रविवार, ३० जानेवारी, २०२२

वेचताना... : तुझे आहे तुजपाशी

मला कुणाचीच भूमिका घ्यायची नाही. मला माझीच भूमिका घ्यायला हवी.

भूतकालभोगी जनतेमध्ये बहुसंख्य मंडळी भूमिकाच काय पण जगण्याची चौकटही भूतकालातून, इतरांकडून स्वीकारत असतात. आणि तीच आपल्यासाठी योग्य आहे हे स्वत:ला नि इतरांना पटवण्यामध्ये आपले आयुष्य व्यतीत करत असतात. आपली भूमिका, जगण्याची चौकट ही स्वत:ची निर्मिती नसली, तरी निदान आपली निवड असावी इतपत स्वातंत्र्य घेण्याचीही त्यांची तयारी नसते. त्यामुळे वारशाच्या कुबड्यांनाच ते आपला आधार करून जगत राहतात

कारण 'लादलेल्या भूमिकेहून वेगळी भूमिका घेण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नाही' असा बहुतेकांचा समज असतो. आणि 'ते आहे' याचे भान असलेल्या इतरांतील बहुसंख्या स्वातंत्र्य या संकल्पनेलाच घाबरून असते. आणि म्हणून ते सारे सामाजिक, कौटुंबिक वारशाचे जोखड फुलांचा हार असल्याचे मानून मिरवत असतात. अनेक जण आणखी पुढे जाऊन त्या वारशाच्या गाठोड्याला अभिमानाचे, अभिमानाला अस्मितेचे आणि अखेरीस अस्मितेला परपीडनाचे रूप देत आपल्या मनातील न्यूनगंडावर मात करण्याची धडपड करत असतात.

तुझे आहे तुजपाशी

सुरुवातीला उद्धृत केलेलं वाक्य पुलंच्या ’तुझे आहे तुजपाशी’ नाटकातील आहे. ’यात मुद्दाम उद्धृत करण्यासारखे काय आहे?’ असा प्रश्न बहुतेकांना पडेल, पडणारच. वरील परिच्छेदात विशद केलेल्या आपल्या सामाजिक दृष्टिकोनाची ती परिणती आहे. त्यातून हे वाक्य त्यातील अशा एका पात्राच्या तोंडी आहे जे पात्र नाटक पाहून/वाचून झाल्यावर अगदी पुलंप्रेमींच्याही (खरेतर त्यांच्याच अधिक) स्मरणातून सहजच निसटून जाते. पण ’तुज आहे तुजपाशी’ पाहिले वाचले तेव्हा दोन पात्रांची तुलना माझ्या मनात उमटून जाते. पैकी एकाला आवश्यकतेपेक्षा अधिक महत्व प्रेक्षकांनी दिले आणि दुसर्‍याला अनुल्लेखाच्या अडगळीत टाकून दिले.

पहिलं पात्र अर्थातच काकाजी देवासकरांचं आहे. या नाटकाचा उल्लेख झाला, की बहुतेक रसिक प्रेक्षकांना काकाजीच प्रथम आठवतात. तसे पाहिले तर ’तुझे आहे तुजपाशी’ हे श्याम-आचार्य आणि उषा-गीता या जोड्या केंद्रस्थानी असणारे नाटक. काकाजी हे पात्र नाटकात येते ते पुढच्या घटनाक्रमाची पार्श्वभूमी म्हणून, आणि अखेरीस नाट्याचा उपसंहार करणारं, आख्यानातील सूत्रधारासारखं. ज्यांना काळे-पांढरे, देव-दानव, नायक-खलनायक अशा जोड्यांमध्ये विचार करण्याची सवय आहे, त्यांनी काकाजी हा आचार्यांचा अ‍ॅंटि-थिसीस (anti-thesis) म्हणूनही पाहायला हरकत नाही.

ज्याला मी ’सुष्टांच्या संघर्षाचं नाटक’ म्हणतो, त्या दारव्हेकरांच्या ’कट्यार काळजात घुसली’ आणि हे 'तुझे आहे तुजपाशी’ यांच्यात या एका बाबतीत थोडे साम्य आहे. 'कट्यार...' हे मुख्यत: सदाशिवचे नाटक. त्याची संगीताप्रती असणारी आस, जगण्यातील संघर्ष पेलूनही ध्येयाकडे जाण्याची त्याची धडपड मांडणारे. उस्ताद अल्ताफ हुसेन खाँसाहेब, उमा, झरीना, बांकेबिहारी आणि पंडित भानुप्रसाद ही त्याच्या भोवती असणारी, त्याच्याविषयी सद्भाव असणारी माणसे, आणि त्यांच्यात परिस्थितीवशच निर्माण होणारा संघर्ष असे त्याचे स्वरूप. पण या पाचांमधल्या खाँसाहेबांच्या पात्राला वसंतराव देशपांडे यांनी इतके उंच नेले, की ते नाटक जणू खाँसाहेबांचेच आहे, असा समज दृढ झाला आहे.

वसंतराव आणि खाँसाहेब हे समीकरण जसे पक्के झाले, तसेच दाजी भाटवडेकर आणि काकाजी हे ही. भाटवडेकरांचा हा काकाजी असा बहारदार उमटला, त्यांच्या तोंडी असणारी काही वाक्ये इतकी लोकप्रिय झाली, की ’तुझे आहे तुजपाशी’ हे काकांजीचेच नाटक मानले जाऊ लागले. त्यातच रसिकाग्रणी रामूभय्या दाते यांच्यावर हे पात्र बेतलेले असल्याचे गृहित धरल्याने (बहुधा पुलंनीच सूचित केल्यामुळे) त्यांच्या प्रचंड मित्रपरिवारानेही त्या पात्राला अधिक उचलून धरले.

इतकेच नव्हे तर, यामुळे हे नाटक आचार्यांचे मूर्तिभंजन करणारे आणि काकाजींच्या सुखवादी जीवनदृष्टीचा पुरस्कार करणारे आहे, असा अनेक प्रेक्षकांचा समज झाला. अनेकांनी तर काकाजी, सतीश, श्याम, वासूअण्णा वगैरेंच्या खुसखुशीत संवादावर पोटभर हसत इतर कथाभागाकडे दुर्लक्ष करुन टाकलं. हे नाटक सर्वोदयाच्या संकल्पनेचे, त्या मार्गावर चालत असलेल्या वीतरागी व्यक्तिंचे, गांधीवाद्यांचे मूर्तिभंजन आहे अशी समजूत करुन घेऊन अनेकांना गुदगुल्या झाल्या... ऑर्वेलच्या 'अ‍ॅनिमल फार्म'मधील एकाधिकारशाहीवरचे भाष्य ही केवळ कम्युनिस्टांवरची टीका आहे, अशी सोयीस्कर समजूत करुन घेणार्‍यांना झाल्या तशा!

हे नाटक अध्यात्माच्या फोलपणाला नव्हे, त्याच्या अवडंबराला अधोरेखित करते आहे. ते बदलांना नकार देण्याचा दुराग्रह (आचार्य) आणि न पेलणारा बदल स्वीकारण्याचा अट्टाहास (श्याम) यांना परस्परांसमोर ठेवते. त्याचवेळी अध्यात्मिक कल असणारे शेठजी, त्यांच्या स्त्रिया आणि ’अतिविशाल महिला मंडळा’च्या सदस्या यांचा बदलांचे फायदे घेत असतानाच बदल-पूर्व परिस्थितीशी आचरणशून्य बांधिलकी दाखवण्याचा दांभिकपणाही समोर मांडते आहे.

यात ना अध्यात्माचा निषेध आहे ना सुखवादी जीवनप्रवाहाचा. असलाच एक अंगुलिनिर्देश, तारतम्य, विधिनिषेध नि भानावर राहण्याच्या आवश्यकतेकडे केलेला. 'कट्यार...' जसे ’सुष्टांच्या संघर्षाचे नाटक’ आहे, तसेच ’तुझे आहे तुजपाशी’ हे ’भानावर येणार्‍यांचे नाटक’ म्हटले पाहिजे. सतीश म्हणतो तसे,'अध्यात्माचं अजीर्ण झालेल्या देशासाठी' हे स्वादिष्ट विरेचन चूर्ण आहेच, पण त्याचबरोबर नवतेच्या प्रवाहाबरोबर वाहात जाणार्‍या आणि तोच काय तो प्रगतीचा एकमेव मार्ग आहे असे मानणार्‍या विरुद्ध गटाच्या अहंमन्यतेला नेमकी चपराकही आहे.

या नाटकात 'गव्हर्मेंट सर्व्हंट्सच्या बायकां'ची टोपी उडवल्याबद्दल आमची सनातनी-फेमिनिस्ट मैत्रिण पुलंवर प्रचंड उखडून होती. पुलं म्हटले की ’स्त्रियांची टवाळी करणार्‍याचे लेखन मी वाचत नाही’ असे ती फणकार्‍याने म्हणे. पण त्या शासकीय अधिकार्‍यांच्या पत्नींचे ’उसाशेजारचा एरंड’ हे चित्रण जसे या नाटकातील एका प्रसंगात आहे, तसेच सर्व पुरुषांसमोर ठाम उभी राहणारी, आपल्या जगण्याचे नियंत्रण संपूर्णपणे आपल्याही हाती आहे हे बजावणारी उषाही या कथानकाचा कणा आहे तिचे काय? पण ती ही अखेरीस आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व राखूनही उसन्या, आवंतून आणलेल्या मार्गापासून दोन पावले माघार घेते (जो खरेतर सुज्ञपणाच आहे, किंवा असे म्हणू आपल्या मर्यादांचे भान येणे आहे.) हे तिला खटकले असते.

मोठ्या झाडाशेजारी वाढणार्‍या, उशीरा उगवलेल्या झाडाचा जीवनरस कसा आटत जातो हे दाखवणारे, पण तरीही स्वतंत्र बाण्याचे गीता हे पात्र आहे. कदाचित तिथे गीतेची भूमिका नीट न समजून न घेता ’स्त्री बिचारी दाखवली’ असा victimhood अप्रोच तिने घेतला असता अशीच शक्यता अधिक आहे. आई-वडील दोघेही लहानपणीच गमावल्यानंतर आचार्यांच्या आश्रमात आलेली, बालपणापासूनच जीवनविन्मुख केली गेलेली गीताची भूमिका तिच्याप्रमाणेच बहुतेक प्रेक्षक/वाचक/समीक्षकांकडून दुय्यम समजून दुर्लक्षिली गेलेली आहे.

नाटकाचा कथाप्रवाह सुरु होतो तो आचार्य पोफळे गुरूजी यांच्या आगमनाने. त्यांच्या आगमनापूर्वी इंदुरातील ती बापू्भैय्या देवासकरांची कोठी म्हणजे एकदम सुखवस्तू, निवांत होती. कोठीमध्ये भिंतीवर लटकलेले प्राचीन घड्याळ बंद पडले तरी त्याची फिकीर नसलेले हे कुटुंबिय. मागील पिढ्यांची संपत्ती जरी फारशी उरली नसली तरी वडिलार्जित कोठी आणि त्यांच्या काळातील सुबत्तेच्या नि कलासक्त काळाच्या स्मरणरंजनात रमलेली नोकरमंडळीही खाऊनपिऊन सुखी. 

या देवासकर कुटुंबियांचे अध्वर्यू म्हणजे फॉरेस्ट खात्यात काम केलेले काकाजी. आपल्या जंगलातील वास्तव्याबद्दल बोलताना,’तिथे तर भय्या दोनच वेळा, दिवस नि रात्र’ असे म्हणणारे. तिथे ’अकरा वाजले म्हणून का सांगितलेस, दहा अठ्ठावन्न झाले म्हणून का सांगितले नाहीस? दोन मिनिटे ही काय सहज डावलण्याजोगी गोष्ट आहे?’ असे म्हणून गीतेला रागे भरणार्‍या आचार्यांचे आगमन झाल्याने देवासकर मंडळींचे आयुष्य ढवळून निघणार हे उघड होते.

बहुतेक आचार्य मंडळी असतात तसेच हे आचार्य जगण्यातील स्थितीशीलता मानणारे. प्रगतीचे वारे आपल्या छातीवर अडवू पाहणारे. यांत्रिक प्रगतीला यांचा विरोध. जोडीला देशीवाद. यंत्रविरोधी देशीवादाला अनुसरून हातसडीचे तांदूळ, शुद्ध मध, हाताने दळलेले पीठ यांच्या वापराचा अट्टाहास. आपण हट्टाने बदल नाकारला तरी भवताली ते होतच असतात. आपण नाकारल्याने बदलांचे चक्र उलटे फिरत नसते; उलट त्या अट्टाहासामुळे आपण इतरांसाठी त्रासदायक होत जातो याचे भान नसलेले हे आचार्य. 

एका बाजूने यंत्राचा धिक्कार करणारे, पण त्याचवेळी जी घड्याळ नावाच्या यंत्राखेरीज सांगता येणे शक्य नाही, इतकी अचूक वेळ सांगण्याबद्दल आग्रही असणारे. स्नानाला विहिरीचं पाणी नाही तर नळाचं म्हणजे ’परावलंबी’ असा शेरा मारताना, ’विहिरीचं असतं तरी ते स्वत: न शेंदता इतर कुणीतरी शेंदून दिलं असतं, म्हणजे तरीही ’परावलंबीच’ राहिलं असतं हे ही विसरणारे. पाश्चात्त्यांनी केलेली नळाची व्यवस्था हट्टाने नाकारण्याच्या नादात दांभिक होत जाणारे. कॉलेजमधील शिक्षणावर विश्वास नसणारे आणि ते मत गीतावर लादून तिच्या शिक्षणाची आणि कदाचित अधिक समृद्ध आयुष्याची दारे हेकटपणे बंद करणारे... एकुणात खेळ, मनोरंजनाला अनैतिक मानणारे.

जगणे अधिकाधिक सुखकर होत असताना, असे दु:ख साजरे करणारी किंवा समाजातील इतर शोषितांप्रती कळवळा दाखवण्यासाठी स्वत:च दु:खाच्या वा रुक्षतेच्या मखरात बसणारी वा इतरांना बसवू पाहणारी ही जीवनदृष्टी हळूहळू माघारीची वाट चालू लागणार, हे सांगायला कुणा ज्योतिष्याची गरज नसते. नव्या वाटांमधील बर्‍यावाईटाची निवड साधकबाधक विचाराने करण्याऐवजी बदलांना सरसकटच नाकारण्याचा हा हट्ट फारतर, स्वत:पुरता आचरणात आणता येईल, इतरांवर लादता येणार नाही याची प्रचीती त्यांना यथावकाश येत जाते.

गंमत म्हणजे शोषित, पददलितांचे दु:ख "तुम्ही 'डी-क्लास’ अर्थात वर्गविहीन (म्हणजे काय याची त्यांची व्याख्या त्यांच्या 'लाडका सैतान' म्हणजे मध्यमवर्गीय असण्याच्या व्याख्येइतकीच व्यक्ति-सापेक्ष असते.) झाल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही" असे म्हणणारे कम्युनिस्ट वेगळ्या अर्थाने आचार्यांचीच री ओढत असतात. आचार्यांची वीतरागी वृत्ती धार्मिक, आध्यात्मिक आणि देशीवादासारख्या प्रादेशिकतावादातून बीजातून आलेली, तर कम्युनिस्टांचे डी-क्लास होणे हे सामाजिक बांधिलकीतून उगवलेले. दु:ख, दैन्य यांची दखल स्वत: त्या पातळीवर उतरून समजून घेण्याची इच्छा सारखीच.

पण सामान्यांना त्यांचे दु:ख नुसतेच शेजारी बसून समजून घेणार्‍यांपेक्षा ते दूर करु इच्छिणार्‍यांची- त्यातही ती कुवत असणार्‍यांची सोबत साहजिकच अधिक हवीशी वाटत असल्याने या दोनही मार्गांचे जगण्याचे आधार म्हणून महत्व केव्हाच लयाला गेले आहे. पोट व्यवस्थित भरलेले, जगण्यातील तडजोडींनी अपराधगंड निर्माण केलेले सुखवस्तू लोक सामाजिक प्रतिमा उजळण्यासाठी एखाद्या बुवा-बाबाचा, एखाद्या देवाचा उत्सव साजरा करत चार दिवस या निरासक्तीच्या मखरात मिरवून घेतात. तर सर्व सोयीसुविधांसह चोख मध्यमवर्गीय आयुष्य जगणारे तोंडाने भांडवलशाहीच्या पापांची, मध्यमवर्गीयांच्या स्वार्थीपणाची उजळणी करणारी तोंडी वाफ दवडत डी-क्लास होणे वगैरे फक्त मठाधिपती बुवा-बाबाच्या प्रवचनाच्या पातळीवरच आणून ठेवत असतात.

अर्थात यात ना धर्मतत्त्वांचा दोष ना मार्क्सचा. दोष असतो तो माणसाच्या सोयीचे तेवढेच स्वीकारण्याच्या प्रवृत्तीचा आणि त्याचवेळी त्याच दुर्गुणाबद्दल इतरांना दोष देण्याच्या सवयीचा. तत्त्वांपेक्षा, अनुसरणापेक्षा कर्मकांडांना नि बोलभांडपणालाच श्रेयस मानण्याचा.

जगाचे भले करण्याच्या वेडाने झपाटलेली, पण ज्यांच्यासाठी आपण जगण्याची वाट वळवली त्यातील अनेकांची दांभिकता पाहून भ्रमनिरास झालेली उषादेखील आचार्यांचीच अनुचर म्हणावी लागेल. स्वत:च्या तथाकथित देशसेवेचा भार इतरांच्या खांद्यावर सक्तीने ठेवू पाहणारी किंवा त्यांच्या मदतीनेच स्वत:ला उदात्त वाटणारे आपले ध्येय वगैरे साध्य करू पाहणारी. 

'न पेलणार्‍या गोळ्या चढवल्या म्हणजे असं होतं. मग त्या देशसेवेच्या असोत, अध्यात्माच्या असोत, नाहीतर भांगेच्या असोत.' हे काकाजींचं विधान ज्याच्या संदर्भात केले आहे तो श्याम, उषेने दिलेला नकारही खिलाडूवृत्तीने स्वीकारून आनंदी आयुष्याची चाकोरी न सोडणारा सतीश आणि उषा, आचार्य आणि अखेरीस श्यामच्या देशसेवेच्या अथवा नैतिकतेच्या प्रयोगांचा काच सहन करणारे घरचे नोकर ही या दोघांच्या भोवताली असणारी अन्य पात्रे.

पण एकुण नाटकाबाबत लिहिणे हा माझा उद्देश नाही. त्यामुळे यांच्याबाबत वा एकुण कथानकाबद्दल मी बोलणार नाही. मला देणं द्यायचं आहे ते त्यातील दुर्लक्षित पात्राचे, गीताचे. 'मला कुणाचीच भूमिका घ्यायची नाही. मला माझी-माझीच भूमिका घ्यायला हवी’ म्हणणार्‍या गीतेच्या पात्राकडे प्रेक्षकांचे फारसे लक्ष जात नाही. तिला केवळ ऑल्सो-रॅनचा घोडा समजून प्रेक्षक आपले लक्ष मुख्यत: काकाजी, श्याम आणि आचार्य यांच्यावर केंद्रित करतात. त्यांच्यासोबत हॅपी-गो-लकी वृत्तीच्या सतीशलाही थोडे फुटेज मिळते.

माझ्या मते गीता हे पात्र कुण्या प्रसिद्ध अभिनेत्रीने न रंगवल्याने दुर्लक्षित राहिले असावे अशीही शक्यता आहे. त्या भूमिकेचे महत्व कदाचित निर्माता-दिग्दर्शकालाही न समजल्याने त्यांनी तिथे दुय्यम अभिनेत्रींची निवड केली असावी. एखादी सशक्त अभिनेत्री त्या परिस्थितीशरण असूनही स्वतंत्र बाण्याच्या त्या भूमिकेला न्याय देऊ शकली असती. शिवाय प्रेक्षकही कथानकात पात्राचे स्थान काय आहे, त्याचे महत्व किती आहे, यापेक्षा ते कुणी प्रसिद्ध अभिनेत्याने अथवा अभिनेत्रीने साकार केले यावर त्याची किती दखल घ्यायची हे निश्चित करत असतात. (वर म्हटल्याप्रमाणे काकाजींचे पात्रही भाटवडेकरांमुळे अधिक लक्षवेधी ठरले.)

दुसरे कारण असे असावे, की उषाच्या वागण्यातला कणखरपणा, काकाजी आणि सतीशच्या वाट्याला आलेले नर्मविनोदी संवाद आणि त्यांची सुखवादी वृत्ती, वासू-जगन्नाथ-भिकू यांनाही मिळालेली एकदोन चमकदार वाक्ये जशी लक्षात राहतात, तसे विशेष लक्षात राहावे असे गीतेच्या व्यक्तिमत्त्वात वा संवादात काही नाही. जे आहे ते विचारांमध्ये आहे, आणि कृतीमध्ये! या दोन्हींपेक्षा बोलणार्‍याकडे अधिक लक्ष देणार्‍या भारतीय वृत्तीला ती सापडत नाही ती त्यामुळेच.

असे असले तरी बदलाची उद्गाती किंवा प्रेरणा तीच आहे. एका अर्थी नाटकातील घटनाक्रम आणि कथानक यांची तीच प्रेषक आहे. उषा स्वत:च्या स्थितीबद्दल,वर्तनाबद्दल विचार करु लागते ते गीतेशी झालेल्या संवादानंतरच. 'खेळातील प्रतीकात्मक हिंसाही निषिद्ध' असे आचार्यांचे संस्कार असतानाही कुतूहलाने 'मला बुद्धिबळ खेळायला शिकवाल का? असे श्यामला विचारणारी तीच आहे. त्यातील नियम समजून घेताना ’तिरका जाणारा उंट मरेल पण सरळ जाणार नाही...’ हे ऐकून ’तिरकी चाल हा उंटाचा धर्म असेल तर माझा धर्म कुठला?' हा प्रश्न तिला पडतो. तिथेच तिच्या खांद्यावरचे वारशाचे जोखड हलके होण्यास सुरुवात होते.

'प्रश्न पडणे' हा माणसाच्या मानसिक गुलामगिरीतून सुटका होण्याचा पहिला टप्पा आहे, आणि इतर कुणाच्याही आधी गीताने तो साध्य केला आहे. त्यापाठोपाठ अनुकरणापेक्षा विचारनिष्ठ स्वीकारालाही तिनेच सुरुवात केली आहे. आपल्या विचारांचा आपल्या वास्तवाशी संबंध असला पाहिजे याचे तिला भान आहे. म्हणूनच दागिन्याने मढलेल्या शेठजी-स्त्रियांच्या आध्यात्माच्या ढोंगाला वैतागून त्यांच्यापासून दूर राहणारी गीताच खर्‍या अर्थाने प्रथम पुढच्या घटनाक्रमाला चालना देते आहे. पुढचे unraveling अथवा पत्त्याच्या डोलारा कोसळणेही तिने काढून घेतलेल्या या पहिल्या पत्त्याने घडून येते. याच्या नेमके उलट वर्तन करणारे आचार्य विचार नि अनुभव या दोहोंनाही दूर ठेवत पूर्वसुरींच्या वचनांची पोपटपंची करताना दिसतात.

अगदी पाचव्या वर्षापासून ’मरणं प्रकृती शरीराणाम्‌’ वगैरे न पेलणार्‍या सुवचनांची(?) पारायणे करत पाप-कल्पनांचे गाठोडे शिरावर घेऊन जगत आलेली गीता, आपली ती अपरिहार्यता असली तरी आपले भागधेय आहे असे मानत नाही. भजी खाल्ली म्हणून ’मी चोर आहे’ असे आश्रमातील सर्वांना सांगत फिरण्याची शिक्षा मिळते, तेव्हाही आपले काही चुकले असे तिला वाटत नाही. बर्‍यावाईटाच्या आपल्या निवाड्याला केवळ आचार्य म्हणतात म्हणून बदलण्याची शरणागत वृत्ती तिच्यात नाही.

'आचार्यांनी प्रार्थना म्हण म्हटलं की प्रार्थना म्हणायची. सूत काढ म्हटलं की सूत काढायचं. रस्ते झाड म्हटलं की रस्ते झाडायचे. ही माझी अपरिहार्यता होती, नाईलाज होता, स्वीकार नव्हता. श्यामचा गैरसमज झाला तसे मी कशाच्याच शोधात निघालेले नाही. आधी मला माझाच शोध घ्यायचा आहे.’ असे म्हणते तेव्हा तिच्यातील स्वतंत्र, विचारी व्यक्तिमत्वाचे प्रेक्षकांना दर्शन घडते... पण प्रेक्षक त्याकडे दुर्लक्ष करुन काकाजी, श्याम वा सतीशचा पुढचा विनोद कधी ऐकायला मिळेल यासाठी कानांत प्राण आणून बसलेले असतात.

त्यामुळे मग ’जोर्जेटची साडी नेसल्याबद्दल तुला पश्चात्ताप वाटत नाही का?’ या आचार्यांच्या प्रश्नावर 'पश्चात्ताप वाटूनच घ्यायचं ठरवलं तर पुढल्या सगळ्या आयुष्यात मला पश्चात्तापच करीत बसावं लागेल' म्हणून ठणकावणार्‍या गीतेची अनाग्रही, संयत स्वतंत्र वृत्ती त्यांच्या ध्यानात येत नाही हे ओघाने आलेच. तिच्यासमोर 'समाजाने दिलेले ओझे वागवण्यापलिकडे आपण काय करु शकतो' ही शरणागत वृत्ती असलेले, पण उच्च-नैतिकतेची करडी झूल पांघरुन त्याखाली तिला दडपून टाकणारे आचार्य खुजे भासू लागतात.

’स्वधर्मे निधनं श्रेय:’ असो वा ’जुने जाऊ द्या मरणालागुनि’, त्या त्या उक्तीचा विचार तारतम्यानेच करायला हवा. ’अधिकस्य अधिकं फलम्‌’ म्हणतानाच मनात कुठेतरी ’अति सर्वत्र वर्जयेत्‌’ची खूणगाठही बांधून ठेवायला हवी. वाहणं नि वाहवत जाणं यातील फरक- आपल्यापुरता का होईना, ओळखता यायला हवा. आणि या तारतम्यासाठी मुळात माणसाच्या मनातील स्वतंत्र विचार जिवंत हवा; अनुकरणाची शरणागत वृत्ती लगामबद्ध केलेली असायला हवी. ’तुझे आहे तुजपाशी’मध्ये गीतानेच सर्वप्रथम हे साध्य केले आहे. आणि म्हणूनच वेचतानाचे हे दोन शब्द तिच्यासाठीच राखून ठेवले आहेत.

- oOo-

१. इतका की त्यांच्या नातवाने ’कट्यार’ रंगभूमीवर आणले, तेव्हा त्यातील पंडितजी हे पात्रच वगळले, तरीही प्रेक्षकांना त्यात काही खटकले नाही.

२.
'सगळे उद्योग हातांनी करावेत असे म्हणतात ना हे आचार्य लोक? मग हातगाडीवर घालून आण त्याला.’
'हे वय काय आचार्यांना वचन देण्याचं आहे? तुझ्याएवढा होतो, तेव्हा दहा पोरींना वचनं गेली होती माझी...'
'तो पाहा- तो गधा चालला आहे ना सडकेवरून, त्या गाढवासारखा दिसतो. त्याला आनंद नाही, दु:ख नाही, लाज नाही, लज्जा नाही. तो आंब्याच्या साली आणि कागद एकाच चवीनं खातो. तसा दिसतो स्थितप्रज्ञ!'

३. नाटकातले काकाजी देवासकर आणि रामूभैय्या दाते हे दोघेही इंदूरचे.

४. अर्थात सर्वच मराठी लेखक हे ’मेले स्त्रीद्वेष्टे’ आहेत असे तिचे परदेश-फेमिनिस्ट-प्रभावित नि आचरणास सोपे असे मत आहे. त्यातून ’आम्ही ब्वा फक्त इंग्लिश वाचतो’ हे उच्च-नासिकादर्शक वाक्य ध्वनित होत असल्याने एकुण मराठी लेखक-वाचकांना तुच्छ लेखण्याचा कार्यक्रमही अनुल्लेखाने पार पडत असे.

५. ही व्यक्तिनिष्ठा बॉलिवूड-टॉलिवूड चित्रपटांमध्ये पार टोकाला जाऊन प्रेक्षक कथानकालाही बाजूला ठेवून आपल्या हीरो वा हीरोईनच्या संवादफेकीवर वा ’लुक्स’वर चित्रपटाचे यशापयश मोजतात.

---

’तुझे आहे तुजपाशी’ या नाटकातील एक वेचा ‘स्थितप्रज्ञस्य का भाषा’.
हा गीताच्या रंगमंचावरील प्रवेशापाशीच संपला आहे हे औचित्यपूर्ण आहे. कारण इथले भाष्य प्रामुख्याने तिचाच वेध घेते आहे.


हे वाचले का?

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

स्थितप्रज्ञस्य का भाषा

श्याम: वासूअण्णा... वासूअण्णा-

वासू:(समोर येऊन उभा राहतो. बोलत नाही.)

श्याम: अरे राम राम राम. हे सूत काढायचं काम इतकं अवघड असेल असं वाटलं नव्हतं मला. ह्या गीतानं मला सूत काढायला दोन दिवसांत शिकवते म्हणून वचन दिलं आणि स्वतः कुठं गायब झाली कुणास ठाऊक ! गीता आचार्याच्या बरोबर बद्रिनारायण शेठजींच्या घरी गेली का वासूअण्णा?

वासू: (मानेने नाही म्हणतो.)

श्याम:नाही गेली ? मग कुठे गेली ?

वासू: (खुणेने 'कोण जाणे' असा भाव व्यक्त करतो.)

श्याम: मग नीट सांग ना-हे असं (त्याने केलेल्या खुणेसारखे करीत) काय ? बोलायला काय झालं? अहो, गीता काय करतेय् ?

वासू: (खुणेने वाचते आहे असे दाखवतो.)

श्याम: वाचते आहे ? मग बोलत का नाही ?

तुझे आहे तुजपाशी

वासू: लावलंत बोलायला ? आचार्यांनी मला आजचा दिवस मौन पाळायला सांगितलं होत. सकाळपासून दहा वेळा मोडायला लावलं मला. अगदी भल्या पहाटे माळीबुवा आले ठणाणा करीत बागेतला पाईप फुटला म्हणून. मी त्याला पाटीवर लिहून सांगितलं की, प्लंबरकडे जा- आता एवढा म्हातारा झाला, त्याला प्लंबरमधला प्ल वाचता येईना. वाचून दाखवावं लागलं. मोडलं मौन ! बरं- ती दूधवाली गौळण ? ती बसली हुज्जत घालीत गाईच्या दुधात पाणी का बातलंस असं विचारलं म्हणून.

श्याम: कोणी?

वासू: मी !

श्याम: मग दुधवालीशी बोलताना मौन नाही मोडलं तुमचं ?

वासू: अहो, आधी मी तिला खुणाच करीत होतो. तर तिला काय वाटलं कोण जाणे ! हाय री दैंया म्हणून मुरकाच मारला तिनं आणि तोंडावर टिचकीनं दूध उडवलं. बरं, आमची बायकोही तिथंच उभी. आता काय मौन पाळता? खुणांचा अर्थ सांगावा लागला. नाहीतर भलती आफत व्हायची भय्या. शंभरदा ओरडून सांगितलं प्रत्येकाला, की भय्या, मौन आहे आमचं, मौन आहे. कुणी आमचं मौन ऐकायलाच तयार नाही.

श्याम: वासूअण्णा इतकी वटवट केलीत माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही देत? ... गीता कुठं आहे?

वासू: बसली आहे वाचत.

श्याम: काय वाचते आहे?

वासू: आता मी तिला काय वाचायला देणार ? तुमची पुस्तकं दिली, ती म्हणाली नको. ही इंजिनियरिंगची आहेत. उषाताईच्या कपाटाला कुलूप. शेवटी जगन्नाथ ड्रायव्हरकडे एक पुस्तक सापडलं ते दिलं.

श्याम: कसलं?

वासू: पिवळा डांबीस !

श्याम: काय?

वासू: पिवळा डांबीस ! शाय्‌डीवाल्याची रहस्यकथा आहे.

श्याम: वासुअण्णा, हे काय चालवलंय् तुम्ही ? आता हे आचार्यांना कळलं तर? वासूअण्णा, आता अगदी कसोशीनं मौन पाळ. एक अक्षर बोलू नको.

वासू: मी कशाला मरायला बोलेन ? पण खरं सांगू का श्यामभय्या? तुमचा हल्ली आचार्यांवर दाब जोर दिसतोय- आताशा बघतोय मी, ते तुम्हाला बरोबर नेतात. तुमच्याशी तास तास बोलतात.

श्याम: अरे बाबा, महान्-महान् माणूस आहे. आचार्य! त्यांच्या जोड्याजवळ उभं राहायची लायकी नाही आमची.

वासू: अगदी खरं बोलणं आहे तुमचं आमचं एक काम करा. त्यांना म्हणावं चाहेल तर हत्ती पाळायला सांगा, पण हे मौन पाळायला नका सांगू,

श्याम:अरे अरे अरे वासूअण्णा-वासूअण्णा तुमच्यात तुमच्यात (खिशातून वही काढतो आणि पाने उलटीत म्हणतो.) तुमच्यात हे-नैष्ठिक निग्रह नाही !

वासू: काय ? काय नाही?

श्याम: नैष्ठिक निग्रह! हे ऐक. आत्म्याचा विकास व्हायला नैष्ठिक निग्रहाची आवश्यकता आहे. तुम्हांला आत्मा आहे ना वासूअण्णा?

वासू: आत्मा? असेल एखादवेळी!

श्याम: शोधून काढा.

वासू: श्यामभय्या, आता काय काय म्हणून शोधून काढू? शुद्ध गाईचं तूप शोधून काढलं. हाताच्या घाण्याचं तेल शोधलं. हातसडीच्या तांदळाचं कार्यालय शोधलं, आता आणखी आत्मा शोधायला सांगता? अहो टाइम कोणाला आहे?

श्याम: अरे अरे अरे वासूअण्णा, अरे हे (वहीतून वाचत) हे अधःपतन आहे. ते जाऊ दे. जगन्नाथ आणि भिकूमाळ्याकडून गीतेतले श्लोक पाठ करून घ्यायला सांगितले होते मी--

वासू: त्यांनाच विचारा- (खिडकीतून हाक मारतो) जगन्नाथ-ए भिकूऽऽ इकडे या काम मग करा-मी ह्या दोघांसाठी माझं मौन मोडलं आहे बरं. पण दाद देत नाहीत-

[जगन्नाथ ड्रायव्हर येतो. कपडे खराब झाले आहेत. हातात मोटारची यंत्रे पुसायचे फडके.]

जगन्नाथ: क्या है जी वासूअण्णा?

भिकू: (गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन येत) काय वासूअण्णा ? श्यामभय्या, हे घ्या. काकाजींनी ती दिल्लीहून रोपं आणली होती त्याची फुलं-

वासू: भिकूऽ- (शाळामास्तराच्या ढंगात) कालचा श्लोक पाठ झाला ?

जगन्नाथ: श्यामभय्या, भलत्या लफड्यात टाकू नका यार आम्हाला आज केव्हापासून बसलोय इंजन खोलून कार्बोरेटरमध्ये मिष्टेक येऊन गेली काय तरी. मी सगळे प्लग साफ करून राह्यलोय. मी सांगून दिलं माझ्या छोकर्‍याला तूच करून दे पाठ. तो म्हणून दाखवील.

भिकू: मी बी हेच म्हणून राहिलोय. सकाळपासून बागेत राबून राहिलोय मी. आज आंघोळसुद्धा नाही झाली.

श्याम: आचार्य काय म्हणाले? (वही उघडून पाने उलटीत) काय म्हणाले? हं-शरिराला रोज आंघोळ घालता, मनाला केव्हा घालाल? ते काही नाही. वासूअण्णा, गीतेचं पुस्तक घ्या ते- (वासू पुस्तक देतो.) हं म्हणा, स्थितप्रज्ञस्य का भाषा-

भिकू: श्यामभय्या तिथं झाडांना पाणी दिलंय मी–-

श्याम: स्थितप्रज्ञस्य का भाषा--

जगन्नाथ:साहेब, गाडी खोलली आहे ना मी, हत्यारं बाहेर पडली आहेत.

श्याम: वासूभय्या, तुम्हांला काय झालं न म्हणायला ?

वासू: श्यामभय्या, माझं मौन आहे आज. मी मनातल्या मनात म्हणतोय--

श्याम: काही नको, म्हण मोठ्यानं स्थितप्रज्ञस्य--

जगन्नाथ: पुन्हा सांगा---

श्याम: स्थितप्रज्ञस्य---

जगन्नाथ: थितस-प्रद्‌य-श्यामभय्या, पयले छूटच जबान अटकते आपली

श्याम: कशी जबान अटकते? कार्बोरेटर म्हणतां येतं! प्लग-मॅग्नेट हे शब्द म्हणता येतात आणि स्थितप्रज्ञ म्हणता येत नाही ?

जगन्नाथ: पण कार्बोरेटर म्हणजे काय मला माहीत आहे. तो दिसला की बराबर कळतं हा कार्बोरेटर. हा मॅग्नेट. पण तुम्ही आता काय म्हणता ती भानगड काय तेच कळत नाही ना. ती एकदा दाखवा आम्हांला, मग बराबर याद राहील. काय भिकू ?

भिकू: क्या बात है? कबीरजीने कहा है--

श्याम: भिकू, कबीरजी नको ! गीता |

[ गीता आतून येते. ]

- oOo -

पुस्तक: तुझे आहे तुजपाशी
लेखक: पु. ल. देशपांडे
प्रकाशक: परचुरे प्रकाश मन्दिर
आवृत्ती सतरावी (१९९६)
पृष्ठे: ३४-३८.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : तुझे आहे तुजपाशी >>
---


हे वाचले का?

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

लोकशाहीच्या नावानं चांगभलं

One heart-bit away from Presidency and not a single vote is cast in my name. Democracy is so over-rated.
    - Frank Underwood (House of Cards: Season 2, Episode 2)

लोकशाही म्हणजे ’लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालवलेले राज्य’ (Democracy is government of the people, by the people, and for the people) ही अब्राहम लिंकनने केलेली व्याख्या आपण नागरिकशास्त्राच्या परीक्षेसाठी पाठ केलेली असते. जिथे अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र हा विषय इतिहासाला जोडलेला असतो, त्या देशात नागरिकशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती उदासीनतेचा असतो हे ध्यानात यावे. 

वास्तविक एखाद्या राज्याला, व्यवस्थेला इतिहासापेक्षा वर्तमानाचे नियोजन, प्रशासन नि संचालन यांची घडी बसवण्यास अत्यावश्यक असलेल्या नागरिकशास्त्राचे महत्त्व अधिक असायला हवे. पण भूतकालभोगी समाजाला इतिहासाभोवती निरांजने ओवाळताना वर्तमानाचा विसर पडत जातो, आणि पर्यायाने नागरिकत्व नि नागरिकशास्त्र हे उपेक्षेचे विषय होऊन राहतात. याचा अपरिहार्य परिणाम म्हणून लोकशाही या व्यवस्थेबद्दल, तिने देऊ केलेल्या अधिकारांबद्दल, आणि एक यंत्रणा म्हणून ती सुरळित चालावी म्हणून आपल्या कर्तव्यांबद्दल बहुतेक नागरिक अनभिज्ञच राहताना दिसतात. प्रागतिकतेचा झेंडा खांद्यावर घेत लोकशाही नि संविधान यांची जपमाळ ओढणारेही त्याला अपवाद नसतात.

लोकशाही ही खरेतर व्यवस्था नसून चौकट म्हणायला हवी. वर दिलेल्या व्याख्येच्या ढोबळ दिग्दर्शनाखाली लोकशाही व्यवस्थेची विविध प्रारुपे जगभर पाहायला मिळतात. यातील बहुतेक प्रारुपे ही प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार करतात. निवडणुका वा तत्सम मार्गाने नागरिक आपले प्रतिनिधी निवडतात आणि या प्रतिनिधींचे प्रतिनिधीमंडळ नागरिकांच्या समुच्चयासाठी असलेल्या लोकशाही व्यवस्थेतील ’संचालक मंडळ’ म्हणून काम करते. कुठे राजकीय पक्षाधारित लोकशाही, तर कुठे 'पक्षविरहित लोकशाही हीच खरी लोकशाही'चा गजर. कुठे नागरिकांनी राजा निवडावा तसा थेट अध्यक्ष निवडून त्याचे सहकारी निवडण्याचा पूर्णाधिकार त्याला बहाल केलेला, तर कुठे जनतेने निवडलेल्या प्रतिनिधींमधूनच संचालक मंडळ अथवा मंत्रिमंडळ निवडण्याचा नियम. कुठे संघराज्य व्यवस्था, तर कुठे ’एक देश, एक कायदा’ ही व्यवस्था. लोकशाहीची अशी अनेक प्रारूपे जगभर दिसतात.

’नागरिक’ कुणाला म्हणावे इथपासून फाटे फुटायला सुरुवात होते. लोकशाहीचे अग्रदूत म्हणवणार्‍या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्येही सुरुवातीच्या कित्येक दशकांत गुलामांना नागरिक मानले जात नव्हते, आपले प्रतिनिधी निवडण्याचा त्यांना अधिकार नव्हता. जगभरात आपल्या साम्राज्याची पताका फडकवणार्‍या, पण देशांतर्गत लोकशाहीचा डिंडिम वाजवणार्‍या इंग्लंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार भारतीय महिलांनंतर मिळाला. अनेक देशांत फक्त करदाते हेच मतदार आणि पर्यायाने नागरिक मानले जात होते. दुसरीकडे गुणवत्तेचा मुद्दा पुढे करत ’देश पातळीवर आपला प्रतिनिधी कसा असावा, त्याची कर्तव्ये काय असावीत’ वगैरे विचार करण्याची कुवत नसलेल्यांना नागरिकत्व वा मतदानाचा अधिकार मिळू नये असा फक्त संभावितांच्याच लोकशाहीचा मुद्दा रेटला जात होता.

भारतासारख्या सरंजामशाही मानसिकतेचा पगडा असलेल्या देशात जुने संस्थानिक, जमीनदार हेच पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत असल्याने 'लोकशाही व्यवस्था खरेच प्रस्थापित झाली का किंवा ती कितपत परिणामकारक आहे?' असा प्रश्न विचारला जाऊ लागला. दुसरीकडे लष्करी मार्गाने एखाद्या देशावर कब्जा करण्याचेच लघुरुप म्हणजे बाहुबलाच्या आधारे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणेही दिसू लागले. थोडक्यात लोकशाही ही बाहुबलाची लोकशाही होऊ लागली. दुसरीकडे अर्थसत्ताही राजकीय सत्तेतील आपला वाटा मागू लागली. मग अर्थ आणि बाहुबळाच्या आधारे एकुणच लोकशाही व्यवस्था आपल्या सोयीनुसार वळवली जाऊ लागली आणि लोकशाही विरूप प्रारूपे दिसून येऊ लागली. 

मग एखादा अध्यक्ष वा पंतप्रधान दोन-तीन दशके नव्वद-पंचाण्णव टक्के अशा भरघोस मतांनी निवडून येऊ लागला, त्याची पूर्वतयारी म्हणून तसा तो निवडून येणारच आहे असे सांगणार्‍या तथाकथित जनमत चाचण्या माध्यमातून छापून येणे वगैरे लोकशाहीच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले.

'केवळ राजकीय नेते, प्रतिनिधी यांच्यावर या सार्‍या दुरवस्थेचे खापर फोडता येईल का? या सार्‍या अवस्थेला खुद्द नागरिक जबाबदार नाहीत का?' असा प्रश्न बहुधा विचारला जात नाही. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प निवडून आले त्यानंतर बराक ओबामा हे जर्मनीच्या दौ-यावर होते. तिथे बर्लिनमध्ये ओबामा यांना जर्मन पत्रकारांनी ट्रम्प यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर ’अमेरिकन लोकशाहीचे भवितव्य कसे वाटते?’ असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ओबामा म्हणाले, "लोकशाही ही दर चार वर्षांनी मतदान करण्यापुरती प्रक्रिया नाही! नागरिकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की लोकशाही ही दैनंदिन आयुष्यात जगण्याची प्रक्रिया आहे. ती जगावी आणि जोपासावी लागते."

पण माणसाची एकुण प्रवृत्ती ही कायमच ’एक त्राता नि एक सैतान’ शोधण्याची असते. आणि हे दोघेही आपल्या स्वत:शिवाय अन्य कोणी असणार हे उघड आहे. जिथे ते सापडत नाहीत तिथे देव नावाची संकल्पना उभी करुन त्रात्याचे पद त्याला बहाल केले जाते आणि त्याच्या श्रेष्ठत्वाला अधोरेखित करण्यासाठी कुण्या सैतान, इब्लिस, मार यांची छोटी रेघ त्याच्या शेजारी ओढली जाते. त्याच धर्तीवर एक तथाकथित बलदंड नेता हा त्राता नि त्याला व त्याच्या उदात्त कार्यात अडथळा ठरणारा कुणी दुय्यम प्रतिस्पर्धी नेता हा सैतान ही निवडही जनता करुन ठेवत असते. थोडक्यात स्वत:ला त्राता होण्याचे कष्ट नकोत आणि बिघडल्या गोष्टींचे उत्तरदायित्व नको या दृष्टिने अनुक्रमे नेता आणि प्रति-नेता निवडून जनता आपले नागरिकत्व त्यांच्या चरणी ठेवून स्वत: केवळ मतदार होऊन राहण्यात धन्यता मानते.

सुरुवातीलाच दिलेले अवतरण हे 'हाऊस ऑफ कार्ड्स' या मालिकेतील फ्रॅंक अंडरवुड या पात्राच्या तोंडी आले आहे. या मालिकेचे वैशिष्ट्य असे की तिचे मुख्य पात्र असलेला हा फ्रॅंक अधेमध्ये सरळ प्रेक्षकांशी संवाद साधतो. एक प्रकारे प्रेक्षकही या राजकीय खेळातील नागरिकच आहेत, अशा तर्‍हेने ही मालिका त्यांनाही त्या कथानकाचा भाग बनवते आहे. अशाच एका प्रसंगात फ्रॅंकवर व्यवस्थेचा दुरुपयोग केल्याचा आरोप ठेवत महाभियोग चालवला जात आहे. त्या दरम्यान आपली साक्ष देताना तो ज्युरींशी बोलता बोलता अचानक वळून प्रेक्षकांशी म्हणजे नागरिकांशी बोलतो आहे,...

You accuse me of breaking the rules, and I tell you, I am playing by the rules. The very rules that you and I all agreed upon. The very rules you and I, all wrote together.

So, yes, I am guilty as hell; but then so are all of you! Yes, the system is corrupt, but you wanted a guardian at the gate like me. And why? Because you know, I will  do whatever it takes. And you have all enjoyed it, been party to it and benefited by it.

(Turning to the viewers/camera)

Oh, don't deny it. You loved it. You don't actually need me to stand for anything. You just need me to stand. To be the strong man. The man of action.

My God, you are addicted to action... and slogans. It doesn't matter what I say. It doesn't matter what I do. Just as long as I am doing something; you are happy to be along for the ride.

And frankly, I don't blame you. With all the foolishness and indecision in your lives, why not a man like me? I don't apologize. In the end, I don't care whether you love me or you hate me... just as long as I win!

The deck is stacked. The rules are rigged... Welcome to the death of the Age of Reason! There is no right or wrong, not anymore. There's only being in...

...and then being out!

- President Frank Underwood. (Testifying in front of DoJ committee)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये असलेली अध्यक्षीय पद्धत किती तकलादू आहे हे ती मालिका आणि फ्रॅंक हे त्यातील मुख्य पात्र तुम्हाला दाखवून देते आहे. वास्तविक फ्रॅंक हा पक्षाचा प्रतोद, अमेरिकेतील लोकशाहीचे प्रारूप पाहता तसा दुय्यम अधिकारी. परंतु आपल्या डावपेचाच्या क्षमतेचा, सत्तेच्या खेळातील इतर खेळाडूंच्या परस्पर संबंधांचा, उद्योगपतींच्या आर्थिक ताकदीचा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेचा धूर्तपणे वापर करत टप्प्याटप्प्याने थेट अध्यक्षपदापर्यंत त्याने मारलेली मजल स्तिमित करणारी. व्यवस्थांच्या यंत्रणा कशा चालतात, त्यांचे परस्परांना कुठे नि कसे छेद जातात याबाबत कुतूहल असणार्‍यांना पुरेपूर समाधान देणारे हे कथानक. 

व्यवस्थेचे भागधारक आणि लाभधारक असे दोन्ही असलेल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि माध्यमिक अशा विविध प्रकारच्या सत्ता राबवणारे नेते, त्यांचे परस्परसंबंध, स्वार्थ साधण्यासाठी कधी परस्परांशी केलेला संघर्ष तर कधी हातात हात घालून केलेली वाटचाल, त्यासाठी व्यवस्थेचे आयाम मन:पूत वाकवणे, ईप्सित साध्य करण्यासाठी पत्रकारितेपासून अर्थसत्तेपर्यंत सर्वांचा केलेला निरंकुश वापर आणि गरज संपतात वा अडचण होताच निष्ठुरपणे दिलेला बळी... ही संपूर्ण मालिका एक प्रकारे लोकशाही व्यवस्थेची चिकित्सा करते आहे, तिचे वाभाडे काढते आहे. आणि या सार्‍याच्या मुळाशी असलेल्या नागरिकांच्या प्रवृत्तीवर फ्रॅंकने केलेले हे मार्मिक भाष्य मला महत्वपूर्ण वाटते. नागरिकांना, जनतेला इतके अचूक जोखलेला फ्रॅंकसारखा नेता अध्यक्षपदापर्यंत पोहोचतो यात नवल नाही.

मुद्दा लोकशाहीचा आहे तर तिच्या दुसर्‍या टोकाला असणार्‍या एकाधिकारशाही व हुकूमशाहीबाबतही बोलायला हवे. वर म्हटल्याप्रमाणे मानवी मनात त्राता आणि सैतान अशी जोडगोळी कायम कार्यरत असते. हुकूमशाहीमध्ये एक व्यक्ती सार्वभौम, सर्वसत्ताधीश; व्यवस्था आणि पर्यायाने त्या व्यवस्थेमधील नागरिक सर्वस्वी तिच्या अधीन. जनतेला, नागरिकांना तिची निवड करण्याचा वा सत्ताभ्रष्ट करण्याचा त्या व्यवस्थेने वैध मानलेला कोणताही मार्ग नसतो. असे हुकूमशहा अनेकदा लोकशाहीचा डोलारा उभा करतात. दाखवण्यापुरत्या निवडणुका होतात आणि ते प्रचंड बहुमतांनी- अगदी नव्वद टक्क्यांहून अधिक, निवडून येतात.

स्वातंत्र्य असलेल्या कोणत्याही समाजात जनमत इतके प्रचंड प्रमाणात एखाद्याच्या बाजूने वा विरोधात जाण्याची संभाव्यता नगण्य आहे हे स्वतंत्र विचारशक्ती असलेल्या सार्‍यांनाच ठाऊक असते. परंतु तरीही या लुटूपुटूच्या निवडणुका होतात आणि हुकूमशहा निवडून येतात. थोडक्यात त्यांनाही आपण लोकशाही मार्गाने निवडून आलेले नेते आहोत हे - निदान बाह्य जगाला - दाखवणे आवश्यक वाटते.

’द डिक्टेटर’ नावाच्या इंग्रजी चित्रपटातील अ‍ॅडमिरल जनरल अलादिन हा असाच एक हुकूमशहा. वादिया नावाच्या राष्ट्रावर त्याची निरंकुश सत्ता आहे. तोच नेता, तोच खेळाडू, तोच अभिनेता... सर्वच क्षेत्रात तोच श्रेष्ठ ’ठरत’ असतो. चित्रपट इंग्रजी असल्याने (आणि वास्तवाचा आधार असल्यानेही) ही वादिया आणि हा राजा/सुलतान यांची पार्श्वभूमी एखाद्या मुस्लिम राज्याची आठवण करुन देणारी. अलादिन हे नावही अरेबिक. त्यामुळे एक प्रकारे यात इस्लामी जगताची खिल्ली उडवण्याचा प्रयत्नही असावा असे गृहित धरून यावर बंदीही आलेली.

त्याच्या वजीराच्या कारस्थानांमुळे या हुकूमशहाला परागंदा व्हावे लागते. कसाबसा तो स्वातंत्र्याची भूमी अमेरिकेत पोहोचतो आणि त्याला एक नवीनच वादिया भेटतो. पण दरम्यान वजीराची कारस्थाने चालू असतात. तो या अलादिनच्या डमीलाच अलादिन म्हणून मिरवत असतो, पाश्चात्त्य देशांशी करार करुन त्यांना लोकशाही स्थापनेचे आश्वासन देतो. बदल्यात तो वादियामधील तेलांच्या खाणींतून तेल-उत्पादनाचे हक्क पाश्चात्त्य कंपन्यांना देऊ करताना स्वत:साठी घसघशीत मोबदला पदरी पाडून घेणार असतो. 

एका जाहीर कार्यक्रमात हा डमी अलादिन अमेरिकन आणि इतर पाश्चात्य देशांच्या नेत्यांसोबत वादियाच्या नव्या संविधानाची प्रत प्रसिद्ध करणार असतो. पण खरा अलादिन तिथे पोहोचतो. या शेवटच्या-क्लायमॅक्सच्या- प्रसंगात अलादिनचे एक दीर्घ भाषण आहे. ते अत्यंत मासलेवाईक आहे.

This coner...stituition is nothing but license to the oil companies and foreign interest to destroy my beloved Wadiya. Wadiya will remain a dictatorship. (tears the draft of new democratic constitution for Wadiya. Lot of unrest in the gathering of dignitaries.)

Oh, be quiet. Why are you guys so anti-dictators? Imagine if America was a dictatorship. You could let 1% of the people have all the nation's wealth. You could help your rich friends get richer by cutting their taxes. And bailing them out when they gamble and lose. You could ignore the needs of the poor for health care and education. Your media would appear free, but would secretly be controlled by one person and his family. You could wiretap phones. You could torture foreign prisoners. You could have rigged elections. You could lie about why you go to war. You could fill your prisons with one particular racial group, and no one would complain. You could use the media to scare the people into supporting policies that are against their interests.

I knew this is hard for you Americans to imagine. But please, try. I will tell you what democracy is. Democracy is the worst. Endless talking and listening to every stupid opinion; and everybody's vote counts. No matter how crippled, black or female they are. Democracy...-

वरकरणी पाहता तो त्याची हुकूमशाही वृत्तीच प्रदर्शित करतो असे वाटत असले, तरी वास्तवात ते वक्रोक्तीचे उत्तम उदाहरण आहे. त्याने दिलेली उदाहरणे ही खुद्द अमेरिकेला चपखल बसतात. ’तुम्ही हुकूमशाही प्रस्थापित केली तर तुम्ही हे करु शकाल...’ असे म्हणत तो जी जंत्री देतो ती सारी कृत्ये ’लोकशाहीवादी’ म्हणवणारी अमेरिकाच कदाचित जगात सर्वाधिक प्रमाणात करत असावी. 

देशातील नव्वद टक्क्यांहून अधिक संपत्ती जेमतेम १% लोकांकडे एकवटलेली असणे, एकाच प्रकारच्या वांशिक गटांवर गुन्हेगार जमात असल्याचा शिक्का मारुन त्यांना तुरुंगात डांबणे, युद्धखोरीला लोकशाहीचा मुखवटा चढवणे, इतर देशांमध्ये लोकशाही प्रस्थापनेच्या नावाखाली ढवळाढवळ करणे आणि सत्तेच्या कटकारस्थानांत सहभाग घेणे इत्यादि दुर्व्यवहार अमेरिकेइतके जगात कोणत्याही लोकशाही देशांत दिसणार नाही. सर्वांत मोठा लोकशाही देश हाच लोकशाहीचा सर्वात मोठा हत्यारा असण्याचा अनुभव आपण घेतो आहोत. 

एखाद्या हुकूमशहाची लोकशाहीची व्याख्या जशी स्वसोयीची, वेगळी असते तशीच अमेरिकेची इतर देशांमधील लोकशाहीची व्याख्या वेगळी असते. द. व्हिएतनाम पासून इराक, अफगाणिस्तानपर्यंत सर्वत्र लोकशाही प्रस्थापित करण्याच्या नावाखाली विध्वंस घडवून लोकशाहीचा जो डोलारा उभा केला गेला तो अमेरिकाधार्जिणाच राहिल याची काळजी घेतली गेली. म्हणजे एखादा हुकूमशहा जसा निवडणुकांमधून प्रचंड बहुमताने ’निवडून’ येतो तसेच या अमेरिका-प्रस्थापित तथाकथित लोकशाहीबाबतही झाले आहे.

’द डिक्टेटर’च्या शेवटास असलेले अलादिनचे हे भाषण म्हणजे लोकशाहीचा मुखवटा घालून मिरवणार्‍या अमेरिकेच्या गालावर मारलेली सणसणीत चपराकच आहे. अणुबॉम्बसारखे प्रलयंकारी हत्यार विकसित करुन, त्याचा वापरही करुन लाखो लोकांचे शिरकाण 'लोकशाहीवादी' अमेरिकेनेच केले आहे. त्या अस्त्राचा वापर आजतागायक एकाही हुकूमशाही वा राजेशाही मिरवणार्‍या देशाने केलेला नाही. वर तिने अण्वस्त्रप्रसारबंदी करारान्वये स्वत:च्या अण्वस्त्रांवर अधिकार राखत अन्य देशांना अण्वस्त्रे विकसित करण्यावर निर्बंध घालण्याचा आटापिटा केला आहे. 

या निर्लज्ज शहाजोगपणाबद्दल वास्तविक आयुष्यात कोणत्याही आंतरराष्ट्रीय नेत्याने अमेरिकेला जाब विचारण्याचे धाडस केलेले नाही. एका चित्रपटात, एका काल्पनिक राष्ट्राच्या नेत्याने, निदान आडवळणाने साधलेला हा निशाणा म्हणूनच मला महत्वाचा वाटतो आहे.

- oOo -


हे वाचले का?