रविवार, १३ डिसेंबर, २०२०

वेचताना... : अडीच अक्षरांची गोष्ट

रक्ताने किंवा कायद्याने बांधलेली नातीच फक्त प्रेमाची धनी नसतात. प्रेमाच्या अनेक छटा आसपास विखुरलेल्या दिसतात. नैसर्गिक प्रेरणेला विसरुन, एखाद्या हरणाच्या पाडसाला दत्तक घेणार्‍या सिंहिणीचा वीडिओ मी पाहतो, तेव्हा त्या नात्याच्या अगम्यतेने स्तिमित होत असतो. थेट भिन्नवंशीय प्राण्यांतील हे प्रेम दूरचे राहिले, पण माणसानेच कृत्रिमरित्या निर्माण केलेल्या गटांच्या भिंती भेदून जाणारे प्रेम, स्नेह, बंध, आत्मीयता, हे देखील हिंसेइतकेच, लैंगिकतेइतकेच आदिम आहेत. पण आजच्या स्वयंघोषित वास्तववादी साहित्यिकांच्या खिजगणतीतही ते नसतात. आदिम प्रेरणा नि जाणीवा म्हणत सदैव हिंसेचा, लैंगिकतेचाच वेध घेणे हीच प्रागतिक साहित्याची खूण का मानली जाऊ लागली आहे, हा प्रश्न मला वारंवार पडत असतो.

अडीच अक्षरांची गोष्ट
    
    

रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं,
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं,
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं,
मोराच्या पिसा-यातील अद्भुत लावण्यावर करावं,
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं,
प्रेम खड्गाच्या पात्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

-कुसुमाग्रज
	

"प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं सेम असतं."

असं म्हणणारे पाडगांवकर बाळबोध ठरवले जातात. भावनिकता हा आधार असलेले, सकारात्मक मानवी बंधांची कहाणी सांगणारे लेखन हे फक्त गृहिणींसाठी असते, नि ग्रेस वाचणे हेच काय ते प्रगल्भ साहित्यप्रेमीचे लक्षण मानले जाते; असे का? बहुसांस्कृतिक, बहुभाषिक, बहुआयामी देशातील साहित्याचे हे आयामही महत्वाचे का मानू नयेत? प्रेमाच्या गोष्टी काय फक्त हिंदी सिनेमांनीच सांगाव्यात असे थोडेच आहे?

बॉक्सर महंमद अलीची जगातील सर्वच शोषित वर्गांप्रती असलेली बांधिलकी, द्वेषाकडून प्रेमाकडे प्रवास झालेला कुणी प्राध्यापक, केवळ पत्रांतून व्यक्त झालेली व्यक्ती आपली आयुष्याची जोडीदार व्हावी असे वाटावे इतपत खात्री पटलेले दोघे, दहशतवादी बापाचा मार्ग झुगारुन त्या दहशतवादाचे बळी नि संभाव्य बळी यांच्याशी आपले नाते जोडून आपल्या 'रिडेम्शन’च्या वाटे चालणारा झाक...

दहशतवादी हल्ले हे जगातील माणसांच्या अंगवळणी पडलेली बातमी. निर्लेपपणे ’किती गेले’ हे वाचून आपण पान उलटतो. फारतर मुठी वळून अशांना फाशीच दिले पाहिजे म्हणून आवेशाने बोलतो. खरंतर बोलणार्‍याने त्यात काहीही गमावलेले नसते, तरीही त्याची त्या मृत व्यक्तींशी कुठेतरी बांधिलकी असते. कदाचित म्हणूनच तो वांझ, अविचारी का होईना पण व्यक्त होत राहतो. पण ज्याने/जिने अशा दहशतवादी हल्ल्यात काही गमावले आहे तिचा संताप, त्वेष कदाचित द्वेष कित्येक पट असेल असा समज असतो आणि बहुधा तसा तो असतोही. 

पण अशा नृशंस अशा हल्ल्यात आपले पाय गमावलेली 'जिल' मात्र दहशतवाद्यांवर वा त्यांच्या जमातीवर सूड घेण्याचे सोडून, त्यांच्या वस्तीत जाऊन तेथील युवकांशी संवाद साधते, त्यांना अतिरेकी विचारांपासून परावृत्त करते; 'त्यांचे नातेवाईक, जातभाई हे ही दहशतवादीच असणार’ या सर्वसामान्यांच्या मनांतील अतिरेकी भूमिकेला छेद देते. हे माणसाचे माणसावरचे कुठल्या पातळीवरचे प्रेम म्हणायचे?

या प्रत्येकाच्या प्रेमाची जातकुळी वेगळी, व्याप्ती वेगळी. यात प्रतवारी लावताच येणार नाही, कशाला लावायची? आपल्याच गुन्हेगारांना क्षमा करण्याइतके अलोट प्रेम, स्नेह राणी मारियाच्या आई-बहिणीच्या, जिलच्या मनात कुठून उगवतो, तो तुमच्या-आमच्या मनांत का दिसून येत नाही? द्वेषाची वात झर्रकन पेटते, पण स्नेहाचे वा प्रेमाचे बंध मात्र तितक्या सहज जुळत नाहीत, काही वेळा जुळलेले तट्‍कन तुटून जातात. जितकी ऊर्जा एखाद्या जमातीचा सरसकट द्वेष करण्यासाठी वापरतो, तिच्या दशांशानेही प्रयत्न असे बंध निर्माण व्हावेत म्हणून आपण करत नाही, ते का? ते आणि आपण इतके वेगळे कसे? असे प्रश्न पडले तर ती तुमच्या जिवंतपणाची खूण मानता येईल.

... म्हणून त्याच कवितेत पाडगांवकर शेवटी म्हणतातच, ’तुमचं आणि आमचं सेम नसतं’. पण तिथे रुद्राक्ष माळा नि कपाळी आठ्या घालून बसलेल्यांना पाडगांवकर असं बजावतात, तर इथे हेच वाक्य मला ’अडीच अक्षरांची गोष्ट’ मधील प्रेमिकांना सांगायचे आहे ते उलट दिशेने आणि नम्रतेने. आमच्यासारख्या सामान्यांचे बोटचेपे, माफक प्रेम तुमच्या प्रमाथी आणि विविध सीमांना ओलांडून जाणार्‍या प्रेमासारखं कसं असेल? राणी मारियाच्या आई नि बहिणीसारखे आपल्या मुलीच्या वा बहिणीच्या खुन्यालाच मुलगा वा भाऊ मानण्याइतकी क्षमाशीलता आमच्या मनात कुठून असणार?

पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रसिद्ध पटकथालेखक, कवी अरविंद जगताप म्हणतात, "प्रेमाला आपण एवढे नियम लावून दिलेत की ते नियम पाळण्यात सगळा वेळ जातो आणि प्रेम करायचं राहून जातं. पण काही माणसं हे नियम झुगारून देतात. त्यांना नियम झुगारण्यात रस नसतो खरंतर, विद्रोहाची आगही नसते. असतं ते फक्त प्रेम."

थोडक्यात यात चित्रपटातल्या अभिनिवेशी प्रेमाचा बाजार नाही, इतरांसमोर स्वत:ला सिद्ध करण्याची अहमहमिका वा परपुष्टता नाही, आहे फक्त 'माझ्या आयुष्यात माझी ही मागणी आहे' ही सहजता आणि तिच्यावरील निष्ठा. 

अलीकडे लव्ह-जिहाद हा शब्द फार वारंवार ऐकू येतो. आमचे दोन मित्र असे होते की ज्यांनी ’त्यांची’ एक मुलगी काढून आणणार’ अशी प्रतिज्ञा केली होती. एकाची ’त्यांची’ ची व्याख्या जातीय होती तर दुसर्‍याची धर्मीय. या शहरातील मुलींच्या सुदैवाने... किंवा शहाणपणानेही असेल, त्यांना ते जमले नाही नि ’विद्रोही प्रेम’ करण्याची त्यांची इच्छा फलद्रूप झाली नाही. सुदैवाने पाहण्या-दाखवण्याच्या कार्यक्रमातून त्यांची लग्ने सफल झाली... अन्यथा व्हॅलेंटाईन-डे च्या माथेफिरु विरोधकांमध्ये आणखी दोनने भर पडली असती!

राज कपूरचे सिनेमे रशियात एकेकाळी प्रचंड लोकप्रिय होते, तिथे त्याचे एक दर्शन व्हावे म्हणून अहमहमिका चाले. अमेरिकेसारख्या प्रगत देशांत कॅब चालवून पोट भरणारा एक अल्जिरियन ड्रायवर मी इंडियन आहे हे समजताच त्याच्या लाडक्या किशोरकुमारवर अर्धा तास माझ्याशी धबधबा बोलत होता, त्याला आवडलेल्या गाण्यांची उजळणी करत होता. भारतात आणि गाण्यांत राहून, गाण्यांवर प्रेम करुनही, एखाद्या भारतीय गायकावर इतकं अलोट प्रेम मीही केलं नसेल. आपले हिंदी चित्रपट इतक्या दूरवर नुसते पाहिले जातात असे नव्हे, तर तिथले लोक त्यातील गायकावर असे अलोट प्रेम करतात, हा अनुभव मला चांगलाच सुखद धक्का देऊन गेला होता. त्याचं नाव तेवढं विचारायचं राहून गेलं...

सुरुवातीला दिलेल्या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या शेवटी जे म्हटले आहे, त्यावर माझ्या बाळबोध, बालिश मनाचा तरी नक्की विश्वास बसतो. प्रगल्भ म्हणवणार्‍यांनीही विचार करुन पहावा.

प्रेम कुणावरही करावं
कारण
प्रेम आहे
माणसाच्या संस्कॄतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष

आणि

भविष्यकालातील
त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव ..... !

संस्कृती आता फक्त अस्मितेचे झेंडे फडकवण्यापुरती वापरली जाते, इतिहासात आपण वितण्डाची बीजे शोधतो, "भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा" हे ध्यानात घेणे तर आपण साफ विसरुन गेलो आहोत.

-oOo -

छापण्यापूर्वी:
(प्रदीप आवटेंचे हे लेखन एका दैनिकातून स्तंभ स्वरुपात प्रकाशित होत असताना त्यांना लिहिलेले हे पत्र...)


प्रिय प्रदीप,

रविवारच्या 'दिव्य मराठी - रसिक' मधील तुझा 'राचेल कोरी'वरचा लेख वाचला आणि भडभडून आले. त्याच सेरीजमधले इतर लेख एक एक करून वाचले आणि प्रत्येक वेळी तळापासून हललो. डोळ्यात आलेल्या पाण्याची मला कधीच लाज वाटत नाही. तटस्थता आणि भावनाशून्यता यात फरक न समजणार्‍यांना वाटत असेल तर वाटू दे बापडी. पण मुर्दाडांच्या जगात आपण अजूनही जिवंत असल्याचे ते लक्षण मानतो मी.

पण दुर्दैव असे की इतक्या आतड्याने लिहिलेले कधी वाचण्यातच येत नाही, कारण तसे लिहिण्याइतके संवेदनशील लोक कुठे हरवून गेलेत कुणास ठाऊक. सततच्या नकारात्मक आणि 'ब्रेकिंग न्यूज'च्या कलकलाटात सकारात्मक कामांकडे दुर्लक्ष होऊ नये असा आग्रह मी सतत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आणि वेगवेगळ्या लोकांकडे धरत असतो. बहुतेक वेळा पालथ्या घड्यांवर पाणी ओतल्याचाच अनुभव आला, अगदी भल्या भल्या पुरोगामी वा समाजसेवेचे कंकण बांधून उभ्या राहिलेल्यांबाबतही फारसा वेगळा अनुभव नाही. 

त्यासाठी मी 'जनगर्जना'मधे 'ऐलपैल' सुरू केली. पण त्यातील लेखन हे प्रामुख्याने माहिती स्वरूपाचे आहे. तुझ्या लेखनात विषयवस्तूबद्दलची जी आच आहे, जी ऊब आहे ती त्यात नाही. कधीकाळी ललित लेखन करताना अति भावनावश झाल्याने ते अर्ध्यावरच थांबवले होते. त्यावेळची मनस्थिती आज तुझे लेख वाचताना पुन्हा अनुभवली.

तुझी ती राचेल, तो झाक, ती लक्ष्मी, त्यानेच हत्या केलेल्या राणी मारियाच्या कुटुंबाने आपलासा करत पुन्हा जीवनसंमुख केलेला समुंदर, तिलाकम आणि काथिर, सारेच या जगात उपरे म्हणावे लागतील. मी या गटाचा, तू त्या गटाचा म्हणजे माझ्यासह आमच्या गटाच्या कुणीही तुझा द्वेष केला पाहिजे, तुझे नुकसान केले पाहिजे, तू न केलेल्या गुन्ह्याबद्दल तुझा सूड घेतला पाहिजे, तुझी हत्या केली पाहिजे इतकेच समजणार्‍या समाजात रहायला नालायक आणि तरीही त्यांचे रोल मॉडेल व्हायला हवेत असे. स्वतःची ओळख जमावात शोधणार्‍या कमअस्सल लोकांच्या निर्बुद्ध जमावात स्वतःची स्वतंत्र ओळख असू शकते, आपल्या दोन पायांवर उभे राहता येते, त्यासाठी समाजाच्या भुक्कड कुचकामी कुबड्यांची गरज नसते हे तोंडपाटीलकी ऐवजी कृतीतून सिद्ध करणारे.

कुठे सापडतात तुला ही माणसं... हजारो, लाखो उन्मादी नृशंसांच्या समाजात कुठल्या सांदीकोपर्‍यात असतात ही माणसं? कसा पोचतोस तू त्यांच्यापर्यंत? ब्रेकिंग न्यूज, पर्दाफाश, स्टिंग ऑपरेशन्स, बाष्कळ नि वांझ चर्चांचे फड यांत रमलेले लोक नि त्यातून टीआरपीचे, पैशाचे पीक काढणारी चॅनेल्स, फक्त भडकाऊ किंवा अश्लील मेसेजेसच पाठवण्यासाठी वापरले जाणारे मोबाईल, लोकानुरंजनाचे किंवा स्वतः सुखवस्तू जगत विद्रोहाची गाणी गाणार्‍यांचे लेखन छापणारे प्रकाशक या अशा व्यक्तींकडे ढुंकून पाहात नाहीत. 

सतत दुसर्‍याने काय करावे, काय खावे, काय प्यावे, कुठे बोलावे, कुठे बोलू नये याची चिंता करणारी आणि आपल्या चुकांना सामोरे जाण्याऐवजी एकमेकांच्या पाठीमागे लपू पाहणार्‍या क्षुद्र माणसांच्या दृष्टीने तर ही माणसे अस्तित्वातच नाहीत. त्यांचे रोल मॉडेल्स वाचिवीर, बोलभांड नेत्यांमधून किंवा अभिनेत्यांमधून येतात (आज या दोघांत फारसा फरक राहिलेला नाही हे आणखी दुर्दैव). त्यातच धुमाकूळ घालणार्‍या भांडवलशाही नावाच्या राक्षसाने व्यक्तिवादाला इतके भयानक पातळीवर रुजवले आहे की 'समाजाचा विचार मी का करावा, इतरांचा विचार मी का करावा?' असे निर्लज्जपणे म्हणत स्वार्थी आयुष्य जगू पाहणारी मंडळी त्याचवेळी जातीच्या, धर्माच्या जमावात सुरक्षिततेचा शोध घेत राहतात. यातली उघड विसंगती न समजण्याइतके बौद्धिकदृष्ट्या ते खुजे होऊन बसले आहे. अशा काळात, अशा समाजात तुला ही अशी माणसं सापडतात तरी कशी नि कुठं?

गंमत पहा. आपल्या वयात फार अंतर नसूनही कालपर्यंत तुला अहो जाहो चे संबोधन वापरत होतो तो आज किती सहजपणे एकेरीवर आलो. कदाचित जे आकांताने सांगू बघत होतो ते दुसर्‍या कुणाच्या डोक्यात उगवून आलेले पाहून समाधानी झालो असेन किंवा असे असेल की आपण एकटेच व्यर्थ कंठशोष करतो आहोत हे वैफल्य, याच वाटेवर आपल्याही पुढे कुणीतरी चालते आहे हे पाहून 'योग्य वाटेवर असल्याची' खात्री पटून थोडा आश्वस्त झालो असेन.

काही का असेना, स्वतःला जगाच्या कल्याणाचे ठेकेदार म्हणवणार्‍या अमेरिकेपासून, स्वतःच स्वतःला श्रेष्ठ संस्कृतीचे सर्टिफिकेट देऊन टाकणार्‍या भारतातही माणूसपण विसरून जनावराहून खालच्या पातळीवर उतरलेल्या जमावाचे थैमान चालू झाले असताना, तुझी ही मालिका माझ्यासारख्याला अजून जगण्यावरचा आपला विश्वास टिकवून धरायला मदत करते आहे. पण बहुसंख्येचे काय... त्यांना जिवंत राहण्याची चिंता आहे, त्यासाठी इतरांना मारण्याची, त्यांचे खच्चीकरण करण्याची चिंता आहे; जगण्याची चिंता करण्याची फुरसत नसावी बहुधा. तुझ्या या लेखनाने एखादा जरी 'बाटला' तरी सप्तसिंधूपर्यटनाचे पुण्य गाठीला लागले असे म्हणायला हरकत नसावी.

तुझा मित्र,
- मंदार
---
पुस्तकातील एक वेचा:दुसरा रस्ता
---


हे वाचले का?

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

रावी के दो किनारे

सचिन कुंडलकर यांचा 'गंध' पाहात होतो. त्यात मिलिंद सोमणने 'रावी के उस पार...' चे एक जेमतेम एक कडवे म्हटले आहे. त्यातल्या रावीऽऽऽ वरची ती मींड काळजावर घाव घालून गेली. दुसर्‍यांदा ऐकताना बेट्याने काय कमाल केली आहे असे वाटून गेले.

वाटलं हा केवळ सर्वसाधारण अभिनेता असलेला माणूस ही जागा अशी वेधक घेऊ शकतो, तर मूळ गाण्यात काय बहार येत असेल. मग मूळ गाणे शोधायला गेलो. पत्ता लागला मूळ गाणे रावी के 'इस' पार आहे, 'उस'पार नव्हे! याची गायिका उमराव ज़िया बेगम पाकिस्तानी आहे हे ध्यानात घेतले तर हा भेद समजून जातो. (कुंडलकरांनी हा बदल हेतुत: केला असावा का?)

रावी के इस पार, सजनवा
रावी के इस पार

प्रेम का दरिया, प्रेम की नैया
प्रेम का चापू, प्रेम खेवैया
आजा कर के पार, सजनवा

बूढे जागे, बालक जागे
मेरे बालम ना, अबतक जागे
जाग उठा संसार, सजनवा

प्रेम पुजारी, बनकर आजा
प्रेम भिखारी, बनकर आजा
त्याग के सब संसार, सजनवा

इस दुनियासे दूर रहेंगे
प्रेम नशेमें चूर रहेंगे
गाएंगे गीत मल्हार, सजनवा
रावी के इस पार
---
१. चापू = होडीचे वल्हे
२. खेवैया = नावाडी

ते ऐकले, गाणे उत्तम आहे यात शंका नाही, पण नेमकी ती मींड तिथे नाही. मींड घेतली आहे पण अगदीच अदखलपात्र अशी भासते, त्यात तो 'लगाव' नाही! गाण्यातले सूर थोडेफार समजत असले तरी स्वरांबाबत बालवाडीपर्यंतही न पोचलेल्या आम्हाला आता 'कट्यार...' मधले खाँसाहेब सदाशिवला 'दिलमें प्यास जगाना, और उसे अधूरी छोडकर जाना...' असं का म्हणाले असतील हे समजून जाते.

पण गाण्याच्या सुरावटीसोबतच त्यातील शब्दांकडे लक्ष गेले आणि त्यामागची भावना लख्खकन चमकून गेली. एक पाकिस्तानी गायिका आपल्या प्रेमिकाला 'रावी के इस पार’ यायला सांगते आहे, याला केवळ शृंगारिक दृष्टीने पाहता येणार नाही. धर्माच्या आधारावर फाळणी करुन जमिनीचे दोन तुकडे करत त्यासोबत असंख्य नात्यांचे बंध कचाकच तोडून टाकल्यानंतरची ती वेदना दिसते.

यावरुन मला माझ्या दृष्टीने ’रावी केस इस पार’ असलेल्या ग़ज़लसम्राज्ञी बेग़म अख्तर यांचा एक किस्सा आठवला. साधारण पन्नास-बावन्नच्या सुमारास कराचीमध्ये लष्करी अधिकार्‍यांच्या एका कार्यक्रमात त्यांनी ’हमारी अटरियापे आओ सजनवा, सारा झगडा खतम हो जाए’ हा दादरा गायला होता. याची निवड हेतुत: केली का असा प्रश्न विचारल्यावर बाई फक्त मंद हसल्या होत्या म्हणतात$.

दोन्ही तीरांवरुन मारलेली ही हाक अर्थातच कुणाच्या कानावर पडली नाही, पडली तरी कुणी मनावर घेतली नाही. कारण प्रेमापेक्षा द्वेषाचे पीक हे अधिक वेगाने वाढते, लवकर कापणीला येते आणि बाजारभावही चांगला मिळतो. तिथे गावकुसाबाहेर ठेवलेल्या दोन स्त्रियांच्या दुबळ्या हाकांना कोण विचारतो.

खूप काही देऊ शकणारे नेमके काही देत नाहीत आणि काहीवेळा फारसे काही हाती नसणारेच एखादे अमूल्य दान पदरी टाकून जातात. फक्त दाता कुणीही असेल तरी दान घेण्यासाठी पदर पसरून याचक होण्याइतके नम्र होता आले पाहिजे.

- oOo -

छापता छापता:

मूळ गाणे कोणत्या वर्षीचे, त्याचा गीतकार/संगीतकार कोण याचा काहीच पत्ता लागला नाही. पण याच गाण्यावर केशवराव भोळे यांनी पं अनुज यांच्याकडून 'देखूं कबतक बांट’ ही बंदिश बांधून घेतली. १९३८ साली आलेल्या ’मेरा लडका’ या चित्रपटात ती शांता हुबळीकरांच्या आवाजात रेकॉर्ड झाली आहे. 'रावी के उस पार’ मारलेली हांक आणि त्याला 'देखूं कबतक बांट' हे मिळालेले उत्तर औचित्यपूर्ण ठरते.

देखूं कबतक बांट, पियरवा
देखूं कबतक बांट, तुम्हार

पथराई अंखियां, देखत, ढूंढत
एकही दिन मोरे, घर ना आवत
खाली बांट निहार, पियरवा ॥१॥

जिया तडपत है, जिया धडकत है,
दरस को तोरे, ललचाता मन है
जीवन के आधार, पियरवा ॥२॥

सागर उठती दूर तरंगे
तैरुं कहांसे, भारी उमंगे
ब्याकुल मैं इस पार, पियरवा ॥३॥

भेंट हमारी अब कब होगी?
प्रीतकी जोती मिलके जलेगी?
डूबे सब संसार, जगतमें
डूबे सब संसार, जगतमें ॥४॥ 
--- 

-oOo-

$. अंबरीश मिश्र यांच्या ’शुभ्र काही जीवेघेणे’ या पुस्तकातील ’अख्तरीबाई’ या लेखातून


हे वाचले का?