समोरच्या झाडातून बुलबुल साद घालू लागला म्हणून गॅस बारीक करून मी गॅलरीत आले. त्याचे गाणे चालूच होते. त्या सुराच्या दिशेने खूप शोधले, पण तो कुठेच दिसेना. हा त्याचा नेहमीचच खेळ आहे. आणि मीही वेडी दर वेळी अशी धावत येते, फसवली जाते आणि मग वैतागतेही. आज मात्र काय झाले कोण जाणे, न रागावता तिथेच डोळे मिटून स्वस्थ बसले. मग त्या गोड सुरांची, समोरच्या त्या झाडांची, झाडांमागल्या आकाशाची, त्यात बागडणाऱ्या ढगांची, त्यांतून कोसळणाऱ्या जलधारांची, त्यांना पोटाशी पेणाऱ्या माझ्या धामापूरच्या तलावाची, त्यातल्या इवलाल्या माशांची, तिथल्या त्या संरक्षक टेकड्यांची, त्यांच्या कुशीतल्या, माझ्या रक्ताशी नाते सांगणाऱ्या, लाल लाल पाऊलवाटांची– साऱ्या साऱ्या आसमंताची, पंचमहातत्त्वांची सावली त्या मिटल्या डोळ्यांतून अलगद आत उतरली. ती अंतर्बाह्य पांघरून मी निवान्त हलकी हलकी झाले.
आता या वयातही स्वर्गीय परी होण्याची ही अवस्था नेहमीची नाही. क्वचित कधी हा भाग्यशाली योग माझ्या वाट्याला येतो तेव्हा मला पंख फुटतात. नको असलेली, हवी असलेलोही, सगळी सगळी बंधने गळून जातात, आणि स्वच्छंद फुलपाखरासारखी मी एका अद्भुताच्या प्रदेशात तरंगायला लागते. वाट्याला आलेल्या आयुष्यातून काढलेली ही पळवाट आहे, की थकल्या-भोगल्या-भागल्या तनमनांची गरज आहे? परिणती कसली का असेना, सत्य स्थिती ही अशी आहे खरी. तो बुडत्याचा आधारही असेल कदाचित !
ही स्थिती किती काळ टिकते? इथला काळाचा हिशेब, सेकंद-मिनिटं-तास दाखवणाऱ्या घरातल्या भितीवरच्या किवा मनगटावरच्या वगैरे यांत्रिक घड्याळांच्या कालगणनेत करताच येणार नाही. हे विश्वच वेगळे, इथले गुरुत्वाकर्षणही वेगळे. इथली वजने, मापे, परिमाणे, गणिते सगळे सगळे अगदी वेगळे आहे. पण जन्मभराचे संचित आपल्याबरोबर सोबतीला असते ना, तेव्हा संदर्भ मात्र पूर्वायुष्यातल्या छोट्यामोठ्या आठवांचे असणे अपरिहार्यच नव्हे का?
हा एकटेपणा आहे की एकान्तवास आहे? Loneliness की solitude आत्ममग्नता? विजनवास? आत्मकोषात जाणे? मला नक्की काहीच सांगता येणार नाही. सगळ्या, शब्दांच्यादेखील सीमारेषा धूसर झाल्या आहेत. इतक्या मौल्यवान, सुंदर, श्रीमंत, भव्य चौकटीतला, प्रभावळीतला, तोरणातला असा हा एकान्तवास, हा आत्मकोष मनाला शांतही करतो आणि हळुवारही. आज अचानक मन किती तरी वर्षे मागे गेले. एक स्वच्छ ताजी टवटवीत नजर नजरेला भिडली. समजायचे ते सर्व काही तत्क्षणी समजून गेले. माझ्या मनातल्या, माडगूळकरांच्या भविष्यातल्या गाण्याला सुधीर फडक्यांनी सूर दिले : ‘डोळ्यांतुनी हळू या हृदयांत पाय ठेवा’. त्याच्या हातात सुरंगीचे गजरे बांधत रेशिमकाठी स्वप्नांच्या मिठीत मिटल्या डोळ्यांनी जागेपणी विसावायला आयुष्यभराचा थकवा गोळा झाला.
ते माझे त्या वेळचे डोळे कुठे गेले? मला चष्मा लावलेली प्रथम पाहिली तेव्हा माधव एकदम म्हणाला, “श्याः! तो– तो चष्मा काढून टाका बरं आधी. तो आणि कशाला लावला? त्या चष्यात तुम्ही बऱ्या नाही दिसत.”
मी खोटेच हसत म्हणाले, “तुम्ही मात्र कसेही दिसला तरी मला बरेच दिसता. अगदी डोळ्याला डोळे भिडवून पाहत राहावं असेच. पण–”
“पण काय?”
“पण अगदी खरे खरे कसे आहांत तसेच दिसायला हवेत म्हणून तर माझ्या डोळ्यांची हरवलेली ताकद परत आणण्यासाठी आता चष्मा लावायला लागले.”
त्या डोळ्यांवर चष्मा येऊन खूप काळ लोटला; माधवला जाऊनही आता खूप काळ लोटला. पण डोळे मिटून असे एकान्तात गेले ना, की गेलेल्या, येणाऱ्या, न येणाऱ्या, कोणत्याही काळाचा तुकडा हवा तेव्हा, दवात न्हालेल्या अर्धोन्मीलित कळीसारखा ताजा होऊन येतो.
काळ कोणताही असो, माझी माणसे त्यांच्या खऱ्या रूपात मला नेहमीच सुंदर दिसतात. फक्त मुखवटा चढवून आली तर मात्र तो मुखवटा कितीही देखणा असो, ती माणसे मला नाही पाहवत. तशा खूप गोष्टी सुंदर असतात. चित्रे, शिल्पे, अक्षरे, मांडणी, शरीरे पण... ती शृंगारता येतात, नटवून अधिक सुंदर करता येतात. पण ‘आपलं माणूस’ हा प्राणी मात्र साऱ्या-साऱ्याहून अगदी वेगळा आहे. खऱ्या, नैसर्गिक स्वरूपातच तो सुंदर दिसतो.
एखाद्या गोष्टीतल्या रूपगुणांपेक्षा तिच्या गाभ्याला, अर्काला, मर्माला अधिक महत्त्व देण्यात माझे काही कुठे चुकत असेल का?
ह्या एकटेपणाचा, एकान्तवासाचा, आत्मकोषाचा हा एक फायदा असतो. काही चुकले तरी त्याचा दुसऱ्या कुणाला उपद्रव नसतो. त्यामुळे चुकायचेही स्वातंत्र्य, सुख भरपूर उपभोगता येते. म्हणून का एकटेपणा मला हवाहवासा वाटतो? की एकटेपणाच्या राज्यात फक्त दुःख, उदासीनताच नांदत असणार याची पुरेपूर जाणीव असूनही आपण त्यातच प्रवेश करतो. कारण दुःख हीच त्या क्षणी आपली गरज असते? श्रेष्ठ साहित्यातही शोकान्तिका आपल्याला अधिक आकृष्ट करतात, तशी? मनापासून नको असेल तर एकटेपणा घालवणे तसे फार अवघड नाही. तो तापदायक असेल, त्यात संकट वाटत असेल, तर काहीतरी किंमत देऊन त्यातून बाहेर पडणे अशक्य नाही. थोडे मनाविरुद्ध मिळते घेणे, समझोता, थोडीफार मानसिक किंमत. पण त्याला तयारी हवी आणि त्या देवघेवींची निकड हवी. माझ्यात मुळातच ह्या गोष्टीची उणीव असावी.
आपला गोतावळा म्हणजे आपल्या आयुष्याला अर्थ देण्यासाठी आपणच गोळा केलेली सजीवसृष्टी. पण पुढे कधीतरी असाही एखादा क्षण येतो, अशी अवस्था निर्माण होते, की सजीव, निर्जीव सगळ्या सगळ्या वस्त्रालंकारांचे ओझे नको वाटते, पेलवेनासे होते. निसर्गावस्थेत, निसर्गातच विरून जावे, तन्मय व्हावे वाटते.
(...)(१)
पण असा एखांदाच क्षणही इतका जड, भरलेला, भारलेला असतो की तोदेखील प्राणांतिक थकवा आणतो. ही माझी माणसे काही आज हयात नसलेली आणि काहीं असलेलीही. जी आहेत तीही आपापल्या परीने आपापल्या जीवनात गुंतलेली आहेत. मीही ‘दूरस्थ कुणी’ होऊन गेले. बहुतेक सगळे धागे तुटून गेले आहेत. क्वचित उरलेसुरलेले मीही तोडून टाकते आहे. अशा मुक्त अवस्थेतही, सुंभ जळला तरी मागे राहणाऱ्या पिळासारखी ही कसली बंधने आठवांच्या धाग्यांनी मला जाळ्यात पकडतात? कोळ्याच्या जाळ्यासारखे नाजूक आणि उन्हाच्या कवडशात तजेलदार दिसणारे हे सप्तरंगी जाळे त्या कोळ्यासारखे मीच विणते का? कशासाठी? एक मात्र बरे आहे, आज हयात असलेली, नसलेली, एकमेकांना ओळखणारी आणि न ओळखणारीही, तिथे भेटणारी सारी जणे माझी आहेत, माझी होती तेव्हाची आहेत.
मी त्यांच्यावर खूप प्रेम केले.
आपण प्रेम करतो म्हणजे काय करतो? चित्र काढणाऱ्या, शिल्पाकृती कोरणाऱ्या कलावंताचे हात जसे रंगांशी, मातीशी, दगडांशी हळुवार क्रीडा करत मनातल्या कलाकृतीला डोळ्यांसमोर प्रत्यक्षात आकारत असतात तसेच कुठेतरी आपल्या मनातली प्रेममूर्ती आपण आपल्या प्रेमिकात कल्पित असतो का? पूर्णत्वाला नेत असतो का? कुरवाळता यावी म्हणून मनातली अशरीरिणी प्रेममूर्ती डोळ्यांसमोर साकार करीत असतो का? आपल्याच भावनांचे, अपेक्षांचे तिथे आरोपण करीत असतो का? जगत असतानाच्या प्रत्येक क्षणी आपण खरे खरे काय करत असतो ते ओळखणे मोठे कठीणच आहे.
मला वाटते, कोणत्याही एका क्षणीदेखील आपण एकच नसतो. निदान मी आताशा तरी एकच नाहीच. चारचौघांतली मी हाडामांसाची अशी अगदी सामान्य व्यक्ती आहे. पण मी एकटी असताना माझ्यातली सुप्त चैतन्याची ज्योत, जी चारचौघात मलूल होऊन विझायला आल्यामुळे उगाचच फुरफुरत असते, ती अधिक स्नेहमयी होऊन तेवायला लागते. संवेदना तेजस्वी व्हायला लागतात. पंचमहाभूतांच्या राज्यात जणू पाहुणचाराला गेल्यासारख्या सुखावतात. कोंडलेल्या श्वासांना सूर सापडेल वाटतो आणि ओठांवर गाणे फुटू पाहते. वयोमानाप्रमाणे (आजवर दुर्लक्षित केलेले) शरीर कुठे ना कुठे दुखत असले तरी ते दुःखदेखील सोसण्याचे बळ येते, की शरीराचे अस्तित्वच जाणवेनासे होते, कोण जाणे.
कासवासारखे किवा गोगलगायीसारखे माणसेही स्वतःला स्वतःत मिटून घेतात का? आत कुठेतरी, खोलवर, अगदी गुप्तपणे चारचौघात जणू माझ्यातली मी नसलेले एक कवच वावरते आणि एकटेपणी कळी फुलायला लागते; रूपवती, गंधवती, तेजस्विनी होते. अंतर्यामीच्या या अस्तित्वाला एक स्वतःचा गर्भाशय असतो. नाजूक, पण कणा असलेला. संदिग्ध. क्वचित कधीतरी, पण त्यातून अवर्णनीय असे काही निष्पन्न होते. आतल्या आतच. स्वतःपुरते अनिर्वचनीय. पंचमहातत्त्वांशी स्नेहाचे नाते जोडण्याची ताकद असलेल्या प्रसववेदनाच गळ्यात स्वयंभू गंधार असलेली गाणी होऊन जन्माला येतात. आणि निसर्गातले सगळे रंग, गंध, मांगल्य, पावित्र्य, वात्सल्य, करुणा, चेतना, तेज, ओलावा, अगदी जादूसुद्धा चहूकडे बरसत राहतात.
अंतर्यामीच्या या बंदिस्त जगात पुन्हा पुन्हा जायला मला कां आवडते? बाहेरच्या जगाचा पुरेपूर अनुभव, अगदी उघड्या डोळ्यांनी आणि सर्वांगाने, सर्वार्थाने घेतला नसता, तर या आतल्या गाभ्याची थोरवी मला कधी जाणवलीच नसती. या बरसातीत चिंब भिजूनही मी कोरडीच राहिले असते.
इथे दुसरे कुणी नाही. त्यामुळे अपेक्षाही नाहीत आणि अपेक्षाभंगही नाहीत. फसवणूक, निराशा, औदासीन्य काही काही नाही. हवा तितका गारवा आणि हवी तितकी ऊब. आपलीच आपल्याला सोबत, हवी तितकी हळुवार.
मघाशी समोरच्या झाडावर बसून गाणारा तो बुलबुल कोणते गाणे म्हणत होता? पक्ष्यांच्या गाण्याला अर्थ असतो, पण त्यात शब्द असतात? मानवाच्या भाग्यवान जातीत जन्म झाला आणि शब्द, भाषा, कविता या गोष्टी मला लाभल्या या जाणिवेने मी मोहरून गेले. या अद्भुत वरदानापुढे लीन झाले आणि माघार घेत काळाच्या उलट्या दिशेने लहान लहान होत गेले. अगदी अणुरेणुया थोकडी. आणि गिरक्या घेत गरगरायला लागले.
या विश्वातला प्रत्येक ग्रहगोल स्वतःभोवती आणि आपल्या जन्मदात्याभोवती गोल गोल अखंड चकरा मारतोय. असे गोल गोलच फिरायचे तर सुरवातीचे स्थळ याला काही महत्त्वच उरत नाही. त्या परिघातला प्रत्येक बिंदू आणि त्या स्थळीचा निमिषार्धाचा गतिमान मुक्काम हा आगमन आणि प्रस्थान यांच्या मीलनाचा सोहळा साजरा करीत असतो, आणि तीच त्यांच्या अस्तित्वाची इतिकर्तव्यता. पण या निरर्थक चक्रनेमिक्रमालाही द्यायचाच ठरवला तर किती अर्थ देता येतो!
जन्म. किती साधी, सोपी, विपुल आणि म्हणूनच किती क्षुल्लक घटना ! पण कवींनी त्याला, सूर्यकिरणांनी कल्पवृक्षाच्या फांदीला बांधलेल्या, फुलांच्या रंगित-गंधित पाळण्यात जोजवला. गोविंदाग्रजांनी त्याच्या पायी घुंगुरवाळा घातला आणि हाडामासाच्या त्या क्षुल्लक बाळगोळ्याचा राजपुत्रच नव्हे तर यक्षकिन्नरही होऊन गेला. हे कवी, अगदी कालपरवाचे आमचे गोविंदाग्रज, बालकवी, आरती प्रभू... कुबेराला आणि कर्णालाही हेवा वाटावा असे चिरंजीव दान मानवजातीला देणारे हे कवी– त्यांच्या ललाटी सुखाच्या चार ओळी लिहाव्या असे नियतीला कां वाटले नाही? की राजराजेश्वरांनी निजशिरी धारण करावे अशा मोलाच्या रत्न-सोन्याने मातीतच जन्म घ्यावा हाच तिचा नियम आहे? की माती आणि रत्न ही एकाच मोलाची आहेत– तितकीच अर्थपूर्ण आणि तितकीच निरर्थक? या चक्रात फसणे मात्र निश्चितच निरर्थक.
ही विचारचक्रे अनंत आहेत आणि एकात एक गुंतलेली. त्यांतल्या एका चक्रात फिरता फिरता आपण दुसऱ्या चक्रात कधी फेकलो जातो कळत नाही. फिरणे मात्र चालूच राहते. त्या त्या चक्राला एक सूर असतो, नाद असतो. सूरलयीचे मिलन.
मघाचा तो दूरचा घंटानाद कधी बंद पडला कळलेच नाही. आता या क्षणी घुंगुरवाळा वाजू लागला आहे. सोन्याच्या पिंपळपारावर बसून साक्षात गोविंदाग्रजच गाताहेत... रात्रीच्या काळी जों बसली ब्रह्मानंदी टाळी, मनिं तेव्हां बाणे, जे गाणें अस्फुट मंजुळवाणें... गाणे मंजुळ ते... आईच्या कुशीत विसावलेले ते गाणे प्रवाहित होऊन अंगणात आले तेव्हा वाळ्याभोवती झुळझुळणाऱ्या त्या गाण्यात पक्ष्यांचे सूर मिसळले, सूर्यकिरणांचे तेज त्याला लाभले आणि फुलांच्या रंगगंधाने ते भारून गेले. मातीच्या स्पर्शाने ते उबदार झाले आणि वाऱ्याच्या झुळकीबरोबर बागडत राहिले. दिवस वर वर येत गेला तसे तेही उंच होत होत आकाशाला भिडले आणि उन्हे उतरत गेली तेव्हा त्यांच्याबरोबर समुद्रापाशी झेपावत क्षितिजाला जाऊन मिळाले. बघता बघता केवढा प्रवास झाला! एक अख्खे आवर्तन पुरे झाले. या क्षितिजाच्या काठाशी उभ्या उभ्या स्वतःभोवतीच एक गिरकी घेताना, ते गाणेच होऊन इथवर आलेल्या माझ्या लक्षात आले. आता अवतीभोवती कुणीही नाही. सूर्य केव्हाच बुडाला. समुद्रही त्याच्याबरोबरच अंतर्धान पावला. क्षितिज म्हणजे तर आभासच. म्हणजे मग यापुढे सोबत लाभलीच तर कुणाची लाभणार ? थेट पंचमहाभूतांचीच ?
धुळीच्या कणाला महाभूतांची सोबत! या कल्पनेनेच मग थिजून गेले. या एवढ्याशा मिटल्या डोळ्यांना दिसते तरी काय काय आणि कुठपर्यंत! दवबिंदूपासून महासागरापर्यंत, तृणांकुरापासून घनदाट अरण्यांपर्यंत, कवडशापासून कोटिभास्करांपर्यंत, हलक्याशा श्वासापासून सोसाट्याच्या उत्पाती वादळापर्यंत, अगदी पाताळापासून आभाळापर्यंत. इवल्याशा मुठीपासून ब्रह्मांडापर्यंत ही सगळी अनुभूती फक्त एकट्याच्या मालकीची. यातले काहीही, कितीही उपभोगावे, अखंड विश्वाशी तन्मय होऊन जावे. प्रचंड धबधब्यांचे आवाज मग डरकाळ्या फोडत कानठळ्या बसवत नाहीत. खर्जातल्या वाद्यवृंदाचा तो घुमारा दऱ्याखोऱ्यांत भरत असताना माझ्याही कानांतून रंध्रारंधांत स्रवत जातो. आणि काळजाचा ठेका चर्चच्या घंटेसारखा आसमंताला साद घालायला लागतो.
धबधब्यांच्या या संततधारा, हे तीर्थस्वरूप पाणी शरीरात झिरपत जाते, रक्ताशी एकजीव होते. ते गालांवरून दोन्ही डोळ्यांवाटे ओघळते, तेव्हा तिथले सगळे पूर्वसंचित धुऊन काढू पाहते. हा सर्वव्यापी अनुभव देताना मन इतके व्याकूळ की व्हावे? याच गालांवरून पूर्वायुष्यात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कारणांनी वाहिलेल्या अश्रूच्या आठवणी तिथल्या त्वचेशी जणू एकरूप झाल्या आहेत ते लागेबांधे तुटता तुटत नाहीत, सुटता सुटत नाहीत. त्या घुंगुरवाळ्याभोवती झुळझुळणारे ते मंजूळ गाणी कानांत साठवून मातापित्यांचे ओठ जेव्हा जेव्हा या गालांना चुंबायला बिलगले तेव्हाचे त्यांचे हळुवार आनंदाश्रू याच गालांना सुस्नात करून गेले असतील ना?
त्यांच्या आठवणी त्यांच्याबरोबर गेल्या, माझ्या माझ्याबरोबर जातील. पण माझ्या जोडीने जाण्यासाठी शेवटपर्यंत त्या माझ्या सोबतीला राहतील ना? या शंकेने येणारी व्याकुळता इतकी भयंकर आणि स्फोटक असते, की ती क्षणार्धात पुन्हा मला वास्तवातल्या रामरगाड्याच्या त्या नेहमीच्या चक्रात चुलीपाशी आणून सोडते.
(‘चक्र’ या लेखातून)
-oOo -
पुस्तक: सोयरे सकळ
लेखिका: सुनीता देशपांडे
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
आवृत्ती तिसरी
वर्ष: २००३
पृ. ८२-८९.
(१). इथे ‘तन्मय’ या शब्दाच्या आधारे फुटलेला एक विचाराचा फाटा आहे. तो मजकूर इथे वगळलेला आहे.
टीप: मोबाईलच्या लहान पडद्यावर वाचण्यास सुलभ व्हावेत म्हणून मजकुरात अथवा वाक्यांच्या क्रमात कोणताही बदल न करता, काहीही न वगळता, भर न घालता मूळ लेखातील एक-दोन मोठे परिच्छेद लहान परिच्छेदांत विभागले आहेत.