मंगळवार, २८ जून, २०१६

एका पानाचा मृत्यू

असंच खचलेलं एक सागवानाचं पान बाजूला लाल मातीवर साचलेल्या पाण्यात पडलं. ऊन आधीपासूनच तिथं पडलेलं होतं. पानानं जागा घेतल्यावर ऊन पानावर. पान पांढरं. बाकीच्या खचलेल्या पानांच्या तुलनेत छोटं. शिरा स्पष्ट. पानाच्या घडबडीत कडा. वरची कड पाण्यात अशी बुडालेली की खरी ती कुठली नि प्रतिबिंब कुठलं ते कळू नये. शेजारी एक काटकी, मळकी. कधीकधी पाटात एखादं पान असं मधेच अडकून पडतं कशाला तरी. दगडाला, फांदीला किंवा असंच कशाला तरी. पण इथं तर पाणी साचलेलंच होतं. आणि पाऊस पडलेला नसल्यामुळं ठप्पच असलेल्या पाण्यात ते पान निवांत.

पान, पाणी नि प्रवाह

हे पान नक्की कुठल्या सागवानाच्या झाडाचं असेल? झाडाला असलेली त्याची गरज संपल्यावर ते गळून गेलं असेल का? झाडानंच त्याला गळायला लावलं असेल का? हे पान पडलं तिथंच कसं पडलं? झाडाला ते कधीपासून फुटायला लागलं नि किती काळ ते झाडावर होतं? ह्या पानाचं मरण कधीपासून सुरू झालं? ह्यातल्या कुठल्याच ऐतिहासिक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं नव्हतं. पण सागवानाच्या पानाला तिथं पाण्यात पडताना मी पाहिलं, ते पाहणं तरी नक्की माझ्याकडं होतं. आणि यात माझा काही गुन्हा होता असं मला वाटत नाही.

सागवानाचं लाकूड मजबूत एकदम. त्या मजबूत लाकडाचा अंश राखलेलं ते पान माझ्यासमोर मरायला टेकलेलं. ह्या वाटेवरचे सागवान फार संख्येनं नाहीयेत. त्या एकूण रानात आहेत इतकंच. आणि आहेत तसे बरे. कोण काय त्यांच्या जीवावर उठलेलं दिसलं नाही कधी. अजून इथं जागा आहे. तिथंच एका जागी ते पान पडलं नि एका जागी मी उभा होतो. जवळच होतो आम्ही. मी आणखी जवळ जाऊन पाहिलं. नितळ पाण्यात पडलेलं ते पान सुंदर दिसत होतं. त्या पानासाठी तरी इथल्या झाडांसोबत उभं र्‍हायला हवं होतं. पण मी झाड नव्हतो, त्यामुळं मी एका मर्यादेपलिकडं तिथं उभं राहू शकत नव्हतो. म्हणून मग मी घरी गेलो.

घरी आलो. मी राहातो तो सव्वापाचशे चौरस फुटांचा फ्लॅट एका दुमजली बिल्डिंगमधे आहे. ती बिल्डिंग उभी राहण्यापूर्वी त्या जागी कोण उभं होतं आणि तेव्हा असं एखादं सागवानाचं पान गळून पडलं होतं काय, हे मला कसं कळणार! पण मगाशी मी नितळ पाण्यात पडताना आणि पडल्यावर जे पान पाहात होतो, तेवढं तरी मला कळू शकत होतं. ते पान जोपर्यंत त्या पाण्यात दिसत राहील तोपर्यंत त्या वाटेनं जाऊ ते पाहणं मला भाग होतं.

ऊन पडल्यामुळं पान जास्तीच पांढरंफटक दिसत होतं. त्याच्याकडं एकटक पाहिलं तर वरच्या कडेला भ्रम जास्तच जाणवत होता. ऊन्हामुळं नि पाण्यामुळं असेल ते. ती कडा स्पष्ट-अस्पष्ट होती. माझ्या दोन डोळ्यांनी मी सागवानाचं एक पान पाहात होतो, एवढ तरी नक्की होतं.

आत्ताच्या आत्ता ह्या पानाशेजारी मी मरून पडलो तर काय होईल? थोड्या वेळानं का होईना, माणसं जमतील. ह्या वाटेचा इतिहास पाहता कोणतरी बेवडा पिऊन पडला असेल, असं पहिल्यांदा लोकांना वाटू शकेल. पण मग कधीतरी मेलेला माणूस आहे ते कळेलंच. मग थोड्या वेळानं का होईना, लोकांची थोडी तरी गर्दी होईलच. मग कौटुंबिक किंवा शेजारपाजारचे का होईना, लोक जमतीलच. मग ठरलेल्या जागी नेऊन शरीराची विल्हेवाट लावतीलच. दरम्यान लोकांच्या जरा गप्पा होतील. 'कसा मेला' ते डॉक्टरांमार्फत मधल्यामधे कळून जाईल. काहीही कळलं तरी शेवटची दुसर्‍या माणसांमार्फत शरीराची सुरळीत विल्हेवाट ठरलेली. अगदी असंच होईल असं नाही, पण साधारण असंच. मेल्यानंतरच्या गोष्टीचा अंदाजच बांधता येईल, त्यामुळं 'साधारण असंच'.

पण ह्या पानाची मरणाची वाट वेगळी आहे. कोणी मुद्दाम त्यासाठी जमलेलं नाही. फक्त मी आणि सोबतीनं काही शब्द जमलेत. शब्द असूनही बोलावसं वाटत नाहीये. म्हणून घरी गेलो. लाकडी कपाटातून वही काढली. पहिल्या पानावरच्या पहिल्या ओळीवर पेन टेकवलं नि ठरवलं, त्या पानाचं मरण वाया जाऊ द्यायचं नाही.

पण म्हणजे काय?

म्हणजे बहुतेक पळवाट होती. नक्की काय सांगणार. मेलेल्या पानाचं रोजचं संपत जाणं मी पाहात होतो. सोबतीला शब्द होते. पान मेल्यावर माणसं जमली नाहीत. पण मी मेल्यावर माणसं जमतील. थोडा वेळ तरी, थोडी तरी माणसं जमतील. पर्याय नाही त्यांच्यासमोर सुद्धा. कारण प्रेताची विल्हेवाट तरी लावायला लागेल. तर, माणसं जमतील. माणूस मेल्यावर माणसं जमतात. माणूस मरतानाही माणसं जमतात. माणसाला मारायलाही माणसं जमतात. आणि तशीही माणसं जमतात. तशीही म्हणजे जिवंत असण्यासंबंधीच्या व्यवहारांच्या निमित्तानं. उदाहरणच घ्यायचं झालं तर इथंच पलीकडच्या बाजूला एक जागा आहे, तिचं घेता येईल. तिथं आधी एकदम मोडकळीला आलेल्या चार-पाच कौलारू खोल्या होत्या. वर्षभरापूर्वी तिथं दोन मजल्यांची बिल्डिंग उभी राहिली. आता तिथं जास्ती कुटुंब राहतायत. तिथं कडेला फणसाची झाडं उभी होती, ती आहेत आता त्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमधेच. दोन-चार पोफळी होत्या, त्या उडाल्या. चांगली जागा मिळाली ह्या लोकांना. अशी पण राहायच्या सोईसाठी माणसं जमू शकतात.

किंवा तिकडं गोखले नाक्यावर वेगवेगळ्या दुकानांमधे लोक जमतात. काय काय वस्तू, सामान वगैरे घ्यायला. ह्या नाक्याकडं येतात त्या दोन गल्ल्या" मारुती आळी नि राम आळी. मारुती आळीत साधी छोटी मशीद होती, ती आता काळ्या काचा लावलेली पांढर्‍या रंगाच्या बिल्डिंगमधली मशीद होऊ घातलेय. राम आळीत चिर्‍यांचं, कौलारू राम मंदिर होतं, तिथं आता संगमरवरी बांधणीमधलं उंच कळस असलेलं मंदिर आहे. इथं पण लोक जमतात. ह्या आळ्या मेन रोडच्या एका बाजूला आहेत, पलीकडच्या बाजूला एस्टी स्टँड. एस्टी स्टँडवर तर जमतातच जमतात लोक. त्याच मेन रोडला पुढं खाली दर मंगळवारी आठवडा बाजारात तर बरेच लोक जमतात. एवढे लोक ते सागवानाचं पान सापडलं त्या वाटेवर जमत नाहीत.

सागवानाच्या पानाच्या मरणाला माणसं जमत नाहीत. का जमत नाहीत? कदाचित पानाची गोष्ट फुटकळ असेल. मग लोक कशासाठी जमतात. जमून काय करतात?
...

ही पानं जपून ठेवायची मला सवय आहे. सवय, असं म्हटलं तरी जरा लांबचं म्हटल्यासारखं होईल. खरं तर ते आपलं आहेच सोबत, नाकासारखं नि पोटासारखं. अशाच गोष्टींमुळं ते सागवानाचं पानसुद्धा मला दिसलं. मी एकटा होतो तेव्हा नि ते सुद्धा एकटं होतं तेव्हा. ते मरत होतं, मी जिवंत होतो.

-oOo-

कादंबरी: 'पान, पाणी नि प्रवाह'
लेखकः अवधूत डोंगरे
प्रकाशकः प्रफुल्लता प्रकाशन
आवृत्ती पहिली (२०१५) पृ. ९-१२.


संबंधित लेखन

1 टिप्पणी:

  1. खरंच किती सुंदर , तरल. एखादी कविता वाचावी तसाच हा उतारा. आता कादंबरी वाचायची इच्छा आहे.

    उत्तर द्याहटवा