बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

एव्हरिबडी लव्ज आँट सेरिना

’एव्हरीबडी लव्ज रेमंड’ ही तशी जुनी मालिका, कौटुंबिक प्रवासातील घटना नि संबंधांमधील विनोदाचा हात धरुन चालणारी. सदैव सहानुभूतीच्या शोधात असलेला 'ममाज बॉय' रेमंड; त्याचा फायदा घेऊन (किंवा त्याला कारण असणारी) त्याला सदैव पदराआड राखू पाहणारी, सून ही नेहेमीच घरकामाच्या बाबत नालायक असते असा ठाम समज असलेली - जवळजवळ भारतीय सासू म्हणावी अशी त्याची भोचक आई मेरी; बाप म्हणून आपल्या कर्तव्याबाबत बव्हंशी उदासीन असणारे, मुलगा-सून-बायको या त्रिकोणात बहुधा बेफिकीर असणारे, आणि खाण्यात व भूतकाळात जगणारे रेमंडचे वडील फ्रँक, आणि संसार हेच जीवितकार्य म्हणून मुलाबाळात रमलेली, नवरा आईच्या मुठीत असल्याने हताशपणे सहन करणारी रेमंडची पत्नी डेब्रा... हे कुटुंब मला बव्हंशी आपल्या भारतीय कुटुंबाचे प्रतिनिधीच वाटत आले आहे.

अगदी 'पीपल नेक्स्ट डोअर' वाटावे असे कुटुंब! यांच्या आयुष्यात घडणार्‍या घटना, त्यांना सामोरे जावे लागलेल्या समस्याही अगदी अस्सल भारतीय वाटाव्यात अशा. तपशीलातील वेगळेपण वगळले तर मुळात सारे जगणे अस्सल भारतीय म्हणण्यात काडीचाही अतिरेक होणार नाही असे.

कधीतरी छोट्या अ‍ॅलीच्या- रेमंडच्या मुलीच्या- शाळेतून आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या मुलाखतीवर आधारित निबंध लिहावा असा 'गृहपाठ' दिला जातो आणि शोध सुरु होतो अशा ज्येष्ठतम सदस्याचा. इथे फ्रँकला आठवण होते आपल्या कुण्या ’आँट सेरिना'ची.

ही फ्रँकच्या वडिलांची बहिण. त्यांचे सारे कुटुंब इटलीहून अमेरिकेला स्थलांतर करत असताना तिकडेच राहिलेली. ती अविवाहित आहे आणि इटलीत अशा ठिकाणी राहणारी की तिला स्वतःचा असा पत्ताही नाही, स्थानिक पोस्ट ऑफिसच्या नावेच तिचे पत्र पाठवावे लागते. या निमित्ताने फ्रॅंक अथवा मेरीबद्दल लिहिणे अनायासे टळेल, या धूर्त हेतूने डेब्रा अ‍ॅलीला तिकडे पत्र पाठवण्यास सांगते.

उत्तर म्हणून तीन आठवड्यात खुद्द आँट सेरिनाच दत्त म्हणून हजर होते. आता ही साधीसुधी स्त्री गेली अनेक वर्षे इटलीत राहते आहे, तिला इंग्रजीचा गंध नाही. ती येते तेव्हा फक्त फ्रँक आणि मेरी हे दोघेच इतालियन भाषा जाणणारे असतात, ते देखील मुलांना न समजता भांडता यावे यासाठी त्या भाषेचा वापर करून सराव राखलेले. पण डेब्रा नि मुले मात्र या भाषेबाबत अनभिज्ञ आहेत.

आँट सेरिना येते ती सारे घरच ताब्यात घेते. ती निष्णात कुक आहे. तिच्या एकाहुन एक अफलातून रेसिपीज, तिने मुलांना शिकवलेली आणि त्यांनी सहजपणे आत्मसात केलेली इतालियन गाणी, घरातील मोठ्यांना आपल्या लाघवी स्वभावामुळे तिने बांधून घातलेले. यातून सारे बरोन कुटुंब पूर्वी कधी नाही इतके एकसंघ होत जाते. जेमतेम आठवड्याभरात समोरासमोर राहणारी आणि सतत एकमेकांची उणीदुणी काढणारी फ्रँक-मेरी आणि रे-डेब्राची कुटुंबे एकजीव होऊन जातात.

कुठल्याशा एका फॅमिली फोटोवरून ध्यानात येते की आँट सेरेना ही या 'बरोन' फॅमिलीची नव्हे, तर अन्य कुणा बरोन्सची आँट आहे. अचानक उघड झालेल्या या सत्याने सारेच भांबावतात नि खंतावतातही. आँट सेरेनाच्या रक्ताच्या नात्यातील तिच्या कुण्या नातीबरोबर तिने जाताना या 'बरोन्स'ना मात्र काही जिवाभावाचे गमावल्याची खंत सतावत राहते. 

रक्ताचे नाते नसेल कदाचित पण ती आँटी त्यांची जिवाभावाची नातलग होऊन राहिली होती. कुटुंबव्यवस्थेचा अर्थ तिने त्यांन उलगडून दाखवला होता. घरच्या मुलांपासून ते तिसर्‍या पिढीपर्यंत सार्‍यांचेच तिच्याशी 'नाते' जुळले होते. ते तुटताना त्या 'बरोन्स'ची जी उलघाल होते ती केवळ त्रस्त करणारी. ती आँटी त्यांची रक्ताची नातलग नसेल पण सार्‍या कुटुंबाला बांधून घालणारा एक 'बंध' ठरली होती.

हिंदीमधे 'रिश्ते' आणि 'नाते' असे दोन भिन्न अर्थाचे शब्द आहेत. मराठी त्यामानाने थोडी कद्रू आहे. दोन्हींसाठी आपल्याकडे नाते असाच शब्द आहे. 'बंध' हा एक शब्द आहे पण तो फारच सबगोलंकार आहे. इथे आँट सेरेनाचे बरोन कुटुंबियांशी जे नाते जुळते ते 'रिश्ते' या वर्गीकरणात बसणारे नसले, तरी भावनिक नात्यांच्या पातळीवर उतरणारे. छोट्या अ‍ॅलीचे आपल्या सख्ख्या आजोबांशी नसतील इतके ऋणानुबंध त्याच्या या कुण्या आँटीशी जुळलेले. ते तुटते तेव्हा अ‍ॅली आणि अन्य बरोन्सना जेव्हढा त्रास देते कदाचित तेवढाच त्रास तुम्हा आम्हा प्रेक्षकांना देते.

विस्कळित आयुष्यात कुठेतरी एखादे वळण येते जिथे आँट सेरिना भेटते नि असे काही घडते की सारे कुटुंब त्या हरवलेल्या धाग्यात ओवले जाते. ती आँट सेरिना निसटून जाते हे खरे, पण तो धागा तुटू नये याची काळजी घ्यावी याचे भान मात्र जाता जाता देऊन जाते. अशी आँट सेरिना आवश्यक तेव्हा तुम्हा सार्‍यांच्या आयुष्यात भेटो ही सदिच्छा. आणि जेव्हा भेटेल तेव्हा ती तुमचीच आँट सेरिना असावी आणि तिला गमावण्याचे दु:ख तुमच्या वाट्याला येऊ नये ही देखील!

- oOo -


हे वाचले का?