बुधवार, २८ एप्रिल, २०२१

वेचताना... : एक झुंज वार्‍याशी

( काही दिवसांपूर्वी अनिल बर्वेंच्या ’थॅंक यू, मिस्टर ग्लाड’वर लिहित होतो. दोन व्यक्तिंमधील मनोबलाच्या संघर्षाबद्दल लिहित असताना पुलंच्या ’एक झुंज वार्‍याशी’ची आठवण झाली. डॉ. देशमुख आणि माणूस यांच्यात अशाच स्वरूपाचा संघर्ष त्यात रंगवला गेला आहे. 

परंतु ’...ग्लाड’च्या तुलनेत तो अधिक महत्वाचा आहे, कारण त्याला केवळ दोन व्यक्तींमधील संघर्ष एवढेच महत्व नाही, त्यामागे असलेला नैतिकतेचा पेच आणि त्याकडे दोन दृष्टीकोनातून पाहणारे दोघे असा तो संघर्ष आहे. त्यामुळे ’...ग्लाड’बद्दल लिहिताना संदर्भापुरते उघडलेल्या त्या पुस्तकाने ’...ग्लाड’ला मागे सारून ’वेचित...’ वर आधी स्थान मिळवले आहे. )

एक झुंज वार्‍याशी

’हशिवनारा बाबा’ असा शिक्का मारून उच्चनासिकान्यायाने अर्वाचीन स्वयंघोषित श्रेष्ठ साहित्यिकांनी बाद केलेल्या पुलंच्या नाटकांबद्दल फारसे बोलले जात नसले, तरी नाट्यस्पर्धांमधून ’सदू आणि दादू’, ’एक झुंज वार्‍याशी’ सारखी त्यांची नाटके वारंवार सादर केली जातात. मागे कुण्या दिग्दर्शकाने - बहुधा चंद्रकांत कुलकर्णी - त्यांच्या अतिरेकाबद्दल वैतागही व्यक्त केला होता. त्यातले ’तुझे आहे तुजपाशी’ वगळता बहुतेक सारी परदेशी रूपांतरित नाटके आहेत, किंवा कथाबीज तिकडून उसने आणलेले आहे हे कदाचित त्याचे कारण असावे.

’एक झुंज वार्‍याशी’ या नाटकाची ओळख झाली ती पुरुषोत्तम करंडक , फिरोदिया करंडक राज्य नाट्य स्पर्धा वा किंवा तत्सम नाट्यस्पर्धेत. त्या काळात त्यातील ’माणूस’ या व्यवस्थेविरोधात उभ्या राहिलेल्या माणसाच्या व्यक्तिमत्वामुळे प्रभावित झालो होतो. पुढे महाविद्यालयीन वयातला आदर्शवाद आणि प्रमाथी प्रवृत्तीची जागा हळूहळू विचारांनी घेतल्यावर मंत्री म्हणजे भ्रष्ट, माणूस म्हणजे चांगला, चित्रा ही शोषित, डॉ. चौधरी म्हणजे लबाड माणूस ही विभागणी मला पटेनाशी झाली. आणि मी त्याकडे अधिक चिकित्सकपणे पाहायला सुरुवात केली.

या नाटकाकडे दोन प्रकारे पाहू शकतो. पहिले म्हणजे तो एक प्रकारचा कोर्टरूम ड्रामा आहे. खरोखरीचे कोर्ट नसले तरी एक घटना आहे, तिचा निवाडा करणे चालू आहे. कुणी एक आरोपी आहे, कुणी एक त्याच्यावर आरोप करतो आहे. पुरावे आणि तर्कांचे वाग्बाण भिरकावले जात आहेत. आणि त्या आरोप-प्रत्यारोपांच्या, पेच-डावपेचांच्या साठमारीतून मूळ मुद्द्याची आपल्या सोयीने तड लावण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

दुसरा दृष्टीकोन माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि तो म्हणजे या नाटकातील मुख्य पात्र म्हणजे ’माणूस’ ही आरोपीची- म्हणजे उपमंत्री डॉ. देशमुखांची सदसद्विवेकबुद्धीच आहे ! याला पुष्टी देणारा नाटकातील भाग म्हणजे त्याने उपमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची केलेली मागणी. 

जी घटना घडली आहे, ज्या आधारे ’माणूस’ देशमुखांवर आरोपांच्या फैरी झाडतो आहे, ते आरोप खरेतर ’मंत्री’ देशमुखांवर नव्हे, तर ’डॉ. देशमुखांवर’ आहेत. त्यामुळे ’माणूस’ हा जर स्वतंत्र व्यक्ती असता, तर त्याने कायदेशीर शिक्षेची मागणी करायला हवी. पण तो ’आजच्या’ देशमुखांची सदसद्विवेकबुद्धी आहे, म्हणूनच त्याच्या दृष्टीने सर्वात मोठे प्रायश्चित्त म्हणजे काय तर आजच्या स्थानापासून- मंत्रिपदावरून पायउतार होणे. 

दुसर्‍या अंकाच्या अखेरीस ’माणूस’ जेव्हा देशमुखांना नैतिक पातळीवरुन आव्हान देतो, जाब विचारतो तेव्हा तो प्रसंग जणू देशमुखांनी स्वत:ची झाडाझडती घेतल्यासारखा, स्वत:च स्वत:ला confront केल्यासारखा भासतो. माझ्या या तर्काला थोडा आधार नाटकाच्या शेवटाकडे सापडतो. 

डॉ. देशमुख माणसाला म्हणतात, ’घटकेत तुम्ही तपासणी करणार्‍याची भूमिका घेता, लगेच न्यायाधीश होता; एकदम बदनामीची धमकी देता आणि आता एकाएकी माझ्या सदसद्विवेकबुद्धीशी एकरूप होता... तुम्ही काय स्वत:ला प्रत्येकाची सदसद्विवेकबुद्धी मानता की स्वत:ला सगळ्यांच्या वरचा न्यायाधीश समजता ?’ डॉ. देशमुख स्वत:च आत्मपरीक्षणाच्या मानसिक स्थितीमध्ये आहेत असे मानले, तर बदनामीची धमकी ही वास्तविक त्यांच्या मनातील भीतीचेच रूप आहे.

हे उपमंत्री डॉ. देशमुख लोकशाही व्यवस्थेतील प्रगतीची शिडी सापडलेलं, व्यवहारी, पण तरीही संवेदनशील... किंवा संवेदना न हरवलेलं, अस्सल मध्यमवर्गीय जाणिवेचे व्यक्तिमत्व आहे. काही व्यक्ती यशाच्या मागे धावत असतानाही त्याची धुंदी त्यांना पुरी वेढत नाही. आपण जे मागे सोडून आलो त्याची बोच त्यांच्यासोबत असते. त्यांना प्रगती करायची आहे, पण त्यासाठी विधिनिषेध खुंटीला टांगणारा ’फास्ट ट्रॅक’ निवडतानाही नैतिकतेचे पेच अथवा वेढे त्यांच्याभोवती कायम असतात. नियमबाह्य वर्तन करताना ते कच खातात. मग त्यासाठी ते इतरांना - प्रामुख्याने स्वीय सहाय्यक डॉ. चौधरी यांना- मध्ये घालतात. हे साधारणपणे राजकारणी धोरणच झाले. अगदी ढोबळ निवाडा करायचा म्हटले तर ’तोबर्‍याला पुढं नि लगामाला मागं’ अशी वृत्ती असलेलं. सारे नाट्य उभे आहे ते त्याच्यामधील प्रगतीचा वारु आणि नैतिकतेच्या लगामातील संघर्षामुळे.

त्यांना आव्हान द्यायला आलेल्या ’माणसा’लाही हे पक्के ठाऊक आहे. नियमाच्या चौकटीत राहून वा कायदेशीररित्या डॉ. देशमुखांना काही धक्का लावू शकत नाही हे उमगले आहे. म्हणून तो सतत त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला, संवेदनेला आव्हान देतो आहे. त्यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यापेक्षाही त्यांच्याकडून कबुलीजबाब मिळवण्याच्या दृष्टीने त्याची पावले पडत आहेत. त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीची टोचणी त्यांच्या व्यवहारीपणाच्या दबावाला झुगारून बाहेर यावी असा त्याचा प्रयत्न आहे.

हा 'माणूस' कितीही निस्वार्थी असला, तरी सर्वथा बरोबर वा बिनचूक आहेच असे म्हणता येणार नाही. शांतपणे बोलत असला, तरी याचा अर्थ तो विचारी आहे असे नाही. अनेकदा तो तर्कसंगती सोडून उसळून येतो, आरोप करतो. डॉक्टर आपण आरोग्यकेंद्राची आपण केलेली भरभराट वर्णन करुन सांगतात, खात्री करुन घेण्यासाठी तेथील कर्मचार्‍यांशी बोला म्हणतात, तेव्हा तो त्यांच्यावर ’तडजोड करण्याचे सुचवत असल्याचा’ आरोप करतो. वास्तविक ’तुम्ही आरोग्यकेंद्राची कितीही भरभराट केलीत तरी त्या यामुळे तुमच्या शस्त्रक्रिया न करण्याने जे जीव गेले ते परत येत नाहीत.’ असे काहीसे तर्कसंगत प्रत्युत्तर देणे त्याला शक्य होते. पण तो प्रत्युत्तराऐवजी प्रत्यारोप करतो.

पुढे डॉक्टर त्याला 'एकाच व्यक्तीमध्ये गुण-दोष दोन्ही असतात, केवळ दोषच पाहात राहिलं तर आपणच काय ते निर्दोष आहोत असा भास होतो' असा सांगताच, ’मला काय करायचंय त्याच्याशी, मी काही उपमंत्री नाही.’ असे ताडकन बोलून तो तोडून टाकतो. वास्तविक डॉक्टरांचा मुद्दा वाजवी असतो. ज्याला निर्णय घ्यावा लागतो त्यालाच तो चुकल्याचे प्रायश्चित्तही स्वीकारावे लागते. निवाड्यास बसणार्‍या कृतिशून्य व्यक्तीस तो धोका कधीच नसतो. या ठिकाणी माणूस उणा पडतो.

डॉक्टर हा ही माणूस असतो, तो त्याच्या बुद्धीच्या मर्यादेत निर्णय घेत असतो. तो निर्णय इतर कुणाच्या कृतीने चूकही ठरू शकतो, तसा तो बरोबरही ठरू शकतो. केवळ चुकीच्या ठरलेल्या निर्णयाकडेच बोट दाखवून त्याला खोडून करुन टाकणे योग्य नव्हे. त्याच्या निर्णयावर त्याच्या कुवतीचा, स्वार्थाचा, दृष्टीकोनाचा व आजवरच्या अनुभवाचा प्रभाव पडत असतोच. त्यात निर्णय आणि परिणाम यात कार्यकारणभावाची साखळी दाखवता येत असेल, तरच त्याबाबत निवाडा शक्य आहे. आणि निवाडाही त्या एका निर्णयापुरता असायला हवा. 

एखाद्याचा अवघड क्षणीचा एक निर्णय योग्य ठरला म्हणजे त्याला बावनकशी ठरवणे आणि एक निर्णय चुकला की त्याला बेजबाबदार वा नालायक म्हणून त्याला खोडून टाकणे, हे दोनही टोकाचे निवाडे आहेत. निष्कर्षाची व्याप्ती अनाठायी वाढवणारे, आणि म्हणून सर्वस्वी चुकीचे आहेत.

डॉ. देशमुखांनी पेंडसेंवर शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय स्वार्थी आहेच. परंतु त्यातून गुन्हा घडल्याची कार्यकारणभावाची साखळी दाखवता येत नाही. त्यांचा मृत्यू झाला असता, तरीदेखील डॉ. देशमुखांना त्याबद्दल जबाबदार धरणे सोपे नव्हते. कारण मुळात ती शस्त्रक्रिया झाली असती, तर त्यांचा जीव वाचण्याची शक्यता किती टक्के होती हे, वस्तुनिष्ठपणे नाही, तरी पर्यायी वैद्यकीय तज्ज्ञांच्या हवाल्याने सिद्ध मांडणे आवश्यक होते. त्यात पेंडसेंचा जीव डॉ. कृष्णमूर्तींमुळे वाचल्यावर (किंवा त्यांचे मरण थोडे लांबल्यावर म्हणू) डॉ. देशमुखांच्या संदर्भात प्रत्यक्ष गुन्हा म्हणावे असे काहीच शिल्लक राहात नाही.

राहता राहिला प्रश्न वाठारकरच्या लेखाचा. तर तो लेख प्रसिद्ध होऊ न दिल्याचे पाप नि:संशयपणे डॉक्टरद्वयींचे आहेच. पण ते ही गुन्हा म्हणावा असे नाही. केवळ तेवढ्याच कारणाने वाठारकरसारखा एखादा माणूस- कितीही संवेदनशील वा हळवा असला तरी, दारूच्या आहारी जातो हे तर्कसंगत वाटत नाही. एखादा सार्वजनिक हिताचा विरोधात जाणारा मोठा भ्रष्टाचार किंवा एखाद्या मोठ्या अधिकारी व्यक्तीने केलेला एखादा गुन्हा असता, तर त्या गुन्हे-उकलीला खूप महत्व होते. आणि त्यानंतर लेख प्रसिद्ध होऊ न शकल्याने ते सारे कष्ट वाया जाऊन वैफल्य आले, तर येणारी व्यसनाधीनता समजण्याजोगी आहे.

कदाचित ’डॉक्टरांच्या त्या निर्णयांमुळे इतके जीव गेले’ असा टोकाचा समज करुन घेऊन तो वैफल्याच्या आहारी गेला असेल. असा समज करुन घेण्यामध्ये माणसे ’वाचू शकली असती’ आणि ’वाचली असती’ यातला फरक न समजण्याची चूक त्याने केली आहे. 'जगण्याची धूसर शक्यता असणारी माणसे दगावली' आणि 'जगू शकली असती अशी माणसे दगावली' या दोन गृहितकांमध्ये फरक आहे. (आणि महत्वाचे म्हणजे ही दोनही केवळ गृहितकेच आहेत.) 

डॉ. देशमुखांचे वैद्यकीय ज्ञान पाहता पहिली शक्यता त्यांनी वर्तवली आहे. वाठारकर तिच्या ऐवजी दुसरी शक्यता गृहित धरत असेल, तरच त्याचे वैफल्य समजण्याजोगे आहे. पण डॉक्टरांचे वैद्यकीय ज्ञान आणि वाठारकरचे वैद्यकीय ज्ञान(?) तसंच पर्यायी मताची अनुपलब्धता याचा विचार करता यात समजुतीचा दोष त्याच्यावर येतो हे विसरता कामा नये.

केवळ एका व्यक्तीच्या तथाकथित गुन्ह्याचा- खरंतर स्वार्थी, फारफार तर अनैतिक वर्तनाचा भांडाफोड करणारा लेख वाठारकरने इतका महत्वाचा मानावा, यातच त्याचा अतिआदर्शवादी, अव्यवहारी दृष्टीकोन दिसतो. कदाचित उलट दिशेने डॉ. चौधरी सूचित करतात तसे त्यातून डॉ. देशमुखांना ब्लॅकमेल करण्याचा हेतूही असू शकतो. 'डॉक्टरांनी न केलेल्या शस्त्रक्रिया केल्या असत्या, तर काही प्राण वाचले असते' हा तर्क, ही शक्यता आपण गृहित धरणार असू, तर ही दुसरी शक्यताही आपण का गृहित धरु नये? 

डॉ. देशमुख हे राजकारणी असल्याने त्यांच्याबद्दलची नकारात्मक शक्यता जमेस धरायची नि वाठारकर मात्र पवित्र पत्रकार असल्याचे गृहित धरुन त्याच्यावरचे डॉ. चौधरींचे आरोप मात्र बिनबुडाचे मानायचे, असा एकतर्फी निवाडा निदान आपल्याला करता येणार नाही. वाठारकर सहृदयी, सज्जन वगैरे आहे हे आपल्याला आणि माणसालाही फक्त चित्राच्या मार्फतच समजते आहे, आणि ती त्याची पत्नी आहे हे विसरुन चालणार नाही.

एका डॉक्टरने केवळ केलेली पेशंट- निवड हा वरकरणी मोठा गुन्हा नाही. परंतु त्यातून एक शक्यता उभी राहते, ती म्हणजे त्याने शस्त्रक्रिया करण्याचे नाकारल्यानंतर मृत झालेले रुग्ण शस्त्रक्रिया केली असती तर वाचले असते का? आणि हाच कळीचा प्रश्न आहे.

या प्रश्नाचे नेमके उत्तर देणे कठीण आहे. कारण मुळात वैद्यकीय व्यवसाय करणारे आपल्या ज्ञान नि अनुभवाच्या आधारे रुग्णांचे आरोग्य-निदान करत असतात. त्यात अनेकदा ’फार दिवस उरले नाहीत. यांना घरी न्या आणि सर्व नातेवाईकांची आणि प्रिय व्यक्तींची भेट घडू द्या.’ असे डॉक्टर सांगतो, तेव्हा तो त्याचा निवाडा असतो. रुग्णाला, त्याच्या नातेवाईकांना ’सेकंड ओपिनियन' घेण्याचा अधिकार वापरता येतोच. 

अन्य डॉक्टरने वा अन्य उपचारपद्धतीने कदाचित त्या रुग्णाचे आजार बरे होतील/त्याचे आयुष्य लांबेलही. पण तसेच घडेल असे ठामपणे सांगणेही शक्य नसते. याच डॉक्टरने सांगितले तसेच वागले पाहिजे असे बंधन कुणी घातलेले नसते. अनेक रुग्णांना हा पर्याय नसतो हे खरे, विशेषत: सरकारी रुग्णालयात उपचार घेणार्‍या गरीबांना. परंतु जगण्यातील ही अनिश्चितता कायम राहतेच.

पेंडसेंचा जीव कृष्णमूर्तींनी वाचवला म्हणजे त्यांनी अन्य नाकारलेल्या रुग्णांचेही जीव वाचवले असतेच, आणि त्यांची वाचवले असते म्हणजे ती शस्त्रक्रिया करणार्‍या डॉ. देशमुखांनीही वाचवलेच असते असे तर्क देता येत नसतात. हां, त्यांचे जीव वाचण्याची शक्यता सद्यस्थितीतील शून्य शक्यतेहून किंचित अधिक राहिली असती हे मान्य करावे लागेल. 

पण शस्त्रक्रिया करणे याचा रुग्ण आणि रुग्ण नातेवाईकांसाठी आर्थिक बाजूचा भुर्दंड विसरता येत नाही. 'माणसाच्या जिवाची किंमत करता येत नाही' हे कितीही आकर्षक वाक्य असले तरी उपचाराचा खर्च न परवडणार्‍याला हा आदर्शवाद कामी येत नाही. निदानाची गंभीरता लक्षात घेता शस्त्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर अल्पकाळात मृत्यू ही शक्यताही जमेस धरायला हवी. आणि ती प्रत्यक्षात उतरली असता रुग्ण गमावण्यासोबतच मागे राहिल्यांची आर्थिक स्थिती रुग्णाईत होण्याचा धोका उद्भवतो...

अर्थात हे सारे तर्क डॉ. देशमुखांचे नसले, त्यांची भूमिका त्यांच्या लक्ष्याला अनुसरून असली तरी त्यांना गुन्हेगार घोषित करण्यापूर्वी ध्यानात घ्यावेत लागतात. त्यांचे वर्तन अनैतिक होते असा एकतर्फी निवाडा देता येईल, तो केवळ नैतिकतेच्या नि वैय्यक्तिक पातळीवरचा राहील. जर मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, एक ठोस कृती करावी अशी अपेक्षा 'माणूस’ करत असेल तर त्यामागे ठोस गुन्हाही सिद्ध करावा लागेल. आणि वरील शक्यतांची सरमिसळ पाहता ते अवघड काम दिसते. आणि बहुधा हेच हेरून माणूस निवाड्यापेक्षाही कबुलीजबाब घेण्यावर अधिक भर देतो आहे.

शेवटी डॉक्टरही उपलब्ध वैद्यकीय ज्ञान आणि वैयक्तिक कुवत याच्याआधारेच निदान करत असतो. काहीतरी एक निश्चित सत्य आहे नि डॉक्टर ते शोधून काढतो असे नसतेच. निदान आणि उकल यात हा महत्वाचा फरक असतो. आजाराचे निदान हे लक्षणांच्या नि उपकरणांच्या आधारे केलेले असते. विशिष्ट शारीरिक स्थितीला आजाराचे नावही माणसांनीच दिलेले असते. सहा दिवसांच्या विश्वनिर्मितीनंतर देवबाप्पाने रविवारी सुटी घेतली आणि पुढच्या सोमवारी ताजेतवाने होऊन कामाला लागत विषमज्वर नावाचा आजार करेक्टं नि परफेक्टं लक्षणांसह जन्माला घातला... असे नसते. 

विविध लक्षणांचे मोजमाप करत डॉक्टरला निदान नि निवाडा करावा लागतो. आणि मोजमापातले फरक नि निष्कर्षातील आक्रमकता वा मवाळपणा या भूमिकांतून निदान नि उपचार ठरत जातात. हे खरे नि ते खोटे, हा डॉक्टर देवदूत नि बाकीचे सगळे पैशाच्या मागे लागलेले सैतान, आम्ही स्वीकारलेली उपचारपद्धती देवदत्त नि इतर सर्व चुकीच्या... या कल्पना बाळबोधच नव्हे तर अज्ञानमूलक नि खोट्या असतात. जग काळ्या-गोर्‍याने विभागलेले नसते. या दोन रंगांच्या मधल्या अनेक छटांचा तो पुरा वर्णपट असतो. त्या सर्वच छटांसह माणसाला जगावे लागत असते. हेच विधान डॉक्टरांच्या निदानालाही लागू पडत असते.

डॉ. कृष्णमूर्तीच्या मते ’अखेरचा उपाय म्हणून शस्त्रक्रिया करुन पाहावीच’ असे असेल आणि डॉ. देशमुखांचे मत ’रुग्ण वाचणार नाहीच तर शस्त्रक्रिया करु नये’ असे धोरण असेल तर तो दृष्टीकोनातला फरक आहे. दोन्ही निर्णयांच्या आधारे केलेली कृती योग्य वा अयोग्य ठरू शकतेच.

पहिला दृष्टिकोनात जीव वाचण्याबरोबरच विफल शस्त्रक्रियेची (आणि त्यातून त्या पेशंटच्या वारसांची आर्थिक स्थिती विनाकारण घसरण्याची) शक्यता राहते; तर दुसर्‍यामध्ये वारसांवर पडणारा संभाव्य आर्थिक भार टळतो, पण त्याचबरोबर जीव वाचण्याची शक्यता नगण्य होऊन जाते. 

शक्यताविज्ञानामध्ये (Statistics) या दोन प्रकारच्या संभाव्य चुकांच्या अदमासाला महत्व आहे. या दोनही चुका एकाच वेळी शून्य करता येत नसतात. 'एकीला कमी करायला जावे तर, दुसरी वाढते' असे त्यांचे परस्परविरोधी नाते असते. बहुसंख्य माणसे यातील स्वत:ला सोयीची शक्यता हे सत्य नि दुसरी शक्यता ही चूक म्हणून गृहित धरुन वागत असतात, नि त्या चुकीला कुणाला तरी जबाबदार धरण्याचा प्रयत्न करत असतात.

डॉक्टरांसमोरच नव्हे तर बहुतेक तुम्हा-आम्हां सर्वांसमोरच निर्णयांच्या क्षणी अशा परस्परविरोधी शक्यता उभ्या असतात. आपली सारासारविवेकबुद्धी, बाह्य माहिती, विश्लेषण या आधारे त्या विशिष्ट निर्णयाप्रसंगी त्यातील एकीला कमी गंभीर ठरवतो नि तिच्याशी निगडित निर्णय घेत असतो. आणि तो निर्णय पुढे बरोबर ठरला, तरी तिची पर्यायी शक्यता अस्तित्वातच नव्हती असे म्हणता येत नसते. शक्यता अनेक असतात, वास्तव त्यापैकी काही शक्यता सोडून उभे राहात असते. पण समस्या ही की वास्तवाचा जन्मच मुळी एक सोडून सर्व शक्यतांचे विसर्जन झाल्यावर होत असतो. त्यामुळे विचारशून्य साक्षीदार असलेले त्याला एकमेव सत्य समजण्याची चूक करत असतात.

पंचाईत ही की आपण शक्यतांच्या भाषेत विचार करत नाही, केला तरी तो तसा करतो आहोत हे आपल्या ध्यानात येत नाही. ’कोणती शक्यता कमी धोक्याची?’ याचा विचार करत असताना, ’कोणता निर्णय बरोबर नि कोणता चूक?’ याचा विचार आपण करत आहोत असा आपला समज असतो. या दोन प्रश्नांना एकच समजण्याची गफलत आपण सारेच करत असतो. स्वत:बाबत ही अवस्था असताना डॉक्टरसारख्या समोरील व्यक्तीबाबत आपण शक्यतांचा विचार करु हे अजिबातच संभवत नसते.

एक मुद्दा मात्र नि:संशयपणे डॉ. देशमुखांच्या विरोधात जातो आणि तो म्हणजे त्यांचे हे धोरण स्वार्थानुकूल म्हणून स्वीकारलेले आहे,. आपल्या यशाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने आखलेले आहे. प्रसिद्ध महाविद्यालये वा कोचिंग क्लासेस आधीच भरपूर गुण असलेल्यांना प्रवेश देतात नि पुढच्या परीक्षेतील त्यांच्या यशाला आपले यश म्हणून मिरवतात तसे. एका बाजूने हा व्यवहार आहे म्हणता येऊ शकते, पण जिथे माणसाच्या जिवाचा प्रश्न येतो तेव्हा इतके वस्तुनिष्ठ राहणे शक्य होत नसते.

पण तरीही डॉ. देशमुख वा डॉ. चौधरी यांच्या व्यावहारिक भूमिकेलाही सर्वस्वी नाकारता येत नाही. औषधे, साधनसामुग्रीची वानवा असलेले, रडतखडत चालू असलेले रुग्णालय भरभराटीला आणण्यासाठी त्यांनी एक मार्ग निवडला. ज्यात संख्याबळाच्या आधारे डॉ. देशमुखांचे डॉक्टर म्हणून श्रेष्ठत्व सिद्ध करुन शासनाचे लक्ष वेधून घेणे, आणि एकदा ते साध्य झाले की त्या प्रसिद्धीच्या आधारे रुग्णालयाला आवश्यक आर्थिक बळ मिळवणे. 

या दोघांनी निवडलेला हा मार्ग यशस्वी ठरला आहे. आणि त्यातून अद्ययावत झालेल्या रुग्णालयाने आणखी काही रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. त्यासाठी त्यांनी शस्त्रक्रिया नाकारलेल्या रुग्णांचे बळी गेले आहेत, जे कदाचित- कदाचितच! - वाचू शकले असते. पण याचबरोबर रुग्णालयाच्या तुटवड्याच्या स्थितीत जे वाचले नसते, असे अनेकांचे प्राण अद्ययावत झालेल्या रुग्णालयाने वाचवले आहेत. थोडक्यात व्यावहारिक पातळीवर हिशोब जमा-खर्चाचा आहे. आणि पुढे डॉ. देशमुखांची झालेली प्रगती पाहता तो ताळेबंद शिलकीचा असावा असा तर्क करता येतो. 

यात मेल्या माणसांना केवळ एक एकक म्हणून मानण्याचे निर्मम, हिशोबी धोरण आहे. किंबहुना माणसाच्या जिवाबाबत नैतिकता आणि संख्याबळ यांच्यात निवड करणे हा अतिशय सनातन प्रश्न आहे. आणि त्यात कोणत्याही एका बाजूने कौल दिला तरी तो चुकीचाच भासत राहतो. (या नैतिकतेच्या प्रश्नाभोवती डॉ फिलिपा फूट या ब्रिटिश तत्वज्ञाने ट्रॉली प्रॉब्लेमची आखणी केली आहे. त्याचा उहापोह इथे ’ट्रॉली प्रॉब्लेम, गेम, द गुड प्लेस आणि नैतिकतेचे प्रश्न’ या लेखामध्ये केलेला आहे.)

या नाटकात निवाड्यापेक्षाही परस्परांवर केलेले डावपेच, त्यात प्रसंगी bluff म्हणजे बतावणीचा केलेला वापर अधिक रोचक आहेत. डॉ. चौधरी हा महत्त्वाकांक्षी, बेरकी माणूस आहे. नाटक मी जेव्हा जेव्हा वाचले तेव्हा मला तो जाळ्यात अडकलेल्या माशीभोवती धूर्तपणे जाळे विणणार्‍या कोळ्यासारखा दिसला होता. वास्तव ठाऊक असूनही ’थांबा मी पेंडसेला फोन करतो.’ म्हणत केलेली बतावणी असो की ’माणूस’ अखेर निघून गेल्यावर, या सार्‍या नाट्याचा कणभरही परिणाम मनावर शिल्लक राहू न देता, ताबडतोब उद्याच्या शेड्युलची चर्चा मंत्र्यांशी करु लागणे असो. ही दोन त्याच्या निर्लिप्त धूर्तपणाची उत्तम उदाहरणे आहेत.

त्याला आपण वृत्तीने डॉक्टर नाही तर मॅनेजर, व्यवस्थापक प्रवृत्तीचे आहोत हे पक्के ठाऊक आहे. त्याने स्वत:ला जसे अचूक ओळखले आहे, तसेच डॉ. देशमुखांच्या कचखाऊ महत्वाकांक्षेलाही. त्यामुळे त्याने एक प्रकारे त्यांना खांद्यावर घेऊन वाटचाल केली आहे. एका अर्थी देशमुखांना त्याने ’गुळाचा गणपती’ करुन ठेवले आहेत. त्यांच्या प्रगतीचा मार्ग त्यानेच आखला आहे. त्या मार्गावर आवश्यक त्या तडजोडी निर्ममपणे, प्रसंगी निष्ठुरपणेही केल्या आहेत आणि देशमुखांनाही करण्यास भाग पाडले आहे. देशमुख हे त्याचा मुखवटा आहेत किंवा प्रगतीची शिडी. देशमुखांच्या त्या शिडीवर एक पायरी मागे असला, तरी त्यांच्या सोबत तो ही वर वर चढत जातोच आहे.

'माणूस' कितीही निस्वार्थी असला, तत्वनिष्ठ असला तरी ती तत्वनिष्ठाच त्याच्या कार्यास अखेरीस मारक ठरते. आपण समुदायाच्या हितासाठी एका व्यक्तीच्या हिताकडे दुर्लक्ष केले असा दावा करणार्‍या डॉ. चौधरींना माणूस ’जोवर तुम्ही माणसाचे हित पाहात नाही, तोवर समुदायाच्या हिताची भाषा गैरलागू आहे’ असे बजावतो... आणि तिथेच त्याची माघार निश्चित होते. 

कारण नेमक्या याच कारणासाठी- पेंडसेंचा जीव वाचावा म्हणून, वाठारकरने माघार घेतली होती, आणि त्याच कारणासाठी माणूसही माघार घेतो, त्याला घ्यावीच लागते. त्याच्याच तर्काचा फास त्याच्या गळ्यात अडकवून डॉ. चौधरी आपली सुटका करून घेतात.

माणसे जीवितहानीबाबत आपली संवेदनशीलता कित्ती कित्ती तीव्र आहे हे दाखवण्याचा आटापिटा करत असतात.(अपवाद फक्त ’त्यांच्या’ गटातील जिवांचा. तिथे बालके मारली तरी समर्थनीय असते. कारण ती मोठी होऊन दहशतवादीच होणार असतात, किंवा झोपडपट्टीत राहून घाण करुण पवित्र देशाच्या प्रगतीला खीळ घालणार असतात, किंवा लायकी नसताना सरकारी पैसा वा नोकरी लाटणार असतात... म्हणे.) त्यामुळे डॉक्टर हा पैसा ओढण्यासाठीच बसलेला असतो, बेफिकिर असतो, त्यांच्या चुकीनेच माणसांचे जीव जातात या घट्ट गृहितकावर जगणार्‍या बहुसंख्येचा समाज या लेखातील डॉक्टरांची भूमिका समजून घेण्याच्या प्रयत्नाला भयंकर पाप वगैरे समजण्याची शक्यताच अधिक आहे. शक्यतांच्या जगात केवळ बरोबर-चूक या समजुतींवर जगणार्‍यांकडून याहून वेगळी अपेक्षाही ठेवता येत नाही.

- oOo -

१. नेमका हाच मुद्दा नैतिक राजकारणाच्या मृगजळाचे पेगच्या पेग रिचवत सत्ताकारणाला नाके मुरडणार्‍यांबद्दल मी मांडत आलो आहे. सत्ता राबवताना येणार्‍या मर्यादा नि बंधने बाहेर बसून नैतिकतेच्या जपमाळा ओढणार्‍यांना नसतात. चूक न करण्याची खात्री फक्त कृती न करणारेच देऊ शकतात. गंमत म्हणजे कृती न करणे हीच अनेकदा मोठी चूक असू शकते हे त्यांच्या ध्यानात येत नसते.

ता.क. : नाटकाचे पुस्तक हाती असेल तर त्याला लेखक-दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी लिहिलेली प्रस्तावना आवर्जून वाचावी.

---

’एक झुंज वार्‍याशी’ या नाटकातील एक वेचा इथे वाचता येईल.


हे वाचले का?

मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

ओळख

माणूस : ठीक आहे. मी तुम्हांला आता प्रामाणिकपणानं सांगतो. इथे येताना मी वाईटातल्या वाईट परिणामाला तयार होतो. पण आपल्या चर्चेमुळं मला खूप समाधान वाटलं. मी तुम्हांला बोलायला भाग पाडलं, एवढंच नव्हे तर सौदाही करायला लावला. आता मला केव्हाही इथून निघून जाता येईल. मला कोण दोष देणार ? मी ? वाठारकर ? चित्रा ? तुम्ही ? डॉक्टर चौधरी तर आनंदाने उड्या मारतील. पण माझ्या हिशेबी ते नसल्यासारखेच आहेत. एखाद्या मेलेल्या माणसासारखे आहेत ते मला—

डॉ० चौधरी: (हसतो. ) होय ! ठार मेलेला !

माणूस : ( तिथे लक्ष न देता) पण डॉक्टरसाहेब, तुम्ही तुम्ही निराळे आहात. आता फक्त तुम्ही आणि मीच. मी इथून गेल्यावर तुम्ही गाडी नाही बोलावणार. तुमच्या ह्या स्वीय सहकाऱ्यांना घरी जायला सांगणार आणि एकटेच इथे राहणार.

डॉ० चौधरी : मला कंटाळा आलाय ह्या बडबडीचा !

[ बाथरूमच्या दिशेने जातो. ]

एक झुंज वार्‍याशी

माणूस : (चौधरींच्या बोलण्याकडे लक्ष न देता ) आणि मग तुम्हांला मनःशांती लाभणार नाही. तुम्ही उदास व्हाल. स्वतःवरच चिडाल— तोंडात एक विचित्र चव आल्यासारखं वाटेल तुम्हांला. तुम्ही स्वतःलाच विचाराल, हे काय झालं ? हा कोण होता ? मला गुन्हेगार ठरवायला आला होता ? माझा आत्मा हिरावून न्यायला आला होता ? तो म्हणजे ज्या काळात मी एक उपाशीपोटी शिकणारा पण अत्यंत निर्मळ मनाचा कॉलेजविद्यार्थी होतो तो मी तर नव्हता तो ? पण मग मी त्याला लाथ मारून बाहेर कां हाकलला ? मी त्याला असं कां नाही म्हटलं, 'मिनिटभर थांब. तुझ्याशी मला बोलायचं आहे. न जाणो, तू योग्य वेळीही आला असशील...

डॉ० चौधरी : मी मेलेला असेन; पण मी वेडा नाही.

डॉ० देशमुख : ( कपाळावरच्या उंचवट्यावर बोटांनी रगडीत) एखादा पसरत जाणारा पुरळ एकदम उठावा तसं काहीतरी घटकेत इथे होतं. घटकेत इथे सरकतंय... सगळं काही चुकलंय असंच मला वाटायला लागलंय... सगळं काही चुकलंय... एकदम टेंपरेचर वाढतंय, एकदम उतरतंय... पण माझं मलाच त्याचं निदान करता येईनासं झालंय.

[ स्तब्धता. ]

तुमची ओळखच पटत नाही आहे मला— तुमची.

माणूस : माझी ?

डॉ० देशमुख : होय, तुमची! घटकेत तुम्ही तपासणी करणाऱ्याची भूमिका घेता, लगेच न्यायाधीश होता; एकदम बदनामीची धमकी देता आणि आता एकाएकी माझ्या सदसद्विवेकबुद्धीशी एकरूप होता. आहे काय हे ? आता माझ्या आत्म्याचीच काळजी वाटायला लागलीय तुम्हाला तुम्हाला ह्या गोष्टी करायला लावण्यामागली प्रेरकशक्ती कुठली ? प्लीज, सांगाल का मला ? दुसऱ्याच्या भानगडीत कशासाठी म्हणून तुम्ही पडता ? तो वाठारकर, आमचं केंद्र, माझं स्थान, माझा आत्मा— ह्यात तुम्हाला पडायचं काय कारण ? तुम्ही काय स्वतःला प्रत्येकाची सदसद्विवेकबुद्धी मानता, की स्वतःला सगळ्यांच्या वरचा न्यायाधीश समजता ?

माणूस : समजा, तुमच्याकडे चौकशीखात्याचा खराखुरा अधिकारी आला तर हाच प्रश्न त्याला विचाराल ? तुम्ही त्याच्या हेतूबद्दलसुद्धा शंका घेणार नाही. का ? केवळ त्याला ते काम करण्याबद्दल पगार मिळतो म्हणून ? पण मी हाच कायदा उचलून धरतोय... तीच मूल्यं...

डॉ० देशमुख : पण कुणीही अधिकार दिला नसताना तुम्ही कशासाठी ह्यात पडता ? तुम्हांला ही विकतची श्राद्धं घ्यायला कोणी सांगितलंय ? सरकार आहे. सार्वजनिक संस्था आहेत. तुम्ही त्यांच्यापाशी गेला असता तर मी समजू शकलो असतो. पुष्कळ लोक लेखी तक्रारी नोंदवतात. पण यापूर्वी कधी कोणी असा एखाद्या वेड्याच्या चिकाटीने एकट्याने उभा राहिलेला— जणू काय आपला दुसरा धंदा असल्यासारखा राबताना पाहिला नव्हता !

डॉ० चौधरी: एखाद्या अर्धवेळ दलालासारखा...

[ स्तब्धता. ]

माणूस : (निर्धाराने ) ठीक आहे. आता त्याचं काय म्हणा ! दलाल म्हणे ! मला दुसरा व्यवसाय नाही. एकच व्यवसाय आहे. मी मोडल्यातोडल्या वस्तू पुन्हा जशाच्या तशा करून द्यायच्या व्यवसायात आहे. मी म्यूझियमच्या अडगळ ठेवायच्या खोलीत माझा वेळ घालवतो. काजळी चढलेल्या मूर्तीचे चेहरे पुन्हा स्वच्छ करून देतो. कधी कधी एखादी बाई येते. मला चित्र दाखवते. म्हणते, अहो, हे किती जुनं असेल ? काय किंमत येईल ? तिला वाटतं, ते गेल्या शतकाबितकातलं आहे. पण ते त्या बाईच्याच वयाचं असतं. त्याला फारशी किंमत येण्यासारखी नसते. डोळे भरून येतात बिचारीचे. (दरवाजाकडे बोट दाखवीत ) तिला पाहिलंत तुम्ही. डोक सुन्न झालंय तिचं.

डॉ० देशमुख : पण हे सगळं प्रकरण आपल्या अंगावर घ्यायची काय गरज होती तुम्हाला ?

माणूस : मी का नाही घ्यायचं ? ह्या जगात आपण काय दुसरे लोक जे पिकवतात तेच खायला आलोय का ? आपण स्वतः झाडं लावून त्यांची फळं का नाही खायची ? माझ्या कानावर सतत एकच पडत असतं : प्रयत्नान्ती परमेश्वर. यश हे प्रत्येक माणसाच्या प्रयत्नावर अवलंबून असतं. दुष्ट प्रवृत्तीशी झगडा करा. आपलं सामर्थ्य कशात आहे ते पाहत जा. आपली सारी शक्ती दुसऱ्यासाठी अर्पण करा. प्रत्येकाने हे केलंच पाहिजे. प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे. हे सारखं ऐकू येत असतं मला— रेडियोवरून, वर्तमानपत्रांतून, टेलिव्हिजनवरून... कदाचित मी स्वप्नात वावरत असेन... पण तुमचं काय ? तुम्ही नाही हे वाचलंत ? तुम्ही नाही ऐकलंत ? तुम्ही स्वतः नाही हे कधी सांगितलंत ?

डॉ० देशमुख : (आश्चर्याने ) तुम्ही हे सगळं गंभीरपणाने बोलताय...

माणूस : म्हणजे ? ह्या शब्दांनी तुम्हांला हसू फुटलं का ?

डॉ० देशमुख : तुम्ही कृपा करून माझ्या बोलण्यातल्या शब्दाशब्दाची आणि वागण्याची अशी चिरफाड करायचं आधी बंद करा बघू. मी तुम्हांला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.

माणूस : त्या शब्दांवर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही ह्या खुर्चीवर बसलातच कसे ?

डॉ० देशमुख : हे पहा, तुम्ही एक बुद्धिमान गृहस्थ आहात. मग तुम्ही... मग तुम्ही प्रत्येक गोष्ट अशी शब्दशः खरी मानून का वागता ?

माणूस : मग कशी मानून वागायला पाहिजे ? तुम्हीच सांगा.

डॉ० देशमुख : हे पहा... मला नाही ठाऊक. पण प्रत्येक माणूस घोषणा खऱ्या करण्यासाठी धावत सुटलाय अस वाटतंय तुम्हाला? प्रत्येक माणूस— (पुढले बोलणे सुचत नाही. )

माणूस : बोला, बोला ना. तुम्ही स्वतःचा एकदेखील विचार कधी पुरा करीत नाही. जणू विसंगती दिसायला लागेल म्हणून घाबरता तुम्ही. आयुष्यात कधी तुम्हाला जे म्हणायचं आहे ते मोकळ्या मनाने, संपूर्णपणाने व्यक्त करायचा प्रयत्न केलाय तुम्ही ? हे सगळं सहन कसं करता तुम्ही, डॉक्टरसाहेब ? तुमच्या अंत:करणातली ती अंधाधुंदी... ते बावळट प्रश्न... त्यांची ती चालचलाऊ उत्तरं— मधेच अडवल्यासारखी... शेवटापर्यंत कधी जायचंच नाही... काहीही स्वच्छ स्पष्ट करायचं नाही. पंचावन्नावं वर्ष चालू आहे तुमचं...(स्वतच्या बोलण्यातच रंगून जाऊन) पंचावन्न झालीसुद्धा... फार तर आणखी दहा किंवा पंधरा वर्ष काम करता येईल तुम्हांला. भीती नाही वाटत तुम्हांला ? तुमचं हे मोठेपण, हे स्थान, ही खुर्ची... हे जाऊन सर्वसामान्य माणूस झाल्यावर काय होणार तुमचं ? काही नाही. कुणाशी संबंध नाही. गाडी नाही... 'जी हुजूर' करणारे अधिकारी नाहीत. काही नाही. फक्त एका दुबळ्या शरीरात राहणारा एक माणूस— अशा अवस्थेत त्यानंतर स्वतःशी खोटंही बोलता येत नाही. मोठ्या धैर्यानं स्वत:च्याच प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं द्यावी लागतात. टाळाटाळी नाही चालंत तिथं. हे असं होतं माझं आयुष्य ? त्या वेळी कोण देणार तुम्हांला सामर्थ्य ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला ? तुमच्या खात्यातले लोक ? हे तुमचे डॉक्टर चौधरी ? तुम्ही— फक्त तुम्ही. (आजुबाजूला पाहत ) सार्थ ठरलं का माझं आयुष्य ? हा शेवटला प्रश्न असेल. मी खूप विचार केलाय ह्या प्रश्नाचा. शेवटी मी ह्या निष्कर्षाला येऊन पोहोचलो: माणसाच्या जीवनाला काही रीतसर सूत्र हवं. नुसता सावळागोंधळ उपयोगाचा नाही. असं असलं तरच त्या जगण्याला काही अर्थ आहे. (खुर्च्या हलवायला लागतो. ) आयुष्य म्हणजे केवळ एक अपघातानं घडून आलेली योगायोगांची साखळी असण्यात अर्थ नाही. तुमच्या इच्छाशक्तीच्या बळावर आणि विश्वासावर तुम्ही स्वतः ते जीवन नीटपणानं रचलेलं आणि घडवलेलं असायला हवं. मला हे जेव्हा लख्ख उमजलं, तेव्हा चक्रावल्यासारखा होऊन गेलो मी. ह्या असल्या स्पष्टपणाची, बरं का साहेब, एक धुंदी असते. सगळं काही इतकं विशाल होतं की तुम्हाला कशाचं भय म्हणून राहत नाही. मला कशाचंही भय का वाटत नाही ? कारण मला कसं जगायचं आहे हे मला पक्कं माहिती आहे. कसं ? माझ्या अंतरंगातच मला एक शिस्त हवी आहे. तुमच्या कधी हे लक्षात आलंय ? निसर्ग माणसाहून अधिक श्रेष्ठ असं कधीही काही निर्माण करणार नाही. निसर्गाच्या संग्रहात आता देण्यासारखं आणखी काहीही उरलेलं नाही. फक्त तुम्ही. (टेबलही असं हलवतो की डॉ० देशमुख एखाद्या अपरिचित जागेवर उभे राहिल्यासारखे दिसतात. ) फक्त तुमचं जीवन. तुम्ही एवढंसं का होईना, पण सुसूत्र असं काहीतरी निसर्गाला देऊन थोडीफार परतफेड करू शकता. सावळ्यागोंधळांनी नव्हे. निसर्गाला सावळागोंधळ मान्यच नाही. सतत निवड चालू असते. निसर्गाला मान्य असलेली एकच गोष्ट आहे : माणसाला परिपूर्ण करणं.

- oOo -

पुस्तक: ’एक झुंज वार्‍याशी’
लेखक: पु. ल. देशपांडे
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
आवृत्ती तिसरी (१९९८)
पृ. ५४-५९.


हे वाचले का?

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

नो थॅंक्यू, मिस्टर ग्लाड

ग्लाडसाहेबाला पाहताच तुरुंगातली वडा-पिंपळाची झाडे चोरून उभी राहिली आणि फाशी गेटला कापरे भरले!

साहेब फाशी गेटच्या दरवाजाशी क्षणभर थबकला. आणि बऱ्याच विचाराअंती आपल्या रुंद जबड्यावर त्याने उसने हास्य आणले. नवख्या नटाने स्टेजवर यावे तसे कावरेबावरे होत हसू साहेबाच्या गालावर बिचकत थबकत येऊन उभे ठाकले. मग साहेबाने आपल्या जाडजूड भुवया इकडे तिकडे उडवत घसा खाकरून आवाजात थोडे मार्दव आणायचा प्रयत्न केला. नि साहेब नक्षलवाद्याच्या कोठडीसमोर येऊन उभा ठाकला.

थँक यू, मिस्टर ग्लाड

“हॅलो यंग बॉय, हाउ आर यू?"

साहेबाने विचारपूर्वक ठरवलेला पहिला प्रश्न दिमाखात फेकला. नक्षलवाद्याला ग्लाडसाहेबाचा कावा कळला. नि साहेबाला झटकत नक्षलवादी म्हणाला, “आय अ‍ॅम कैदी नंबर आठसो बयालीस, ए ट्रेटर, नक्षलाइट अँड नॉट ए यंग बॉय, मिस्टर ग्लाड ! "

नक्षलवाद्याच्या या तोडून टाकणाऱ्या उत्तराने सीनियर जेलरच्या उरात धडकी भरली. फाशी गेटच्या जेलरला कापरे भरले. ग्लाडसाहेब पिसाळणार असे त्यांना वाटले. पण ग्लाडसाहेब भडकला नाही. संतापला नाही. चिडला नाही. त्याने फक्त जमादाराला दरवाजा खोलण्याची खूण केली. वेंधळ्या जमादाराने धांदरटपणे पुढे येत जुडग्यातल्या किल्ल्या चार वेळा आलटत पालटत दरवाजा उघडला. मग साहेबाने जमादाराचे स्टूल स्वत:च उचलले नि नक्षलवाद्याच्या पुढ्यात फेंगड्या पायाने स्टुलावर बैठक मारली.

कोठडीत एक संशयी शांतता भरून राहिली. मग शिरस्त्याप्रमाणे साहेबानेच तिचा भंग कला. साहेबाने आधी आपला डावा डोळा जरा बारीक केला. उजव्या हातातली छडी डाव्या तळव्यावर आपटली आणि साहेब गडगडला... मोकळेपणाने गडगडला. मनापासून गडगडला. आणि खर्जात बोलला,

“बच्चा फौलाद का है फौलाद का!”

मग साहेब क्षणभर थांबला आणि नक्षलवाद्याच्या नजरेत नजर घालून डावा डोळा अधिकच बारीक करीत विचारता झाला,

"क्यों बे कैदी नंबर आठसो बयालीस, माझं काय वय असेल? अंदाज कर जरा!”

नक्षलवाद्याने एकवार ग्लाडसाहेबाला आपादमस्तक न्याहाळले नि पांढऱ्या होत चाललेल्या त्याच्या झुपकेदार मिशांना पाहात सांगितले...

"असेल बावन त्रेपन्न!”

नक्षलवाद्याच्या या उत्तरावर साहेब कडाडला...

“बेवकूफ गद्धा आहेस. माझं वय तुझ्या बापाएवढं आहे समजलास!”

स्वत:च्या वयाचा फायदा घेऊन वडिलकीचा अधिकार गाजवायचा प्रयत्न ग्लाडसाहेबाने केला खरा, पण त्याने नक्षलवाद्याच्या चेहऱ्यावरील सुरकुतीही हालली नाही. मग साहेब एकदम अजीजीने बोलू लागला.

"हे बघ पोरा, ज्याची मस्ती आमच्या अंगात आहे ती ही खाकी झूल देखील माणसाच्याच अंगावर चढवलीय बरं. आणि एक वडीलधारा माणूस म्हणून तुला सांगतो मर्सी-पिटिशनवर सही कर."

साहेबाने हातातला कागद नि पेन नक्षलवाद्यासमोर केले. पण नक्षलवाद्याने त्याकडे ढुंकूनसुद्धा पाहिले नाही आणि साहेबाने पण आपला प्रयत्न सोडला नाही.

"यू सी बॉय, तू एकदम सही करणार नाहीस. मला माहितीय. तुला त्यात अपमान वाटतो. वाटणं साहजिक आहे. पण मूर्खपणाचं आहे, चुकीचं आहे.”

“असं? कसं काय बुवा?" -तोंडाचा चंबू करीत टवाळीच्या सुरात नक्षलवाद्याने ग्लाडसाहेबाला विचारले.

साहेबाने त्या टवाळीकडे सरळ डोळेझाक केली आणि युक्तिवाद चालूच ठेवला.

"यू सी... क्लास वॉर... वर्गयुद्धावर तुझा विश्वास नाही का?” साहेबाने विचारले.

"ऑफ कोर्स आहे!" नक्षलवाद्याने उत्तर दिले.

"मग लढाईत चार वार, चार जखमा व्हायच्याच. आणि होणारा वार नेहमी शारीरिकच असतो असं नाही. तो मानसिकही असतो. खरा योद्धा हेही वार झेलतो, आणि अंतिम विजयासाठी माघारी फिरतो. तसा तूही आता माघारी फीर. माघार... अगदी तात्पुरती माघार. जीव वाचवण्यापुरती माघार. तुझा जीव लाखमोलाचा आहे हे विसरू नकोस. तुझ्यासारखी माणसंच क्रांती करतात."

“हे कोणी सांगितलं तुम्हांला?” साहेबाचे बोलणे मध्येच तोडत नक्षलवादी म्हणाला. “मिस्टर ग्लाड, क्रांती जनता करते. एखादा दुसरा माणूस नाही. माझ्या फाशी जाण्याने काही क्रांती दूर लोटली जाणार नाही.”

“हो, पण तुझ्या फाशी जाण्यानं काही ती जवळही येणार नाही. मग इतका हटवादी कशाला होतोस? मर्सी-पिटिशनमध्ये स्वत:चा अपमान कशाला समजतोस?” ग्लाडसाहेबाने प्रतिप्रश्न केला.

“स्वत:चे सारे मान अपमान गुंडाळूनच मी घराबाहेर पडलोय मिस्टर ग्लाड. मर्सी-पिटिशनमध्ये मी माझा अपमान समजत नाही, क्रांतिकारी चळवळीचा अपमान समजतो. या जुलमी सत्तेकडे स्वत:च्या प्राणांसाठी याचना करणे म्हणजे जनतेच्या क्रांतिकारी शक्तीवर अविश्वास दाखवणे आहे. एक क्रांतिकारक असून क्रांतिकारक चळवळीला कमीपणा आणणे आहे!” नक्षलवाद्याने उत्तर दिले.

नक्षलवाद्याच्या या उत्तराने ग्लाडसाहेब निरुत्तर झाला. राजकारण हा काही आपला प्रांत नाही हे ग्लाडसाहेबाला पुन्हा एकदा जाणवले. आणि मग त्याने सरळ त्याच्या भावनेलाच हात घालायचा प्रयत्न केला.

"तुझी क्रांती राहू दे बाजूला, त्यातलं मला काही समजत नाही. मला फक्त एवढंच समजतं की, तुझी बायको-मुलं निराधार आहेत. एकटी आहेत. तुला भेटायला लहानग्या पोराला कडेवर घेऊन शंभर मैल उन्हातान्हाची अनवाणी चालत आली होती ती!” ग्लाडसाहेब बोलला.

"मला माहितीय, मिस्टर ग्लाड. माझ्याशी लग्न केलं तेव्हापासूनच ती निखाऱ्यावरून चालतीय. शंभर मैलांची अनवाणी चाल तिला जड नाही!" नक्षलवाद्याने थंडपणे उत्तर दिले. पण नक्षलवाद्याच्या भावनेला हात घालता घालता खुद्द ग्लाडसाहेबच भावनेच्या आहारी जात होता.

“शब्दांचं सामर्थ्य फक्त स्पष्टीकरणापुरतं मोठं असतं पोरा, वस्तुस्थिती त्यानं बदलत नाही. तू मेलास तर तुझ्या बायकोचं आयुष्य वैराण होईल... उद्ध्वस्त होईल. ही वैराणता काय असते ती तुला काय माहीत? मला विचार. मला माहितीय आयुष्य वैराण होणं म्हणजे काय, उद्ध्वस्त होणं म्हणजे काय."

बोलता बोलता ग्लाडसाहेब हालला... गलबलला. आपल्या बोलण्याचा नक्षलवाद्यावर काहीच परिणाम होत नाहीय हे पाहून कातावला... चिडला आणि एकदम नक्षलवाद्याचे खंदे गदागदा हालवीत ओरडला,

"माणूस आहेस का जनावर? तू खोटारडा, लुच्चा, ढोंगी आहेस. रस्त्यावरच्या उपाशी पोराला पाहून तुझ्या आतडयाला पीळ पडतो पण स्वतःच्या बायकापोरांची तुला कणवही येत नाही होय रे? स्वत:च्या अहंकारासाठी त्यांचा बळी देतोयस तू?"... ग्लाडसाहेबाने विचारले.

“माझ्या बायकापोरांची तुम्हांला का एवढी कणव येतीय?” नक्षलवाद्याने चिडून विचारले.

“साध्या माणुसकीच्या नात्यानं”, ग्लाडसाहेबाने उत्तर दिले. तशी नक्षलवादी ताडकन् म्हणाला,

“तुमचा नि माणुसकीचा काय संबंध मिस्टर ग्लाड? माणुसकीशी नातं सांगायला छाताडात माणसाचं काळीज असावं लागतं. तुमच्यासारख्या नरपशूचा माणुसकीशी काय संबंध?”

ग्लाडसाहेबांचा हा अपमान वेंधळ्या जमादारालाही सहन झाला नाही आणि दंडा उगारत तो नक्षलवाद्यावर धावला. पण ग्लाडसाहेबाने त्याला हातानेच मागे लोटले. नक्षलवादी मात्र कडवट शब्दांत ग्लाडसाहेबाला सुनावत होता,

“आय नो. मला माहितीय. मी मर्सी-पिटिशन केला नाही हे सरकारच्या नाकाला झोंबलंय. मी सरकारची दखलही घेत नाही हे पाहून होम डिपार्टमेंटला अपमान वाटतोय, आणि म्हणून तुम्हांला सांगितलं गेलंय... माझी मर्सी-पिटिशनवर सही घ्यायला. तरीच परवापासून एवढी बडदास्त ठेवताय तुम्ही... गोडीगुलाबीने वागताय..." नक्षलवाद्याच्या या आरोपांनी ग्लाडसाहेब नुसता सुन्न झाला आणि बसून राहिला. अर्ध्या तासाने साहेब जायला उठला. क्षणभर कोठडीच्या दरवाजात थांबला आणि नक्षलवाद्याला म्हणाला,

“पोरा, अजून रांगतं पोर आहेस तू रांगतं पोर! तुला राजकारणही कळत नाही नि माणूसही कळत नाही. तुला कळणार नाही, मी तुझ्या दाराशी का येतो ते. कारण अजून तुझं आयुष्य कधी उद्ध्वस्त झालं नाही, वैराण झालं नाही. माणसाला ओळखणं इतकं सोपं नसतं पोरा. आणि राजकारण?... ते तुला समजत असतं तर सरकार तुझ्या मर्सी-पिटिशनची वाट पाहतंय असं तुला वाटलंच नसतं. ओ. के.! मी पुन्हा पुन्हा येईन. अखेरच्या क्षणापर्यंत येईन. मी तुला हकनाक फासावर चढू देणार नाही. बाय!”

साहेब फाशी गेटमधून चालता झाला तो तडक बंगल्यावर आला. मग त्याने क्षितिजाकडे नजर टाकली... सूर्य अस्ताला चालला होता. नक्षलवाद्याला कन्व्हिन्स करण्यात अख्खा दिवस गेला होता.

*

रात्र जसजशी गर्द होऊ लागली तसतसा साहेब अधिकाधिक तर्रर्र होऊ लागला. रोजचा रिवाजच होता त्याचा तो. साहेबाला खूप चढली की वैराण, उद्ध्वस्त माळावरही शेतेभाते डोलताना... फुलताना दिसत... पण आजची साहेबाची सारी नशाच वांझोटी होत होती. पेगच्या पेग घशाखाली उतरूनही साहेब स्वत:ला हरवून जाऊ शकत नव्हता... नक्षलवाद्याचे डसलेले शब्द तो काट्यासारखे काढून फेकून देऊ शकत नव्हता...

साहेब झुकांड्या खात डोलत उठला. अंधारातच बागेत आला. त्याने रातराणीचा मंद मत्त वास दीर्घ श्वासाबरोबर छाताडात घेतला. त्याने तो मोहरून गेला, तशी आपल्या छाताडात माणसांचे काळीज आहे याची त्याला पुन्हा बालंबाल खात्री पटली... मग लाडाने त्याने रातराणीला कुरवाळले.

ग्लाडसाहेबाचे रातराणीवर फार फार प्रेम होते. त्याला सूर्यप्रकाशात नखरे करणारी लडिवाळ फुलझाडे आवडत नसत. क्षुद्र माणसांप्रमाणेच त्याला ती वाटत, फक्त सुखात वाटेकरी होणारी. पण 'रातराणी' ?

... ग्लाडसाहेबाने रातराणीला पुन्हा एकदा कुरवाळले. जेव्हा सूर्य अस्ताला जातो नि निबिड रात्र साऱ्यांना घेरून टाकते तेव्हा नाजूक रातराणीच ताठ्यात उभी राहते. अंधाराला नाक मुरडीत आपल्या मंद सुवासाने वातावरण दरवळून टाकते.

साहेबाने डोळे फाडफाडून अंधाराकडे पाहिले. ठणा ठणा पडणाऱ्या बाराच्या ठोक्यांबरोबर तो काळरात्रीचा निबिड अंधार सारी सृष्टी बकाबका खात चालला होता. आधी मोठमोठ्या झाडांना, नंतर तुरुंगाच्या दगडी भिंतींना आणि आता ग्लाडसाहेबाच्या बंगल्यालाही. घाबरून साहेब रातराणीच्या कुशीत शिरला.

इवलीशी नाजूक रातराणी मात्र टेचात उभी होती. निबिड अंधाराला वाकुल्या दाखवीत प्रसन्न हसत होती. गेस्टापोंच्या तावडीतल्या माराप्रमाणे माराच्या आठवणीने साहेब पंख तुटलेल्या पाखराप्रमाणे तडफडू लागला. रातराणीला छातीशी धरून गदागदा हलवू लागला. नि साहेबाने आतल्या आत टाहो फोडला...

“मारा ऽऽ मारा ऽऽ"

रातराणीने साहेबाला छातीशी लावून पाठीवरून मायेचा हात फिरवीत समजूत काढली. मग थोड्या वेळाने साहेब भानावर आला. आणि पुन्हा त्याला नक्षलवाद्याचे शब्द डसले. मग साहेब संतापला, चिडला आणि दातओठ खात पुटपुटला,

“भांचोद, चार पुस्तकं वाचली म्हणून स्वत:ला फार विद्वान समजतो काय? मला माणसाचं काळीज नाही म्हणतो? भडवा साला..."

साहेब रागाच्या सपाट्यातच रातराणीच्या कुशीतून उठला आणि दिवाणखान्यात गेला. नाइट गाऊन फेकून कशीबशी अधिकाराची वर्दी त्याने अंगावर चढवली. कमरेला लेदर बेल्ट अडकवून त्याने खिशात मर्सी-पिटिशन कोंबला आणि तुरुंगाकडे तो चालू लागला...

काळ्याशार डांबरी रस्त्यावर पावले खाड् खाड् वाजू लागली. रस्ता निर्मनुष्य झाला. आसपासच्या झाडावरल्या रातकिड्यांची किरकिरही शांत झाली...

गार्ड-ड्यूटीवरल्या हवालदारांनी सलामी दिली. मेन गेटच्या पहारेकऱ्यांनी गडबडीने मेन गेटचे दरवाजे उघडले. ग्लाडसाहेबाने तुरुंगात पाऊल टाकले. ग्लाडसाहेबाचे पाऊल तुरुंगात पडले नि साखर झोपेत असलेले कैदी घाबरून बिस्तर्यात उठून बसले. मध्यरात्रीचा साहेब तुरुंगात आलेला पाहून नाईट ड्यूटीचा वॉचमन, वॉर्डर, शिपाई, जेलरांची एकच धावपळ उडाली.

ग्लाडसाहेबाने फाशी गेटमध्ये शिरता शिरताच डरकाळी फोडली,

“ए कैदी नंबर आठसो बयालीस."

साहेबाच्या डरकाळीने वेडा कैदीही उठून जागा झाला!

ताड् ताड् पावले फेकीत ग्लाडसाहेब नक्षलवाद्याच्या कोठडीसमोर येऊन उभा ठाकला. त्याला पाहताच नक्षलवाद्याने नेहमीचे मंद स्मित करीत विचारले,

“हॅलो, मिस्टर ग्लाड, हाउ आर यू?"

पण नक्षलवाद्याच्या त्या मोहिनी हास्याचा आज ग्लाडसाहेबावर काहीच परिणाम झाला नाही. तो फाशी गेटच्या वेंधळ्या जमादारावर खेकसला.

“बुबुळांच्या खाचा झाल्या काय तुझ्या? दरवाजा खोल.”

वेंधळ्या जमादाराची त्रेधातिरपीट उडाली. कसेबसे कुलूप उघडून त्याने सुटकेचा श्वास सोडला.

वेंधळ्या जमादाराने कुलूप उघडताच साहेबाने एक कचकचीत लाथ दरवाजावर घातली. कोठडीचा लोखंडी दरवाजा थाड्कन दगडी भिंतीवर आपटला आणि त्या आवाजाने सारा तुरुंग दुमदुमला.

साहेब कोठडीत शिरला आणि दुसऱ्या लाथेसरशी त्याने सर्व कवितांची पुस्तके कोठडीभर विखरून टाकली. मग दोन-चार पुस्तकांवर थयाथया नाचत तो नक्षलवाद्यावर ओरडला.

“कविता वाचतोस होय रे भडव्या, कविता वाचतोस?”

मग कवितांची पुस्तके पुरेशी पायदळी तुडवल्यावर त्याने नक्षलवाद्याची गचांडी धरली अन् त्याला गदागदा हालवीत विचारले, “बोल, मर्सी पिटिशनवर सही करतोस की नाही?"

नक्षलवाद्याने निर्धाराने नकारार्थी मान हालविली. त्याच्या ठाम नकाराने साहेब अधिकच खवळला आणि दोन्ही हातांनी त्याने नक्षलवाद्याला हवेतल्या हवेतच उचलले नि एकदा या व एकदा त्या अशा चारी भिंतींवर दणादणा आपटायला सुरुवात केली. रिटायर व्हायला आलेल्या ग्लाडसाहेबाच्या अंगातली ती मस्ती, ती रंग, आणि अचाट ताकद पाहून फाशी गेटचा वेंधळा जमादार नुसत्या भीतीनेच थरथर कापू लागला.

भिंतीवर आपटून आपटून नक्षलवाद्याची हाडे खिळखिळी करून झाल्यावर ग्लाडसाहेबाने त्याला दाणकन फरशीवर पटकले. इतका मार बसूनही नक्षलवादी धडपडत उठला आणि ताठ मानेने छाती काढून ग्लाडसाहेबासमोर उभा राहिला. आपल्या राठ पंजात नक्षलवाद्याचे तोंड पकडन ग्लाडसाहेब ओरडला.

“कुत्रा समजतोस काय मला? सरकारच्या हुकमानं तुझा मर्सी-पिटिशन मागतो असं वाटतंय काय तुला? हरामखोर, मला काय काळीज नाही?... भडव्या तुला काळीज नाही, तुला मन नाही. हलकट, लुच्चा, ढोंगी आहेस तू..."

ग्लाडसाहेबाने एकावर एक कचकचीत थोबाडात भडकावत सरबत्ती चालू केली...

“साला, कविता वाचतो कविता. त्या बिचारीला विधवा करणार. इवल्याशा लेकराला तू अनाथ करणार. आणि भडव्या, कविता वाचतोस काय?”

ग्लाडसाहेबाने रेड्याच्या ताकदीने दोन ठोसे नक्षलवाद्याच्या छाताडावर लगावले. इतका बळकट आणि जवान नक्षलवादी, पण तोही कोकरासारखा हेलपाटला, खाली पडला. मग साहेबाने त्याच्या छातीवर आपले गुडघे रोवले नि त्याच्या झिंज्या पकडून त्याचे डोके उचलीत विचारले,

“हरामखोर, त्या बिचारीच्या पायाला भेगा पडल्या अनवाणी चालून तुझ्यासाठी. गूखाऊ आता स्वतःला फासावर चढवून घेऊन तिच्या काळजाला चिरा पाडणार काय तू? माझ्यासारखं तिचंही आयुष्य तू वैराण करणार... उद्ध्वस्त करणार?”

एका झटक्यात ग्लाडसाहेबाने नक्षलवाद्याला उभे केले आणि उरल्यासुरल्या चार थोबाडांत पुन्हा भडकावीत ओरडला, “नीच, हलकट तू क्रांतिकारक नाहीस. गेस्टापो आहेस गेस्टापो. हिटलर... नाझी.... फॅसिस्ट आहेस तू !”

बसलेल्या असह्य माराने नक्षलवादी जमिनीवर कोसळला. ग्लाडसाहेबही आता थकला होता, दमला होता. त्याचे सारे अंग घामाने थबथबले होते... अत्याचाराच्या आणि दारूच्या धुंद नशेतही त्याला नक्षलवाद्याच्या बायकोच्या पायाला पडलेल्या भेगा आठवल्या... गॅस चेंबरमध्ये जळणारी मारा आठवली आणि डोळे घट्ट मिटून घेत ग्लाडसाहेबाने आतल्या आत टाहो फोडला…

"माराऽऽ माराऽऽ"

- oOo -

पुस्तक: ’थॅंक यू, मिस्टर ग्लाड’
लेखक: अनिल बर्वे
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती सहावी, दुसरे पुनर्मुद्रण (२०२०)
आवृत्ती पहिली: १९७५
पृ. ३२-३८.


हे वाचले का?

शनिवार, १७ एप्रिल, २०२१

वेचताना... : माचीवरला बुधा

(सुमारे दहा बारा वर्षांपूर्वी अविनाश चव्हाण या काहीशा अबोल पण रसिक मित्राशी ओळख झाली. व्यवसायाने बिल्डर असलेला हा मित्र प्लॅन, परवानग्या, विटा, सिमेंट, वगैरे जगातून वैतागून बाहेर पडायचा नि आम्हा दोन-चार मित्रांना पकडून त्याच्या ऐसपैस गाडीत घालून भटकायला घेऊन जायचा. या भटकंतीचा मुख्य उद्देश असे गप्पा. इंटरनेटवरुन आमची ओळख झाली ती अक्षरश: एकाच क्षणी आम्ही दोघांनी ’पाडस’ या पुस्तकाबाबत लिहिलेल्या प्रतिसादामुळे. त्यामुळे या गप्पांमध्ये मुख्यत: पुस्तके नि चित्रपट यावर घनघोर चर्चा चालत. ’राशोमोन’वर मी लिहिलेल्या मालिकेनंतर पाडस, माचीवरला बुधा ही दोन पुस्तके आणि मॅट्रिक्स चित्रपट मालिका यावर मी लिहायला हवे असा त्याचा आग्रह होता. मैफल सोडून तो मध्येच निघून गेल्यानंतर पाच-सहा वर्षांनी बुधावर लिहिण्यास मुहूर्त लागला आहे. हा लेख त्याच्याच स्मृतींना अर्पण. )
---

माचीवरला बुधा

आयुष्याच्या संध्याकाळी जगण्यातील ईर्षा मावळू लागल्यानंतर माणूस हळूहळू अंतर्मुख होऊ लागतो. बालपणाकडे परतुनि येण्याची, जगण्याच्या मुळांना पुन्हा स्पर्श करण्याची ही ओढ माणसांना कायमच राहते. माणूस काय साध्य केले, काय मिळवले, काय जमले नाही, काय गमावले याचा धांडोळा घेऊ लागतो. जगण्याचे धुके विरत जाऊन बालपणी पाहिलेली, जगण्याच्या संघर्षात वा मिळेल ते कमावत राहण्याच्या अहमहमिकेत हरवून गेलेली काही स्वप्ने पुन्हा स्वच्छ दिसू लागतात. भौतिक यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केलेल्यांनाही ’परत फिरावे घराकडे अपुल्या’ची ओढ लागत असते. मग आपल्या मुळांकडे, बालपणाकडे आणि पर्यायाने गावाकडे परतुनि जाण्याचा विचार सुरु होतो. 

पण अनेक स्टेशने पुढे गेलेली जगण्याची गाडी वळवून मागच्या स्टेशनांकडे नेणे इतके सोपे नसते. बालपणाचे तुटून गेलेले, विरलेले धागे आणि दरम्यानच्या जगण्यात नव्याने निर्माण झालेले नि बळकट होत गेलेले बंध, या निर्णयासमोर अडथळा म्हणून उभे राहतात. मग स्वत:पुरता दिलासा म्हणून 'आपण नाही, आपले नाव तिथे राहावे' अशी धडपड माणसे करतात. 

जगण्यासाठी पोटाच्या पाठी लागून गावांतून, छोट्या शहरांतून मुंबईसारख्या मोठ्या शहरांत आलेले, किंवा नव्या स्वप्नांच्या शोधात अमेरिकेसारख्या स्वप्नप्रदेशाकडे उडत उडत गेलेले लोक, आपल्या मायभूमीमध्ये एखादे घर विकत घेऊन ठेवतात. जगात कुठल्याही भूमीच्या कुशीत वास्तव्य असले, तरी नाळ इथे जोडलेली आहे हे स्वत:च्या स्मृतितून निसटू न देण्याचा तो एक प्रयत्न असतो.

'पासोव्हर' या सणाला जगभरातले ज्यू जसे ’पुढल्या वर्षी जेरुसलेम’ असा निर्धार करतात, तसे निवृत्तीनंतर वा उतारवयात त्या घरात परतून जाऊ अशा दुबळ्या आशेवर वर्तमानातले, अन्य भूमीतले जगणे सुखाने जगत राहतात. पण आपल्या घरट्याकडे परतुनि जाण्याचा तो निर्धार प्रत्यक्षात आणणारा अगदी विरळा. नव्या जगातली नि जुन्या जगातली तफावत त्यांना प्रकर्षाने जाणवत राहते. परतून जाताना जुन्या जगातली अभावाची छिद्रे त्यांना प्रकर्षाने दिसत राहतात, आणि त्यांचा निर्धार हळूहळू ढासळत जातो. मग तो निर्णय हळूच पुढे ढकलून ’रद्द झालेला नाही’ याचा खोटा दिलासा ते स्वत:ला देत राहतात.

पण भौतिक बाजूखेरीज भावनिक पातळीवरही माणूस बालपणाकडे परतून येत असतो.... ’सिटिझन केन’ या अतिशय प्रसिद्ध चित्रपटात धनाढ्य उद्योगपती चार्ल्स फॉस्टर केन याने आपल्या अखेरच्या क्षणी उच्चारलेल्या ’रोझबड’ या शब्दाचा वेध पत्रकारांना त्याच्या बालपणाकडे घेऊन जातो. अंतर्बाह्य खलनायक म्हणून रंगवल्या गेलेल्या दुर्योधनावर ’मातृगर्भाशयाची ओढ’ या शीर्षकाचा लेख अरुणा ढेरे यांनी लिहिलेला आहे. त्यात गांधारी आणि दुर्योधन यांचे नाते आणि अखेरच्या क्षणी त्याने तळ्याचा आश्रय घेणे यातील संकेतार्थ उलगडून पाहिला आहे. 

’आपली नाळ जिथे पुरली तिथेच आपली राखही पडावी’ या तीव्र इच्छेने मुंबईकर चाकरमानी बुधा चर्‍हाटेही आपल्या बालपणीच्या जगाकडे, राजमाची किल्ल्याकडे परतून येतो. परतून आल्यावर आपल्या बापदाद्यांच्या त्या भूमीवर सजीव-निर्जीवाशी नाते जोडत जातो.

बुधाचे परतून येणे हे केवळ स्मरणरंजनस्वरूप नाही. लहानपणी जमवलेल्या पोस्टाच्या स्टॅंप्सकडे किंवा आपण गिरवलेल्या पहिल्या मुळाक्षरांकडे ज्या साक्षीभावाने पाहतो तसे नाही. पाहिले नि वही मिटून ठेवत दुसर्‍या क्षणी वर्तमानात परत जाणे नाही, की मुंबईतून एखाद्या सप्ताहाअखेरीस दोन दिवस आपल्या गावी बांधून ठेवलेल्या घरात उतारकरूसारखे राहायला येणेही नाही. तो येतो तो त्या भूमीत आपली मुळे रुजवण्यासाठीच. त्यासाठी त्या राहाळाचे रहिवासी असलेल्या झाड-झाडोर्‍यांपासून, जीव-जिवारांशीही नाते जोडत जातो. म्हणून दाण्डेकरांनी बुधाच्या कहाणीला ’माचीवरला बुधा’ असेच शीर्षक दिले आहे. जुन्या म्हणीला किंचित बदलून घेत ’माचीतून येसी माचीस मिळसी’ अशी या बुधाची कथा आहे.

बुधाच्या या परतुनि येण्याच्या आसक्तीची तुलना साहित्यात करायची झाली तर हेन्री डेविड थोरोच्या ’वॉल्डन’ किंवा जॅक लंडनच्या ’कॉल ऑफ द वाईल्ड’शी करता येईल. पण थोरो जरी निसर्गाकडे जात असला, त्याच्याशी एकरूप होऊ पाहात असला, तरी बुधाप्रमाणे त्याची मुळे तिथे नाहीत. त्याने निवडलेल्या जागी तो तसा उपरा आहे. एका विशिष्ट तात्विक भूमिकेतून तो ते नाते जोडू पाहतो आहे. त्यात एक प्रकारे निसर्ग संरक्षकाची, पालकाची, वरचढ असल्याची भूमिका तो घेतो आहे.

तर दुसरीकडे आमीश या नावाने ओळखला जाणारा एक पंथ निसर्गाने देऊ केलेल्या गोष्टींवरच संपूर्ण उपजीविका करण्याच्या जिद्दीने राहतो. पण त्यातही बदलांना, तांत्रिक प्रगतीला अट्टाहासाने दिलेला नकार अंतर्भूत होत असतो. बुधा अशी कोणतीच भूमिका मांडत नाही. आपली माती लाडक्या माचीच्याच परसात पडावी एवढीच त्याची माफक इच्छा आहे.

त्या असोशीने तो मुंबईहून निघतो. मुंबई ते माचीच्या घेर्‍यातले टेमलाईचे पठार या प्रवासादरम्यानची त्याची उलघाल, असोशी दाण्डेकरांनी सुरेख टिपली आहे. लोणावळ्याला उतरुन माचीकडे निघालेल्या बुधाच्या चालीबद्दल दाण्डेकर म्हणतात, ’जणू त्याला पाय नव्हतेच, होते ते पंख.’ त्याच्या चित्तवृत्तीवर परिसरघटकांचे होणारे परिणाम, परिचिताचे दर्शन होताच निवत जाणारा त्याच्या मनातला संभ्रम आणि गमावलेपणाची शंका त्याला माचीच्या एक एक पाऊल जवळ घेऊन जातात. एक एक परिचित पान, टेकाड, वाट, माणसे पाहात पुढे जाताना ’माहेरी’ आल्याची त्याच्या मनात रुजत जाणारी भावना वाचकाच्या मनात हलके हलके उतरत जाते.

बुधा चर्‍हाटेच्या घराण्याकडे माचीवरच्या पाण्याच्या टाक्यांच्या देखरेखीचे काम होते. या राखणदारांच्या उदरनिर्वाहासाठी टेमलाईच्या पठारावरचा तो तुकडा राजाकडून इनाम म्हणून मिळालेला. त्यात भात, नागली, वरी, खुरासणी (कारळे) यांची पिके काढत त्याच्या पूर्वजांनी उदरनिर्वाह केलेला. आता बुधाही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून जगू पाहतो आहे. काळाच्या ओघात गडाचे मानकरी माचीला सोडून बुधाप्रमाणेच पोटामागे परागंदा झालेले.

इथे असा एक विचार मनात येतो की गडकोट ही सत्तास्थाने असलेली व्यवस्था होती तेव्हा हे जंगलवासी कातकरी, ठाकर, जित्राबांमागे पोटासाठी वणवण करणारे धनगर हे विशिष्ट कामाचे मानकरी होते. त्या व्यवस्थेत त्यांच्या उदरनिर्वाहाची हक्काची सोय लावली होती. 

लोकशाहीच्या नव्या व्यवस्थेमध्ये जेव्हा ’सर्व नागरिक सारखेच’चा - कदाचित फसवा - उद्घोष झाला, तेव्हा या नव्या व्यवस्थेमध्ये यांना हक्काची जागा उरली नाही. मग माचीचे मानकरी मुंबईला जाऊन चाकरमानी झाले. गिरण वा कंपनी बंद केली वा मालकाची खप्पा मर्जी झाली की बेरोजगार होऊ लागले. ’राष्ट्राची संपत्ती ही सर्वांची, जो जो ओरबाडेल तयाची’च्या जमान्यात दर्‍याखोर्‍यात, जंगलात विखरुन पडलेले हे लोक संघटित शहरी जमावापुढे कसे टिकाव धरणार? 

एखादा बुधा परतून येऊ शकतो कारण परतून येण्यासाठी त्याचे काहीतरी तिथे शिल्लक आहे. उरलेले बहुतेक सारे एकतर जगण्याची पालं उचलून परागंदा झालेले असतात किंवा शहरी जगात मिळवण्याच्या अहमहमिकेमध्ये अमेरिका-स्थित भारतीयांप्रमाणॆ ’थोड्याच वर्षात परत येणार’चा फसवा दिलासा स्वत:ला नि इतरांना देत राहतात.

हा शहरी दृष्टीकोन पुरा रुजलेला, मुंबईतच लहानाचा मोठा झालेला बुधाचा मुलगा भिवा आपल्या बापाला भेटायला येतो. आपल्या प्रवासाबाबत सांगताना तो म्हणतो ’लोनावळ्याला उतरलो साडेपाचला- न्हाई, साडेपाच वाजून तीन मिंटांनी...' तो पुरेपूर मुंबईकर झाल्याचे हे निदर्शक आहे. बुधा ज्या ठिकाणी राहतो, तिथे सकाळ, दुपार संध्याकाळ आणि रात्र असा चार टप्प्यात मोजला जाणारा दिवस त्या मुंबईकरासाठी मात्र १४४० मिनिटांच्या टप्प्यांत विभागला गेला आहे. 

आता दोघांच्या जगण्याच्या वाटा जशा वेगळ्या झाल्या आहेत, तसेच त्यांच्या काळाचा अक्षही वेगवेगळा झाला आहे. एकाच घरात राहूनही अनेकदा दोन पिढ्यांच्या आयुष्यातील काळाचे परिमाण वेगळे असते. अलीकडेच पाहिलेल्या ’मसान’ या हिंदी चित्रपटात एकाच भूभागावर राहणार्‍या भिन्न व्यक्तींसाठी असलेला भिन्न काळाचा अक्ष फारच सुंदरपणे मांडला होता. इथे तर बुधा आणि भिवा हे तर सर्वस्वी वेगळ्या परिसंस्थेत जगत आहेत.

बापलेकांची ही भेट म्हणजे तुमचे-आमचे शहरी जगणे आणि बुधाचे जगणे यांच्या परस्पर-विसंवादाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. बापाला भेटायला आलेला भिवा त्याच्या आवडीच्या बिडीचे बंडल घेऊन आला आहे, त्याचवेळी आपण सिगरेटशिवाय काही ओढत नाही हे आवर्जून सांगतो आहे. आता बुधाने मात्र बिडी सोडून चिलमीशी सलगी केली आहे. 

भिवाच्या बोलण्यात येणारे सारे विषय हे त्याच्या/त्यांच्या मुंबईतील आयुष्याशी निगडित आहेत. बापाच्या या नव्या जगण्याबाबत त्याला काडीचे कुतूहल नाही. बापाच्या जगण्याच्या देखण्या, दखलपात्र पैलूंबाबत तो उदासीन आहे. भिवाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेल्या सार्‍या सजीव-निर्जीवांच्या मेळ्याला तो ’बिरान्या** गावचा गोतावळा’ म्हणून त्यांची संभावना करतो आहे. ते सारे त्याच्या जाणिवेचा भागच नाही. (परस्परांपासून दूर राहिल्याने बाप-लेकांमध्ये आलेला अंतराय, एकमेकांच्या जगण्याला सामोरे जाताना कसा विरघळत जातो हे मांडणार्‍या ’पोस्टमेन इन माउंटन’ या नितांतसुंदर चित्रपटाची इथे आठवण होते. ) 

बुधा आता स्वयंपूर्ण आहे, आपल्यावर अवलंबून नाही, याचे भानही त्याला नाही. बाप आता नवकरी सोडून बसला आहे, म्हणजे एक प्रकारे खुडूक झाला आहे. आणि आपण कमावते झालो, म्हणजे घरचे कर्ते आता आपण आहोत असा त्याचा समज झालेला आहे. तेव्हा आता बुधाने आपल्या मतानेच वागायला हवे असा काहीसा आविर्भाव त्याच्यात दिसून येतो. 'परत मुंबईला जायचे आहे' असे फर्मान सोडून बाप येणारच, नव्हे त्याला यावेच लागणार असे गृहित धरुनच तो वागतो. यात एका बाजूने बापाच्या भल्याची चिंता असली, थोडाफार घरचा स्वार्थ असला, तरी आता बापाच्या मताला काही किंमत द्यावी असे त्याला वाटत नाही हेच महत्त्वाचे दिसते.

बुधाच्या कथेचा आधार असलेल्या भाषेबद्दल आवर्जून बोलायला हवे. दाण्डेकरांची भाषा प्रवाही आहे. अर्थ शब्दांतून समजून घ्यावा लागत नाही तो मागुते येतोच आणि शब्दांशिवाय तुमच्या मनात रुजून जातो. बोली भाषेतील अनेक सुंदर शब्दांचा असलेला वापर करकरीत व्यवहारी भाषेची सवय असणार्‍या वाचकालाही सहजपणे उचलून बुधाशेजारी, त्याच्या शेजारी, त्या टेमलाईच्या पठारावर नेऊन सोडतो. त्या भाषेच्या मार्दवामुळेच त्याच्या आसमंताशी बुधाने जोडलेली नाती सहजपणे उलगडत जातात.

वाघाटीच्या कुरवाळण्याचा मान करुन बुघा पुढं चालला... रानजुई डोक्यात दहावीस पांढरीफेक फुलं खोवून तोर्‍यात उभी असलेली त्यानं पाहिली... निळं निळं पाणी फुलिया फळिया वोळणार्‍या* वनस्पतींच्या मुळ्यांतून वाहात होतं. त्या मुळ्यांचा कस घेऊन... घाणेरी फतकल घालून बसली आहे.... धसमुसळ्या कांडेसांबरीनं ऐसपैस मांडा ठोकून आपले हातपाय पसरले होते... त्यांचा हरीख कोंबांवाटे बाहेर पडला... दोन-अडीच महिन्यांची मुसळधार पिऊन जणू सगळं रान उतलंमातलं होतं... बुधा (कोळ्याच्या) जाळ्याजवळ उभे राहून ते कवतिक न्याहाळू लागला... सगळं उगवतीकडच्या तांबड्यानं देखणं होऊ लागलं... रान तांबूस पालवीनं साजरं झालं...

बोली भाषेतील विशिष्ट शब्दही असे आहेत की त्या शब्दातूनच एक आपुलकी, एक बंध सहजपणे दिसतो. हजार पानांनी पिंपळ ’पाल्हेजला’ असं दाण्डेकर म्हणतात. कुत्रा ’किरण बांधून’ बसला म्हणतात, पावसाळा 'उबाला' म्हणतात, त्याच्या बाळमनी असा हेतू ’उदेजला’ होता म्हणतात. पायवाटेला ’पावटी’ असा आपुलकीचा शब्द वापरतात. याखेरीज चघाळ (शेकोटीच्या आगीला चघळायला द्यायचे ते चघाळ), नसराणेपणा (नखरेलपणा), मध चुपीत बसणे असे काही सोपे, नि ते माहित नसलेल्या वाचकालाही अर्थाची उमज सहज पडावी असे काही शब्दही सोबत येतात. चिलीम पेटवताना पहिली ठिणगी पडली, शेवाळ धुमसू लागले की फुंकर मारुन जाळ करण्याला त्यांनी ’वारा पाजला’ असा वाक्प्रचार वापरला आहे.

'पाण्याची शीतळवंती त्याच्या पायाच्या जाड कातडीतून आत शिरुन त्याच्या शरीरात भिनली. सगळं सुखच सुख झालं'. (पान ७) ज्यांनी कधी ट्रेकिंग केले असेल, त्यांना 'सुखच सुख झाले' याचा अर्थ सहज जाणवेल, कदाचित पायाखाली त्या गार पाण्याचा आभासही होईल. काही तास रखरखाटातून पायपीट केल्यावर समोर आलेल्या ओढ्यात पाय सोडताच 'सुखच सुख झाले'चा अलौकिक अनुभव येतो. त्याची तुलना कित्येक तासांची पायपीट करुन अखेर गडावर पोचल्यावर होणार्‍या सुखाशीच होऊ शकते. 'आपण ही तंगडतोड करण्याच्या फंदात का पडलो’ असा वैताग चरमसीमेला पोचला असताना ही दोन्ही सुखे समोर येतात, तेव्हा आता इथून हलूच नये असे वाटावे इतके ’सुखच सुख होते’. घरबसल्या नेचर वीडिओज्‌ बघणार्‍यांना त्याचा लाभ होत नसतो.

’मी याच राहाळाचं ल्येकरु-’ असं बुधा म्हणतो, तेव्हा हा म्हातारा स्वत:ला ल्येकरु म्हणतो म्हणून त्याच्या नातवाच्या वयाची मुलं खुदुखुदू हसतात. पण हे वाचणारा संवेदनशील वाचक मात्र अंतर्मुख होतो. दाण्डेकरांनी ’घर’ वा वस्ती अधिक सरावलेला शहरी शब्द न वापरता ’राहाळ’ असा अस्सल बोली भाषेतला शब्द वापरला आहे. 'वस्तीला राहाळापर्यंत पोचण्यासाठी बराच पल्ला गाठावा लागतो’ असं म्हटलं तर बहुतेक शहरी मंडळी बुचकळ्यात पडतील अशी शक्यता आहे. 

जिथे अनेक जण सोबत राहातात, जगणे वाटून घेतात ते राहाळ. संपूर्ण राहाळाला जोडणारे असे बंध असतात. त्यातील सर्वांचेच परस्परांशी नाते प्रस्थापित झालेले असते. ज्याचे दार लावले असता आतले नि बाहेरचे अशी विभागणी पुरी होते ते ’घर’, आणि व्यावहारिक नात्याने जोडलेल्या अशा घरांची 'वस्ती' होते. घर एकाचे वा कुटुंबाचे असते, तर वस्ती या शब्दात काहीसा उपरेपणाचा आभास होतो. त्यामुळे त्या राहाळात पोचताच आईबापाच्या कुशीत आल्याचा जो आनंद, श्रांतपणा निवल्याची जी भावना बुधाच्या मनात उमटते तिने नकळत त्या वाचकाचेही डोळे ओलावले तर आश्चर्य नाही.

दारी येणार्‍या खारुटल्यांसाठी बुधा नागलीच्या भाकरी करतो. केवळ त्यासाठीच जमिनीच्या एका तुकड्यावर नागली पेरतो. त्या भाकरींचे नीट तुकडे व्हावेत म्हणून एक दिवस त्या तशाच ठेवून देतो. त्यांना मुंग्या लागू नयेत म्हणून गवताचे शिंके करुन त्या टांगून ठेवण्याची खबरदारीही घेतो. दुसर्‍या दिवशी त्या चुरून त्यांना खाऊ घालतो. नागर आयुष्यात एखादा माणूस दुसर्‍या माणसासाठी कधी इतके कष्ट करण्याची शक्यता किती? अर्थात माणसाची 'भूक' खारोटीहून बरीच अधिक असल्याने ते परवडण्याजोगेही नसते हे ही खरे.

या खारींच्या पिल्लांच्या मागे लागलेल्या आपल्या कुत्र्याला दटावताना बुधा म्हणतो, ’सुकाळीच्या! त्या न्हान लेकरांना धरीतो!’ त्या 'धरीतो’ वरुन मला एकदम कुठल्याशा जुन्या मराठी चित्रपटातील दिनानाथ टाकळकर आठवले. त्यांच्या तोंडून येणारे ते ’करीतो’, ’धरीतो’ बाजाचे शब्द कसे गोड भासत याची आठवण झाली. वरील वाक्य त्यांच्या तोंडून आल्याची कल्पना केली आणि त्यांनी बुधाची भूमिका बहारदार केली असती असं वाटून गेलं. (अलीकडे येऊन गेलेल्या चित्रपटात सुहास पळशीकर यांनी ही भूमिका केली. दुर्दैवाने चित्रपट पाहायचा राहून गेला.)

माणसाच्या उच्चारांतही एक गंमत असते. माझ्या मते शहरी माणसांच्या आणि निसर्गाच्या कुशीत राहणार्‍यांच्या भाषेतील केवळ शब्दांत नि व्याकरणातच फरक असतो असे नाही. त्या शब्दोच्चाराचा ’लगाव’देखील निराळा असतो. कुठे उच्चार लांबतात, कुठे घाईघाईने उच्चारल्याने संधी होतात. कुठे जनावरांच्या, पक्ष्यांच्या आवाजाचे हेल माणसाच्या बोलण्यात बेमालूम मिसळून जात असतील. डोंगरातील वस्तीमध्ये दूर दूरपर्यंत आवाज पोचावा म्हणून आवाजाला विशिष्ट प्रकारचे हेलकावे दिले जात असतील. थोडक्यात भाषेला परिसरघटकांचे आवरण पडलेले असते. (पठारावर राहणार्‍यांची गाणी आणि जंगलात राहणार्‍यांची गाणी यांच्यात ध्वनिच्या वापरात कसा फरक पडतो हे प्राची दुबळेंनी सुरेख उलगडून दाखवले होते त्याची आठवण होते.)

पण फक्त निसर्गाशीच बुधा नाते जोडत जातो असे नाही. रोज ठराविक वेळेला डोक्यावरुन जाणारे इवायन (विमान), बहिरोबाच्या देवळाच्या पठारावरून खाली दूरवर दिसणारे कोकण, माचीच्या दरीमध्ये सरावासाठी आलेले जवान यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क न येताही त्याचे बंध जुळून जातात. इतक्या उंचावरून त्यांना आपले बोलणे ऐकू जाणार नाही हे ठाऊक असलेला बुधा तिथूनच त्यांची वास्तपुस्त करतो, विमानाची वेळ टळली तर कासावीस होतो आणि खालचे कोकण ढगांच्या पडद्याआड दिसेनासे झाले की अस्वस्थ होतो.

त्याच्या या जगण्यातलं सर्वात मोठं आव्हान होतं ते वणव्याचं. शहरी जीवनात अनेक हत्यारे नि उपकरणे दिमतीला असलेल्या एखाद्यासमोर इतके मोठे आव्हान कधीच उभे राहात नाही. राहिले तरी त्याच्याशी एकट्याने झुंज घेण्याची पाळी त्याच्यावर येत नाही. त्या वणव्याशी लढण्यासाठी बुधाकडे कोणतेही मॉडर्न हत्यार नाही. डोळ्यात फूल पडलेला, म्हातारा बुधा केवळ निर्गुडीच्या फांदोर्‍यांच्या सहाय्याने त्या राक्षसी संकटाशी झट्या घेतो ते त्याच्या आवळीबाय, खारुटली, शेळी, कुत्रा, त्याच्या झोपडीवर आज्यासारखी सावली धरणारा उंबर, यासारख्या सुहृदांना वाचवण्यासाठी. जगण्यातला हा सर्वात मोठा नि अखेरचा संघर्ष बुधा जिंकतो. अशा बिरान्या गावात बुधा एकटा राहू शकेल का? या भिवाच्या शंकेला दिलेले हे सणसणीत प्रत्युत्तर म्हणता येईल.

शहरी जीवनात माणूस जगण्याच्या शेअर संपवून जातो तो एकतर वाळवीने पोखरलेल्या झाडासारखा अंथरुणाला खिळून झिजत जातो किंवा एका घावात झाडाची फांदी खोडावेगळी करावी तसा त्याच्या जगण्याचा तुकडा पडून जातो. पण बुधासारखा माणूस ज्या परिसराला आपले म्हणतो तो परिसर, त्याचे सुहृद त्याला त्याच्या जगण्याचा शेवट जवळ आल्याची जाणीव करुन देत, त्याला सोबत करत राहतात. जवानांचा सराव संपून ते निघून जातात, विमानाचे येणे थांबते, जिवाभावाचा सोबती कुत्रा जातो, केवळ मरण्यासाठी म्हणूनच दारी उगवलेली म्हैस कड्यावरुन पडून भीषण मृत्यूला सामोरी जाते. जगण्याचा एक एक संदर्भ निसटत जातो आणि त्यांचे बोट धरुन बुधा शांतपणे आपल्या शेवटाला सामोरा जातो, विरघळून जातो.

- oOo -

'माचीवरला बुधा’ या पुस्तकातील दोन वेचे इथे ’वेचित चाललो...’ वर समाविष्ट केले आहेत. यातील पहिला वेचा आहे तो त्याच्या माचीकडच्या प्रवासावरचा आणि दुसरा आहे तो विलयक्षणीचा. थोडक्यात हे दोन वेचे असोशी आणि विरक्ती अशा दोन भावना प्रकट करणारे आहेत.

१. पहा जरा परतून
२. सोयरी वनचरी
---

*’जन हे वोळतू जेथे’ या शीर्षकाची मुक्तिबोधांची एक कादंबरी आहे; सत्यजित रेंच्या ’अपू त्रिधारा’ प्रमाणेच मुक्तिबोधांनी लिहिलेल्या विशू त्रिधारेतील एक.

** वैराण, वीरान (हिं.)


हे वाचले का?

पहा जरा परतून*

मनमाड पॅसेंजरनं कर्जत सोडलं, तेव्हा उकाड्यामुळं कलबलत होतं. सारा डबा हाय हाय करीत होता. गाडी घाट चढू लागली, तेव्हा तर उकाडा जास्तच वाढला.

बुधा धसमुसळ्यासारखा पासिंदरांचे पाय तुडवीत दाराकडे धावला. पासिंदरांनी तोंडं वाकडी करीत त्याला काहीबाही म्हटलं. पण तिकडे त्याचं लक्ष नव्हतं. तो दाराशी पोचला, अन् उगवतीकडल्या अंगाला दारातून तोंड बाहेर काढून वाकवाकून पाहू लागला.

हवेची वाट अडवल्याबद्दल त्याला पासिंदरांनी लाख शिव्या मोजल्या. एकाने त्याला, दारातून बाहेर वाकू नको, असा हितोपदेशही केला. पण बुधाचं तिकडे लक्ष नव्हतं. त्याला कसलंच भान राहिलं नव्हतं. तो डोळ्यांवर हात दे-देऊन समोरचा डोंगरमाथा निरखीत होता.

माचीवरला बुधा

त्याच्या एका डोळ्यात फूल पडले होते. दुसऱ्या डोळ्याला आता कमी दिसू लागलं होतं. तरी तो उगवतीकडली डोंगराळ पट्टी न्याहाळित होता.

अजून त्याची दिठी कुठंच स्थिर होत नव्हती. ती डोंगरांमागून डोंगर हुडकीत होती. पण त्याला पाहिजे होतं, ते सापडंत नव्हतं.

गाडी वर चढत होती. बोगद्यात शिरत होती अन् बाहेर पडत होती. दर दोन मिनिटांनी गाडीतले पासिंदर रात्र अन् दिवस अनुभवीत होते. डब्यातले दिवे मधूनच अंधुक होत होते. पुनः उजळत होते.

पण बुधावर या अंधार-उजेडाचा काहीच परिणाम होत नव्हता. बोगदा सुरू होताच तो डोळे चोळीत होता. गाडी बोगद्याबाहेर पडताच उगवती निरखीत होता, अन् पुनः निराश होत होता.

करता करता गाडी चौदाव्या बोगद्याबाहेर आली, अन् बुधाला पाहिजे होते ते एकदम सापडलं. त्याचं मन हरीखानं मोहरलं. त्यानं निरखून निरखून पाहिलं, की किल्ले राजमाची होता तिथंच आहे अजून!

इतक्यात गाडी पंधराव्या बोगद्यात शिरली. जणू बुधाच्या मनाला ठेचच लागली. पण बोगदा संपला, अन् राजमाचीचा अलीकडील बालेकिल्ला पुनः समोर उभा ठाकला. बुधाच्या अंधारू पाहाणार्‍या मनात कोवळ्या उन्हाचा कवडसा पडला.

मग निरनिराळी टेकाडं आड येऊ लागली. कधी शिखरं, कधी बोगदे, राजमाची दिसायची अन् पुनः लपायची. होता होता गाडी एका मोठ्या बोगद्यातून बाहेर आली, ती मावळतीकडे. उगवतीच्या अंगाला एक भला डंगाळा डोंगर पलीकडलं सगळं अडवून उभा राहिला.

राजमाची दिसेना झाली, तरी बुधानं आपलं डोकं दारातून आत घेतलं नाही. त्याच्या मनापुढलं राजमाचीचं चित्र अभंग, अक्षय्य राहिलं.

गाडीनं खंडाळा सोडलंन्, अन् ती लोणावळा स्टेशनच्या यार्डात कोकलत उभी राहिली. कारण लाइनीवर एक कुत्र्याचं पिलू खेळत होतं. ग्याटवाला पोर्टर धावत आला. त्यानं पिलाच्या पाठीत एक चापट घातली. तशी पिलू क्यांव क्यांव करीत दूर पळालं. मग गाडी स्टेशनात शिरली. फलाटावर येऊन उभी राहिली.

त्याच वेळी खंडाळ्याच्या अंगानं आठदहा ढगही तरंगत लोणावळ्यावर आले. पण ते काही थांबले नाहीत. पुढं चालते झाले. पिंजत पिंजत, आकार बदलीत ते पांगले.

बुधा घाईघाईनं गाडीतून उतरला, अन् तिकीट देऊन स्टेशनातून बाहेर पडला. इतका वेळ गाडीतल्या गलग्यानं त्याला अगदी कावल्यासारखं झालं होतं. आता वाऱ्याची एक झुळुक आली. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या पिंपरी अन् जांभळींवरून. त्या झुळकीनं बुधाला कुरवाळलं. तिच्या लडिवाळ स्पर्शानं त्याला फार बरं वाटलं. ती झुळुक त्याच्या माहेरची होती.

मुंबई-पुणे रस्ता ओलांडून तो तुंगारली गावात शिरला. माचीकडून डोईवर तुपाची चरवी घेऊन बोंबल्या येत होता. बुधाला पाहाताच तो गपाक्कदिशी उभा ठाकला, बोलला,

"बुधादा, तुमीच हाये जनू?"
'व्हय् व्हय्! रामराम!"
“रामराम! न्हव, पर मंदीच ?"
बुधा गडबडून बोलला,
'व्हय! पर समदं ठीक हाये ना ?"
“हाये त का झालं! पर- समदं म्हंजी ?"

डोळ्यांवर आडवा हात ठेवून त्याच्याकडे निरखून पाहात बुधा बोलून गेला,
“समदं म्हंजी- ट्येमलाईचं पठार- शिरीवर्धन- मणरंजेण-
पहिल्या क्षणी बोंबल्याला बुधा काय म्हणतोय, ते उमगलंच नाही. दुसऱ्या क्षणीही उमगलं नाहीच; पण फार फार हसू मात्र आलं. तो फुदकून फुदकून हसला. मग कसाबसा बोलला,
“अवो- ट्येमलाईचं पठार म्हंजी का भाकरीचा तुकडा हाये? का कुनी हड्या पळवून नील? जितं हुतं तितंच हाय त्ये!"

बुधा थोडासा लाजला. थोडासा कोमेजला. त्यानं ज्या आप्रुकीनं विचारलं होतं, त्या आप्रुकीची बूज राखली गेली नाही. तिची थट्टा झाली.

मग तो तसाच पुढं सरत बोलला, “चलतो वले! न्हाई त पोचायला टाइंब व्हायाचा."

झपाझप पावलं उचलीत त्यानं धाकट्या धरणाची भिंत ओलांडली. वर निघताक्षणी त्याला लंबाड्या जांभळीखाली ठाकरवाडी दिसली. डाव्या हाताला झाडांनी झाकलेली टेकडी. उजव्या हाताला उताराच्या आड डोळेमिचकावणी करीत लपून बसलेलं धरणाचं पाणी. ते दृश्य दिसताच त्याच्या मनाला मघा झालेली जखम बुजली. पुन्हा एकदा डोळ्यांवर हात ठेवून त्याने ते दृश्य पाहिलं. डोळेभरी पाहिलं. मग तो झपाट्यानं पावलं उचलीत चालू लागला. जणू त्याला पाय नव्हतेच. होते ते पंख.

घळीच्या तोंडाशी त्याला ठाकरणी भेटल्या. माचीजवळ वळंज नावाची ठाकरवाडी. तिथून लाकडाच्या मोळ्या घेऊन त्या भल्या पहाटेस लोणावळ्याला गेल्या होत्या. मणामणाच्या मोळ्या त्यांनी दहाबारा मैल डुयांवर वाहिल्या होत्या. सहा आण्यांपासून साडेअकरा आण्यांपर्यंत जो भाव निघाला. त्याला त्या विकल्या होत्या. त्या पैशातून मीठ-मिरची घेतली होती. तंबाखू अन् बोंबील घेतले होते. धाकल्यांसाठी एखाद आण्याची जिलबी घेतली होती. आता त्या आपल्या घरकुलांकडे परत निघाल्या होत्या.

त्या हसत होत्या. खिदळत होत्या. कुणाची तरी नक्कल करीत होत्या. फाटक्या कांबरुणांमुळे त्यांना लाज वाटत नव्हती. चिराळलेल्या पायांचा अन् कांट्यांनी ओरबाडलेल्या अंगांचा उबग वाटत नव्हता. त्यांचा हरीख पाहू बुधाला आणिकच हलकं हलकं वाटलं. विनोदानं उजळलेल्या ठाकरणींच्या मुद्रा त्याने एकदा कपाळावर हात देऊन न्याहाळल्या. मग तो गाडीवाटेनं घळ उतरू लागला.

मध्येच पावटी गाडीवाटेचा आसरा सोडून शेजारच्या उंचावावर चढली होती. बुधानं गाडीवाट सोडून दिली. तो लांच लांब पावलं टाकीत पावटीवरून चालला.

दुतर्फा निगडी धुमारली होती. आवळी चवऱ्या ढाळीत होत्या. शिलेदारासारखे ताठ उभे आंबे आकाशापर्यंत पोचले होते. एका किंजळीवर वाघाट्याची वेल फोफावली होती. तिनं आपले कोवळे हात बाहेर पसरले होते. येत्या जात्याच्या अंगाला ती कुरवाळीत होती. शेजारच्या येकळीच्या जाळीतून आपले तांबडे डोळे उघडून गुंजांच्या शेंगा टकाटका रानाकडे बघत होत्या. वाघाटीच्या कुरवाळण्याचा मान करून बुधा पुढं चालला, तो रानजुई डोक्यात दहावीस पांढरीफेक फुलं खोवून तोऱ्यात उभी असलेली त्यानं पाहिली. छाती फुलवून त्यानं तिचा वास घेतला. त्या वासाबरोबरच शेजारच्या रामेट्याच्या पिवळ्याधम्मक फुलांचा वास, वाटभर पसरलेल्या घाणेरीच्या फुलांचा अन् फळांचा वास, कुड्याच्या फुलांचा मंदसर वास- असे किती तरी वास त्याला जाणवले. तो तटकन् उभा राहिला. त्याच्या वयातली पन्नासपंचावन्न वर्ष जणू त्या वासानं पुसून टाकली. त्याला वाटलं, की कालच तर आपण हा सगळा वास घेतला होता. या वासानं वेडे होऊन आपण रानभर हाका घालीत हिंडलो होतो. काट्याकुट्यातून, येकळी-टाकळीतून, आपट्या कांचनातून, लवलवत असलेल्या गवतातून.

मग तो धावत खोगळीतून खाली निघाला. पण एका दगडाला ठेचकाळून जेव्हा तो खाली कोसळला, तेव्हा त्याला जाणवलं की आपल्या डोळ्यात फूल पडलं आहे. आपण आयुष्याच्या ढळतीवर उभे आहोत. मग तो अंग झटकीत उठला. मंदावल्या वेगानं लंगडत चालू लागला.

खाली उतरल्यावर तो कडेपठारावर पोचला, तो त्याला समोर लांबवर आवळ्याजावळ्या भावांसारखे एका शेजारी एक बसलेले राजमाचीचे बालेकिल्ले श्रीवर्धन अन् मनरंजन दिसले. अंधुक अंधुक दिसले. ते किल्ले दृष्टीस पडताच तो उभा राहिला. एकदम त्यांच्या म्हाताऱ्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. ते बोटांनी निरपून टाकीत त्यानं समोरचं दृश्य न्याहाळलं.

उजव्या हाताला मैलभर लांबीचा काळाभंगार कडा छाती फुलवून उभा होता. डाव्या हाताला सुस्तावून पसरलेली दरी. दरीच्या अंगाला उतारावर भात अन् नागलीची कापलेली खाचरं. लांबवर कड्याच्या आसऱ्यानं धावत असलेली गाडीवाट.

एकदम त्याला वाटलं, की आपली या रहाळाशी जन्मजन्मांची ओळख आहे. गेले अनेक जन्म आपण याच रहाळात जन्मलो आहोत. रांगलो अनु धुळीनं लिडबिडलो आहोत. भाताच्या खाचरांतून खपलो आहोत. रानात भटकलो आहोत. शेवटचा श्वास आपण इथंच कुठं तरी टेंभुर्णी अन् कारवीच्या झुडपाखाली घेतला आहे. आपल्या त्या जन्मांच्या शरीरांची राख इथं रानभर पसरली आहे. तीतून पावसाळ्यात सोनकीची पिवळी नाजुक फुलं धुमारली आहेत.

असा तो त्या रानानं झपाटला. मग त्याच धुंदीत तो पुढं चालला. टेपाडं चढत अन् उतरत. वाटेत फणसराईत तो क्षणभर थांबला. नुसतं नावच तेवढं फणसराई. फणसाचं एकही झाड नाही. इतर झाडांचीच दाटी. मग हलत्या झाडांचा वारा अंगावर घेऊन अन् घाम पुसून तो पुढं चालला. कमानकड्याखालून जात असता त्याला ठाकर भेटत होते. फॉरेस्टगार्ड भेटत होते. पण त्या कुणाकडेच त्याचं लक्ष नव्हतं. त्याचं धोतर सगळं कुसळांनी भरून गेलं होतं; ती टोचणीही त्याला जाणवत नव्हती.

राजमाची डाव्या अंगाला अगदी जवळ भिडली. पण मध्ये दरी पसरली होती. बुधानं गाडीवाट सोडून दिली. तो डाव्या हाताच्या पावटीनं दरीतल्या झाडावळीत शिरला. आभाळाला टेकलेल्या झाडांच्या सावलीतून तो चालू लागला. त्याला दुतर्फा धुमसत असलेल्या कोळशाच्या भट्ट्या दिसल्या. कुणी एक ठाकरीण एका झुडपावर कोयतीचे घाव घालीत होती. दुसरी एक हातानी झुडपांचं जंजाळ वारीत मधमाशांची पोळी शोधीत होती. त्यांनी क्षणभर बुधाकडे निरखून पाहिलं. मग त्या पुन्हा आपल्या कामाला लागल्या.

भले थोरले धोंडे ओलांडीत बुधा घळीतल्या ओहोळात उतरला. निळं निळं पाणी फुलिया फळिया वोळणार्‍या वनस्पतींच्या मुळ्यांतून वाहात होतं. त्या मुळ्यांचा कस संगे घेऊन. उन्हाळा बाहेर कडकडत होता; पण ओहोळाचं पाणी थंडगार होतं. भल्या सपाट्या काळ्याशार खडकांमधून ते धावत होतं. पाणलोटाच्या दबावानं खडक एकमेकांत गच्चम बसवलेले होते. ती पाण्याची धार पाहून बुधा हरिखला. धोतर वर उचलण्याचं भानही त्याला राहिलं नाही. तो तसाच जाऊन पाण्यात उभा ठाकला. पाण्याची शीतळवंती त्याच्या पायाच्या जाड कातडीतून आत शिरून त्याच्या शिरात भिनली. सगळं सुखच सुख झालं.

- oOo -

पुस्तक: ’माचीवरला बुधा’
लेखक: गो. नी. दाण्डेकर.
प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन
आवृत्ती सातवी (डिसेंबर २००५)
पृष्ठे: ३ ते ७

---

*कविवर्य कुसुमाग्रजांची 'शेवटचे पान’ या शीर्षकाची एक सुरेख कविता आहे. त्यातील भाव प्रेयसीचा असला तरी बुधासारख्यांना त्यांच्या रहाळाने मारलेली हाक म्हणूनही पाहता येते. त्या कवितेचे धुवपद हेच शीर्षक म्हणून इथे वापरले आहे.


हे वाचले का?

रविवार, ११ एप्रिल, २०२१

राणीचा जोडीदार

(ब्रिटनची राणी एलिझाबेथ(दुसरी) हिच्या जीवनावर आधारित ’द क्राऊन’ ही मालिका अलिकडे पाहण्यात आली. सरधोपट कथानकातले काही तुकडे अचानक मधल्या काही प्रसंगांना गाळून एकमेकांशी जुळल्यासारखे वाटू लागले. त्यातून राणीपेक्षा राणीचा नवरा... ज्याला अधिकृतपणे 'जोडीदार' म्हटले जाते, प्रिन्स फिलिप याच्या आयुष्यानेच माझे लक्ष अधिक वेधून घेतले.

तटस्थपणे वा राणीला केंद्रस्थानी ठेवून न पाहता फिलिपच्या स्वत:च्याच नजरेतून त्याच्या आयुष्याकडे पाहिले तर ते कसे दिसेल असा विचार करता ते जसे दिसले, जी संगती लागली ती इथे मांडली आहे. हा एका व्यक्तीचा दृष्टीकोन असल्याने अर्थात स्व-पक्षपाती असणारच आहे. पण तरीही त्याचे भरकटलेले बालपण, भंगलेले कुटुंब, त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर पडलेली राजघराण्याची छाया आणि पुढच्या पिढीबद्दलचे वैफल्य ध्यानात घेण्याजोगे आहे असे मला प्रामाणिकपणे वाटले. प्रिन्स फिलिप यांचे दोनच दिवसांपूर्वी देहावसान झाले. त्याचे औचित्य साधून त्यांची ही कैफियत इथे मांडतो आहे. यासाठी मालिकेबाहेरील काही तथ्यांचा आधारही घेतला आहे.

फिलिपचा जिवलग मित्र मायकेल पार्कर याच्यापासून त्याला राणी आणि मंत्रिमंडळाच्या दबावामुळे दूर व्हावे लागले होते. इथे फिलिप त्याच्याशीच पत्र-संवाद साधतो आहे.)

---

प्रिय मायकेल,

तू दूर गेलास त्याला आता एक दशक उलटले. दरम्यान अधून मधून होणारा फोन आणि पत्रसंपर्क वगळता आपली अनौपचारिक अशी भेट झालेली नाही. या दशकांत इतका तीव्र एकटेपणा क्वचित वाटला असेल. तो वाटावा इतकी मानसिक फुरसतही फारशी मिळाली नाही. 'राजघराण्याच्या एक्स्प्रेस गाडीला जोडलेला गार्डाचा डबा' ही माझी भूमिका निभावता निभावता स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधीच फारशी मिळाली नाही.

पण काल जे घडले, त्यातून तुटलेपणाची भावना अनेक वर्षांनी पुन्हा उसळून आली आहे. यापूर्वी माझे आयुष्य भरकटले, तेव्हा तू माझा सोबती झाला होतास, माझे तारु बंदराला लावणारा तारणहार झाला होतास. त्यामुळे आज तुझी तीव्रतेने आठवण झाली आणि हे लिहायला बसलो आहे.

मी सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुटीवर आहे, अर्थात माझ्या तिथल्या मैत्रिणीसोबत. राणीच्या जोडीदाराचे प्रकरण फारसे लपून राहणे शक्य नसते. खुद्द एलिझाबेथलाही ते ठाऊक असावे. पण काल प्रथमच असे घडले, की स्वत: राणी लंडनहून स्वत: इथे माझ्या भेटीसाठी आली. माझ्या एकट्याच्या सुटीच्या काळात तिने यापूर्वी असे केले नव्हते. एक व्यक्ती म्हणून माझी खासगी स्पेस तिने कायम जपली आहे. पण ती आज आली, ती मला जाब विचारायला... खरंतर ते ही खरे नाही. तिने मला फक्त ’जनतेच्या सहज नजरेस पडू नकोस याची काळजी घे’ इतकाच सल्ला दिला. बस्स.

नव‍र्‍याच्या बाहेरख्यालीपणाची माहिती समजूनही कोणताही कांगावा अथवा अकांडतांडव न करणारी पत्नी मिळणे हे त्याचे भाग्यच म्हणावे लागेल. यात थोडा उपहास डोकावला, हो ना? पण ते अपरिहार्यच आहे. पण तरीदेखील मला खात्री आहे की यात समजूतदारपणाबरोबरच- कदाचित त्याहून बरीच अधिक, राणी म्हणून असणारी सामाजिक बंधनांची जाणीव असणार. राणीचा नवरा बाहेरख्याली झाला, म्हणून वेगळे होण्याचा पर्याय राणीला असतो कुठे? हे माहित असल्यानेच मी बेदरकार वागलो, असा तुझा कदाचित समज होईल. पण तसे नाही.

हे आज ना उद्या होणार याची मला पुरेपूर कल्पना होती. राणीचा जोडीदार हा कायम जनतेच्या, सामान्यांच्या नजरेसमोर असतो. त्यांच्या नजरेपासून स्वत:ला वाचवणे त्याला शक्यच नसते. आणि त्याचे प्रेमपात्र खमंग नि चविष्ट गॉसिपचा भाग होणार हे उघड होतेच. त्यामुळे ही बातमी राणीपर्यंत पोचल्याचे मला काहीच आश्चर्य वाटले नाही; आश्चर्य याचे वाटले, की याबद्दल जाब विचारायला तिने इतकी वर्षे वाट पाहिली. आणि तरीही तिने आपला पत्नी म्हणून अधिकार वापरला नाही, ती केवळ राणी म्हणूनच आली, मला भेटली आणि निघून गेली...'तुझे हे प्रकरण जनतेच्या समोर फार सहजपणे उघड होऊ नये याची काळजी घे’ इतकाच सल्ला देऊन. यात बाहेरख्याली पतीच्या क्षुब्ध पत्नीपेक्षा आपल्या स्थानाची प्रतिष्ठा सांभाळण्याचा प्रयत्न करणारी राणीच मला दिसत राहिली.

मी प्रेम केले ते राजाच्या पुतणीवर, राणीवर नव्हे. पण तिच्या काकांच्या राजेपदावरुन पायउतार होण्याने आमच्या जगण्याची दिशाच बदलून गेली. वडिलांच्या राजा होण्याने होण्याने माझी पत्नी भावी राणी म्हणून एका चौकटीत बंदिस्त झाली. तिचा-माझा संवाद केवळ एका खिडकीतून व्हावा तसा परका आणि औपचारिक होत गेला. माझे आयुष्य तिच्यापासून सुटे होत गेले, आणि तसे असूनही त्या नात्यातून आलेल्या नव्या बंधनांनी माझ्या जगण्याभोवती कुंपण घालण्यास सुरुवात केली. 

राजघराण्याचे हे सारे संकेत राजा अथवा राणी नसलेल्यांच्या गळ्यात कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्यासारखे घट्ट बसलेले आहेत. त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची परवानगी नाही. त्यावर उपाय एकच होता. जिवंतपणीच ’माजी राजा’ असे दुर्मिळ बिरुद मिरवणार्‍या तिच्या काकांनी- एडवर्डनी केला तसा विद्रोह. त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे परागंदा होणे.

पण मी मुळातच एक देश, एक कुटुंब गमावून आलेलो होतो. आता दोन मुलांचा बाप झाल्यावर, मध्यमवयात पोचल्यावर, इतका मोठा विद्रोह करण्याची ताकद माझ्यात उरलेली नाही. राजकुटुंबापलिकडे आणि म्हणून ब्रिटनपलीकडे मला आयुष्यच शिल्लक नाही. आधीच एक परागंदा आयुष्य जगून थोडे स्थैर्य पाहिल्यानंतर आता तेवढे धाडस उरलेले नाही. कुणास ठाऊक. माझी ही मैत्रिण माझ्या माफक विद्रोहाचे फलित आहे, की माझ्यातल्या पुरुषाला- नराला असलेल्या स्त्री-सहवासाच्या आसक्तीचे- मला नक्की सांगता येणार नाही.

राजकुलातल्यांसाठी वैवाहिक आयुष्याप्रती असलेली, प्रसंगी स्वत:लाच जाचक ठरणारी ही बंधने पाहून मला असं वाटलं होतं, की माझ्या स्विस मैत्रिणीबाबत समजताच एक पत्नी म्हणून ती मला जाब विचा्रेल. पण ही गोष्ट फार पूर्वी ठाऊक होऊनही तिने त्याकडे दुर्लक्ष केले. तिचे माझ्याकडे लक्ष वेधून घेण्याची माझी इच्छा होती. पण सारे ठाऊक असूनही ती आपण त्या गावचेच नाही असे भासवत आली. इतकेच नव्हे तर राजघराण्याच्या संकेताला अनुसरून ती त्याला एका शिष्टाचाराच्या आवरणात झाकून टाकत गेली. राणीपदाच्या झुलीखाली तिच्यातल्या पत्नीला चिणून टाकत गेली.

तू तर माझा जिवाभावाचा मित्र, नौदलातला सहकारी आणि परागंदा आयुष्यातील माझा मुख्य आधार. तुझ्या बाहेरख्यालीपणामुळे तुझी पत्नी घटस्फोटाचा विचार करते आहे, हे कानावर येताच राजघराण्यावर अप्रत्यक्ष किटाळ नको, म्हणून मला तुझ्यापासून दूर होण्याचा सल्ला देण्यात आला. ’सीझरच्या पत्नीचे चारित्र्य संशयातीत असायला हवे’ असा वाक्प्रचार आपण सर्रास वापरतो. पण असे खुद्द सीझरनेच म्हटले होते, हे आपण साफ विसरुन गेलो आहोत. याबाबत सीझरच्या पत्नीचे म्हणणे काय होते याची नोंद इतिहासात नाही.

इथे केवळ राणीचा जोडीदारच नव्हे, तर त्याचे मित्रही तसे असावेत असा अलिखित नियम राजघराण्यात आहे. त्यातच घटस्फोट, विवाहविच्छेद हे सर्वात मोठे किटाळ मानले जाते. एलिझाबेथचे काका, किंग एडवर्ड यांना एक घटस्फोटितेशी लग्न करण्यासाठी राजेपदावर पाणी सोडावे लागले हे तर तुला ठाऊक आहेच. पण पुढे तिच्या बहिणीला तिच्या घटस्फोटित प्रेमिकाशी लग्न करण्याची परवानगी तिने आणि मंत्रिमंडळाने नाकारली; राजघराण्याच्या प्रतिष्ठेसाठी!

मी नावापुरताच ग्रीक उमराव-पुत्र, क्रीटच्या राजाचा पुतण्या. आयुष्याच्या सुरुवातीलाच देश सुटला. देशात उठाव झाला नि काकाचे राज्य गेले. कुटुंब परागंदा झाले. माझ्या वडिलांच्या बाहेरख्याली वृत्तीला कंटाळून आईने दुसरा घरोबा केला. दोघे दोन दिशांनी निघून गेले. मग मी करड्या नाझी पठडीत जगणार्‍या बहिणीच्या संसारात उपरा, आश्रित म्हणून जगलो.

पुढे हे अंतर इतके वाढले, की जिच्या घरी मी वाढलो, त्या बहिणीच्या विमान अपघाती मृत्यूनंतर अंत्यसंस्कारांस आलेल्या, बुद्धिभ्रंशाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या आईला ’हा तुझा मुलगा’ म्हणून ओळख करुन द्यावी लागली. बापाने, ’माझ्या मुलीच्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस’ म्हणून माझ्यावर आगपाखड केली. आई-बाप आपल्यासोबत नसले तरी कुठेतरी आहेत, आपले आहेत, ही जाणीव बहिणीच्या मृत्युक्षणी तिच्यासोबतच थडग्यात गेली. वयाच्या बारा-तेराव्या वर्षी एका रात्रीत सारे कुटुंब हरवले!

पण त्या फ्युनरलला उपस्थित असलेल्या डिकी अंकलनी कुटुंब हरवलेल्या मला मला आपल्या छत्राखाली घेतले. हा परागंदा ग्रीक राजपुत्र जर्मनीलाही कायमचा निरोप देऊन करुन ब्रिटिश नागरिक झाला नि माऊंटबॅटन घराण्याचे, म्हणजे आईचे नि डिकी अंकलच्या घराण्याचे नाव लावू लागला. पुढे त्यांच्याच मदतीने रॉयल नेव्हीमध्ये दाखल झालो. त्याच सुमारास लिझची भेट झाली... झाली म्हणण्यापेक्षा राजकारणचतुर डिकी अंकलनी घडवून आणली असली पाहिजे असं आता वाटतं. ज्या व्यक्तीच्या सहवासाची आतुरतेने वाट पाहावी, असे कुणी आयुष्यात प्रथमच डोकावले. 

पण राजघराण्यातील सोयरिकी या केवळ कुटुंबाच्याच नव्हे तर पुर्‍या देशाच्या प्रतिष्ठेचा भाग असतात. त्यामुळे राजा आणि राजाचे राजकीय हस्तक आमच्या विवाहाच्या विरोधात गेले. पण लिझ हट्टाला पेटली होती. मला भेटलेल्या एका हळव्या मुलीतला हा कणखरपणा मला प्रथमच दिसला... पुढे- कदाचित नाईलाजाने असेल, पण तिच्या व्यक्तिमत्वाचा मुख्य भागच होऊन गेला. पुन्हा अंकलनी मध्यस्थी करुन मला दत्तक घेतले. आणि तोवर केवळ एक माऊंटबॅटन असलेला फिलिप आता ’ड्यूक ऑफ एडिंबरा’ झाला, राजघराण्याशी सोयरिक करण्यास लायक ठरला.

ग्रीसमधला पदच्युतीनंतर आधी स्वित्झर्लंड नि मग जर्मनीमध्ये परागंदा आयुष्य जगलो होतो. माझ्या दोन्ही थोरल्या बहिणींनी स्वित्झर्लंडच्या वास्तव्यात जर्मन जोडीदार निवडले. त्या कट्टर नाझी झाल्या. मग एका नाझी महिला अधिकार्‍याचा भाऊ म्हणून आदराचा नि द्वेषाचा सामना केला. आमच्या लग्नाला राजा नि त्याच्या राजकीय सल्लागारांचा विरोध याही कारणाने होता. माझा हा नातेसंबंध तोडून टाकण्याची, disown करण्याची अट त्यासाठी आली. मला माझ्या ग्रीक ऑर्थोडॉक्स परंपरांचा त्याग करुन तुमच्या अ‍ॅंग्लिकन चर्चचे सदस्यत्व घ्यावे लागले. त्याचबरोबर ग्रीक राजघराण्याशी असलेले संबंध तोडून, त्याच्याशी निगडित सर्व अधिकार व कर्तव्यांपासून मुक्त झाल्याचे जाहीर करावे लागले.

पण याच दरम्यान किंग एडवर्ड यांच्या प्रेमप्रकरणामुळे सत्तेमध्ये उलथापालथ झाली. राजकुलाने आणि संसदेच्या विरोधानंतर ’राज्य की प्रेयसी’ या तिढ्यामध्ये प्रेयसीची निवड करुन राज्यत्याग करणारा राजा म्हणून एडवर्डची नोंद झाली. राजघराण्याच्या प्रतिष्ठेला नाकारून प्रेमाशी बांधिलकी राखणार्‍या एडवर्डचा मला आजही अभिमानच वाटतो.

पण याच घटनेमुळे माझ्याही आयुष्यात उलथापालथ होईल हे तेव्हा माझ्या ध्यानात आले नव्हते. अपत्यहीन राजा परागंदा झाल्याने, त्याचा धाकटा भाऊ राजा झाला, आणि त्याची थोरली मुलगी, माझी वाग्दत्त वधू, राजकुमारी, आणि म्हणून राजाची पहिल्या क्रमांकाची वारस ठरली. दुर्दैवाने आमच्या विवाहानंतर लवकरच तिचे वडीलही फुप्फुसाच्या विकाराने कालवश झाले आणि एव्हाना दोन मुलांची आई झालेली माझी पत्नी एलिझाबेथ, आता ब्रिटनची राणी झाली.

इथेच मला राजघराण्याच्या परंपरांची, संकेतांची पहिली दाहक चुणूक पाहायला मिळाली. जगभरात पुरुषप्रधान संस्कृती असल्याने सामान्यपणे लग्नानंतर पत्नी पतीचे आडनाव स्वीकारते, त्या घराण्याशी संबंध जोडते. पण माउंटबॅटन घराण्याचे वाढते प्रस्थ पाहून अस्वस्थ झालेल्या लिझच्या आजीने, पंतप्रधान चर्चिल यांच्या सल्ल्याने नवी राणी ही ’हाउस ऑफ विंडसर’ हे आपले मूळ घराणेच कायम ठेवेल असे जाहीर केले.

म्हणजे माझी पत्नी ही ब्रिटनची राणी. तिचा-माझा मुलगा हा राजगादीचा वारस, त्यानंतर त्याच्या पाठची मुलगी. उद्या आमचे तिसरे मूल जन्माला येईल तेव्हा ते तिच्यानंतरच क्रमांक पटकावणार. माझी पत्नी राणी, क्वीन. माझी मुले प्रिन्स आणि प्रिन्सेस... पण या उतरंडीत मला जागाच नाही! मग मी नक्की कोण? जगभरातील पुरुषप्रधानसंस्कृतींमध्ये ’ बीजक्षेत्रन्यायाने’ मूल बापाचे कुलनाम स्वीकारते, आईचे नव्हे. मग मी ’हाऊस ऑफ एडिंबरा’ कुलनाम मिरवत असताना माझी मुले मात्र 'हाऊस ऑफ विंडसर'ची, त्या घराण्याची... हे कसे? त्यांच्या शिक्षणापासून सर्व गोष्टींचा निर्णय करणारेही वेगळेच. यांचा मी कोण मग? केवळ त्यांच्या आईला बीजदान देणारा एखादा अर्वाचीन स्पर्म डोनर, की प्राचीन भारताच्या इतिहासात आपण शिकलो त्याप्रमाणे कुठल्याशा यज्ञामध्ये राणीला बीजदान देऊन पुत्रोत्पत्ती करणारा कुणी निमित्तकारण ऋषी?

दरबारी पत्रव्यवहारात माझा उल्लेख राणीचा नवरा म्हणून होत नाही. होतो तो ’राणीचा जोडीदार’ म्हणून... जोडीदार(consort)! राजवाड्यातले आयुष्य माझे उरलेच नाही, ते तर राणीच्या जोडीदाराचे, त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या शिष्टाचारांच्या चौकटीत घट्ट बांधून घातलेले. त्यात फिलिप कुठेच नाही. अगदी पाळण्यात असतानाच देश सोडून परागंदा व्हावे लागल्यामुळे राजघराण्याचे नाव असले, तरी आब कसा असतो ते मला कधीच समजू शकले नाही. त्याची ओळख मला झाली ती इथे, विंडसर कासलमध्ये, आणि तो अनुभव फारसा आनंददायी नव्हता.

अंकलबरोबर ब्रिटनमध्ये आलो तेव्हा माझ्या अपेक्षा माफक होत्या. मला पायलट व्हायचे होते, विमान उडवायचे होते, आकाशाला गवसणी घालून वरुन जग कसे दिसते हे पाहायचे होते. प्रेमाची इतिकर्तव्यता लग्नात होते असा एक समज आहे. माझ्याबाबत तशी आणि तेवढीच ती झाली का? लग्न आहे, प्रेम आहे पण सहजीवनाचे काय? राणीचा नवरा... चुकलो ’जोडीदार’, त्यामुळे राजकुलाचा सदस्य असल्याने सतत जनतेच्या, राजकारण्यांच्या, माध्यमांच्या नजरेसमोर वावरणे अपरिहार्य. 

राजकुलाचा सदस्य आहे पण राजवंशी नाही. त्यामुळे बंधने सारी पण मान अथवा अधिकार मात्र नाहीत. वैयक्तिक आयुष्यात तर सोडाच, पण शिष्टाचारातही कुठे डावे-उजवे करण्याची परवानगी नाही. नावापुरते राजकुल असले, तरी त्यांच्या जगण्याचे अनेक आयाम हे लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती. त्या अर्थी राणीही एक प्रकारे संसदेच्या नियंत्रणाखाली. मग हे लोकप्रतिनिधी माझ्याकडेही केवळ ’समर्थाघरचे श्वान’ म्हणून बघतात अशी भावना कायम माझ्या मनात ठाण मांडून बसली आहे.

हे सारे असह्य होऊन एकदा कोसळलो. उद्वेगाच्या भरात भडाभडा तिला सारे ऐकवले. मग ’ड्यूक ऑफ एडिंबरा’असलेला फिलिप ’प्रिन्स फिलिप’ म्हणून अधिकृतरित्या राजघराण्याचा सदस्य म्हणून राजकुलात सामावून घेतला गेला.

दोन्ही बहिणी जर्मनीत, कट्टर नात्झी, मी ब्रिटिश राणीचा नवरा, मूळचा ग्रीक... कुलनाम बॅटनबर्ग, माऊंटबॅटन... नक्की काय कुणास ठाऊक. स्वत:ची अशी भूमी नाही, कुटुंब नाही, पत्नी देशाची, मुले तिचे नाव लावणारी आणि फक्त त्यांच्यासोबत राजवाड्यात राहणारा... पण तरीही अनिकेत!

आयुष्यात एकच प्रसंग, जोडप्यातला ’नर’ असल्याची खात्री पटवून देणारा. तिने राणी होण्यापूर्वी राजाचे दूत म्हणून आम्ही श्रीलंकेचा दौरा केला होता. या दौर्‍यामध्ये बिथरलेल्या, तिच्यावर चालून आलेल्या हत्तीला सामोरे जात मी तिला सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यास वाट करुन दिली होती. त्यावेळी तिच्या नजरेत दिसलेले प्रेम शेवटचे! त्यानंतर तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच चेहर्‍यावर राणीचा करारी मुखवटा चढला तो कायमचा.

दुसरा प्रसंग बहिणीच्या मृत्यूनंतर शाळेत पोचल्यानंतरचा. सारे कुटुंब एका क्षणात गमावल्याने निर्माण डोक्यात झालेल्या तुफानाला चिणून टाकण्यासाठी मी एकट्याने रात्रंदिवस काम करुन शाळेची भिंत बांधून काढली होती. त्यावेळी हान नावाच्या एका शिक्षकाने माझ्यातल्या उद्वेगाला, दु:खावेगाला समजून घेतले. आपल्या भावना कुणाला तरी समजतात हा आयुष्यात आलेला तो पहिला अनुभव. ती शाळा नि तो शिक्षक हा माझ्या मनात एक हळवा कोपरा होऊन बसला.

त्यातूनच आपल्या मुलानेही तिथेच शिकावे, केवळ राणीचा मुलगा म्हणून न राहता स्वत:चे व्यक्तिमत्व विकसित करावे अशी माझी अपेक्षा होती. पण दुबळ्या मनाच्या चार्ल्सने माझी साफ निराशा केली. जगाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास तयार करण्यासाठी माझ्या मातृसंस्थेत (Alma mater), गॉर्डनस्टन शाळेत पाठवलेला माझा हा मुलगा, तिथल्या आव्हानांसमोर साफ थिटा तर पडला. एवढेच नव्हे, तर आपल्या कचखाऊ वृत्तीने संघर्षाच्या क्षणी पळपुटाही ठरला. ज्या व्यासपीठावरून त्याने माझ्या हस्ते पारितोषिक स्वीकारावे अशी माझी इच्छा होती, त्याच व्यासपीठावरून त्या भेकडाला राजघराण्याच्या डिटेक्टिवच्या कुशीत सुरक्षितता शोधताना मी पाहिला. हे मूल बीजाचे नव्हे, तर क्षेत्राचे आहे हे सिद्ध करुन गेला.

व्यासपीठावरुन मी बोलत होतो... ’ या स्पर्धेसाठी दृढनिश्चय, बांधिलकी, शारीर बळ, दमसास आणि सर्वात महत्वाचे म्हणजे धैर्य...’ मी धैर्य हा शब्द उच्चारत असतानाच हा माझा मुलगा एका य:कश्चित नोकराच्या कुशीत आसरा घेत होता. ज्या शाळेत स्वहस्ते बांधलेल्या कुंपणाच्या भिंतीत मी माझ्या रक्ताच्या कुटुंबाचे गमावणे चिणून टाकले होते, तिथेच माझ्या मुलाने माझ्या अपेक्षांचे थडगे बांधले, आणि त्याच्या-माझ्यात एक भिंत उभी केली. 

मी उभारलेल्या त्या भिंतीने मला नव्या आयुष्याचे फाटक उघडून दिले तर या नव्या भिंतीने माझा भेकड मुलगा पुन्हा एकवार स्वत:ला राजघराण्याच्या उबदार घरात कोंडून घेताना मी पाहिला. त्या डिटेक्टिवच्या नजरेतही स्वामित्वाचे आव्हान मला स्पष्ट दिसले. "हे मूल तुझे नाही, राणीचे आहे आणि मी तिचा दूत आहे. ’माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट’ म्हणत बापाला आदर्श मानण्याच्या, त्याच्या संरक्षक कवचात राहण्याच्या वयातल्या तुझ्या मुलासाठी तू नव्हे तर मी ती भूमिका पार पाडतो आहे." असा धिक्कार त्याच्या नजरेतून मला जाणवला. राजघराण्याचा आपला संबंध केवळ ’राणीचा जोडीदार’ या पलीकडे नाही याची जाणीव ठळक होत गेली.

त्याला तिकडे पाठवण्यास आधीच नाखुष असणार्‍या एलिझाबेथने अखेर त्याला पुन्हा उमरावांच्या मुलांसाठी बोटचेप्या शिक्षणाचे माहेरघर असलेल्या ईटनमध्ये पाठवले. गॉर्डनस्टन शाळेतील पाच वर्षांच्या अनुभवाला चार्ल्सने पुढे ’तुरुंगवास’ किंवा ’सर्वंकष नरकवास’ असो म्हटले. आपले व्यक्तिमत्व विकसित करण्याऐवजी त्याने भावी राजा म्हणून सुरक्षित, आव्हानहीन, संघर्षहीन वातावरणात राहणेच पसंत केले.

हे सगळे तुला ठाऊक नाही असेही नाही. पण अनेकदा ते क्रमवार मांडले, त्यांची उजळणी केली तर त्याची वेगळीच संगती लागते. इथे तशी ती लागते आहे का, मला ठाऊक नाही. लागावी म्हणून हे लिहिले असेही नाही. पिसाटलेल्या मस्तकाने एकदा भिंत बांधून काढली, कोसळल्या मनाने एकदा माझे अनिकेत असणे तुझ्यासमोर ओतले होते. तसेच आता थोडेस अलिप्त होऊन संगती लावू पाहतो आहे. हे तुझ्या एखाद्या स्वतंत्र विचाराच्या, स्त्री-मुक्तिवादी वगैरे मैत्रिणीला दिलेस तर ती चटकन मला ’सगळं स्वत:पुरतं पाहणारा, सैल वर्तणुकीचा, स्त्रीने आपल्याहून दुय्यम राहावे अशी अपेक्षा असलेला, आणि वर स्वत:च सहानुभूतीची अपेक्षा ठेवणारा मेल शावनिस्ट पिग’ म्हणून मोकळी होईल. तिचे चूक नसेलही कदाचित. लिहावंसं वाटलं एवढं मात्र खरं.

’लोक-नजरांपासून दूर रहा’ असे सांगायला आलेल्या राणीला मी एवढेच म्हणालो...

There are two types of people in life. Those whom one imagines to be trustworthy & reliable; who turn out to be treacherous and weak, like Mr. McMillan. And those who appear to be complex and difficult; who turn out to be more dependable than anyone thought... like me! I know exactly what my job is. Your father made it perfectly clear. You are my job! You are the essence of my duty. So here I am, liege-man of life and limb... in, and out (unlike Mr. McMillan)

तिला पटले की नाही ठाउक नाही. कदाचित लगामाने बांधलेला घोडा तबेल्यापासून फार दूर जाऊ शकत नाही याची खात्री असल्याने ती निश्चिंतपणे परतली असेल. स्वित्झर्लंडच्या मुक्त जगात चार दिवसांच्या सुटीला गेलेल्या पक्ष्याला ते तात्कालिक स्वातंत्र्य मागे टाकून लंडनच्या पिंजर्‍यात निमूट परतण्याशिवाय गत्यंतरही नाही.

अशाच एखाद्या तात्कालिक स्वातंत्र्याच्या दरम्यान तुझी भेट व्हावी या इच्छेसह,

तुझा,
फिलिप

- oOo -

१. ब्रिटनचे तत्कालिन पंतप्रधान हेरॉल्ड मॅकमिलन.

(या लेखातील मजकूर प्रथम ’अक्षरनामा’ या पोर्टलवर प्रकाशित झाला आहे. इथे त्याला अनुरूप अशा व्हिडिओंची जोड दिली आहे.)


हे वाचले का?

शनिवार, १० एप्रिल, २०२१

एक शेंडीवाल्या पोरीची गोष्ट

काही काळापूर्वी गंमत म्हणून ’द बिग बँग थिअरी’मधील एक मजेशीर प्रसंगाचा व्हिडिओ मी शेअर केला होता. आणि ती गंमत उलगडून पाहता पाहता शेल्डनच्या त्यातील सपशेल पराभवाची मीमांसा करण्याकडे झुकलो. ते वाचून एक मैत्रिण म्हणाली, ’तुला हसून सोडून देता येत नाही का? इतका कशाला विचार करायचा.’ थोडा विचार केल्यावर(!) लक्षात आले की यात तथ्य आहे. वेचित...’ वर काहीही शेअर करताना मूल्यमापन हे नेहमीच आस्वादावर स्वार होते आहे.

'स्वधर्मे निधनं श्रेय:’ वगैरे खरे असले तर स्वधर्म नक्की कुठला हे ठरायचे असल्याने ’जे भावेल ते वेचेन’ असा बाणा ठेवला आहे. त्यामुळे मग अगदी टॉम अ‍ॅंड जेरी यांच्या लुटुपुटूच्या लढायांपासून रॅटटुईमधल्या रेमीच्या जिद्दीपर्यंत, बिग बॅंग थिअरीमध्ये कालप्रवासातून निर्माण झालेल्या व्याकरणविषयक समस्येपासून ’द गुड प्लेस’मधे त्याच कालप्रवाहाच्या केलेल्या गंमतीशीर विडंबनापर्यंत काहीही डोक्यात रुजत जात असते. काही वेळा ते विचारात पाडणारे असते, काही वेळा ते खळखळून हसवणारे असते तर काहीवेळा त्यातील निरागसता आश्वस्त करुन जाते.

लहान मुलांच्या आसपास वावरणे हे तणावमुक्त (काही पोट्ट्यांच्या आईवडिलांचा अपवाद) राहण्याचा रामबाण उपाय आहे. एखादं पिल्लू ऐटीत स्टाईलने चाललेलं पाहून हसू फुटतं, दोन पोनीटेल घालून आपल्या इटुकल्या फ्रॉकमध्ये गिरक्या घेणारी एखादी छोटी पाहून एक छानसा गालगुच्चा घ्यायची इच्छा होते, जेमतेम बसू लागलेलं एखादं पोट्टं आपल्या तळहातावरच्या रेषा कुतूहलाने न्याहाळत असताना काय विचार करत असेल असा प्रश्न डोक्यात येतो. एखाद्या सामान्य घरातलं चार-पाच वर्षांचं पोरगं इवलिशी छाती फुगवून ’शीवाजी म्हाराजांची गोष्टं’ सांगताना पाहून हे बाळ असंच लहान राहावं नि मोठं होऊन महाराजांच्या नावावर चाललेल्या राजकारणाचा नि अस्मितेच्या बाजाराचा भाग होऊ नये अशी तीव्र इच्छा निर्माण होते. 

पण या पलिकडे मला सर्वात लक्षवेधी वाटते एक पोनीटेल, तीही पाठीमागे नाही तर डोक्याच्या वर बांधलेली छोटुकली पिल्ली. अशीच एक पिल्ली मला नुकतीच एका चलच्चित्रपटात सापडली. स्क्रीनवरुनच तिचा छानपैकी गालगुच्चा घेऊन टाकला.

हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला एक आगाऊ मूल आणि उद्धट मूल यातील फरक पाहता येईल. ही जी वेनेलोपी आहे ती अत्यंत आगाऊ मुलगी आहे. बिचार्‍या राल्फला प्रश्न विचारून ती भंडावून सोडते आहे. पण यात कुठेही त्याचा अपमान करण्याचा तिचा हेतू नाही की निर्हेतुकपणेही तसे तिच्याकडून घडत नाही. तिच्या त्या आगाऊपणाच्याच मी प्रेमात पडलो... आणि अर्थातच ती ’एक शेंडीवाली’ मुलगी असल्यामुळेही.

हा जो राल्फ आहे तो त्याच्या गेममधला विध्वंसक, आणि म्हणून खलनायक आहे. इमारती पाडणे, उध्वस्त करणे, निदान त्यांची मोडतोड करणे हे त्याचे काम. फीलिक्स हा त्यातील गुड बॉय. त्याच्या मदतीने या पाडलेल्या, मोडलेल्या इमारती खेळाडूंनी पुन्हा बांधून काढायच्या असा हा खेळ. प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार केला की या ’फिक्स-इट’ फीलिक्सला (आणि पर्यायाने तो खेळ खेळणार्‍याला) एक मेडल मिळते. असे टप्पे पार करत खेळ पुढे सरकत राहतो. (यावरुन कुठल्याशा विनोदी लेखनात वाचलेले वाक्य आठवते- ’आणि लेखक-दिग्दर्शक त्याच्या बाजूला असल्याने हीरोने व्हिलनचा पाडाव केला.’)

पण राल्फलाही आता मेडल हवे आहे. त्याला एकट्यालाच उकिरड्यावर राहावे लागते हे त्याला पटत नाही. त्यालाही इतर पात्रांबरोबर इमारतीमधील घरात राहायचे आहे. यातून तो ते मेडल मिळवण्याच्या मागे लागतो नि त्या खटपटीत आपला गेम (खेळ) सोडून भलत्याच गेममध्ये प्रवेश करतो. आणि तिथे ही Vanellope von Schweetz अर्थात ’साखरगावची पोरगी’ त्याला भेटते.

तिची स्वत:चीही एक समस्या आहे. ही छोटी ’शुगर रश’ या सर्वस्वी साखरेच्या बनलेल्या जगातील कार रेसमध्ये भाग घेऊन ती जिंकायची जिद्द बाळगून आहे. पण तिच्या प्रोग्राममध्ये काही बिघाड झाल्याने अधूनमधून तिच्याबाबतीत काही अनपेक्षित घडत असते. या बिघाडामुळे सारा गेमच बिघडल्याची समजूत झाली, तर तो कायमचा बंद केला जाईल नि त्यातील सर्वच पात्रे ’बेरोजगार’ होतील अशी भीती तिथल्या राजाला आहे. आणि म्हणून वेनेलोपीला तो ’ग्लिच’ म्हणजे बिघाड असेच म्हणतो नि तिला शर्यतीमध्ये भाग घेण्यास मनाई करत असतो.

त्यामुळे स्वत:साठी एक उत्तम रेस कार- अर्थात साखरेपासून, तयार करुन ती शर्यत जिंकायचीच असा तिने निर्धार केला आहे. आणि आपल्या मेडलच्या शोधात तिच्या त्या गेममध्ये येऊन धडकलेल्या राल्फशी ती ’युती’ (किंवा ’आघाडी’ म्हणा, काय फरक पडतो. :) ) करते आहे.

आता हे दोघे उत्साहाने कामाला लागतात. दोघे मिळून तिच्या शर्यतीसाठी एक फर्स्टक्लास मोटार बनवतात. वेनेलोपी खुश होते. आणि एक छानसे मेडल बनवून एखाद्या राणीच्या थाटात राल्फला प्रदान करते.

पण साखरगावचा राजा फार सावध आहे. ग्लिच ऊर्फ वेनेलोपीने रेसमध्ये भाग घेणे म्हणजे त्या बिघाडाला खेळाडूसमोर ठेवण्यासारखे आहे. यातून पुरा गेमच बंद केला जाऊ शकतो नि यातून इतर पात्रांबरोबरच खुद्द वेनेलोपीचा अवतारही संपुष्टात येईल हे तो राल्फला पटवून देतो. त्याचबरोबर राल्फचे हरवलेले मेडलही तो सदिच्छेखातर त्याला देऊन टाकतो. 

एकवेळ तिने शर्यत जिंकली नाही तरी चालेल पण तिचे अस्तित्व संपुष्टात यायला नको, अशा साधकबाधक विचाराने राल्फ तिला स्पर्धेत भाग घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. ती ऐकत नाही असे दिसताच आपल्या विध्वंसकाच्या भूमिकेला जागून स्वत:च्या हाताने तिची मोटार नष्ट करतो.

आयुष्यभराचे(!) स्वप्न हातातोंडाशी येऊन हिरावून घेतले गेलेली वेनेलोपीचे आक्रंदन पाहणार्‍याला अंतर्बाह्य हादरवून जाते. काही सेकंदापूर्वी पटलेली राल्फची कारणमीमांसा आता फोल वाटू लागते. कदाचित ती शर्यत जिंकणे हीच तिच्या आयुष्याची इतिकर्तव्यता असेल. मग मूर्तिमंत बिघाड म्हणून आपल्या गुहेत राहणार्‍यापुरतेच अस्तित्व उरलेल्या वेनेलोपीपेक्षा शर्यत जिंकून नष्ट झालेली वेनेलोपीच अधिक आपली भासू लागते...

उरलेली गोष्ट मी सांगणार नाही, तसा या पोस्टचा उद्देशही नाही. एक शेंडीवाल्या पोरीला समोर ठेवणे एवढाच माझा हेतू आहे. तिची जिद्द समजली, धडपड उमगली, आपले स्वप्न डोळ्यासमोर उध्वस्त होताना पाहण्यातले वैफल्य जाणवले तरी खूप झाले.

'रेक इट राल्फ’ या चित्रपटाचे पोस्टर पाहिले तेव्हा त्यातील खांद्यापेक्षा मोठ्या मुठी असलेला राल्फ पाहून हे प्रकरण त्या ’बिग ६’ सारख्या कंटाळवाण्या सुपरहीरोंच्या रांगेतलं असणार असा समज करुन घेऊन सोडून दिले होते. पण एकदा मी पाहात असलेली विचारप्रधान मालिका संपली आणि आंतरपीक म्हणून कार्टुनकडे वळलो. तेव्हा हा चित्रपट पाहिला. आणि एक सुखद धक्का बसला. राल्फ हा आपण समजलो तसा सुपरहीरोही नाही आणि सुपरविलनही नाही हे लक्षात आले. रॅटटुईमध्ये डिस्ने स्टुडिओजनी एक अर्वाचीन पंचतंत्रकथा सांगितली होती तशीच राल्फ आणि त्याची ही छोटी मैत्रिण वेनेलोपी यांच्या संदर्भात सांगितलेली आहे.

वर म्हटल्याप्रमाणे त्यातील तात्विक बाजूबद्दल मी इथे बोलणार नाही. फक्त अंगुलिनिर्देश करुन ठेवतो. राल्फ हे एका व्हिडिओ गेममधील पात्र. त्याचे काम त्याला गेमकर्त्याने नेमून दिले आहे. त्याहून वेगळे त्याला काही करता येत नाही. मानवी नियतीवादावरचे हे भाष्य आहे. पुढची कथा एकप्रकारे समाजव्यवस्थेने दाबून ठेवलेल्या, दुय्यम नागरिक म्हणून ठेचलेल्या व्यक्तिची संघर्षकथा आहे, तर वेनेलोपी ही न्याय्य हक्क डावलल्या गेलेल्या व्यक्तिचे प्रतिरूप आहे. राल्फ वरचा अन्याय हा व्यवस्थांतर्गत आहे तर वेनेलोपीचा व्यवस्था वेठीस धरणार्‍या व्यक्तींकडून, नियमांची चौकट धुडकावून केला गेलेला. पण इतके पुरे.

- oOo -

१. मला पेनेलोपी हे नाव माहित होते. पण वेनेलोपी हे नाव माझ्या कधी कानावर पडलेले नाही. थोडा शोध घेता ते पेनेलोपीचे अपभ्रंश (ग्लिच?) रूप आहे असे वाचण्यात आले. एका ठिकाणी अमेरिकेन बोलीभाषेत वेनेलोपीचा अर्थच कॅंडी (चॉकलेट्स किंवा एकुणच चघण्याळजोगे साखरपदार्थ) असा आहे, असा उल्लेख सापडला. परंतु तो कार्यकारणभाव नेमका उलट असावा असं मला वाटतं. या साखरगावच्या मुलीमुळेच तो आता रूढ झाला असावा.

२. Schwitz या मूळ जर्मन शब्दाचा अर्थ आहे 'घाम'. पण इथे Schweetz स्पेलिंगमध्ये 'i' ऐवजी ee आहे. त्यामुळे तो शब्द Sweat ऐवजी Sweetशी नाते सांगतो आहे. von या जर्मन शब्दाचा अर्थही इंग्रजीच्या from किंवा of सारखा आहे. त्यामुळे तिचे नाव Penellope von Schweetz म्हणजे ’साखरगावची वेनेलोपी’ असे आहे.

---

जाताजाता:

वर शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओत त्या छोटीचे हावभाव आणि तिचा आवाज याचे कमालीचे एकरुपत्व पाहून मी प्रभावित झालो होतो. त्यामुळॆ या पोरीचा आवाज कुणाचा आहे याचे कुतूहल होते. यू-ट्यूब अशा प्रश्नांची उत्तरे फार चटकन देते. सारा सिल्वरमनचा वेनेलोपीसाठी डबिंग करतानाचा एक व्हिडिओच सापडला. प्रत्यक्ष स्टुडिओतले डबिंग आणि चित्रपटातील तो प्रसंग असे दोन व्हिडिओ पाठोपाठ पाहण्यासाठी इथे शेअर करतो आहे.
हे वाचले का?