणी म्हणत बसते.

या संपूर्ण प्रकारात त्या नऊ-दहा वर्षांच्या मुलाला कम्युनिजम म्हणजे नक्की काय, नि त्यावर आधारित व्यवस्था म्हणजे काय हे समजत असेल का? असा प्रश्न एकाच्याही मनात येत नाही. याला एकच ठळक अपवाद आहे तो शेल्डनचा मोठा भाऊ जॉर्जी याच्या मैत्रिणीचा. ती अजूनही शिकते आहे, विद्यार्थी आहे. अद्याप तिचे निबर कातडीच्या नागरिकात- नव्हे मतदारात, रूपांतर झालेले नाही. राष्ट्रभक्तीच्या निव्वळ ढेकरा देऊनही समाजात आपली पत फुकटात वाढवता येते, याची तिला अजून जाणीव नाही.

कम्युनिस्ट व्यवस्थेबाबतचे ते विधान चॅनेल-प्रतिनिधीनेच त्याच्याकडून वदवून घेतले आहे, हे समजून घ्यायची बहुतेकांची इच्छा नाही. खोट्या राष्ट्रभक्तीच्या आणि कम्युनिस्ट-द्वेषाच्या आपल्या दंभासमोर एका लहान मुलाचा सामाजिक बळी द्यायलाही ते कचरत नाहीत. तो हो म्हणाला म्हणजे तो कम्युनिस्ट आहे, आणि तो कम्युनिस्ट आहे म्हणजे त्याच्या घरातून त्याच्यावर तेच ’संस्कार’ झाले आहेत असा ग्रह बहुतेक परिचित करुन घेतात.  

दुसर्‍याला स्वत:पेक्षा कमी देशभक्त, वा देशद्रोही ठरवायला सार्‍याच देशातले लोक हपापलेले असतात. आणि अशा एखाद्या लहानशा प्रसंगातही त्या उन्मादी समाजाचे जमावात, आणि जमावाचे अखेरीस मेंदूहीन झुंडीत रूपांतर होत असते.

सनसनाटीपणारूपी रक्ताला चटावलेली माध्यमे, देशभक्तीचा उन्माद, काल्पनिक शत्रूची भीती (paranoia) आणि भेकड नागरिक ही काही कुण्या एका देशाची मिरासदारी थोडीच आहे?

- oOo -


हे वाचले का?

बुधवार, ३ मार्च, २०२१

कला, कलाकार आणि माध्यमे

(यापूर्वी रमतारामाच्या विश्रांतीस्थळी लिहिलेला आणि 'अक्षरनामा’वर प्रसिद्ध झालेला हा लेख, विषयाच्या संगतीमुळे ’वेचित...’ वर हलवला आहे.)

दोन-एक आठवड्यांपूर्वी यू-ट्यूवबर एक चलच्चित्र लघुपट (Animation short-film) पाहात होतो. सोबत डिस्ने स्टुडिओजच्या ’मोआना’ या चित्रपटातील एका गाण्याची शिफारस दिसली. टेलर डेव्हिस नावाच्या एका कलाकाराने हे गाणे व्हायलिनवर वाजवलेले होते. कारोलिना प्रोत्सेंको या छोटीमुळे मी नुकतेच व्हायलिनवर वाजवलेली गाणी ऐकू लागलो होतो. त्यामुळे साहजिकच हे गाणेही ऐकले... पाहिलेही!

कारोलिनाचे सादरीकरण प्रामुख्याने पथ-प्रदर्शन (किंवा पथ-सादरीकरण) स्वरुपात होते. तिची अंगभूत लय वगळता त्यात सादरीकरणाची दृश्य बाजू नाही. तंत्राचा वापरही नाही. पण टेलर डेव्हिसचे वादन हे केवळ वादन नव्हते, तर तंत्राचा पुरेपूर वापर करुन केलेले आखीव सादरीकरण होते. पुढे तिची आणखी काही गाणी ऐकली, नि पाहिली. प्रत्येक गाण्यासाठी एक पार्श्वभूमी, विशिष्ट वेशभूषा यांची निवड होती. त्याशिवाय दृश्य रेकॉर्डिंग आणि संपादन तंत्राचा पुरेपूर वापरही होता. एका वैय्यक्तिक (सोलो) सादरीकरणाला तंत्राच्या साहाय्याने श्राव्य अंगाबरोबर दृश्य अंगाची जोडही दिलेली होती.

पण गायनाला सादरीकरणाची जोड पाश्चात्त्य संगीतात काही नवीन नाही. बहुतेक प्रसिद्ध गायक त्यांचे सादरीकरण हे स्टेज-शोजच्या माध्यमांतूनच करत आले आहेत. त्यामुळे त्यांना गायकांना गाण्याबरोबर सादरीकरणाकडेही लक्ष द्यावे लागते. त्यांना नृत्य-दिग्दर्शकाची सोबत लागते, नेपथ्य लागते, झगमगते दिवे, नाट्यमय प्रवेश वगैरे क्लृप्त्या लढवाव्या लागतात. एकुणात सारा नटवा मामला असतो. पण इथे फरक आहे तो माध्यमांचा. प्रत्यक्ष सादरीकरणापेक्षाही दृश्य माध्यमांतून जाण्याचा, आणि निवडलेल्या माध्यमांचे नवे आयाम ध्यानांत घेऊन सादरीकरणाला नवे वळण देण्याचा.

हे पाहात असताना दहा-एक वर्षांपूर्वी पाहिलेल्या ’Jota de Saura’ (इंग्रजी शीर्षक: Beyond Flamenco) या चित्रपटाची आठवण झाली. कार्लोस सॉरा अतारेस या स्पॅनिश दिग्दर्शकाने ’होता'(Jota) या स्पेनमधील पारंपरिक संगीत-नृत्याला दृश्य माध्यमांच्या आयामांची जोड दिलेली होती. चालू असलेल्या नृत्याचे पडद्यावर प्रक्षेपण, त्यासाठी नृत्यकलाकारांभोवती वापरलेले पडदे, त्यांच्यावर प्रक्षेपित होणार्‍या दृश्यांची संगती, विसंगती तसंच प्रक्षेपणाच्या वेगातील आणि काळातील फरक, दिव्यांचा चित्रपटीय अथवा नाटकाच्या पद्धतीचा वापर, आणि मुख्य म्हणजे कॅमेर्‍यांची सर्वस्वी नवी भाषा, या सार्‍यांच्या मिलाफातून त्या नृत्याला अनेक नव्या आयामांसह सादर करुन एक अलौकिक अनुभव समोर ठेवला होता. 

ज्याचे वर्गीकरण ’माहितीपट’ असे केले गेले असले तरी मला ते सयुक्तिक वाटले नाही. ही फिल्म कथाप्रधान नाही त्यामुळे रूढार्थाने हा चित्रपट नाही. तसेच माहिती देण्याच्या दृष्टीने न बनवल्याने, निवेदनाचाच काय शब्दांचाही वापर नसल्याने माहितीपटही नाही. कथा नसलेला, पण पटकथा असलेला असा अपवादात्मक चित्रपटच म्हणायला हवा. (याने त्यापूर्वी फ्लामेंको या प्रसिद्ध नृत्यप्रकारावर दोन आणि फार्दोस, आयबेरिया या प्रकारावरही असे ’माहितीपट’ बनवले होते.) पण हा झाला नृत्याला दृश्य माध्यमांत नेण्याचा, नवे आयाम देण्याचा प्रयोग. गाडी वळवून परत डेव्हिस आणि वैय्यक्तिक सादरीकरणाकडे नेतो.

फार पूर्वी वाचलेल्या कार्व्हरच्या चरित्रामध्ये त्याचे एक वाक्य मनात रुतून बसले होते, ते द्रष्टेपणाचे होते असे मला लगेचच जाणवू लागले. त्याच्या टस्कगी इन्स्टिट्यूटमधील रस्त्याची जागा बदलण्याबाबत ते म्हणाले होते, ’लोक आपला रस्ता सोडत नसतात. त्यांनी आपल्या रस्त्याने जावे असे वाटत असेल तर आपला रस्ताच त्यांच्या पायाखाली सरकवावा लागतो.’ किंवा असे म्हणू या की, ’आता महंमद पर्वताकडे येत नसतात, पर्वतालाच महंमदाकडे जावे लागते. आता रसिक राजा आहे. It's a buyer's market! तो कार्यक्रमासाठी थिएटरमध्ये येण्याची तसदी घेत नाही, त्याच्यासमोर आलेल्या पर्यायातून तो निवड करतो. याचसाठी नव्या व्यवस्थेत कलेआधी कलाकारच रसिकांपर्यंत पोचतो आहे!

पथ-प्रदर्शनाच्या माध्यमातून कारोलिन जशी थेट स्वत:च प्रेक्षकांसमोर जाऊन उभी राहते, त्याचप्रमाणे टेलर डेव्हिस ही यू-ट्यूब, पेट्रिऑन यांसारख्या माध्यमांतून तिच्या कलेला अपेक्षित श्रोत्या/प्रेक्षकांपर्यंत पोचते आहे. वास्तविक पथ-प्रदर्शन हा काही अलीकडचा शोध नव्हे. ज्यांना स्ट्रगलर्स म्हटले जाते असे उदयोन्मुख कलाकार सुरुवातीच्या धडपडीच्या काळात या तंत्राचा वापर अनेक दशके करत आले आहेत.

परंतु बर्‍यापैकी प्रस्थापित होऊनही त्या प्रकाराला सोडचिठ्ठी न देणे आता दिसू लागले आहे. कारण भांडवलशाही व्यवस्थेत पर्यायांचा मारा व्याप्तीने नि वेगाने इतका मोठा असतो की ’नजरेआडचा कानाआड’ (’Out of sight is out of mind’) या न्यायाने तुम्ही सोडलेली जागा इतर कुणी बळकावून, वर त्याआधारे पुन्हा तुमच्या वरच्या पायरीला धडका देण्यास सुरुवात करु शकतो. त्यामुळे विक्रेत्याच्या भूमिकेतील कलाकाराला सतत अपेक्षित ग्राहकाच्या (इथे श्रोते/प्रेक्षक) समोर राहणे आवश्यक ठरते.

माझा स्वत:चा भर माझे लेखन वा विचार शब्दांमधून व्यक्त करुन ब्लॉगमार्फत सादर करण्याकडे आहे. परंतु फेसबुकसारख्या समाज-माध्यमांत लिहिलेल्या फुटकळ पोस्टला जेवढा वाचक असतो, त्याच्या दशांशाने अभ्यासपूर्वक लिहिलेल्या ब्लॉग-पोस्टला नसतो. कारण पुन्हा तेच. वाचक तुमच्या ब्लॉगकडे यायची तसदी घेत नसतात. तुमचा ब्लॉगच तुम्हाला त्यांच्या डोळ्यांसमोर सरकवावा लागतो. 

पथ-प्रदर्शन, यू-ट्यूब चॅनेल्स यांच्यामार्फत कारोलिना आणि टेलर नेमके हेच साधत असतात. ज्यांना ही तंत्रे अवगत नसतात, त्यांची गुणवत्ता सादरकर्त्यांहून सरस असली तरीही ’विकली’ जात नाही. ’बोलणार्‍याची माती विकली जाते, न बोलणार्‍याचे सोनेही विकले जात नाही’ ही म्हण भांडवलशाही व्यवस्थेमध्ये तंतोतंत अनुभवण्यास मिळते ती अशी.

ज्याप्रमाणे सिनेमा म्हणजे कॅमेर्‍यातून पाहिलेले नाटक नव्हे, त्याचप्रमाणे डिजिटल माध्यमांतले सादरीकरण म्हणजे प्रत्यक्ष सादर केलेल्या कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग यू-ट्यूब चॅनेलवर अपलोड करणे नव्हे. माध्यमबदलाचे भान राखणे हे यात अत्यंत महत्वाचे ठरते. त्याचे स्वत:चे असे जे आयाम आहेत ते ध्यानात घेऊनच कलाकाराला तिथे शिरकाव करुन घ्यावा लागतो.

मराठीमध्ये ’भारतीय डिजिटल पार्टी’ अर्थात भाडिपा हे एक चटकन नजरेत येणारे उदाहरण. मुळात मराठी नाट्यक्षेत्रातील तरुण मंडळींनी हे माध्यम आपलेसे केले. हे करत असताना नाटकाचा प्रेक्षक आणि यू-ट्यूबवरचा प्रेक्षक आणि मुख्य म्हणजे व्याप्ती यांत असलेला फरक याचे भान त्यांनी राखले आहे. त्यामुळे त्यांच्या यू-ट्यूब चॅनेलवरचे कार्यक्रम आणि नाटकांच्या वर्ण्यविषयांत चांगलाच फरक आहे. आमच्या मित्रांपैकी अनेक ’रसिक’ मित्र त्यांच्या या चॅनेलवरील कार्यक्रमांबाबत नाराजी व्यक्त करतात. पण जे भाडिपावाल्यांना समजले ते त्यांना समजले नसावे, किंवा समजूनही ’माझेच खरे’ या दुराग्रहापासून त्यांना दूर जाता येत नसावे. 

भाडिपाच्या मंडळींनी डिजिटल माध्यम हा टीआरपीचा खेळ असतो हे पुरेपूर ओळखलेले दिसते. त्यामुळे रसिक म्हणून मिरवणार्‍या मर्यादित वर्तुळाबाहेरही आपल्याला पोहोचावे लागणार आहे याचे भान त्यांना असावे. त्यासाठी विषयांमध्ये सुलभता आणत प्रेक्षकवर्गाची व्याप्ती वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. त्याचसोबत टीव्ही चॅनेल्समध्ये असलेले प्रच्छन्न जाहिरातीचे (embedded marketing) तंत्र वापरुन जाहिरातीमार्फत आर्थिक लाभाचा एक स्रोत त्यांनी निर्माण केला आहे.

पण भाडिपाचे कार्यक्रम हे सामूहिक सादरीकरण आहे. भारतात हिंदी आणि इंग्रजी विनोदवीरांनी डिजिटल माध्यमांचा बर्‍यापैकी वापर केलेला दिसतो. ध्रुव राठीसारख्याने तर एक समकालीन घडामोडींचा एक विश्लेषक आणि भाष्यकार म्हणून इथे आपले स्वतंत्र स्थानच निर्माण केले आहे. पण मराठी कलाक्षेत्रात याची जाणीव कितपत रुजली आहे? या प्रश्नाचे उत्तर फारसे उत्साहवर्धक नाही.

एरवी मराठी जगात चित्रपट संगीतांवर आधारित कार्यक्रम होतात, गझलगायनाचे कार्यक्रम होतात. खरेतर यात  एकदा पार्श्वसंगीत बसवले की ते वाजवणारे कलाकार प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहण्याची आवश्यकता नसते. कराओके तंत्राचा वापर करुन त्या संगीताचा वापर करुन एकटा गायक आपला कार्यक्रम सादर करु शकतो. पण एखादा गजलगायक असा कार्यक्रम कधी करताना दिसत नाही. 

रागसंगीतातही अनेक गायक इलेक्ट्रॉनिक तानपुरा अथवा मोबाईलवरील त्याचे अ‍ॅप वापरतात. परंतु तरीदेखील मागे तानपुरा घेऊन त्यांचे विद्यार्थी बसतात. पण ते त्या विद्यार्थ्यांना मैफलीचा सराव व्हावा म्हणून. पण ते अपरिहार्य नाही. तसेच इलेक्ट्रॉनिक तालमाला अथवा अ‍ॅप वापरुन तबलजीच्या साथीविना एकटा गायक गाणे सादर करु शकतो. असा प्रयोग फारसा होताना दिसत नाही. 

सुमारे दशकभरापूर्वी हजारभर कार्यक्रम झालेल्या ’आयुष्यावर बोलू काही’ या संदीप-सलील द्वयींच्या कवितेवरील कार्यक्रमाचा एक ठळक अपवाद. कोणत्याही साथसंगतीखेरीज, आधीच ध्वनिमुद्रित केलेल्या पार्श्वसंगीताचा वापर करून ते दोघेच हा कार्यक्रम सादर करीत असत. हे तंत्र पुढे फारसे कुणी प्रचलित केले नाही. हे जमले, तर कारोलिन अथवा डेव्हिसप्रमाणे या गायक/वादक कलाकारांना स्वतंत्रपणे नवी माध्यमे, व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीरपणे वापरणे सुलभ होईल असा माझा होरा आहे.

आपल्याकडे काही प्रमाणात हौशी कवितावाचकांनी, अगदी स्वान्त सुखाय स्वरुपाचे गाणार्‍या गायकांनी वा वादकांनी यू-ट्यूब चॅनेल वगैरेंचा वापर केला असला तरी त्याचा चोख व्यावसायिक वापर अजूनही बराच दूर आहे. सध्या कोरोनाच्या उद्रेकामुळे जाहीर कार्यक्रम बंद झाल्याने काही कलाकारांनी डिजिटल व्यासपीठांकडे मोर्चा वळवलेला असला तरी तो तात्कालिक आणि ’सिनेमा म्हणजे चित्रित नाटक’ या संकुचित दृष्टीकोनाप्रमाणेच जाहीर कार्यक्रमाचे कॅमेर्‍यामार्फत प्रक्षेपण इतक्या माफक विचाराने केलेला आहे.

पण या तंत्राचा नकारात्मक परिणाम म्हणजे सहकलाकारांची आवश्यकता संपुष्टात येते. यातून सुटे झालेले पेटी किंवा संवादिनीवादक स्वतंत्र वादनाचे कार्यक्रम करु शकत असले तरी त्यांचे प्रमाणही नगण्यच आहे. पूर्वी गोविंदराव पटवर्धन, नंतर अप्पा जळगांवकर आणि अलिकडे डॉ. अरविंद थत्ते वगळले तर इतर कुणाचे स्वतंत्र पेटीवादनाचे फार कार्यक्रम झाल्याचे दिसत नाही. 

त्याहून वाईट परिस्थिती असेल ती तबला अथवा एकुणच तालवाद्य वादकांची. झाकीर हुसेन यांच्यासारखा जागतिक कीर्तिचा तबलावादक, अनिंदो चॅटर्जींसारखे आणखी एक-दोघे यातच ही यादीही संपेल. तंतुवाद्ये, संवादिनी सारखी वाद्ये जी गायनाशी संगत करतात, त्यांना तेच सादरीकरण स्वतंत्रणे करण्याचा पर्याय आहे. ते कारोलिनप्रमाणे अथवा टेलर डेव्हिसप्रमाणे नवी व्यासपीठे शोधून आपली कला रसिकांपर्यंत पोचवू शकतील. पण तालवाद्यांना निव्वळ माध्यम नव्हे तर सादरीकरणाचेच नवे आयाम शोधावे लागणार आहेत. ते कुठले असतील हे आजतरी अंदाज करता येण्याजोगे नाहीत.

पण त्यासाठी कलाकारांनी आपल्या मानसिक चौकटीतून, बंदिस्त विचारातून बाहेर यायची तयारी ठेवायला हवी. केवळ वैयक्तिक कलेला नवे माध्यम अशा दृष्टीने न पाहता, नव्या माध्यमाच्या नव्या संधींकडेही लक्ष द्यायला हवे. टेलर डेव्हिसने वापरलेले परस्पर-सहकार्याचे, त्रयस्थ व्यासपीठाचा वापर करण्याचे तंत्र, सहकलाकारांशिवाय वैय्यक्तिक सादरीकरणाचे आत्मसात केलेले तंत्र (ज्यातून प्रयोग सुटसुटीत होऊन मर्यादित अवकाशात, फारशा नेपथ्याशिवाय सहजपणे सादर करता येऊ शकेल) नव्या दर्जेदार पण वाहून नेण्यास सोप्या कॅमेर्‍यांचा वापर, उच्च-तांत्रिक स्टुडिओंवर अवलंबून न राहता संगणकावर सहज वापरता येण्याजोग्या एडिटिंग संगणक-प्रणालींचा वापर यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रित केले तर हे शक्य आहे.

पण नुसते माध्यम निवडून काम झाले असे म्हणता येत नाही. त्यातून आर्थिक प्राप्तीचे मार्गही शोधणे गरजेचे आहे. टेलर डेव्हिसच्या चॅनेलवर या दृष्टीने उपयुक्त असे दोन व्हिडिओ सापडले. (पैकी पहिला लेखाच्या सुरुवातीला दिला आहे. तर दुसरा शेवटी.) पहिल्यामध्ये तिने आपण या माध्यमांतून पैसे कसे मिळवतो याची कल्पना दिली आहे. तर दुसर्‍यामध्ये 'पॅट्रिऑन'सारख्या व्यासपीठांच्या मार्फत आपल्या कलेला रसिकांपर्यंत पोहोचवून अर्थप्राप्तीचा स्रोत कसा निर्माण करता येतो याची माहिती दिली आहे. 

या दोन पलिकडे डिजिटल माध्यमांनी अनेक पर्याय निर्माण केले आहेत. इंटरनेट रेडिओ, पॉडकास्ट, साऊंडक्लाऊड सारख्या शेअरिंग साईट्स वगैरे अनेक व्यासपीठे कलाकारांना उपलब्ध झाली आहेत. त्यांचाही वापर करुन कलाकार आपल्या कलेला प्रेक्षक अथवा श्रोते मिळवू शकतो आणि अर्थप्राप्तीचा स्रोत निर्माण करु शकतो.

टेलर डेव्हिसच्या अनुभवातून तांत्रिक बाजूचे महत्व अधोरेखित होते, तर कारोलिनच्या माध्यमांतून त्या माध्यमांचे सार्वजनिक असणे, किमान खर्चिक असणे. नाट्यगृह अथवा एखादे सभागृह भाड्याने घेऊन त्यात कार्यक्रम सादर करणे हे खर्चिक काम आहे. ते बहुतेक सामान्य कलाकाराच्या आवाक्याबाहेर जाते. त्यात पुन्हा सहकलाकार असतील तर सारा आतबट्ट्याच्या व्यवहार होतो. 

याउलट कारोलिनाला उपलब्ध असलेल्या ’नाक्यावरील सादरीकरणा’चा पर्याय जर उपलब्ध करुन दिला तर कलाकारांची मोठी सोय होईल. आठवड्यात एका दिवशी कमी वर्दळीचे पण बाजारपेठेलगतचे काही रस्ते जर 'नो-ड्राईव्ह झोन' म्हणून जाहीर केले, तर तिथे कलाकारांना आपली कला सादर करता येऊ शकेल. इथे कार्यक्रम-पूर्व आर्थिक गुंतवणूक नगण्य असल्याने प्राप्ती फारशी झाली नाही, तरी प्रत्यक्ष आर्थिक नुकसानही मर्यादित राहील. (आणि रस्त्यावर फक्त भिकारीच गातो हा समजही पुसता येईल.) नाट्यगृहांसाठी आग्रह धरण्यापेक्षा कलाकारांच्या संघटनेने अशा नुक्कड-कलाकारीला उपयुक्त जागांची मागणी केली तर तरी सर्वांच्या दृष्टीने सोयीची तर होईलच, पण नाट्यगृहांमध्ये होणारी बुकिंगमधील ’घराणेशाही’देखील टाळता येईल. (अर्थात तोच प्रकार कदाचित पुढे सोयीच्या दिवशी, मोक्याच्या जागांसाठी होऊ शकेल . पण तो टाळण्याचे उपायही योजून ठेवावे लागतील.)

टेलर डेव्हिस आणि कारोलिना या काही विशेष नव्हेत की त्यांच्या क्षेत्रातील दिग्गजही. पण अकरा वर्षांच्या कारोलिनने आजवर दोनशेहून अधिक कार्यक्रम सादर केले आहेत, तर टेलर ही पहिल्या दहा कव्हर आर्टिस्टसमध्ये गणली जाते. त्यांची उदाहरणे ही केवळ माझ्यासमोर आली म्हणून ती घेतली इतकेच. इतर कलाकार आणखी काही पर्यायही वापरत असावेत. हे लिहून होईतो नवे काही निर्माणही झाले असतील. कारण या ० आणि १ ने सुरुवात केलेल्या माध्यमाचा वेग, पल्ला आणि उपयुक्तता अमर्याद (infinite) आहे.

-oOo-


हे वाचले का?