शनिवार, २८ जानेवारी, २०१७

वेचताना... : युगान्त

आपल्या अभिमानाची स्थाने भूतकाळात शोधणार्‍या भारतासारख्या देशात, इतिहासाच्या आधारे केलेले लेखन हे साहित्य क्षेत्रात वाचकांतील लोकप्रियतेबाबत संख्यात्मक निकषावर वादातीतपणे पहिल्या क्रमांकावर आहे. याचा सुकाळ इतका वाढला आहे की हळूहळू इतिहासाच्या आधारे केलेले ललित लेखन आणि इतिहासावरचे लेखन यातील सीमारेषा पुसट होऊ लागल्या आहेत.

युगान्त

एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीच्या चरित्राआधारे लिहिलेल्या कादंबर्‍यांची लाट तर आज तीस पस्तीस वर्षांनंतरही ओसरायचे नाव घेत नाही. आणि असे लेखन करणारे लेखकच काय पण नाटकासारख्या सादरीकरणात त्या त्या व्यक्तिरेखेला साकार करणारे नटही इतिहासाचे तज्ज्ञ म्हणून मिरवू लागले आहेत. त्यातच माध्यम उपलब्धतेचा स्फोट झाल्यावर तर त्यांच्याकडून इतिहासतज्ज्ञांना 'मागणी' वाढू लागली आहे. परिणामी गल्लोगल्ली इतिहासतज्ज्ञ दिसू लागले आहेत.

याचवेळी इतिहासातील व्यक्तिरेखांमधे आपले आदर्श शोधणारे गट आणि म्हणून दुसर्‍या बाजूने त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्या त्या आदर्शांवर हल्ले करणार्‍या मनःपूत चारित्र्यहननात्मक लेखन करणार्‍या स्वयंघोषित इतिहासकारांची संख्या भूमितीश्रेणीने वाढू लागली आहे. यापूर्वी भौतिक/भौगोलिक वर्चस्वासाठी लढाया झाल्या, वंशश्रेष्ठत्वासाठी युद्धे झाली; भविष्यात अन्न आणि पाण्यासारख्या मूलभूत साधनसामुग्रींसाठी युद्धे होतील असे भाकित काही राजकीय-सामाजिक तज्ज्ञ वर्तवू लागले होते.

पण यांनाही मागे सारत कदाचित इतिहासातील व्यक्तिरेखांबाबत, त्यांतील परस्परांच्या आदर्शांबाबत नि त्याबाबत वेगाने विकसित होऊ लागलेल्या मतभेदांवरही युद्धे होऊ शकतात असे कुणी म्हटले तर ती शक्यता अजिबात अतिशयोक्तीची म्हणता येणार नाही. कारण गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत इतिहासातील घटना, व्यक्ती यांच्या संदर्भात झालेल्या हिंसाचारांची प्रकरणे दरवर्षी वाढतच जाताना दिसत आहेत.

इतके सारे लोक इतिहासाबाबत बोलत, लिहीत असताना इतिहासाच्या अभ्यासाच्या निश्चित दृष्टीकोनाचा अभाव मात्र दिवसेंदिवस अधिकच भयावह रितीने विस्तारताना दिसतो आहे. बहुतेक लेखन हे विशिष्ट हेतूने, अनेकदा एखाद्या व्यक्ती अथवा समाजगटाच्या उदात्तीकरणाच्या किंवा चारित्र्यहननाच्या दृष्टीने केले जात असल्याने एका मर्यादित वर्तुळात त्याला आंधळे समर्थन, तर दुसर्‍या वर्तुळात एक शब्दही न वाचता नकार, अशा स्थितीत आपण येऊन पोहोचलो आहोत.

अशा वेळी इतिहासाच्या अभ्यासाचे दृष्टीकोन विकसित करणे, मुळात अभ्यास-विषयाचा अपेक्षित निष्कर्षापेक्षा शंका, प्रश्न, जिज्ञासा यांच्या आधारे वेध घेणे; एखाद्या प्रश्नाच्या निर्णायक उत्तरासाठी पुरेसा पुरावा, तर्कसंगती मिळू शकली नाही तर तो अनुत्तरित ठेवण्याचा प्रामाणिकपणा स्वीकारणे हे दुर्मिळ झाले आहे.

इतिहास हे अस्मिता आणि विद्रोहाचे हत्यार होऊन बसले असताना अशा खुल्या मनाने इतिहासाकडे बघणे, काढलेले निष्कर्ष हे चूक असू शकतात ही शक्यता मान्य करत ते मांडणे, हे लेखकाच्या अस्थिर मनाचे, 'निश्चित भूमिका घेण्यास घाबरत असल्याचे' किंवा दुटप्पीपणाचे निदर्शक असल्याचा आरोप गल्लीबोळातली अर्ध्या चड्डीतली मुलेही सहजपणे करताना दिसतात.

जगात निश्चित विधान फार क्वचित करता येते. एरवी समोर असतात त्या केवळ शक्यता आणि इतिहास लेखक तुमच्यासमोर मांडतो ती त्याच्या दृष्टीने सर्वाधिक संभाव्य अशी शक्यता असते. ही समज आता अस्तंगत झाली आहे. या दृष्टीने इथे निवडलेला वेचा - ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठी - अभ्यासनीय आहे.

इरावती कर्वे या मराठी वाचकांना जरी लेखिका म्हणून ठाऊक असल्या तरी त्यांची मूळची ओळख ही समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, पुरातत्वशास्त्रज्ञ ही आहे. त्या शास्त्राच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेली शास्त्रीय आणि तार्किक बैठक त्यांच्याकडे असल्याने त्यांनी इतिहासाकडेही या दोन्ही आयुधांच्या साहाय्याने पाहिले आहे. युगान्त हे पुस्तक त्यांच्या लेखिका म्हणून असलेल्या कारकीर्दीतील शिखर मानले जाते.

-oOo-

या पुस्तकातील एक वेचा: इतिहास-वेध.


हे वाचले का?

इतिहास-वेध

महाभारतीय समाज बर्‍याच अर्थांनी संकुचितच होता. त्याच्या जीवनाचे चित्र दाखवते की, आधिभौतिक दृष्टीने - द्रव्याच्या दृष्टीने - तो कृषि-गोरक्षकांचाच होता. वैदिक आर्य येथल्या लोकांत मिसळू लागले होते. पण त्यांचे सांस्कृतिक जीवन बहुतांशी गोरक्षक आर्यांच्याच मर्यादेत राहिले होते. घोडे हे त्यांचे आवडते जनावर. घोड्यांच्या संख्येवर, रूपावर व गुणांवर क्षत्रियांचा मोठेपणा अवलंबून असे. बर्‍याचशा राजांची नावेही घोड्याच्या मालकीची वा गुणांची निदर्शक होती. उदा. 'हर्यश्व' (तांबडा घोडा असलेला), 'अश्वपति' (घोड्यांचा स्वामी), 'श्वेतवाहन' (अर्जुनाचे एक नाव), 'युवनाश्व' (एका प्रसिद्ध पूर्वकालीन राजाचे नाव). सारथी असणे, रथातून लढणे (महारथी, रथी, अतिरथी) हा मोठेपणा समजला जाई. रथ लहान-मोठे असत. पण महाभारतकाली कोणाला घोड्यावर बसता येत नसे. ती कला ख्रिस्तोत्तरकाली, म्हणजे भारतीय युद्धानंतर हजार वर्षांनी हिंदुस्थानात आली.

युगान्त

गोरक्षण व कृषि हा जीवनाचा पाया होता. 'गोमांस खात असत का?' असत, असाही पुरावा नाही. नसत, असाही पुरावा नाही. वेद-ब्राह्मण-काली खात होते. सणासुदीला, विद्वान ब्राह्मणासारखा मोठा पाहुणा आला, तर खाण्याचा तो जिन्नस होता. तसा उल्लेख महाभारतात नाही. खात नसतीलच, असेही नक्की सांगता येत नाही. जागोजाग व्याधांचे उल्लेख आहेत. भीमाला मांस आवडे, ते ते मृगया करून आणीत, असाही उल्लेख आहे. पांडव मृगयेवर राहत. त्यांनी आणिलेली मृगया त्यांचे ब्राह्मण आश्रितही खात असणार. मृगयेच्या आणि व्याधांच्या उल्लेखांवरून वाटते की, गोमांस खायचा प्रघात अजिबात नाहीसा तरी झाला होता, किंवा फारसा अस्तित्वात नव्हता. सर्व क्षत्रिय गाईंचे मोठे कळप पाळीत. ते का? क्षत्रिय दूध विकीतसे दिसत नाही. मग गुरे कुटुंबाला दूधदुभत्यासाठी व नित्य होणार्‍या यागाला लागणार्‍या तुपासाठीच होती, का क्वचित खाण्यासाठीही, असा प्रश्न मनात येतो. कर्णपर्वातील उघड-उघड प्रक्षिप्त भाग कर्णाचे मद्र-बाल्हिक व गांधार या देशांतील माणसांबद्दलचे निर्देश हा वाटतो. कुरु-पांचाल धार्मिक, इतर राष्ट्रे अधार्मिक, असा समज झाल्यानंतरचा असावा. त्यात म्हटले आहे की, वरील तिन्ही राष्ट्रांचे लोक गोमांस खात व दारु पीत. (८.२७-७७) दारु पिणे महाभारतकाली क्षत्रियांना संमत होते, हे उघड आहे. तसेच गोमांस खाणेही संमत असेल. पुढे त्यावर धार्मिक बंधन पडल्यावर पश्चिमेकडील लोक जुने रीती-रिवाज पाळीत असल्यामुळे ते नव्या समजुतीप्रमाणे धर्मबाह्य ठरले असतील.

दूध, सायान्न व घृत ही हविर्द्रव्ये होती. 'सायान्न' म्हणजे दूध फाडून फडक्यात बांधून केलेला छाना. ही सर्व खाद्येही असणारच. मनुष्य स्वतःसाठी जे उत्पन्न करतो व खातो, तेच आपल्या देवांना वाहतो. 'घृत' म्हणजे काय? 'तक्र' व 'नवनीत' हे दोन्ही शब्द महाभारतात नाहीत. लोणी तापवून केलेले ते घृत, की गोचर्ममांस तापवून युरोपात काढतात तशी चरबी? तोच प्रश्न 'आज्य' ह्या शब्दाविषयी. 'आज्य' म्हणजे अजापासून झाले ते. 'आज्य' हे बोकडाचे किंवा शेळीचे मांसही असू शकेल. 'आज्य' शब्द 'अञ्ज्' (=माखणे) ह्या धातूपासूनही होतो. आज्य म्हणजे या अर्थाने 'अंगाला माखायचे ते'. तिबेटी लोक व मध्य आशियातील पशुपालक भटके लोक आजही सर्व तर्‍हेची चरबी व लोणी अंगाला फासायलाही वापरतात. घोडा अश्वमेधात बळी देत. अजा क्षुद्र यागात उपयोगी पडत असेल. इतरही जनावरे मेध्य होती. मेध्य जनावरे खाद्यही होती. गो ही मेध्य आणि खाद्य दोन्ही होती का?

महाभारतकालीन लोकांचे मुख्य धान्य काय होते. ते पुस्तकावरून कळत नाही. बहुधा जव असावे. क्षत्रिय भरपूर दारु पीत असत. धान्य जसे खाद्य होते, तसे देवाला पुरोडाशाच्या रूपाने अर्पण करावयाचे द्रव्यही असे. यागप्रधान धर्मात पत्र, पुष्प व फल ह्या तिहींनाही स्थान नव्हते. अशा प्रकारची पूजा महाभारतात नाही. गीतेत जरी ह्या तिन्हींचा ['पत्रं पुष्पं फलं तोयं यो मां भक्त्या' इत्यादि] उल्लेख असला, तरी तो नंतरचा समजला पाहिजे. महाभारतकाली जे आपले व आपल्या देवांचे खाद्य होते, ते मागाहून राहिले नाही. माणसे व देव दोन्ही बदलली.

ज्याचा निर्णय करता येत नाही, अशी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे: ती म्हणजे लिपी व लेखन. महाभारतकाली लोकांना लिहिता येत होते का? महाभारतात लेखनाचा उल्लेख नाही. लिपी असती, तर उल्लेख आलाच असता, अशी ठिकाणे असूनही उल्लेख येत नाही. म्हणून लिहिणे माहीत नसावेसे वाटते. सगळी तोंडी निरोपानिरोपी. दूत पाठवायचे, ते ही लिहिलेली चिठी न देता तोंडी निरोप देऊन. विदुराने वारणावताला धर्माकडे आपला जो एक विश्वासू 'खनक' (= खणणारा) पाठविला, तो तोंडी निरोप देऊन. निरोप फार गुप्त स्वरूपाचा म्हणून तोंडी दिला असे म्हटले, तरी इतर प्रकरणे मुळीच गुप्त नव्हती. प्रत्येक सांगावा चार माणसे जमवून बोलण्याचा होता. विराटपर्वात शमीवृक्षाखाली उभे राहून अर्जुन उत्तराला कोणची शस्त्रे कोणाची, हे जेव्हा सांगतो, त्या वेळी एका तरी शस्त्रावर नाव असावे, अशी अपेक्षा असते. पण नाव नसून खुणा मात्र होत्या. सोन्याचे ठिपके [ जातरूपस्य बिन्दवः ] असलेले धनुष्य गांडीव, ज्याच्यावर सोन्याचे हत्ती ते भीमाचे, ज्याच्यावर इन्द्रगोप ते धर्माचे, ज्याच्यावर सोन्याचे सूर्य ते नकुलाचे व टोळ असलेले ते सहदेवाचे. त्याप्रमाणे बाण कुणाकुणाचे, तलवारी व म्याने कुणाकुणाची, ह्याचे वर्णन आहे. एकाही आयुधावर नाव मात्र नाही. तसेच, राजाचे गोधन मुद्रांकित असे. पण मुद्रेवर नाव असे, असे दिसत नाही. ही गोष्ट क्षत्रियांची. क्षत्रियांना लिहिणे-वाचणे आले नाही, तरी अगदी परवा-परवापर्यंत चालतच असे. पण इतरांच्याही बाबतीत लेखाचे नाव नाही. कृषि व गोरक्षण लेखनाशिवाय चालू शकते. आर्यांच्या आधी भारतात वसलेल्या सिंधुकाठच्या लोकांना लिपी होती, लिहिणे होते. आर्यांची लिपी पहिल्याने ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात सापडते. त्याआधी दोन शतके लेखन आले असल्यास बुद्धाच्या वेळी लेखन होतेसे दिसते. बुद्धयुगाला वणिग् युग म्हटले तर ते अपेक्षितच आहे. कारण द्रव्याच्या उलाढाली लेखनाशिवाय होऊ शकत नाहीत. महाभारतात लेखनाचा व लेखनसाहित्याचा, - शाई, पत्र व लेखणी यांतल्या कशाचाच उल्लेख नाही. लेखन असेल पण असलेच तर, अपवादात्मक असावे. कदाचित सभा बांधणार्‍या मयाला ती विद्या अवगत असली, तर कोण जाणे!

रुक्मिणीची कथा ही महाभारताचा भाग नसली , तरी त्या कालातीलच! कृष्ण कितीही श्रेष्ठ असला, तरी तो ही त्या काळातील क्षत्रियच होता. तेव्हा रुक्मिणीने स्वयंवरापूर्वी प्रेमपत्रिका लिहिणे व कृष्णाला ती वाचता येणे दोन्ही गोष्टी असंभाव्य.

जसे लेखन नव्हते, तशी विटांची वा दगडांची घरेही नव्हती. आर्य बहुधा लाकडी घरे बांधीत. पहिली बौद्ध लेणी ही लाकडी बांधणीच्या अनुकरणाची आहेत, असे जाणकारांचे मत आहे. यज्ञांत निरनिराळ्या चिती सांगितल्या आहेत. त्यांसाठी इष्टका म्हणजे वीट लागत असे. वीट करणे एकदा माहीत झाले, म्हणजे विटा घरांसाठी वापरणे शक्य आहे. पण तसा उल्लेख नाही. गरीब लोक आज बांधतात, तशी मातीची घरे बांधीत असतील.

धर्म, तत्त्वज्ञान, सामाजिक मूल्ये याबाबतींत खूप पुढे गेलेले हे लोक ऐहिक गोष्टींत फार पुढारलेले नव्हते. इतर आर्यभाषिकांप्रमाणेच मिसर व बावेरु येथल्या सेमिटिक-हामिटिक लोकांच्या मानाने ते मागासलेलेच होते. त्यांची शस्त्रे उत्तम होती, व वाहनांमुळे त्यांना जलद गती होती. घोडा हे जनावर त्यांनीच मिसर व बावेरु (इजिप्त व बाबिलॉन) देशांत नेले व त्याच्याच साहाय्याने ते देश जिंकून काही काळ त्यांवर पगडा बसविला. ह्याच भाषिक समूहातील लोक ग्रीसमध्ये गेले. ग्रीसमधील समाजव्यवस्था, दैवते व महाभारतातील चित्र ह्यांत विलक्षण साम्न्य आहे, व विचार करायला लावतील, असे फरकही आहेत. त्यांनीही अशाच एका जुन्या लढाईचा 'इलियड' नावाच्या अमर-काव्यात वृत्तान्त दिला आहे. त्यात जी समाजस्थिती दिसते, ती आपल्या महाभारतकालीन समाजस्थितीशी जुळती आहे. तेथेही लहान-लहान राज्ये होती. सगळे राज्यकर्ते एकमेकांच्या बरोबरीचे होते; व ट्रॉयच्या युद्धात या राजांचे मानापमान करता-करता बिचार्‍या आगामेम्नॉनची दुर्योधनाप्रमाणेच अवस्था झाली होती. ग्रीक कथेत देवादिकांची ढवळाढवळ महाभारतकथेपेक्षा जास्त आहे. ग्रीक देव एकमेकांशी भांडतात. ग्रीक कथांतून देवींचे स्थान स्वतंत्र , (उदा. पालासअथीनी) - देवांइतकेच महत्त्वाचे आहे. महाभारतकाळापर्यंत आपल्याकडे देवींना वा देवांच्या बायकांना स्थान नाही. दोन्ही समाज पितृप्रधान असूनही ग्रीकांच्या कथांत स्त्रियांची चरित्रे ठळक, वैशिष्ट्यपूर्ण व विविध आहेत. मानवी समाजात काय, किंवा स्वर्गात काय, ग्रीकांमध्ये स्त्रीला भारतातल्यापेक्षा जास्त महत्त्व होते, ह्यात शंका नाही.

ग्रीकांच्या मानाने आपल्याकडील स्त्रिया उदात्त असल्या तरी एकाच ठशाच्या व कंटाळवाण्या वाटतात. माता व पत्नी ह्या दोन भूमिकांतच त्या दिसतात. नवर्‍याने पोटच्या पोरीला देवीला बळी दिली, हे निमित्त पुढे करून नवर्‍याला मारणारी क्लिटेमनेस्ट्रा, आपला मुलगा मेलिआगर ह्याने आपला भाऊ थेस्टिआडीस ह्याला भांडणात मारले म्हणून रागाच्या भरात मेलिआगरला मारणारी त्याची आई आलथिआ, आपला शापित भाऊ ओरेस्टेसबरोबर वणवण हिंडणारी इलेक्ट्रा*, पापाचे प्रायश्चित्त म्हणून म्हातारपणी इडिपसने आपले डोळे फोडून घेतले तेव्हा ठरलेले लग्न मोडून ह्या निराधार अपंग बापाची काठी होणारी इफिजेनिया, अशी कितीतरी अविस्मरणीय विविध चरित्रे ग्रीक कथांतून आहेत. ग्रीकांचे देव व देवताही आपल्याकडील देवांच्या मानाने भारी रागीट, उतावळ्या व स्वभावाने दुष्ट वाटतात, ग्रीक कथेत बहीण-भाऊ ह्यांचे नाते अतिशय प्रेमाचे व जवळिकीचे दाखवले आहे. लग्न झाले, म्हणून स्त्री आपल्या माहेराला विसरत नव्हती. मूळ एक पण मागाहून निरनिराळ्या प्रदेशांत गेलेल्या दोन पितृप्रधान संस्कृतीत हा फरक का असावा, असा प्रश्न साहजिकच उभा राहतो. मिसर देशात राजा जरी पुरुष असला, तरी संस्कृती मातृप्रधान होती, व स्त्रियांचा दर्जा फार मोठा होता. त्याचा हा परिणाम होता ग्रीकांमध्येही राजकुले, पूजा-अर्चा करणारा वर्ग व इतर समाज होता. त्याशिवाय परिचर्या करणारा दासवर्गही होता. राजकुले जाऊन लोकसत्ताक प्रस्थापित झाले, तेव्हा मताधिकार फक्त वरचा तीन लोकांना होता. दासांना नव्हता. तोच प्रकार आजपर्यंत अमेरिकेत होता. इतर पाश्चात्त्य देशही एकाच वेळी घरी लोकसत्ताक व बाहेर साम्राज्यवादी होते व आहेत. आपले व परकीय, आपले देव व परकीयांचे देव, आपले हक्क घेण्याची व परकीयांना हक्क न देण्याची प्रवृत्ती - हे सर्व तेव्हा होते, आताही आहे. तेव्हाचे मानवसमाज लहान-लहान होते. ह्या तर्‍हेची समाजव्यवस्था हीच स्वाभाविक समजली जाई. तीत लपवण्यासारखे काही वाटत नसे. हल्ली पूर्वीच्या गोष्टींपैकी खूपच गोष्टी शिल्लक आहेत. पण त्या जणू नाहीतच, अशा भावनेने लोक लिहीत असतात. जुने नुसते त्याज्यच नाही, तर हल्लीच्या काळाला गैरलागू , अशी बर्‍याच लोकांची समजूत असते. तसे ते नाही. जुने कधीही सर्वस्वी टाकाऊ व सर्वस्वी गैरलागू होत नाही; नवे ते इतके नवे कधीही नसते की, त्यात जुन्याचा अंशच नाही. अशी मानवशास्त्राची बैठक आहे. जुने, नवे, जवळ-जळचे तसेच लांब-लांबचे, अप्रगत व प्रगत, सगळेच मानवसमाज अभ्यासास योग्य आहेत. अभ्यास व्हावा तो पूर्वी काय होते व आज काय आहे, त्याची तुलना करता येईल, ह्या दृष्टीने व्हावा. अभ्यासाआधीच ठाम मते ठरवून मूर्तिपूजकाप्रमाणे भक्तिभावानेही होऊ नये व मूर्तिभंजकाच्या आवेशाने द्वेषभावनेनेही होऊ नये, इतकीच प्रार्थना
---

हे सर्व लिहीत असताना एका मित्राने विचार मांडला. वेद, उपनिषदे, महाभारत अशी सुरुवात झाल्यावर आपल्या सबंध समाजाने पलटी का खाल्ली? इतक्या कणखरपणे आयुष्याचा विचार केल्यावर भक्तिमार्गाचा स्वप्नाळूपणा व विभूतीपूजा त्याने कशी स्वीकारली? गोमांसासुद्धा सर्व तर्‍हेचे मांस खाणारे शेवटी गाईचे शेण खाऊन व मूत पिऊन, एका चार पायाच्या जनावराला आपली माता कशी समजू लागले?

ह्या प्रश्नांची उत्तरे देणे - निदान एकट्या माणसाने देणे - अशक्य आहे. विचार व्हावा, म्हणून माझे व इतरांचे प्रश्न पुढे टाकले आहेत. दुसर्‍या एका मित्राने मांडलेला विचार मात्र काहीसा सुखकारक आहे. तो म्हणाला, "अहो, दुसरे काही टिकले नाही, पण भाषा टिकली आहे, हे नशीब समजा. आज तुम्हाला महाभारत वाचता येऊन त्याचा अर्थ समजतो आहे, हे भाग्य नाही का? नाहीतर मोहेंजोदारोप्रमाणे झाले असते. चित्रे आहेत, वस्तू आहेत, काहीतरी लिहिले आहे, पण काय ते मात्र भाषेच्या ज्ञानाअभावी कळत नाही." खरेच केवढे माझे भाग्य की, आज मला तीन हजार वर्षांपूर्वीची 'जय' नावाची कथा वाचता येते आहे, व तीत माझे प्रतिबिंब पाहता येत आहे!
वर्षप्रतिपदा, शके १८८९
१० एप्रिल, १९६७

- oOo -

पुस्तकः युगान्त
लेखिका: इरावती कर्वे
प्रकाशकः देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.
आवृत्ती नववी (१९९४)
पृष्ठे २७३ - २८०.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : युगान्त >>
---


हे वाचले का?

सोमवार, २३ जानेवारी, २०१७

वेचताना... : बाराला दहा कमी

'बाराला दहा कमी' हे मराठी भाषेतील एकमेवाद्वितीय पुस्तक आहे. 

एकतर आपल्याकडे शुद्ध विज्ञान विषयावर लिहिली गेलेली पुस्तके नगण्य, फार फार तर विज्ञानकथा लिहिल्या जातात. त्यातही विज्ञान चवीपुरते नि कथाच जास्त अशी परिस्थिती असते. 

अशा वेळी एखाद्या वैज्ञानिक संकल्पनेचा ऐतिहासिक, सामाजिक वेध घेणं त्याच्या राजकीय-सामाजिक इतिहासाचा अभ्यास करून त्याची 'बखर' मांडणं हे तर आपल्या तर्काच्या पलीकडचे म्हणावे लागेल. केवळ इथेच न थांबता त्याच्याशी निगडित व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात - संदर्भापुरते - डोकावून पाहात अनेक छोट्या छोट्या तपशीलांसह एक सारा कालपटच उभा करणं हे अशक्यप्राय वाटावं इतकं चिकाटीचं काम आहे.

बाराला दहा कमी

दुसर्‍या महायुद्धाने एक नवे जग निर्माण केले. हे विधान अनेक अर्थांनी घेता येईल. एका बाजूने अमेरिकेचा जागतिक महासत्ता म्हणून उदय झाला, दुसर्‍या बाजूने हिटलरच्या सेनेला कोंडीत पकडून निर्णायक पराभवाच्या उंबरठ्यावर नेऊन तार्तरांना खंडणी नेणारा रशिया आता एक बलवान दुसरी शक्ती म्हणून उभे राहिल्याचे इशारे देऊ लागला होता. जगावर राज्य करणार्‍या युरपने अर्ध्या शतकात दोन महायुद्धे पचवून जगण्याचे सारे वैफल्य पदरी बांधून घेतले होते. (दोन सांडांच्या टकरीत वासरासारख्या अडकलेल्या पोलंडसारख्या देशांतून निर्माण होणार्‍या चित्रपटातून आजही हा वेदनेचा सूरच अधिक वारंवार ऐकू येत असतो.) युरपमधील सर्वसामान्य माणसांत संपत्ती आणि स्थावर सतत गमावत राहिल्याच्या नैराश्याने, आपण कधीही मरु शकतो या भावनेतून आलेल्या वैफल्याने ठाण मांडले. 

आर्थिक कणा ढासळल्याने आणि महायुद्धाने कापून काढलेल्या कर्त्या पिढीच्या पाठिंब्याअभावी या युरपने अंकित केलेल्या अनेक देशांच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा होऊ लागला. याच वेळी पूर्वेला एक बलशाली शक्ती म्हणून उदयास येऊ पाहणार्‍या जपानचा पराभव एका अमोघ अस्त्राने करत एका बाजूने राजकीय शक्ती म्हणून जपानचा अस्त तर सर्वोच्च लष्करी ताकद म्हणून आपली द्वाही अमेरिकेने फिरवली. 

या महायुद्धाने पाणबुड्या, रेडार, लढाऊ विमाने, विध्वंसके, क्षेपणास्त्रे आदींच्या संशोधनाला चालना देत युद्धाला तंत्रज्ञानाचे नवेच परिमाण बहाल केले. या दरम्यान समाजात 'काहीतरी विचित्र काम करत बसणारे वेडे लोक' अशी समाजात तसंच राज्यकर्त्यांमधे असलेली इमेज झाडून टाकत अचानक शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञांना राज्यकर्त्यांकडून मान मिळू लागला, नव्हे त्यांना सोबत घेऊन अनेक विकास प्रकल्पांची आखणी सुरू झाली... आणि विध्वंस प्रकल्पांचीही! यात सर्वार्थाने मोठे स्थान मिळवले ते 'अणुबाँब' या संहारक अस्त्राच्या उदयाने.

युरपमधे वेगाने घोडदौड करत निघालेल्या हिटलरने यू-बोटी, नवी युद्धसज्ज विमाने आदी नव्या तंत्राच्या विकासावर भर दिला. त्यातच काही शास्त्रज्ञांनी शक्यता व्यक्त केलेले किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या वापरातून निर्माण करता येईल असे अतिसंहारक अस्त्र हिटलर विकसित करण्याच्या खटपटीत आहे अशी कुणकुण हिटलरविरोधी दोस्त राष्ट्रांना लागल्याने त्याला प्रतिवाद म्हणून ते आपणच प्रथम तयार करावे असा प्रस्ताव काही शास्त्रज्ञांनी- त्याकाळात बव्हंशी लष्करी नेतृत्वाच्या पातळीवर उरलेल्या - नेतृत्वाच्या गळी उतरवला. 

पुढे भयावह स्पर्धेला जन्म दिलेल्या या अस्त्राची निर्मिती ही शास्त्रज्ञांची चूष, राजकीय नेतृत्वाची चढाओढ, लष्करी नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा आणि शीतयुद्धाचा अपरिहार्य भाग बनलेली देशादेशांतील कुरघोडीची आणि संशयाची भावना या सार्‍यांच्या एकत्रित पुढाकाराने झालेली दिसते. या अस्त्राची निर्मिती ज्याला खर्‍या अर्थाने युद्धपातळीवर म्हणतात तशीच झालेली आहे. लाखो माणसे क्षणात भूतलावरून नाहीसे करण्याचे हे तंत्र माणसाने अक्षरशः हजारो शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, सामान्य कामगार, लष्करी अधिकारी आदींना एका जागी एकत्र करून विकसित केले आहे. 

शासकीय पातळीवरून अशी विध्वंसाची हत्यारे विकसित करण्याचे हे कदाचित पहिलेच उदाहरण असावे. या अणुबॉम्बच्या निर्मितीमधे हिटरलकृपेने युरपमधून परागंदा झालेल्या ज्यू शास्त्रज्ञांनी मोठी कामगिरी बजावलेली दिसते. हा थोडासा वैयक्तिक पातळीवरील सूडाचा आयामही त्याला लाभलेला दिसतो. पण पुढे हे अस्त्र तयार होण्याआधीच रशियाने हिटलरची नांगी ठेचली आणि एक प्रकारे त्यांचा अपेक्षाभंग झाला असे म्हणावे लागेल.

या पहिल्या सर्वसंहारक अस्त्राच्या निर्मितीची कथा 'बाराला दहा कमी' आपल्यासमोर ठेवते आहे. युद्धाची पार्श्वभूमी, या अस्त्राच्या निर्मितीच्या निर्णयाप्रत पोचताना राजकीय पातळीवर झाले विचारमंथन, शास्त्रज्ञांची परस्पर-कुरघोडीची भावना, त्यानंतर काही तरी नवे 'निर्माण' करण्याच्या भावनेने त्यांच्यात निर्माण झालेले चैतन्य, या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या तीन अणुनगर्‍या, त्यांचे व्यवस्थापन, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ तसेच लष्करी अधिकारी यांचे परस्पर-संबंध यांचा एक विस्तृत पट घेऊन हे पुस्तक उभे आहे.

या पुस्तकातून निवडलेला वेचा या अणुनगरीच्या निर्मितीच्या सुरुवातीचा भाग आहे. यात एक वस्ती उदयाला येण्याची कहाणी आहे. शून्यातून एक वसाहत उभी करताना करावी लागणारी उभारणी, कसरत, नियंत्रक व्यवस्था, परस्पविरोधी दृष्टीकोनांतून अपरिहार्यपणे उडणारा संघर्ष, उद्दिष्टे कितीही समान असली आणि शास्त्रज्ञांसारखी माणसे कितीही समाजविन्मुख असली, तरी त्यांच्याही मनात कायम ठाण मांडून बसलेली वर्चस्ववादी वृत्ती आदिंचा वेध घेत या विध्वंसाच्या निर्मितीप्रक्रियेचा श्रीकार या वेच्यामधे समोर येतो आहे. हा वेचा जरी दीर्घ असला तरी त्याची सुरुवात नि शेवट दोन विशिष्ट टप्प्यांना सांधणारा असल्याने कमी करण्याचा प्रयत्न केलेला नाही.

'केवळ इंग्रजी पुस्तकांतूनच ज्ञान मिळतं' अशी धारणा असलेल्या - बहुसंख्येपैकी एक - आमच्या एका मित्राने चुकून हे पुस्तक वाचले आणि तो इतका प्रभावित झाला की सवयीने त्याने 'हे पुस्तक कुठल्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे?' असे मला विचारले होते. या प्रश्नाचे उत्तर त्याने पुढे शोधून काढले की नाही मला ठाऊक नाही. कदाचित आपले इंग्रजी वाचन किती व्यापक आहे हे दाखवण्यासाठी काही छिद्रान्वेषी ते शोधून काढतील किंवा काढलेही असेल.

परंतु त्या वांझोट्या तर्कात पडण्यापेक्षा ते पुस्तक मला काय देते हे मला अधिक महत्त्वाचे वाटते. आजच्या काळात रूढ झालेल्या प्रघातानुसार चित्रपटांपासून विज्ञानापर्यंत सर्वच क्षेत्रात मेटा-डेटा ऊर्फ निव्वळ माहिती जमा करून कृतकृत्य होण्यापेक्षा, त्या त्या विषयात बुडी मारून थोडी ओल अंगाला लावून घेणं अधिक आनंददायी असतं असं मी मानतो. जगातलं सगळं काही जमा करण्यापेक्षा मर्यादित परिघात जगणार्‍या माझ्यासारख्या माणसाच्या दृष्टीने हे पुस्तक टनभर सोन्यापेक्षा अधिक मूल्यवान असतं.

-oOo-

या पुस्तकातील एक वेचा: विध्वंसाची निर्मिती


हे वाचले का?

रविवार, २२ जानेवारी, २०१७

विध्वंसाची निर्मिती

अण्वस्त्रप्रकल्पावर अमेरिकेच्या लष्करातून मुरब्बी अभियांत्रिक घेतले गेले. हाती घेतलेलं काम धडक पद्धतीनं तडीला नेणारे अशी त्यांची ख्याती होती. संपूर्ण अण्वस्त्रप्रकल्पाचा प्रमुख सूत्रधार ज. लेस्ली ग्रोव्हज् हा त्यांच्यातलाच होता. पहिल्याच भेटीनंतर अमेरिकन अध्यक्षाच्या शास्त्रीय सल्लागारानं सेक्रेटरी ऑफ स्टेटला कळवलं, "ग्रोव्हज्‌चं आणि माझं जे काही बोलणं झालं त्यावरून अशा कामाकरिता लागणारा पोच त्याच्या ठिकाणी कितपत आहे, याची मला शंकाच वाटते..."

ग्रोव्हज्‌च्या मनातही वैज्ञानिकांविषयी अढी होतीच - सेनाधिकारी आणि अभियांत्रिक अशी वैज्ञानिकांची दोन सावत्र भावंडं त्याच्यात एकत्र झालेली होती ना!

बाराला दहा कमी

शिकागो इथल्या प्रयोगशाळेला त्यानं प्रथम भेट दिली तेव्हाची गोष्ट. मुळात त्याला तंत्रज्ञांच्या रोकठोकपणाची सवय. कोणत्याही गोष्टीबद्दल पूर्णपणे खात्री पटेपर्यंत काही विधान न करणार्‍या वैज्ञानिकांचा गुळमुळीतपणा त्याला सहन होत नसे.

म्हणून त्यानं संशोधनाची शास्त्रीय बाजू अगदी जिवाचा कान करून ऐकली. काहीतरी खोटंनाटं सांगून आपल्याला गंडवायचा डाव असावा या धूर्त वैज्ञानिकांचा! तेवढ्यात एक वैज्ञानिक फळ्यावरचं एक समीकरण खालच्या ओळीत उतरवताना एक आकडा चुकला. ग्रोव्हज्‌नं ताड्कन उठून हिरिरीनं ती चूक निदर्शनाला आणली. वर म्हणाला, "एक गोष्ट तुम्हाला माहीत असलेली बरी. तुम्हाला याची कल्पना असेलच की मी पीएच्. डी. केलेली नाही. कर्नल निकोलस पीएच्. डी. आहे. माझं तसं नाही. असं असलं तरी तरी मी एकूण दहा वर्षं महाविद्यालयीन शिक्षण घेतलेलं आहे. ध्यानात घ्या. तब्बल दहा वर्षे अभ्यास एके अभ्यास! आणि तो ही नोकरीसाठी जरूर नसताना. तेव्हा मला वाटतं हे शिक्षण दोनदा पीएच्. डी. केल्याइतकं मानायला तुमची हरकत नसावी."

ग्रोव्हज् बाहेर पडताच झलार्डनं कपाळाला हात लावला, "या अशा लोकांबरोबर आपण काम करावं अशी अपेक्षा आहे यांची?"

पुढं एकदा ग्रोव्हज् आपल्या सहकार्‍यांना म्हणाला, "कमालीची खटपट करून जगाच्या पाठीवरची एकजात सारी चक्रम माणसं आपण इथं एकत्र केली आहेत." त्यांना तो 'झिपरे लोक' म्हणे!

सेहेचाळीस वर्षांच्या ग्रोव्हज्‌ची प्रकल्पप्रमुख पदावर नियुक्ती झाली ती मारुन मुटकून केल्यासारखी. त्याला खुमखुमी होती आघाडी गाजवण्याची; पण लष्करानं त्याला तब्बल दशकभर ठेवलं होतं बांधकामाच्या आघाडीवर, 'लेफ्टनंट' पदावर. कर्नल व्हायला त्याला उशीर झाला होता. या प्रकल्पामुळे तो कुरकुरत का होईना ब्रिगेडियर जनरल बनला!
-

आणि या धटिंगणानं शास्त्रीय संचालकपदासाठी निवडलं नाजूक चणीच्या, पुस्तकी व सिद्धान्तवादी प्राध्यापकाला.

प्रथम ओपनहायमरला विरोधच झाला. ओपनहायमर तोपर्यंत स्वतंत्रपणे एकही प्रकल्प हाताळलेला नव्हता. वय, अनुभव, विद्वत्ता आणि व्यवस्थापकीय कसब, कोणतीही बाजू ठोस जमेची नव्हती. यथावकाश सुरक्षा यंत्रणेनंही त्याच्या नेमणुकीला आक्षेप घेतला, पण ग्रोव्हज्‌नं त्याला पाठीशी घातलं.

ओपनहायमध्ये बौद्धिक चापल्य तर होतंच; शिवाय रक्तात मुरलेलं सुसंस्कृतपणही या कामात उपयुक्त ठरणारं होतं.

अणुनगरीत 'टाऊन कौन्सिल' निघेपर्यंत सर्व तंटेबखेडे तो एकटा हाताळी आणि गुंते हळुवारपणे सोडवून टाकी. ज्येष्ठ शास्त्रज्ञ त्याच्या नेतृत्वाखाली काम करायला राजी असत. तरुण संशोधकांचा आत्मविश्वास त्याच्यामुळे वाढे. शास्त्रज्ञ व व्यवस्थापन यांच्यातले संबंध सुरळीत ठेवण्याबद्दल तो प्रथमपासून जागरूक होता, त्यामुळे संघर्ष विकोपाला जातच नसत.

एकदा तरुण संशोधकांचा एक गट बिथरला. इथं आपल्यापेक्षा सुतारांना आणि सफाई कामगारांना अधिक वेतनवाढ मिळते हे त्यांच्या लक्षात आलं होतं. ओपनहायमरनं त्यांना तो काळ 'किरकोळ गार्‍हाण्यां'चा नाही हे इतक्या गोड आणि परिणामकारक शब्दांत पटवलं की त्या तरुणांचा केवळ रागच निवळला असं नाही, तर प्रसंगाचं गांभीर्य ओळखून पडेल ते काम करायची जिद्द त्यांच्यात निर्माण झाली.

अर्थात वैमनस्य वेळीच निस्तरणं प्रत्येक वेळी इतकं सोपं नसे. आरंभीच्या काळातच वैज्ञानिक आणि लष्कराधिकारी यांच्यात काही मूलभूत मुद्द्यांवर खटके उडाले.

या महाअस्त्राच्या निमित्तानं मानवी इतिहासात प्रथमच वैज्ञानिक वर्गानं इतक्या मोठ्या संख्येनं लष्करी लगामांचा स्वीकार केलेला होता. केवळ या निर्मितीतल्या शास्त्रीय आव्हानांची भुरळ पडून नव्हे तर अधिक व्यापक प्रेरणेनं ते मुक्तात्मे आपखुषीनं आपले पंख छाटून घेऊन अणुनगरीच्या पिंजर्‍यात येऊन पडले होते. युद्धकाळात शासनाच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारच्या संशोधनाचे निष्कर्ष जाहीर करायचे नाहीत, हा निर्बंधही त्यांनी स्वतःवर लादून घेतला होता आणि आपल्या खुल्या वृत्तीला काचणार्‍या गुप्ततेच्या, सुरक्षिततेच्या अटी ते विनातक्रार पाळत होते; परंतु या सगळ्याला मर्यादा होतीच. लष्करी अधिकार्‍यांनी तिला धक्का लावताच वैज्ञानिक उसळले.

ग्रोव्हज् आणि ओपनहायमर यांनी ठरवलं होतं की वैज्ञानिकांना लष्करात भरती करून घ्यायचं. लष्करी किताब, वर्दी, कायदेकानू त्यांना लागू करायचे. ओपनहायमर लेफ्टनंट कर्नल होणार होता.

अण्वस्त्रनिर्मितीचे प्रयत्न युद्धपातळीवर करायचे असल्यामुळे हे सयुक्तिकही होतं!

परंतु बिटा, राबी, बेचर अशा काही वैज्ञानिकांनी रडार प्रकल्पावर काम करताना लष्करी जाच अनुभवला होता. लष्करी धोरण वैज्ञानिक कामाच्या बाबतीत पोषक ठरणार नाही, संशोधनाच्या कामात योग्य ती लवचिकता टिकवणं त्यामुळे जड जाईल, असं त्यांचं म्हणणं होतं. एकदा घेतलेला निर्णय बदलणं लष्कराधिकार्‍याला सोपं नसतं. उलट प्रत्येक फसलेला प्रयोग स्वतःच उधळून लावणं हा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे, असं वैज्ञानिक मानत असतो!

या मंडळींनी लष्करजमा व्हायला निकरानं विरोध केला. शेवटी ओपनहायमरनं कोनांटच्या मध्यस्थीनं ग्रोव्हज्‌शी रदबदली केली आणि निदान पहिले नऊ महिने प्रकल्प लष्करी असावा असा करार करून घेतला.

एवढं झाल्यावरही ग्रोव्हज्‌नं वैज्ञानिकांना लष्करी गणवेषात कोंबायचा प्रस्ताव मांडला. तेव्हा वैज्ञानिकांकडून त्याला जोरदारपणे विरोध होणं साहजिकच होतं. वैज्ञानिकांना 'मोकाट' सोडलं तर ते आपल्या डोक्यावर बसतील अशी ग्रोव्हज्‌ची धारणा होती. तो ही हट्टाला पेटला. ओपनहायमरनं पुन्हा आपलं कौशल्य खर्ची घालून ग्रोव्हज्‌ची समजूत काढली आणि गणवेषाची कल्पना बासना गुंडाळून ठेवली गेली.

हा प्रकल्प गुप्त असल्यामुळे सुरक्षिततेच्या अटी अटळ होत्या. परंतु लष्करी अधिकार्‍यांनी त्यांच्या शिरस्त्यानुसार गुप्ततेचे हे निर्बंध अंतर्गत पातळीवरही इतके काटेकोरपणानं लावले की त्यांचं खरोखरच पालन करायचं म्हटलं असतं तर काय चाललं आहे हे या खात्याचं त्या खात्यालाच काय; पण या कानाचं त्या कानालाही कळणार नाही अशी वागणूक ठेवणं प्राप्त होतं.

हा केवळ भावनिक घुसमटीचा प्रश्न नव्हता. त्यामुळे वेगवेगळ्या शाखांमधला संवाद तुटून संशोधनकार्याला अडथळा होणार होता. वैज्ञानिक संशोधनाचं हे स्वरूप लष्कराधिकार्‍यांच्या लक्षात येईना. ग्रोव्हज्‌च्या दृष्टीनं हे सगळ वैज्ञानिकांचं 'विनाकारण चकाट्या पिटणं' किंवा वेळेची नासाडी करणं होतं. एकाच वेळी दोन विभागांचा प्रमुख असलेल्या हेन्री स्मिथची तर अशी पंचाईत होती की या पद्धतीनं काम करायचं तर त्याला झोपेतदेखील एका विभागाची गुपितं दुसर्‍या विभागाला फोडता येणार नव्हती!

फेनमन, स्मिथ, झलार्ड इत्यादिंनी डोकी लढवून हे नियम आपल्यापुरते शिथिल करून घेतले. यात झलार्डचा ग्रोव्हज्‌शी चांगलाच खटका उडाला आणि त्याचं पर्यवसान ग्रोव्हज्‌कडून या गुणी, दूरदर्शी वैज्ञानिकाची प्रकल्पावरून हकालपट्टी होण्यात झालं.

कंडनकडे ग्रोव्हज्‌नं वैज्ञानिक आणि लष्कराधिकारी यांच्यात सलोखा राखण्याचं काम सोपवलेलं होतं; परंतु खात्याखात्यांमध्ये अशा गुप्ततेच्या तटबंद्या उभारण्याच्या तत्त्वाशी न पटल्यामुळे त्याच्यावरच अखेर राजीनामा देऊन सोडून जायची पाळी आली.

एक लक्षात घेण्यासारखा तपशील असा की कंडननं राजीनामा देण्यापूर्वी ओपनहायमरला आपली कड घेण्याची विनंती केली; पण ओपनहायमरनं 'मला यात पडून ग्रोव्हज् ला दुखवायचं नाही.' असं म्हणून कानावर हात ठेवले. ही दूरदृष्टी म्हणायची, की धोरणीपणा, की नेमस्तपणा? मात्र त्याची 'नरो वा कुंजरो वा' वृत्ती अण्वस्त्रप्रकल्पाला पोषक ठरणार होती.
-

प्रकल्पाची सूत्रं हाती घेताना आपल्याला तीस वैज्ञानिक आणि त्यांचे इतर मदतनीस मिळून सुमारे शंभर जणांची व्यवस्था लागेल अशी ओपनहायमरची कल्पना होती; परंतु सहा महिन्यात एकट्या लॉस अलमॉस या अणुनगरीत तीन हजारांवर कर्मचारी राबू लागले होते. खर्च, जागा, बांधकाम, वेळ, मनुष्यबळ सर्वच बाबतींत तीनही अणुनगर्‍यांचा आवाका आणि आकार आधी बेडूक, बेडकाचा बोकड, बोकडाचा बैल, बैलाचा ऐरावत ... असा वाढतच जायचा होता...

दहा-बारा वर्षांपूर्वी ओपनहायमरनं चुकतमाकत प्राध्यापकी सुरू केली होती. तीच त्याची गत अण्वस्त्रनिर्मितीच्या या प्रकल्पाची सूत्रं हाती घेतानाही झाली होती.

एखाद्या कलाकृतीचं कल्पनाचित्र रेखाटावं तसा प्रकल्पाचा त्याचा पहिला आराखडा काव्यमय होता.

रॉबर्ट सर्बर या वैज्ञानिकाशी तो त्याविषयी जेव्हा सल्लामसलत करी तेव्हा ते दोघे एखाद्या नाटकाची जुळवाजुळव करताहेत असं वाटे, असं ओपनहायमरच्या सचिवानं लिहून ठेवलं आहे - शिकागोहून आलेल्या सॅम अलिसनपुढे ओपनहायमरनं हा 'कशिद्याचा नमुना' धरला तेव्हा अ‍ॅलिसन हादरलाच.

ओपनहायमरनं रॉबर्ट विल्यम्स या आपल्या बर्कलेच्या विद्यार्थ्यावर हार्वर्डमधल्या प्रचंड सायक्लोट्रॉनची लॉस अलमॉसच्या प्रयोगालयात प्रतिष्ठापना करायची कामगिरी सोपवलेली होती. विल्सन अणुनगरीतला सावळागोंधळ पाहून चक्रावून गेला.

सुदैवानं ओपनहायमरनं आपल्या चुका झपाट्यानं सुधारल्या आणि मग त्यानं प्रकल्पावरची आपली मांड सुटूच दिली नाही. कंडन आणि बिटा या त्याच्या व्यवसायबंधूंनी त्याला प्रकल्पाची अधिक नेटकी आखणी, पद्धतशीर नियोजन आणि संचालन करण्याचं महत्त्वं पटवून दिलं. त्याप्रमाणे त्यानं प्रकल्पाची चार मुख्य विभागांत, वेगवेगळ्या खात्यांत विभागणी करून त्यांच्यावर बिटा, बेचर, जोसेफ केनेडी आणि कॅप्टन पार्सन यांची शाखाप्रमुख म्हणून नेमणूक केली.
-

या सर्वांच्या प्रयत्नांतून जी अणुनगरी तिथं आकार घेऊ लागली, तिचं वर्णन करताना तिथल्या एका वैज्ञानिकाच्या पत्नीनं म्हटलं आहे, "लॉस अलमॉस म्हणजे जणू एक मोठं-थोरलं मुंग्यांचं वारूळच होतं. अणुबॉम्ब ही त्यातली राणी मुंगी. ही राणी मुंगी आपल्या 'तांत्रिक विभाग' नामक बिळात राहात असे आणि तिच्या खादाडपणाला सीमाच नसे. फक्त रविवारी ती झोप घेई. तेवढ्यात कामकरी मुंग्या वारुळातून बाहेर पडत आणि इतस्ततः भटकून घेत..."

अणुबॉम्बची निर्मिती जेवढी अवघड, तेवढंच अणुनगरीवासीयांचं जीवनही खडतर असणार होतं.

शाळेनं सत्तावीस छोट्या-मोठ्या इमारती मागे ठेवल्या होत्या. नंतरच्या तीन महिन्यांत तीन हजार कामगारांनी रात्रंदिवस राबून तिथं पाच प्रयोगशाळा, एक यंत्रशाळा, एक गोदाम आणि बर्‍याचशा बराकींच्या आणि घरांचा रांगा बांधून काढल्या.

'सॅण्टा फी'हून रोजच्या रोज मालवाहू ट्रक येत. कुंपणालगतच्या वखारींमधून हे सामान उतरवून घेतलं जाई. लॉस अलमॉस'मधे आलेल्या सैद्धान्तिक शास्त्रज्ञांना लगोलग संशोधनाला सुरुवात करता येई. प्रयोगवादी वैज्ञानिक मात्र - त्यांत नोबेल-पारितोषिकविजेते वैज्ञानिकही आले बरं का - उन्हातान्हात उभं राहून हे सामान उतरवून घेणं, त्यांच्या याद्या बनवणं असल्या कामांत गुंतून पडत!

अणुनगरीत शिरल्यावर अर्धा तास कच्च्या सडकेनं या मालवाहू गाडया आणि बुलडोझर यांच्यामधूनच वाट काढावी लागे. सुचेल त्या ठिकाणी, लागतील तसतशी घरं बांधून त्यांच्यात येतील तसतशी माणसं कोंबायची, कुणालाही बेघर ठेवायची नाहीत, हे एकच ध्येयधोरण ठेवून लष्कराचं बांधकाम चालू होतं आणि बांधकामाचा हा उद्योग पुढं तब्बल वीस वर्षांपर्यंत चालूच राहणार होता!

न्यू मेक्सिकोतला हा भाग दुष्काळी परिसर म्हणून प्रसिद्ध होता. पाण्याचा कायम दुष्काळ.

काही ठिकाणी तर दर ऐंशी एकरांमागे एक गाय पोसता येई!

लष्कराने ११ किलोमीटरवर धरण बांधून पाणीपुरवठा सुधारला, तरी 'लॉस अलमॉस' वासीयांना घरटंचाई, पाण्याचा प्रश्न आणि सुरक्षेचा जाच या तीन गोष्टी सतत सतावतच राहणार होत्या.
-

ाळेच्या मुख्य इमारतीत कचेर्‍या थाटण्यात आल्या. तळमजल्यावरच्या अभ्यासिकेत ग्रंथालयाची आणि मनोरंजनाची सोय झाली. 'फ्युलर लॉज' नावाच्या लाकडी ओंडक्यांच्या सुंदरशा इमारतीत उपाहारगृहं, अतिथीगृहं सजली. शा़ळेच्या वर्गांतून टपालकचेरी, प्रथमोपचार केंद्र, दुकानं उघडण्यात आली. शिक्षकांसाठी बांधलेल्या घरांची रांग प्रथम श्रेणीच्या व्यवस्थापकांनी व वैज्ञानिकांनी व्यापली.

नंतर घाईघाईनं बांधून काढलेल्या घरांमध्ये कंटाळवाणा सारखेपणा आणि सुखसोयींचा अभाव असे. भिंती इतक्या पातळ की सगळ्यांना सगळं ऐकू जाई. ऊबनियंत्रणाची सोय जेमतेम, त्यामुळे घटकेत घराचं शीतगृह व्हायचं, तर घटकेत भट्टी! तांत्रिक विभागात विजेचा वापर वाढला की घरातली वीज जाई. खिडकी लावायला गेलं की कडीच तुटून हातात येई!

तिथल्या तथाकथित रुग्णालयात बरेच दिवस शाळेच्या साठवणीतले आयोडिन आणि मर्क्युरीक्रोम हेच दोन सर्व दुखण्यांवरचे अक्सीर इलाज उपलब्ध होते. धोब्याचे कपडे सॅण्टा फी मधल्या ५६ किलोमीटरवरच्या धुलाईत धाडावे लागत. सॅण्टा फी इथं खरेदीकरता जायचं तर परवाना काढावा लागे आणि पाठीवर सुरक्षाधिकार्‍यांचा ससेमिरा बाळगून बाजार करावा लागे!

या सर्व आनंदीआनंदात भर घालणार्‍या आणखी दोनच गोष्टींचा उल्लेख व्हायला हवा. त्या मुलखात वरचेवर उद्भवणारी टायफॉईडची साथ आणि उन्हाळ्यात बिळांतून बाहेर पडणारे महाभयंकर खुळखुळे साप!
-

एरवी तो परिसर निसर्गरम्य होता.

विरंगुळ्यासाठी गिर्यारोहणाला, घोड्यावरून गिरीभ्रमणाला जाता येई. रेड इंडियनांचे पाडे धुंडाळणं, मासेमारी, बर्फघसरण करणं, हे आणखी काही विरंगुळे. तरी करमणूक कमीच पडत असावी; कारण वर्षभरातच इतकी बाळं जन्मली की ग्रोव्हज् कुरकुर करू लागला! मग मात्र ओपनहायमरनं कानावर हात ठेवले, 'याबाबतीत मी नाही हां काही करू शकणार!'

एवढ्या हालअपेष्टा काढत असूनही अणुनगरीच्या युद्धकालीन इतिहासात कुणालाही मनोदौर्बल्याचा झटका आल्याची नोंद नाही. बहुतेक रहिवाशांच्या तिथल्या स्मृती रम्यच आहेत!

एक तर बहुतेक रहिवासी ऐन पंचविशीच्या उमेदीतले होते. दुसरं, बाहेर महायुद्धामुळे जी रणधुमाळी, वाताहत माजलेली होती तिच्यातून हे लोक वाचले होते; निदान कुटुंबियांसह राहू शकत होते.

खेरीज या रम्या नगरीत नव्हते गोरगरीब, बेकार, अपंग, कैदी, गुन्हेगार. रस्त्यांना पायपथही नव्हते आणि सुरक्षाव्यवस्था आहे ती आपली चित्रपटांच्या आशेनं आदिवासींनी अणुनगरीत घुसू नये म्हणून, अशी बायका-मुलांची कल्पना होती!

मनुष्यस्वभावाची गंमत अशी की त्या 'माळराना'तही लवकरच श्रेणीबद्धता आकाराला आली. सर्व घरं सारखीच असली तरी कोण कुठल्या भागात राहतं यावर रहिवाशांची इज्जत ठरू लागली. अखेर लॉरा फर्मीनं मुद्दाम 'दर्जाहीन' घराची निवड करून या रोगट समाजरचनेवर घाव घातला.

- oOo -

पुस्तकः 'बाराला दहा कमी'
लेखकः पद्मजा फाटक, माधव नेरुरकर
प्रकाशकः राजहंस प्रकाशन
आवृत्ती दुसरी (१९९८)
पृ. २५९ - २६५.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : बाराला दहा कमी >>
---


हे वाचले का?

गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

वेचताना... : शुभ्र काही जीवघेणे

"ओंजळीत सूर्य घेऊन समुद्रभर हेलकावे खाणार्‍या चंद्रदेवतेची एक झुलू दंतकथा आहे. ही शापभ्रष्ट देवता लाटालाटांवर पिंगा घेत खलाशांची गाणी गाते अन् आपल्या गाण्याने आपणच बेचैन होते. चंद्रदेवतेचं गाणं हा समुद्राचा निनाद आहे असं म्हणतात."
---

शुभ्र काही जीवघेणे

ज्याला अभिजात किंवा शास्त्रीय संगीत असं सामान्यपणे म्हटलं जातं त्यात दिग्गज गायक-गायिकांनी पहिला 'सा' लावताच, किंवा पहिली सुरावट घेताच अनेक मुरलेल्या रसिकांकडून 'व्वा:' अशी दाद जाते. नवथर किंवा पुरेशा न मुरलेल्या रसिकाला कदाचित हा प्रकार फुकाचा शो-ऑफ वाटू शकतो. परंतु खरंच अनेकदा तो सूरच असा लागतो की पुढचं गाणं एकदम सजीव होऊन समोर उभे राहिल्याचा भास येतो. अनेकदा पुढचा राग-विस्तारही जेव्हा आपल्या मनात उमटलेल्या या चित्राशी सुसंगत होऊ लागतो तेव्हा तो रसिक त्या गाण्याशी तद्रूप होऊन अवर्णनीय अशा आनंदाचा धनी होतो.

अंबरीश मिश्र यांच्या 'शुभ्र काही जीवघेणे' या पुस्तकातील 'चंद्रदेवतेचं गाणं' या विदुषी शोभा गुर्टू यांच्यावरील आपल्या लेखाची सुरुवात वर दिलेल्या ओळींनी केली आहे. त्यांच्या या पुस्तकातील हा पहिलाच लेख असल्याने त्या लयबद्ध पुस्तकाचीही सुरुवात म्हणता येईल. हे संपूर्ण पुस्तक म्हणजे पहिला 'सा' लागताच 'व्वा:' ची दाद देण्याइतक्या मुरलेल्या रसिकाचे प्रकटन आहे. संगीत, नाटक, चित्रपट या तीन क्षेत्रातील काही दिग्गजांवरचे लेख विलक्षण आत्मीयतेने लिहिलेले आहेत. (हीच आत्मीयता मला 'माधव मोहोळकर' या रसिकाने चित्रपटसंगीतावर लिहिलेल्या 'गीतयात्री' या पुस्तकात आढळली होती.) ते लिहित असताना लेखकाची जी काही तंद्री लागली असेल जवळजवळ तशीच ते वाचतानाही एखाद्या संवेदनशील वाचकाची लागायला हवी.

आपला लेखनविषय असलेल्या कलाकाराबद्दलची आत्मीयता राखूनही मिश्र यांनी त्यांच्या आयुष्यातील नकारात्मक बाजूंचे उल्लेख मुळीच टाळलेले नाहीत, किंवा त्याचे समर्थन करण्याचाही प्रयत्न केलेला नाही... त्यात थोड्या ओलाव्याचे 'मोहन' घालून एकजीव करून घेतले आहेत. सआदत हसन मंटो किंवा पार्श्वनाथ आळतेकरांसारख्या व्यावहारिक आयुष्यात सातत्याने पराभूत होत राहिलेल्यांबद्दल लिहिताना ते विशेष हळवे होताना दिसतात. शोभा गुर्टू, अख्तरीबाई, ओ.पी., सज्जाद, पंकज मलिक यांच्यावरील लेखांसाठी त्यांनी निवडलेली शीर्षकेच बरंच काही सांगून जातात.

संगीत, नाट्य, चित्रपट या कला ज्यांच्या आयुष्याचे अविभाज्य आणि अतूट अंग आहे अशा मराठी माणसाने हे पुस्तक वाचले नाही तोवर त्याला मरायला परवानगीच नाही.

निवडलेला वेचा हा 'चंद्रदेवतेचं गाणं' या विदुषी शोभा गुर्टू यांच्यावरील लेखाचा भाग आहे. तो एकाहुन अधिक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. (पहिल्याच वाक्यात येणारा जातीचा उल्लेख काहींच्या मते वाचनाच्या लयीत ठेच लावणारा असला तरी तो अनेक कारणांनी सुसंगत आहे. त्याबद्दल स्वतंत्रपणे लिहिणे आवश्यक आहे.) वर पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे हा मूळ गाणे सुरू होण्यापूर्वी घेतलेला एक सुरेल उठाव आहे. शोभाताईंच्या पूर्वसुरींचा धावता आढावा घेत असताना तो त्या गाण्याच्या सुवर्णकाळाची पार्श्वभूमी बनलेला राजकीय र्‍हासकाळही नोंदवून पुढे जातो. आणि एखाद्या विलक्षण हरकतीनंतर लीलया समेवर यावे तसे शोभाताईंचे बोट पकडून पुढे चालू लागतो.

-oOo-

या पुस्तकातील एक वेचा: ठुमरीचा ’उठाव’


हे वाचले का?

ठुमरीचा ’उठाव’

संगीतातल्या बामणांनी ठुमरीला नेहमीच वेशीबाहेर ठेवलं. खयाल गायकीला दरबारी शिरपेच मिळाला अन् ठुमरी चुपचाप गावकुसा बाहेर कोठ्यावर विराजमान झाली. ठुमरीचा अहिल्योद्धार तवायफांनी केला हे विशेष.

शुभ्र काही जीवघेणे

गेल्या शतकाच्या उत्तरार्धात मोगलाई आमदनीचे ताणेबाणे उसवत गेले अन् कंपनी सरकारचा हुकूम सर्वत्र रुजू झाला. तो उत्तर हिंदुस्थानचा अत्यंत धकाधकीचा काळ होता. याच काळात ग़ज़ल-ठुमरी दादराचा डौल झळाळून निघाला. महमदशाह रंगीलेचा रसीला कित्ता होताच. त्यात मिर्झा गालिब, दाग़, मोमीन, ज़ौकने तर कहर केला. बहादुरशाह ज़फरने ग़ज़लच्याच दोन ओळीत त्या काळाचा आकांत शब्दबद्ध केला. तवायफांनी तो गाऊन अमर केला.

ठुमरी, दादराच्या असंख्य चीजा कोठ्याकोठ्यावर झंकारत होत्या. 'छोटासा बालमुवा मोरा', 'नजर लागी राजा' सारख्या सुरेल ठुमर्‍यांनी रसिकांना पागल करून टाकलं होतं. ठुमरी-दादरा गायकीचा बगीचा असंख्य तवायफांनी समृद्ध केला. आज त्यापैकी कित्येक जणी विस्मृतीच्या गर्तेत विरून गेल्या आहेत.

विसाव्या शतकाचे घट बसले अन् थोड्याच वर्षात ग्रामोफोनची दिग्विजयी पताका सर्वत्र फडकली. ग़ज़ल ठुमरी गायकीला सुगीचे दिवस आले.

मायक्रोफोनमध्ये गायल्याने आवाज खराब होतो किंवा नाही याचा शास्त्रीय काथ्याकूट एकीकडे होत असताना दुसरीकडे ठुमर्‍यांच्या तबकड्यांवर असंख्य घरंदाज गायिकांच्या नावाची मोहोर झळकली. बाई सुंदराबाई, बाई प्यारीबाई, बाई मलकाजान यांच्या रेकॉर्डसचा बोलबाला झाला.

पुढे गोव्यातल्या कित्येक घरंदाज गायिकांनी मुंबईची वाट धरली. इथे जागोजागी प्रसन्न मैफलीच्या राहुट्या उभ्या राहिल्या. ठुमरी-दादरा- गायकीला नवीन झळाळी लाभली. ठुमरी-ग़ज़ल गायकीचा दीपोत्सव निरंतर ठेवणार्‍यांत या गायिकांचा मोठा वाटा आहे.

तीसच्या आसपास भावगीतांचा जमाना सुरू झाला. जी.एन. जोशी, लीला लिमये फॉर्मात होते. हलक्या फुलक्या गाण्याचा चस्का पब्लिकला लागला होता. बरकत अली खाँ'च्या 'बाग़ोमें पडे झूले' ची जादुगिरी काही औरच होती. वत्सला कुमठेकर, कुमुद पेडणेकर आघाडीवर होत्या. वत्सलाबाईंची 'रुसला कान्हा ग बाई बाई जा ना' सरळ काळजातच स्पर्शून जात होती.

घम्मनखाँसाहेबांकडे जयश्री कामुलकर, वासंती घोरपडे आणि मेनका शिरोडकर संथा घेत होत्या. अख्तरीबाई फैज़ाबादी नावाचं एक घननीळ काहूर आस्ते आस्ते उमलून येत होतं. 'दीवाना बनाना है तो दीवाना बना दे'चे दिवस होते. बडे ग़ुलाम अली खाँ आपल्या लफ्फेदार आवाजात नाजूक ठुमर्‍या छेडत होते.

ठुमरी-दादरा-ग़जलचा हा वारसा रसूलनबाई, अख्तरीबाईंनी पुढे चालवला. आज पारंपरिक ग़ज़ल ठुमरीचा दिवा घेऊन शोभाबाई पुढे निघाल्या आहेत.

- oOo -

पुस्तकः 'शुभ्र काही जीवघेणे'
लेखकः अंबरीश मिश्र
प्रकाशकः राजहंस प्रकाशन
आवृत्ती दुसरी (१९९८)
पृ. ५-६.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : शुभ्र काही जीवघेणे >>
---


हे वाचले का?

सोमवार, ९ जानेवारी, २०१७

वेचताना... : मितवा

या आधी विद्याधर पुंडलिकांच्या 'शाश्वताचे रंग' मधील वेचा दिला तो वाचक आणि लेखनाचे अनुबंध दर्शवणारा म्हणून. पुंडलिकांखेरीज अशाच प्रकारे अन्य लेखकांच्या लेखनाशी तद्रूप होणारे दुसरे लेखक म्हणजे जीए. पण या दोघांपलिकडे जाऊन थेट तादात्म्य पावताना त्या लेखनातून निर्माण झालेले जग, त्यातील पात्रे यांच्याशी समरस होणारा, जणू ते आपल्या जगण्याचा भाग असल्याचा समज करून घेणारा आणि आपले सारे लेखनच त्या जगात घेऊन जाणारा आणि म्हणून ते जग अपरिचित असलेल्यांकडून दुर्बोधतेचा शेरा मिळवणारा लेखक म्हणजे ग्रेस.

मितवा

ग्रेस यांची सर्वसाधारण ओळख कवी म्हणूनच आहे. त्यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे कोणत्याही परंपरेचा नसलेला आणि कदाचित कोणत्याही परंपरेचा उद्गाता नसलेला कवी. त्यांच्या कवितांमधील प्रतिमा, संदर्भ अनेकदा या भूमीशी नाते सांगणारे नसल्याने बहुसंख्य वाचकांना अनाकलनीय.

परंतु बहुसंख्येला अनाकलनीय आहे म्हणूनच ते श्रेष्ठ आहे असे समजून त्याला उचलून धरणारी एक साहित्यिक कलाकारांची जमात असते त्यांनी ग्रेस यांच्या कवितांना श्रेष्ठत्वाची पावती देऊन टाकली. 'आपल्याला ग्रेस आवडतात' हे सांगणेच मुळी 'आपली आवड चारचौघांसारखी नाही, अधिक उच्च आहे' हे अप्रत्यक्ष सांगण्यासाठी असते हे अनेकदा सहजपणे दिसून येते.

पण अनेकदा हे 'अडाण्याचे गाणे' देखील उपयुक्त ठरते कारण केवळ पारंपरिक जाणीवा आणि विचारांच्या पलीकडे जाऊन एखादा विचार करतो नि त्यांना ग्रेस उलगडू लागतो. मराठी साहित्यात आज कवी म्हणून ग्रेस यांचे स्थान अनन्यसाधारण असे मानले जाते.

जेव्हा ग्रेस यांच्या कविता वाचल्या तेव्हा 'हे आपले काम नोहे' याची खूण मनोमन पटली. त्याबाबतीत आज माझी थोडीफार प्रगती झाली असेल, नसेल. परंतु माझ्या दृष्टीने हा आत्ममग्न कवी एक श्रेष्ठ विचारवंत-लेखक आहे आणि तीच त्यांची प्रमुख ओळख असायला हवी असे मी मानतो. त्या अर्थी मी त्यांना जीएंच्या जातकुळीचा मानत आलो आहे.

त्यांचे 'मितवा' प्रथम हाती घेतले तेव्हा 'ग्रेस वाचायचा कारण आपल्याला ग्रेट रसिक म्हणून मिरवायचे आहे' हा उद्देश होता हे सांगायला काहीच लाज वाटत नाही. पण ते पुस्तक उघडले आणि एक झंझावात रोरावत आला नि त्याने माझ्या जाणिवांच्या, विचारांच्या, दृष्टीकोनांच्या चिंध्या चिंध्या केल्या. आजवर आपण जगाकडे पाहात होतो ते केवळ साक्षीभावाने; त्याला थेट भिडणार्‍या, त्यात आपले जगणे मुरवलेल्या माणसाला जग कसे दिसते याची चुणूकच या पुस्तकाने दाखवली.

एमिली डिकिन्सन, टॉलस्टॉयचा 'फादर सर्जियस', 'बॉदलेअर'चा अल्बेट्रॉस या परदेशी लेखनातील किंवा उर्मिला, सिद्धार्थ आदी देशी मातीतील पात्रांना कवेत घेऊन ग्रेस त्यांच्याशी बोलू लागतात. ते तटस्थ भावाने लिहीत बोलत नाहीत, जणू त्या जगाचे ते भागच होऊन राहिल्यासारखे दिसते. पण हे करत असतानाही त्यातून त्यांचे स्वतःचे विचारमंथन विलक्षण वेगाने आणि तेजाने प्रकट होताना दिसते. 

परंतु भरजरी वाक्यांची पखरण म्हणजे जीएशैली ही समज जेवढी अडाणीपणाची आहे तितकीच लेखनातील दुर्बोधता म्हणजे ग्रेस ही देखील. कारण परपुष्ट वाटणारी प्रतिमासृष्टी त्यांची स्वतःची जाणीव, दृष्टीकोन आणि विचार घेऊन उभी राहते. त्याशिवाय निव्वळ दुर्बोधता म्हणजे ग्रेसशैली म्हणणे हे विस्कळित वाक्यांच्या गद्यलेखनाला मुक्तच्छंदातील कविता म्हणून मान्यता देण्यासारखे आहे.

प्रतिबिंबाचे कोडे हा जीएंना सतत भेटणारा विषय. अगदी 'प्रवासी' पासून 'बखर बिम्म'ची पर्यंत सर्वत्र त्यांनी त्या कोड्याचा वेध घेतला आहे. त्यांच्या प्रवासी'मधला आंधळा शिकारी आरशांच्या व्यूह रचतो नि दृष्टीला देणगी समजणार्‍या डोळसांची शिकार करतो. आरसा हे प्रतिबिंब पाहण्याचे मानवनिर्मित साधन. प्रतिबिंब हे जड व्यक्ती अथवा वस्तूचे असते तसेच ते जाणीवेतून उमटलेलेही असू शकते. संथ तळ्याच्या पृष्ठभागावर माणूस आपले प्रतिबिंब पाहतो तसेच अन्य व्यक्तींच्या जाणिवेतही.

या प्रतिबिंबांच्या अन्वयार्थाच्या आधारे जीए पुढे जातात तर ग्रेस यांना या आरशात भुलीचा स्रोत दिसतो. त्यात बंदिवान होण्याची सांगड जगण्यातील अस्तित्वाच्या प्रश्नांशी पडलेली दिसते. एका साध्या प्रतिबिंबातून निर्माण झालेला प्रवास अस्तित्वाचे प्रश्नांचा वेध घेत पुढे जातो.

- oOo -

या पुस्तकातील एक वेचा: प्रतिमाविभ्रम आणि आरसा


हे वाचले का?

प्रतिमाविभ्रम आणि आरसा

आरशावर चिमण्या फार गोंधळ घालतात. सुचू देत नाहीत अजिबात. घटकाभर डोळा लागला तरी त्यांच्या धिंगाण्याने जाग येते. पुन्हा खाली जमिनीवर हा एवढा कचरा सांडून ठेवतात तो वेगळाच!

मुलींनाही आरशाचे वेड फार. एकदाही इकडून तिकडे जाताना आरशात डोकावल्याशिवाय जाणार नाहीत. काही कारण नसताना. उगीचच! अभ्यास करायलाही आरशासमोर बसायलाच स्पर्धा.

मितवा

मी या चिमण्यांच्या अन् पोरींच्या अनावर छंदामुळे वैतागून आरशावर एक जाडसर कापडाचा पडदा बांधून टाकला. काम असले की तेवढ्यापुरता कपडा बाजूला करायचा. एरवी पडद्याने आरसा झाकून टाकायचा, असा नियम करून टाकला. मी जातीने आरशावर नजर ठेवू लागलो. जरा उघडा दिसला की आठवणीने उठून स्वतः पडदा टाकू लागलो.

लहानपणापासून मला आरशाची चीड येते. त्याच्यामागे माणसे नादावू लागली की त्यांना खडबडून जागे करावेसे वाटते. पण अनुभव असा आहे की हीच येता जाता आरशात डोकावणारी माणसे मला उलट घाव घालतात. म्हणतात, मीच सत्याला भितो. मीच सत्यापासून पळतो आणि म्हणून आरसा टाळतो. म्हणणारांची तोंडे शिवणे शक्य नाही. पण मला मनातल्या मनात लोकांच्या या भूमिकेची गंमत वाटते. आरसा म्हणे सत्य दाखवतो, वा रे वा! आणि सत्य म्हणजे काय? तर जे आरशात दिसते ते, असा विधानव्यतिक्रम मी केला तर हे लोक पुन्हा मलाच वेड्यात काढणार! म्हणजे आरशात दिसते ते सत्य नव्हे पण आरसा मात्र सत्य दाखवितो- असा एखादा विलक्षण गडबडगुंडा नाही का तयार होत? महानुभावाध्ये होता तसा? पण आरशावर भरवसा ठेवणार्‍यांना हे कळत नाही. आरशासमोर उभे राहताच मला स्पष्ट दिसते की, माझे प्रतिबिंब म्हणून दिसणारा माणूस चक्क डाव्या हाताने केस विंचरतो. चमकून स्वतःकडे बघावे तर आपला उजवाच हात असतो. म्हणून मुद्दाम डावा डोळा मिचकावला तर आरशातल्याचा उजवा डोळा मिचकावला जातो. इतक्या धादांत खोटेपणाला सत्य म्हणतात? मला कळत नाही. प्रकाशाच्या नियमाप्रमाणे इकडचे प्रकाशकिरण तिकडे आणि तिकडचे इकडे जाणारे फुल्याफुल्यांचे आराखडे मी ही लहानपणी काढले आहेत. टेबलावर टाचण्या टोचून प्रतिमांचे परस्परसंबंध पडताळूनही बघितले आहेत. पण मग मला माझ्या डोळ्यांनी डोळ्यांनी जी प्रतिमा दिसते ती खोटी आणि विज्ञानाने सिद्ध करता येते ती खरी- ही आत्मवंचना नाही का होणार? मला आरशातील प्रतिमा चुकीची दिसते. मग मी नजरेवर मेंदूचे लगाम घालून खोट्याचे खरे का म्हणून मानावे? त्यापेक्षा माझ्या अंतर्विश्वातच दिसणारी प्रतिमा मला खरीखुरी वाटली तर त्यात बिघडले काय? कुणाला बुद्धीचे पंख आवडतात, कुणाला कल्पनेचे- एवढाच फरक नाही का? शेवटी जी समोर असते त्या प्रतिमेला काहीतरी आकलन लागतेच- बुद्धीचे म्हणा, कल्पनेचे म्हणा! मग बुद्धीचे भास तेवढे खरे आणि कल्पकतेचे भास तेवढे खोटे असा पंक्तिप्रपंच का? सत्याबाबात दुराग्रह निर्माण करणे बरे नव्हे. आरशात बघितल्यामुळे खोट्या गोष्टींवर विश्वास बसून दुराग्रह वाढीस लागतात. आणि अशी दुराग्रही माणसे इतरांना सत्याचे धडे देऊ लागली की मग अभावितपणे- Reality is the greatest fantasy of life - असे म्हणावेसे वाटते मला.

आरशाशी असा पूर्वापारचा दावा आहेच माझा. पण अलीकडे भोवताली सगळ्यांचे आरशाचे वेड मला इतके वाढीला लागलेले दिसते की, ही गोष्ट सहजासहजी झटकून मोकळे होता येत नाही. खरेच, माणसाला स्वतःची प्रतिमा वारंवार का बघावीशी वाटत असेल? या प्रश्नामागे मी पाठलाग करत जाऊ लागलो. कुठून हे वेड आले असावे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागलो. बुटाला चकचकीत पॉलिश करून त्यात डोकावून पाहणारी पोरे, भांडी व्हिमने घासून पालथी घालता घालता त्याच स्वतःचे प्रतिबिंब बघणार्‍या बायका, घडा बुडवण्यापूर्वी संथ तळ्याच्या पाण्यात डोकावून बघणार्‍या पोरीबाळी, मोटारीच्या खिडकीच्या काचेत मुद्दाम मान वळवून बघणारी माणसे, बुबुळातल्या प्रतिबिंबाचा ठाव घेणारे प्रेयसीचे डोळे- चोळीला, परकराला आरसे शिवण्याची पद्धत तर आहेच! पण परवा तर एका खट्याळ पोरीने नाकात खड्याच्या ऐवजी लहानशा आरशाचा तुकडा सोन्यात मढवून घेण्याची इच्छा बेधडक बोलून दाखविली मात्र; आणि मी तळामुळापासून हादरून निघालो. दुसर्‍याचे प्रतिबिंब आपल्यात शोधण्याची ही अनावर ओढ सृजनाच्या आदिम इच्छेचीच तर द्योतक नसेल ना, या विचाराने पिसाळून गेलो.

लहानपणी आमच्या घरासमोर एक कुंभारवाडा होता. अगदी समोर जे घर- म्हणजे लहानसे झोपडेच - होते, त्यात एक म्हातारा कुंभार आणि तितकीच जख्ख म्हातारी कुंभारीण राहायची. म्हातारीच्या अंगात देवी येत असे दर अमावास्या-पौर्णिमेला. म्हातारा दिवसभर गरगरत्या चाकावर लहानमोठी गाडगी, मडकी, पणत्या वगैरे करत असायचा. हातात मातीचा गोळा आला अन् चाक गरगरू लागले की म्हातार्‍याची तंद्री लागायची. म्हातारी एकटक त्याच्याकडे बघत राहायची. घरात तिसरे माणूस नव्हते. दोन पोरे होती ती मजुरी करायला शहरात निघून गेली. त्यांना या धंद्यात गोडी नव्हती. पण या वृद्ध जोडप्याला मात्र पोटापाण्यासाठी धंदा करीत राहणे भाग होते. म्हातार्‍याचे हात अजून समर्थ होते. अनुभव दांडगा होता. अख्ख्या कुंभारवाड्याचा आवा म्हातारा एकटा लावायचा. बाकीचे कुंभार झिलप्या, गोवर्‍या वगैरे वस्तू आणून द्यायचे. म्हातार्‍याचा आवा अगदी दृष्ट लागण्यासारखा असे. धुमसू लागला की अगदी एखादे देऊळ जळते आहे असे वाटे. आणि शांत झाला की आतली सगळी मडकी अगदी हवी तितकी खरपूस भाजून निघायची. एकही तडकायचे नाही की फुटायचे नाही. पण म्हातारी आता पुरती थकली होती. चिखल तुडवून माती तयार करण्याचे काम तिच्याने अजिबात होत नव्हते. फक्त अंगात देवी आली की दणादण नाचायची, बेभान व्हायची. मग दोन दिवस अंथरुणातून उठण्याची ताकद राहात नसे तिच्या अंगात. माती तयार नसली की म्हातार्‍याचा धंदा मार खाई. उपासमारीचा राक्षस डोळ्यांसमोर थैमान घालू लागे. अशा परिस्थिस्तीत म्हातारीला एकदा देवीने दृष्टांत दिला म्हणे! अन् त्या झटक्यात म्हातारीने नवर्‍याचे दुसरे लग्न लावून दिले. शेजारच्या खेड्यातली, पैशाने नडलेल्या बापाची कोवळी पोर नगद पैसे मोजून घरात आणली. लोक थक्क झाले. म्हातारीचे मन मोठे म्हणू लागले. म्हातारीच्या मनात गणित पक्के झाले होते, ते वेगळेच.

चवदा-पंधरा वर्षांची ती नवी नवरी लग्नाच्या तिसर्‍या दिवसापासून खड्ड्यात उतरून चिखल तुडवू लागली. पण त्या कामात तिचे मन रमेना. आठदहा दिवस तिने कसेतरी काढले आणि एक दिवस ती पहाटेच घरातून पळून गेली. म्हातारी चिडली. पण तिला माहीत होते- पोरगी पळून जाणार कुठे? तिच्या माहेराला जाऊन झिंज्या धरून म्हातारी तिला परत घेऊन आली, आणि मग हेच चक्र सुरु झाले. नवरी पळून जायची, म्हातारी तिला धरून आणायची. एक दिवस अधीच धरून आणायला सवतीच्या माहेरला जात असताना, रस्त्याच्या कडेला म्हातारीला आरशाचा एक फुटका तुकडा सापडला. चांगला मोठा, पण वाकडातिकडा. म्हातारी मग त्या दिवशी सवतीच्या माहेराला गेलीच नाही. घरी परत आली. शेणामातीचे गरगट करून तिने झोपडीच्या भिंतीत तो तुकडा नीट लिंपून टाकला. खड्ड्यात उतरली, तिथून बरोब्बर आरशात तोंड दिसते की नाही त्याची खात्री करून घेतली. पुन्हा वर येऊन आरसा जरा सरकवून योग्य जागी बसवला. दिवसभर उन्हात वाळून मातीत पक्का बसू दिला. दुसर्‍या दिवशी लहानग्या सवतीला घेऊन आली. म्हातारीचा होरा अगदी बरोबर होता. पोरगी आरशात बघण्याचा नादाने तासन् तास चिखल तुडवू लागली. कुंभाराचे चाक वेगाने गरगरु लागले. म्हातारी अवसे-पौर्णिमेला तुफान होऊन नाचू लागली. भरभरून खणा-नारळाच्या ओट्या घेऊ लागली. आठवडी बाजाराला गाडग्या-मडक्यांची चळत गाड्यांवर चढू लागली.

सवतीमत्सराचा तो अभिनव प्रकार पाहून मी तेव्हाही अस्वस्थ झालो होतो. पण त्यावेळी सगळे संदर्भ लागले नव्हते. आज आरशाच्या वेडाचा शोध घेता घेता अचानक संदर्भसूत्र हाती आले. अजाण जीव दर्पणमोहात इतके का हरवून जातात ते एकाएकी गवसल्यासारखे वाटते आहे आता. प्रतिमा अशाच तयार होतात, आरशातल्या आणि मनातल्याही. त्यांचे खरेखोटेपण खरेतर संपूर्णपणे सापेक्ष असते.

माणसांचे सर्वांत जास्त प्रेम स्वत:वरच असते. त्याला स्वतःची प्रतिमा बघावीशी वाटते ती ही स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्यासाठी आणि आपली प्रतिमा बघण्याचा सर्वांत सोपा मार्ग सापडतो आरशात. जे दिसते ते खरे की खोटे हा विचारही सुचू नये इतकी जबरदस्त असते ही आभासाची भूल... माणूस त्यात गुंततो. अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा वेध बाजूला पडतो आणि या माध्यमातच सर्वस्व अडकून पडते. फसून जाते. मुख्य म्हणजे आत्मवंचनेची जाणीवही मनाला शिवत नाही. फसवणुकीचा एवढासा संशयही येत नाही. पण काळ मात्र सर्व आभासांना कधीतरी चूड लावतोच. हाच आरसा आपली बदलती, अप्रिय परिवर्तने दाखवू लागला की वैरी वाटू लागतो. मग आपल्यापेक्षा वयाने लहान असणार्‍यांचे वेड पूर्णपणे लक्षात येते. अस्तित्वाच्या अर्थासाठी आपणास आरशाचा नाद लागतो; पण तो नाद सुटल्यानंतरच स्वतःची खरी प्रतिमा दिसू शकते. हे एकदा समजले की मग प्रतिमा-विभ्रमांच्या भूलभुलैय्याचे जगड्व्याळ खेळ प्रत्यक्षात दिसू लागतात- आरशात नव्हे. इथूनच सुरू होते मृगजळाचे बांधकाम...

पण हा सगळा प्रवास शेवटी स्वानुभवाचाच. आरशावर मीच लावलेला पडदा आता मीच कधीतरी काढून टाकणार आहे. कारण या भूलभुलैय्यातून गेल्याशिवाय मागे वळून त्याचे खरे स्वरूप पाहणे कुणालाच शक्य नाही. त्या भूलभुलैय्यातच कायमची अडकून पडणारीही काही माणसे असतात. पण कोणी एखादा त्यातून बाहेर पडलाच तर तो ही या आवर्तातून पिळवटून निघालेला असतो. भूलभुलैय्या हा अस्तित्व शोधाच्या मार्गावरचा अटळ टप्पा आहे. माणसाला तर सगळ्याच गोष्टींचा अर्थ हवा असतो. या अर्थवेडापायी कधी खरे, कधी खोटे, कधी भ्रामक, कधी फसवे अर्थ उरीपोटी जपले जातात. पण हे सारे अपरिहार्यपणे असेच व्हावे लागते. अर्थातीत प्रतिमेच्या दर्शनातून कधीतरी आत्मशोध होणारच असेल तर अगोदरचे सर्व टप्पे ओलांडणे भाग असते. भासचक्राची गती त्रयस्थपणे न्याहाळायची असेल तर, एकतर चक्राच्या बाहेर जावे लागते किंवा केंद्रबिंदूशी यावे लागते. तिथूनच दिसू शकते प्रतिमेची अर्थातीतता- अर्थाच्या अनर्थकारी वेडाला चूड लावणारी! काव्यभाषेच्या संदर्भात बोलावयाचे झाल्यास- It discards the poverty of language...

अनेकदा वाचूनही काही शब्द, काही प्रतिमा आपल्यापर्यंत पोहोचलेलेच नसतात, अर्थवेधाचा शाप उरावर असूनही या क्षणी- फक्त घटकाभरच- मला अखेर अल्बेर कामूच्या शब्दांची प्रचीती येते. आणि त्याच्या गळ्यात गळा घालून म्हणावेसे वाटते-

I still think that this world has no higher meaning. But I am also sure that something in it has meaning. This is man, for man alone in the universe insists upon having meaning.

- oOo -

पुस्तकः मितवा
लेखकः ग्रेस
प्रकाशकः पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती दुसरी, पुनर्मुद्रण (२०००)
पृ. ६२-६६.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : मितवा >>
---


हे वाचले का?