बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

वेचताना... : नॉर्मा आणि कम्मो

“हे जीवघेणं गाणं आहे!... हो ना?”
“हो!”
“हे ऐकलं की एका मिनिटानं आयुष्य कमी होतं आणि अर्ध्या मिनिटानं वाढतं!”

जगण्यात काही क्षण असे सापडतात की तिथे अचानक स्तिमित होऊन माणूस स्तब्ध होतो. ‘कल और आएंगे नग्मोंकी खिलती कलियाँ चुननेवाले । मुझसे बेहतर कहनेवाले, तुमसे बेहतर सुननेवाले ॥’ म्हणत साहिरने माझ्यातल्या बुतशिकनला बुत बनवून ठेवला होता. वरची दोनच वाक्ये समोर ठेवून सासणेंनी मला पुतळाच बनवून ठेवले.

काही वर्षांपूर्वी ‘सनसेट बुलेवार्ड’ नावाचा एक चित्रपट पाहिला होता. मूकपटांच्या जमान्यातील कुणी प्रसिद्ध नटी, नॉर्मा. बोलपटाच्या आगमनानंतर झालेल्या तंत्रबदलातून जी वावटळ निर्माण झाली, त्यातून चंदेरी दुनियेतून पाचोळ्यासारखी बाहेर फेकल्या गेलेल्यांपैकी एक.

अत्यंत आत्मकेंद्रित, आपल्याच विश्वात जगणारी नॉर्मा वास्तव जगापासून पार अलिप्त आहे. या जगात आता तिला कणभर स्थान नाही याचे तिला भान नाही. जर ते आले, तर तिच्या भूतकाळाचा तिनेच रंगवलेला पडदा फाटून तिला एग्जिट घ्यावी लागेल अशी शक्यता आहे. हे ठाऊक असलेला तिचा माजी दिग्दर्शक, माजी नवरा, अक्षरश: तिचा नोकर बनून तिला जगवतो आहे; तिच्या श्रेष्ठत्वाचा भ्रम हर तर्‍हेने जिवंत ठेवतो आहे(१).

प्रसिद्ध खेळाडू, अभिनेते आणि राजकारणी यांच्यात एक साम्य असते. निवृत्ती हा त्यांना शाप असतो. एका झगमगाटात ते जगतात. अनेक वर्तुळांचे केंद्रबिंदू म्हणून त्यांचे जगणे असते. एक बटण दाबून बंद होणार्‍या दिव्यासारखे ते सारे विझून जाणे किंवा अगदी नाटकातल्या एखाद्या स्पॉटसारखे फेड-आउट होणेही त्यांना जमत नाही. मग या ना त्या प्रकारे ते ‘अजून यौवनात मी’ सिद्ध करण्याचा आटापिटा करत राहतात. गेलाबाजार आपल्या जमान्यातील दर्जा, प्रामाणिकपणा, बांधिलकी वगैरे आता न उरल्याचे अरण्यरुदन ऐकवत राहतात.

नॉर्माला नव्या चित्रसृष्टीत पुनरागमन करायचे आहे. त्यासाठी तिला एक उत्कृष्ट पटकथा हवी आहे. त्यासाठी ती एका तरुण लेखकाला अक्षरश: बंदिवान बनवून ती हे साध्य सिद्ध करु पाहते. अपेक्षेप्रमाणे तिची शोकांतिका होते... पण तशी ती झाली, इतके भानही तिला उरलेले नसते.

भूतकाळात जगणे, तो पुनर्जात करण्याचा आटापिटा करणे हे काही श्रेष्ठ, प्रसिद्ध लोकांची मक्तेदारी नाही. पुढे रडतखडत शिक्षण पुरे करुन कारकुनी करणार्‍याने उगाळलेले आपले ‘दोन मार्कांनी हुकलेले (दहावी) बोर्डात येणे’, एखाद्या स्थानिक क्लबच्या संघातही एका मोसमाहून अधिक टिकू न शकलेल्या फलंदाजाचे कुठल्याशा प्रदर्शनीय सामन्यात एखाद्या प्रसिद्ध गोलंदाजाच्या गोलंदाजीवर मारलेला चौकाराची गोष्ट चहा अथवा सिगरेटच्या सोबतीने मित्रांना पुन्हा पुन्हा सांगणे असेल... अशी अनेक उदाहरणे आसपास दिसतात.

जवळजवळ प्रत्येक व्यक्तिच्या बाबतीत भूतकाळाला असा तलम तुकडा चिकटलेला असतो. आणि भिंतीवर टांगलेल्या पूर्वजांच्या नाहीतर कोण्या आदर्श व्यक्तीच्या तसबिरीकडे पाहात तो आपले खुरटे आयुष्य ढकलत राहतो तसेच याचेही करत असतो. ज्यांच्याकडे ते ही नसते ते इतरांच्या भूतकाळात आपले स्थान घुसडण्याचा प्रयत्न करतात. आपल्यातला सर्वोच्च ‘मी’ जिवंत ठेवण्याचा आटापिटा ते करतात. इतकेच नव्हे ते तो काळ, तो क्षण पुनरुज्जीवीत, पुनर्जात करण्याची उमेद अथवा आशा बाळगून असतात. सासणेंच्या ’रेस्ट इज सायलन्स’च्या सुरुवातीला अशीच एक नॉर्मा आपल्या भेटीस आली आहे असे वाटू लागले होते. पण त्यांनी मला चकवले नि एक सुखद धक्का दिला.

ऐसा दुस्तर संसाऽर

सासणेंच्या या कथेमध्ये चंदेरी दुनियेत आपली काही पावले उमटवून आज विझल्या दिव्यांच्या विंगेत फेकली गेलेली कुणी कम्मो आहे. तिच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट अपुरा राहिलेला आहे. एका आगीमध्ये या चित्रपटाची आहुती पडलेली आहे. एक वृक्ष कोसळला की अनेक पाखरे रानभरी होतात, तसे तिच्यासोबतच अन्य लहान मोठे कलाकार, तंत्रज्ञ रसिकांच्या विस्मृतीच्या अंधारात फेकले गेले आहेत. नॉर्माच्या बाबतही असे घडले असणारच, पण सर्वस्वी आत्ममग्न असलेल्या तिला त्याचे सोयर-सुतक नव्हते.

पण कम्मो म्हणजे नॉर्मा नव्हे. तिने आपल्या घराच्या तळमजल्यावर या अंधाराच्या वारकर्‍यांसाठी ‘सूरज-महल’ नावाने एक कॅफे उघडला आहे. तिथे कम्मो असते, नसते. पण नॉर्मासारखे तिच्या भूतकाळाच्या पडद्यावर केवळ तिचेच चित्र नसते. तिचे सोबती असलेले सारे भूतकाळाचे प्रवासी तिथे ‘जगताहेत’. ती त्यांचा आधारस्वर आहे. त्या कॅफेचे स्थान वर्तमानात असले तरी तिथली हवा भूतकाळातली. त्या भूतकाळाच्या आधारे नवे फासे फेकले जातात... खेळ संपला की पट गुंडाळून पुन्हा पेटीत जातात.

श्वायट्झर आणि बाबा आमटे यांच्याबाबत बोलताना एक प्रसिद्ध विचारवंत म्हणाले होते ‘श्वायट्झरने माणसाला कुबड्या दिल्या तर बाबांनी पाय’. हे विश्लेषण तंतोतंत लागू पडत नसले तरी इतके नक्कीच म्हणता येईल की नॉर्मा सहकार्‍यांच्या खांद्यावर उभी होती तर कम्मो त्यांच्यासोबत!

एका नाटकाची प्रकृती घेऊन कम्मोची कथा उभी आहे. एखादा चांगला नाट्यलेखक तिचे सोने करील असे वाटून गेले...

कथा संपली. तो कॅफे अजून माझ्या अवतीभवती तसाच होता. तो विरुन जाईल अशी भीती वाटली. मग मीही भूतकालभोगी होण्यासाठी जालसाबच्या समोर बसलो. संपलेल्या डावानंतर त्याने पट पुन्हा सज्ज केला होता. मी राणीपुढचे प्यादे दोन घरे पुढे सरकवले, नि खेळ सुरु केला.

-oOo-

‘रेस्ट इज सायलन्स’या कथेमधील एक वेचा: प्रतीक्षा
---

(१). इथे ‘गुडबाय लेनिन’ या चित्रपटाची आठवण होते. एका अपघातात कोमात गेलेली पू. जर्मनीतील एक कट्टर नाझी कॉम्रेड बर्लिन भिंतीच्या पाडावानंतरच त्यातून बाहेर येते. या दरम्यात तिची प्रकृती नाजूक झाली असल्याने तिला कोणताही मानसिक धक्का बसू नये असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे ‘पू. जर्मनी अद्यापही कम्युनिस्टशासित आहे, तिचे ते जग अद्यापही तसेच आहे’ हा तिचा भ्रम जोपासण्यासाठी तिच्या मुलाने केलेला आटापिटा नॉर्माच्या नवर्‍यासारखाच.


हे वाचले का?