साइखेडात सगळाच अंधार होता असं नाही. जळतेपण क्षीण होतं आणि जागेपण बावरलेलं. जिथे कुठे चडफड होती ती भवतीच्या दाट ओल्या पासोडीखाली चिमून चाललेली.
शंभुराव जाधव काय, हरिभट ग्रामोपाध्ये काय, तिरीमिरीवर येणारे, भडकील्या डोक्याचे म्हणून प्रसिद्ध होते. लोक त्यांना मानायचे. पण त्यांच्यामागून पावलं टाकायची हिंमत त्यांच्यात नव्हती. अग्नी अग्नीच असतो. पण वेळीच इंधन मिळेल तर.
साइखेड हे एखाद्या बेटासारखं. बाकीच्या जगापासून विलग झालेलं... आपल्याच ठिकाणी उसाभरी करणारं. तरी त्यात इतिहासातले द्वेष पुन:पुन्हा वस्तीला येत. जातीचा झेंडा ज्याच्या त्याच्या हाती. त्यामुळे आपल्या कळपातल्याहून इतर सगळे तुच्छ आणि हीन. सत्ता आणि धन यासाठी केलेली चाल ती पुण्यमार्गावरची. वासनांचा संतोष हाच एक विसावा.
अशा समाजात सदाच भयाचं वातावरण लपेटून राहणार यात शंका कसली? भयाला नेहमीच हिंसेचं काळंगडद अस्तर असतं. अशानं भूमी दिवसरात्र द्वंद्वासाठी सजलेली असते. तिच्यावर सुंदर जीवनाची रोपं अंकुरणार कशी? कोणत्याही क्षणी, कोणत्याही वळणावर आणीबाणी छातीवर बसेल अशी व्यवस्था.
एका सिद्धपुरुषाची समाधिभूमी अन एकाहून अधिक गुणशाली राजांची कर्मभूमी असलेलं साइखेड आता निव्वळ कुरुक्षेत्र होऊ पाहात होतं: पावलोपावली अधर्म, वैर, खोटारडेपण आणि हत्या.
आपण सर्व जण एकाच ईश्वराची लेकरं आहोत. या सृष्टीचं वैभव सर्वांसाठी आहे. त्याचा उपभोग घ्यायला सर्वांना समान संधी हवी. दुसर्याच्या दु:खाला कारण व्हायचं नसेल तर आपण अन्यायी न झालं पाहिजे: स्वत:बरोबर इतराचा समान हक्क आणि अधिकार मानला पाहिजे; विषमवृत्ती आणि वरचढपणा पायदळी घातला पाहिजे.
हे कुणीतरी दुसर्यानं करून पाहावं, आम्हाला या शपथेतून सुटं ठेवावं, असंच फार जणांना वाटतं.
ज्ञानदेव असो, तुकाराम असो किंवा शिवाजी, आमचा-आमचा म्हणून घोष करण्यात आम्ही कधीतरी मागं असतो? इडापिडा टळावी म्हणून काळबाहुली आढ्याला टांगावी तसे त्यांना आम्ही देव्हार्यात ठेवतो. आम्ही किती श्रद्धावान, पूर्वजांचं थोरपण जाणणारे याचा गवगवा करण्यातच आमची दमछाक होते.
आमचं उदारपण वाहून वाहून किती दूरवर वाहील? टिळकांचं थोरपण आम्ही चित्पावन कोकणस्थाच्या कुडीत रेखून ठेवतो. जोतीबांचं महानुभावपण त्यांच्या अब्राहमणपणात अटकवतो. त्यांची आयुष्यभराची तगमग बाजारचौकाच्या भाषणात आम्ही वापरतो.
साइखेडात गेली पाचसात वर्षं असला उठवळपणा गल्लोगल्ली धुमसत होता.
उगवणारा प्रत्येकच दिवस शेवटचा असू शकतो याचा चटका आमच्या चित्ताला कधी बसला असता तर आग लागलेल्या घरातून जिवानिशी पळ काढावा तसे आम्ही जातीजातींच्या वैमनस्यातून झडझडून बाहेर निघालो असतो. अट्टहास आम्ही कसला करतो! शेवटचा दिवस आमच्या गणतीतच नाही.
छे: आम्ही तुकारामाचं काही लागत नाही. जोतीबांचं त्याहून नाही. ते थोडेच साक्षात्कारी संत होते?
सिद्धमठातला गुरव स्वत:ला 'महास्वामी' समजत असे. म्हणजे लोकांनी आपल्याला तसं हाकारावं अशी त्याची इच्छा. आपल्या हस्तकांकरवी तो ती पुरवून घेत असे. मठाचे मुख्य ट्रस्टी, साइखेडच्या बाजारपेठेतलं एक प्रस्थ, महालिंगप्पा त्याच्या पाठीशी उभे असल्यानं तो चावर्या कुत्र्यासारखा एक विचित्र दबदबा गाजवीत होता. सरसकट माळ्या-कुणब्याना तो छी: थू: करी. ब्राह्मण म्हणजे ईश्वराच्या मुखातील लाळ, तो म्हणायचा. त्यांच्या हातचं खातो-पितो तो खरा लिंगपूजकच नव्हे अशी त्याची धारणा. त्यामुळं ब्राह्मणाला अस्पृश्य समजत नाहीत त्या सगळ्या जाती त्याला नीच वाटायच्या.
तिकडे दत्तमंदिराचा ब्राह्मण पुजारी घरंदाज मराठ्यांनासुद्धा दानपेटीच्या पलीकडे सुद्धा फिरकू देत नाही, अशी स्थिती होती. हे किती दिवस चालणार, आणि चालत चालत कोणत्या खड्ड्यात नेणार? याचा वचार कोणाला शिवत नव्हता.
प्रत्येक बदचालीला प्रायश्चित्त असतं. जाहीरपणे ते न घ्याल तर दडपलेल्या आजारासारखं अवकाळी झडप घालतं ते... तुमच्या प्राणांवर.
बाजारपेठ, रस्ते, चावडी, ही तर कोणा वरिष्ठ म्हणवणार्या जातवाल्यांच्या मालकीची नसतात! तिथं एक दुसर्याची लक्तरं टांगू पाहतो. अन कुणालाच त्याची किळस वाटत नसते.
- oOo -
पुस्तक: 'डांगोरा: एका नगरीचा'
लेखक: त्र्यं. वि. सरदेशमुख
प्रकाशक: मौज प्रकाशन
आवृत्ती दुसरी (२००४)
पृष्ठे: १३६ - १३८.
---
संबंधित लेखन:
वेचताना... : डांगोरा: एका नगरीचा >>
---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा