बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

वेचताना... : वीरभूषण, ग्लाड आणि आपण

एखाद्या पुस्तकातील वेचे इथे समाविष्ट करत असताना काही वेळा त्या वेच्याबाबत, पुस्तकाबाबत अथवा त्याचा धागा पकडून केलेल्या स्वतंत्र विचार-विश्लेषणावर आधारित ’वेचताना’ या मालिकेतील लेख इथे लिहित असतो. ’थॅंक यू, मि. ग्लाड’ या कादंबरीतील वेचे इथे शेअर करताना ’वेचताना...’ हा जोडलेखही शेअर केला आहे. परंतु मला तो थोडा अपुरा वाटतो आहे.

हा लेख प्रामुख्याने ती कादंबरी, लेखक आणि तिचे अन्य कलाकृतींमध्ये दिसलेले प्रतिबिंब याभोवतीच केंद्रित आहे. त्यामध्ये ग्लाड या पात्राच्या मनोभूमिकेकडे मी अधिक बारकाईने पाहिले आहे. त्या कादंबरीकडे नि त्यातील दोनही प्रमुख पात्रांकडे तुम्ही-आम्ही कसे पाहावे याबाबत त्यात काही लिहिलेले नाही. त्या कादंबरीची आणि त्यावर आधारित नाटकाचा जनमानसावर तत्कालीन समाजावर पडलेला प्रभाव पाहता त्याबाबत स्वतंत्रपणे लिहिणे मला आवश्यक वाटले.

कादंबरी वाचत असताना त्यातील वीरभूषण पटनायक या कैद्याच्या (नक्षलवाद्याच्या) ताठ कण्याच्या व्यक्तिमत्वाचा वाचकाच्या मनावर प्रभाव पडत जातो. ’वेचताना...’ या जोडलेखामध्ये म्हटल्याप्रमाणे यातील संघर्ष आहे तो ताठ मानेचा ग्लाड आणि ताठ कण्याचा वीरभूषण यांच्यातला. अखेरच्या प्रसंगामध्ये जेलर ग्लाड त्याचे श्रेष्ठत्व अप्रत्यक्षपणे मान्य करतो असा उतावळा निष्कर्ष काढला जाऊ शकतो- काढला गेला. त्यातून नकळत वीरभूषण या पात्राचे उदात्तीकरणही झाले.

यातून झालं असं की एखाद्या एकांगी विचाराच्या व्यक्तिमत्वावर मानवी वृत्तीचा शेंदूर लावून त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी या व्यक्तिमत्वाने एक आराखडाच (template) देऊ केला. ’वेचताना...’ लेखात उल्लेख केल्याप्रमाणॆ महात्मा गांधीच्या खुन्याचे समर्थन करण्यासाठी याच नाटकावर हिंदुत्ववादी संस्करण करुन रंगभूमीवर आणण्यात आले. आजच्या प्रचार-लढाईच्या कालखंडात भानावर राहणे किती मोलाचे आहे हे आपण सर्व जाणतोच. त्यामुळे या कादंबरी/नाटकाकडे अधिक वस्तुनिष्ठपणे पाहणे, भारावून न जाणे हे महत्त्वाचे ठरते.

थँक यू, मिस्टर ग्लाड

’थॅंक यू मि. ग्लाड’च्या शेवटाकडे झुकताना ’वीरभूषण हा आपला शत्रू असला तरी आपल्या विचारांवर निष्ठा असणारा, त्यासाठी सर्वस्व झोकून देणारा आहे, त्या अर्थी क्रांतिकारक आहे’ अशी जाणीव ग्लाडला होते. म्हणूनच एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्याला फाशी न देतात क्रांतिकारकाला साजेसा मृत्यू तो देऊ करतो. आणि यातून वाचकाला वीरभूषणबाबत निर्माण झालेली सहानुभूती अधिक गाढ होत जाते. पण...

...’हा विचार ग्लाडचा आहे’(!) हे विसरून चालणार नाही! म्हणजे असं पाहा, की वीरभूषणने सात-आठ व्यक्तींची हत्या केली आहे, पण ती त्याच्या वैचारिक निष्ठेतून केली आहे असे त्याचे म्हणणे आहे. आणि जेलर ग्लाडलाही अखेरीस - परिस्थितीवश - मान्य झालेले दिसते. ग्लाड असा विचार करु शकतो, कारण ज्यांच्याशी आपले प्रत्यक्ष वैर वा संघर्ष नाही अशांप्रती एकतर्फी शारीरिक हिंसा हे त्याच्याही दृष्टीने स्वसत्ता प्रस्थापित करण्याचे अथवा राबवण्याचे वैध हत्यार आहे. तेव्हा आपल्या निष्ठेसाठी विरोधी बाजूंच्या काही जणांवर अत्याचार झाले तर त्यात काही गैर नाही, असाच त्याचाही समज आहे... आपल्या आसपासच्या बहुसंख्येचाही असतो! त्यामुळे जेलर ग्लाड ’पाशवी वृत्ती तीच, फक्त वैचारिक भूमिका वेगळी ’ असणार्‍या वीरभूषणकडे तो ’मला न पटणार्‍या’ विचारांचा क्रांतिकारक’ म्हणून पाहू शकतो.

ग्लाड ’बळी तो कान पिळी’ याच विचाराचा असला, तरीही वीरभूषणने त्याच्यातील विचाराला जागवले आहे, उपकृतही केले आहे. म्हणून तो असा विचार करु शकतो. एरवी विरोधकांवर मात करण्यासाठी ’पुरा तयांचा वंश खणावा’ वृत्तीचा एखादा अतिरेकी मानसिकतेचा हिंदुत्ववादी नक्षलवाद्यांबद्दल असा विचार करु शकेल? किंवा उलट दिशेने एखादा नक्षलवादी अशा हिंसाप्रेमी हिंदुत्ववाद्याबद्दल असा विचार करु शकेल? विशिष्ट वैचारिक दृष्टिकोन असणार्‍यांचे सोडा, तुमच्या-आमच्यासारखे वैचारिकतेचा केवळ झेंडा खांद्यावर मिरवणारे, एरवी वैचारिकतेमधील री पहिली की दुसरी हे ही माहित नसणारे हे करु शकतील का?

माझ्यापुरते याचे उत्तर नकारार्थी आहे. कारण माझ्या विचारांचे पोषण लोकशाही मूल्यांवर झाले आहे. आणि माझ्या दृष्टीने ती मूल्ये म्हणजे डाव्यांप्रमाणे वा हिंदुत्ववाद्यांप्रमाणे 'मला हवी तशी हुकूमशाही प्रस्थापित होईतो- नाईलाजाने घालावी लागणी टोपी' नाही. तिच्यातील दोष मान्य करुनही ती मला निर्विवादपणे स्वीकारार्ह असलेली व्यवस्था व विचारसरणी आहे.

निरपवाद, निरपेक्ष अशी न्यायाची कोणतीही कल्पना या जगात अस्तित्वात नसते! जो तो आपल्याला अभिप्रेत व्यवस्थेला अनुसरूनच न्याय-संकल्पना मांडत असतो. वीरभूषणने तेच केले आहे नि ग्लाडनेही. मी ही माझ्या व्यवस्थेला अनुसरूनच माझी कल्पना विकसित करणार हे साहजिक आहे. आणि माझ्या न्याय-संकल्पनेच्या परिघामध्ये या दोघांचेही वर्तन निषेधार्ह आहे- दंडनीय आहे असे म्हटले तरी चालेल.

मानवी समाजातील सर्वच व्यवस्थांमध्ये माणसे एकक (subjects) असतात आणि त्या व्यवस्थेच्या अंतर्गत त्यांच्या तंट्यांचे, संघर्षाचे, हक्काचे निवाडे करता येतात. पण दोन व्यवस्थांना पोटात घेणारी एखादी मातृ-व्यवस्था (सुपर-सिस्टम) नसते, जिथे त्या दोन्हींना त्या व्यवस्थेअंतर्गत एकक (subject) मानून त्यांच्या परस्परसंबंधांचे निवाडे तिच्या अंतर्गत करणे शक्य व्हावे. तेव्हा अशा दोन व्यवस्थांचे परस्पर-वर्तन आणि मूल्यमापन हे उभयपक्षी अधिकृत वा अनधिकृतपणे मान्य केलेल्या द्विपक्षीय करार वा संकेतांनुसारच होत असते. (या मुद्द्याचा थोडा उहापोह रमतारामाच्या विश्रांतीस्थळी लिहिलेल्या ’व्यवस्थांची वर्तुळे’ या लेखामध्ये केला आहे.)

मला अभिप्रेत असलेल्या लोकशाही व्यवस्थेचा आधार असणार्‍या सामान्य पोटार्थी व्यक्तींनाही त्याच्या व्यवस्थेचा शत्रू मानून वीरभूषण त्यांची हत्या करत असतो. लोकशाही व्यवस्थेनेही त्याच्याबाबत उलट दिशेने तीच भूमिका घेतली, तर माझ्या मानवतावादी भूमिकेला अनुसरून तिचा निषेध करणे मला अवघड होत असते. त्याच्या व्यवस्थेतील ’पीपल्स कोर्ट’ जर लोकशाही व्यवस्थेमधील व्यक्तींचा एकतर्फी निवाडा करत असेल, तर लोकशाही व्यवस्थेतील न्यायव्यवस्थेनेही त्याचा एकतर्फी निवाडा केला, तर अन्याय म्हणता येईल का? पण लोकशाही व्यवस्था- निदान सैद्धांतिक पातळीवर- तसा करत नाही हेच माझ्या लोकशाही व्यवस्थेवरील निष्ठेचे मुख्य कारण आहे.

दोन व्यवस्थांमधील परस्पर-संघर्षामध्ये ’न्याय’ ही संकल्पना मोजायची ती कशाच्या आधारे? त्याच्या व्यवस्थेत देहदंड हा चौकी बॉम्बने उडवून दिला जात असेल, तर या व्यवस्थेत दोराला लटकवून फाशी देऊन दिला जातो एवढाच काय तो फरक आहे. 'फाशी देणे योग्य आहे का?' ही चर्चा आपण लोकशाही व्यवस्थेअंतर्गतच करु शकतो. ती त्या व्यवस्थेच्या अंतर्गत बाब आहे. त्या व्यवस्थेअंतर्गत जोवर ती अस्तित्वात आहे, तोवर तिला अनुसरून निवाडे होत राहणार. ग्लाडची गोष्ट आणखी वेगळी आहे. तो तांत्रिकदृष्ट्या लोकशाही व्यवस्थेअंतर्गत असला तरी तुरुंग ही त्याच्या अखत्यारितील व्यवस्था आहे आणि तिच्याअंतर्गत तो त्याची दंडव्यवस्था राबवतो आहे, जी बव्हंशी वीरभूषणप्रमाणेच एकतर्फी निवाडा करणारी आहे.

यातील योग्य कुठले वा अयोग्य कुठले याबद्दल नैतिक निवाडा करणे अशक्यच आहे. नैतिकतेची कल्पना ही नेहमीच व्यक्ती तसंच व्यवस्थासापेक्ष असते. आणि वर म्हटले तसे दोन व्यवस्थांच्या संदर्भात सामूहिक नैतिकतेच्या कल्पनांना आधार देणारी सामायिक व्यवस्थाही अस्तित्वातच नाही. आणि म्हणून ग्लाडने वीरभूषणचा निवाडा क्रांतिकारक म्हणून केला असला, तरी लोकशाहीवादी व्यवस्था मानणार्‍या माझ्यासारख्याला तसा करणे शक्य नाही.

जो न्याय वीरभूषणला लावावा लागतो, तोच ’न्यायालयात न्याय मिळत नाही’ असा कांगावा करत विध्वंसाचा वडवानल पेटवणार्‍या, स्वत:ला धर्मयोद्धे समजणार्‍यांनाही ! यांच्या दृष्टीने लोकशाही व्यवस्थेचे पाईक हे शोषकांचे अथवा अन्य धर्माला पक्षपाती आणि म्हणून दंडनीय असतात. त्याचप्रमाणे लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने हे दोघेही गुन्हेगारच असतात, क्रांतिकारक नसतात!

त्यामुळे ग्लाडच्या वैय्यक्तिक अनुभवातून- कदाचित उपकाराच्या ओझ्याखाली - ग्लाडचा कणा झुकला असला, तरी ते वीरभूषणच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र मानण्याची गरज नाही! ग्लाड असो की वीरभूषण, दोघांच्याही परस्परसंबंधात यथावकाश आपुलकीचा एक धागा निर्माण होतो आहे. तरीही ते दोघेही मूलत: हिंसेचे उपासक आहेत आणि सामान्यांचे कर्दनकाळ आहेत हे विसरुन चालणार नाही. त्यांच्या परस्पर-आपुलकीचा प्रादुर्भाव आपल्या मनात होऊ न देणेच शहाणपणाचे आहे.

ग्लाडची परिस्थिती वीरभूषणहून वेगळी आहे. जरी तो वीरभूषणबाबत ’माझ्या विपरीत विचारांचा क्रांतिकारक’ या निष्कर्षाप्रत पोहोचत असला तरी यात दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला, ’आपल्याला वैचारिक भूमिका आहे, दृष्टिकोन आहे’ हा ग्लाडचा भ्रमच आहे. कुणीतरी आपल्यावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन इतर कुणावर तरी अत्याचार करुन करण्याचा प्रयत्न करणे यात कुठलीही वैचारिक भूमिका नाही. असलाच तर भेकडाचा सूड आहे.

’वेचताना...’ या आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे तो सत्तेच्या बाजूला राहणारा, निष्ठा बदलणारा आहे. आपल्या वैफल्याचे विरेचन व्यवस्थेने आपल्या तावडीत आणून सोडलेल्या, त्याअर्थी दुबळ्या जीवांवर करणारा तो एक भेकड जीव आहे. आपली भीरूता जाहीर होऊ नये म्हणून त्याला क्रौर्याचा आधार घेऊन आपला दरारा निर्माण करावा लागतो, राखावा लागतो. आक्रमकता हा अनेकदा न्यूनगंडाचाच आविष्कार असतो याचे तो मूर्तिमंत उदाहरण आहे.

वीरभूषणने नाममात्र का होईना सर्वकल्याणकारी तत्त्वज्ञान अंगीकारले आहे- म्हणजे कदाचित ते अभ्यासले आहे. त्याच्या या सर्व-कल्याणाच्या व्याख्येमधून इतर व्यवस्थांचे पाईक वा लाभधारक सोयीस्करपणे वगळलेले आहेत. ते केवळ परकेच नव्हे तर थेट शत्रू मानले आहेत. त्यांचे निर्दालन करण्यास हिंसेचा वापर समर्थनीय मानला आहे.

हे ज्यांना असमर्थनीय वाटते त्यांनी समाजाअंतर्गत अन्य-धर्मीयांच्या अथवा अन्य-जातीयांबाबत आपली भावना अशीच आहे का हे स्वत:ला विचारून पाहायला हरकत नाही. इतकेच कशाला आपला देश महासत्ता व्हावा, इतर देशांवर त्याने वर्चस्व गाजवावे या वेडाने झपाटलेले लोक अन्य देशांतील- अथवा शत्रू म्हणून निवडलेल्या देशांतील - सामान्य नागरिकांची बॉम्बस्फोट वा तत्सम मार्गाने केली जाणारी हत्याही समर्थनीय मानत नाहीत काय? ’पुरा तयांचा वंश खणावा’ ही प्रवृत्ती या ना त्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या मनात ठाण मांडून बसलेली नसते का? वीरभूषणच्या विचारांतून येणारी हिंसा ही किती भयंकर द्रोही, मानवतेविरोधात आहे वगैरे म्हणत असताना देश, धर्म, वंश वगैरे आधारावर होणार्‍या एकतर्फी हिंसेचे मात्र आडवळणी समर्थन करताना आढळतात.

याचे कारण माणसांनी भौतिक प्रगती कितीही साधली असेल पण मूलत: माणूस हा अजूनही टोळ्या करून राहणारा प्राणी आहे. आणि अन्य टोळीच्या कोणत्याही सभासदाबद्दल तो तीव्र शत्रुत्व मनात बाळगून असतो. त्याने जन्माला घातलेले सर्व धर्म, स्वत:ला सर्वकल्याणकारी म्हणवणारी तत्त्वज्ञाने, व्यवस्था या शत्रूलक्ष्यी मांडणीच करत असतात. त्यातून मनुष्यप्राण्याच्या मनातील हिंसेचे विरेचन होण्यास एक वाट निर्माण होत असते. बहुसंख्य व्यक्तींना शाब्दिक विरेचन पुरते, गल्लीतल्या गुंडांना दुबळ्यांच्या मर्यादित वर्तुळात हिंसेचा वापर करुन पाहावासा वाटतो, पाठीशी जात, देव, देश, धर्माचे अधिष्ठान असले की या हिंसेला आणखी मोठे पाठबळ मिळते नि त्याची व्याप्ती वाढते.

या सार्‍याचा विचार करता वीरभूषण काय की ग्लाड काय या भेकड, टोळीबद्ध प्राण्यांतील एक प्राणी आहेत इतकेच. तुम्ही या दोहोंशी सहमत नसाल तर तुमच्या भूमिकेचे मी स्वागत करेन. परंतु तेवढे पुरेसे नाही. या दोहोंच्या विचारांचे मूळ असलेली, मित्र-शत्रूंच्या व्याख्येमध्ये सरसकटीकरण करणारी शत्रूलक्ष्यी मांडणी टाळून- त्या कुबड्या टाकून निरपवाद, स्वत:च्या पायावर उभी असणारी विचारसरणी अंगीकारणे गरजेचे आहे. लोकशाही ही तुम्हा-आम्हाला उपलब्ध असणारी अशी एक व्यवस्था आहे. ती स्वीकारायची असेल तर वीरभूषणचा ताठ कणा वा ग्लाडचा तथाकथित मनाचा मोठेपणा यांनी फार भारावून न जाण्याचे भान राखायला हवे आहे. त्याचबरोबर त्या दोहोंमधील दोषच वेगळ्या रंगात रंगवून मांडणार्‍या तथाकथित पर्यायी व्यवस्थांनाही नाकारणे आवश्यक आहे.

-oOo -

संबंधित लेखन:
वेचताना... : थँक यू, मिस्टर ग्लाड >>
शरीरम् धनसंपदा >>
नो थँक्यू, मिस्टर ग्लाड >>
---


हे वाचले का?

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

चढ आणि उतार

माझ्या घरापासून अगदी पाच-दहा मिनिटांच्या वाटेवर टेकडी आहे. मनात आले की, तिच्यावर जाता येते, ही केवढी भाग्याची गोष्ट आहे! विशेषत: मुंबईला कामासाठी गेलो, म्हणजे माझे हे भाग्य मला फार ठळकपणे जाणवते.

सुंदर पहाट होते. हातात लहानशी काठी आणि खिशात दुर्बीण घेऊन मी बाहेर पडतो. बालभारतीच्या पाठीमागे जी टेकडी आहे, तिच्या पायथ्याशी येऊन जरा मागे वळून बघतो, पुणे शहर अजून पुरते जागे झालेले नसते. अजून रस्ते वाहू लागलेले नसतात. पूर्व दिशेला लाली मात्र चढलेली दिसते. मी उत्साहाने टेकडी चढू लागतो.

अगदी परवा-परवा या टेकडीवर छान झाडी होती. पूरग्रस्त लोकांची वस्ती झाली, खिंड झाली, रस्ता झाला आणि टेकडीवरची अनेक झाडे सर्पणासाठी जाळली गेली. कडुनिंबाचे चांगले जाणते झाड कोणीतरी घाव घालून तोडत आहे, हे दृश्य मी अनेकदा पाहिले आहे. उघड्याबंब अंगाने धोतराचा काचा मारून झाड तोडणाऱ्या माणसापाशी त्याचे इमानी कुत्रे असत. दोन पोरे तोडलेल्या ढलप्या कवळे भरभरून नेत आहेत, असे दिसते. हे सगळे बघूनही 'बाबा रे, का तोडतो आहेस झाड? तू कोण? हे झाड कुणाच्या मालकीचे आहे?' असे त्या लाकूडतोड्याला हटकण्याचे धाडस मात्र कधीही माझ्याकडून झालेले नाही. तो पूरग्रस्त आहे आणि त्या वस्तीतल्या गरीब बापड्या लोकांना रोजची भाजी-भाकरी शिजविण्याला सर्पण विकत आणण्याची शक्ती जर नसेल, तर त्यांनी काय करावे?

फिरणे, हवा खाणे, निसर्गसौंदर्य चाखणे हे चोचले गरिबांना परवडण्यासारखे नाहीत, वगैरे सगळे मला माहीतच आहे. शिवाय माणसाने जमाना ओळखावा आणि गप्प बसावे, हे मध्यमवर्गीय शहाणपण मला वारसाहक्काने मिळालेले आहेच. असो.

घाव घालून अधू केलेली झाडे, विस्तार तोडून उरलेले आणि तरीही ढलप्यांसाठी कोयत्या-कुऱ्हाडीचे घाव घेऊन तांबडेलाल झालेले खुंट मला जागोजागी दिसतात. तोडून फरफटत नेलेल्या खोडांचे फरकाटे खडकावरून उठलेले असतात. पण या दृश्याकडे दुर्लक्ष करून मी हवा खात हिंडतो.

वाटा

टेकडीच्या माथ्यावर आणि अंगाखांद्यावर मला ओळखीच्या अनेक वनस्पती दिसतात. दगडीपाल्याचा हिरवाकंच वेल आणि त्यावर उमटलेली लांब देठांची पिवळी फुले दिसतात. कोरफडीचे आळे दिसते. सराट्याचे वेल दिसतात. काळमाशीचे गड्डे दिसतात. या सगळ्यांचे औषधी गुण मला बाळपणीच रामोशांच्या आणि धनगरांच्या गुराखी पोरांबरोबर राने तुडविताना माहीत झालेले आहेत. ऋतुकालमानानुसार या वनस्पतींचे दर्शन होते, तेव्हा मला बरे वाटते. गावाकडचा माणूस भेटावा, तसा आनंद होतो. या लहानसान वनस्पतींबरोबरच फुललेल्या कडुनिंबाचा आणि मुरमुट्याचा गंध, भिजल्या गवताचा आणि माळरानाचा वास हेही मला कसल्यातरी जुन्या आठवणी करून देतात. चालता-चालता वाटेवरच्या धुळीत गुंडी किड्यांनी केलेल्या सुरेख गदी दिसतात. अंगावरच्या कपड्यातले एखादे सूत ओढून त्याची लहान गुंडी या गदीत टाकावी आणि घसरून गदीत पडणाऱ्या भक्ष्याची वाट पाहात मातीखाली दडून राहिलेल्या किड्यांचे दर्शन घडते का बघावे, म्हणून मी थबकतो. कधी हात लावला की, अंगाचे वेटोळे करणारे पैसा किडे दिसतात. कधी माळसरडे दिसतात, कधी खारीची पोरे दिसतात. बघावे तेवढे थोडेच असते.

टेकडीच्या परिसरातली बरीच पाखरे आता माझ्या माहितीची झाली आहेत. अमुक ठिकाणी तमका भेटेल, तमुक ठिकाणी तो हा चरत असेल, असे माझे अंदाज सहसा खोटे ठरत नाहीत. पाखरे उडतात, तेव्हा ती दिवसभरात दूरदूरची राने धुंडत असतील, असे आपल्याला वाटते. पण ते काही खरे नाही. त्यांचेही जग एवढेएवढेसेच असते.

पायथ्याच्या माळरानावर मला तुरेवाले आणि बिनतुरेवाले चंडोल हमखास दिसतात. कधी चार-सहाच्या घोळक्यांनी ते चरत असतात. डोळ्याला दुर्बीण लावून त्यांना अगदी छान न्याहाळता येते. थोडी पोटे भरली की, त्यांना गाण्याची लहर येते. एखादे पाखरू अगदी ठिपका होईस्तोवर उंच उडते. क्षणभर जागच्या जागी थांबते आणि सुरेख गाणे गाऊन सारे आसमंत भारून टाकते. हे स्वर कानी येतात, तेव्हा मला शाळेची एकाकी वाट आठवते. माडगूळ ते आटपाडी हे पाच मैलांचे अंतर भल्या सकाळी तुडविताना सगळ्या वाटेवर चंडोलांचे गाणे माझा श्रमपरिहार करीत असे.

पायथ्याशी हिंडताना पांढरपोट्या दयाळाचे सुस्वर कानी पडतात. तो कुठे आहे, हे मला बरोबर माहीत आहे. वेताळ टेकडी आणि बालभारतीच्या पाठीची टेकडी या दोहोंमध्ये, आत गेलेला थोडा दडणीचा जो भाग आहे, तिथे उंच शेलाटा, एकाकी कडुनिंब आहे. त्याच्या टोकाशी बसून हा दयाळ रोज सकाळी गातो. 'हे एवढे रान माझे आहे. इथला स्वामी मी आहे,' एवढाच त्याचा गाण्याचा आशय असावा. आणखी एक कोणीतरी 'पीऽबीऽ चिक्ऽऽ पीऽ बीऽ' एवढेच कडवे सारखे गात असतो. बराच तपास करूनही त्याची-माझी दृष्टभेट अद्याप झालेली नाही.

गुराख्यांनी पाडलेल्या पायवाटेने मी वेताळ टेकडीच्या दिशेने चढू लागतो आणि वाटेवरच कुठे माना काढून, माझ्या हालचालींवर डोळा ठेवून असलेली तित्तिराची एक जोडी अगदी शेजारी गेल्यावर, भुर्रकन भरारी घेऊन पार पलीकडे असलेल्या घायपातीच्या लहानशा बेटात जाऊन पडते. त्यांना दुर्बिणीने टिपण्याचा माझा बेत अजून सफल झालेला नाही. प्रत्येक खेपेला, त्यांनीच मला आधी हेरलेले असते. बेटे चूप बसतात आणि मी अगदी चार फुटांवर गेलो की, एक-दोन-तीन म्हणून एकदम भरारी घेतात.

माथ्यावर पोहोचले की, चोहोकडे सुरेख रान आणि डोक्यावर निळे आभाळ दिसते. अजून कोणी फिरकलेले नसते. कडेची एखादी पायवाट धरून चालू लागले की, तांबूस पाठी, पांढरी पोटे आणि त्यांवर बारीक काळे ठिपके असलेल्या मुनियाचा भलामोठा थवा भेटतो. चांगल्या शे-सव्वाशे चिमण्या असतात. गवतात चिमणचारा वेचण्याच्या नादात त्यांना पुष्कळदा माझी चाहूल लागत नाही. मी बघत असती आणि त्या चरत असतात. हळूहळू आमच्यातले अंतर कमी होत जाते. दुर्बिणीतून झोपेतले बाळ सटवाईने घाबरवावे, तशा त्या भुर्रकन घोळक्यानेच उडतात. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर एवढे एवढे ठिपके खाली-वर होताना दिसतात. जमिनीवर मुक्या राहणाऱ्या मुनिया अधांतरी होताच बोलू लागतात. बारीक घुंगरमाळांचा आवाज रुणझुणावा, तसे त्यांचे बोल कानी येतात.

थोडे पलीकडे मेंढीफार्मच्या वरच्या बाजूला कशी कोण जाणे, पण अजून थोडी झाडी राहिलेली आहे. अगदी अलीकडे भल्या सकाळी कोणीतरी बुझवलेले एक भेकर सुसाट पाळताना मी खालून पाहिले होते, ते याच ठिकाणी. इथे मुरमुटीसारखी दिसणारी बरीच झाडे आहेत. ती फुलावर असली, म्हणजे अनेक फुलचोख्या डहाळ्यांशी झोंबताना दिसतात. त्यांच्या अस्वस्थ हालचाली अगदी निवांतपणे आपल्याला बघता येतात.

या झाडीत घुसून एखाद्या बुंध्याशी उभे राहून कान दिले की, नाना आवाज येतात. बुलबुल बोलत असतात. खाटीक, ल्हाने कोतवाल, मुके राघू आणि मठ्ठपणे बसलेले कावळे दिसतात. झाडांच्या बुंध्याच्या खांबातून वाकडे-तिकडे घसरत आपण सावकाश खाली उतरू लागावे.

शेपट्या हलवीत डहाळीवर बसलेले कोतवाल दिसतात, मेंढी फार्ममधल्या मेंढ्या चरणीसाठी बाहेर केव्हा येतात आणि त्यांच्या खुरांनी उडविलेले टोळ, किडे मटकावीत आपण त्यांच्याच पाठीवर बसून फेरफटका कधी घेतो, याची वाटच ते बघत असतात.

मधेच हवेत कोलांटी मारून एखादा मुका राघू पुन्हा साळसुदासारखा डहाळीवर येऊन बसतो, तेव्हा खुशाल समजावे की, त्याने उडता पतंग मटकावला. तुम्ही कधी पाण्यावर तरंगत जाणारा घोडा बघितला आहे का? नक्षीदार पंखांचा आणि लांब करवेदार शेपटाचा? बाळपणी आम्ही हलक्या हाताने हा पकडीत असू आणि त्याच्या शेपटीला लांब दोरा बांधून त्याचा पतंग उडवीत असू. एकदा असला भलामोठा घोडा मुक्या राघूने अधांतरीच पकडला. चांगला दीड इंच लांबीचा आणि फताड्या पंखांचा. रंगाने चकचकीत गुलाबी होता. हिरव्या मुक्या राघूने आपल्या दाभण चोचीने त्याला पकडले आणि फांदीवर येऊन बसल्यावर त्याच्या ध्यानी आले- 'अरे, हा तर लहान तोंडी मोठा घास आहे.' घोडा अजून धडपडतच होता. खरे तर चिमणी आकाराच्या मुक्या राघूने त्याला सोडून मोकळे व्हावयाचे. पण नाही! त्याने जोरजोराने त्याला फांदीवर आपटून पुरे केले आणि मग मोठ्या हिमतीने गिळले. पोट टम् झाले असावे. कारण मान आत घेऊन शेपटी खालीवर करीत तो कितीतरी वेळ जागचा हलला नाही. मला तर वाटले की, आता दिवस मावळेपर्यंत यांची बेगमी झाली.

असे बघत-बघत आपण मेंढी फार्मच्या फाटकाशी पोहोचतो. 'कुत्र्यापासून सावध' अशी पाटी इथे आहे. पण अनेक वेळा सावध राहूनही मला इथे कधी कुत्रे दिसलेले नाहीत. वतन गेले नाव राहिले, असा प्रकार असावा. याच उतारावर कधी नव्हे तो एकदा मला चित्तूर तुरगताना दुरून दिसला होता. फारच चपळाईने त्याने मला झुकांडी दिली. अस्मानी उडाला की पाताळी दडला, हेसुद्धा कळले नाही.

एवढा पल्ला मारून तळाशी उतरेपर्यंत दिवस वर आलेला असतो. रोजचे व्यवहार सुरू झालेले असतात. मेंढी फार्मवरची गुरे डोंगर वेचू लागलेली असतात.. पूरग्रस्त वस्तीवरची माणसे लोटा परेडसाठी डोंगराच्या दिशेने निघालेली दिसतात. कुठे उंच खडकावर स्वच्छ हवेत जोर-बैठका मारून हेल्थ कमविणाऱ्या पोरांच्या आकृती दिसू लागतात. मग दुर्बीण डोळ्याला लावून बघावे, असा भाग आता संपला, असे समजून मी नाकासमोर बघत परतीची वाट तुडवू लागतो.

अजून माळरानच असते. ते संपून खिंड येईपर्यंत काहीबाही दिसतच असते. रानवट दयाळची जोडी एकापाठोपाठ नाचताना दिसते. भांडखोर साळुंक्या कुस्ती खेळताना दिसतात. तारेवर बसून 'किलकिल्या' ओरडलेला ऐकू येतो. कधी बालभारतीच्या आसमंतात शेपूट नाचवून ओरडणारा शिंपीही दिसतो.

पुढे मात्र माणसे भेटू लागतात. कुत्रेवाली, मफलरवाली, छत्रीवाली...
कामगार, शाळकरी पोरे, भांडीवाल्या बाया, वडार, सायकली, रिक्षा, स्कूटर्स...

आता पाहण्यासारखे काही नसते. सपाट गुळगुळीत डांबरी रस्ता.

तरतरीत शरीराने आणि उल्हसित मनाने हाती काठी फिरवीत मी घराशी पोहोचतो. गरम चहाचा पत्तिगंध !

’वनस्पतिशास्त्र किंवा तत्सम एखाद्या शास्त्रातील विशिष्ट कामात मी गुंतलेलो नाही. परंतु जगलो वाचलो, तर निसर्गाबद्दल सांगण्यासारखे मात्र माझ्यापाशी पुष्कळच असेल.' असे तो आधुनिक ऋषी थोरो म्हणाला होता. बापडा पन्नाशीच्या आतच देवाघरी गेला. माझी उमेद एवढीच आहे की, जगलो वाचलो तर निसर्गापासून थोडा अधिक आनंद मी मिळवेन आणि तो तिळगुळासारखा वाटेन!

-oOo -

पुस्तक: वाटा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती सहावी, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०१८.
पृ. ५६-५९.

(पहिली आवृत्ती: १९७६. अन्य प्रकाशन)


हे वाचले का?

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

सहकार आणि संघर्ष

दुसरी एक मजेची गोष्ट मी सारखी पाहत होतो. म्हशींच्या मागे, पुढे गायबगळे सारखे टपून होते. या थोराड जनावरांच्या चारीही पायांनी आणि त्यांच्या मुस्कटांनी गवतातून उडणारे टोळ, गवळणीसारखे कीटक, अळ्या, सरडे, उंदरं, बेडकं असं त्यांचं खाद्य फार शोधाशोध न करता आयतं त्यांना मिळत होतं. म्हशी पुढं सरकल्या की, उडण्याची तकलीफ न घेता हे पांढरेधोट बगळे वाहनात बसून मजेनं जावं, तसं त्यांच्या पाठीवर, शिंगावर बसून जात होते आणि यात काही गैर आहे, ही पाखरं आपला भलताच फायदा उठवीत आहेत, असं म्हशींना वाटत नव्हतं. पाखरांची चालण्याची शक्ती ती किती? म्हणून ते या वाहनांचा उपयोग करून घेत असावेत. हेच बगळे गेंड्याच्या भोवतीही गर्दी करून होते. हरणाच्या पाठीवर लहान साळुक्या होत्या, काळे कोतवाल होते. जनावरं खाली बसून चरत होती आणि ही लहान पाखरं त्यांच्या पाठीवर बसून होती. एखादा लठ्ठ टोळ दिसला की, तेवढ्यापुरती गिरकी घेऊन त्याला मटकावत होती आणि पुन्हा पाठीवर बसत होती. उंचावर असल्यामुळे त्यांना सगळीकडे नजर ठेवता येत होती. माना वेळावून ती दाही दिशांना बघू शकत होती. कुठं धोका जाणवला की, ओरडून ओरडून गेंड्यांना, हरणांना, म्हशींना इशारा देत होती. हिरव्यागार गवतातून अचानक फर्रकन तीन-चार पांढरेधोट बगळे उडत आणि जरा पुढं जाऊन बघावं, तर निळ्या पाण्यात डुंबणारा काळाधोप गेंडा दिसे! पाठीवरचे बगळे असे उडताच तो सावध होऊन उठलेला असे. ही लहान पाखरं जनावरांच्या पाठीवरूनच सफर करतात असं नाही, तर चार-पाच फूट उंचीचा बस्टार्ड पक्षी जेव्हा गवतातून चालतो, तेव्हा त्याच्या पाठीवर बसूनसुद्धा कोतवालासारखा एखादा लहानगा पक्षी आपण हत्तीवरून जावं, तसा जातो. वाहनाचा आनंद माणसानंच घ्यावा, असं थोडंच आहे!

जंगलातील दिवस

रान काढून सावज उठवण्याचं काम मोठी जनावरं करतात आणि ही पाखरं आपली शिकार साधतात. मोठी जनावरंही पाखरांचं हे अंगाखांद्यावरचं खेळणं सहन करतात. कारण जिथं शिगं, खूर, शेपूट पोहोचत नाही अशा अवघड जागी चिकटून रक्त पिणारे त्यांच्या अंगावरचे लहान लहान कीटक ही पाखरं मटकावून त्यांना सुख देतात. माझा अंदाज आहे की, लहानसहान बलुतेदार पूर्वी जसे एकएक मोठा शेतकरी, आपलं कूळ म्हणून धरून ठेवीत, तशी ही पाखरंही एकच कूळ धरून ठेवत असावीत. मैना-साळुंक्यांच्याच कुळातला एक पक्षी oxpeckers असं करतो. आफ्रिकेतल्या गेंड्याशी आणि रानम्हशी-रेड्यांशी त्याचं असं कूळ-बलुतेदाराचं नातं असतं. मोठ्या कळपांपैकी एकच जनावर तो धरून असतो. सगळा जन्म तिथंच काढतो. रेड्याच्या पाठीवरच त्याचं सगळं खाणं, मादी शोधून तिच्याशी प्रियाराधन करणं, हनिमून! जे जगाच्या पाठीवर माणसं करतात, ते सगळं तो रेड्याच्या, गेंड्याच्या पाठीवर करतो. त्याच्या पायाची नखं चांगली धारदार आणि जनावराच्या कातडीशी लटकण्याजोगी पकड असणारी असतात. तोल सावरायला उपयोगी पडेल, अशी लांब, ताठ शेपटी असते. आखूड, सपाट अशी चोच असते. तिचा कात्रीसारखा उपयोग करून तो अडचणीत शिरून बसलेल्या गोचड्या, गोमाश्या खतो आणि समोर धोका दिसला की, वारंवार ओरडून, आपल्या कुळाच्या डोक्याभोवती चकरा घेऊन त्याला सावध करतो.

कुणातरी हुशार फोटोग्राफरनं घेतलेला एक उत्तम फोटोग्राफ पाहिलेला मला आठवतो. आफ्रिकेतल्या जंगलात प्रचंड शिंगांचा आणि गलेलठ्ठ मानेचा मोठा काळवीट वाहत्या धारेत उभा राहून पाणी पितो आहे आणि त्याच्या हनुवटीला उलट लटकून दोन oxpeckers ही पाणी पिताहेत.

असं हे गुण्यागोविंदानं नांदणं असतं. वेगवेगळ्या प्राण्यांचे कळप शांततामय सहजीवनाचे चाहते असतात. मारामारीसाठी मारामारी सहसा होत नाही. कधी होते, ती मादींच्या पायी नरानरांतच! तीही जीव घेण्याच्या इराद्याने नाही, तर फक्त मी बलिष्ठ आहे, हे सिद्ध करण्यासाठी! रक्तपात असा घडत नाही.

आणखी लठ्ठालठ्ठी होते ती हद्दी सांभाळण्यासाठी. ही भांडणं विशेष करून पाखरांत होतात. ही माझी हद्द, ही तुझी हद्द ही जिद्द पक्ष्यांत फार असते.

साध्या मैना बघा. नळावर बाया भांडतात, तशा त्वेषाने भांडतात. एकमेकींच्या अंगावर धावून जातात. लाथा झाडतात, मारतात. एकमेकींचे केस ओढतात.

मैना कशाला, साध्या घरचिमण्या भांडताना बघा! मोठं बघण्यालायक भांडण असतं. ही भांडणं हद्दीवरून होतात. खेड्यापाड्यांत शेताचा बांध रेटण्यावरून जशा हाणामार्‍या होतात, त्यापैकीच हाही प्रकार!

रानातली जनावरंही आपापल्या हद्दी ठरवून टाकतात आणि आपल्या हद्दीत दुसरा कोणी आल्याचं त्यांना मुळीच खपत नाही. कोल्हे, लांडगे, खोकड आपली हद्द जाहीर व्हावी म्हणून झाडांच्या खोडांवर, दगडांवर मुताची तुरतुरी सोडतात. गव्यासारखे दांडगे प्राणी शिंगानं झाडांच्या साली फाडून ठेवतात. आपल्या हद्दीतल्या झाडावर आपला वास ठेवण्यासाठी नरगवा आपल्याच मूत्रात लोळतो. त्या चिखलानं अंग भरवून घेऊन ते झाडाच्या बुंध्याला घासतो. आपल्याकडच्या हरणांच्या डोळ्यापाशी वासाची अशी एक ग्रंथी असते. ती ग्रंथी झाडांच्या फांद्यांना घासून ते आपला वास तिथं लावून ठेवतात. परहद्दीतल्या नरानं तो वास घ्यावा आणि समजावं की, हे रान दुसऱ्याच्या मालकीचं आहे. मग त्यानं दांडगावा करून मारामारी करावी, जय मिळवावा किंवा पराजय पत्करून माघार घ्यावी.

काही जनावरं आवाज उठवून आपली हद्द जाहीर करतात. पक्षी आवाज करतात, ते केवळ मादी धावत यावी म्हणून नव्हे; तर आपल्या हद्दीची खूण म्हणून! अर्थात बारा महिने तेरा काळ आपली हद्द सगळेच सांभाळत नाहीत. वर्षातले काही महिनेच ही बांधांची आखणी होते. एरवी कोणी कुठंही हिंडतो. हरणाच्या बाबतीत जेव्हा नर माजावर येतात, तेव्हाच माद्यांच्या कळपात शिरतात. एरवी वर्षभर माद्या- पोरं एका कळपानं आणि नर एका कळपानं असे हिंडतात. कळपानं राहणं एवढंच संरक्षण!

- oOo -

पुस्तक: जंगलातील दिवस.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती नववी.
वर्ष: २०२२.
पृ. २१-२५.

(पहिली आवृत्ती: १९८४. अन्य प्रकाशन)


हे वाचले का?