रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

देवबाप्पा, डार्विन आणि शेल्डन


'यंग शेल्डन’ मालिकेतील शेल्डन आणि पॅस्टर जेफ यांच्यातील संवाद ...

Pastor Jeff: Sometimes people say to me, "Pastor Jeff, how do you know there's a God?" And I say "It's simple math. God either exists or he doesn't." So let's be cynical. Worst-case scenario, there's a 50-50 chance, And I like those odds.

Sheldon: [raising his hand] That's wrong.

Mary : [lower voice] Shelly, put your hand down.

Mary: [to Pastor Jeff] Sorry, Please continue.

Pastor Jeff: That's okay, Mary. It's Sheldon, right?

Sheldon: Yes, sir.

Pastor Jeff: Well, Sheldon, why don't you come on up here and tell me why I'm wrong.

Mary: No!

Sheldon: Okay. [heads on up]

Pastor Jeff: Let's give him a hand, everybody.

Missy : [waking up] What's happening?

Meemaw: [to Mary] Shelly's gonna eat him alive.

Pastor Jeff: So, you were saying?

Sheldon: You've confused possibilities with probabilities. According to your analogy, when I go home I might find a million dollars on my bed or I might not. In what universe is that 50-50?

Pastor Jeff: So, what do you think the odds are that God exists?

Sheldon: I think they're zero. I believe in science.

Pastor Jeff: So you don't think science and God can go hand in hand?

Sheldon: Science is facts, religion is faith. I prefer facts.

Pastor Jeff: Mm. I understand that. Here's a cool fact for ya. A lot of famous scientists believed in God. Isaac Newton, Albert Einstein, even Charles Darwin.

Sheldon: So Darwin's right about God and wrong about evolution?

Pastor Jeff: Now you're gettin' it. Let's give it up for Sheldon, everybody! What a good sport.

यात 'डार्विनपण देव मानत होता’ असा दावा करणार्‍या पॅस्टरना छोट्या शेल्डनने मार्मिक प्रश्न विचारला आहे. तो म्हणतो, ’म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे, की डार्विनचा देवाबाबतचा दावा खरा आहे, पण उत्क्रांतीबाबतचा नाही?’

एखाद्या थोराचे आपल्या सोयीचे विधान वा दावे उद्धृत करुन आपले दावे बळकट करतानाच त्याच्या आपल्या धारणांना गैरसोयीच्या ठरणार्‍या मुद्द्यांबाबत वा विधानांबाबत सोयीस्कर मौन पाळायचे, वा पॅस्टरने जशी बगल दिली तशी बगल द्यायची, हा आपल्या नित्य अनुभवाचा भाग आहे. हिंदुत्ववादी सावरकरांना आपल्या सोयीसाठी डोक्यावर घेणारे, दुसरीकडे त्यांच्या 'गाय माता असेल तर बैलाची माझी नव्हे. गोरक्षणाऐवजी गोभक्षण करा.' या ठणठणीत विज्ञानवादी मताकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात. कारण गोरक्षणाच्या हाकाटीआधारे राजकारण करण्याच्या त्यांच्या हेतूला ते बाधक ठरत असते.

अर्थात एका माणसाचे सारेच काही बरोबर असते असे मानायचे काही कारण नाही. त्यामुळे शेल्डनचा हा प्रश्न तसा निसरडा आहे. पण 'डार्विनसुद्धा' असे म्हणतानाच 'डार्विन हा कुणी खास आहे आणि म्हणून त्यानेसुद्धा देव मानणे हा देवाच्या बाजूचा एक पुरावा मानावा' असा पॅस्टरचा दावा आहे. आता डार्विन कुणी खास माणूस का आहे, तर तो उत्क्रांतीवादाचा जनक म्हणूनच खास आहे. ज्या धार्मिकांना उत्क्रांतीवाद मान्य नाही, त्यांच्या दृष्टीने डार्विन जास्तीत जास्त चार चौघांसारखा साधा माणूस नाही का? तसे असेल, तर मग त्याचा देवावर विश्वास होता की नाही या मुद्द्याला, 'गणपाचा देवावर विश्वास नाही- किंवा विश्वास आहे.' या मताला जेवढी किंमत असेल तेवढीच द्यायला हवी. त्याचा खास उल्लेख करण्याचे कारणच नाही, निदान धार्मिकांच्या मेळ्यात नक्कीच नाही.

हा असा तिढा वारंवार आपण पाहतो. अशा दांभिकांच्या किंवा गोंधळल्या मनांच्या, पण प्रवृत्तीने आक्रमक अशा फौजा दररोज समोर येत असतात.'अमका माणूस अणुवैज्ञानिक असून गोमूत्रातील गुण मान्य करतो' हा दावा करताना प्रथम त्याचे अणुवैज्ञानिक असणे त्याचे सामाजिक स्थान सांगत असते. तो 'गोमूत्र-वैज्ञानिक(?) आहे नि गोमूत्रातील गुण मान्य करतो' हा दावा कुचकामी असतो. थोडक्यात गोमूत्राचे समर्थक अणुवैज्ञानिक असणे या पायावर आपला दावा बांडगुळासारखा चिकटवून देत असतात. त्याने वेदपाठशाळा- किंवा मुस्लिम असला तर जमातमध्ये- जाऊन शिक्षण घेण्याऐवजी विज्ञाननिष्ठ शिक्षण घेतलेले आहे, हा मुद्दाही लक्षात घेण्यासारखा आहे ना? ज्ञान मिळवण्यासाठी तो धार्मिक चाकोरी न स्वीकारता वैज्ञानिक वाट निवडतो आहे हे उघड आहे. मग 'देव मानणारासुद्धा बघा वैज्ञानिक शिक्षणच घेतो, धार्मिक शिक्षण घेत नाही.' किंवा 'देव मानणारे, विज्ञानाऐवजी श्रद्धेच्या बळाला अधिक महत्वाचे मानणारेही वैज्ञानिक आधारावर सिद्ध झालेली उपचारपद्धतीच स्वीकारुन अमेरिकेत उपचाराला जातात; गोमूत्र वापरुन आपला आजार बरा करण्याचा प्रयत्न करत नाहीत.' असे उलट दावे मी विज्ञानाच्या समर्थनार्थ करु शकतोच की.

वास्तव इतकेच असते की एकीकडे तो अणुवैज्ञानिक असतो आणि दुसरीकडे तो गोमूत्र-गुणांवर विश्वास ठेवणारा असतो, किंवा देव मानणारा असतो. या दोन्हींत कोणताही कार्यकारणभाव असेलच असे गृहित धरण्याची घाई करु नये. (जिज्ञासूंनी छद्मसंगती (spurious correlation) ही शक्यताविज्ञानातील (Statistics) संकल्पना पाहावी.) अ आणि ब एका जागी आहेत इतकेच मान्य करुन न थांबता, अ मुळे ब आहे किंवा ब मुळे अ आहे असा कार्यकारणभाव जबरदस्तीने का लादावा? कार्यकारणभाव हा केवळ मूल्यमापनाचा भाग असतो, नि बरेचदा तो सापेक्षही असतो.

दुसरा मुद्दा असा, की सामान्यपणे असे प्रयत्न धार्मिक वा ऐतिहासिक आधारावर अस्मिता जोपासणार्‍यांकडूनच होतात. एखादा भौतिकशास्त्रज्ञ अथवा रसायनशास्त्रज्ञ आपल्या सिद्धान्ताच्या पुष्ट्यर्थ ’बायबल मध्ये पण असे लिहिले आहे. म्हणजे हे सिद्ध झाले.’ असा दावा करत नाही. तो अनुभव, तर्क, प्रयोग, निरीक्षण, निष्कर्ष या मार्गानेच जातो, त्याला तसेच जावे लागते. आणि त्यातून सिद्ध झालेल्या सिद्धांताला अशी धार्मिक पुस्तकांची जोड द्यावी लागत नाही. विज्ञानाला देवाच्या वा धर्माच्या खांद्यावर बसून आपली उंची वाढवण्याची गरज नसते. तसा प्रयत्न एखाद्याने केला तरी वैज्ञानिक क्षेत्रात त्याला काडीची विश्वासार्हता नसते... अगदी सत्तेच्या बळावर सायन्स काँग्रेसमध्ये घुसखोरी करुन असले भंपक दावे केले तरीही!

धार्मिक आधारावर शेंडाबुडखा नसलेले दावे करणारे मात्र ’नासा’ची साक्ष काढतात. पण तसे करताना ते नासा आपल्या धर्मग्रंथाहून अधिक विश्वासार्ह असल्याची कबुलीच देत असतात. कारण तसे नसेल तर मग नासाची साक्ष काढायचे कारणच काय? नासा हे धर्मपीठ नव्हे तर विज्ञान/तंत्रज्ञानपीठ असल्याने हा धार्मिकांना गैरसोयीचा अर्थ निघतो आहे.

यासारखेच सध्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून बोकाळलेला एक प्रकार म्हणजे आपल्या सोयीची, आपली विधाने वा दावे एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या नावे ठोकून देणे. हा धडधडीत खोटेपणादेखील बाजारात आपल्या वा आपल्या नेत्यांच्या - धार्मिक, सामाजिक, राजकीय वा अन्य - मताला बाजारात फारशी किंमत नाही हे मनातून मान्य केल्याचा उघड पुरावाच असतो. अविश्वासार्ह दावे करणार्‍यांनाच असे विश्वासार्ह लोकांना वा संस्थांना हायजॅक करावे लागते, त्यांच्या मांडीवर बसावे लागते. सिद्धता नसेल, पुरावा नसेल तेव्हा अशी परपुष्टता वापरावी लागते. आपले नसलेल्यांना, अनेकदा तर आपले विरोधक असलेल्यांना हायजॅक करुन त्यांच्या मुखी आपले बोल बोलवावे लागतात.

आपली विश्वासार्हता वाढवण्याची युगत यांना अजूनही सापडलेली नाही, कदाचित कधी सापडणारही नाही. कारण त्यासाठी नेणिवेबरोबरच जाणिवेच्या पातळीवरही आपण कुठेतरी चुकतो आहोत हे आधी मान्य करावे लागेल. त्यांच्यातील दंभ त्यांना तसे करण्यापासून कायम परावृत्त करत राहतो. चुकांना घाबरणारे हे लोक, ’आम्ही सर्वज्ञच आहोत’ असा दावा आक्रमकपणे करत, समोरच्याला आपले म्हणणे पटवून देण्यापेक्षा त्यांचे तोंड बंद करण्यासाठी जमावाच्या कलकलाटाचा वापर करुन घेतात. माणसांना अज्ञानी ठेवून त्यांच्या कळपाच्या जोरावर ते आपले मत लादू शकतील... पण सिद्ध करु शकणार नाहीत !

व्हिडिओतील मूळ प्रश्नाबाबत बोलायचे तर देव मानणे अथवा न मानणे याबाबतची चर्चाच अनाठायी असते, गैरलागू असते किंवा सरळसरळ कुचकामी असते असे माझे मत आहे.

प्रश्न विचारणार्‍याच्या मनात देव नावाची संकल्पना मुळातच नीट आकार घेतलेली नसते. त्याशिवाय त्याची त्या संकल्पनेबाबतची धारणा आणि ज्याला तो प्रश्न विचारला त्याची धारणा- कदाचित दोघे एकाच बाजूला असूनही, भिन्न असण्याची शक्यता बरीच असते. याशिवाय धर्माच्या आधारे, जातीच्या आधारे, वंशाच्या आधारे देवांच्या असलेल्या विविध कल्पना आधीच त्या संकल्पनेचे एकमेवत्व बाधित करतात. त्यावर आमच्या गटाने मान्य केलेला तोच एकमेव देव असे बाष्कळ दावे सर्वधर्मीय करत असतात. आणि एकाहुन अधिक गटांची वा व्यक्तिंची ही संकल्पना सारखी असेलच, तर ती ठोस (concrete) नसून धूसर(vague) आणि म्हणून सर्वसमावेशक असण्याची शक्यताच अधिक.

त्यामुळे ज्याला आवश्यकता वाटते, त्यांनी आपल्या मनात आपल्याला अपेक्षित गुणवैशिष्ट्यांसह एक देव निर्माण करावा किंवा इतर कुणाकडून स्वीकारावा नि पुजावा. त्याची मंदिरे बांधू नयेत, की त्याला इतरांवर लादण्याचा प्रयत्न करु नये. पण हे शहाणपण आहे. माणसांचा समाज हा कितीही तांत्रिक प्रगती केलेला असला, तरी मानसिक बाबतीत अजूनही मध्ययुगीन टोळ्यांच्या मानसिकतेमध्येच जगत असल्याने, हे शहाणपण त्या जमावात रुजणे अवघड आहे.

माणसे आप-आपला देव निर्माण करुन ते थांबत नाहीत. त्याच्या अस्तित्वाबद्दल त्यांनाच शंका राहते. मग तो ’खरा’ आहे हे सिद्ध करण्याचा त्यांचा आटापिटा सुरु होतो. आणि हे खरेपण सिद्ध करण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्याच्या अस्तित्वाला बहुसंख्येचे पाठबळ निर्माण करणे. अशी बहुसंख्या मग साम-दाम-दंड-भेद-छद्म आणि झुंड अशा सहा मार्गांनी जमवली जाते. आता इतके लोक तो मानतात म्हणजे ती संकल्पना नव्हे तर देव खरेच अस्तित्वात आहे असे हे लोक स्वत:देखील मानू लागतात. आणि त्यांचा देव अस्तित्वात असल्याचा ठराव बहुमताने पास होतो.

यावरुन मला मुल्ला नसरुद्दिनची म्हणून सांगितली जाणारी गोष्ट आठवते. गंमत म्हणून तो एक अफवा पसरवून देतो. पाहता-पाहता ती गावभर होते. मग लोक ती खरी मानून त्यानुसार लोक वागू लागतात. हे पाहून मुल्लाही विचारात पडतो नि म्हणतो, ’ज्या अर्थी इतके लोक हे मानत आहेत म्हणजे ते खरेच असले पाहिजे.’ आणि तो ही इतरांसारखा वागू लागतो.

विज्ञानाचे असे नाही. तिथे बहुसंख्या पुरेशी नाही, तिथे सिद्धताच हवी. एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाचा (बहुद्धा लप्लास किंवा लग्रांज) म्हणून सांगितलेला किस्सा आठवतो. आपल्या विद्यार्थ्यांना एक सिद्धांत शिकवत असताना, ’आता हे उघड (obvious) आहे...’ म्हणत त्याने गणितातला एक टप्पा मांडला. एका चौकस विद्यार्थ्याने हात वर केला आणि म्हटले, ’सर, मला हे उघड कसे ते समजले नाही.’ आता प्राध्यापक महोदय त्या टप्प्याची सिद्धता देऊ गेले नि चक्क अडकले. बराच वेळ प्रयत्न करुन त्यांना ते सिद्ध करता येईना. अखेर तास संपला. दुसर्‍या दिवशी प्राध्यापकांनी त्या टप्प्याची सिद्धता तपशीलवार दिली आणि गंमतीने म्हटले, ’NOW, it's obvious.'

थोडक्यात एखादा मुद्दा सोपा आहे म्हणून आपण नेहमी त्याची सिद्धता देत बसत नाही. हळूहळू ती विस्मरणात जाते. आणि एखादे वेळी ती द्यायची वेळ आली की आपण अडकतो. पण प्राध्यापकाला ’अरे वर्गातील इतरांना तो टप्पा उघड आहे हे पटले आहे, तू एकटाच अडाणी आहेस.’ असे म्हणून मुद्द्याला बगल देता येत नाही. सिद्धता ही द्यावीच लागते. आणि ती मागणारा तो चौकस विद्यार्थी ज्ञानाचा तो तळही उपसून पाहात असतो, त्या पाण्याला सडण्यापासून वाचवत असतो.

देव-धर्मादि गोष्टींत परंपरा अधिक महत्वाची नि बहुसंख्या. समोरच्या तळ्यातील पाणी चक्क सडले आहे हे दिसत असूनही बहुसंख्येला ते पाणी स्वच्छ आहे असे म्हणण्यास भाग पाडता आले, की ते पाणी पिण्यायोग्य आहे हा दावा ’निवडून आणता येतो’. या क्षेत्रात निर्णय असतो, निष्कर्ष नसतो. बुद्धिगम्यतेपेक्षा प्रामाण्याला नि अनुसरणाला अधिक महत्व असते. आणि म्हणून पाचव्या ’दिवशी’ सूर्य जन्मला हा स्वप्रतारक दावाही लोक शिरोधार्य मानून चालत असतात.

-oOo-

जाताजाता:
शेल्डनने पॅस्टरच्या तर्कातील शक्यता (possibility) आणि संभाव्यता (probability) यांच्यात झालेला गोंधळ अचूक पकडला आहे. बहुसंख्य माणसे या दोन्हींमध्ये गल्लत करतात. अतिशय सोपे उदाहरण देऊन शेल्डनने त्यातील फरक स्पष्ट केला आहे. शक्यता तर्काने सांगता येते, संभाव्यतेला अनुभवाची, माहिती/डेटा यांच्या साहाय्याची गरज असते. शक्यता निश्चित असते. संभाव्यता ही परिस्थितीजन्य असते, परिस्थिती बदलली की ती बदलू शकते. त्याबद्दल विस्ताराने पुन्हा केव्हा तरी.

---


हे वाचले का?

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

बुद्धिबळातील ‘मार्शल’ आर्ट

Andres_Wadalupe

चित्रातील बुद्धिबळाच्या पटाकडे पाहिल्यावर बहुतेकांच्या मनात चित्रात दाखवलेल्या माणसाप्रमाणेच 'हा काळी मोहरी असलेला येडाय काय?' असा भाव प्रथमदर्शनी उमटेल. आपला वजीर नि हत्ती दोघेही खुशाल पांढर्‍याच्या प्याद्यांसमोर नि वजीराच्या पट्ट्यात आणून काय आत्महत्या करायची आहे का असा समज होईल.पण गंमत पहा. हा डाव काळ्याचाच आहे! कसा ते पाहू.

पण त्याआधी खेळ्या समजण्यासाठी संदर्भ म्हणून बुद्धिबळाचा हा रिकामा पट समोर राहू द्या. यातून पटावरील चौकोन-स्थानांच्या नामकरणाची पद्धत लक्षात येईल. उदा. खालील पटावर निळ्या रंगाच्या बॉर्डरने रंगवलेला चौकोन हा F स्तंभातील (column) तिसर्‍या ओळीत असल्याने त्याचा उल्लेख F-3 असा केला जातो.

Chessboard

१. आता काळ्याची खेळी असेल, तर वजिराने H-2 मधील प्यादे मारले की डाव संपतो.

एक पर्याय म्हणजे घोडा F-3 मधे आणला की तरी एका खेळीनंतर डाव संपतो. पांढर्‍याचे G-2 प्याद्याच्या पाठीमागे राजा असल्याने अडकलेला आहे. तो फक्त H-1 मधे जाऊ शकतो. पण काळ्याने हत्ती अथवा वजिराने H-2 प्यादे मारले की मात होते.

आणखी एक शक्यता म्हणजे घोडा F-3मध्ये आणून राजाला शह देतानाच पांढर्‍या वजीरावर नेम धरता येतो. काळ्या वजीरामुळे G-2 प्याद्याला हा घोडा मारता येत नाही.

२. पांढर्‍याची खेळी असेल तर त्याला प्रथम १ मधे उल्लेख केलेल्या तीनही शक्यता बंद कराव्या लागतील.

बारकाईने पाहता निव्वळ F-3 वर हल्ला करून भागत नाही. मूळ धोकादायक असलेल्या वजीर वा हत्तीला ठारच मारावे लागते.

किंवा F-2 मधील प्यादे एक किंवा दोन घरे पुढे सरकवून पांढर्‍या राजासाठी ती जागा मोकळी करुन घेता येईल. पण याचाही उपयोग नाही. कारण घोडा प्रथम E-2 मध्ये येऊन पांढर्‍या राजाला उपलब्ध असलेला एकमेव चौकोन H-1 मध्ये जाण्यास भाग पाडेल. मग काळा वजीर किंवा हत्ती H-2 प्यादे मारुन मात पुरी करेल.

आणखी एक पर्याय म्हणजे F-1 मधला पांढरा हत्ती हलवून राजाला एक जागा निर्माण करणे. पण याने फारसा फायदा नाही. प्रथम वजीर H-1 प्यादे मारुन शह देईल. पांढरा राजा F-1 मध्ये आला की वजीर H-1 मध्ये जाऊन मात पुरी करेल.

३. काळ्याचा हत्ती ठार मारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे G-2 प्याद्याने मारणे.

पण ते मागे असलेल्या राजाचे काळ्या वजीरापासून संरक्षण करत असल्याने हलू शकत नाही. तेव्हा हे शक्य नाही.

४. वजीर ठार मारायला तीन पर्याय आहेत.

४.अ. F-2 (हत्तीपुढच्या प्याद्याने) ठार मारणे.

पण इथे काळ्याला एक सोपी खेळी आहे घोडा E-2 ->शह. पुन्हा राजाला फक्त H-1 हीच जागा शिल्लक आहे. ( F-2 रिकामी झाली असली तरी तिथे F-8मधील काळ्या हत्तीचा जोर आहे.) तो तिकडे सरकला की काळ्याचा E-8 मधील हत्ती पांढर्‍याच्या E-1 हत्तीचा बळी घेऊन बॅक-रँक* मात देतो.
(* राजा शेवटच्या पट्टीत तीन प्याद्यांआड अडकून पडला आहे. काळ्याचा हत्ती वा वजिरासारखा सरळ हल्ला करणारा मोहरा तिथे येऊन शह देतो. आपला राजा आणि हे काळ्याचा शह देणारा वजीर वा हत्ती यांच्या मध्ये आणता येईल असा मोहरा पांढर्‍याला उपलब्ध नसल्याने मात होते.)

४.ब. H-2 प्याद्याने वजीर मारणे.

हा तर सरळ सरळ आत्मघात आहे. कारण आता H-3 मधल्या काळ्या हत्तीला एच पट्टी आंदण दिल्याने अ. पर्यायातील घोड्याची खेळी सरळ मातच देते.

४.क. वजीराने ठार मारणे.

पण यानंतर काळा पुन्हा तीच घोड्याची खेळी करतो आहे. राजा H-1 ला गेला की पांढर्‍याचा वजीर पडतो. इथे हत्तीने नव्हे तर पुन्हा घोड्यानेच त्याचा बळी घ्यायचा आहे. यामुळे हत्ती जिथला तिथे राह्तो नि H-2 प्याद्याला घोडा मारणे शक्य होत नाही.(F-2 ने तर नाहीच नाही कारण पुन्हा अ. मधे सांगितल्याप्रमाणे मात होते.) पुन्हा राजा G-1 मधे सरकतो.

यानंतरच्या खेळीत,

काळ्याचा घोडा F-1 मधल्या पांढर्‍या हत्तीचा बळी घेऊ शकतो, पण त्यातून त्याच्या H-2 हत्तीचा बळी जाईल. तेव्हा त्यापेक्षा काळा घोडा परत E-2 मधे येऊन शह देत स्वतःला मोकळा करून घेईल नि त्याचवेळी शह बसल्याने पुढची खेळी हत्तीला वाचवायला मदत करेल.

किंवा आणखी एक पर्याय म्हणजे आधी H-3 मधील काळा हत्ती हलवून घोड्याच्या जोरावर H-5 मध्ये नेऊन C-5 मध्ये बसलेल्या पांढर्‍या हत्तीला आव्हान देईल. यात एकतर हत्तींची देवाणघेवाण होत काळा घोडा H-5 मध्ये सुरक्षित पोचेल, किंवा पांढर्‍याने हत्ती बचावल्यास पुढच्या खेळीत काळा घोडा योग्य त्या ठिकाणी हलवून सुरक्षित करता येईल.

किंवा काळ्या घोड्याने E-4 मध्ये येऊन C-5 मधील पांढर्‍या हत्तीवर नेम धरता येईल. पुन्हा एकतर हत्तींची देवाणघेवाण होईल किंवा पांढर्‍या हत्तीने उलट घोड्यावर हल्ला केला तर H-3 हत्ती मदतीला नेऊन दोघांची एकाच वेळी सोडवणूक करता येईल.

बॅक-रँक मात शक्यता टाळण्यासाठी पांढर्‍याचा मागचा हत्ती फारसा हलू शकत नसल्याने पटावरची स्थिती एक घोडा अधिक असलेल्या काळ्याला अधिकच अनुकूल होऊन जाते. पांढर्‍याला हाच त्यातल्या त्यात बरा पर्याय उरतो.

या सार्‍या शक्यता पाहून पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळणार्‍या लेविट्स्कीने राजीनामा दिला.

---

इंटरनेट कृपेने शोधाशोध करता हा डाव १९१२ मध्ये खेळला गेला असे दिसते. काळा वजीर थेट पांढर्‍या वजीराच्या आणि दोन प्याद्यांच्या समोर आणून ठेवणारी मार्शलने केलेली अखेरची खेळी पुढे ’सुवर्णवर्षाव खेळी’ म्हणून ओळखली गेली. या खेळीनंतर काही प्रेक्षकांनी सोन्याची नाणी उधळली अशी दंतकथा सांगण्यात येते. पण खुद्द मार्शलच्या पत्नीने मात्र एक पेनी (सर्वात लहान नाणे) देखील उडवले गेले नसल्याचे सांगितले. पण डच जर्नालिस्ट, लेखक आणि बुद्धिबळ खेळाडू असलेल्या टिम क्रोबेने या खेळीला जगातील पहिल्या तीन बुद्धिमान खेळ्यांमध्ये स्थान दिले आहे.

सामान्यपणे सामाजिक-राजकीय मुद्द्यांभोवती रुंजी घालणार्‍या भाष्यचित्रकारांपैकी एकाने फुटबॉलादि खेळांच्या तुलनेत फार प्रसिद्ध नसलेल्या एका खेळाला नि खेळाडूला दिलेली ही मानवंदना आहे. त्याअर्थी हे भाष्यचित्र लक्षणीय आहे.

ज्यांना शक्यतांचा विचार करायला आवडतो, त्याआधारे भविष्याचा वेध घ्यायला नि त्यावर नियंत्रण राखायला आवडते त्यांच्यासाठी बुद्धिबळ हा खेळ खूप काही शिकवू शकतो. शक्यतांकडे पाहण्याची चिकाटी असली की वरकरणी इतरांना हरता दिसणारा डावही जिंकता येतो.

ज्यांना मोहर्‍यांचे काळे नि पांढरे रंगच फक्त दिसतात आणि ज्यांच्यात 'भविष्य हे नियत आहे किंवा इतर कुणाच्या हाती आहे' असे समजण्याची शरणागत वृत्ती असते ते खरे दुर्दैवी. त्यांनी आपला पेशन्सचा डाव मांडावा. पत्ते येतील तशी रांग लागेल. चारही रांगा पुर्‍या करता आल्या नाहीत तर बॅड'लक’ म्हणून पत्ते गोळा करायला मोकळे. ना निर्णयाची जबाबदारी आपली, ना परिणामाची!

-oOo-

  • chess24 या संस्थळासाठी वादालुपे यांनी काढलेली भाष्यचित्रे

---

संबंधित लेखन:

१. बुद्धिबळाचा अंत निश्चित आहे?


हे वाचले का?

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

त्या बाजूने पाहाताना

MarvinCartoon

काही काळांपूर्वी साठवून ठेवलेलं टॉम आर्मस्ट्राँगच्या मार्विनचं हे भाष्यचित्र* काल सापडलं. मार्विन आणि जॉर्डन ही जोडगोळी अजून सर्वस्वी परावलंबी आयुष्याच्या टप्प्यावर आहे. माणसाच्या पिल्लाचे पहिले स्वावलंबी काम म्हणजे स्वत:ची स्वच्छता स्वत: करणे. ही पहिली 'जबाबदारी’ स्वीकाराण्यास मार्विन नाखूष आहे. इतके छान चाललेल्या आयुष्यात होऊ घातलेला हा बदल त्याच्या दृष्टीने ’जगाची उलथापालथ करणारा’ आहे. आणि म्हणून त्याला तो भयकथेचे रूप देतो आहे.

सापेक्षता आणि दृष्टीकोन हे खरंतर जगण्याचे अविभाज्य भाग आहेत. बहुतेकांना तत्त्वतः - किंवा तोंडतः :) - मान्यच असते. परंतु असे असले तरी त्यांच्या जाणीवेत असतात असे मात्र नाही. सर्वसामान्य माणूस व्यक्त होताना किंवा साहित्यिक, कलाकार, परफॉर्मर याचे भान ठेवतीलच असे मात्र नाही. त्यामुळे अनेकदा व्यवहारात लंब्या-चौड्या तात्त्विक गप्पा मारणारे वर्तनाने सर्वस्वी विसंगत दिसतात. 

तसंच साहित्यात, विशेषतः कथा कादंबरी, नाटक-चित्रपटाची संहिता यांत अनेकदा पात्रे बरीच पण व्यक्तिमत्वे एक किंवा दोन, अशी स्थिती दिसते. एखाद्या नाटकात सारी पात्रे लेखकाचीच भाषा बोलत आहेत हा अनुभव तर वारंवार येणारा. त्यांचे म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व आहे, दृष्टीकोन आहेत, विचार आहेत याचे भान लेखकाला नसते; असले तरी ते लेखणीतून उतरेलच असे मात्र नाही.

आपल्याकडचे बालवाङमय तर बहुधा त्या त्या लेखकांचे पौगंडावस्थेतील स्वप्नविश्व आणि आकर्षणविषय घेऊनच साकार झालेले असते. ज्या वयोगटासाठी आपण हे लिहीत आहोत त्यांच्या भावावस्थेचे, जगाचे आणि दृष्टीकोनाचे - भौतिक आणि वैचारिकही - भान या लेखकांना क्वचित दिसते. ('जी.एं.'चे 'बखर बिम्म'ची हा एक अपवाद.) मुले म्हटले की त्यांना फँटसीच आवडणार या एकांगी कल्पनेतून मुलांसाठीचे साहित्य लिहिले जाते. त्यांच्या पातळीवर जाऊन विचार करणे बहुतेकांना साधत नाही.

माझ्या बहिणीने सांगितलेला एक गंमतीशीर किस्सा. तिच्या एका चाइल्ड-सायकॉलजिस्ट मैत्रिणीचा छोटा जेमतेम दीड-दोन वर्षांचा मुलगा. नुकताच कमोडचा वापर करू लागलेला. एकदा साहेब बराच वेळ त्यावर बैठक जमवून बसलेले. आईला इकडे ऑफिसला जायची घाई. त्यापूर्वी साहेबांना पाळणाघरात पोचवायचे होते. एक सहकारी आधीच येऊन बसलेली. 

बर्‍याच वेळा सांगूनही साहेबांचे आपली 'खुर्ची' सोडण्याचे काही चिन्ह दिसेना तेव्हा आईने लष्करी कारवाई करून 'उगाच टाईमपास करू नकोस. आवर.' असे म्हणत फ्लश चे बटन दाबले नि इकडे बाहेर येऊन मैत्रिणीशी काही बोलत होती. इतक्यात स्वारी दिगंबर अवस्थेत बाहेर आली आणि आईकडे रोखून पाहात तक्रार करती झाली. 'मी शीटवर असतानाच कसा फ्लश केलास तू, वाहून गेलो असतो म्हणजे.' क्षणभर शांततेनंतर आई नि मावशी हास्यकल्लोळात बुडाली.

पण आई चाईल्ड-सायकॉलजिस्ट असल्याने तिने त्याबद्दल थोडा विचार केला नि तिच्या लक्षात आले की प्रसंग वाटतो तितका हास्यास्पद नाही. त्या पोराच्या आकारमानाचा विचार करता त्या टॉयलेट-बोल मधे ते पोरगं सहज बसलं असतं. आणि एकदा ते झालं की फ्लशचं येणारं पाणी हे तुम्हा आम्हा पूर्ण वाढून बसलेल्या लोकांच्या दृष्टीने पाहिलं तर एखादा जलविद्युत केंद्रातील पुरुषभर उंचीच्या त्या पाईप्समधून येणार्‍या पाण्याइतकं व्यापक आणि वेगवान. अशा वेळी माणूस वाहून जाण्याच्या भीतीने व्यापला जाणं अगदीच साहजिक आहे...

...यावरून मला आम्ही लहानपणी राहात होतो तो वाडा आठवला.

त्या वाड्याच्या अंगणात आम्ही क्रिकेट खेळायचो. एवढ्याशा अंगणात फक्त ऑफ-साईडच होती. तेव्हा आमचं क्रिकेटही असं ’एकांगी’ होतं. त्या अंगणात कौतुकाने स्लिप, गली, दोन पॉईंंट फील्डर्स (त्या बाजूला राहणारे काका चेंडू घरात आला की जप्त करीत, आणि खेळणारे सगळेच सेहवाग, म्हणून ही तरतूद) एक कव्हर आणि एक मिडॉफ इतके खेळाडू मावत. 

वाडा सोडला नि सुमारे दहा एक वर्षांनी परत गेलो तेव्हा ते अंगण इतकं लहान कसं झालं, इथे दोन खेळाडू तरी क्रिकेट खेळू शकतील का असा प्रश्न पडला. ज्या पॅसेजमधला गेलेला दिवा बदलण्यासाठी स्टूल आणावे लागे त्याचे छत आता डोक्याला लागेल की काय असे वाटावे इतके खाली कसे आले असा प्रश्न पडला होता. जगण्यात सातत्य वा सलगता (continuity) असली तर हे अचाट अनुभव येत नाहीत. बराच काळाचा ब्रेक घेतल्यानंतर 'परतुनि गेलो' तर त्यावेळची जाणीव नि आजची जाणीव यात पडलेल्या फरकाशी सामना होण्याची अनुभूती घेता येते.

याच सापेक्षतेचं आणखी एक उदाहरण सापडलं ते मार्क पारिसीच्या एका व्यंगचित्रामध्ये. जेम्स कॅमेरनचा चित्रपट येऊन गेल्यापासून ’टायटॅनिक’ची शोकांतिका जगभर प्रसिद्ध झाली. पण त्या घटनेकडे मार्क वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहतो. तो असा विचार करतो की या दुर्घटनेबाबत त्या समुद्रातील शार्क माशांना काय वाटले असेल?

माणसांच्या दृष्टीने झालेली ही शोकांतिका, मांसाचा एकरकमी पुरवठा झाल्याने शार्क माशांच्या दृष्टीने एखाद्या पार्टीसारखी ठरली असेल. आषाढी अमावास्या ऊर्फ गटारी अमावास्या किंवा मुस्लिमांची बकरी-ईद ही कोंबड्या वा बकर्‍यांच्या दृष्टीने लोकसंख्येत मोठी घट करणार्‍या एखाद्या भूकंप अथवा पुरासारखीच असते. 

मध्यंतरी बर्ड-फ्लूच्या साथीच्या वेळी माणसांच्या आहारातील चिकन गायब झाले तेव्हा किंवा श्रावणात कोंबड्यांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचे व्यंगचित्रही समाजमाध्यमांवर फिरत होते. त्यावर मनसोक्त हसणारे परिसीच्या या चित्रावरही तितक्याच मनमोकळेपणे हसू शकतील का?

HappyEnding

-oOo -

* वृत्तपत्रांतून येणार्‍या अशा चित्रांना सामान्यपणे ’व्यंगचित्र’ म्हटले जाते. ही संज्ञा हिंदीतील ’व्यंग्य’ या शब्दापासून आलेली, ’व्यंग्यचित्र’ अशी असावी. त्या 'व्यंग्य’चा अर्थ उपहास, अथवा तिरकस टिपण्णी असा आहे. याउलट मराठी ’व्यंग’चा अर्थ वैगुण्य, न्यून असा आहे. त्यामुळे ती मराठी संज्ञा मला कधीच पटली नाही. असे चित्र नेहमीच वैगुण्यावर बोट ठेवते असे नाही. 

वृत्तपत्रांतून येणारी अशी चित्रे प्रासंगिक, अप्रासंगिक मुद्द्यांवर भाष्य करतात. त्यामुळे त्यांना भाष्यचित्र म्हणणे मला अधिक सयुक्तिक वाटते. यामुळे अशा चित्रांसाठी मी भाष्यचित्र अशी वर्गवारी निर्माण केली आहे.


हे वाचले का?

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

भाषा: राष्ट्र, धर्म... आणि हत्यार

(अलिकडेच द वायर या संस्थळाने हिंदी-उर्दू भाषेच्या राजकारणावर अथेर फारुकी यांनी लिहिलेला एक लेख प्रसिद्ध केला आणि मी पूर्वी फेसबुकवर लिहिलेल्या या पोस्टची आठवण झाली. थोड्या बदलांसह ’वेचित’ वर नोंदवून ठेवतो आहे.)

राष्ट्र (nation) ही अखेर एक संकल्पना आहे. त्याच्या सीमारेषा तुम्हाला आखाव्या लागतात, समाजाच्या गळी उतरवाव्या लागतात. राष्ट्राच्या भौगोलिक, भाषिक, वांशिक अशा अनेक प्रकारच्या व्याख्या निर्माण केल्या गेल्या, रुजवल्या गेल्या. त्याआधारे राजकीय सत्ता उभ्या राहिल्या, देश (state) निर्माण झाले. 'आमच्या देशाला इतक्या वर्षांचा इतिहास आहे' वगैरे वल्गना वर्तमानात कर्तृत्वाची वानवा असलेले, किंवा त्यासाठी करावे लागणारे कष्ट वा मेहनत करण्याबाबत आळशी असणारे, आणि भविष्याची भीती गाडून टाकण्यास उत्सुक असणारे, भूतकालभोगी समाजच असले आधारहीन दावे कुरवाळत बसतात. वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहिले, तर काळाच्या प्रवाहात देश निर्माण होत असतात, विखंडित होतात, विलयाला जातात, कधी ते पादाक्रांत केले जातात, आणि भूगोल बदलत राहतो...

अमुक काळात तमुक भूभाग हा ढमुक देशाचा भाग होता म्हणजे आज त्या वारशाने ढमुक देशाचा वारस मिरवणार्‍या देशाने वा गटाने त्यावर हक्क सांगणे याला सोयीची भूमिका घेणेच म्हणता येते. इतिहासातील काळाचा कोणता तुकडा आपण निवडतो, त्यानुसार त्या भूभागाची मालकी या वा त्या - कदाचित त्या काळात अस्तित्वातही नसलेल्या - देशाच्या ओटीत टाकता येते. ही कृती स्वार्थप्रेरित आणि आपल्या गटाची पक्षपातीच असते.

भारतामध्ये मु्स्लिम लीग आणि हिंदु महासभेसारख्या संघटनांनी धार्मिकतेला राष्ट्रवादात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. पण मध्यपूर्व आशियामध्ये पसरलेल्या अनेक मुस्लिम राष्ट्रांकडे आणि युरपभर पसरेल्या ख्रिश्चनबहुल देशांकडे पाहिले तर धर्म हे राष्ट्र असल्याची संकल्पना मोडीत निघालेली दिसते. इथे राष्ट्र (nation) आणि देश (state)  या दोन संकल्पनांतील फरक अधोरेखित होतो आहे. पूर्व पाकिस्तानने पश्चिम पाकिस्तानपासून दूर होताना उर्दू=मुस्लिम हे गणित मोडीत काढले. तिथे भाषा हा राष्ट्रनिश्चितीचा निकष अधिक प्रबळ ठरला. 

दोन देशांच्या निर्मितीनंतर हिंदू महासभेचा प्रभाव ओसरत गेल्यानंतर तिची जागा घेण्यास सरसावलेल्या संघ परिवाराने त्यासोबतच भाषिक राष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी पद्धतशीरपणे भारतातील मुस्लिम हे उर्दू भाषिक असल्याची हाकाटी पसरवण्यास सुरुवात केली
 
त्याचवेळी या दाव्याचे महत्व मुस्लिम कट्टरवाद्यांनीही ओळखले होते. विविध स्थानिक भाषा संवादासाठी वापरणार्‍या भारतीय मुस्लिमांना एकाच सूत्रात बांधण्यास हा धागा उपयुक्त ठरणार होता. हिंदुत्ववाद्यांना द्वेषाला सोयीचे असलेले गृहितकच कट्टरतावादी मुस्लिमांना आपला गट बांधण्यास उपयुक्त ठरत होते. थोडक्यात आपापले स्थान बळकट करण्यासाठी दोनही विरोधकांनी अप्रत्यक्षपणे एकमेकांच्या हातात हात घेऊन पावले टाकली... आजही टाकत आहेत. आणि सामान्य त्यांच्यामागे फरफटत जात आहेत.

भूतकालभोगी हिंदुत्ववाद्यांनी संस्कृत ही प्राचीन आणि हिंदी ही अर्वाचीन भाषा आपल्या भाषिक राष्ट्रवादाचे साधन म्हणून पुढे रेटायला सुरुवात केली आहे. आणि त्यासाठी उर्दूला मागे रेटणे त्यांना अपरिहार्य ठरले. त्यासाठी याच देशात निर्माण झालेली, गंगा-जमनी संस्कृतीचे एक प्रतीक असलेली उर्दू त्यांनी मुस्लिम समाजाच्या ओटीत टाकली, नव्हे त्यांना करकचून बांधून टाकली. आणि मग त्या ’अमंगळ’ लोकांची भाषा आत्मसात करण्यापासून ’आपल्या’ लोकांना परावृत्त करणे सोपे झाले. 
 
द्वेष रुजवणे हा सर्वात सोपा उपाय दोन्ही धार्मिक कट्टरतावादी वापरतात. तो सर्वाधिक परिणामकारकही असतो. एखाद्या झाडाच्या मुळाशी मोरचूद टाकून निश्चिंतपणे निघून जाणार्‍या आणि त्या झाडाचा तिळतिळ होत जाणारा मृत्यू समाधानाने पाहात राहणार्‍या विकृत लाकूडतोड्यासारखे हे दोघे गळ्यात गळा घालून या भाषिक लढाईतून समाजातील भेग वेगाने वाढत जाताना पाहून संतोष पावत असतात. माथेफिरु धर्मवेडापायी माणसांचे नरबळी देण्यासही न कचरणारे एखाद्या भाषेच्या हत्येबाबत संवेदनशील असतील ही अपेक्षाच मूर्खपणाची आहे.

अमंगळ लोकांच्या भाषेचा मुद्दा आला आहे तर हिंदुत्ववाद्यांच्या लाडक्या संस्कृतचा उल्लेखही अपरिहार्य आहे. सोयीचा इतिहास, समाजव्यवस्था, नीतिनियम रुजवणे, त्यासाठी उपयुक्त ठरणारा प्रॉपगंडा ऊर्फ प्रचार-प्रसारासाठी माध्यमांचे महत्व ब्राह्मणांनी फार प्राचीन काळापासून चोख ओळखले होते. त्यामुळे देवांशी हॉटलाईन असल्याचा दावा करणार्‍या त्या जमातीने देव-भाषा म्हणत तिला इतर ’अमंगळ’ समाजामध्ये फारसे रुजू दिले नाही. त्यातून पवित्र देव-भाषा विटाळेल असा त्यांचा दावा होता. 
पुढे ब्रिटिशांसोबत आलेल्या इंग्रजी भाषेसोबत आलेल्या रोजगार-संधीही सर्वप्रथम साधणार्‍या त्याच समाजाने व्यवहारात संस्कृतचे बोट सोडले. त्यातून तिची पीछेहाट होत गेली. त्यांच्याच कर्माने मरु घातलेली ही भाषा जिवंत ठेवण्यासाठी आणि प्राचीनत्वाचा सोस मिरवण्यासाठी आता त्याबाबत आक्रोश सुरु आहे. आणि तो करणारे स्वत: आपल्या पुढच्या पिढीला इंग्रजी आणि चोख व्यावहारिक शिक्षणच देत आहेत. संस्कृत ही भाषा त्यांच्या खांद्यावरचा एक अस्मितेचा झेंडा म्हणूनच शिल्लक राहिली आहे.

थोडक्यात संस्कृतच्या ठेकेदारांनी तिला आपल्याच लोकांपासून दूर ठेवून तिची वाढ खुंटवली आणि इंग्रजीच्या आगमनानंतर स्वत:ही तिचा हात सोडून तिला वार्‍यावर सोडली. आता केवळ देव्हार्‍यातल्या शाळिग्रामासारखी तिची पळभराची पूजा उरकून दिवसभराची इंग्रजीची चाकरी करायला ते चालते होतात.

हिंदुत्ववाद्यांनी आणि मुस्लिम कट्टरतावाद्यांनी कितीही भेग पाड्ण्याचा प्रयत्न केला तरी, संस्कृतला ज्या दुर्भाग्याला सामोरे जावे लागले तसे उर्दूला सामोरे जावे लागलेले नाही. उर्दू ही भारतीय मुस्लिमांची भाषा ही हाकाटी दोन्ही बाजूंनी केल्याने, भाषांनी विभागलेल्या मुस्लिम समाजाला एक सामायिक ओळख मिळत असल्याने ती आनंदाने स्वीकारली. पण असे असूनही तिच्यामध्ये निर्माण झालेल्या दर्जेदार साहित्यामुळे, विशेषत: शायरीमुळे, ती मुस्लिम समाजाबाहेरही अंगीकारली नि अभ्यासली गेली आणि वाढत गेली. भाषेच्या आणि लिपीच्या पावित्र्याच्या खुळचट कल्पनांनी आपल्याच भाषेची हत्या करणार्‍यांच्या हाती उर्दूचा द्वेष करण्यापलिकडे काही उरलेले नाही.

ज्यांच्या ’तरक्कीपसंद’ भूमिकेमुळे हिंदुत्ववादी आणि कट्टर मुस्लिम असे दोघेही ज्यांचा मनापासून द्वेष करतात त्या जावेद अख्तर यांचा एक व्हिडिओ दोन-एक वर्षांपूर्वी पाहायला मिळाला.
या माणसाचे उर्दूवर मनापासून प्रेम आहे. त्या भाषेला एका धर्माच्या दावणीला बांधल्यामुळे होणारी त्याची तडफड समोरूनही अनुभवता येते. या व्हिडिओमध्ये समोरच्या पंजाबी तरुणांना जावेद तळमळीने विचारतात, ’अरे तुम्ही सर्वाधिक उत्तम साहित्य यात निर्माण केले, ही तुमची भाषा आहे. मग तुम्ही असे कसे तिला इतरांच्या ओटीत टाकून मोकळे होतात, आपल्याच अपत्याला असे कसे नाकारता?’ 
 
खरंतर त्यांना हा प्रश्न पडायला नको. इथला करंटा हिंदू समाज 'ब्रेड खाल्ला म्हणून तू बाटलास' म्हणत आपल्याच लोकांना ख्रिश्चन धर्माच्या ओटीत टाकून मोकळा होत असे. एखाद्याची जबरदस्तीने सुन्नत केली गेली म्हणून, मूळ धर्म, देव-विचार-परंपरा-रीतीभाती यावरची श्रद्धा कितीही अभंग असली तरी त्याला मुस्लिम मानू लागे. यांना श्रद्धेतून. बांधिलकीतून निर्माण होणारी ओळख मान्य नाही, त्यांना ती कर्मकांडांच्या प्रांतातच शोधायची असते. काहीही नि कुणालाही आपलेसे करण्यापेक्षा दूर ढकलण्यास उत्सुक असलेला हा समाज आहे. अगदी त्यातील पुरोगामी मंडळींमध्येही मला हा दोष ओतप्रोत भरलेला दिसतो.

१७९८ मध्ये, म्हणजे जेमतेम सव्वादोनशे वर्षांपूर्वी कुराण उर्दूमध्ये प्रथम अनुवादित केले गेले. सिंधीतील त्यापूर्वी सातशे वर्षे (तपशील त्यांनी दिलेला, बरोबर चूक मला माहित नाही!) 'अशा अमंगळ भाषेत आमचे पवित्र पुस्तक लिहिले' म्हणून हे करणार्‍याविरोधात मौलवींनी फतवा जाहीर केला होता! थोडक्यात मौलवी लोक अठराव्या शतकाच्या शेवटी उर्दूला अमंगळ भाषा मानत होते! ती मुस्लिमांची असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता! त्यामुळे द्वेषाचे राजकारण करणार्‍यांच्या सोयीसाठीच ती मुस्लिमांची भाषा ठरवली गेली हे उघड आहे.

अख्तर यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे तो असा की बहुतेक भाषांमधले पहिले साहित्य हे धार्मिक आहे. उर्दू ही अशी पहिली आणि कदाचित एकमेव भाषा आहे जिचे पहिले साहित्य हे विद्रोही आहे. आणि अगदी अख्तर म्हणतात ते शब्दश: खरे असले/नसले तिचा प्रचार-प्रसार हा शायरीच्या माध्यमातून झाला ज्यात तरक्कीपसंद शायरीचा वाटा मोठा (सर्वात मोठा आहे की नाही मला ठाऊक नाही. अभ्यासकच ते सांगू शकतील. ) आहे. 
 
उर्दू ही या देशातच तयार झालेली भाषा आहे, सर्वात अर्वाचीन, सर्वात तरुण भाषा आहे. त्या अर्थी ती तरुणांची आहे तशीच दार्शनिक शायरांचीही. एका धर्माच्या दावणीला तिला बांधणारे द्वेषाने आंधळे झालेले असतात. आधी द्वेष करायचा, तो परिणामकारक ठरत नाही म्हटल्यावर नि मग ’आमचीच’ म्हणत त्याला आपल्या रंगाचा लेप देण्याचा प्रयत्न करायचा, अशी दुभंग व्यक्तिमत्वच दाखवत असतात.

वैय्यक्तिक अनुभवाचा उल्लेख करायचा झाला, तर संस्कृतला गीर्वाणभाषा, देव-भाषा म्हणत अठ्ठावीस इंची छाती साडेअठ्ठावीस इंची फुगवणार्‍या समाजातच मी जन्मलो. शाळेत तीन वर्षे अभ्यासक्रमातले संस्कृत शिकलो. त्यापलिकडे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या तीन परीक्षाही दिल्या. पण त्या भाषेचे वळण मला कधीच परिचयाचे, आपले असे वाटले नाही. पण गजल, शायरीच्या माध्यमातून ओळख झालेली उर्दू मात्र भावली. आजतागायत तिची साथ मिळते आहे. 
 
’आमची पवित्र लिपी अशा अमंगळ भाषेला दिल्याने ती अपवित्र होईल’ म्हणत नागरी लिपीत उर्दू लिहिण्यास मज्जाव करणार्‍या माथेफिरु मुखंडांच्या कृपेने ही भाषा फारसी-अरेबिक लिपीमध्ये लिहिली जाते. मला ती अवगत नाही. तरीही माझे फारसे बिघडत नाही. ज्या तरक्कीपसंद शायरीच्या माध्यमातून ती माझ्यापर्यंत पोचते, ती खिडकी आमच्या संवादास पुरेशी आहे. ’आपले तेच चांगले’ असा दुराग्रहाचा कारभार न करता ’भावले ते आपले’, ’पटले ते आपले’ किंवा थोडे अधिक ठोस विधान करायचे तर ’चांगले ते आपले’ असा माझा बाणा असल्याने मी तिला आपले म्हटले आहे.

मुळात सजीवांनी भाषा विकसित केली ती संवादासाठी, संदेशांच्या वा विचारांच्या देवाणघेवाणीसाठी. माणसांची भाषा तर अधिक समृद्ध. अन्य सजीवांप्रमाणे तिला केवळ वर्तमानाचे बंधन नाही. भूतकाळाचे, भविष्यकाळाचे, इतकेच काय निखळ विचाराचेही पैलू तिला मिळत गेले आहेत. अशा वेळी तिला द्वेषाचे, फाटाफुटीचे साधन बनवणार्‍या विकृतांच्या झुंडींचा विवेकी विरोध अतिशय महत्वाचा ठरत असतो. जावेत अख्तर हे त्या विवेकी विरोधाचे एक अध्वर्यू म्हणून उभे आहेत.

- oOo -


हे वाचले का?