शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

वेचताना... : डांगोरा: एका नगरीचा

ट्रिलजी किंवा तीन भागातील विस्तृत कथानक मांडणी हा प्रकार तसा अप्रचलित नसला तरी दुर्मिळ आहे. सिनेमा (सत्यजित रे यांची अपू ट्रिलजी), नाटक (एलकुंचवारांची वाडा ट्रिलजी) तसेच कादंबरी (मुक्तिबोधांची बिशू ट्रिलजी) अशा बहुतेक कलामाध्यमांतून हा प्रयोग होत आला आहे.

मराठी साहित्यातील ग्रॅंड ओल्ड मॅन भालचंद्र नेमाडे यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत ’चांगदेव चतुष्टय’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या चार कादंबर्‍या लिहिल्या. (श्री. ना. पेंडसे यांची तुंबाडचे खोत ही चार भागातील विस्तीर्ण कादंबरी एक प्रकारे चतुष्टयच आहे.)

डांगोरा: एका नगरीचा

एका विस्तीर्ण अशा पटावर एखादी व्यक्ती, एखादा भूभाग किंवा समाजव्यवस्था यांची स्थित्यंतरे कवेत घ्यायची, तर एखादी कादंबरी पुरेशी होत नाही. अशा वेळी त्या कथनाचे टप्पे कल्पून त्या भोवती स्वतंत्र उभ्या राहतील अशा कलाकृती निर्माण करणे, हे सर्वसामान्य कलाकाराला झेपणारे काम नव्हे. इथे सर्जनशीलतेसोबतच चिकाटी, चोख हिशोबीपणाही अंगी असावा लागतो. एवढ्या विस्तीर्ण मांडणीमध्ये कुठे विसंगती येऊ नये, कथानकाचा ओघ आणि धाटणी दोन्ही बदलू नये याची डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी लागते.

नेमाडेंनी त्यांच्या ‘हिंदू: एक समृद्ध अडगळ’ साठी केलेली टिपणे त्यांच्यावर तयार केलेल्या लघुपटात पाहण्यात आली होती. लेखन म्हणजे काहीतरी आतून स्फुरते नि लेखक दणादण लेखन करतो अशा स्वप्नाळू कल्पनेला छेद देणारा तो पुरावा पाहून मला समाधान वाटले होते. अशा कलाकृतींचा आस्वाद घेताना वाचक/प्रेक्षकही तितकाच सजग आणि चिकाटीचा हवा हे ओघाने आलेच.

मराठी कादंबरीच्या क्षेत्रात मुक्तिबोधांच्या बिशू ट्रिलजी प्रमाणेच आणखी एक ट्रिलजी वाचण्यात आली ती म्हणजे त्र्यं. वि. सरदेशमुखांची ’साइखेड’ ट्रिलजी. मुक्तिबोधांच्या, रेंच्या ट्रिलजीमध्ये एका व्यक्तिचा प्रवास संकलित केला आहे तर इथे एका संस्थानचा. 

स्वातंत्र्यपूर्व काळात आणि ब्रिटिश अंमलाखाली असलेले ’साइखेड’ हे एक अगदी लहानसे संस्थान. सरदेशमुखांनी या संस्थानच्या पार्श्वभूमीवर ’बखर: एका राजाची’, ’उच्छाद’ आणि ’डांगोरा: एका नगरीचा’ अशा तीन कादंबर्‍या लिहिल्या आहेत. आधीच म्हटल्याप्रमाणे इथे एका व्यक्तिचा वेध नसल्याने या तीनमध्ये काळाची सलगता आहे (त्यातही एक पेच आहे, तो पुढे येतोच आहे) पण एखाद्या व्यक्ती अथवा घराण्याचा प्रवास नाही. त्यामुळे कदाचित या तीन स्वतंत्र भासतात, त्यांना जोडणारा दुवा आहे तो ते संस्थान, साइखेड.

या ट्रिलजीची तुलना मी मुक्तिबोधांच्या ट्रिलजीशी करणार नाही. अगदी वैयक्तिक मत सांगायचे, तर माझ्या मते हे त्रिकूट मुक्तिबोधांच्या त्रिकूटाच्या इतके भक्कम सूत्रात बांधलेले नाही. दुसरे असे की प्रत्येक कथानकाचा गाभा सर्वस्वी वेगळ्या केंद्राभोवती विणला असल्याने त्यात सलगतेचा भास होत नाही. पण व्यक्ती, कुटुंब, समाज, संस्था असे अस्तित्वाने मोजता येणारे सूत्र न घेता पार्श्वभूमी हे बांधणारे सूत्र असल्याने सामान्य वाचकाला असे भासत असावे.

'बखर...' एका संवेदनशील राजाची फरफट मांडते तर 'उच्छाद' मध्ये सर्वच बाबतीत उखडल्या गेलेल्या व्यक्तीची ससेहोलपट ग्रथित केलेली आहे. पण या तीनही कादंबर्‍यात कथानकाच्या व्यामिश्रतेमुळे आणि विस्तारामुळे सर्वात उठून दिसते ती 'डांगोरा...'.

तीनही कादंबर्‍यामधील सर्वात मोठी आणि अतिशय काटेकोरपणे विणलेली ही कादंबरी खरे तर एक मैलाचा दगड ठरायला हवी होती. पण तिची फारशी चर्चा निदान माझ्या कानावर आलेली नाही. एक गंमतीशीर भाग असा की काळाच्या पटावर पाहिले तर ही मधली कादंबरी, पण ती प्रकाशित झाली सर्वात शेवटी; त्यापूर्वी आलेल्या 'उच्छाद' नंतर तब्बल वीस वर्षांनी. बखर ७२ ची तर उच्छाद ७८ ची पण डांगोरा येईतो ९८ साल उजाडले.

मराठी भाषेत राजकीय कादंबर्‍या फारशा लिहिल्या जात नाहीत अशी एक तक्रार मध्यंतरी एका ग्रुपमध्ये ऐकली. होती. निखळ राजकीय म्हणाव्यात अशा कादंबर्‍या मोजक्याच. त्यात पुन्हा राजकीय म्हणजे फक्त सत्तेच्या सत्तेच्या राजकारणाशी निगडीत असा संकुचित अर्थ घेतला, तर अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या. पण राजकारण म्हणजे केवळ सत्तेचे राजकारण नव्हे, सामाजिक राजकारण (थोडे पुढे जाऊन साहित्यिक राजकारण का नको असा प्रश्न काहीजण विचारतील, पण तो सोडून देऊ) असा व्यापक अर्थ घेतला तर 'डांगोरा...' एक महत्वाची कादंबरी ठरते.

यात सत्तेचे राजकारण तर आहेच, पण त्याला सामाजिक आणि मुख्य म्हणजे जातीय समीकरणाचा मोठा फास पडलेला आहे. ब्राह्मण आणि मराठा या तथाकथित उच्च जातींचे परस्पर राजकारण, त्यात गुंतलेले सत्तेच्या आणि आर्थिक राजकारणाचे पेच आणि पेड, त्यात अपरिहार्यपणे ओढले जाणारे अन्य जातीय लोक असा ढोबळ कॅनव्हास घेऊन कादंबरी उभी आहे.

पण तिची वीण इतकी एकटाकी, एकरंगी नाही. जातीवर आधारित कंपू करून चाललेल्या शह-काटशहाच्या राजकारणातही स्वार्थ समोर येताच परस्परांना केलेले सहकार्य, त्यासाठी लहान लहान प्याद्यांचा बिनदिक्कतपणे दिला जाणारा बळी, हे एका बाजूला घडत असताना जातिभेदाच्या भिंती मोडून परस्परांची साथ करणारे, सत्याची कास धरणारे बव्हंशी दुबळे, बरेचसे अकर्मक आणि म्हणून बहुधा पराभूत लोकांची संख्याही समाजात कमी नसते.

याशिवाय संस्थान असले तरी ब्रिटिश अंकित असल्याने त्या मार्गे होणारे सकारात्मक/ नकारात्मक हस्तक्षेप, आर्थिक तसंच राजकीय सत्तेच्या साठमारीत, त्यातील माणसांच्या किडक्या माथेफिरु स्वार्थापुढे भरडली जाणारी पापभीरू सामान्य माणसे, पण त्याचवेळी त्या साठमारीचा आपल्याही छोट्या छोट्या स्वार्थांसाठी उपयोग करून घेणारे छोटे लोक अशा अनेक लहान लहान पेडांनी ती विणली आहे. अगदी मर्यादित वकुबाचे, सामाजिक प्रतिष्ठेचे पात्र देखील काटेकोरपणे उभे राहून आपली भूमिका पार पाडताना दिसते.

एक महत्वाचा मुद्दा नोंदवून ठेवायचा म्हणजे यातील बहुतेक पात्रे ही काळ्या वा पांढर्‍या रंगात रंगवलेली आहेत. पण काळं काय नि पांढरं काय हे सापेक्ष आहे. माझ्या मते ज्यांच्या जातीय जाणीवा तीव्र आहेत त्यांना आपापल्या पूर्वग्रहानुसार ते रंग दिसतील. तेव्हा आपण सेफ म्हणून दुरंगी म्हणू या. त्या अर्थी अर्वाचीन साहित्यिक निकषांवर कदाचित ही कदाचित उणीव म्हणून गणली जातील. अगदी क्वचित एखादे पात्र रंग बदलते किंवा दोन्ही रंग दाखवते आहे. पण एरवी एखाद्या पौराणिक लढाईप्रमाणे दोन सैन्ये परस्परांसमोर उभी ठाकली आहेत.

या सार्‍या स्थानिक घडामोडींना देशातील पण संस्थाबाहेरील घडामोडींची एक पार्श्वभूमी देण्याचा प्रयत्न सरदेशमुखानी केला आहे. पण तो मर्यादितच यशस्वी झाला आहे असे माझे मत झाले. एखादा अपवाद वगळला तर तो काळाचा अक्ष (axis) म्हणून काम करण्यापलीकडे कथाकाच्या प्रवाहावर त्याचा फार फरक पडत नाही. इथे 'तुंबाडचे खोत' मधील स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील चित्रण आवर्जून लक्षात घेण्याजोगे. तिथे जसे बाहेरील राजकारण, स्थितीबदल तुंबाडमध्ये उलथापालथ घडवतो, समीकरणे बदलतो तसा कार्यकारणभाव इथे दिसत नाही. परंतु त्या अनुषंगाने येणारी ब्रिटिश पात्रांना मात्र कथानकात निश्चित स्थान आहे, पण ते ब्रिटिश नसता फार फरक पडला असता असे वाटत नाही.

इथे निवडलेला उतारा प्रत्यक्ष कथानकाचा भाग नाही, त्याचा प्रातिनिधिक देखील नाही. पण एकूण कादंबरीला तो एका परिप्रेक्ष्यात मांडतो असे मला वाटते. यातील पहिलेच वाक्य माझ्या मनावर एक जळता ओरखडा उठवून गेलं. पुढचा उतारा तर कोणत्याही शतकातील भारताला चपखल लागू पडेल असा.

(या पुस्तकातील एक वेचा http://vechitchaalalo.blogspot.com/2017/11/Daangoraa.html )


हे वाचले का?

विहीरीतले बेडूक

साइखेडात सगळाच अंधार होता असं नाही. जळतेपण क्षीण होतं आणि जागेपण बावरलेलं. जिथे कुठे चडफड होती ती भवतीच्या दाट ओल्या पासोडीखाली चिमून चाललेली.

डांगोरा: एका नगरीचा

शंभुराव जाधव काय, हरिभट ग्रामोपाध्ये काय, तिरीमिरीवर येणारे, भडकील्या डोक्याचे म्हणून प्रसिद्ध होते. लोक त्यांना मानायचे. पण त्यांच्यामागून पावलं टाकायची हिंमत त्यांच्यात नव्हती. अग्नी अग्नीच असतो. पण वेळीच इंधन मिळेल तर.

साइखेड हे एखाद्या बेटासारखं. बाकीच्या जगापासून विलग झालेलं... आपल्याच ठिकाणी उसाभरी करणारं. तरी त्यात इतिहासातले द्वेष पुन:पुन्हा वस्तीला येत. जातीचा झेंडा ज्याच्या त्याच्या हाती. त्यामुळे आपल्या कळपातल्याहून इतर सगळे तुच्छ आणि हीन. सत्ता आणि धन यासाठी केलेली चाल ती पुण्यमार्गावरची. वासनांचा संतोष हाच एक विसावा.

अशा समाजात सदाच भयाचं वातावरण लपेटून राहणार यात शंका कसली? भयाला नेहमीच हिंसेचं काळंगडद अस्तर असतं. अशानं भूमी दिवसरात्र द्वंद्वासाठी सजलेली असते. तिच्यावर सुंदर जीवनाची रोपं अंकुरणार कशी? कोणत्याही क्षणी, कोणत्याही वळणावर आणीबाणी छातीवर बसेल अशी व्यवस्था.

एका सिद्धपुरुषाची समाधिभूमी अन एकाहून अधिक गुणशाली राजांची कर्मभूमी असलेलं साइखेड आता निव्वळ कुरुक्षेत्र होऊ पाहात होतं: पावलोपावली अधर्म, वैर, खोटारडेपण आणि हत्या.

आपण सर्व जण एकाच ईश्वराची लेकरं आहोत. या सृष्टीचं वैभव सर्वांसाठी आहे. त्याचा उपभोग घ्यायला सर्वांना समान संधी हवी. दुसर्‍याच्या दु:खाला कारण व्हायचं नसेल तर आपण अन्यायी न झालं पाहिजे: स्वत:बरोबर इतराचा समान हक्क आणि अधिकार मानला पाहिजे; विषमवृत्ती आणि वरचढपणा पायदळी घातला पाहिजे.

हे कुणीतरी दुसर्‍यानं करून पाहावं, आम्हाला या शपथेतून सुटं ठेवावं, असंच फार जणांना वाटतं.

ज्ञानदेव असो, तुकाराम असो किंवा शिवाजी, आमचा-आमचा म्हणून घोष करण्यात आम्ही कधीतरी मागं असतो? इडापिडा टळावी म्हणून काळबाहुली आढ्याला टांगावी तसे त्यांना आम्ही देव्हार्‍यात ठेवतो. आम्ही किती श्रद्धावान, पूर्वजांचं थोरपण जाणणारे याचा गवगवा करण्यातच आमची दमछाक होते.

आमचं उदारपण वाहून वाहून किती दूरवर वाहील? टिळकांचं थोरपण आम्ही चित्पावन कोकणस्थाच्या कुडीत रेखून ठेवतो. जोतीबांचं महानुभावपण त्यांच्या अब्राहमणपणात अटकवतो. त्यांची आयुष्यभराची तगमग बाजारचौकाच्या भाषणात आम्ही वापरतो.

साइखेडात गेली पाचसात वर्षं असला उठवळपणा गल्लोगल्ली धुमसत होता.

उगवणारा प्रत्येकच दिवस शेवटचा असू शकतो याचा चटका आमच्या चित्ताला कधी बसला असता तर आग लागलेल्या घरातून जिवानिशी पळ काढावा तसे आम्ही जातीजातींच्या वैमनस्यातून झडझडून बाहेर निघालो असतो. अट्टहास आम्ही कसला करतो! शेवटचा दिवस आमच्या गणतीतच नाही.

छे: आम्ही तुकारामाचं काही लागत नाही. जोतीबांचं त्याहून नाही. ते थोडेच साक्षात्कारी संत होते?

सिद्धमठातला गुरव स्वत:ला 'महास्वामी' समजत असे. म्हणजे लोकांनी आपल्याला तसं हाकारावं अशी त्याची इच्छा. आपल्या हस्तकांकरवी तो ती पुरवून घेत असे. मठाचे मुख्य ट्रस्टी, साइखेडच्या बाजारपेठेतलं एक प्रस्थ, महालिंगप्पा त्याच्या पाठीशी उभे असल्यानं तो चावर्‍या कुत्र्यासारखा एक विचित्र दबदबा गाजवीत होता. सरसकट माळ्या-कुणब्याना तो छी: थू: करी. ब्राह्मण म्हणजे ईश्वराच्या मुखातील लाळ, तो म्हणायचा. त्यांच्या हातचं खातो-पितो तो खरा लिंगपूजकच नव्हे अशी त्याची धारणा. त्यामुळं ब्राह्मणाला अस्पृश्य समजत नाहीत त्या सगळ्या जाती त्याला नीच वाटायच्या.

तिकडे दत्तमंदिराचा ब्राह्मण पुजारी घरंदाज मराठ्यांनासुद्धा दानपेटीच्या पलीकडे सुद्धा फिरकू देत नाही, अशी स्थिती होती. हे किती दिवस चालणार, आणि चालत चालत कोणत्या खड्ड्यात नेणार? याचा वचार कोणाला शिवत नव्हता.

प्रत्येक बदचालीला प्रायश्चित्त असतं. जाहीरपणे ते न घ्याल तर दडपलेल्या आजारासारखं अवकाळी झडप घालतं ते... तुमच्या प्राणांवर.

बाजारपेठ, रस्ते, चावडी, ही तर कोणा वरिष्ठ म्हणवणार्‍या जातवाल्यांच्या मालकीची नसतात! तिथं एक दुसर्‍याची लक्तरं टांगू पाहतो. अन कुणालाच त्याची किळस वाटत नसते.

- oOo -

पुस्तक: 'डांगोरा: एका नगरीचा'
लेखक: त्र्यं. वि. सरदेशमुख
प्रकाशक: मौज प्रकाशन
आवृत्ती दुसरी (२००४)
पृष्ठे: १३६ - १३८.


हे वाचले का?

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

ऋणानुबंध

बेलार्दो कुटुंबाशी स्नेह दृढ होण्यास एक योगायोग (कारणीभूत) झाला. बेलार्दो कुटुंबात एकदा भोजनाचं निमंत्रण होतं. दिवस होता चार डिसेंबरचा. तो माझा वाढदिवस होता. त्या घरात मी पाऊल टाकलं तेव्हा कळलं त्या दिवशी मग्दालेना यांचाही वाढदिवस होता. योगायोग म्हणजे दिनांक आणि वर्षही एकच होतं. मग्दालेनाचा एकुलता एक भाऊ गेल्यामुळे त्या मला भाऊ मानीत होत्या. त्या छोट्या अ‍ॅनाला म्हणाल्या,

"नॉई सियामो जेम्मेली ('आम्ही जुळी भावंडं आहोत.')". हे जुळ्या भावंडांचं कोडं अ‍ॅनाच्या काही लवकर ध्यानात आलं नाही. ती गोंधळून गेली. तिने विचारले, " फादर भारतातले व तू इकडची, मग तुम्ही जुळे कसे?" मग्दालेना खळखळून हसल्या.

ओअ‍ॅसिसच्या शोधात

बर्थडेचा खास बेत होता. मला सुट्टी होती. अकरा-साडेअकराच्या सुमारास मी त्यांच्याकडे पोहोचलो होतो. मग्दालेनाची बहीण लेआ त्या दिवशी आली होती. तिनं निवडलेला मुलगा मग्दालेनाला पसंत नव्हता व त्या (अ)विचारापासून मी तिला परावृत्त करावं म्हणून त्यांनी लेआला त्या दिवशी बोलावून घेतलं होतं. (अर्थात अतिशय सावधपणे मी त्या नाजूक प्रश्नाला बगल दिली. मिया बीबी राजी असतील, तर उगाच काजीनं तिथं नाक का खुपसावं?)

दुपारी बाराच्या सुमारास श्री. बेलार्दो अ‍ॅनाला शाळेतून घेऊन आले. आमच्या गप्पा रंगल्या; पण स्वयंपाकाचं कुणी नाव काढीना. खरोखर मला भोजनासाठीच बोलावलं होतं की... माझं मन साशंक झालं. खास वाढदिवसाचं भोजन म्हणजे खूप तयारी असेल अशी माझी (भारतीय) समजूत. साधारण साडेबारा वाजता दोघी बहिणी स्वयंपाकघरात गेल्या. गॅसवर पाणी उकळत होतं. मग्दालेनानं स्पागेतीचं पाकीट त्यात रिकामं केलं. लेआनं झटपट सॅलड बनवलं. रात्री शिजवलेल्या मांसाचा मोठा तुकडा फ्रीजमधून टेबलावर आणून ठेवला. पाव व दोन तीन प्रकारचं चीज काढलं. गुळाच्या ढेपेसारखा चीजचा एक तुकडा घेऊन लेआने त्याचा चुरा खरवडून तो सूपमध्ये टाकला. श्री. बेलार्दो यांनी चार-पाच तर्‍हेच्या वाईनच्या बाटल्या मेजावर मांडल्या. अर्ध्या पाऊण तासात भोजन तयार!

आपल्याकडं खास भोजनासाठी आठवड्याची तयारी लागेल. रांधणं, शिजवणं, उकडणं... किती प्रकार. 'उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म' या वृत्तीने सर्व तयारी कशी साग्रसंगीत. प्रत्येक भोजनासाठी ताजा बेत. प्रत्येक भाजीला 'ह्यूमन टच'ची फोडणी हवी. युरोपमध्ये झटपट संस्कृती. सगळेच पदार्थ बाजारात विकत मिळतात. संस्कृतीतील फरक स्वयंपाकघरामध्ये प्रकर्षानं जाणवला.

भातावर वरण ओतावं, तसं माझ्या मित्रानं स्पागेतीवर ऑलिव्ह ऑईल ओतलं आणि वर चवीला चीजच्या चुर्‍याचा थर चढविला. काट्याभोवती गुंडाळी करून घास घ्यायला सुरुवात केली. बाकी स्पागेतीचा घास घ्यावा इटलीकरांनी. आपण काट्याभोवती एक घास गुंडाळावा तोच त्यांची अर्धी प्लेट रिकामी. कोल्हा आणि करकोचा ही गोष्ट आठवली.

अधूनमधून वाईनचे घुटके घेत, स्पागेती खाणं चाललं होतं. अर्ध्या तासात जेवण आटोपलं. जेवणानंतर थोडा वेळ गप्पा झाल्या आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. कारण एक वेळ भोजनाशिवाय इटलीकर वेळ मारून नेतील; परंतु सिएस्टाशिवाय त्यांचं पान हलत नाही. दुपारी २ ते ४ या वेळात सर्व इटलीकर बिछान्यावरच आढळतात.

छोट्या अ‍ॅनाला भाऊ नव्हता. तिला खेळण्यासाठी भावंडं हवं होतं; पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिच्या आईला ते शक्य नव्हतं. अ‍ॅना मला म्हणायची, "तूच माझा भाऊ हो ना!" ती चिमुरडी माझ्या अंगाखांद्यावर बागडायची. तिच्या छोट्या स्वतंत्र खोलीत मला खेळायला भाग पाडायची. घरातील एका लाकडी ठोकळ्याला कवेत घेऊन ती सर्वांन सांगायची, "हा माझा भाऊ."

खाऊ आणि खेळणी यांचा कितीही मारा केला, तरी मुलांना समवयस्काचीच संगत हवी असते. त्यांच्यात ती गुंतत असतात आणि वाढत असतात.

एकदा मी त्यांच्या घरी गेलो असता "मला तुमच्याशी खाजगी बोलायचं आहे", असं म्हणत अ‍ॅनाने अक्षरशः मला तिच्या खोलीत ओढत नेले. तिची आई हा प्रकार पाहून गालातल्या गालात हसत होती.

मी खोलीत गेल्यावर तिने दरवाजा लावून घेतला व हळू आवाजात म्हणाली, "तुझ्याकडे पोस्टाचे स्टँप आहेत का?"

"कशासाठी हवेत?" मी विचारले.

"माझ्या बॉयफ्रेंडला मला पत्र पाठवायचे आहे... मॉर्को मला खूप खूप आवडतो..."

"कुठं भेटला तो तुला?" मी विचारले.

"तो माझ्या आत्याचा मुलगा. आम्ही समुद्रावर फिरायला गेलो होतो ना, तिथं तो मला भेटला..." ती गोड हसत म्हणाली.

माझ्या डायरीत एक भारतीय स्टँप होता. मी तो तिला दिला. वेड्यावाकड्या रेषा रेखाटलेला व त्यावर हृदयाचे चित्र काढलेला एक कागद तिनं पाकिटात घातला व त्यावर तो स्टँप चिकटविला. हळूच त्यांचं किस घेतलं आणि पोस्टात टाकण्यासाठी माझ्या हवाली केलं. दार उघडताना मात्र तिनं ताकीद दिली: "आईला काहीही कळता कामा नये!"

"काय गं सांगितलं फादरांना?" आईनं विचारलं. तेव्हा ती लाजून म्हणाली, "आमचं सिक्रेट आहे, तुला नाही सांगायचं." आईला काही सांगू नकोस, असं तिनं मला नजरेनं खुणावलं!

एक दिवस मग्दालेना गप्पांच्या ओघात मला म्हणाल्या, 'फादर फ्रान्सिस, आम्ही दोघी बहिणी व निनो (अँथनी) हा आमचा लाडका भाऊ. वयाच्या १८व्या वर्षी त्याला आजार झाला व त्यातच तो गेला. आमच्या घराचं सगळं वैभवच जणू नाहीसं झालं. माझे आईवडील अजून त्या धक्क्यातून बाहेर पडले नाहीत. भावाची स्मृती जागी होताच डोळे पाण्यानं भरतात... तुम्हाला मी पहिल्या वेळेस पाहिलं तेव्हा का कुणास ठाऊक, मनाला वाटलं... माझा भाऊ परत आलाय..." त्या मध्येच थांबल्या. आपल्या खोलीत गेल्या. डोळे पाणावलेलेच होते... पट्ट्यापट्ट्याचा जाडजूड एक स्वेटर स्वेटर घेऊन त्या आल्या. "माझ्या लाडक्या भावासाठी स्वत:च्या हातानं मी हा विणलाय... आता थंडीचा जोर वाढत आहे. त्यासाठी घे तू! खूप उबदार आहे हा... आमच्या निनोची स्मृती..." मी भारावून गेलो. काय बोलावं ते मला सुचलं नाही. क्षणभर आम्ही दोघं स्तब्ध. भावाचं नातं जोडण्याच्या आपल्याकडील राखीच्या प्रथेची मी त्यांना माहिती दिली आणि त्या स्वेटरचा स्वीकार केला. डबल विणीचा तो स्वेटर खूपच उबदार होता. अंगावर चढवून मी त्यांचा निरोप घेतला.

निवासस्थानी पोचेपर्यंत मनात अनेक तरंग उठत होते... त्यांचे ते आसवांनी भरलेले डोळे, कंपित स्वर, मी निघताना घरातली ती बोलकी शांतता... प्रेम, माया, जिव्हाळा सातासमुद्रापलीकडेही एकाच रेषेत प्रवास करतात. माणसाच्या अंतरंगातील नातेसंबंधांची जाणीव कुठल्याही प्रदेशात तितकीच उत्कट असते म्हणायची... पण माझं प्रश्नांकित मन शांत बसायला तयार नव्हतं. त्या कुटुंबासाठी मी काय केलं होतं? काहीच नाही. मग आपल्या भावाच्या चेहर्‍यावरील खुणा त्यांना माझ्या मुद्रेवर कशा वाचता आल्या? देवाला ठाऊक!

युरोपच्या धुराड्यातून सोन्याचा नसला, तरी संपन्नतेचा धूर बाहेर पडतो. भांडवलशाही समाजरचनेमुळे आर्थिक सुबत्ता आली आहे. युनियन चळवळीमुळे कामगारांना न्याय मिळणं सुलभ झालं आहे. आधुनिक सुखसोयींचा पाऊस युरोप-अमेरिकेत कोसळत असतो आणि तरीही पश्चिमी राष्ट्रं खर्‍या अर्थानं सुरक्षित आहेत, असं वाटत नाही. अनिश्चितता आणि युद्धाची भीती यांच्या परजलेल्या तलवारी त्यांच्या डोक्यावर टांगलेल्या जाणवतात. लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्य याचे कितीही डिंडिम त्यांनी वाजविले तरी तो समाज भीतीच्या प्रचंड दडपणाखाली वावरत आहे. निर्भयतेचा अभाव मला युरोपमध्ये अनेक ठिकाणी जाणवला. त्याचा प्रत्यय या कुटुंबातच आला.

मग्दालेनाला भीतीने ग्रासलं होतं. महासत्तांमधील स्पर्धेमुळं तिसर्‍या महायुद्धाला तोंड फुटलं तर... या विचारानं त्यांचा थरकाप उडाला. इटलीचे रक्षण करण्यासाठी 'नाटो' करार करावा लागतो, यातच त्यांना आपल्या देशाचं दुबळेपण आणि परावलंबित्व दिसलं; पण ते उसनं बळ उठविलं, तर इटलीचा अफगाणिस्तान होण्यास विलंब लागणार नाही, असं त्यांचं मत ठरलेलं आहे.

१३ मे १९८२ रोजी दुसरे जॉन पॉप यांच्यावर दिवसाढवळ्या खुनी हल्ला झाला. कबुतरावर गिधाडानं घातलेली ती झडप होती. दहशतावादाच्या दुष्ट दूतांनी मंदिरातील वेदीलाच रक्तानं स्नान घालण्याचा केलेला तो दुबळा प्रयत्न होता. मग्दालेनाच्या दृष्टीकोनातून पोप हे शांततेचं प्रतीक. त्या प्रतिकाला झालेल्या जखमेमुळे त्या घायाळ झाल्या, उद्विग्न झाल्या, त्या गोष्टीचा त्यांनी धसका घेतला. त्या मानसिक धक्क्यातून बाहेर पडायला त्यांना खूप अवधी लागला. त्यांच्या कोमल आणि संवेदनक्षम मनाला त्या आघातामुळे खोलवर इजा झाली. आठ्यांचं जाळं त्यांच्या कपाळावर दिसू लागलं. जीवनावरची आणि जगण्यावरची त्यांची श्रद्धाच जणू उडाली. "माझ्या मुलीचं, माझ्या पतीचं, माझ्या कुटुंबियांचं भवितव्य काय? आज पोपवर, उद्या आम्हां कुणावरही पिस्तुल रोखलं जाईल," अशा विचारात त्या दंग असायच्या.

आणि व्हायचं तेच झालं! त्यांचा तोल ढळला. शून्यात नजर लावून त्या आसवं गाळीत बसायच्या. छोट्या अ‍ॅनासाठी हा अजब अनुभव होता. आपल्या आईला शांत करण्याचा ती प्रयत्न करू लागली. श्री. बेलार्दो यांनी त्यांच्यासाठी प्रख्यात मानसोपचातज्ज्ञांचं औषधपाणी सुरू केलं. एके दिवशी श्री. बेलार्दो यांनी मला घरी बोलावून घेतलं. वातावरण थोडसं गंभीर भासलं. सौ. बेलार्दो यांनी दोन दिवस अन्नपाण्याला स्पर्श केला नव्हता. त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांची बहीण लेआ तिथं आली होती. घराबाहेर पाऊल टाकण्यास सौ. बेलार्दो तयार नव्हत्या. सर्वत्र जणू दहशतवादीच दिसत होते तिला.

"फादर चर्चमध्ये प्रार्थना करणार आहेत. तू प्रार्थनेला चल म्हणजे तुला बरं वाटेल," लेआनं सुचविलं.

हो ना करता त्या तयार झाल्या. लेआ आणि मी त्यांना घेऊन पायीच एका चर्चमध्ये गेलो. तिथं प्रार्थनेत काही वेळ घालविला. प्रार्थनेच्या वेळी ख्रिस्ती भाविकांना 'प्रसाद' म्हणून पावाचा तुकडा देतात. मग्दालेना वृत्तीनं धार्मिक, पण त्या दिवशी त्यांनी तो प्रसाद घेण्यास चक्क नकार दिला. कारण विचारलं तर त्या म्हणाल्या, "तुम्ही त्यात विष मिसळलं नसेल कशावरून?"

महिनाभरात त्यांना बरं वाटू लागलं. त्यांची बहीण चार दिवस राहून गावी निघून गेली. नवजात अर्भकाला जपावं तशी श्री. बेलार्दो यांनी पत्नीची काळजी घेतली. वेळोवेळी ते तिला औषधाच्या गोळ्या द्यायचे. तिची विचित्र वागणूक पाहून ते कधी तिच्यावर संतापले नाहीत, की चिडले नाहीत. त्यांनी धीर सोडला नाही. गाडीचं एक चाक नादुरुस्त झालं, की संसारी माणसाची कशी त्रेधातिरपिट उडते, हे मी पाहिलं. युरोपमध्ये हे विशेष जाणवतं. माहेर, सासर, गणगोत असा गोतावळा तिथं नाही. सगळी स्वतंत्र घरटी. ज्यानं त्यानं आपला क्रूस उचलून चालायचं.

हळूहळू सौ बेलार्दो पूर्णपणे बर्‍या झाल्या. त्या घरट्यात पुन्हा हास्य विनोदाला बहर आला. आनंद व्यक्त करण्यासाठी एका संध्याकाळी रोमजवळील समुद्रकिनार्‍यावर जायचं ठरलं. निळ्याशार लाटा किनार्‍यावर येऊन आदळंत होत्या. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं आमच्या गप्पा चालल्या होत्या. मी त्यांना म्हणालो, "सारं कसं विचित्र! तुम्ही तिघं मला भाऊ मानता. तुमच्यावर कठीण प्रसंग आला तेव्हा तुम्ही मला बोलावलं. कुटुंबाचा घटक म्हणून मला तुम्ही वागविता... लवकरच मी मायदेशी निघून जाईन. मग तुम्ही मला विसराल..."

नाही, तसं कधीच होणार नाही. आम्ही तुला भेटायला भारतात येऊ. मी आतापासून इंग्लिश शिकायला सुरुवात केली आहे," श्री बेलार्दो म्हणाले.

मग्दालेनानं त्यांच्या सुरात सूर मिसळला. "मी पण येणार हं..." अ‍ॅना लाडिकपणे म्हणाली.

माझा निघण्याचा दिवस उगवला. सर्वात अस्वस्थ झाली अ‍ॅना... दिवसभर तिनं रडून डोळे लाल केले. दुपारचं भोजन मी त्यांच्याकडे घेतलं. जूनच्या उकाड्याचे ते दिवस! डबल विणीचा तो जाडजूड स्वेटर मग्दालेनाच्या हाती परत देत मी म्हणालो, " हा तुमच्याकडेच राहू द्या. आमच्या देशात मी त्याचा वापर करू शकणार नाही. उगाच फडताळात पडून राहील. माझी स्मृती म्हणून तुमच्याकडे तो ठेवून घ्या."

थोड्याशा अनिच्छेनं; पण मोठ्या मायेनं त्यांनी तो स्वीकारला. निरोप घेण्याआधी काही क्षण शांत राहून आम्ही प्रार्थना केली. निघताना कुणाच्या कंठातून शब्द फुटेनात. छोट्या अ‍ॅनाने माझ्या गालाच गोड पापा घेतला व रडवेल्या सुरात ती म्हणाली, "क्वाँदो रितोर्नी? (केव्हा परत याल?)"

मी उत्तर दिलं, "तुझा लग्नाला."

रोमहून मी भारतात परतलो. अधूनमधून आम्ही एकमेकांना पत्र पाठवितो. माझ्या वसईतील मित्राची पत्नी ज्युली ही हवाईसेविका आहे. रोमला तिच्या फेर्‍या व्हायच्या. बेलार्दो कुटुंबियांशी मी तिची ओळख करून दिली होती. अ‍ॅनाला ज्युलीचा भारी लळा. तिच्या लांबसडक आणि काळ्याभोर केशसंभाराचं फारच आकर्षण.

कधी रोमचं विमान लागलं म्हणजे ज्युली अ‍ॅनाकडे फेरी मारते. एकदा ज्युलीनं मला अ‍ॅनाकडून एक मोलाचं पत्र आणलं.

प्रिय फादर,
मला तुमची फार आठवण येतेय. मी तुमच्यासाठी प्रार्थना करते. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करता ना? मी तुमच्यासाठी एक गंमत पाठवून देते.
तुमची लाडकी,
अ‍ॅना.

काय होती ती गंमत? अ‍ॅनाचा पडलेला पहिला दूधदात. एक फार मौल्यवान अशी भेट तिनं माझ्यासाठी पाठवून दिली होती.

बुद्धाच्या दाताप्रमाणं मी तो दात जपून ठेवला आहे.

- oOo -

पुस्तकः ओअ‍ॅसिसच्या शोधात
लेखकः फादर फ्रान्सिस दिब्रिटो
प्रकाशकः राजहंस प्रकाशन
आवृत्ती दुसरी (१९९६)
पृष्ठे ७२-७७.


हे वाचले का?

वेचताना... : ओॲसिसच्या शोधात

लेखनाच्या दर्जावरुन नव्हे तर लेखकाच्या ’आडनावा’वरून किंवा त्याच्या साहित्यबाह्य मतांवरून त्याच्या लेखनाला न वाचताच बाद करून टाकण्याची आपल्याकडे परंपरा आहे. 

एवढं पुरेसं नाही म्हणून की काय वर आपापले गट असतात, इतर सार्‍या निकषांत बसत असला पण आपल्या गटातला नसला तर त्याच्या लेखनाची दखल न घेणे, त्यावर ताशेरे ओढणे हे ही चालते. नवे-जुने, देशीवादी-आधुनिक वगैरे कळप आपापली ’भूमी’ राखून असतात. त्यातच देशातील बहुसंख्येच्या बाहेरच्या सामाजिक गटातला लेखक असेल मग तर विचारायलाच नको.

त्यामुळे ’फादर’ दिब्रिटोंचं ’ओॲसिसच्या शोधात’ वाचलंस का?’ या माझ्या प्रश्नावर ’आम्ही खूप वाचतो बरं का’ असा दावा करणारे बरेच जण माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले होते. इतके सुरेख पुस्तक वाचून त्यातला आनंद घेता आला नाही, हे असल्या पूर्वग्रहदूषित मनाच्या व्यक्तींचे दुर्दैव म्हणायला हवे.

ओअ‍ॅसिसच्या शोधात

मध्यंतरी एका साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मीना प्रभू उमेदवार होत्या तेव्हा साहित्यिकांनी ’प्रवासवर्णन’ हा लेखनप्रकार साहित्य मानावा की नाही असा वाद निर्माण केला होता. सामान्यत: पर्यटनाचे अनुभव लिहिणे हा ढोबळमानाने प्रवासवर्णनाचा घाट असतो. यात प्रामुख्याने ज्या ठिकाणाला भेट दिली तिथली माहिती, तात्कालिक अनुभव, इतिहास, आदि माहितीचा भराव असतो.

पण फादर दिब्रिटोंच्या युरोप भेटींवर आधारित या लेखनाला प्रवासवर्णन या सदरात टाकता येणार नाही. याचे कारण म्हणजे यातील दृष्टीकोन पर्यटकाचा नाही. ज्या देशांना, शहरांना भेट दिली तेथील प्रसिद्ध ठिकाणांना दिलेल्या भेटींच्या आधारे लिहिलेले हे लेखन नाही. ज्या देशांना भेटी दिल्या त्या समाजातील व्यक्तींशी समरस होताना आलेल्या अनुभवांना शब्दबद्ध करुन समोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. यात माहितीची भरताड, पर्यटनाची हौस यापेक्षाही त्या त्या ठिकाणच्या समाजातील मूलाधाराशी जोडून घेण्याचा प्रयत्न आहे. कारण यात निव्वळ भेटींपेक्षा ’वास्तव्या’चा भाग अधिक आहे.

दिब्रिटो हे फादर असल्याने चर्चच्या माध्यमातून झालेले हे दौरे ख्रिश्चन परंपरांच्या संदर्भाशिवाय मांडले जाणे अशक्यच होते. पण केवळ जाताजाता येणारा उल्लेख इतकेच त्याचे स्थान या लेखनात आहे असे माझे मत झाले. एरवी युरोपच्या समाजाच्या तत्कालीन परिस्थितीचे आकलन करण्याचा, तिला भिडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे करत असतानाच त्यांनी अनेक ठिकाणी भारतीय समाजाची आणि युरोपिय समाजाची तुलना करून पाहण्याचा प्रयत्नही केला आहे. आणि पूर्वग्रहदूषित मने गृहित धरतील, तसे हे विवेचन एकांगी अजिबातच नाही. ज्ञानोबा-तुकोबाला सोबतीला घेऊन त्यांनी अनेक ठिकाणी भारतीय समाज, परंपरा यांच्याबाबत तुलनात्मक केलेले भाष्य विचारात घेण्याजोगे आहे. 

खरंतर हा त्यांच्या प्रवासाचा अनुभव नसून 'अनुभवाचा प्रवास' आहे असे म्हटले तर ते अधिक सयुक्तिक ठरेल. ज्या काळात मोबाईल, इंटरनेट, आदि तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते; जेव्हा भारतात लॅंडलाईन फोन ही देखील समाजात मूठभर प्रतिष्ठितांची चैन होती आणि परस्पर-संपर्कासाठी पत्र हे एकच माध्यम उपलब्ध होते, त्या काळात दिब्रिटोंनी देशाच्या सीमा ओलांडून अनेक परदेशस्थ व्यक्तींशी, माणसांशी प्रस्थापित केलेल्या नात्यांचा हा लेखाजोखा आहे.

इथे निवडलेला वेचा त्यांच्या इटलीतील वास्तव्यादरम्यान एका कुटुंबासोबत घालवलेल्या काही काळासंदर्भात आहे. तोडकेमोडके इटालियन शिकलेले फादर आणि इंग्रजीचा गंध नसलेले इटालियन जोडपे आणि त्यांची छोटी मुलगी यांच्यात निर्माण झालेल्या ऋणानुबंधाची ही गोष्ट आहे. 

पण निव्वळ तितकेच न राहता त्या दरम्यान फादर इटलीतील समाज, त्यांची जीवनपद्धती, खाद्यसंस्कृती, त्यांच्या जगण्यातले ताण-तणाव इत्यादींना स्पर्श करून जातात. त्यातल्या सर्वात छोट्या सदस्याशी - अनाशी - तर त्यांची छान दोस्ती होऊन जाते. या लेखात छोटी असलेली आना पुढे बरीच वर्षे त्यांच्या संपर्कात होती. पुढे तरुण आनाशी झालेल्या संवादावर पुढे आणखी एक लेख याच पुस्तकात त्यांनी लिहिला आहे. या दोन टप्प्यातील संवादावरुन अनाच्या व्यक्तिमत्वात झालेल्या स्थित्यंतराच्या निमित्ताने तेथील संस्कृतीचे काही पैलू डोकावून जातात.

वाचन हा ज्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, अशांसाठी काही पुस्तके पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी असतात. अशा पुस्तकांच्या माझ्या यादीत 'ओअ‍ॅसिसच्या शोधात' हे पुस्तक आजही समाविष्ट आहे.

शाब्दिक, शारीरिक हिंसा, विध्वंस, द्वेष, असूया, हेवेदावे इत्यादींचा मारा असह्य होतो तेव्हा मी हे पुस्तक उघडतो. माणसाच्या माणसावरच्या विश्वासावरचा माझा डळमळीत झालेला विश्वास पुन्हा दृढ होतो.

('या पुस्तकातील एक वेचा: http://vechitchaalalo.blogspot.com/2017/10/Oasis.html )


हे वाचले का?

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

विचारांच्या मूल्यमापनाची परिमाणे

हटवादीपणाने व आग्रहाने अमुकच एक सत्य आहे असे आपण कसे म्हणू शकू? नेहरुंना असे वाटे की, सर्व प्रश्नांवर आपण आपले मन खुले ठेवले पाहिजे. विचारांचा हा मोकळेपणा वैज्ञानिक दृष्टीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे विविध प्रश्नांकडे ठोकळेबाजपणे पाहण्याची कम्युनिस्टांची पद्धत त्यांना चुकीची वाटे. साचेबंद विचार करुन आपण फक्तच चुकीचा विचार करतो, इतकेच नाही तर जनतेने योग्य मार्गाने विचार करावा, त्यांची विचारक्षमता वाढावी यालाही आपण अडथळे करतो. भारतीय कम्युनिस्टांविषयी तर त्यांच्या मनात विशेष राग होता. भारतासमोर कोणते प्रश्न आहेत आणि ते कसे सोडवावे लागतील याबाबत कम्युनिस्टांना संपूर्णपणे अज्ञान आहे, असे नेहरुंना वाटे. भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या आधारे हिंदुस्थान समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. नेहरुंना असे वाटे की, भारतातील परिस्थिती आधी समजून घ्यावी आणि या परिस्थितीच्या संदर्भात मार्क्सच्या तत्त्वज्ञानातील कोणता भाग व्यवहार्य आहे हे ठरवावे. १९ व्या शतकात युरोपात जी राजकीय आणि आर्थिक परिस्थिती होती तिच्या आधारे मार्क्सवादाचे चिंतन चालू आहे. दरम्यान परिस्थिती पुष्कळच बदललेली आहे. विसाव्या शतकात निर्माण झालेले प्रश्न निराळे आहेत. विसाव्या शतकातील भारतासारख्या अविकसित देशात मार्क्सचे चिंतन पुष्कळसे अप्रस्तुत होते. हे जर कळाले नाही तर मग आपण वास्तवापासून आणि वैज्ञानिकतेपासून खूपच दूर जातो

पं. नेहरु: एक मागोवा

नेहरुंनी कम्युनिस्टांना पुन:पुन्हा एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांचे म्हणणे असे आहे की, १९ व्या शतकातील मार्क्स विसाव्या शतकात आता पूर्णपणे कालबाह्य झालेला आहे. इतर कम्युनिस्ट विचारवंत - विशेषतः लेनिन - विसाव्या शतकाच्या अगदी आरंभीच्या काळात विचार करत होता. ज्या परिस्थितीत, ज्या वातावरणात, जे प्रश्न डोळ्यांसमोर ठेवून ही माणसे विचार करत होती, ती परिस्थिती, ते प्रश्न आता संपूर्ण बदललेले आहेत. विशेष म्हणजे मार्क्सवाद्यांसमोर युरोप आणि अमेरिकेचे प्रश्न होते. त्यांनी आशिया-आफ्रिकेच्या संदर्भात विचार केलेला नाही. म्हणून भारतासारख्या अविकसित देशाचा विचार करताना ते सारेच प्रश्न संपूर्णपणे गैरलागू होतात.

मार्क्सही शेवटी आपल्या काळाचे अपत्य होता. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडत होती, या औद्योगिक क्रांतीच्या आरंभावस्थेत त्याने केलेले चिंतन त्या काळच्या दृष्टीने अतिशय योग्य होते. पण इंग्लंडमधील असह्य असणारे १९व्या शतकाच्या मध्यावरचे अनैसर्गिक जीवन हा काही जीवनाचा स्थायीभाव नव्हे. ते सर्वत्रच तसे असणार नाही. इंग्लंडमध्येही नेहमीच तसे राहिलेले नाही. १९ व्या शतकाच्या मध्यावर उभ्या असणार्‍या इंग्लंडच्या संदर्भात मार्क्सचे विचार बरोबर असू शकतील; परंतु या विचारांचा आजच्या अविकसित जगातील प्रश्न सोडवायला फारसा उपयोग नाही. भारतासमोर असणारे प्रश्न भारताच्या संदर्भात समजून घेतले पाहिजेत आणि वर्तमान जगाच्या संदर्भात हे प्रश्न सोडविले पाहिजेत. आपले प्रश्न विसरून जाऊन आणि वर्तमान जग विसरून जाऊन मार्क्सच्या विवेचनाच्या आधारे प्रश्न सोडविण्याचा उद्योग फारसा यशस्वी होणारा नव्हे. काळ बदलला म्हणजे नुसते प्रश्नच बदलत नाहीत; ते सोडविण्याच्या पद्धती बदलतात. मार्क्सच्या विचारावर अवलंबून राहणे हे याचे उत्तर नव्हे.

नेहरुंचे असेही म्हणणे होते की, मार्क्सने अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक प्रवाहांचे अतिशय योग्य आणि यथार्थ मूल्यमापन केले होते; परंतु जे प्रवाह नव्याने अस्तित्वात येत होते त्यांची जाणीव मार्क्सला झाली नाही. हे नवे प्रवाह अस्तित्वात आल्यामुळे जुने चित्र काही प्रमाणात बदलत होते. मार्क्सने त्याचा विचार केला नाही. अर्थात याबद्दल मार्क्सला दोषी धरण्यात अर्थ नाही. कारण ज्या वेळी त्याचे चिंतन आणि लेखन चालू होते, त्यावेळी अस्तित्वात असलेली परिस्थिती आधारासाठी घेऊनच मार्क्सला विचार करणे भाग होते, आपले निर्णय देणे भाग होते. हे मार्क्सचे विवेचन घडून गेल्यानंतरच्या काळात जर नवे घटक अस्तित्वात आले असतील तर त्याचा विचार करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. मार्क्सच्या काळात राजकीय लोकशाही अस्तित्वातच नव्हती. प्रौढ मतदानावर आधारलेल्या लोकशाहीचा उदयही मार्क्सच्या नंतरच्या काळात अस्तित्वात आलेली सर्वात महत्त्वाची घटना आहे. जोपर्यंत ही लोकशाही अस्तित्वात नव्हती, तोपर्यंत घटनात्मक आणि लोकशाही मार्गाने समाजजीवनात बदल घडवून आणणे शक्यच नव्हते आणि त्यामुळे सशस्त्र क्रांतीशिवाय मार्क्ससमोर समाजपरिवर्तनाचा दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. सशस्त्र क्रांती हा क्रांतीचा एकमेव मार्ग हे जे मार्क्सचे प्रतिपादन, ते सार्वत्रिक नाही. ज्या कालखंडात मार्क्स वावरत होता त्या कालखंडातील परिस्थितीच्या आधारे घेतलेला तो निर्णय आहे.मार्क्सनंतरच्या काळात जगातील वेगवेगळ्या देशांत जनतेला व्यापक प्रमाणात मतदानाचा अधिकार मिळाला. या व्यापक मतदानामुळे शासनाच्या स्वरूपातच मूलभूत बदल होऊन जातात. जनतेच्या हाती आलेली मतदानाची शक्ती हे एक महत्त्वाचे हत्यार आहे. समाज परिवर्तन आवश्यक दिशेने घडवून आणण्यासाठी आता जनता प्रभावीरित्या शासनावर दडपण आणू शकते. ही घटना मार्क्सच्या डोळ्यांसमोर नव्हती; मार्क्सला या घटनेची कल्पनाही करता आली नाही.

मार्क्सनंतरच्या काळात अजून काही घटना राजकीय क्षेत्रात प्रविष्ट झाल्या; त्यांचाही विचार आपण करायला पाहिजे. या घटना म्हणजे मजुरांच्या आणि शेतकर्‍यांच्या प्रचंड संघटना होत. ही संघटित असणारी शक्ती एक नवीनच परिस्थिती निर्माण करते. मजुरांच्या संघटना अस्तित्वात असल्या म्हणजे त्यांचे अस्तित्व हेच सधन वर्गावर एक फार मोठे दडपण असते. शासन करणारा वर्ग आणि सधन समाज त्यांना काही प्रमाणात या नव्या वस्तुस्थितीशी मिळतेजुळते घेणे भाग असते. यामुळे आर्थिक लोकशाहीचा प्रारंभ होतो. मार्क्सिस्टना असे वाटले की, भांडवलाशाहीच्या विकासाबरोबर काही जणांच्या हातात सत्ता आणि संपत्तीचे केंद्रीकरण होऊन जाईल; पण तसे घडले नाही. मार्क्सवादी लोक औद्योगिक क्रांतीच्या संदर्भात विचार करत होते. त्यांना पुढे येणार्‍या घटना दिसू शकल्या नाहीत. सत्ता आणि संपत्ती काही जणांच्या हाती केंद्रित होण्याऐवजी सत्तेचा पाया व्यापक झाला आणि म्हणून शासनावर जनतेचे दडपण वाढत गेले. संपत्ती काहीजणांच्या हातात केंद्रित झाली; पण उरलेल्या समाजात दारिद्र्य आणि बेकारी वाढली नाही. उलट सार्वमतावर आधारलेली लोकशाही आणि मजूर संघटना यांच्या संमिश्र प्रभावामुळे मजुरांच्या हाती काही सवलती पडल्या. त्यांचे जीवनमान व परिस्थिती काही प्रमाणात सुधारली. म्हणजे समाजाचे जे दोन गटांत विभाजन व्हायला हवे होते ते झालेच नाही. दारिद्र्य आणि बेकारीचा फैलाव यालाही नियंत्रण बसले. संपत्तीच्या केंद्रीकरणालाही आळा बसला. जे घडेल हे मार्क्सचे भाकित होते ते फारच थोड्या प्रमाणात घडले. कारण नवे निर्माण झालेले घटक आपापल्या क्षेत्रात प्रभावी होतच होते.

सामाजिक न्याय आणि समाजपरिवर्तनाची इच्छा यांना राजकीय परिस्थितीमुळे नवी गती प्राप्त झाली. सातत्याने परिस्थितीत मूलभूत बदल होत आहेत. या घटना घडत असताना राजकारणात नव्या पद्धतीच्या संघटना अस्तित्वात येत आहेत. तंत्रशास्त्रात क्रांतिकारी बदल होत आहेत. हे बदल मार्क्सलाच काय पण १९व्या शतकात कोणालाच जाणवणे शक्य नव्हते. ज्या काळात मार्क्स जन्माला आला, त्या काळात एक टंचाईची परिस्थिती होती. सर्वांच्या गरजेला पुरेसे होईल एवढे उत्पादनच उपलब्ध नव्हते. जे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही त्याचे न्याय्य वाटप कसे करावे हा महत्त्वाचा प्रश्न होता. यातून नवे ताण आणि सर्व प्रकारचे संघर्ष उदयाला येत होते. सर्वांच्या गरजा पूर्ण होऊ शकतील इतके उत्पादन उपलब्ध नसले म्हणजे आक्रमणाची प्रवृत्ती बळावते. जे बलवान आणि सधन असतात ते मिळेल ते ताब्यात घेतात. त्यामुळे उरलेल्या दुबळ्या आणि गरीब सर्वसामान्य जनतेला विविध प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. त्यामुळे सबल आणि दुर्बल, सधन आणि गरीब असा संघर्ष निर्माण होतो. गरजेच्या मानाने आवश्यक असलेले उत्पादन ज्या प्रमाणात कमी असेल त्या प्रमाणात हा संघर्ष अधिक तीव्र असतो. पण आता हा संदर्भच बदललेला आहे.आधुनिक काळात वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे भौतिक समृद्धी जनतेच्या आटोक्यात आली आहे. ज्या प्रमाणात उत्पादन वाढत होते आणि या वाढीचे प्रमाण गरजांशी मिळतेजुळते होत जाते, त्या प्रमाणात संघर्षाचे प्रमाण कमी होत जाते. संघर्ष मावळतच जातो. जगातील अनेक देशांत ते प्रत्यक्ष घडून येत असताना आपल्याला दिसत आहे.

अमेरिकेतील संयुक्त संस्थाने हे नव्या काळात याचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. आपली उत्पादन क्षमता अमेरिकेने प्रचंड प्रमाणात वाढवीत नेली आहे. त्यामुळे ते सगळ्याच उत्पादनाचे एक बलशाली केंद्र झाले आहे. अमेरिकेतील अब्जाधीश आणि सर्वसामान्य गरीब माणूस यांच्यातील फरक मोठा आहे हे मान्य केले, तरी या सर्वसामान्य माणसाचे सर्वसामान्य जीवनमान खूप उंचावलेले आहे. ज्याला मार्क्सवादी कल्पनेतला कामगार असे आपण म्हणू तो अमेरिकेत शिल्लकच राहिलेला नाही. अमेरिकेत जे घडले आहे (ते) अगदी निराळे आहे. मार्क्सवाद्यांच्या भाकिताप्रमाणे जे घडायलाच हवे होते तसे घडलील नाही. भांडवलशाहीच दरम्यानच्या काळात बदललेली आहे. ती दर क्षणी बदलत आहे. भांडवलशाहीतील संपत्ती गोळा करण्याची प्रेरणा तीच आहे. मिळेल ती सत्ता हातात घेण्याची प्रेरणा तशीच चालू आहे. नफ्याची प्रेरणा आहे, एकेका उत्पादनाच्या क्षेत्रावर एकाधिकार गाजविण्याची प्रवृत्ती आहे; पण याही भांडवलशाहीत सामाजिक न्यायाची प्रेरणा आहे, जनतेचे जीवनमान सुखावह करण्याची इच्छा याही पद्धतीत दिसून येत आहे.

राजकीय क्षेत्रात प्रौढ-मतदानावर आधारलेली लोकशाही आणि वैज्ञानिक क्षेत्रात विकसित झालेले तंत्रज्ञान या दोहोंच्या संदर्भात मार्क्सवादाचा संपूर्ण फेरविचार करणे आता आवश्यक झाले आहे; कारण वर्तमान जगाचे प्रश्न असे आहेत की, त्यांचा विचार करणे मार्क्सला शक्यच नव्हते. म्हणून नेहरूंना असे वाटे की, आता मार्क्सच्या वचनांना आणि विचारांना चिकटून बसण्यात अर्थ राहिलेला नाही. त्यांच्या ठोकळेबाज आग्रहाला तर पूर्वीही अर्थ नव्हता. अनेक प्रश्नांबाबत मार्क्सवादी दृष्टीकोन हा नुसता अहितकारक नाही तर अर्थशून्यही झालेला आहे. या सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष करणारी पोथीनिष्ठा नेहरुंना अमान्य होती. ज्याला भोवताली आधार नाही त्याचे आंधळे प्रतिपादन करण्यात त्यांना रस नव्हता.

-oOo-

पुस्तकः पं. नेहरु: एक मागोवा
लेखकः डॉ. न. गो. राजूरकर, प्रा. नरहर कुरुंदकर
प्रकाशकः पद्मगंधा प्रकाशन
आवृत्ती दुसरी (२००८)
पृष्ठे ७८-८२.


हे वाचले का?

वेचताना... : पं. नेहरु: एक मागोवा

माणसाच्या बुद्धीचा विकास जसजसा झाला, तसतसे त्याची बाह्य धोक्यांची जाणीव वाढत गेली. मग त्याने धोक्यापासून रक्षण करु शकतील अशी भौतिक आणि अध्याहृत अशी दोन प्रकारची साधने त्याने विकसित केली. निसर्ग घटकांच्या दैवतीकरणाने सुरुवात करुन अखेर अमूर्त अशा देव संकल्पनेपर्यंत तो पोचला. स्वतःला सुरक्षित करुन घेण्यासाठी या बाह्य, अध्याहृत खुंट्यांचा आधार घेत असतानाच तो दुबळ्या जनावरांप्रमाणे कळपाने राहात होता. 

जनावरांहून अधिक प्रगल्भ जाणीवा, अपेक्षा नि प्रेरणा विकसित झाल्या, तसतसे त्याला कळपातील परस्पर-व्यवहारांना अधिक काटेकोर करण्याची गरज भासू लागली. त्यातून आचारी (behavioral) धर्माचा जन्म झाला, आणि कळपाचे रूपांतर समाजात झाले.

पं. नेहरु: एक मागोवा

परंतु समाज आणि व्यक्ती यांचे हितसंबंध अनेकदा परस्परांना छेदून जात असल्याने व्यक्तींचा कल अनेकदा सामाजिक - आचारी धर्माचे - नीतिनियम डावलून स्वार्थानुरूप वर्तन करण्याकडे होत असतो. याला प्रतिरोध करण्यासाठी काही चतुर नेत्यांनी आचारी धर्माला यथावकाश देव-संकल्पनेसह पारलौकिक संकल्पनांशी जोडून दिले; आणि आचारी धर्माच्या नीतिनियमांना पावित्र्य संकल्पनेचा आवरणात गुंडाळून सादर केले, ज्यातून ते अनुल्लंघनीय असल्याचा धाक अधिक परिणामकारकपणे घालता येऊ लागला.

परंतु इतकेही पुरेसे होईना. पुढे वेगवेगळ्या धार्मिक समाजातील व्यक्तींची सरमिसळ होऊ लागली आणि त्यातून विविध समाजव्यवस्थांचे परस्परांना छेद जाऊ लागले. आता एक-धर्माचारी समाजच एकत्र वस्ती करून राहील असे बंधन राहिले नाही. त्यामुळे पुन्हा धर्मगट आणि समाज या कल्पना वेगळ्या झाल्या. 

आता या सरमिसळ समाजासाठी नीतिव्यवस्था आणि व्यवहार-व्यवस्था निर्माण करणे अपरिहार्य ठरले. विविध तत्त्वज्ञानांच्या माध्यमांतून नवे वैयक्तिक आचारधर्म पुढे आले, तर व्यापारादि परस्पर-व्यवहारासाठी सामाजिक व्यवस्था निर्माण केल्या गेल्या. तत्त्वज्ञानांचे क्षेत्र बुद्धिमंतांचे, तर सामाजिक व्यवस्थेचे क्षेत्र प्रामुख्याने राजकीय/सामाजिक नेत्यांचे ठरले. 

अर्वाचीन काळात पुन्हा ही विभागणी धूसर होत एखादा तत्त्वविचार एकाच वेळी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय चौकटी देऊ लागला. कम्युनिझमच्या विचाराने धर्मसंस्थाचे अस्तित्व प्रथमच संपूर्णपणे झुगारून सर्वस्वी अधार्मिक, ऐहिक अशी देऊ केलेली समाजव्यवस्था हा एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगात व्यापकदृष्ट्या प्रभावशाली ठरलेला सर्वात अर्वाचीन असा विचार मानला जातो.

पं. जवाहरलाल नेहरु हे केवळ भारताचे पहिले पंतप्रधान इतकीच ओळख घेऊन उभे असलेले व्यक्तिमत्व नव्हते. आपल्या विद्यार्थी दशेतच आंतरराष्ट्रीय राजकारण, समाजव्यवस्था आणि अर्थकारण यांचा सांगोपांग अभ्यास करून भारतात आल्यानंतर संयुक्त प्रांतातील शेतकरी चळवळीच्या माध्यमातून थेट भारतातील समाजाच्या सर्वात वंचित थरातील समाजाशी जोडले गेले होते. स्वातंत्र्यपूर्व कालात त्यांच्यावर कम्युनिझमचा पगडा होता आणि रशियातील त्याच्या प्रयोगाबाबत आस्था

पण त्याच वेळी 'डिस्कवरी ऑफ इंडिया'च्या निमित्ताने भारतीय इतिहास व संस्कृतीचा बारकाईने अभ्यास करून तिच्याबद्दलचा अभिमान आपल्या विचारव्यूहात व दृष्टिकोनात राखूनही राष्ट्रवादाचे संकुचित रूप झाडून टाकून भारतीय स्वातंत्र्याला देशोदेशींच्या स्वातंत्र्य लढ्यांच्या संदर्भात पाहात होते. त्याआधारे एका व्यापक स्वातंत्र्याची संकल्पना मांडत एका बाजूने साम्राज्यवादी नि दुसर्‍या बाजूने फॅसिस्ट सत्तांशी आपला लढा आहे असे बजावून सांगत होते. असे बहुआयामी, बहुश्रुत असे हे व्यक्तिमत्व. 

त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मला भावलेला भाग म्हणजे त्यांची वस्तुनिष्ठता, मूल्यमापनाचा आग्रह आणि विचार तसेच निर्णय हे व्यक्ती, समाज, काल आणि परिस्थिती-सापेक्ष असणे मान्य करण्याचा खुलेपणा. त्याचबरोबर ज्यांच्या सोबत प्रवास करायचा त्यांच्यावरच्या निष्ठा, बंधुभाव कायम ठेवतानाच मतभेदांची शक्यता न नाकारणे, 'गिव एवरी डेविल हिज ड्यू' या न्यायाने ज्याला विरोधक मानले, त्याज्य मानले अशा व्यक्ति अथवा विचाराचीही सकारात्मक बाजू - कदाचित अन्य स्थळी, काळी आपले मूल्यमापन वेगळे असू शकते या साठी - नोंदवून ठेवणे.

इथे निवडलेला वेचा हा त्यांच्या मार्क्स, मार्क्सवाद आणि त्याचे भारतीय व पाश्चात्य संदर्भ याबाबत त्यांची भूमिका मांडणारा आहे. पण मी तो निवडला तो कम्युनिजमचा पंचनामा म्हणून नव्हे. मला भावली ती त्यांच्या विचाराची पद्धत. व्यक्ती, त्याचा विचार, अंमलबजावणी, त्याचे संदर्भ, स्थल-काला संदर्भातील सापेक्षता या परिमाणांचा इतका सांगोपांग वेध क्वचितच घेतलेला पहायला मिळतो. त्यामुळे इथे कम्युनिजम कडे मी केवळ 'केस स्टडी' म्हणून पाहतो आहे, आणि त्या निमित्ताने विश्लेषण, मूल्यमापनाचा वस्तुपाठ म्हणून मी हा वेचा निवडला आहे. कम्युनिजमवरची टीका शेअर करणे हा इथे हेतूच नाही! तेव्हा कम्युनिस्ट/कम्युमिजम द्वेष्ट्यांनी खूष व्हायचे कारण नाही, तसेच कम्युनिजम बद्दल आस्था असणार्‍या किंवा कम्युनिस्ट असलेल्यांनी नाराज व्हायचेही कारण नाही.

दुसरा मुद्दा असा, की ज्या पुस्तकातून हा वेचा निवडला आहे त्या पुस्तकाचे लेखक खुद्द पं. नेहरु नाहीत. त्यांच्या समग्र लेखनातून विविध विषयांबद्दल त्यांच्या मतांचा मागोवा घेणारे हे लेखन संपादित केले आहे ते नेहरुंचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. न. गो. राजूरकर आणि प्रसिद्ध विचारवंत, अभ्यासक, तत्त्वज्ञ - जे स्वतःला मार्क्सवादी म्हणवीत - प्रा. नरहर कुरुंदकर यांनी. तेव्हा या वेच्यातील विचार, तसंच वाक्यरचना तंतोतंत नेहरुंचे आहेत असे गृहित धरण्याचे कारण नाही. याशिवाय या वेच्यात नेहरुंने मार्क्सबाबत केलेले विवेचन या वेच्यासंदर्भात आणि एकुणच त्यातून प्रतिबिंबित होणार्‍या त्यांच्या विचारव्यूहाला लागू करणे आवश्यक आहे. नेहरुंचे बहुतेक लेखन हे स्वातंत्र्यपूर्व कालातले आहे, त्या परिस्थिती-संदर्भात आहे. स्वातंत्र्यानंतर त्यांची मते बदललेली असू शकतात.

यात नेहरुंनी मार्क्सवादाबाबत केलेले भाष्य, केलेली टीका मला किंवा इतर कुणाला सर्वस्वी मान्य असायला हवी असा आग्रह धरण्याचे कारण नाही. (यातील एक दोन मुद्द्यांचा मीच विस्ताराने प्रतिवाद करु शकेन.) कदाचित यातील विचार पुढे कालबाह्य झाल्याचे नेहरुंनी मान्य केले असणे शक्य आहे किंवा कुण्या कम्युनिस्ट विचारवंताने त्याचा प्रतिवाद केला असणेही शक्य आहे.

प्रस्तावना आवरती घेताना पुन्हा एकदा आठवण करतो की हा वेचा कम्युनिजमवरची टीका म्हणून शेअर केलेला नाही, तर त्या टीकेचा दृष्टीकोन अभ्यासावा या हेतूने शेअर केलेला आहे. "मार्क्सही शेवटी आपल्या काळाचे अपत्य होता.", "मार्क्सचे विवेचन घडून गेल्यानंतरच्या काळात जर नवे घटक अस्तित्वात आले असतील तर त्याचा विचार करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. " यासारखी वाक्ये माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आणि त्यासंबंधीचे विवेचन अभ्यासनीय ठरते.

(या पुस्तकातील हा वेचा : http://vechitchaalalo.blogspot.com/2017/10/NehruMaagowaa.html)


हे वाचले का?

शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

वेचताना... : कट्यार काळजात घुसली

अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणार्‍या कौशल्यांनंतर माणसाने सर्वप्रथम विकसित केलेले कौशल्य असावे ते गाण्याचे. मनोरंजनाचे दालन माणसाने सर्वप्रथम खुले केले ते गाण्याचे दार उघडूनच.

एखादे आवडते गाणे, आवडती धून गुणगुणला नाही असा माणूस सापडणे दुर्मिळ. अगदी आपला आवाज बेसूर आहे हे पक्के ठाऊक असलेली आमच्यासारखी माणसे निदान बाथरुममध्ये – जिथे समोर कुणी नसल्याने भिडस्तपणा आड येत नाही – तरी अधेमधे आपला गळा तासून पाहतात.

कट्यार काळजात घुसली

एक-दोन आठवड्यापूर्वी मुकेशने गायलेले ‘जाने कहाँ गये वो दिन’च्या ताना मारून पाहात होतो.

हे गाणे भलतेच दगाबाज आहे, निदान माझ्यासाठी तरी. ‘जाने कहाँ ग_’ नंतरचा जो उठाव– की तान की मींड की काहीतरी– आहे तो मला नेहमीच दगा देऊन जातो. म्हणजे असं की गातो खरा, पण पुढची ओळ पुरी घेऊन, ते कडवे संपेतो आपली पट्टी दहा मैल तरी सरकली आहे हे ध्यानात येई. म्हणजे आपल्या ‘आदत’ नि ‘जिगर’चा काहीही उपयोग न होता ‘हिसाबा’त गडबड होतेच आहे हे लगेच समजून येई.

मग कुणीतरी तज्ज्ञाने सांगितले की म्हणे हा ‘शिवरंजनी’ नावाचा राग आहे आणि तू म्हणतोस ती मींड शुद्ध धैवतावरून दोन्ही निषादांना स्पर्श न करता वरच्या षड्जावर जाते. मला सुरभान असले तरी स्वरज्ञान नसल्याने हे काही आपल्याला समजले नाही. ते जे काही असेल ते असो.

पण त्या दिवशी कसे कुणास ठाऊक तो ‘ए’ (किंवा वरचा षड्ज) नेमका सापडला, आणि तो असा लागला की त्यावरच थांबलो. आसपासचं सगळं एकदम स्तब्ध झाल्याचा भास झाला. उरलेली ओळ पुरी करून समेवर यायला जमते का याची खात्री करून पहायची गरजच वाटली नाही, ‘मी तुला नेमका सापडलो’ याचे सर्टिफिकेट घेऊनच तो आला होता.

असा एक सूर सापडल्याने होणारा आनंद जर इतका मोठा असेल, तर ज्यांना सारेच सूर वश आहेत, नव्हे त्यांच्या अधीन आहेत, त्यांची काय चैन असेल असा विचार माझ्या मनात नेहमीच डोकावतो. त्या सर्वांचा खच्चून हेवा वाटतोच, पण दुसरीकडे त्यांच्यामुळेच आपल्याला गाण्याची संगत लाभते म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञही असतो. आणि त्यांचा तो ठेवा त्यांनी व्यवस्थित सांभाळावा, वृद्धिंगत करावा ही आपलीही जबाबदारी जाणवत राहते आणि गळ्यात नसला तरी मनात तो सूर राहावा म्हणून त्याची संगत कधीच सोडावीशी वाटत नाही.

असा सुरांचा मोहक दंश जर योग्य वयात झाला नि त्या डसण्यातून जी बाधा होते ती अलौकिक अशीच असते. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातल्या सदाशिवला तो सूर सापडतो पंडित भानुशंकरांच्या गाण्यातून. त्या सुरांनी वेड लावलेला तो दहा-बारा वर्षांचा मुलगा, त्यांच्या अनुपस्थितीतही अनेक वर्षे सांभाळून ठेवतो आणि अखेर घरच्या जबाबदारीतून मुक्त होताच पहिली धाव घेतो ते पंडितजींकडे. तिथून पुढे त्याच्या गायनविद्येच्या – किंवा कविराज बाँकेबिहारीच्या शब्दात सांगायचे तर ‘गायनकलेच्या’ – ध्यासाचा प्रवास उलगडत जातो.

मराठी संगीत नाटकांच्या परंपरेत संगीत हा ज्यांचा अविभाज्य भाग आहे अशी मोजकीच जी नाटके आहेत त्यातील ‘कट्यार काळजात घुसली’ हे एक, कदाचित सर्वाधिक लोकप्रिय देखील. या नाटकाचा विषय निघाला की आठवतात ते डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेले खाँसाहेब. वसंतराव म्हणजे ‘कट्यार...’ आणि ‘कट्यार...’ म्हणजे वसंतराव हे जणू समीकरणच बनून गेले आहे. आणि त्यामुळे ‘कट्यार...’ हे खाँसाहेबांचे नाटक आहे असा समज रुजून बसला आहे. हे रसिकांचे सुदैव असले तरी माझ्या मते नाटकाचे दुर्दैव आहे!

कारण मुळात हे नाटक आहे ते सदाशिवचे, त्याच्या संगीतप्रेमाचे आणि त्याच्या त्या प्रेमावर प्रेम करणार्‍या – खुद्द खाँसाहेबांसह – चार जिवांचे. हे नाटक म्हणजे ‘सुष्टांच्या संघर्षाची गोष्ट' आहे. यातले कोणतेच पात्र खलप्रवृत्तीचे नाही, फक्त प्रसंगोत्पात त्यांची कृती वा विचार इतरांना गैरसोयीचे वा चुकीचे वाटू शकतात इतकेच.

आपल्या घराण्याचा हुनर परक्या घराण्याच्या शागीर्दाकडे जाऊ नये ही घराण्याच्या दृष्टीने पाहिले तर सदिच्छा, जबाबदारीही! (दृष्टीकोन महत्त्वाचा; कोणत्याही निर्णयाला दृष्टीकोन महत्त्वाचा असतो, सार्वकालिक सत्य असे काही नसते हे बहुसंख्य लोक ध्यानीच घेत नाहीत म्हणून हा खुंटा हलवून बसवतो आहे.) ती हुनर चोरून नेण्याचा प्रयत्न करणार्‍या सदाशिववर 'एक खून माफ' असलेली कट्यार चालवून ती पार पाडावी अशी खाँसाहेबांची इच्छा होते खरी. पण ‘मौसिकी से मुहब्बत’ ही ‘घराने की जिम्मेदारी’पेक्षा वरचढ तर ठरतेच, पण मुळातच सद्भावना घेऊन जगणारे मन शरीराला अशी हिंसक कृती करू देत नाही.

नाटकातला अखेरचा प्रसंग अर्थातच चरमसीमेचा, क्लायमॅक्सचा. त्यात ‘क्यूं अब्बाजान, फिरसे पाँव में चोट आयी?’ या झरीनाच्या प्रश्नाला ‘नहीं बेटी! पाँव मे नहीं– पाँव मे नहीं— ’ असे उत्तर घायाळ झालेले खाँसाहेब देतात तेव्हा त्यांची ती चोट वाचक/प्रेक्षकालाही – खाँसाहेबांना जाणवली तिथेच – जाणवते आणि एखाद्या संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यातून सहजपणे पाझरून जाते.

- oOo -

या नाटकातील एक वेचा : एक घायाळ द्रोणाचार्य

---

या नाटकाचे विस्तृत परिशीलन ‘रमतारामाच्या विश्रांतीस्थळी’: भाग १ आणि भाग २


हे वाचले का?

सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

एक घायाळ द्रोणाचार्य

सदाशिव: माझी शेवटची इच्छा! ठीक आहे. सांगतो. तुम्ही ज्या आसनावर बसून गात होतात, त्याच आसनावर बसून मला गायचं आहे. एकदा. या हवेलीत नोकर म्हणून वावरताना अनेकदा तुमचा रियाज ऐकला. पण कधी खुल्या आवाजात मोकळ्या मनानं ते गाऊ शकलो नाही. मनाच्या गाभार्‍यात घुमणारे ते मुके सूर मुखातून बाहेर पडायला उतावीळ झाले आहेत. खाँसाहेब, आपण समोर बसून माझं गाणं ऐका- तुम्हाला ते आवडलं तर उराशी जपलेलं माझं स्वप्न अंशतः तरी खरं होईल, मी कृतकृत्य होऊन आनंदानं तयार होईन ती कट्यार काळजात झेलून घ्यायला–

उस्तादः और अगर नहीं जँचा तो? नही पसंद आया तो?

सदाशिव: आपणासारख्या अधिकारी व्यक्तीला माझं गाणं आवडलं नाही तर ‘कट्यारीशिवाय’ मरेन मी! कारण जिवंत राहण्याचं काही प्रयोजनच उरणार नाही!

उस्तादः माषाल्ला! क्या मिजाज़ पाया है लौंडेने! आखरी दम तर मुजोरी और सीना जोरी! बैठ यहाँ! (काठीने बैठक दाखवतात.)

उस्मानः (हतबुद्ध होऊन) लेकिन चचाजान–

उस्तादः (गर्जून) खामोष! उस्मान-चाँद हा आता आम्हां दोघांतला मामला आहे. तुम उपर जाव बेटे... अपनी दीदी के पास बैठो. खबरदार! जो बगैर इजाज़त यहाँ आए.

[चाँद-उस्मान अस्वस्थपणे वर जातात. सदाशिव तानपुरा उचलून गाऊ लागतो.]

भूला भटका पथहारा
अब शरण तुम्हारी आया || धृ.||
कह दो हे गुरू कहाँ मिलेगी
चरण-कमल की छाया || १ ||

दीन दुखी जो द्वार तुम्हारे
आए दोनो हाथ पसारे
माथेपर ना लगे कलंक
अब तो शीष झुकाया ||२||

[ त्यातूनच खाँसाहेबांच्या रियाजातील ‘सुरत पिया की’ चीज सुरू करतो. दुसर्‍या अंकात म्हटलेला भाग म्हणून थांबतो]

कट्यार काळजात घुसली

उस्ताद: रुको नहीं बेटे! किसी के दिलमें प्यास पैदा करना और फिर उसे अधूरीही छोडकर... गाओ... आगे गाओ–

सदाशिव: पण या पुढला अंतरा त्या दिवशी तुम्ही गायला नाहीत. आता मला आपण तो शिकवाल तर...

उस्तादः (कठोर स्वरात) नहीं... हरगिज नहीं.

सदाशिव: ठीक आहे... मग माझ्या अल्प-मतीनं जुळविलेला अंतरा ऐका...

[त्या चीजेचा पुढला अंतरा गाऊन दाखवितो.]

उस्तादः वाहवा! बहोत अच्छे! गजबका दिमाख है तेरा– मजा आ रहा है... ये ऐसा अंदाज़ पहले कभी सुना नहीं था! ‘जीते रहो बेटा, गाते रहो’...

[ तो आशीर्वाद ऐकू सदाशिव गहिवरतो आणि नमस्कार करून तानपुरा खाली ठेवतो.]

उस्तादः रुको नहीं बेटे! गाओ, कुछ देर और गाओ...

सदाशिव: क्षमा करा. माझी शेवटची इच्छा पूर्ण झाली.

उस्तादः मगर हमारी जो तसल्ली नहीं हुई... गाओ सदाशिव!

सदाशिव: (आसनावरून उठत) नको खाँसाहेब!

उस्तादः (कडाडून) हमारा हुक्म है...

सदाशिव: (आवेशाने) हुकूम? मी आपणाला गुरू मानलं असलं तरी आपण मला शिष्य मानलं नाही... हा हुकूम... ही आज्ञा पाळण्याचं माझ्यावर बंधन नाही... मी स्वतंत्र आहे... (कळवळून) कारण मी निराधार आहे... एक स्वप्न होतं ते ही काही प्रमाणात सफल झालं. आता कुणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुणाशीही नातं उरलं नाही माझं. आता आम्ही दोघंच... मी आणि ती कट्यार! खाँसाहेब, मी तयार आहे!

उस्तादः बेटे! हम मिन्नत करते हैं! फिरसे उठाओ तानपुरा...

सदाशिव: खाँसाहेब, मी तयार आहे, उचला हात आणि चालवा कट्यार...

उस्तादः (संतापून) बदतमीज! किसी गुश्ताखी हमनें आजतक... (गहिवरून) बेटे! किसीके दिलमें प्यास पैदा करना और उसे अधूरी छोडकर... देख सदाशिव, तेरी और कोई मुराद हो तो बता देना... पूरी कर दूँगा... मगर एक बार और...

सदाशिव: ठीक आहे! गाईन! एका अटीवर. आपण शागीर्द म्हणून माझा स्वीकार कराल? खर्‍या अर्थाने माझे गुरू व्हाल?

उस्तादः (अगतिकपणे ओरडून) नहीं! नहीं! उतनी बात छोडकर और कोई चीज माँग ले!

सदाशिव: जशी मुरलीधराची इच्छा! मग एक तर माझी वाट सोडा किंवा कट्यार चालवा.

उस्तादः (कळवळून) ए परवरदिगार! ये जिद, ये हठीलापन, चलाऊंगा बेटे कटार! यहाँ सामने आ [प्रकाशयोजना तालबद्ध रीतीने अनुक्रमे मंद आणि प्रखर होऊ लागते.] ये रोशनी क्यूं धुंद हुई? कुछ धीमीसी लग रही है– सम्भालना बेटे– मेरा हाथ उठ रहा है– काँप रहा है– क्योंकी बुढापा आ रहा है– और पैर में कुछ... कहाँ खडा है तू– मैं (त्याला धरून कट्यारीचा हात उगारतात– कट्यार गळून पडते– ते हताश होतात– आपल्या आसनाचा आधार घेतात.) कटार क्या चलाऊं लौंडे? कटार तो तूने चलायी ज़िंदगीभर, मेरी आँखोके सामने नहीं आना– कविराज ले जाईये इस कम्बख्त को.

[ सदाशिव त्यांची कट्यार उचलून त्यांच्या पायांशी ठेवतो. जाऊ लागतो. त्या वेळेपर्यंत झरीना, चाँद, उस्मान, जिन्यात आलेले.]

सदाशिव: कविराज, क्षमा करा! तुमची अपेक्षा अपूर्ण राहिली, माझ्या स्वप्नासारखीच...

कविराजः सदाशिव, वाईट वाटून घेऊ नकोस. ही तुझी शोकांतिका नाही. द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा मागितली तेव्हा एकलव्यानं आपला अंगठा कापून दिला. डोळ्यांत टिपूस न आणता. एकलव्याचा नुसता हात जखमी झाला- विद्रूप झाला– पण द्रोणाचार्य मात्र अंतर्बाह्य जखमी झाले– आयुष्यभर तळमळत राहिले, हळहळत राहिले.

झरीना: (भिंतीवरची तसबीर काढून घेत) सदाशिव!

सदाशिव: हे काय झरीना– ही खाँसाहेबांची तसबीर...

झरीना: असू दे तुझ्याजवळ... तुझ्याच कष्टाच्या कमाईतून बनविलीस तू... गुरुदक्षिणा म्हणून... या हवेलीत तुझ्या कष्टांचा अपमान झाला! निदान या गुरुदक्षिणेचा व्हायला नको. “शुभास्ते पंथान:”

सदाशिव: खुदा हाफिज!

झरीना: उमाची भेट झाली तर माझा निरोप सांग... ज्याला आपण बागेतला पोपट समजत होतो, तो आता मोठा झाला आहे... गरुडासारखा. त्याची वाट कुणीही अडवू शकणार नाही यापुढं. “शुभास्ते पंथान:”

सदाशिव: खुदा हाफिज! [सदाशिव व कविराज जातात. खाँसाहेब काठीच्या आधारे उठून तिकडे जाऊ लागतात.]

उस्ताद: (भ्रमिष्टासारखे होत, स्वतःशी) चला गया? सदाशिव चला गया? (कळवळून, आकाशाकडे हात उचलीत) ए मालिक! मेरे आका! काश् ! तू मेरे घरानेमे एक ऐसा शागीर्द पैदा करता– तो मैं अलम् दुनिया को चुनौती देकर कहता–

[आवेगाच्या भरात घडवंचीला पाय लागून त्यांचा तोल जातो. त्यांचे किंचाळणे ऐकून झरीना धावत येऊन त्यांना आधार देते.]

झरीना: क्या हुआ अब्बाजान! फिर पाँव में चोट आई?

उस्तादः (तिला जवळ घेऊन आसवे ढाळीत) नहीं बेटी! पाँव मे नहीं– पाँव मे नहीं—

- oOo -

पुस्तकः कट्यार काळजात घुसली.
लेखकः पुरुषोत्तम दारव्हेकर.
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन.
आवृत्ती चौथी (२०१६).
पृष्ठे: ११६-११९


हे वाचले का?

शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७

वेचताना... : मृगजळाची तळी

मनुष्यप्राण्याच्या इतिहासात त्याने आपल्या भीतीवर मात करण्यासाठी देव ही आदर्श, नियंत्रक आणि कृपाळू संकल्पना निर्माण करून त्याचे अस्तित्व आणि श्रेष्ठत्व प्रतिपादित करायला सुरुवात केली. हे अस्तित्व केवळ मानण्यावरच असल्याने स्वयंसिद्ध होते.

मृगजळाची तळी

पण मनुष्यप्राण्याचा माणूस होऊ लागला, त्याचे विचार-इंद्रिय विकसित होऊ लागले तसतसे श्रेष्ठत्व हे पुराव्याने, तर्काने सिद्ध करावे लागेल याची त्याला जाणीव झाली. मग मोठ्या-शेजारी छोटी रेघ ओढून त्याने त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास सुरुवात केली. जगातील बहुतेक जमाती, धर्म, वंश यांच्या परंपरेत देवाच्या जोडीला देवांकडून सतत पराभूत होणारा असा शत्रू आणून बसवण्यात आला. मग ज्यू/ख्रिश्चन परंपरेत सैतान आला, इस्लाममधे इब्लिस, शैतान आला, तर बौद्ध धर्मात मार उगवला. (या इथे दुर्गाबाईंच्या वेच्याच्या प्रस्तावनेतही हा मुद्दा आला आहे.) हिंदू परंपरेत तर अशा छोट्या रेघांची रेलचेल आहे, कारण इथे देवांची संख्या प्रचंड असल्याने त्यांचे शत्रूही महामूर.

ही आदिम जाणीव माणूस आजही पुढे घेऊन जातो आहे. राजकारणापासून समाजकारणापर्यंत कुठेही शेजारी लहान रेघ ओढल्याखेरीज आपली रेघ मोठी सिद्धच करता येत नाही इतकी श्रेष्ठत्वाची व्याख्या खुजी झाली आहे. इतिहास वा साहित्यही याला अपवाद नाही. 

आपल्या मते मूर्खपणाच्या असलेल्या, मारक असलेल्या एखाद्या निर्णयावर 'तुघलकी निर्णय' असा शिक्का मारून त्याची निंदा केली जाते, कारण महंमद बिन तुघलक हा मूर्खांचा शिरोमणी अशी आपली व्याख्या आहे. इथे 'वेचित चाललो' वरच कार्नाडांच्या 'तुघलक'चा एक वेचा शेअर केला आहे. या नाटकातला तुघलक वेगळाच दिसतो. ही दुसरी बाजू पाहण्याची तसदी घेणारे कार्नाडांसारखे एखादेच, बाकीचे सारे पूर्वग्रहांवर जगतात.

याच्या दुसर्‍या टोकाला काही जण जात, धर्म, गट याचा विचार करून आपल्या बाजूच्या, गटाच्या प्रत्येक नकारात्मक प्रवृत्तीचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात एखादी व्यक्ती रोल मॉडेल आहे की आपला तुघलक आहे हे बव्हंशी वास्तवापेक्षा पूर्वग्रह नि आपल्या मतांना दामटण्याची सोय यावरच ठरते.

साहित्यामधे सर्वांतिसचा 'डॉन क्विक्झोट' हे पात्र याचे उत्तम उदाहरण ठरते. सर्वांतिसने त्याच्या या कादंबरीचा पहिला भाग प्रकाशित केला तेव्हा हे पात्र 'तुघलक' म्हणून सामोरे आले. पूर्वग्रहदूषित विचार करणार्‍यांनी या व्यक्तीला तसेच पाहिले. सोळाव्या शतकात प्रकाशित झालेल्या या कादंबरीला समीक्षकांनी बिल्कुल महत्त्व दिले नाही. पण वाचकांनी मात्र तिला डोक्यावर घेतले, ते ही एक विनोदी कादंबरी म्हणूनच. 

पुढे एकोणिसाव्या शतकात ’क्विक्झोट'कडे हा एक वेगळेच व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाऊ लागले. क्विक्झोट्च्या व्यक्तिमत्त्वात एखाद्या प्रेषिताची कळकळ नि हेतू सहज दिसतात. फक्त त्याला योग्य कृती अथवा विचार सापडले नाहीत, त्यामुळे त्याची कृती हास्यास्पद ठरली, तो लोकांच्या उपहासाचे, मनोरंजनाचे साधन ठरून गेला. थोडक्यात त्याच्याकडे एक 'अयशस्वी प्रेषित' म्हणून का पाहू नये असा एक विचार पुढे आला. 

इतकेच नव्हे तर त्याने जागतिक साहित्यात अनेक लेखकांना प्रेरणा दिली. 'क्विक्झॉटिझम' हा विचारच त्यातून पुढे आला. क्विझॉटिझम म्हणजे नक्की काय याची शाब्दिक व्याख्या प्रत्येकाने आपापल्या सोयीची केलेली असली तरी ढोबळमानाने 'सर्वेपि सुखिनः सन्तु' ही मूळ प्रेरणा आणि तसे घडावे म्हणून आपण आपली जबाबदारी उचलायला हवी हा विचार, पण त्याला आवश्यक असलेल्या वास्तवाच्या भानाचा किंवा बलाचा अभाव म्हणजे क्विक्झॉटिक व्यक्तिमत्व असे म्हणता येईल. 

ही जी व्याख्या मी केली ती ढोबळ यासाठी म्हणतो, की यातील एखाद्या गुणाची (गुण या शब्दाला कोणतीही सकारात्मक, नकारात्मक छटा नाही!) छटा कमी अधिक गडद असू शकते, एखाद्याचा अभाव असू शकतो, तितपत धूसरता कोणत्याही व्याख्येत असतेच.

तर या क्विक्झॉटिझम ने साहित्यात आपले एक अढळ असे स्थान निर्माण केले. असे क्विक्झोटने जागतिक साहित्याच्या क्षेत्रातील अनेक दिग्गज लेखकांच्या लेखनात शिरकाव केलेला दिसतो. अनेकांनी जाहीरपणे हे ऋण मान्यही केले आहे. हा धागा घेऊन दोन जागतिक आणि दोन भारतीय लेखकांवरील क्विक्झोटचा प्रभाव शोधण्याचा प्रयत्न विजय पाडळकर यांनी आपल्या 'मृगजळाची तळी' या पुस्तकातून केला आहे. 

डोस्टोव्हस्कीच्या 'इडियट'मधला प्रिन्स मिश्किन, हिंदीमध्ये बिमल मित्र यांच्या 'मुजरिम हाजिर' मधला सदानंद, गुस्ताव फ्लॉबेरची प्रसिद्ध 'मादाम बोवारी' आणि जीएंच्या 'यात्रिक' मधे येणारा डॉन (जो खरंतर व्यक्ती म्हणूनही डॉन क्विझोटच आहे) यांच्यातील क्विक्झोट उलगडून पाहण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

थोडे शोधले तर इतर अनेक कथा, कादंबर्‍यातून अशी क्विक्झॉटिक पात्रे आढळून येतील. विश्राम गुप्ते यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या 'चेटूक' या कादंबरीतील राणी ही देखील साहित्य, चित्रपटाच्या जगातून घेतलेल्या आदर्श प्रेमाची, आदर्श जोडीदाराची आस घेऊन असते. पण वास्तवात तिच्या समोर येतो तोच आपल्याला हवा तसा जोडीदार आहे या भ्रमात ती वागू पाहते. फक्त क्विक्झोटप्रमाणे तिचा भ्रमनिरास फार उशीरा होत नाही, पण तिच्या स्वप्नाळू काळातील कृतीचे परिणाम तिला अखेरपर्यंत भेडसावत राहतातच.

पाडळकरांनी या सार्‍या लेखकांच्या लेखनातील क्विक्झॉटिक अस्तित्वाबाबत केलेले विवेचन सारे तुम्हा आम्हाला पटेल असे मुळीच नाही. अगदी इथे मी निवडलेल्या वेच्याबाबतही मला ते पुरेसे पटले आहे असे नाही. परंतु स्वतंत्रपणे पाहिले, तर त्यांचा हा 'आकान्ताचे वैफल्य' हा लेखच मला पुस्तकातील पाच लेखांत सर्वात अधिक भावला.

हा लेख बिमल मित्र यांच्या 'मुजरिम हाजिर' या कादंबरीबाबत आहे. यातील सदानंद हा मला स्वतःला क्विक्झोट कमी आणि ’पराभूत बुद्ध' अधिक दिसतो. किंबहुना मी ती कादंबरी वाचली तेव्हा त्याचे ते बुद्धाची छाया असणेच मला अधिक भावले होते. आजच्या जगात बुद्ध अवतरला तर त्याचे भागधेय देखील ’सदानंद'पेक्षा वेगळे नसेल याची मला जवळजवळ खात्रीच आहे. 'जो लोक कल्याणा, घेई करी प्राण, त्या सौख्य कैचे' हे खरे असले तरी आज त्याला जोडूनच 'त्या यश कैसे' असेही म्हणावे लागेल. 

वैयक्तिक स्वार्थ, माझ्या गटाचा स्वार्थ या क्रमाने प्राधान्यक्रम उतरत जात असताना आणि तो स्वार्थ, अहंकार जपण्यासाठी सोबत इतरांसाठी द्वेष जपणे महत्त्वाचे ठरत असताना ’सकलांचे कल्याण’ ही सर्वांनाच मूर्खपणाची कल्पना वाटत असते हे उघड आहे. अशा वातावरणात बुद्ध पराभूतच होत असतात. कारण बुद्धाचे श्रेष्ठत्व समजून घेण्याइतकी कुवत आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याची निर्लिप्तता केव्हाच अस्तंगत झालेली आहे.

हा लेख निवडला याचे कारण म्हणजे हा सदानंद एकांगी, सर्वगुणसंपन्न असा नाही हे! माणूस कितीही सद्भावना राखून असला तरी ती आचरणात आणण्याइतकी त्याची प्रेरणा किंवा कुवत पुरेशी प्रबळ असेलच असे नाही. तसे असले तरी त्याच्या त्या सद्भावनेचे महत्त्व कमी होत नाही. आणि म्हणून हा सदानंद आपल्यातलाच वाटतो. आणि जर तो क्विक्झॉटिक असेल, तर त्याच्यासोबत असताना आपल्या आतला क्विक्झोटही कदाचित सापडू शकतो.

(या पुस्तकातील एक वेचा: http://vechitchaalalo.blogspot.com/2017/04/MrugajalaachiTali.html )


हे वाचले का?

गुरुवार, २० एप्रिल, २०१७

आकान्ताचे वैफल्य

'मुजरिम हाजिर'चा नायक सदानंद चौधरीभोवती वर उल्लेख केलेली पात्रे फिरत असतात. घटनांचे केंद्रस्थान व लेखकाचे लक्ष्यही तेच आहे. ह्या सदानंदचे व्यक्तिमत्त्व कसे विकसित होत जाते हा या कादंबरीचा अत्यंत महत्त्वाचा गुण-विशेष आहे. ज्या घटना घडतात, त्यांना महत्त्व आहे ते सदानंदाच्या संदर्भात. कारण शेवटी घटनांना सामोरे जाणारा माणूस, त्याच्यात होणारे परिवर्तन हे लेखकाच्या व वाचकाच्या दृष्टीने मोलाचे असते. सदानंदच्या आयुष्यात एका मागोमाग एक घडणार्‍या घटना पाहिल्या की त्यांच्यामधून सदानंदचे अत्यंत व्यामिश्र असे व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभे राहते. अगदी लहानपणापासून हा मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे. खेळात त्याला रस नाही. नाटकाबिटकात तो रमत नाही. त्याला फारसे मित्र नाहीत. एकटे फिरणे त्याला आवडते. आत्मकेंद्रित व्यक्तिमत्वाच्या या सार्‍या पाऊलखुणा. बाह्य अशी काहीच व्यवधाने नसल्यामुळे हा मुलगा मनाशीच विचार करू लागतो. आपल्याभोवती घडणार्‍या घटनांचा अर्थ जाणून घेण्याची त्याला गरज भासते आणि त्याला वेगळीच अशी बाजू दिसते. कपिल पायरापोडोने आत्महत्या का केली? 'कालीगंज की बहू' आपल्याकडे सारख्या चकरा का मारते? गरीबांना आपले वडील, आजोबा का छळतात? असे प्रश्न त्याच्या बालमनाला पडतात. आपण श्रीमंत व इतर गरीब का? माणसामाणसांत असा फरक का? तो कोणी केला? एक ना दोन. ह्या प्रश्नांचे ओझे त्याला सहन होत नाही. अत्यंत लाडात सुखवैभवात वाढणार्‍या मुलाच्या मनात हे असमाधानाचे बीज कोठून आले? आयुष्य अशा प्रश्नांचे उत्तर देत नाही. पण एवढे मात्र खरे की असे बीज ज्याच्या मनात पडते तो जगापासून तांदळातल्या खड्याप्रमाणे बाजूला पडतो. त्याची एकाकीपणापासून सुटका नाही, असमाधानापासून सुटका नाही. वाडवडिलांच्या संपत्तीच्या पाठीमागे असलेल्या गुन्ह्यांची, पापांची जाणीव सदानंदला लहानपणीच होते व त्याचे बाल्य कोमेजते. ऐश्वर्यामुळे त्याचे डोळे बंद होत नाहीत; तर पुरते उघडतात. ह्या पापात आपणही सहभागी आहोत ही भावना त्याच्या मनात जन्म घेते. आयुष्य जसे आहे तसे निमूटपणे स्वीकारुन जगत राहणार्‍या माणसांच्या कळपात त्याला स्थान राहात नाही. एकदा प्रश्न मनात उमटू लागले की सतत नवनवे प्रश्न येतच राहतात आणि त्यांची उत्तरे शोधता शोधताच आयुष्य संपून जाते. हे अटळ भविष्य लहानपणीच सदानंदच्या भाळी लिहिले गेले आहे.

मृगजळाची तळी

लहानपणी मनावर ज्या गोष्टी कोरल्या जातात त्यांच्या खुणा मोठेपणीही मिटत नाहीत. उत्कटपणे जगणार्‍या माणसाच्या मनात तर त्या सतत जाग्याच असतात. सदानंद तरुण होतो तरी त्याच्या मनातले प्रश्न त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यांच्यापैकी काहींची ठाम उत्तरे उलट आता मिळालेली आहेत. पूर्वजांच्या जगातील अन्याय मानवनिर्मित आहे हे त्याला कळले आहे. पूर्वजांच्या पापात आपण सहभागी आहो हा त्याचा ठाम निष्कर्ष आहे. त्यामुळे संपत्तीबद्दलची त्याच्या मनातील आसक्ती हळूहळू कमी होत जाते. स्वतःजवळ सारे काही असल्यामुळेच व अधिक काही नको असल्यामुळे एक स्वार्थरहित अशी त्याची मनोवृत्ती तयार होते. जे आहे त्याचेच ओझे झाल्यामुळे आणखी काही मागण्याचा प्रश्नच नसतो. जगाविषयीची त्याची भूमिका आता पक्की होते. माणसाबद्दल त्याच्या मनात खोल सहानुभूती आहे. करुणा आहे, प्रेम आहे. माणुसकी व दया या मूल्यांवर त्याचा विश्वास आहे. केवळ स्वतःचा स्वार्थ न पाहता कुणासाठी काहीतरी करावे, इतरांची दु:खे दूर करावीत, त्यांना सुख मिळवून द्यावे अशा इच्छा त्याच्या मनात निर्माण होतात व येथेच त्याचे डॉन क्विक्झोटशी नाते जुळते.

सदानंदचे डॉन क्विक्झोटशी असलेले नाते थोडे विस्ताराने पाहण्यासारखे आहे. सर्वांतिसच्या ह्या झपाटलेल्या शिलेदारासारखेच सदानंदच्या हृदयात माणसाबद्दल प्रेम आहे. मनात एक स्वप्न आहे. डोक्यात एक वेड आहे. ह्या संदर्भात पहिला प्रश्न असा की आपला नायक डॉन क्विक्झोटवर बेतावा अशी बिमल मित्र यांची इच्छा होती का? कादंबरीतील सदानंदच्या संदर्भातील लेखकाचे भाष्य काळजीपूर्वक तपासले तर दिसून येते की त्यांनी एकदा गौतम बुद्धाचा व एकदा येशूचा उल्लेख केला आहे. 'ढाई हजार साल पहले दूसरे एक सदानंदका जन्म हुआ था | लेकिन इस सदानंद की तरह उस सदानंद का भी ऐश्वर्यसे जी नही भरा था | उसके भी मनमे यही प्रश्न जगा था, यह अन्याय है, यह पाप है| इस अन्याय, इस पाप का प्रतिकार होना चाहिए |

"आजसे एक हजार नौसो तिहत्तर साल पहले तब के मनुष्य की धरतीने जैसे दूसरे एक सदानंद को समसामायिक समाज ने बिल्कुल खत्म करके अपने आपको खतरे से खाली समझा था, उसके उतने दिनोंके बाद आज के मनुष्य की धरती भी उसके एक अन्य उत्तरसूरी मुजरिम को दंड देकर अपने को खतरेसे खाली समझकर निश्चिंत हो गयी|

गौतम बुद्धाप्रमाणेच आपले सारे वैभव, आपली पत्नी यांचा त्याग करुन सदानंद घराबाहेर पडला. येशू ख्रिस्ताप्रमाणेच त्याला अपराधी ठरवून मानवावर केलेल्या प्रेमाचे प्रायश्चित्त समाजाने भोगण्यास लावले. पण त्या महामानवांशी असलेले सदानंदचे साम्य तेथेच संपते. ते फारसे ताणता येत नाही. याची लेखकालाही जाणीव आहे. महामानवाचे चित्रण करणे हा या कादंबरीचा हेतू नाही. सामान्य माणसातून वर उठू पाहणार्‍या एका उत्कट जीवाची शोकांतिका लेखकाला रंगवायची आहे. आणि ह्या शोकांतिकेला भव्य पार्श्वभूमी आहे ती समाजाच्या रसातळाकडे जाणार्‍या महायात्रेची. सामाजिक अधःपतनाच्या काळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी चमकणारी क्षीण प्रकाशरेषा लेखकाला पकडावयाची आहे. म्हणून आपला नायक त्यांनी दैवी गुण वा सामर्थ्य असलेला निवडलेला नाही. त्याला न पेलणारे वर त्यांनी दिलेले नाहीत. सदानंद बुद्ध नाही, येशू नाही, कारण त्याच्याजवळ भक्कम असे तत्त्वज्ञान नाही. भोवतालच्या दु:खाने तो व्याकुळ होतो. सर्वांनी सुखी व्हावे ही शुभेच्छा त्याच्या ओठावर आहे. पण मानवजातीला दु:खातून सोडवण्याचा मार्ग त्याला सापडत नाही. (अर्थात तो तसा बुद्धाला वा येशूला सापडला की नाही हा वादाचा प्रश्न आहेच.) असा सदानंद महामानव बनू शकत नाही याची कारणे त्याच्या स्वभावातच आहेत. हा माणूस ज्या वैभवात वाढला आहे त्या वैभवाचे गुण याचा त्याला तिटकारा आहे. त्याचा बाप म्हणतो, "लडकेमे यह भी क्षमता नही की खुद कमाकर गुजारा चलाएगा!" एक खानदानी रक्त त्याच्या धमन्यांतून वाहते आहे#. तो आपल्यासाठी पाणीदेखील शोधून पिऊ शकत नाही. त्याचा नोकर एकदा त्याला म्हणतोच, "आप ढूँढकर गिलास कैसे पाएंगे| आपने क्या कभी हातसे डालकर पानी लिया है?" हा माणूस घरून बाहेर पडतो, पण पुन्हा पुन्हा कुणाच्या तरी आश्रयालाच जातो, जेथे खाण्यापिण्याची तरी कमीत कमी सोय होईल. अन्यायाविरुद्ध तो बोलतो, त्याला चीड आहे, पण त्याविरुद्धच्या लढाईत तो स्वतःला झोकून देऊ शकत नाही. लढाईपासून तो हमेशा दूरच आहे. पण त्याचबरोबर हेही खरे की लढाई त्याच्या मनातच आहे. हा माणूस महामानव नाही म्हणूनच तो आपल्याला जवळचा वाटतो, त्याची सुखदु:खे जवळची वाटतात, आपली वाटतात.

सबंध मानवजातीच्या कल्याणाचे लक्ष्य सदानंदसमोर नाही. त्याला मानवाचे दु:ख दिसते. त्याच्या वेदना दिसतात. पण त्याची दृष्टी मर्यादित आहे. आपल्या वर्तुळापुरती सीमित आहे. आपल्या पूर्वजांचे पाप आपल्या शिरावर आहे हे तो मानतो व त्या पापाचे प्रायश्चित्त त्याला पुरेसे आहे. "मैं तुम्हारे पाप का भागीदार नहीं हूँ | सिर्फ मुझे तुम लोग छुटकारा दो |" असे तो म्हणतो. पण ह्या जीवनाच्या चक्रव्यूहात अडकल्यावर सुटणे एवढे सोपे नसते. सुटून जाणार कोठे? सर्वत्र तर हीच माणसे आहेत. चेहरे बदललेले पण आत्मे तेच. सर्वत्र हेच तर जीवन आहे. किडलेले, भ्रष्ट! ह्यापासून सुटका नाही. ह्या अशुभाशी टक्कर देण्याचे सामर्थ्य सदानंदजवळ नाही

त्याच्याजवळ आहे ती फक्त शुभेच्छा, सर्वांचे भले व्हावे, सर्व सुखी व्हावे, ही. या संदर्भात मला डी. एच. लॉरेन्स'चे एक वाक्य आठवते. त्याने लिहिले आहे, "General goodwill is a form of egoism. It is always felt as insult by the mere object* of it."

- oOo -

*हा मुद्रणदोष असावा. बहुधा हा शब्द subject असा असावा.

---

पुस्तकः मृगजळाची तळी
लेखक: विजय पाडळकर
प्रकाशकः मॅजेस्टिक प्रकाशन
आवृत्ती पहिली (१९९९)
पृष्ठे: ६१-६४


हे वाचले का?

रविवार, ९ एप्रिल, २०१७

मोठी रेघ - छोटी रेघ

"बाई, आता आपण पाप-पुण्य, स्वर्ग-नरकाबद्दल बोललो. त्याच संदर्भात एक प्रश्न मला विचारावासा वाटतो आहे. 'पैस' मधे तुम्ही अजिंठावर लेख लिहिला आहे. त्यामधे 'टेम्प्टेशन ऑफ बुद्ध' असं नाव एक जर्मन माणसान दिलेल्या चित्राचं तुम्ही फार सुंदर वर्णन केलं आहे. या चित्रामध्ये गौतम बुद्धाला मोहात पाडण्याची पराकाष्ठा करणारा 'मार' दाखवलेला आहे. आता इथं मला आठवण होते ती 'टेम्प्टेशन ऑफ ख्राइस्ट' या कथेची. या दोन्हींची तुलना कशी कराल?"

ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी

"बौद्ध वाङमयामधे 'मार' ही व्यक्तिरेखा आहे, ती सैतानाची मूर्ती नाही. ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाममधे सैतान आहे. 'मार' हा त्या अर्थाने सैतान नाही. पण तो बुद्धाला, बौद्धांना मोहात पाडणारा आहे. तुमच्या मनात ऐहिक सुखासाठी लोभ-मोह उत्पन्न करणारा आहे; पण हा पापी नाही. 'संपत्ती पाहिजे? ये माझ्याकडे, मी देतो. बुद्धाकडे कशाला जातोस?' अशा पद्धतीचं त्याचं बोलणं असतं. 'बुद्धप्रलोभन' म्हणून मी एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये हा मार बुद्धालाच मोहात पाडायचा प्रयत्न करतो त्याबद्दल मी लिहिलंय. तेच ते अजिंठा इथलं चित्र. फारच सुंदर चित्र आहे ते, की बुद्धासमोर मार येतो. अक्राळविक्राळ चेहर्‍याचा आहे तो मार. बुद्धाला भय दाखवतो, की मी मारेन तुला. मग त्याच्यासमोर आसन्नप्रसवा गर्भवती, सुंदर स्त्री उभी करतो, की ती बघून त्याला - बुद्धाला - आपल्या बायकोची, मुलाची आठवण यावी आणि त्याचा तपोभंग व्हावा. कारण गौतम आपल्या तान्ह्या मुलाला आणि तरुण, सुंदर पत्नीला सोडून आलेला असतो. पण गौतमाने आपला मार्ग सोडला नाही. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, की गौतमाच्या वडिलांनी त्याला अगदी ऐषारामात ठेवलं होतं. दु:खाचा, दैन्याचा वारादेखील त्याला लागू नये म्हणून. पण गौतमाने जख्खड म्हातारा बघितला, रोगी माणूस बघितला, प्रेतयात्रा बघितली आणि मग वैराग्य येऊन त्यानं राजवाडा सोडला, आपला तान्हा मुलगा सोडला, तरुण, सुंदर पत्नीचाही त्याग केला. पण एक लक्षात घे, की गौतमाला हे वैराग्य मोठ्या वयातच आलं असं नव्हे, तर लहानपणापासून त्याची ती मूळ प्रवृत्तीच होती. एकदा छोटा गौतम पांढर्‍या जांबाच्या झाडाखाली बसला होता. तर तिथं बसल्या बसल्याच जांबाकडे बघून त्यानं ध्यान लावलं. तेव्हा तो ५-६ वर्षांचाच होता. त्याची ही वृत्ती बघूनच त्याच्या वडिलांनी त्याला हरप्रकारे दु:खापासून दूर ठेवलं होतं, ऐषारामात ठेवलं होतं. त्याला हा मार परत परत वैराग्यापासून, ज्ञानमार्गापासून, तपःसाधनेपासून दूर ठेवायचा प्रयत्न करतो. पण बुद्ध मात्र आपल्या निश्चयापासून ढळत नाही. 'बुद्धिझम अ‍ॅन्ड मायथॉलॉजी ऑफ इव्हिल' नावाचं एक पुस्तक आहे, ते वाच. या मारबद्दल खूप माहिती मिळेल तुला. तशीच 'मेरी कॉरेली'ची 'सॉरोज् ऑफ सॅटान' नावाची कादंबरी आहे. त्यामध्ये तिनं सैतानाचं दु:ख काय आहे ते मांडलंय. फार छान पुस्तक आहे ते."

"अगदी जरूर वाचेन ही पुस्तकं. आणखीही काही मिळाली तर वाचेन."

"आणि मग मला सांग; काय काय तुला मिळालं ते."

"सांगेन. पण आत्ता मला सांगा, की बौद्ध वाङमयातला मार आणि ख्रिश्चनांचा सैतान यांच्यामधला फरक, साम्य काय? 'टेम्प्टेशन ऑफ बुद्ध' आणि 'टेम्प्टेशन ऑफ ख्राइस्ट' यांच्यामधे साम्य, फरक काय?"

"मार आणि सैतान हे दोघेही लोकांना मोहात पाडण्यासाठी धडपडणारे आहेत. ख्रिस्ताबद्दल असं म्हणतात, की माग्दालेना ही ख्रिस्ताचे पाय आपल्या अश्रूंनी धुते, आपल्या लांबसडक केसांनी ख्रिस्ताचे पाय पुसते. तेव्हा ख्रिस्त तिच्याकडे दयार्द्र दृष्टीने बघत असतो. ते दृश्य पाहून लोकांना वाटतं, की ख्रिस्ताला माग्दालेनाचा मोह पडलेला आहे. पण वस्तुतः तिने जीझसचे पाय आपल्या अश्रूंनी धुवून, केसांनी पुसून स्वतःच्या पापांच क्षालन केलेलं आहे, असाही विचार मांडला जातो."

"बुद्ध आणि मार यांचं नातं वेगळंच आहे. बुद्धाने वैराग्याच्या मार्गाने, तपश्चर्येच्या मार्गाने जाऊ नये, सुखासीन आयुष्य जगावं, जगातले सगळे उपभोग घ्यावेत यासाठी मार त्याला कधी भीती दाखवतो, तर कधी मोहात पाडतो. कितीतरी प्रसंग असे आहेत, की बुद्ध मोहात पडू शकला असता; त्याच्या नकळतच. पण बुद्ध विचलित झाला नाही. म्हणून बुद्धाचं हे टेम्प्टेशन नाहीच आहे. कोणी कोणी विद्वान येतात आणि काहीतरी आख्यायिका शोधून काढून कशाशी तरी संबंध लावतात. खरं म्हणजे या चित्रामध्ये मार तिथे असला; तरी ते बुद्धाचं टेम्प्टेशन नाही; तर मार तिथे असूनही बुद्धाला झालेला परमसत्याचा साक्षात्कार आहे. म्हणूनच बुद्धाची नजर, त्याचे डोळे अर्धोन्मीलित आहेत, अंतर्मुख झालेले आहेत. बुद्ध स्वतःच कल्पना करतो, की मार मला कुठल्या पातळीपर्यंत जाऊन मोहात पाडायचा प्रयत्न करू शकतो. आणि त्या कल्पनेपासूनही बुद्ध स्वतःला सोडवून घेतो. ख्रिस्ताचं भांडण आहे ते प्रत्यक्षातल्या सैतानाशी.

"हिंदू धर्मामध्ये सैतानाची किंवा मारची कल्पना दिसत नाही ना?"

"नाही. हिंदू धर्मात सैतान किंवा मार नाही. त्याचं स्वरूप फार वेगळं आहे. एक महत्त्वाचा फरक म्हणजे माणसाला मोहात पाडायला, तपश्चर्येपासून विचलित करण्यासाठी दुसरा कोणी लागत नाही; तर माणसाच्या मनातच लोभ, मोह, माया, आसक्ती असते. माणूसच स्वतःचा शत्रू असतो. ही कल्पना हिंदू धर्मात आहे. म्हणूनच आपले साधू, संत, महात्मे नेहमी सांगत असतात, की माणसाने स्वतःच आसक्ती आणि मोहापासून दूर राहावे. हिंदू माणसाचा झगडा असतो तो सैतानाशी नसून स्वतःशीच असतो. पण दुष्टात्मा, भूतंप्रेतं, राक्षस ही कल्पना हिंदूंमध्ये आहे. पण या लोकांचं माणसाशी वैर असतं, ते इहलोकी मिळणार्‍या सुखदु:खांशी जोडलेलं आहे. आध्यात्मिक मार्गाने जाणार्‍याला स्वतःच्या मनाशीच झगडा करावा लागतो."

"पण आपल्याकडे अप्सरा वगैरे आहेतच; ऋषीमुनींना मोहात पाडण्यासाठी."

"आहेत ना. त्यांना इंद्र पाठवतो. किंवा इतर देवांना जेव्हा या ऋषीमुनींची भीती वाटते तेव्हा ते इंद्राकडे जातात, विष्णूकडे जातात. आणि मग ते देव मोहिनीचं रूप घेतात किंवा स्वर्गातल्या एखाद्या अप्सरेला त्या ऋषीमुनींचा तपोभंग करण्यासाठी पाठवतात. त्यामागे हेतू असतो तो देवांच्या स्वार्थाचा. की अमुक ऋषीनं एवढं तप केलेलं आहे, की इंद्राला वाटतं त्याच्या तपामुळे माझं इंद्रपद जाईल; म्हणून तो अप्सरेला पाठवतो. किंवा ऋषी जेव्हा यज्ञयाग करायचे तेव्हा राक्षस येऊन त्यांचा यज्ञ उध्वस्त करून टाकायचे; कारण यज्ञ करून ऋषींना वर मिळतील, ते आपल्यापेक्षा वरचढ होतील म्हणून राक्षसांना भीती वाटायची. दुसरी एक गोष्ट आहे एका राक्षसाची, भस्मासुराची. त्यानं तपश्चर्येनं शंकराकडून वर मिळवला, की तो ज्यांच्या डोक्यावर हात ठेवेल ते ते लोक मरतील. शिवाय त्याला इतर कुणीही मारू शकणार नाही. हा वर मिळाल्यानंतर त्याने पृथ्वीवर अगदी हैदोस घातला. ज्याच्या त्याच्या डोक्यावर हात ठेवत त्याने मानवसंहार सुरू केला. तेव्हा सगळे लोक विष्णूला शरण गेले. मग विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं आणि नाचता नाचता त्या राक्षसाला आपल्या नादी लावलं आणि स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवायला लावला. आता या गोष्टीत अध्यात्माचा किंवा ज्ञानमार्गाला जाणार्‍याचा काहीही संबंध नाही.मनुष्य, राक्षस, दुष्टात्मे आणि देव यांचं भांडण आहे ते सत्तेसाठी. परम कोटीला जाऊ पाहणार्‍या माणसाला अडवण्यासाठी देव आणि दानव कोणीही येत नाही. हा फरक आहे हिंदू धर्म आणि इतर धर्मांत; सैतानाच्या किंवा मारच्या संदर्भात." बाई म्हणाल्या.

- oOo -

(तिरपा ठसा संवादक प्रतिभा रानडे यांच्या संभाषणासाठी)

(टीपः या विषयासंबंधी दुर्गाबाईंनी सुचवलेली पुस्तके गोळा करून प्रतिभा रानडे यांनी त्यांच्या आधारे- विशेषतः टी.ओ. लिंग लिखित 'बुद्धिझम अ‍ॅन्ड दि मायथॉलॉजी ऑफ इव्हिल'- या उतार्‍याला एक टिपण जोडून दिले आहे. ते आवर्जून वाचण्याजोगे.)

---

पुस्तकः ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी
लेखक/संवादकः दुर्गा भागवत/प्रतिभा रानडे
प्रकाशकः राजहंस प्रकाशन
आवृत्ती पाचवी (२००५)
पृष्ठे: १२०-१२२.


हे वाचले का?

वेचताना... : ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी

आपली रेघ मोठी करायची असेल तर शेजारची खोडून लहान करायला हवी, आणि शेजारी अशी रेघ नसेलच तर आपणच एक छोटी रेघ शेजारी ओढून आपली रेघ मोठी असल्याचा भास निर्माण करावा' हे माणसाला संस्कृतीच्या अगदी प्राथमिक अवस्थेत झालेलं ज्ञान आहे असं म्हणायला हरकत नाही. आजही एखाद्याच्या अवगुणाबद्दल बोला, त्याचे तर्क संपले, मुद्दा अंगाशी आला की तो हटकून आपल्याहून अधिक अवगुणी व्यक्तीला चर्चेत आणून त्याच्याआड लपू पाहतो, किंवा स्वतःच्या निरपेक्ष मोठेपणाऐवजी, सापेक्ष मोठेपणा तुमच्या गळी उतरवू पाहतो.

ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी

हे जितकं सामान्य व्यक्तींबाबत खरं आहे, तितकच राजकारणी, कलाकार, विशिष्ट कौशल्य अंगीकृत केलेल्यांबाबतही. धर्मसंस्थेने किंवा स्वयंघोषित प्रेषितांनी त्यांच्या अनुयायांनीही हे तंत्र आपल्या ज्ञानाच्या प्रसारासाठी यशस्वीपणे राबवले आहे. एखादी व्यक्ती 'कुणाला तरी हरवून जिंकली' आहे असं म्हटलं की जमावाच्या तिच्याबाबतचा आदर चटकन वाढतो आणि त्याचे म्हणणे जमाव आस्थेवाईकपणे ऐकतो. आता हे जिंकणे युद्धभूमीवरचे रक्तरंजित युद्ध असो किंवा बौद्धिक वितण्डाच्या स्वरूपातील. दोन्ही प्रकारात एक शत्रू हवा, त्याच्यावर मात करता यायला हवी.

पण हा जरा धोक्याचा मुद्दा आहे, कारण यात आपल्यालाही पराभवाला सामोरे जाण्याची शक्यता असते. यावर शब्दपंडितांनी एक सुरक्षित उपाय शोधून काढला आणि तो म्हणजे काल्पनिक शत्रू निर्माण करून त्याच्यावर आपल्या प्रेषिताने, नेत्याने, देवाने, धर्मासारख्या व्यवस्थेने विजय मिळाल्याच्या कपोलकल्पित कथा प्रसृत करायच्या. यातून आपल्या नेत्याची 'विश्वासार्हता' वाढते आणि जमाव त्याच्या शब्दाला प्रमाण मानून चालण्याची शक्यता कित्येक पट वाढते.

जगातील बहुतेक सर्व धर्मांमधे देवाच्या जोडीला एक अँटि-गॉड असतो. त्याचा रोल, त्याची भूमिका ही या छोट्या रेघेसारखी असते. त्याच्या शेजारी उभे राहिलेला आपला नेता जमावाला उंच भासत असतो, आणि तो म्हणेल तिकडे त्याच्या मागोमाग जाण्यास ते एका पायावर तयार होत असतात. जगात सर्वाधिक प्रसार झालेल्या बिब्लिकल धर्मात सैतान, इब्लिस वगैरे असतात, बौद्ध धर्मात बुद्धाला तत्त्वच्युत करू पाहणारा 'मार' असतो, हिंदू धर्मात असा 'एकास एक' सामना नसला - याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदू धर्मच अनेकेश्वरवादी आहे - तरी ऋषीमुनींचा तपोभंग करणार्‍या मायाविनी अप्सरा असतात, यज्ञसंस्कृतीच्या उपासकांचे यज्ञ उद्ध्वस्त करणारे असुर असतात. थोडक्यात श्रेष्ठत्वाचा मापदंडच मुळी 'शेजारच्या लहान रेघेहून मोठा' असा असतो.

आमच्या गणितात आवश्यक (Necessary) आणि पुरेशी(Sufficient) अशा दोन संबंधातून कार्य नि कारण यांच्यातील एकास-एक परस्परसंबंध सिद्ध केला जातो. वरील तर्काचा विचार केला तर शेजारची छोटी रेघ ही बर्‍याच अंशी आवश्यक गोष्ट होती, पण ती पुरेशी नसे. त्या पलीकडे जाऊन नेत्याचे, प्रेषिताचे श्रेष्ठत्व स्वतंत्रपणे सिद्ध करणारे कर्तृत्व समोर ठेवावेच लागे. परंतु स्पर्धा व्यवस्थेला यशाची गुरुकिल्ली म्हणून सादर करणारी भांडवलशाही अवतरली आणि श्रेष्ठ अथवा गुणवान असण्यापेक्षा इतर सर्व स्पर्धकांपेक्षा पुढे असणे यशस्वी होण्यास पुरेसे ठरू लागले. थोडक्यात छोट्या रेघेपेक्षा आपली रेघ मोठी असणे केवळ आवश्यक न राहता पुरेसेही ठरू लागले

एकदा हे घडले की छोटी रेघ मोठी झाली तर आपली रेघही कष्टाने मोठी करावी लागते हे ध्यानात आले तसतसे सोपा उपाय म्हणून छोटी रेघ आणखी छोटी करण्याचे उपाय शोधले जाऊ लागले. त्यासाठी माध्यमांचा यथास्थित वापर सुरू झाला.

आता थोडे मागे गेलो तर लक्षात येईल की धार्मिक आणि राजकीय इतिहास लेखकांनी तरी याहून वेगळे काय केले आहे? त्यांनी आपला प्रेषित, नेता, राजा, सम्राट श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या विरोधकांना अधिकाधिक काळ्या रंगात रंगवून वाचकांसमोर ठेवले नाही? आज गल्लोगल्ली उगवून आलेले इतिहासलेखकांचे एरंड तोच कित्ता गिरवत इतिहासाचे चक्र उलट दिशेने फिरवू पाहात नाहीत? गेलाबाजार राजकारणात प्रस्थापित होऊ पाहणारे प्रथम कुण्या लेखकाच्या, चित्रकाराच्या, नाटककारच्या डोक्यावर पाय देऊन त्याची रेघ छोटी म्हणून माझी मोठी हा दावा करत नाहीत? एकदा शिरकाव झाल्यावर राजकारणाची शिडी चढून जाताना, आपले कर्तृत्व वाढवत नेण्याऐवजी इतरांना खेचून खाली ढकलण्याचा सोपा मार्ग चोखाळत नाहीत?

ही सुमारांची सद्दी अधिकाधिक आक्रमक होत असताना एखाद्या व्यवस्थेवर, मुद्द्यावर, व्यक्तीवर, विचारव्यूहावर टीका करण्यासाठी आणि त्यांचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे असे समजणारे नि त्यासाठी आयुष्याचा मोठा भाग खर्ची घालणारे अभ्यासक ही जमात अस्तंगत होत जाताना दिसते यात नवल नाही.

महाराष्ट्रात मराठी भाषेमधे अर्वाचीन काळात 'विदुषी' हे विशेषण खर्‍या अर्थाने सार्थ करणार्‍या दुर्गाबाई भागवत यांच्या अभ्यासाचा आणि विचाराचा परीघ अतिशय विस्तृत होता. अभ्यासकांमधे बहुतेक वेळा विचाराची अथवा अभ्यासाची व्याप्ती अधिक असलेले किंवा (मोजक्याच विषयात) खोली अधिक असलेले असे दोन प्रकार दिसतात. पण एकाच वेळी धर्माचा, तत्त्वज्ञानाचा, साहित्याचा अभ्यास करत असतानाच अस्वल या एकाच प्राण्यासंदर्भातील विविध परंपरातील दंतकथा अथवा संकेतांचा अभ्यास करून त्यावर एक पुस्तकच लिहिणार्‍या दुर्गाबाई एकाच वेळी या दोनही गटात बसतात.

बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजी अनुवादांवर अवलंबून न राहता पाली भाषा शिकून मूळ ग्रंथांच्या आधारे त्यांनी त्याचा अभ्यास केला. अभ्यासकाची इतकी तीव्र बांधिलकी आज दुर्मिळ झाली आहे. केवळ त्या एका धर्माचा अभ्यास करून न थांबता त्या अनुषंगाने त्याचा भारतातील समाजजीवनावर असलेला प्रभाव, हिंदू परंपरा आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा परस्परसंघर्ष आणि सहकार्य, बौद्ध धर्मातून उगम पावलेल्या विविध परंपरा यांचा अभ्यास करताना त्या थेट डॉ. आंबेडकरांनी स्वीकारलेल्या बौद्ध धर्मापर्यंत पोहोचतात.

यातील कोणत्याच धर्माचा वा परंपरेचा एकांगी उदोउदो किंवा थेट चिरफाड करणे अशा टोकाच्या भूमिका त्या घेत नाहीत. आज ही विचक्षण दृष्टी दुर्मिळ आहे. धर्मसंस्थेबद्दल लिहायचे ते केवळ समर्थन करण्यासाठी किंवा त्यातील न्यून चव्हाट्यावर आणण्यासाठी इतकेच आपल्याला समजते. गल्लोगल्ली अभ्यासाविना झालेले अभ्यासक अशा तथाकथित वैचारिक लेखनाच्या काँग्रेस गवताची रुजवणूक करत आहेत. जे पटते त्याचे हातचे राखून न ठेवता कौतुक करायचे नि जे पटत नाही त्यावर निर्भिडपणे टीका करायची, अशी ताठ कण्याची भूमिका घेणार्‍या बाईंच्या इतका समतोल अभ्यास क्वचितच कुणी केला असेल.

अर्थात याचा अर्थ असा नव्हे की त्यांची मते तुम्हाला पटली पाहिजेत. (किंबहुना अनेकदा त्यातील आग्रहीपणा, ठामपणा, लवचिकतेचा अभाव खटकेलच!) खरं तर विचारपूर्वक भूमिका घेणार्‍याच्या बाबत उलट न पटण्याची शक्यताच अधिक कारण बहुसंख्या ही विचारापेक्षा बांधिलकीला (जातीय, धार्मिक, विभागीय, कौंटुंबिक, भाषिक इ.) अनुसरून निवड करणारीच असते.

कालानुरूप अभ्यासविषयाचे संदर्भही बदलतात. आज सर्वसामान्यांच्या मनात बौद्ध धर्म हा बुद्धापेक्षाही डॉ. आंबेडकरांच्या संदर्भात अधिक निगडित आहे. त्याबरोबर त्याला अस्मितेचे अस्तरही चिकटले आहे. त्याचवेळी उधाणलेल्या तथाकथित हिंदुत्ववादाने हिंदू धर्माचे जणू अपहरण करून आपणच त्याचे ठेकेदार असल्याची द्वाही फिरवली आहे. अशा वेळी या दोन धर्मांचा साधकबाधक विचार करणे, त्यातील मूल्ये पडताळणे, तुलना करणे त्याबाबत काही भाष्य करणे हे शत्रू-मित्रांचे मोहोळ उठवणेच ठरते. या गदारोळात साक्षेपी अभ्यासक नावाची जमात केव्हाच परागंदा झालेली आहे.

पण केवळ अभ्यासक, विचारवंत यापलीकडे त्यांची एक महत्त्वाची ओळख आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात व्यक्तिस्वातंत्र्याची पहिली गळचेपी म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या आणिबाणीच्या विरोधात सर्वप्रथम जाहीरपणे रणशिंग फुंकणार्‍या रणरागिणी अशीही त्यांची ओळख आहे. आणिबाणी-विरोधातील त्यांच्या घणाघाती भाषणानंतरच महाराष्ट्रातील साहित्यिक, विचारवंत यांनी आणिबाणीच्या विरोधात जाहीर आणि मुख्य म्हणजे सक्रीय भूमिका घेतली त्याचे श्रेय निर्विवादपणे बाईंचेच.

अशा चतुरस्र अभ्यासकाशी होणार्‍या अनौपचारिक गप्पाही सुखद आणि माहितीप्रद असतात असा अनुभव अशा व्यक्तींच्या आसपास असणार्‍यांना येतच असतो. अनेकदा असं वाटतंही की अरे हे असं अनौपचारिक बोलणं कुठे तरी नोंदवून ठेवायला हवं. कारण या संवादात औपचारिकता नसते, विचाराची चौकट नसते, शब्दसंख्येची मर्यादा नसते, प्रतिक्रियेची अपेक्षा अथवा भीती नसते, काटेकोरपणाची आवश्यकता नसल्याने पुराव्याखेरीज एखाद्या तर्कसंगत शक्यतेबाबत बोलता येते, लिखित स्वरुपात समोर येणार्‍या विचारांप्रमाणे बंदिस्तपणा नसतो. आणि म्हणूनच अनेकदा हा संवाद अधिक आनंददायी आणि समाधान देणारा असतो. यातून मुलाखत हा एक प्रकार पुढे आला.

पण माध्यमांनी जसजसे जगण्यातील प्रत्येक गोष्टीचे वस्तुकरण आणि एकसाचीकरण सुरू केले तसतशा या मुलाखतींचा कार्यक्रम हास्यास्पद होत गेला. मुलाखत घेणार्‍याला जणू काही समज असायची गरजच नाही. एका चॅनेलवरील साहित्यासंबंधीच्या चर्चेत वृत्तनिवेदिकाच मुलाखतकार म्हणून समोर आलेली पाहून मी कपाळाला हात लावला होता. तिला त्या कार्यक्रमाबद्दल इतकी 'आस्था' होती की कार्यक्रम सुरु होण्यागोदर जेमतेम एक तास आधी तिने माझ्याशी संपर्क साधून आपण काय बोलू शकतो याची तब्बल अडीच मिनिटे 'चर्चा' केली.

नव्या जगात उगवलेल्या 'मॅनेजमेंट' नावाच्या विषयाने जगण्यातल्या सार्‍याच गोष्टी या आनंद घेण्यासाठी नव्हे तर 'मॅनेज करण्यासाठी' असतात, त्यांचा इव्हेंट करण्यासाठी असतात, त्या 'संपन्न करण्यासाठी' असतात ही धारणा पुरेपूर रुजवली आहे. सोबतच 'जागा भरण्यासाठी' अशा गोष्टी केल्या जात असल्याने मागणी भरपूर. त्यामुळे हल्ली या मुलाखती - संवाद नव्हे - म्हणजे सुमार मुलाखतकार (ज्यांच्याकडे बहुधा वट्ट दहा प्रश्नांची चेकलिस्ट असावी, जी ते प्रत्येक मुलाखतीसाठी वापरत असावेत) आणि सुमार 'विचारवंत/ कलाकार/ अभ्यासक' अशी स्थिती असते.

त्यातल्या त्यात हसतखेळत मुलाखत घेणारा ग्रेट मुलाखतकार (हा शब्दच बोचतो) मानला जातो, तो रोल मॉडेल म्हणून पाहिला जातो. अतिशय गंभीर विषयावरील नाटक अथवा सिनेमातही पहिली संधी मिळताच दात दाखवणार्‍या, 'सस्त्यात मनोरंजन हवे बुवा' म्हणणार्‍या बहुसंख्य समाजाच्या मानसिक स्थितीलाही ते मानवणारं असतं. अशा वेळी मुलाखत घेणार्‍याची त्या तज्ज्ञाशी, कलाकाराशी, विचारवंताशी, अभ्यासकाशी बोलण्यासाठी किमान काही पात्रता असायला हवी असं म्हटलं तर 'हे काय आणखी नवीन' अशी बहुतेकांची प्रतिक्रिया येईल. हे असं का म्हटलो हे समजण्यासाठीच 'ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी' हे पुस्तक वाचायला हवे.

प्रतिभा रानडे यांची ज्या प्रकारे दुर्गाबाईंना बोलते केले आहे, प्रसंगी एखादा मुद्दा विस्तारपूर्वक यावा म्हणून स्वतःही नेमकी भर घातली आहे (चॅनेलवरच्या बोलभांड निवेदकाप्रमाणे आपली अक्कल न पाजळता), कुठे बाईंच्या चतुरस्र बुद्धिमत्तेमुळे भरकटणारा मुद्दा पुन्हा जागेवर घेऊन आल्या आहेत. हे पाहणे आनंददायी आहे. अशा संवादात त्यांचे स्थानही किती महत्त्वाचे आहे हे जाणवते. नेमके बोलू शकणारा मुलाखतकार/ संवादक त्या संवादाला कुठल्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो याचा वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखन निव्वळ संवादापुरते मर्यादित नाही. अधेमधे दुर्गाबाईंनी दिलेले संदर्भ शोधून प्रतिभा रानडे यांनी त्याआधारे बाईंच्या मुद्द्यांचे जागोजागी विस्तार करून ते पुस्तकात समाविष्ट केल्याने त्या दस्तऐवजीकरणाला अधिकच परिपूर्णता येते आहे.

या दीर्घ संवादात बाईंनी संस्कृती, स्त्रीवाद, मिथ्यकथा, साहित्य, श्लील-अश्लील वाद (भाऊ पाध्ये यांच्यावर अश्लीलतेच्या झालेल्या आरोपांच्या वेळी बाईंनी श्लील-अश्लीलता ही संदर्भातच असते अशी त्यांच्या बाजूने सडेतोड भूमिका घेतली होती, ज्याबद्दल अत्रेंनी त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली होती हे जाताजाता सांगायला हरकत नाही.), त्यांचा अभ्यासविषय असलेला बौद्ध धर्म, त्यांचे स्वतःचे साहित्य, मृत्यू इ. अनेक विषयांवर आपली मते व्यक्त केली आहेत. प्रतिभा रानडे यांनी त्यांना त्यावर अतिशय नेमके प्रश्न विचारत, कधी स्वतः संदर्भ पुरवत, कधी आपल्या माहितीची, मतांची जोड देत एक संग्राह्य दस्तऐवज या पुस्तक रूपात आपल्या समोर ठेवला आहे.

( या पुस्तकातील एक वेचा :http://vechitchaalalo.blogspot.com/2017/04/AispaisGappaa.html)


हे वाचले का?

बुधवार, २९ मार्च, २०१७

वेचताना... : तुघलक

'महंमद बिन तुघलक' हे नाव ऐकले की मूठभर भारतीय वगळले तर बहुतेकांच्या चेहर्‍यावर एक कुत्सित हास्य उमटेल. (या अपवादांची बांधिलकीही वैचारिक असण्यापेक्षा धार्मिक असण्याची शक्यताच अधिक आहे.) 'तुघलकी निर्णय' असा वाक्प्रचार वापरला जातो तो प्रामुख्याने माथेफिरूपणे, सारासार किंवा साधकबाधक विचार न करता, संभाव्य परिणामांचा अंदाज न घेतलेल्या निर्णयाबद्दल. आणि याला संदर्भ असतो तो तुघलकाने आपल्या सुलतानी कारकीर्दीत घेतलेल्या दोन निर्णयांचा.

तुघलक

पहिला म्हणजे आपल्या राज्याची राजधानी ही दिल्लीहून देवगिरी (त्याचे दौलताबाद असे नामकरण करून) येथे आणणे आणि चामड्याची नाणी सुरू करण्याचा दुसरा! दोनही निर्णय साफ फसले हे त्याच्या आयुष्यातच त्याच्या ध्यानी आले आणि त्याने सरळ ते मान्य करून त्या दोनही चुका, भरपूर किंमत देऊन, दुरुस्तही केल्या.

परंतु तब्बल पंचवीस-सव्वीस वर्षे सुलतान असलेल्या या तुर्की शासकाची एवढीच ओळख आपल्यासमोर येते. आजच्या बलुचिस्तानचा आणि 'खैबर-पख्तुनवा'चा थोडा भाग वगळून सारा पाकिस्तान, दक्षिणेला केरळ तसंच तमिळनाडूचा अगदी थोडा भाग आणि उडिशा, झारखंड, छत्तीसगड वगळता सारा भारत - बांग्लादेशासह! - इतक्या विस्तीर्ण साम्राज्याचा हा सुलतान! शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांतूनही मुघल साम्राज्याचा इतिहास तपशीलाने शिकत असताना भारतातील या तुर्की साम्राज्याबाबत मात्र अगदीच त्रोटक माहिती दिलेली दिसते.

हा व्यक्ती म्हणून कसा होता, त्याच्यासमोरची आव्हाने कशी होती, त्याने घेतलेल्या या 'तुघलकी' निर्णयांमागची कारणमीमांसा काय होती, ते का फसले याचे विश्लेषण त्याने केले इतपत भानावर असलेला सुलतान जर तो असेल तर त्याची निर्णयपद्धती कशी होती असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. कारण 'एक मुस्लिम शासक म्हणजे क्रूरकर्मा, या हिंदू देशाला मुस्लिम करून सोडण्यासाठीच आलेला, त्याच्यात काय गुण असणार?' असे 'संस्कार' आपल्यावर पहिल्यापासून असतात. वस्तुनिष्ठता, चिकित्सा हे गुण या देशात कवडीमोलाचेच असतात. 

आजचे जग हे ’पोस्ट-ट्रूथ'चे आहे असे ट्रम्प-विजयानंतर अमेरिकेत बोलले जाऊ लागले आहे. भारत मात्र सदैव पोस्ट-ट्रूथच्याच जगातच होता आणि भविष्यातही राहणार आहे. त्यामुळे इथे 'गिव एव्हरी डेविल हिज ड्यू' हे वाक्य फक्त सुभाषितच असते, जे अर्थातच अंमलात आणायचे नसते, 'आपल्या धारणा, पूर्वग्रह, भावना नि अस्मितांच्या चष्म्यातूनच जग पहायचे असते' ही बाळगुटी प्रत्येक भारतीय बाळाला त्याच्या आईबापांनी पाजलेली असते, मोठेपणीही पाजतच राहतात.

तुघलकाने हे जे दोन निर्णय घेतले ते खरंच एक काहीतरी वेगळे करण्याची लहर म्हणून (तसं असेल तर तुघलक आजच्या भारताचा शासक म्हणूनही शोभला असता असं वाटून जातं. काहीतरी वेगळं केलं की ते व्याख्येनुसारच योग्य नि फलदायी असतं असा ठाम विश्वास आजही बर्‍याच भारतीयांमधे रुजलेला दिसतो.) की त्यामागे काही विचार होता? दिल्ली ही राजधानी म्हणून त्याला का अयोग्य किंवा गैरसोयीची वाटत होती? दिल्ली त्याच्या साम्राज्याच्या सीमेजवळ तर देवगिरी ही मध्यवर्ती हा भौगोलिक फायदा तर होता. पण त्यापलीकडे आणखी काही विचार होता का जेणेकरून त्याने साम्राज्यातील अनेक व्यक्ती आणि संस्थांसह उचलून दक्षिणेत आणण्याचा खटाटोप करावासा वाटला? 

त्याला सोने आणि चांदी सोडून चामड्याची नाणी का पाडावीशी वाटली? आपण आज वापरतो त्या चलनाचा कागद तर त्या चामड्यापेक्षाही कवडीमोलाचा असतो हे ध्यानात घेतले तर त्याची ही कृती अगदीच मूर्खपणाची म्हणता येणार नाही. मग चामड्याचे चलन आणण्याचा त्याचा प्रयत्न का फसला? 

बरं त्याकाळीच काय आजतागायत कुण्याही शासकाने केली नसेल अशी आपली चूक मान्य करून ती सुधारण्याची दुर्मिळ कृती करण्याचे धैर्य नि प्रामाणिकपणा त्याच्यात असेल तर असा शासक 'वेडा महंमद' म्हणून हिणवून सोडून देता येईल का? आज केवळ अस्मिता-विद्रोहाचे साधन म्हणूनच उरलेला इतिहास खरंच समजून घ्यायचा असेल त्याला हे प्रश्न निश्चितच पडायला हवेत. याच प्रश्नांच्या अनुषंगाने कार्नाडांचा तुघलक उभा आहे.

तुघलक हे कार्नाडांचे पात्र काळ्या-पांढर्‍या रंगाचे अक्षरशः एकजीव मिश्रण म्हणावे इतके करडे आहे. केवळ भूभाग जिंकणे नि राज्य करणे एवढाच त्याचा उद्देश नव्हता. त्या पलीकडे जाऊन जनतेच्या हिताचा 'विचार' तो करत होता. यात निव्वळ वारशाने मिळालेल्या संस्कार-विचारांपलीकडच्या, (त्याच्या) परंपरेने स्पर्धकच नव्हे तर 'काफिर' मानलेल्या विचारधारांचाही अभ्यास तो करत होता. भिन्न उपासनापद्धती असलेल्यांच्या सहजीवनाबद्दल त्याच्याकडे ठोस उपाय नसले, तरी त्या दृष्टीने त्याची धडपड होती. असे असूनही एक सुलतान म्हणून इतिहासात अमर होण्याची त्याची महत्वाकांक्षाही धारदार होती. 

एकीकडे राज्याकडे दुर्लक्ष होऊ नये या हेतूने अन्य सर्व बंधनापासून मुक्त राहण्याच्या उद्देशाने अविवाहित राहून केवळ राज्यकारभाराकडे लक्ष केंद्रित करत असतानाच आपल्या वैचारिक आणि लष्करी विरोधकांना दडपून टाकण्यासाठी आवश्यक ते निष्ठुर उपाय योजायला तो कमी करत नसे. थोडक्यात मॅकियावेलीच्या व्याख्येनुसार तो एक आदर्श राजा होता.

एका बाजूने त्याने प्रत्येक पाक मुस्लिमाने पाच वेळा नमाज पढलीच पाहिजे अशी सक्ती केली होती, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी खास नोकर नेमले होते तर दुसरीकडे 'हिंदूंनी जिझिया कर देऊ नये' असा आदेश काढला होता. 'तू हिंदू असलास तरी माणूसच आहेस' असे म्हणणारा मुस्लिम सुलतान अनेक मुस्लिमांना पसंत नव्हताच. 

त्यातच न्यायव्यवस्था ही इतकी स्वतंत्र असली पाहिजे की खुद्द सुलतानाविरुद्ध तिथे दाद मागता आली पाहिजे असा त्याचा दावा होता. कुण्या विष्णूप्रसादची जमीन सुलतानांनी अन्यायकारकरित्या ताब्यात घेतल्याबद्दल त्याला जमीनीसह पाच हजार दिनार दंड सुलतानांनी द्यावा असा निर्णय त्याने नेमलेल्या काझीनेच दिला होता. 

सुलतानाचे विरोधक अर्थातच हा सुलतानांनी आपली सहिष्णुता जनतेच्या मनात ठसवण्यासाठी घडवून आणलेला बनाव आहे असा दावा करत होतो. पुढे 'त्याच्या विरोधात सच्च्या मुस्लिमांनी बंड करावे' अशी चिथावणी देणार्‍या इमामुद्दिन या अवलियाचे ते बंड त्याने त्याचीच विश्वासार्हता संपुष्टात आणून कसे मोडले याचा किस्सा पाहता ही शक्यता म्हणून नाकारता येत नाहीच.

त्याचे व्यक्तिमत्व अशा विरोधाभासाने भरलेले आहे. तो सहृदयी आहे, तो कठोर आहे, त्याचे आपल्या सावत्र आईवर सख्ख्या आईपेक्षाही अधिक प्रेम आहे. पण तीच आई आपल्याविरुद्ध कट करते आहे हे तात्काळ समजावे इतपत बारीक लक्ष तिच्या हालचालीवर ठेवून आहे, तसे सिद्ध होताच तो तिला क्षमा न करता निष्ठुरपणे शिक्षा देतो आहे. तीच गत त्याच्या बालमित्राचीही होते आहे. सच्च्या मुस्लिमांना 'जिहाद' ची हाक देऊन त्याच्या विरोधात बंड करणार्‍यांना तो हिंदू एकनिष्ठ सैनिकांच्या सहाय्याने नामोहरम करतो, त्याचवेळी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा देखावा करत, वास्तवात तो हिंदू दुय्यम नागरिक असल्याची त्यांची जाणीव जिवंत ठेवतो आहे.

या नाटकातला खाली निवडलेला प्रवेश त्याचे अंतर्विरोधांनी भरलेले व्यक्तिमत्व पुरेपूर समोर आणणारा. ज्याच्या मनात तुघलकाबद्दल काही पूर्वग्रह नाहीत (हे त्याचा धर्म आणि त्याच्याबद्दल प्रचलित धारणा यामुळे जवळजवळ अशक्यच दिसते) त्याला यात तुघलकाचे व्यामिश्र व्यक्तिमत्व दिसेल. ज्याला ते एकरंगी दिसेल त्याने आपण बव्हंशी एकांगी विचाराचे आहोत हे समजून चालावे. यात तुघलक दिसतो तो धूर्त, सावध राजकारणी. आपल्या विरोधात धर्माच्या नावावर लोकांना चिथावणार्‍या इमामुद्दिनचे आव्हान पेलणारा, नव्हे त्या आव्हानाला आपल्याच फायद्यासाठी वळवून घेण्याइतका पाताळयंत्री.

इमामुद्दिनच्या मागे धर्माच्या नावाचे पाठबळ आहे, तेव्हा त्याच्या बाबतीत दंडात्मक कारवाई करण्याने उलट तो अधिकच मोठा होत जाईल हे त्याने पुरेपूर ओळखले आहे. आपल्या विरोधात भाषणे करणार्‍याचे भाषण स्वतःच आयोजित करून तो भावनिक आणि चंचल बुद्धीच्या जनतेच्या मनात त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण करून त्याची विश्वासार्हता डळमळीत करण्याचा डाव तो खेळतो. सुदैवाने त्याने टाकलेला हा फासा त्याला अनुकूल पडतो, निदान तो तसा पडला हे इमामुद्दिनच्या मनावर ठसवण्यात तो यशस्वी होतो.

दिल्लीचे लोक या भाषणाला येऊ नयेत म्हणून त्याचे सैनिक सर्वांना धमकावत होते असा आरोप त्याचे विरोधक पुढे करतात. तेव्हा भाषण आयोजित करणे हा कानपूर गाजवून आलेल्या इमामुद्दिनला 'दिल्लीत तुला काही किंमत नाही' हे अप्रत्यक्षपणे सांगून त्याचा आत्मविश्वास खच्ची करण्यासाठी केलेला बनावही असू शकतो... 'असू शकतो' असेच आपण म्हणू शकतो. कारण या संवादात इमामुद्दिन जे आरोप करतो त्यातही तथ्य दिसते, तर खुद्द तुघलकाचे संभाषण विश्वासार्ह, सच्चे, प्रामाणिक भासते. त्यामुळे या आरोप-प्रत्यारोपांच्या झडीमध्ये विरोधकांचे आरोप खरे की तुघलकाची राज्याप्रती दिसणारी कळकळ खरी यात आपण गुदमरून जातो. 

एका बाजूने इमामुद्दिनच्या पाठीशी केवळ धर्माचे पाठबळ आहे पण त्याच्याकडे राज्यासंबंधी कोणतीही ठोस योजना नाही. आहे ती व्यवस्था उधळून देणे इतकेच त्याचे मर्यादित उद्दिष्ट आहे. कुठल्यातरी पुस्तकात जगण्याच्या सार्‍या प्रश्नांची उत्तरे आहेत असे समजणारा खुजा जीव आहे तो. त्याची धर्माप्रती निष्ठा अतूट आहे आणि म्हणून त्याला बाध आणणारे तुघलकाचे वर्तन नि निर्णय निषेधयोग्य असून तो सुलतान असला तरी त्याच्या विरोधात बोलले पाहिजे इतका निर्भय तो आहे. 

पण दुसर्‍या बाजूने या निर्भयतेला राजकारणाच्या समजुतीची जोड मात्र नाही. म्हणूनच तुघलक धूर्त कोळ्याप्रमाणे त्याच्याभोवती फास आवळत जाताना दिसतो. सत्ता टिकवायची तर धर्माला नाकारता येणार नाही हे तुघलकाला पुरेपूर ठाऊक आहे. पण तरीही त्याच्या राज्यव्यवस्थेच्या व्हिजनमधे धर्माला स्थान नाही. पण हे जाहीर मान्य न करण्याचे भान तो राखतो आहे. जसे इमामुद्दिनला आपल्या धर्माच्या श्रेष्ठ व्यवस्थेबाबत अभंग अशी खात्री आहे, तशीच तुघलकाला त्याच्या सर्वसमावेशक राज्याबद्दल. दोघांमधील दिसण्याचे साम्य हा मुद्दा कार्नाडांनी वापरला आहेच तो या साम्याला सूचित करण्यासाठीच असावा.

पण या दोघांत एक महत्त्वाचा फरक आहे. आणि तो म्हणजे इमामुद्दिन पुरेसा धूर्त नाही. आपल्या भाषण कौशल्याने त्याने जनतेला सुलतानाच्या विरोधात भडकावले आहे नि त्याचा परिणाम कानपूरमधे अनुभवून तो पुढे आला आहे. आपल्या शब्दाची ताकद प्रचंड आहे या भ्रमात तो आहे. परिस्थिती, भूगोल आणि व्यक्ती बदलल्या की धोरण बदलावे लागते याचे भान त्याला नाही

याउलट इमामुद्दिन, शहाबुद्दिन, आइने उल्मुल्क आणि आपली सावत्र आई या आपल्या विरोधकांना संपवण्याचे हत्यार वेगवेगळे असायला हवे याची तुघलकाला अचूक जाण आहे. इमामुद्दिनच्या धर्मनिष्ठेचाच फास बनवून तो त्याच्याच गळ्यात अडकवतो. इमामुद्दिनलाच आपला सदिच्छा दूत म्हणून पाठवण्याची त्याची चाल दुहेरी आहे, आइने उल्मुल्क आणि इमामुद्दिन या दोघांनाही वठणीवर आणण्याची. 

यात इमामुद्दिनचा बळी जातो, त्यातून आइने उल्मुल्कबाबत जनतेत प्रतिकूल भावना तयार होते आणि या दोघांचेही काटे तुघलकाच्या वाटेतून अलगद दूर होतात.

( या नाटकातील एक वेचा :http://vechitchaalalo.blogspot.com/2017/03/Tughlaq.html)


हे वाचले का?