RamataramMarquee

सोमवार, २६ जुलै, २०२१

द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च

  • प्रथम टोळी, मग नीतिनियमादि चौकटी अधिक काटेकोर होत तिचा बनलेला समाज, पुढे पुनरुत्पादन प्रक्रियेची समज आल्यानंतर रक्ताच्या नात्याने बांधले गेलेले व्यापक कुटुंब, आणि माणूस जसजसा शहरी जीवन अंगीकारता झाला तसे ते संकुचित होत उदयाला आलेली एककेंद्री कुटुंब-व्यवस्था(१) ... या मार्गे माणसाच्या नात्यांच्या जाणीवांचा प्रवास होत गेला आहे.

    याचा पुढचा टप्पा बनू पाहात असलेले स्वकेंद्रितांचे दुभंग, विखंडित कुटुंब हे ‘फायनल डेस्टीनेशन’ ही अमेरिकेची संयुक्त संस्थानांची उरलेल्या जगाला देणगी असे म्हणण्यास फारशी कुणाची हरकत नसावी. विभक्त आई-वडील, शक्य तितक्या लवकर सुटी/स्वतंत्र होऊ पाहणारी मुले, त्यातून भावनिक बंधांना येणारा कमकुवतपणा, कोरडेपणाही अपरिहार्यपणे येतोच. मग त्याची भरपाई करण्यासाठी अगदी पौगंडावस्थेपासून जोडीदाराचा शोध; नात्यांच्या वैविध्याच्या अभावामुळे त्याच्याकडून असलेल्या अनेक-पदरी आणि म्हणून अवास्तव अपेक्षा, आणि त्या अपेक्षाभंगातून येणारे टोकाचे वैफल्य... टोळी-समाज-कुटुंब या मार्गे सर्वस्वी वैय्यक्तिक जगण्यापर्यंतचा हा प्रवास !

    कौटुंबिक गैरसमजांचे परस्पर-संवादातून निराकरण करणे, हा आता भारतासारख्या देशातही जवळजवळ अस्तंगत होत चाललेला प्रकार आहे. त्यामुळे हा समाज कुजत, सडत पडलेल्या गैरसमजांच्या जाणार्‍या अढ्यांचे गाठोडे घेऊन जगणार्‍या व्यक्तींचा होत चालला आहे. या अढ्यांच्या गढ्या, दोघांना केवळ समोर बसवले नि बोलते केले तर सहज उध्वस्त करता येतील हे समजणार्‍या, तेवढा समजूतदारपणा असलेल्या, आणि मुख्य म्हणजे ते घडवून आणणे हे आपण करायला हवे इतपत बंध राखून असलेल्या ’तिसर्‍यां’चा (मी ’त्रयस्थां’चा म्हणत नाही!) दुष्काळ पडलेला.

    पण सुदैवाने असे कुणी सापडले आणि त्याच्या/तिच्या मनात आपण आपले प्रतिबिंब पाहिले, तर त्या आरशात बरेचदा आपल्याच शिरावर असलेली दोन शिंगे आपल्याला दिसतात. आणि ज्या व्यक्तिबद्दल अढी धरली, ’केवळ तिच्याच शिरी शिंगे आहेत’ हा आपला समज धुळीला मिळतो. पण इतकेच नव्हे, तर त्या प्रतिबिंबाच्या पलीकडे खोलवर आणखी एक प्रतिबिंब दिसते, तो चेहरा नक्की आपला, की त्या तिसर्‍या व्यक्तीचा असा संभ्रम निर्माण होतो. त्या संभ्रमातून जो बंध तयार होतो त्यात पुन्हा भावनिकतेचे, आकर्षणाचे पेड वेटाळताना दिसतात. दोघेही पुरेसे समजूतदार असले, तर रुढ चौकटींपलीकडे जाऊन, त्या बंधाला नाव न देताही सामोरे जाता येते...

    २०१४ साली येऊन गेलेला ‘द मेड’ नावाचा एक ब्रिटिश चित्रपट चित्रपट मध्यंतरी पाहण्यात आला. माझ्यासारख्या आळशाच्या कानावर ते हे नाव कधी आले नव्हते. त्यामुळे बाजारात फार किंमत न मिळालेला असावा असा तर्क करायला हरकत नाही. किंवा हॉलीवुडचा नसल्याने आणि त्यात थरार, दे-दणादण मारामारी, स्तिमित करुन टाकणारे चित्रीकरण वगैरे मालमसाला अजिबात नसल्याने त्याला फारसे फुटेज इथे मिळाले नसावे. बाप आणि मुलगा हा सनातन संघर्ष, त्याचे चिघळत गेलेले भावनिक गुंते आणि नकळतपणे त्यात गुंतत गेलेली वडिलांकडची मेड म्हणजे गृहसहाय्यिका ही तीन पात्रे आणि एक घर इतका मर्यादित अवकाश घेऊन चित्रपट उभा आहे. या तिघांपलीकडे अन्य दोन पात्रे येतात ती अक्षरश: निमित्तमात्र नि काही सेकंदापुरती, एक दुय्यम मुद्दा समोर ठेवून लगेच फळा पुसल्यासारखी निघूनही जातात.

    चित्रपटाची जातकुळी खरं तर नाटकाची. मर्यादित पात्रे नि मर्यादित अवकाश यामुळे कथानकाचा भर प्रामुख्याने पात्र-निर्मितीवर, घटना नगण्य ! बहुतेक सारा भर संवादांवर आणि त्यातून भूत-वर्तमानाचे पेड उकलण्यावर. विस्तार कमी असला की खोलात जाण्याची मुभा अधिक राहते. आणि एरवी बहुसंख्य चित्रपटांतील वेगवान आणि भरगच्च घटनाक्रमाच्या रेट्यात वाहात जाताना फारसा गुंतू न शकलेल्या प्रेक्षक/वाचकालाही विचाराला वाव मिळतो, स्वत:ला जोडून पाहता येते.

    चित्रपटाच्या सुरुवातीलाच अमेरिकेत राहणारा जॅक आपल्या वडिलांकडे इंग्लंडला येतो. पुढे त्याचा भूतकाळ हा त्याच्या वडिलांशी आणि मुख्य म्हणे त्यांची मेड ‘मरिया’ हिच्याशी झालेल्या संवादातून सापडत जातो. यात फ्लॅशबॅकचा वापर केलेला नाही. सामान्यत: फ्लॅशबॅक हा भूतकाळात घडलेल्या घटना समोर ठेवण्यासाठी- क्वचित वर्तमानातील त्यांच्या परिणामांशी जोडून दाखवण्यासाठी वापरला जातो. यात समोर घडणार्‍या घटना प्रत्यक्ष घडलेल्या, वास्तव असतात. (अपवाद राशोमोनसारख्या मोजक्या चित्रपटांचा, ज्यात वास्तवाच्या ’शक्यता’ही चित्रित करुन समोर ठेवलेल्या असतात.) ’द मेड’मध्ये मात्र केवळ जॅक अथवा त्याचे वडील डेविड यांच्या निवेदनातून वा संवादातून भूतकाळ आपल्यासमोर मांडला जातो. तो त्या त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातूनच समोर येतो हे ध्यानात ठेवावे लागते. आणि म्हणून चित्रपट पाहताना एक महत्वाचा मुद्दा नीट ध्यानात ठेवायला हवा तो म्हणजे दृष्टिकोनाचा, सापेक्षतेचा !

    कुरोसावाच्या ‘राशोमोन’मध्ये एकाच घटनेचे, एकाहून अधिक व्यक्तींनी केलेले निवेदन, सापेक्षतेचा मुद्दा ठळक करते. तसे इथे नाही. परंतु जॅक आणि त्याच्या वडिलांच्या संबंधाने जो भूतकाळ समोर येतो, तो कुणाच्या निवेदनातून येतो, यानुसार त्याचे मूल्यमापन करायला हवे. निवेदकाच्या मूल्यमापनाचा पडदा दूर करुन केवळ घटनाक्रमाला नोंदवून घेत पुढे जायला हवे.

    जॅकच्या आईचा त्याच्या जन्माच्या वेळेसच मृत्यू झालेला. याला पोरके जगावे लागू नये, म्हणून तो जेमतेम वर्षाचा होईतो वडिलांनी दुसरे लग्न केले... असे ते सांगतात ! तर जॅकच्या मते ‘नवी आई स्वत:चे मूल जन्माला येईतो तशी चांगलीच वागली. परंतु स्वत:चे मूल झाल्यानंतर तिचे माझ्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. असे का? असे मी तिला विचारल्यावर तिने प्रथमच ती सावत्र आई असल्याचे सांगितले’ असे तो म्हणतो. पण आता जॅकला सावत्रपणाची जाणीव झाल्याने त्याच्या मनात अढी निर्माण होते. त्यातून त्याच्या वर्तनाला जे वळण लागते, त्यातून अपरिहार्यपणे त्याला अमेरिकेला त्याच्या मामाकडे शिकायला ठेवावे लागते.

    याबाबतही जॅक आणि त्याचे वडील यांचे मूल्यमापन भिन्न आहे. जॅकच्या मते त्याच्या सावत्र आईने केलेल्या सावत्रपणाच्या जाचामुळे त्याला घर सोडावे लागले, तर वडिलांच्या मते त्याने धाकट्या भावाच्या जन्मानंतर त्याचे वर्तन अधिकाधिक आक्रमक नि असह्य होऊ लागल्याने त्यांना नाईलाजाने तो निर्णय घ्यावा लागला. खरे तर दुसरे मूल झाल्यावर सख्ख्या थोरल्या भावंडाकडेही आईचे लक्ष कमी होते, हे अगदीच समजण्याजोगे आहे. जॅक म्हणतो त्याप्रमाणे ’आपण सावत्र आई आहोत’ हे त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याचे कारण म्हणून आईने कदाचित सांगितलेही नसावे. ही आई सावत्र आहे हे समजल्यानंतर बिथरलेल्या जॅकने तो स्वत:च काढलेला निष्कर्षही असू शकतो. दृष्टिकोन ध्यानात घ्यायचा म्हणतो ते यासाठी.

    आपल्या मुलाबाबत आपण आर्थिक जबाबदारी पार पाडली असली तरी, आपल्या व्यावसायिक बांधिलकीमुळे आणि भौगोलिक अंतरामुळे, बाप-मुलांत भावनिक बंध निर्माण व्हावा या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न आपण करू शकलो नाही हे जॅकच्या वडिलांना मान्यच आहे. त्या अपराधगंडातून ते मुळासमोर बहुतेक वेळ बचावात्मक पवित्र्यात दिसतात.

    तसा अपराधगंड जॅकलाही आहेच. तो स्वत:ला आपल्या आईच्या मृत्युसाठी जबाबदार धरतो आहे. पण तो अपराधगंड दडपून टाकण्यासाठी, तो उलट अधिक आक्रमक होत आपल्या वडिलांवरच दोषारोप करतो आहे. त्यांना तो सरळ ‘डेविड’ या नावानेच संबोधित करतो. रक्ताचे असल्याने नाते शिल्लक असले, तरी त्यातून निर्माण होणारा बाप-लेकाचा तो बंध तुझ्या-माझ्यात शिल्लक नाही, असे तो त्यांना अप्रत्यक्षपणे बजावतो आहे. वडिलांपासून तुटलेला आणि आईच्या मृत्यूला स्वत:ला जबाबदार असल्याच्या अपराधगंडाने पछाडलेला असा जॅक कुढत जातो, एकलकोंडा होतो, त्यातून अति-विचार करु लागतो आणि त्यामुळे समवयस्कांपासून तुटत जातो.

    दृष्टिकोनाबाबत आणखी एक वास्तव अधोरेखित करून ठेवायला हवे. डेविडच्या दुसर्‍या पत्नीला (आणि तिच्या मुलाला, जॅकच्या सावत्रभावालाही) संपूर्ण चित्रपटात कुठेही स्थान नाही. तिचे फक्त उल्लेख येतात. त्या अर्थी तिची बाजू कुठेच येत नाही. तिचे व्यक्तिमत्व जॅक वा डेविड यांच्या संवादातूनच उभे राहते. आणि म्हणून ते त्या दोघांच्या दृष्टिकोनाने अवगुंठित आहे. खरंतर कथानकाचा केंद्र पाहता, तिचे अस्तित्व तसे अभिक्रियेतील केवळ एक उत्प्रेरक (catalyst) इतकेच. त्या क्रियेला गतिमान करण्याइतके किंवा एक पार्श्वभूमी प्रदान करण्याइतकेच आहे. आणि म्हणून ती पडद्यावर कधीच येत नाही.

    काही वेळा एखाद्या पात्राचे अथवा व्यक्तीचे प्रेक्षक अथवा वाचकापर्यंत केवळ परोक्षपणे येणे हा एक चकवा असतो. आपण त्या व्यक्तीला त्या कथेतील कुण्या दुसर्‍या व्यक्तीच्या दृष्टिकोनातूनच पाहतो आहोत हे प्रेक्षक अथवा वाचक अनेकदा विसरुन जातो नि ती व्यक्ती तशीच आहे असे गृहित धरू लागतो. त्याबरोबर ’सावत्र आई’ या नात्याभोवती असलेल्या नकारात्मतेच्या वलयामुळे, त्या पूर्वग्रहामुळे सर्वसामान्य प्रेक्षकाच्या मनात तिच्याबद्दल रोष निर्माण होऊ शकतो... त्याला चित्रपटात कोणताही आधार नाही !

    जॅक आणि डेविड यांच्या संबंधांची घुसळण, त्याचे जॅक आणि मरियाच्या(२) संवादातून पडणारे प्रतिबिंब, आणि त्यातून परस्परांना उलगडत जाणारे – आणि गुंततही जाणारे – नात्यांचे अर्थ असा प्रवास आहे. यात ती सावत्र आई हे केवळ भूतकाळातील एक दुय्यम, केवळ निमित्तकारण असे अस्तित्व आहे. तिच्या अस्तित्वाशिवायही जॅक नि डेविड यांच्या नात्याचे तिढे – किंचित ढिले असते – बव्हंशी तसेच राहिले असते. तिच्याशिवाय जॅक आणि डेविड यांचे वेगळे होण्यास कदाचित दुसरे एखादे कारण निर्माण व्हावे लागले असते. आणि ते मिळेतो आणखी काही काळ त्या मोडक्या नात्यासह त्यांना नकोसे झालेले ते सहजीवन कंठावे लागले असते, ही एक शक्यताही होती. पण त्यांचे नाते दुभंगले ते प्रामुख्याने जॅकच्या अपराधगंडातून निर्माण झालेल्या आक्रमकतेतून, आणि डेविडच्या कार्यमग्नतेतून पुरेशा सहवासाअभावी क्षीण होत गेलेल्या आपलेपणातून, सावत्र आईमुळे नव्हे!

    एकुणात ही सावत्र आई आपल्या मनातील भयगंडाचे, पूर्वग्रहांचे प्रतीकच आहे. वास्तवाशी सुसंगत नसलेला आपला भयगंड, अन्यायाचा कांगावा हीच आपल्या आयुष्यातील सावत्र आई असते. ती केवळ आपल्या मनात असते, आपल्या अपयशाचे, अधोगतीचे खापर फोडण्यासाठी आपल्या मनातच उभे केलेले एक बुजगावणे, शोधलेला बळीचा बकरा!

    इथे जीएंच्या ‘प्रदक्षिणा’(३) या कथेचा उल्लेख करावासा वाटतो. त्यातले दादासाहेब हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व. सामाजिक, राजकीय दबदबा असलेले. पण हा कथेचा भाग नसलेला, त्यांच्या आयुष्याचा पूर्वार्ध. कथा त्याचा उत्तरार्ध सांगते. त्यांची साधारण व्यक्तिमत्व असणारी पत्नी, त्यांचा आश्रित असलेला भाऊ आणि त्यांची पूर्वाश्रमीची प्रेयसी असलेली पत्नीची बहीण, अशा त्यांच्या नातलगांच्या, सुहृदांच्या निवेदनातून दादासाहेब उलगडत जातात.

    कुरोसावाच्या ’राशोमोन’ या चित्रपटात विविध साक्षीदार एकाच घटनेसंदर्भात पर्यायी वास्तवाचे तुकडे समोर ठेवत जातात. त्या आधारे तो माणसाच्या मनातील स्वार्थ, पूर्वग्रह, अहंकार वगैरे भावनांचे त्याच्या समजुतीवर होणारे परिणाम अधोरेखित करत जातो. याउलट ’प्रदक्षिणा’ मध्ये एकाच वास्तवाचे कवडसे नव्हे, तर सारे मिळून एक पर्यायी वास्तव उभे करत आहेत. आणि या पर्यायी वास्तवामध्ये दादासाहेबांच्या प्रचलित व्यक्तिमत्वाच्या सर्वस्वी विपरीत असे व्यक्तिमत्व उभे राहते आहे.

    यात चटकन ’त्यांचा खरा चेहरा समोर आला’ असे एकतर्फी निदान केले जाण्याचा संभव आहे. पण दृष्टिकोनाचा विचार केला, तर दादासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वासमोर बहुतेकांना कायम दुय्यम भूमिका घ्यावी लागली असल्याने, त्यांच्या मनात असलेल्या रोषाचा अथवा कडवटपणाचा हा परिणाम असू शकतो. त्यांच्या मृत्यूनंतर ती खदखद बाहेर येऊ शकते. त्यातून त्यांच्या हयातीत न दिसलेले काही खरे-काही खोटे असे त्यांचे व्यक्तिमत्व रंगवले जाऊ शकते. ही शक्यता वाचकाला विसरुन चालत नाही.

    एखाद्या थोर व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा ’खरा इतिहास’ सांगणारे बरेच खोटारडेही असतात. जिवंतपणी त्याला नमवू न शकलेले त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या व्यक्तिमत्वावर शेणाचे थर देऊन ते विद्रूप करण्याची संधी साधत असतात. हे विसरलेल्या एका नाटकवाल्याने जीएंच्या त्या कथेच्या नाट्य-रूपांतरात त्यांची पत्नी संतापाने त्यांचा पुतळा फोडते असे दाखवून त्या कथेचे - जीएंच्या भाषेत -शेण केले होते.

    त्या कथेतील दादासाहेब आणि ’द मेड’मधील ही सावत्र आई या दोघांनाही वर्तमानात स्थान नाही हे एक साम्य दिसते खरे, पण एक फरक नोंदवून ठेवता येतो. ‘प्रदक्षिणा’ व्यक्तिच्या व्यक्तिमत्वाचे सापेक्ष असणे अधोरेखित करते. तिथे दादासाहेब ही एक केंद्रस्थानी असलेली विषयवस्तू आहे, तर ’द मेड’ मधील सावत्र आई ही केवळ जॅक-डेविड संबंधांची केवळ पार्श्वभूमी.

    इथे अलिकडे पाहण्यात आलेल्या ’ब्रॉडचर्च’ या मालिकेची आठवण होते. एका छोट्या गावात एका लहान मुलाची हत्या झाली आहे. शहरी जीवनाच्या तुलनेत अशा लहान वस्तीमध्ये असतात बहुतेक नागरिकांचे परस्परांशी निदान औपचारिक पातळीवरचे का होईना संबंध येतात. अशा गर्हणीय कृत्याने समाजाचा तो तुकडा ढवळून निघतो. तपास जसजसा वेगवेगळी वळणे घेत जातो तसतसे त्यात परस्पर-अविश्वास, संशय यांचे भोवरे तयार होतात. अखेरीस तपास-अधिकारी असणारी एली मिलर(४) तिच्या पतीला- 'जो मिलर'लाच या हत्येबद्दल आरोपी म्हणून अटक करते.

    मालिकेच्या दुसर्‍या सीझनमध्ये खटला उभा राहतो. पुरावे नि घटनाक्रम अगदी उघड असल्याने जो मिलरला शिक्षा होणार हे अपेक्षितच असते. पण इथेच न्यायव्यवस्था ही खरेतर 'निवाडा-व्यवस्था' आहे हे अधोरेखित करणार्‍या घटना घडतात. जो मिलरची बाजू लढवणारी शेरॉन बिशप ही त्याच पुराव्यांच्या आधारे एक पर्यायी घटनाक्रमाची शक्यता मांडून दाखवते.

    आता प्रेक्षकांनी घटनाक्रम संपूर्णपणे पाहिला आहे. शिवाय खुद्द एलीनेच तपास केलेला असल्याने तो खरा आहे याची तिला आणि तिचा तपासातील सहकारी अलेक हार्डी यांना माहित आहे. पण... न्यायालयासमोर मात्र तो पुराव्यांच्या आधारे मांडलेली घटनाक्रमाची एक ’शक्यता’च असते. त्यामुळे आता न्यायाधीश आणि ज्युरी यांच्यासमोर त्याच पुराव्यांच्या आधारे उभ्या केलेल्या दोन प्रतिस्पर्धी शक्यता आहेत. आणि त्यांना त्यातील एकीची ’अधिक संभाव्य’ म्हणून निवड करायची आहे. वास्तव काय हे त्या घटनाक्रमातील सहभागी व्यक्तींखेरीज कुणालाच नेमके समजलेले, खरेतर दिसलेले नसते. आकलनाची, स्वार्थाची, पूर्वग्रहाची छाया घेऊनच ते त्यांच्याही मनात रुजते. वास्तवाचे दूषित होणे तिथूनच सुरू होते. त्यामुळे न्यायाधीश, ज्युरी, तिथे उपस्थित अन्य व्यक्तीच नव्हे, तर आपण प्रेक्षकही पाहतो ते कुणीतरी त्यांचे, त्यांना आकलन झालेल्या वास्तवाचे आपल्यासमोर मांडलेले कवडसेच फक्त असतात.

    शेरॉन आपल्या वकीली कौशल्याचा वापर करुन आपला घटनाक्रम, आपले मूल्यमापन अधिक विश्वासार्ह असल्याचे ज्युरींना पटवून देते. आणि ज्याच्या पत्नीनेच त्याला अटक केली, जो गुन्हेगार आहे हे तिला नक्की ठाऊक आहे, अशा जो मिलरला आरोपमुक्त केले जाते. आपण स्क्रीनवर जे पाहिले ते नाकारून न्यायालय वेगळा (अनेकांच्या मनात ’चुकीचा’ असा शब्द उमटला असेल... तो चुकीचा आहे!) निर्णय देते हे प्रेक्षकांना पटत नाही. किंबहुना इथेच न्याय आणि निवाडा यातील फरक अधोरेखित होतो.

    न्यायालय हे सर्वस्वी तपास-यंत्रणेने समोर ठेवलेल्या पुराव्यांच्या, तपास-अहवालाच्या, नोंदींच्या, साक्षींच्या आधारेच निवाडा करत असते. एली तपास-अधिकारी नसता खुद्द न्यायाधीश असती, आणि तिला आपल्या पतीच्या गुन्ह्याबद्दल खात्री असती, तरी न्यायासनावर बसल्यानंतर त्याआधारे तिला निर्णय घेता आला नसता. तिला न्यायासनाच्या समोर जेवढे चित्र दिसले, तेवढाच पुरावा ग्राह्य मानावा लागला असता. यातून तिच्या खात्रीशीर माहितीच्या विपरीत असा निवाडा तिलाही द्यावा लागला असतात.

    ’द मेड’च्या अखेरीस जॅक आणि मारियाच्या सहवासातून संवादातून जॅकचा दृष्टीकोन अधिक व्यापक, कदाचित अधिक उदार होत जातो. तो बापाची बाजू समजून घेऊ पाहातो. इथे पुन्हा ’पोस्टमेन इन द माउंटन्स नावाच्या एका अप्रतिम चिनी चित्रपटाची आठवण होते.

    डोंगराळ भागात पत्र पोहोचवण्याच्या कामावर असल्याने आठवड्याचे सहा दिवस घराबाहेर असलेला बाप. तो सदैव बाहेर असल्याने घराचा दिनक्रम, त्यात येणार्‍या अडचणी, त्यावरील उपाय याबाबत सर्वस्वी अज्ञानी राहिलेला आहे. त्याच्या या उपेक्षेने त्याच्या मुलाच्या मनात जॅकप्रमाणेच त्याच्याबद्दल अढी निर्माण झाली आहे.

    पुढे गुडघ्याच्या त्रासामुळे बापाला लवकर निवृत्त व्हावे लागते. पण त्यापूर्वी आपली नोकरी आपल्या मुलालाच मिळावी याची तजवीज तो करून ठेवतो. या नोकरीच्या ’उमेदवारीच्या’ पहिल्याच फेरीत बाप नि मुलगा एकमेकांच्या जगाशी परिचित होत जातात. त्यांच्यातील अढी, दुरावा वितळत जातो. गंमत म्हणजे इथेही या दोघांच्याही आयुष्याचा कणा असलेली त्या पोस्टमनची पत्नी या कथानकात अगदी किमान स्थान मिळवू शकली आहे.

    माणसाच्या ग्रहणक्षमतेची मर्यादा, सापेक्षता, पूर्वग्रह, त्यामुळे तिढा पडलेली वा विरलेली नाती आणि निवाड्यातील वस्तुनिष्ठतेची अपरिहार्यता... असे अनेक मुद्दे जाताजाता या कथा, चित्रपट आणि मालिकांनी समोर माझ्यासमोर ठेवले आहेत.

    - oOo -

    टीपा:

    (१). ही संज्ञा तशी पुरुषप्रधान संस्कृतीची देणगी आहे. कुटुंबातील पुरुष हा केंद्र मानून त्याची पत्नी नि मुले हे एककेंद्री कुटुंब अशी ही व्याख्या. [↑]

    (२). जॅक आणि डेविडच्या कथेत मरिया केवळ तटस्थ श्रोता नाही. तिचीही स्वत:ची अशी कहाणी आहे. तिच्या जॅकमध्ये गुंतण्यातून तिच्यातील आई आणि मादी या दोन भूमिकांतील ताणाला ती सामोरी जाते आहे. ’द मेड’ ही एकप्रकारे जॅक, डेविड सोबतच मरियाचीही बंधनमुक्ती आहे. [↑]

    (३). जी. ए. कुलकर्णी यांच्या ’काजळमाया’ या कथासंग्रहातील पहिली कथा. [↑]

    (४). फोलपट-मसाला प्रेमींसाठी: 'फेव्हरिट’ या चित्रपटातील एलिझाबेथ-पहिलीच्या भूमिकेबद्दल २०१९ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या ऑलिव्हिया कोलमन हिने ही भूमिका केली आहे. [↑]

    ---

    संबंधित लेखन:
    सत्य-असत्याची कोण देई ग्वाही (पूर्वार्ध) : प्रचलित निकष
    बिम्मच्या पतंगावरून - ३ : प्रतिबिंबांचा प्रश्न


हे वाचले का?

बुधवार, १४ जुलै, २०२१

चार प्रार्थना

  • प्रार्थना हा गीतप्रकार असा आहे की ज्यात श्रद्धेपेक्षा भावनेला अधिक आवाहन असते. शिव-विष्णूची केली, अल्लाहची केली की येशूची हा मुद्दा गौण होऊन गीतातील भाव जेव्हा ऐकणार्‍यापर्यंत पोचवते ती कविता म्हणजे प्रार्थना. एखाद्या नास्तिकालाही मंत्रमुग्ध करु शकते, तो ही जिच्याशी तद्रूप होऊ शकते ती प्रार्थना. शेवटी श्रद्धास्थान ही माणसाच्या कल्पनेचीच निर्मिती असल्याने, त्याच्या प्रार्थनेची परिणामकारकताही त्याच्या मनाच्या, शब्दांच्या आणि भावनेच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असते.

    मी स्वत:ला हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती अशा धार्मिक अथवा सश्रद्ध, अश्रद्ध, अज्ञेयवादी अशा कृत्रिम आणि तरीही धूसर सीमारेषांच्या वर्गीकरणांच्या चौकटीत तपासून पाहात नाही. आवड, नावड आणि निवड यांच्याशी प्रामाणिक राहात जे पटेल आवडेल त्याचा स्वीकार आणि जे रुचणार नाही, पटणार नाही त्याचा अस्वीकार (नकार नेहमीच आवश्यक असतो असे मी मानत नाही.) या बाण्याने चालत असतो. रामाच्या नावावर चाललेल्या राजकारण, द्वेषकारण तर सोडाच, पण श्रद्धेचाही मला स्पर्श झालेला नाही. असे असूनही गीतरामायणासारख्या एकाहून एक अस्खलित गाण्यांचा ठेवा मला अतिशय प्रिय आहे. गदिमा आणि बाबूजी या परस्परविरोधी विचारसरणीच्या दोघांनी एकत्र येऊन उभे केलेले ते अजोड लेणे आहे असे मी मानतो. त्याचप्रमाणे, रूढार्थाने अश्रद्ध असूनही अनेक प्रार्थनागीतेही मला भावलेली आहेत. त्यातील चार (निवडत न बसता जशी सापडली तशी ) इथे जोडतो आहे. गीतरामायणामध्ये जसा शब्द-सुरांचा अजोड मिलाफ आहे, तसेच इथे निवडलेल्या चार गाण्यांमध्ये शब्द नि सूर दोन्हींचा मेळ अतिशय एकजीव होऊन गेला आहे.

    हे पहिले गाणे आहे ते उबुंटू चित्रपटातले. हे कधीही ऐकले तरी डोळे ओलावल्याखेरीज राहात नाहीत. हे गाणे मी अनेकदा ऐकले. क्वचित फेसबुकवर शेअर केलेही असेल. गंमत म्हणजे या गीताचा गीतकार/कवी समीर सामंत हा फेसबुकमधील मित्रयादीत होता. त्याच्याशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर तिथे बोलणेही होई. पण हाच मनुष्य आपल्या आवडत्या गाण्याचा गीतकार आहे याचा मला फेसबुकवरुन निवृत्ती घेतल्यावरच पत्ता लागला. एरवी एखादा जाहीर कार्यक्रम सादर केला, वा चार गाण्यांचा अल्बम काढला, तरी समाजमाध्यमांवर स्वत:च्या नावापुढे गीतकार वा संगीतकार म्हणून पदवी लावणारे नमुने तिथे बरेच सापडतात. या भाऊगर्दीत हा माणूस- अधूनमधून आपल्या कविता वा गाणी शेअर करत असला, तरी असे मिरवत नसल्याने मी चक्क चकलो होतो.

    ग्रेसने ’पाणकळा’ असा शब्द वापरला आहे. हे गाणे ऐकताना त्याची अनुभूती न चुकता येत असते.

    हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
    माणसाने, माणसाशी, माणसासम वागणे

    धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
    एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
    अन् पुन्हा पसरो मनावर, शुद्धतेचे चांदणे
    माणसाने, माणसाशी, माणसासम वागणे

    भोवताली दाटला, अंधार दुःखाचा जरी,
    सूर्य सत्याचा, उद्या उगवेल आहे खातरी,
    तोवरी देई आम्हाला, काजव्यांचे जागणे
    माणसाने, माणसाशी, माणसासम वागणे

    लाभले आयुष्य जितके, ते जगावे चांगले
    पाउले चालो पुढे, जे थांबले ते संपले
    घेतला जो श्वास आता, तो पुन्हा ना लाभणे
    माणसाने, माणसाशी, माणसासम वागणे

    - oOo -

    दुसरी प्रार्थना आहे गुरु ठाकूर यांची. यांनी 'नटरंग’मध्ये लावण्या लिहिल्या, 'टाईमपास’मध्ये ’ही पोरगी साजुक तुपातली’ लिहून दोन-तीन गणेशोत्सवांच्या दणदणाटात आपला हिस्सा मिळवला. लोकमान्य, डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारख्या चरित्रपटांसाठीही गाणी लिहिली.

    मराठीमध्ये कवी आणि गीतकार अशी जातिव्यवस्था मानण्याची एक वाईट पद्धत आहे. ’फुकट लिहिणार्‍यांस थेट प्रवेश’ अशी पाटी लावलेल्या माध्यमांत दोन चार बेमुर्वतछंदातल्या... आय मिन मुक्तच्छंदातल्या कविता छापून स्वत:ला 'कवी' म्हणवणाराही चित्रपट वा मालिकांसाठी गाणी लिहिणार्‍या गीतकारापेक्षा स्वत:ला चार आणे श्रेष्ठ समजत असतो. गुरू ठाकूर यांच्यासारखा गीतकार, कवी याला सणसणीत उत्तर असतो. त्यांच्या किमान दोन कविता या जुन्या प्रसिद्ध कवींच्या समजून अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहे.

    त्यांची ’आयुष्याला द्यावे उत्तर’ ही कविता विंदाची समजून त्यांच्या फोटोसह इतकी फिरली की त्यांना नाईलाजाने दहा ठिकाणी याचा खुलासा करावा लागला. गंमत म्हणजे ही कविता बालभारतीच्या इयत्ता ७वीच्या पुस्तकात त्यांच्या नावे प्रसिद्ध झालेली असूनही हा गोंधळ झाला. इथे जोडलेली कविताही ’डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटात वापरली गेली आहे. यू-ट्यूबवरील काही मंडळींसह अन्यत्रही ही कविता प्रकाश आमटे यांच्या नावेच फिरते आहे.

    तू बुद्धि दे, तू तेज दे
    नवचेतना विश्वास दे
    जे सत्य सुंदर सर्वथा,
    आजन्म त्याचा ध्यास दे…

    हरवले आभाळ ज्यांचे
    हो तयांचा सोबती,
    सापडेना वाट ज्यांना
    हो तयांचा सारथी,
    साधना करिती तुझी जे
    नित्य तव सहवास दे…

    जाणवाया दुर्बलांचे
    दुःख आणि वेदना,
    तेवत्या राहो सदा
    रंध्रातुनी संवेदना,
    धमन्यातल्या रुधिरास या
    खल भेदण्याची आस दे,
    सामर्थ्य या शब्दांस
    आणि अर्थ या जगण्यास दे…

    सन्मार्ग आणि सन्मती
    लाभो सदा सत्संगती,
    नीती नाही भ्रष्ट हो
    जरी संकटे आली किती,
    पंखास या बळ दे नवे
    झेपावण्या आकाश दे…

    - oOo -

    प्रार्थनागीत म्हटले की ’उंबरठा’मधील अजरामर ’गगन-सदन तेजोमय’चा समावेश अपरिहार्य आहे. तिलक-कामोद रागाची बंदिशच म्हणावी इतके हे गीत त्या रागाला सोबत घेऊन जाते आहे. अगदी रागसंगीताच्या चाहत्यांनाही तिलक-कामोद म्हटल्यावर कोणत्याही बंदिशीआधी हे गाणेच आठवते. फारतर ’वितरी प्रखर तेजोबल’ या दीनानाथ मंगेशकरांनी गायलेल्या नाट्यगीताची आठवण होईल.

    पण ही दोनही गीते ज्या 'परमपुरुषनारायण' या बंदिशीवरुन बांधली आहेत ती आज कुणाला आठवतही नाही. या मूळ बंदिशीवरुन वझेबुवांनी 'रणदुंदुभी'तील वीर वामनराव जोशींचे पद बांधले नि दीनानाथांनी ते गायले. वडिलांच्या त्या पदावरुन हृदयनाथांनी ही प्रार्थना संगीतबद्ध केली. रात्रीच्या मैफली आता सरकारी वटहुकूमानुसार बंद झाल्यामुळे, आणि प्रहरांचे गणित मोडून अन्य वेळी तो गाण्याचे ’पाप’ गायक मंडळी करत नसल्याने, हल्ली तो राग ऐकायला मिळणे दुरापास्तच झाले आहे.

    वर गीतरामायणासंदर्भात दोन परस्परविरोधी विचारांच्या कलाकारांच्या साहचर्याचा उल्लेख आला आहे. हे अविस्मरणीय गीतही राष्ट्रसेवादलाच्या पठडीतले वसंत बापट आणि सावरकरांच्या हिंदुत्ववादाचा वारसा सांगणार्‍या मंगेशकर कुटुंबियांच्या सहकार्याचे फलित आहे.

    गगन-सदन तेजोमय
    तिमिर हरून, करुणाकर
    दे प्रकाश, देई अभय
    
    छाया तव, माया तव
    हेच परम पुण्यधाम
    वाऱ्यातुन, ताऱ्यांतुन
    वाचले तुझेच नाम
    जग, जीवन, जनन, मरण
    हे तुझेच रूप सदय
    
    वासंतिक कुसुमांतुन,
    तूच मधुर हासतोस
    मेघांच्या धारांतून,
    प्रेमरूप भासतोस
    कधी येशील चपल-चरण
    वाहिले तुलाच हृदय
    
    भवमोचन हे लोचन
    तुजसाठी दोन दिवे
    कंठतील स्वर मंजुळ
    भावमधुर गीत नवे
    सकलशरण, मनमोहन
    सृजन तूच, तूच विलय 
    
    - oOo - 

    ही चौथी आणि अखेरची प्रार्थना अरुण म्हात्रेंची. अरुण म्हात्रे यांनी गीते लिहिण्यापूर्वीपासून मी त्यांना कवी म्हणूनच ओळखतो. कवी निरंजन उजगरे, अशोक बागवे, अशोक नायगावकर, नलेश पाटील आणि महेश केळुसकर या तेव्हाच्या ताज्या दमाच्या कवी मंडळींना सोबत घेऊन त्यांनी 'कवितांच्या गावा जावे’ हा कविता-वाचनाचा कार्यक्रम राज्यभर लोकप्रिय केला होता. त्यातील निवडक कवितांचे पुस्तकही प्रकाशित झाले. पुढे या सहा जणांचे वैयक्तिक कविता-संग्रहदेखील वाचण्यात आले. त्यांतील निवडक कविता यथावकाश ’वेचित...’ वर प्रसिद्ध करेनच.

    मार्ग लाभो पावलांना ही तृणाची याचना
    लाभु दे ऐसा वसा की जन्म होवो प्रार्थना
    
    जन्मती जन्मासवें काही रूढींची बंधने
    दोर नियमांचे जखडती, हे मनाचे चांदणे
    संपु दे त्याच्या व्रताने ही युगाची वंचना
    
    जाणत्यांचा धर्म असतो माणसाला जाणणे
    आपल्या आतील दु:खे स्वेतरांतून वाचणे
    सार सार्‍या धर्मपंथांचे असे सहवेदना
    
    काय जे जमिनीवरी आहेत ते मातीतले?
    का तयांना वर्ज्य हे आनंद या वार्‍यातले
    लाभु दे अवकाश त्यांसी ही मनाला सांत्वना 
    
    - oOo - 

    या चारपैकी ही शेवटची प्रार्थना प्रथम संग्रहित केली होती. मग इतर दोन सापडल्यानंतर त्यांची अशी एकत्र मोट बांधण्याचा निर्णय घेतला.

    या चारही गीतांना शेअर करताना मूळ चित्रपट अथवा मालिकेतील प्रसंग हेतुत:च घेतलेला नाही. प्रार्थना ही डोळे मिटून अनुभवण्याची गोष्ट आहे. समोर दिसणार्‍या फाफटपसार्‍याकडून लक्ष काढून घेऊन फक्त तिच्यावरच लक्ष केंद्रित करायचे असते.

    - oOo -


हे वाचले का?