गुरुवार, ७ मार्च, २०१९

मळकर्णीचा डोंगूर...

चढणीवर आणखी एका अप-टु-डेट माणसाची पावलं पडलेली पाहताच मळकर्णीचा डोंगर स्वत:शीच पुटपुटला,
’सटवाईनं नशिबी लिहिलेलं कधी चुकायचं नाही !’

... आता आजच्या विज्ञानयुगात ’सटवाईनं नशिबी लिहिण्याची’ भाषा शोभून दिसत नाही, हे खरं, तरी पण मळकर्णीचा डोंगर चार बुकं देखील न शिकलेला नांगरगट्ट्या डोंगर, घडणार्‍या घडामोडींचा अधिक काय अर्थ लावू शकणार होता?

पण झालं होतं, ते असं...

डोंगर म्हातारा झाला

फार फार वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्यातून सांडलेल्या लाव्हाने एक डोंगरी कुटुंब तयार झालं होतं. माणसं त्याला सह्यगिरीची रांग वगैरे म्हणतात. शेकडो वर्षे त्या कुटुंबातील डोंगर सुखासमाधानाने नांदले. कुणी लंब्याटंगाळ्या आहे म्हणून, तर कुणी बुट्ट्या थोटा आहे म्हणून परस्परांचा द्वेष, मत्सर त्यांनी कधी केला नाही. त्यांचे आपले एक तत्त्वज्ञान होते :

’डोंगर लहान काय, मोठा काय, मातीची जात एकच आहे!’

अगदी जिऑलॉजिस्टांच्या म्हणण्याप्रमाणेही हे सर्व डोंगर अग्निजन्य खडकांचे बनलेले आहेत. तर अशा रीतीने भूतलावर मळकर्णीच्या डोंगराचा जन्म झाला. डोंगर म्हटला, की जंगल आलं; जंगल म्हटले की पशुपक्षी आले. पशुपक्ष्यांच्या मागोमाग माणूस यायचा थोडाच राहतोय? हळूहळू मळकर्णीच्या डोंगराचाही संसार थाटला गेला नि कैक शतके सुखासमाधानाने नांदला.

पण दरम्यान बर्‍याच घडामोडी घडल्या. विलायतेतल्या टोपीकरानं इंडियात- आय मीन, भारतात- आपले राज्य स्थापले आणि साहेबाच्या राज्यातल्या गोर्‍या कलेक्टराचा थाट, तो काय विचारतात? त्या बेट्याला जरा चार चटके बसले, की चटकन् ’सनस्ट्रोक’ने मरायचा. आता नऊ कोटी मैलावरचा सूर्यनारायण कशाला तडमडायला गोर्‍या साहेबाला स्ट्रोक द्यायला येईल? पण गोर्‍या साहेबाच्या मिजाशीच फार. अशाच एका गरम मिजाशीचा कलेक्टरबहादूर, नामे माल्कम्, शिकारीला म्हणून मळकर्णीच्या डोंगरावर आला. इथली थंड हवा, गर्द झाडी, शांत वारा याने त्याची तबियत खुश झाली व दर उन्हाळ्याला मळकर्णीस येऊन तो डेरेदाखल होऊ लागला.

माल्कम् साहेबाच्या पाठोपाठ दुष्काळ आला. जंगले सुकून पिवळी झाली, ओढे आटून सुकून गेले, अगदी दशादशा झाली. मळकर्णीच्या घेर्‍यातली ठाकरं पटापट मरू लागली. तेव्हा मग ठाकरांच्या मुक्तीला आणि प्रभू येशूच्या प्रचाराला पाद्री आले. पाद्र्यांनी पाहिले, एवढा भीषण दुष्काळ, पण मळकर्णीच्या टकुर्‍यावरल्या वाघाईच्या तळ्यात पाणी भरपूर!

... वाघाईचे तळे म्हणजे एक मजा होती. मळकर्णीच्या बरोब्बर डोक्यावर ते ठाण मांडून बसले होते. आता इतक्या उंचावर नितळ, थंड, गोड पाणी... आणि तेही बारा महिने, तिन्ही त्रिकाळ, कसे काय? ठाकरं वाघाईची कृपा म्हणत, तर विज्ञाननिष्ठ माणसे निसर्गाचा चमत्कार म्हणत. मळकर्णीच्या डोंगराला मात्र त्यात जगावेगळे, अप्रूप असे काही वाटले नाही. त्याची शेखी त्याने कधी मिरवली नाही. पण मळकर्णीच्या टकुर्‍यावर वाघाईचे तळे होते, ही वस्तुस्थिती होती, ती होतीच की!

अशा रीतीने गोर्‍या साहेबाचा राबता वाढत गेला, तसा साहेबाचं अनुकरण करण्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता मानणार्‍या नेटिव्हाचाही राबता मळकर्णीला वाढत गेला. पण एके दिवशी चमत्कार झाला नि मळकर्णीचा भाग्योदय झाला!

साहेब गेल्यानंतरच गोष्ट. एकदा एका प्रोड्यूसरने आपल्या ’हंटरवाली और मोती’ नामक चित्रपटाचे बाह्यचित्रीकरण- आउट डोअर शूटिंग- मळकर्णीच्या परिसरात केले आणि मळकर्णीचा बोलबाला सर्व देशभर झाला. मग शहरातले श्रीमान नगरशेठ उन्हाळ्याच्या दिवसांत लेकी, सुना, नातवंडॆ आणि इष्टमित्रांसहित मळकर्णीवर येऊन राहू लागले आणि इथूनच मळकर्णीचा डोंगर पायासह हलला, पायासह हादरला.

शहरातली ही माणसं विलक्षण चौकस आणि जागत्या कुतूहलाची. त्यांना डोके एकच; पण डोक्यात समस्या कित्येक. पहिली समस्या, ’या डोंगराला मळकर्णीचा डोंगरच का म्हणतात’, ’इथे वाघाईचे देऊळ कोणी आणि का बांधले?’, आणि मुख्य म्हणजे ’शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने मळकर्णी पुनीत झाला आहे, की नाही?

आता शिवाजी महाराज याच मुलखातले. ते मळकर्णीला येऊनही गेले असतील. मळकर्णीनं त्यांना पाहिलंही असेल. पण मळकर्णी कशाला त्यांना नाव-गाव विचारतोय? मळकर्णीच्या डोंगराला थोडेच माहीत होते, की तीनशे वर्षांनंतर या राजाच्या नावे लोक राज्य करणार आहेत म्हणून.

-- तर अशी सारी गंमत

- oOo -

लेखक: ’डोंगर म्हातारा झाला’
पुस्तक: अनिल बर्वे
प्रकाशक: मॅजेस्टिक बुक स्टॉल
आवृत्ती दुसरी (१९८१)
पृष्ठे: ५ ते ७


हे वाचले का?