बुधवार, २९ जून, २०१६

बहुमत

एकदा असंख्य कावळे मानससरोवराजवळ जमले. त्या ठिकाणी शुभ्र पंखांचा, लाल चोचीचा एक हंस आपल्या हंसीबरोबर जलक्रीडा करत होता. कावळ्यांनी एकदम कलकलाट केला नि त्यांनी हंसास मानससरोवर सोडून जाण्यास सांगितले, कारण त्यांच्या आगमनाच्या क्षणापासून मानससरोवरावर त्यांची सत्ता चालू झाली होती.

काजळमाया

"अनादिकालापासून मानससरोवर हंसांसाठीच आहे." हंस म्हणाला. 'शिवाय तुम्हाला पोहता येत नाही, तर मानससरोवर हवे कशाला?"

"आम्हाला पोहता येत नसेल, पण त्याचा आणि स्वामित्वाचा काय संबंध आहे? आपल्या सत्तेची नृत्यशाला अथवा गायनशाला असेल तर आपल्याला नृत्य-गायन आलंच पाहिजे असं कोठे आहे?" कावळ्यांच्या नेत्याने राजकारणी हसून विचारले. हा नेता मोठा व्युत्पन्न होता व त्याने कृष्णद्वीपात जाऊन न्याय नि राजनीतीचा प्रगाढ अभ्यास केला होता.

"आणि आत्ताच्या आत्ता तू मानससरोवर सोडून गेला नाहीस, तर आम्ही सगळे तुझ्यावर तुटून पडू व तुझा आणि तुझ्या निवासस्थानाचा पूर्ण नाश करू!" एका तरुण कावळ्याने गर्जून सांगितले. परंतु त्याच्या या कर्कश शब्दांनी नेत्यास क्रोध आला व त्याचे संस्कारित मन फार व्यथित झाले. त्याने आपल्या उतावीळ अनुयायांस गप्प बसवले. अशा तर्‍हेच्या आततायी उपायांची योजना आता रानवट झाली होती आणि तिला कृष्णद्वीपात स्थान नव्हते. त्याने पुन्हा सौजन्यपूर्वक हसून म्हटले "आपलं म्हणणं मला मान्य आहे. मानससरोवर हे हंसांसाठीच आहे. ही आपली प्राचीन परंपरा मला अढळ राखायची आहे. उलट त्या पवित्र परंपरेच्या सामर्थ्यशाली आश्रयाने मला मातृदेशाची कीर्ती वृद्धिंगत करायची आहे. पण त्यासाठी 'हंस कोण' हे आधी ठरलं पाहिजे. आपण हंस आहात कशावरून?"

हंसाला या प्रश्नाचाच मोठा विस्मय वाटला. त्याने आपल्या शुभ्र पंखांकडे पाहिले. त्याला जलातील प्रतिबिंबात आपली डौलदार मान, तिच्या अग्रभागी असलेली कमलदलासारखी लाल चोच दिसली. पण आपणच हंस आहो हे सांगण्यास त्याल प्रमाण सुचेना. कावळ्यांचा नेता नम्रपणे हसला. तो म्हणाला "तेव्हा आपण त्या प्रश्नाचा प्रथम निर्णय लावू. येथे उपस्थित सर्वांना आपण एकेक पान आणावयास सांगू. जर आपण हंस असाल तर त्यांनी 'लाल' पान आणावं. जर त्यांना मी हंस आहे असा विश्वास असेल तर त्यांनी हिरवे पान आणावं."

"पण या ठिकाणी कावळेच संख्येने जास्त आहेत." हंसी म्हणाली.

"देवी, आपले शब्द सत्य आहेत. पण तो आमचा का अपराध आहे?" नेता विनयाने म्हणाला.

थोड्याच वेळात तिथे हिरव्या पानांचा ढीग जमला. हंसीने जाऊन कमळाची एक अस्फुट कळी आणून ठेवली.

कावळ्यांचा नेता म्हणाला "पाहिलंत. न्यायनीतीनुसार निर्णय होऊन मी हंस ठरलो आहे. हे इतर सारे माझेच आप्तगण असल्याने अर्थात ते देखील हंसच आहेत. आणि आता आपणच मान्य केलंत की मानससरोवर हंसांसाठीच आहे. तेव्हा आता तुम्ही येथून जावं हेच न्यायाचं होईल."

हंस खिन्न होऊन सरोवराबाहेर आला. हंसीने त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. "प्रिया तू खिन्न का?" ती म्हणाली. "पानांच्या राशीने का हंसत्व ठरत असतं? चल, आपण येथून जाऊ. तू ज्या जलाशयात उतरशील ते मानससरोवर होईल. जेथे तू दिसशील ते तीर्थक्षेत्र ठरेल."

हंस हंसीबरोबर जाण्यासाठी उठून सिद्ध झाला. तोच वेगाने उडत चाललेल्या सुवर्णगरुडाशी त्याची भेट झाली. त्याने विचारले की "हंस म्हटला की त्याचे मुख मानससरोवराकडे असायचे. पण तू असा विन्मुख होऊन कुठं चाललास?" मग हंसाने सारी हकीकत सांगताच गरुडाच्या अंगावरील पिसे उसळली व डोळ्यात अंगार दिसला.

"मित्रा, मी गरुड आहे की नाही हे पानं गोळा करून ते क्षुद्र ठरवणार? माझ्या चोचीचा एक फटकारा बसला की त्या गोष्टीचा तात्काळ निर्णय होत असतो. त्या क्षुद्रांची तू गय करणार? जा आणि आपल्या देवदत्त मानससरोवराकडे पाठ वळवू नकोस. उद्या हेच कावळे पानांचे भारे जमा करत माझ्या नंदादेवी कांचनगौरीवर अधिकार सांगू लागतील."

हंसीने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला पण हंस आता प्रज्वलित झाला होता. त्याला शब्दांची धुंदी चढली होती. हंसी हताश चित्ताने त्याच्याबरोबर मानससरोवरापाशी आली. त्यांना पाहून कावळ्यांचा समुदाय त्यांच्यावर धावून आला. कावळ्यांचा नेता म्हणाला "मी अत्यंत शांतताप्रिय आहे." त्याचा स्वर खेदापेक्षा दु:खाने कंपित झाला होता. "पण आमच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही प्राणार्पण करू. हंस कोण याचा न्याय आणि नि:पक्षपाती निर्णय लागलेला आहे."

आता त्याचा स्वत दु:खापेक्षाही अनुकंपेने आर्द्र झाला होता. त्याची अनुज्ञा होताच ते असंख्य कावळे हंस-हंसीवर तुटून पडले व त्यांचे शुभ्र पंख आणि लाल चोची यांचा विध्वंस झाला.

पण झाडाच्या ढोलीतून एक खार ती हत्या पहात होती. ती चीत्कारत म्हणाली "गरुडाची गोष्ट निराळी. त्यानं एकदा नखं फिरवली की दहा कावळ्यांच्या चिंध्या होतात. पण तुम्ही झुंजणार कशानं? पांढर्‍या पंखांनी, डौलदार मानेने की माणकांसारख्या चोचीने? प्रतिपक्षाला चांगलीच समजेल अशी भाषा वापरण्याचं सामर्थ्य नसेल तर शहाण्यानं त्या ठिकाणी सत्य खपवायला जाऊच नये.

खारीचा चीत्कार काही कावळ्यांनी ऐकला आणि त्यांनी तिला देखील टोचून मारून टाकले. म्हणजे ते सत्य माहित नसलेला हंस आणि ते सत्य माहित असलेली खार या दोघांचाही सर्वनाश झाला.

तात्पर्य काय, स्वसंरक्षणाच्या संदर्भात सत्याचे ज्ञान-अज्ञान या गोष्टी पूर्णपणे असंगत आहेत. कारण अनुयायांच्या रक्षणाबाबत सत्य पूर्णपणे उदासीन असते. दुसरे एक शेष तात्पर्य असे की, तो स्वर मग कितीही तात्त्विक असेना, भोवती कावळे असताना खारीने चीत्कारू नये.

- oOo -

कथासंग्रह: 'काजळमाया'
लेखकः जी. ए. कुलकर्णी.
प्रकाशकः पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती सहावी, दुसरे पुनर्मुद्रण (२००७)
पृ. २४४-२४६.


हे वाचले का?

मंगळवार, २८ जून, २०१६

एका पानाचा मृत्यू

असंच खचलेलं एक सागवानाचं पान बाजूला लाल मातीवर साचलेल्या पाण्यात पडलं. ऊन आधीपासूनच तिथं पडलेलं होतं. पानानं जागा घेतल्यावर ऊन पानावर. पान पांढरं. बाकीच्या खचलेल्या पानांच्या तुलनेत छोटं. शिरा स्पष्ट. पानाच्या घडबडीत कडा. वरची कड पाण्यात अशी बुडालेली की खरी ती कुठली नि प्रतिबिंब कुठलं ते कळू नये. शेजारी एक काटकी, मळकी. कधीकधी पाटात एखादं पान असं मधेच अडकून पडतं कशाला तरी. दगडाला, फांदीला किंवा असंच कशाला तरी. पण इथं तर पाणी साचलेलंच होतं. आणि पाऊस पडलेला नसल्यामुळं ठप्पच असलेल्या पाण्यात ते पान निवांत.

पान, पाणी नि प्रवाह

हे पान नक्की कुठल्या सागवानाच्या झाडाचं असेल? झाडाला असलेली त्याची गरज संपल्यावर ते गळून गेलं असेल का? झाडानंच त्याला गळायला लावलं असेल का? हे पान पडलं तिथंच कसं पडलं? झाडाला ते कधीपासून फुटायला लागलं नि किती काळ ते झाडावर होतं? ह्या पानाचं मरण कधीपासून सुरू झालं? ह्यातल्या कुठल्याच ऐतिहासिक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं नव्हतं. पण सागवानाच्या पानाला तिथं पाण्यात पडताना मी पाहिलं, ते पाहणं तरी नक्की माझ्याकडं होतं. आणि यात माझा काही गुन्हा होता असं मला वाटत नाही.

सागवानाचं लाकूड मजबूत एकदम. त्या मजबूत लाकडाचा अंश राखलेलं ते पान माझ्यासमोर मरायला टेकलेलं. ह्या वाटेवरचे सागवान फार संख्येनं नाहीयेत. त्या एकूण रानात आहेत इतकंच. आणि आहेत तसे बरे. कोण काय त्यांच्या जीवावर उठलेलं दिसलं नाही कधी. अजून इथं जागा आहे. तिथंच एका जागी ते पान पडलं नि एका जागी मी उभा होतो. जवळच होतो आम्ही. मी आणखी जवळ जाऊन पाहिलं. नितळ पाण्यात पडलेलं ते पान सुंदर दिसत होतं. त्या पानासाठी तरी इथल्या झाडांसोबत उभं र्‍हायला हवं होतं. पण मी झाड नव्हतो, त्यामुळं मी एका मर्यादेपलिकडं तिथं उभं राहू शकत नव्हतो. म्हणून मग मी घरी गेलो.

घरी आलो. मी राहातो तो सव्वापाचशे चौरस फुटांचा फ्लॅट एका दुमजली बिल्डिंगमधे आहे. ती बिल्डिंग उभी राहण्यापूर्वी त्या जागी कोण उभं होतं आणि तेव्हा असं एखादं सागवानाचं पान गळून पडलं होतं काय, हे मला कसं कळणार! पण मगाशी मी नितळ पाण्यात पडताना आणि पडल्यावर जे पान पाहात होतो, तेवढं तरी मला कळू शकत होतं. ते पान जोपर्यंत त्या पाण्यात दिसत राहील तोपर्यंत त्या वाटेनं जाऊ ते पाहणं मला भाग होतं.

ऊन पडल्यामुळं पान जास्तीच पांढरंफटक दिसत होतं. त्याच्याकडं एकटक पाहिलं तर वरच्या कडेला भ्रम जास्तच जाणवत होता. ऊन्हामुळं नि पाण्यामुळं असेल ते. ती कडा स्पष्ट-अस्पष्ट होती. माझ्या दोन डोळ्यांनी मी सागवानाचं एक पान पाहात होतो, एवढ तरी नक्की होतं.

आत्ताच्या आत्ता ह्या पानाशेजारी मी मरून पडलो तर काय होईल? थोड्या वेळानं का होईना, माणसं जमतील. ह्या वाटेचा इतिहास पाहता कोणतरी बेवडा पिऊन पडला असेल, असं पहिल्यांदा लोकांना वाटू शकेल. पण मग कधीतरी मेलेला माणूस आहे ते कळेलंच. मग थोड्या वेळानं का होईना, लोकांची थोडी तरी गर्दी होईलच. मग कौटुंबिक किंवा शेजारपाजारचे का होईना, लोक जमतीलच. मग ठरलेल्या जागी नेऊन शरीराची विल्हेवाट लावतीलच. दरम्यान लोकांच्या जरा गप्पा होतील. 'कसा मेला' ते डॉक्टरांमार्फत मधल्यामधे कळून जाईल. काहीही कळलं तरी शेवटची दुसर्‍या माणसांमार्फत शरीराची सुरळीत विल्हेवाट ठरलेली. अगदी असंच होईल असं नाही, पण साधारण असंच. मेल्यानंतरच्या गोष्टीचा अंदाजच बांधता येईल, त्यामुळं 'साधारण असंच'.

पण ह्या पानाची मरणाची वाट वेगळी आहे. कोणी मुद्दाम त्यासाठी जमलेलं नाही. फक्त मी आणि सोबतीनं काही शब्द जमलेत. शब्द असूनही बोलावसं वाटत नाहीये. म्हणून घरी गेलो. लाकडी कपाटातून वही काढली. पहिल्या पानावरच्या पहिल्या ओळीवर पेन टेकवलं नि ठरवलं, त्या पानाचं मरण वाया जाऊ द्यायचं नाही.

पण म्हणजे काय?

म्हणजे बहुतेक पळवाट होती. नक्की काय सांगणार. मेलेल्या पानाचं रोजचं संपत जाणं मी पाहात होतो. सोबतीला शब्द होते. पान मेल्यावर माणसं जमली नाहीत. पण मी मेल्यावर माणसं जमतील. थोडा वेळ तरी, थोडी तरी माणसं जमतील. पर्याय नाही त्यांच्यासमोर सुद्धा. कारण प्रेताची विल्हेवाट तरी लावायला लागेल. तर, माणसं जमतील. माणूस मेल्यावर माणसं जमतात. माणूस मरतानाही माणसं जमतात. माणसाला मारायलाही माणसं जमतात. आणि तशीही माणसं जमतात. तशीही म्हणजे जिवंत असण्यासंबंधीच्या व्यवहारांच्या निमित्तानं. उदाहरणच घ्यायचं झालं तर इथंच पलीकडच्या बाजूला एक जागा आहे, तिचं घेता येईल. तिथं आधी एकदम मोडकळीला आलेल्या चार-पाच कौलारू खोल्या होत्या. वर्षभरापूर्वी तिथं दोन मजल्यांची बिल्डिंग उभी राहिली. आता तिथं जास्ती कुटुंब राहतायत. तिथं कडेला फणसाची झाडं उभी होती, ती आहेत आता त्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमधेच. दोन-चार पोफळी होत्या, त्या उडाल्या. चांगली जागा मिळाली ह्या लोकांना. अशी पण राहायच्या सोईसाठी माणसं जमू शकतात.

किंवा तिकडं गोखले नाक्यावर वेगवेगळ्या दुकानांमधे लोक जमतात. काय काय वस्तू, सामान वगैरे घ्यायला. ह्या नाक्याकडं येतात त्या दोन गल्ल्या" मारुती आळी नि राम आळी. मारुती आळीत साधी छोटी मशीद होती, ती आता काळ्या काचा लावलेली पांढर्‍या रंगाच्या बिल्डिंगमधली मशीद होऊ घातलेय. राम आळीत चिर्‍यांचं, कौलारू राम मंदिर होतं, तिथं आता संगमरवरी बांधणीमधलं उंच कळस असलेलं मंदिर आहे. इथं पण लोक जमतात. ह्या आळ्या मेन रोडच्या एका बाजूला आहेत, पलीकडच्या बाजूला एस्टी स्टँड. एस्टी स्टँडवर तर जमतातच जमतात लोक. त्याच मेन रोडला पुढं खाली दर मंगळवारी आठवडा बाजारात तर बरेच लोक जमतात. एवढे लोक ते सागवानाचं पान सापडलं त्या वाटेवर जमत नाहीत.

सागवानाच्या पानाच्या मरणाला माणसं जमत नाहीत. का जमत नाहीत? कदाचित पानाची गोष्ट फुटकळ असेल. मग लोक कशासाठी जमतात. जमून काय करतात?
...

ही पानं जपून ठेवायची मला सवय आहे. सवय, असं म्हटलं तरी जरा लांबचं म्हटल्यासारखं होईल. खरं तर ते आपलं आहेच सोबत, नाकासारखं नि पोटासारखं. अशाच गोष्टींमुळं ते सागवानाचं पानसुद्धा मला दिसलं. मी एकटा होतो तेव्हा नि ते सुद्धा एकटं होतं तेव्हा. ते मरत होतं, मी जिवंत होतो.

-oOo-

कादंबरी: 'पान, पाणी नि प्रवाह'
लेखकः अवधूत डोंगरे
प्रकाशकः प्रफुल्लता प्रकाशन
आवृत्ती पहिली (२०१५) पृ. ९-१२.


हे वाचले का?

काजळवाट

बोट बंदरातून बाहेर काढली तरी कार्मोन टेपरिकॉर्डर लावत नसे. सेंट्रल पार्कवरून येणारे संगीताचे स्वर आकाशात भरून राहिलेले असत. आणि त्यांची लय कार्मोनला बिघडवायची नसे. सेंट्रल पार्कमधून येणार्‍या त्या स्वरांनी बोटीतील वातावरण देखील भारलं जाई. बोट मीरामारच्या आसपास येई तेव्हा सेंट्रल पार्कवरून येणारे स्वर अगदी मंदावल्यासारखे होत आणि कार्मोन टेपरिकॉर्डर चालू करी. तो ही अशा खुबीने की सेंट्रल पार्कमधून येणार्‍या संगीताचे स्वर संपले कधी आणि टेपरिकॉर्डरवरचे स्वर सुरू झाले कधी हे कोणाच्याच लक्षात येत नसे.

बोटीच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या फेरीत केव्हा तरी सूर्य पश्चिम क्षितिजाला टेकू लागे. सारं पणजी शहर तेव्हा पेटून उठल्यासारखं वाटे. पिवळ्या रंगानं प्रदीप्त झाल्यासारखं वाटे.

माती आणि आदेउश

दिवसाउजेडीच्या या फेर्‍या कितीही मनोहारी असल्या तरी कार्मोनला खरोखर आवडत त्या काळोख पडल्यानंतरच्याच फेर्‍या. सारा अवकाश काळोखानं भरून गेला असताना, बोटीवर मंद दिवे लावून तो काळोख कापत जाण्यात जो उन्माद होता तो अलौकिकच.

आता काळोख साकळू लागला होता. शेवटच्या फेरीनंतर बोट धक्क्याला लागून थोडा वेळ लोटला होता. बोटीतील वास्तव्यात मंत्रमुग्ध झालेले लोक धक्क्यावर उतरले तरी त्यांची पावलं मागंच ओढ घेत होती ते कार्मोननं पाहिलं होतं.

धक्क्यावर जमलेले लोक आता बोटीमध्ये बसू लागले होते. धक्का रिकामा होऊ लागला होता.
-

काळोख साकळू लागला आणि पाण्यानं आपल्याला आपल्यातच अधिक मिटून घेतलं. ते अधिकच आत्मनिमग्न झालं. आता पाणी म्हणजे फक्त एखाद्या काळ्या लालसर अधिकाधिक गडद होणार्‍या पत्र्यासारखं वाटू लागलं. पाण्याला आता स्वतःशिवाय दुसर्‍या कशाचीच जाणीव नव्हती. आकाशातून उडत येणारी भिरी तर त्याच्या मुळी लक्षातही आली नव्हती.

काळोख जेवढा बाहेर साकळत होता त्याहून जास्त तो झाडात साकळत होता. मीरामारकडे जाणार्‍या रस्त्यावर दुतर्फा हारीनं गच्चं झाडं उभी होती. त्यांचे बुंधे आता अधिकच काळे पडले होते, आणि त्याहूनही त्यांची पानं. पानापानांत काळोख आता गच्च होऊ पाहात होता. त्या झाडांच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फाकलेल्या पसरट फांद्या, त्यांची पानं आणि त्यांत जमू लागलेला काळोख हे सगळंच आता एक होऊ पाहात होतं. एकाच काळ्या रंगात बुडू पाहात होतं. हळूहळू पानापासून पान वेगळं दिसेनासं झालं. सारी झाडंच काळोख पोटाशी धरून बसल्यासारखी वाटू लागली. आणखी... आणखी काळोख पोटात रिचवून गूढ होऊ लागली.

काळोख पडू लागला तशी आजूबाजूच्या परिसरातून कावळ्यांची भिरीच्या भिरी आकाशात उडाली होती. जोरजोरानं हवेवर पंख हाणत पणजीच्या दिशेनं झेपावू लागली होती. आकाशातून उडत येणारे हे कावळे विलक्षण कलकलाट करीत आता या झाडांच्या पानांत घुसत होते. त्यांच्या कलकलाटानं सारा आसमंत दणाणू सोडत होते. दाटणार्‍या काळोखाच्या वजनाखाली त्यांच्या चिमुकल्या छात्या दडपल्या जात होत्या. आसमंताच्या या विरूप दर्शनानं त्यांच्या हृदयांचा भीतीनं गोळा होत होता. एक दिवस संपत आलेला होता. या दिवसाच्या अखेरीस कावळ्यांना आपला अंतकाळच समीप दिसत होता. त्यांचा ध्यास एकच होता - तो अंतकाळ यायच्या अगोदर आपण आपल्या जागी सुरक्षित असावं. म्हणूनच आपलं ठराविक झाड, ठराविक फांदी, ठराविक घरटं गाठीपर्यंत त्यांच्या जिवाला थारा नव्हता. पानात शिरलं तरी त्यांचे पंख फडफडतच राहत होते, एकमेकांशी झुंजत होते. त्या झुंजीत प्राणभयानं ते खाली रस्त्यावर शिटंत होते. ते आक्रंदत होते आणि त्यांच्या आक्रंदनानं सारा आसमंत थरारून उठत होता.

आसमंतात दाटू पाहणारा काळोख अधिकच कुंद होत होता.

-

बोट सुरू करण्याच्या नेमक्या वेळेलाच हातात मेंडोलिन, गिटार, व्हायोलिन, क्लारियोनेट, बोंगो अशी वाद्यं घेतलेली चारपाच तरुण पोरं बोटीत शिरली आणि कार्मोननं ओळखलं, आपल्याला आता टेपरिकॉर्डर चालू करावा लागणार नाही.

बोट धक्क्यापासून दूर झाली, थोडी लांब गेली आणि बोटीतला प्रकाश वेगळाच वाटला. एवढा वेळ बोट धक्क्याला लागून होती. बोटीत दिवे होते तसेच धक्क्यावरही दिवे लागलेले होते आणि सर्वांचाच एक मंद फिका प्रकाश पसरलेला होता. बोटीतल्या काय, किंवा बोटीबाहेरच्या काय, कोणत्याही प्रकाशाचं काही विशेष वाटतच नव्हतं. आता बोट नदीच्या पाण्यात खेचली गेली आणि एकदम पाण्यावर सभोवती पसरलेल्या काळोखाचं अस्तित्व जाणवलं.

त्या काळोखानं बोटीला चहूबाजूंनी घेरलं होतं, आणि फूल फुलावं तसा हा बोटीत मध्येच प्रकाश फुलला होता. हा प्रकाश एकदम वेगळा वाटू लागला. सुखद वाटू लागला. हवाहवासा वाटू लागला. प्रकाशाच्या या अस्तित्वामुळं प्रत्येकाला इतर सृष्टीपासून आपण वेगळं असल्याची एक अनोखी जाणीव होऊ लागली.

बोट पणजीच्या किनार्‍यापासून दूर झाली आणि पणजीच्या किनार्‍यावरच दिवे दिसू लागले. दाटणार्‍या काळोखात प्रकाशाचे गोल. पण काळोख अजून पुरा पडला नव्हता. क्षणाक्षणाला तो अधिकाधिक गडद मात्र होत होता. आणि त्या काळोखात ते दिवे, कोणीतरी गळा घोटल्यामुळे घुसमटावं, तसे घुसमटत असल्यासारखे दिसत होते. बोटीतून पालासीसमोरच्या रस्त्यावरून येणारी-जाणारी माणसंही दिसत होती. रस्त्यावर दिवे सर्वत्र लागले होते खरे, पण तरीही ती माणसं काळोखाच्याच आवरणाखाली असल्यासारखी वाटत होती. त्या दृश्यात एकाच वेळी काहीतरी करुण होतं आणि काही तरी तितकंच रम्य होतं.

धक्क्यापासून बोट अलग झाली तेव्हांपासूनच वाद्यांच्या हलक्या, नाजूक लहरी उठू लागल्या होत्या. वाद्यांच्या स्वरांच्या त्या तरंगांनी बोटीतील वातावरण धुंदकारु लागलं. क्षणन् क्षण तरल, रोमांचित होऊ लागला. क्षण आता क्षणामागून जात असल्यासारखे वाटतच नव्हते. प्रत्येक क्षण तिथेच, त्या स्वरमेळातच जणू अडकून राहत होता. थांबत होता.

वाद्यांचे सुरुवातीला हलके वाटणारे स्वर हळू हळू घनदाट बनू लागले. त्या स्वरांच्या आघातानं बोटीतील प्रकाशाचा कणन् कण थरारू लागला. किंबहुना, बोटीतील त्या प्रकाशालाच स्वरांचे कळे फुटत असल्यासारखं वाटू लागलं. आता त्या स्वरांबरोबरच पावलांचे ठेके धरले गेले. थोड्याच वेळात आणखीही ठेके मिसळले जाऊ लागले. आणि मग त्या वाद्यांतून निघणारा स्वरमेळ केवळ त्या चौघा पाच जणांचाच राहिला नाही. तो बोटीतील सर्वांचाच झाला.

बोटीवर वाद्यं अशी झणकारत असताना, त्या वाद्यांच्या लयीशी जुळवून कोणी तरी उंच, कापर्‍या स्वरात गाऊ लागलं.

पेद्रू काजराक ओयता
पेद्रू काजराक ओयता
मारयाच्या काजराक ओयता

त्या गाण्याचे स्वरच असे थरकंपित करणारे होते की काही अघटित घडत असल्याच्या जाणीवेनं सारी बोट तटस्थ झाली. भुंग्यानं भोवती गुणगुणत फिरावं तसे गाण्याचे ते स्वरच प्रत्येकाच्या भोवती आता रुंजी घालू लागले होते.

ही मारिया कोण? ही पेद्रूची प्रेयसी. बालपणापासूनची त्याची मैत्रीण. लग्नाच्या त्यांनी आणाभाका घेतलेल्या. आणि त्याच मारियाचं आता दुसर्‍याशी लग्न होत होतं. सगळा गाव या लग्नाला जाणार. पेद्रूला तरी मागं राहून कसं चालेल.? जनरीत म्हणून पेद्रूलाही लग्नाला गेलंच पाहिजे. आणि तिथे गेल्यावर काय होतं?

पेद्रू मारयाक चोयता
ताच्या मारयाक चोयता

बोटीनं फेरीबोटीचा पट्टा आता ओलांडला होता. मीरामारकडे जाणार्‍या रस्त्यावरचे दिवे आता एका ओळीत ओवलेल्या मण्यांसारखे दिसत होते. पण नवलाची गोष्ट अशी की ते मणी चमकदार असूनही झाकोळून गेल्यासारखे दिसत होते. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या झाडांच्या ऐसपैस विस्ताराची जणू त्यांच्यावर सावली पडली होती आणि त्या सावलीतच ते गुरफटून गेले होते. दिवे लागले तरी त्या रस्त्यावर अजूनही अंधारच असल्यासारखा वाटत होता.

काळोख आता जणू नदीतूनच वर उसळत होता. बोटीला चहूबाजूंनी घेरत होता. आणि या उसळत्या काळोखात बोटीतील प्रकाश तेवढा संथपणे तरंगत होता. गाण्यानं, संगीतानं बेभानपणे निनादत होता.

वधूवेषातील मारियाला पेद्रू पाहतो. जी मारिया या वेषात त्याच्याबरोबर असायला हवी होती तीच मारिया या वेषात दुसर्‍याच कुणाबरोबर असलेली पाहून पेद्रूच्या काळजाचा ठाव सुटतो. तो वेडापिसा होतो. त्या लग्नघरात राहणं मग त्याला शक्यच होत नाही. तो आपल्या घरी परततो.

पेद्रू घराक येयता
दोळ्यातल्यान् दुखां व्हायता
दोळ्यातल्यान् दुखां व्हायता

मूकपणाने पेद्रू अश्रू ढाळीत राहतो.

हळू हळू नदीचं पात्र रुंद होऊ लागलेलं आहे. आता समोर काळा समुद्र अपरंपार पसरलेला दिसतो. क्षितिज कुठे दिसतच नाही. समुद्र आणि आकाश यांचा आता एकच गडद अवकाश झालेला दिसतो. आकाशात कुठे कुठे चांदण्या दिसतात म्हणून फक्त आकाश वेगळं ओळखता येतं. त्या चांदण्याही आता निस्तेज, फिक्याच दिसतात. आणखी थोडा अवकाश गेला की याच चांदण्या विलक्षण तेजानं चमकू लागतील.

नदीचं समुद्रापासून वेगळं अस्तित्व जिथं नाहीसं होतं तिथं बोट वळली. कार्मोननं बोट वळवली आणि समोर एकदम आग्वादचा किल्ला दिसला. उंचच उंच टेकाडावर हा किल्ला वसलेला होता. एरव्हीदेखील या किल्ल्याच्या पाषाणी भिंती समुद्रावर स्वामित्व गाजवत असल्यासारख्या भासत होत्या. आता काळोखात त्या अधिकच काळ्या दिसत होत्या. त्या भिंती आणि त्याच्या लगतचा परिसर. त्यांच्या हुकमतीखाली पाणी जणू निचेष्ट पडलं होतं.

कार्मोननं बोट संपूर्ण वळवली आणि तिचं तोंड पुन्हा धक्क्याच्या दिशेनं केलं. बोट समुद्राकडे जात असताना अभावितपणे सर्वांच्या नजरा पणजीच्या किनार्‍यावरच खिळलेल्या असत. इथं बोट वळली की आपोआपच त्या डोळ्यांसमोर येई ते आग्वादचा उंच टेकाडावरचा किल्ला आणि वेरेबेतीच्या लांबलचक किनार्‍याचा पट्टा. नेहमी या वेळेला बोटीतील प्रवासी आश्चर्यातिरेकानं, उन्मादानं चित्कारत असत. पणजीकडेच वळलेल्या डोळ्यांचा नदीच्या दुसर्‍या किनार्‍यावरचं संपूर्णपणे वेगळं दृश्य पाहताना एकदम स्वतःवरचाच विश्वास उडे. या किनार्‍याकडे, किनार्‍यावरील झाडांकडे, छोट्या छोट्या घरांकडे पाहताना ते मंत्रमुग्ध होत. या दोन किनार्‍यावरील दोन दृश्यांपैकी अधिक विलोभनीय कोणतं याचा ते हिशेब मांडू लागत, पण त्यांना पडलेलं कोडं मात्र कधीच सुटत नसे.

पण आज एकाच्याही तोंडातून कसलाही चित्कार उमटला नाही. एकाएकी कार्मोनच्या लक्षात आलं, बोटीवर केव्हापासून हास्यध्वनी उमटलेच नाहीत. मौजमजाही झालीच नाही. वाद्यांच्या स्वराबरोबरच वाजणारे पावलांचे ठेही केव्हा बंद झाले समजलं नाही. सारी बोट तटस्थ झाली होती. प्रत्येकाची मुद्रा गंभीर झाली होती. प्रत्येकजण केवळ एकट्या पेद्रूशीच तद्रूप झाला होता.

गाता आवाज आता विलक्षण कातर झाला होता. त्याला कमालीची धार चढली होती. तो ऐकणार्‍याचं हृदय कापत थेट आत घुसत होता.

दुखांची मोतीया जातात
मोतयांत मारयाच दिसतां
मोतयांत मारयाच दिसतां
पेद्रू काजराक ओयता...

गाणं संपलं. आपोआपच वाद्य थांबली. कोणाची लवदेखील हलली नाही. जो तो तिथल्या तिथेच खिळून राहिला. पेद्रूच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू... अश्रूंचे मोती... त्या मोत्यांत पुन्हा मारियाच... ज्याला त्याला मारियाच फक्त डोळ्यासमोर दिसत होती.

केव्हातरी बोटीला या सगळ्यातून जाग आली. एकदम पालासीजवळचे दिवे दिसू लागले. दिवे फक्त एका कुशीलाच. बाकी दिसत होता तो समोर आरपार पसरलेला धुवांधार काळोख.

खरं तर धक्का आता अगदी जवळ आला होता. पण एकाएकी ते अंतर फार वाटू लागलं. सारं अस्तित्वच आता जड वाटू लागलं होतं.

- oOo -

कथासंग्रह: 'माती आणि आदेउश'
लेखकः वि. ज. बोरकर
प्रकाशकः मौज प्रकाशन गृह
(पुस्तकावर प्रकाशनाचे वर्ष लिहिलेले नाही पण किंमत रुपये बावीस पाहता ऐंशीच्या दशकातले असावे.)
पृ. १३४-१३८.


हे वाचले का?