शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

वेचताना... : डांगोरा: एका नगरीचा

ट्रिलजी किंवा तीन भागातील विस्तृत कथानक मांडणी हा प्रकार तसा अप्रचलित नसला तरी दुर्मिळ आहे. सिनेमा (सत्यजित रे यांची अपू ट्रिलजी), नाटक (एलकुंचवारांची वाडा ट्रिलजी) तसेच कादंबरी (मुक्तिबोधांची बिशू ट्रिलजी) अशा बहुतेक कलामाध्यमांतून हा प्रयोग होत आला आहे.

मराठी साहित्यातील ग्रॅंड ओल्ड मॅन भालचंद्र नेमाडे यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत ’चांगदेव चतुष्टय’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या चार कादंबर्‍या लिहिल्या. (श्री. ना. पेंडसे यांची तुंबाडचे खोत ही चार भागातील विस्तीर्ण कादंबरी एक प्रकारे चतुष्टयच आहे.)

डांगोरा: एका नगरीचा

एका विस्तीर्ण अशा पटावर एखादी व्यक्ती, एखादा भूभाग किंवा समाजव्यवस्था यांची स्थित्यंतरे कवेत घ्यायची, तर एखादी कादंबरी पुरेशी होत नाही. अशा वेळी त्या कथनाचे टप्पे कल्पून त्या भोवती स्वतंत्र उभ्या राहतील अशा कलाकृती निर्माण करणे, हे सर्वसामान्य कलाकाराला झेपणारे काम नव्हे. इथे सर्जनशीलतेसोबतच चिकाटी, चोख हिशोबीपणाही अंगी असावा लागतो. एवढ्या विस्तीर्ण मांडणीमध्ये कुठे विसंगती येऊ नये, कथानकाचा ओघ आणि धाटणी दोन्ही बदलू नये याची डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी लागते.

नेमाडेंनी त्यांच्या ‘हिंदू: एक समृद्ध अडगळ’ साठी केलेली टिपणे त्यांच्यावर तयार केलेल्या लघुपटात पाहण्यात आली होती. लेखन म्हणजे काहीतरी आतून स्फुरते नि लेखक दणादण लेखन करतो अशा स्वप्नाळू कल्पनेला छेद देणारा तो पुरावा पाहून मला समाधान वाटले होते. अशा कलाकृतींचा आस्वाद घेताना वाचक/प्रेक्षकही तितकाच सजग आणि चिकाटीचा हवा हे ओघाने आलेच.

मराठी कादंबरीच्या क्षेत्रात मुक्तिबोधांच्या बिशू ट्रिलजी प्रमाणेच आणखी एक ट्रिलजी वाचण्यात आली ती म्हणजे त्र्यं. वि. सरदेशमुखांची ’साइखेड’ ट्रिलजी. मुक्तिबोधांच्या, रेंच्या ट्रिलजीमध्ये एका व्यक्तिचा प्रवास संकलित केला आहे तर इथे एका संस्थानचा. 

स्वातंत्र्यपूर्व काळात आणि ब्रिटिश अंमलाखाली असलेले ’साइखेड’ हे एक अगदी लहानसे संस्थान. सरदेशमुखांनी या संस्थानच्या पार्श्वभूमीवर ’बखर: एका राजाची’, ’उच्छाद’ आणि ’डांगोरा: एका नगरीचा’ अशा तीन कादंबर्‍या लिहिल्या आहेत. आधीच म्हटल्याप्रमाणे इथे एका व्यक्तिचा वेध नसल्याने या तीनमध्ये काळाची सलगता आहे (त्यातही एक पेच आहे, तो पुढे येतोच आहे) पण एखाद्या व्यक्ती अथवा घराण्याचा प्रवास नाही. त्यामुळे कदाचित या तीन स्वतंत्र भासतात, त्यांना जोडणारा दुवा आहे तो ते संस्थान, साइखेड.

या ट्रिलजीची तुलना मी मुक्तिबोधांच्या ट्रिलजीशी करणार नाही. अगदी वैयक्तिक मत सांगायचे, तर माझ्या मते हे त्रिकूट मुक्तिबोधांच्या त्रिकूटाच्या इतके भक्कम सूत्रात बांधलेले नाही. दुसरे असे की प्रत्येक कथानकाचा गाभा सर्वस्वी वेगळ्या केंद्राभोवती विणला असल्याने त्यात सलगतेचा भास होत नाही. पण व्यक्ती, कुटुंब, समाज, संस्था असे अस्तित्वाने मोजता येणारे सूत्र न घेता पार्श्वभूमी हे बांधणारे सूत्र असल्याने सामान्य वाचकाला असे भासत असावे.

'बखर...' एका संवेदनशील राजाची फरफट मांडते तर 'उच्छाद' मध्ये सर्वच बाबतीत उखडल्या गेलेल्या व्यक्तीची ससेहोलपट ग्रथित केलेली आहे. पण या तीनही कादंबर्‍यात कथानकाच्या व्यामिश्रतेमुळे आणि विस्तारामुळे सर्वात उठून दिसते ती 'डांगोरा...'.

तीनही कादंबर्‍यामधील सर्वात मोठी आणि अतिशय काटेकोरपणे विणलेली ही कादंबरी खरे तर एक मैलाचा दगड ठरायला हवी होती. पण तिची फारशी चर्चा निदान माझ्या कानावर आलेली नाही. एक गंमतीशीर भाग असा की काळाच्या पटावर पाहिले तर ही मधली कादंबरी, पण ती प्रकाशित झाली सर्वात शेवटी; त्यापूर्वी आलेल्या 'उच्छाद' नंतर तब्बल वीस वर्षांनी. बखर ७२ ची तर उच्छाद ७८ ची पण डांगोरा येईतो ९८ साल उजाडले.

मराठी भाषेत राजकीय कादंबर्‍या फारशा लिहिल्या जात नाहीत अशी एक तक्रार मध्यंतरी एका ग्रुपमध्ये ऐकली. होती. निखळ राजकीय म्हणाव्यात अशा कादंबर्‍या मोजक्याच. त्यात पुन्हा राजकीय म्हणजे फक्त सत्तेच्या सत्तेच्या राजकारणाशी निगडीत असा संकुचित अर्थ घेतला, तर अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या. पण राजकारण म्हणजे केवळ सत्तेचे राजकारण नव्हे, सामाजिक राजकारण (थोडे पुढे जाऊन साहित्यिक राजकारण का नको असा प्रश्न काहीजण विचारतील, पण तो सोडून देऊ) असा व्यापक अर्थ घेतला तर 'डांगोरा...' एक महत्वाची कादंबरी ठरते.

यात सत्तेचे राजकारण तर आहेच, पण त्याला सामाजिक आणि मुख्य म्हणजे जातीय समीकरणाचा मोठा फास पडलेला आहे. ब्राह्मण आणि मराठा या तथाकथित उच्च जातींचे परस्पर राजकारण, त्यात गुंतलेले सत्तेच्या आणि आर्थिक राजकारणाचे पेच आणि पेड, त्यात अपरिहार्यपणे ओढले जाणारे अन्य जातीय लोक असा ढोबळ कॅनव्हास घेऊन कादंबरी उभी आहे.

पण तिची वीण इतकी एकटाकी, एकरंगी नाही. जातीवर आधारित कंपू करून चाललेल्या शह-काटशहाच्या राजकारणातही स्वार्थ समोर येताच परस्परांना केलेले सहकार्य, त्यासाठी लहान लहान प्याद्यांचा बिनदिक्कतपणे दिला जाणारा बळी, हे एका बाजूला घडत असताना जातिभेदाच्या भिंती मोडून परस्परांची साथ करणारे, सत्याची कास धरणारे बव्हंशी दुबळे, बरेचसे अकर्मक आणि म्हणून बहुधा पराभूत लोकांची संख्याही समाजात कमी नसते.

याशिवाय संस्थान असले तरी ब्रिटिश अंकित असल्याने त्या मार्गे होणारे सकारात्मक/ नकारात्मक हस्तक्षेप, आर्थिक तसंच राजकीय सत्तेच्या साठमारीत, त्यातील माणसांच्या किडक्या माथेफिरु स्वार्थापुढे भरडली जाणारी पापभीरू सामान्य माणसे, पण त्याचवेळी त्या साठमारीचा आपल्याही छोट्या छोट्या स्वार्थांसाठी उपयोग करून घेणारे छोटे लोक अशा अनेक लहान लहान पेडांनी ती विणली आहे. अगदी मर्यादित वकुबाचे, सामाजिक प्रतिष्ठेचे पात्र देखील काटेकोरपणे उभे राहून आपली भूमिका पार पाडताना दिसते.

एक महत्वाचा मुद्दा नोंदवून ठेवायचा म्हणजे यातील बहुतेक पात्रे ही काळ्या वा पांढर्‍या रंगात रंगवलेली आहेत. पण काळं काय नि पांढरं काय हे सापेक्ष आहे. माझ्या मते ज्यांच्या जातीय जाणीवा तीव्र आहेत त्यांना आपापल्या पूर्वग्रहानुसार ते रंग दिसतील. तेव्हा आपण सेफ म्हणून दुरंगी म्हणू या. त्या अर्थी अर्वाचीन साहित्यिक निकषांवर कदाचित ही कदाचित उणीव म्हणून गणली जातील. अगदी क्वचित एखादे पात्र रंग बदलते किंवा दोन्ही रंग दाखवते आहे. पण एरवी एखाद्या पौराणिक लढाईप्रमाणे दोन सैन्ये परस्परांसमोर उभी ठाकली आहेत.

या सार्‍या स्थानिक घडामोडींना देशातील पण संस्थाबाहेरील घडामोडींची एक पार्श्वभूमी देण्याचा प्रयत्न सरदेशमुखानी केला आहे. पण तो मर्यादितच यशस्वी झाला आहे असे माझे मत झाले. एखादा अपवाद वगळला तर तो काळाचा अक्ष (axis) म्हणून काम करण्यापलीकडे कथाकाच्या प्रवाहावर त्याचा फार फरक पडत नाही. इथे 'तुंबाडचे खोत' मधील स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील चित्रण आवर्जून लक्षात घेण्याजोगे. तिथे जसे बाहेरील राजकारण, स्थितीबदल तुंबाडमध्ये उलथापालथ घडवतो, समीकरणे बदलतो तसा कार्यकारणभाव इथे दिसत नाही. परंतु त्या अनुषंगाने येणारी ब्रिटिश पात्रांना मात्र कथानकात निश्चित स्थान आहे, पण ते ब्रिटिश नसता फार फरक पडला असता असे वाटत नाही.

इथे निवडलेला उतारा प्रत्यक्ष कथानकाचा भाग नाही, त्याचा प्रातिनिधिक देखील नाही. पण एकूण कादंबरीला तो एका परिप्रेक्ष्यात मांडतो असे मला वाटते. यातील पहिलेच वाक्य माझ्या मनावर एक जळता ओरखडा उठवून गेलं. पुढचा उतारा तर कोणत्याही शतकातील भारताला चपखल लागू पडेल असा.

- oOo -

या पुस्तकातील एक वेचा: विहीरीतले बेडूक


हे वाचले का?

विहीरीतले बेडूक

साइखेडात सगळाच अंधार होता असं नाही. जळतेपण क्षीण होतं आणि जागेपण बावरलेलं. जिथे कुठे चडफड होती ती भवतीच्या दाट ओल्या पासोडीखाली चिमून चाललेली.

डांगोरा: एका नगरीचा

शंभुराव जाधव काय, हरिभट ग्रामोपाध्ये काय, तिरीमिरीवर येणारे, भडकील्या डोक्याचे म्हणून प्रसिद्ध होते. लोक त्यांना मानायचे. पण त्यांच्यामागून पावलं टाकायची हिंमत त्यांच्यात नव्हती. अग्नी अग्नीच असतो. पण वेळीच इंधन मिळेल तर.

साइखेड हे एखाद्या बेटासारखं. बाकीच्या जगापासून विलग झालेलं... आपल्याच ठिकाणी उसाभरी करणारं. तरी त्यात इतिहासातले द्वेष पुन:पुन्हा वस्तीला येत. जातीचा झेंडा ज्याच्या त्याच्या हाती. त्यामुळे आपल्या कळपातल्याहून इतर सगळे तुच्छ आणि हीन. सत्ता आणि धन यासाठी केलेली चाल ती पुण्यमार्गावरची. वासनांचा संतोष हाच एक विसावा.

अशा समाजात सदाच भयाचं वातावरण लपेटून राहणार यात शंका कसली? भयाला नेहमीच हिंसेचं काळंगडद अस्तर असतं. अशानं भूमी दिवसरात्र द्वंद्वासाठी सजलेली असते. तिच्यावर सुंदर जीवनाची रोपं अंकुरणार कशी? कोणत्याही क्षणी, कोणत्याही वळणावर आणीबाणी छातीवर बसेल अशी व्यवस्था.

एका सिद्धपुरुषाची समाधिभूमी अन एकाहून अधिक गुणशाली राजांची कर्मभूमी असलेलं साइखेड आता निव्वळ कुरुक्षेत्र होऊ पाहात होतं: पावलोपावली अधर्म, वैर, खोटारडेपण आणि हत्या.

आपण सर्व जण एकाच ईश्वराची लेकरं आहोत. या सृष्टीचं वैभव सर्वांसाठी आहे. त्याचा उपभोग घ्यायला सर्वांना समान संधी हवी. दुसर्‍याच्या दु:खाला कारण व्हायचं नसेल तर आपण अन्यायी न झालं पाहिजे: स्वत:बरोबर इतराचा समान हक्क आणि अधिकार मानला पाहिजे; विषमवृत्ती आणि वरचढपणा पायदळी घातला पाहिजे.

हे कुणीतरी दुसर्‍यानं करून पाहावं, आम्हाला या शपथेतून सुटं ठेवावं, असंच फार जणांना वाटतं.

ज्ञानदेव असो, तुकाराम असो किंवा शिवाजी, आमचा-आमचा म्हणून घोष करण्यात आम्ही कधीतरी मागं असतो? इडापिडा टळावी म्हणून काळबाहुली आढ्याला टांगावी तसे त्यांना आम्ही देव्हार्‍यात ठेवतो. आम्ही किती श्रद्धावान, पूर्वजांचं थोरपण जाणणारे याचा गवगवा करण्यातच आमची दमछाक होते.

आमचं उदारपण वाहून वाहून किती दूरवर वाहील? टिळकांचं थोरपण आम्ही चित्पावन कोकणस्थाच्या कुडीत रेखून ठेवतो. जोतीबांचं महानुभावपण त्यांच्या अब्राहमणपणात अटकवतो. त्यांची आयुष्यभराची तगमग बाजारचौकाच्या भाषणात आम्ही वापरतो.

साइखेडात गेली पाचसात वर्षं असला उठवळपणा गल्लोगल्ली धुमसत होता.

उगवणारा प्रत्येकच दिवस शेवटचा असू शकतो याचा चटका आमच्या चित्ताला कधी बसला असता तर आग लागलेल्या घरातून जिवानिशी पळ काढावा तसे आम्ही जातीजातींच्या वैमनस्यातून झडझडून बाहेर निघालो असतो. अट्टहास आम्ही कसला करतो! शेवटचा दिवस आमच्या गणतीतच नाही.

छे: आम्ही तुकारामाचं काही लागत नाही. जोतीबांचं त्याहून नाही. ते थोडेच साक्षात्कारी संत होते?

सिद्धमठातला गुरव स्वत:ला 'महास्वामी' समजत असे. म्हणजे लोकांनी आपल्याला तसं हाकारावं अशी त्याची इच्छा. आपल्या हस्तकांकरवी तो ती पुरवून घेत असे. मठाचे मुख्य ट्रस्टी, साइखेडच्या बाजारपेठेतलं एक प्रस्थ, महालिंगप्पा त्याच्या पाठीशी उभे असल्यानं तो चावर्‍या कुत्र्यासारखा एक विचित्र दबदबा गाजवीत होता. सरसकट माळ्या-कुणब्याना तो छी: थू: करी. ब्राह्मण म्हणजे ईश्वराच्या मुखातील लाळ, तो म्हणायचा. त्यांच्या हातचं खातो-पितो तो खरा लिंगपूजकच नव्हे अशी त्याची धारणा. त्यामुळं ब्राह्मणाला अस्पृश्य समजत नाहीत त्या सगळ्या जाती त्याला नीच वाटायच्या.

तिकडे दत्तमंदिराचा ब्राह्मण पुजारी घरंदाज मराठ्यांनासुद्धा दानपेटीच्या पलीकडे सुद्धा फिरकू देत नाही, अशी स्थिती होती. हे किती दिवस चालणार, आणि चालत चालत कोणत्या खड्ड्यात नेणार? याचा वचार कोणाला शिवत नव्हता.

प्रत्येक बदचालीला प्रायश्चित्त असतं. जाहीरपणे ते न घ्याल तर दडपलेल्या आजारासारखं अवकाळी झडप घालतं ते... तुमच्या प्राणांवर.

बाजारपेठ, रस्ते, चावडी, ही तर कोणा वरिष्ठ म्हणवणार्‍या जातवाल्यांच्या मालकीची नसतात! तिथं एक दुसर्‍याची लक्तरं टांगू पाहतो. अन कुणालाच त्याची किळस वाटत नसते.

- oOo -

पुस्तक: 'डांगोरा: एका नगरीचा'
लेखक: त्र्यं. वि. सरदेशमुख
प्रकाशक: मौज प्रकाशन
आवृत्ती दुसरी (२००४)
पृष्ठे: १३६ - १३८.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : डांगोरा: एका नगरीचा >>
---


हे वाचले का?