बुधवार, १४ जुलै, २०२१

चार प्रार्थना

प्रार्थना हा गीतप्रकार असा आहे की ज्यात श्रद्धेपेक्षा भावनेला अधिक आवाहन असते. शिव-विष्णूची केली, अल्लाहची केली की येशूची हा मुद्दा गौण होऊन गीतातील भाव जेव्हा ऐकणार्‍यापर्यंत पोचवते ती कविता म्हणजे प्रार्थना. एखाद्या नास्तिकालाही मंत्रमुग्ध करु शकते, तो ही जिच्याशी तद्रूप होऊ शकते ती प्रार्थना. शेवटी श्रद्धास्थान ही माणसाच्या कल्पनेचीच निर्मिती असल्याने, त्याच्या प्रार्थनेची परिणामकारकताही त्याच्या मनाच्या, शब्दांच्या आणि भावनेच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असते.

मी स्वत:ला हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती अशा धार्मिक अथवा सश्रद्ध, अश्रद्ध, अज्ञेयवादी अशा कृत्रिम आणि तरीही धूसर सीमारेषांच्या वर्गीकरणांच्या चौकटीत तपासून पाहात नाही. आवड, नावड आणि निवड यांच्याशी प्रामाणिक राहात जे पटेल आवडेल त्याचा स्वीकार आणि जे रुचणार नाही, पटणार नाही त्याचा अस्वीकार (नकार नेहमीच आवश्यक असतो असे मी मानत नाही.) या बाण्याने चालत असतो. रामाच्या नावावर चाललेल्या राजकारण, द्वेषकारण तर सोडाच, पण श्रद्धेचाही मला स्पर्श झालेला नाही. असे असूनही गीतरामायणासारख्या एकाहून एक अस्खलित गाण्यांचा ठेवा मला अतिशय प्रिय आहे. गदिमा आणि बाबूजी या परस्परविरोधी विचारसरणीच्या दोघांनी एकत्र येऊन उभे केलेले ते अजोड लेणे आहे असे मी मानतो. त्याचप्रमाणे, रूढार्थाने अश्रद्ध असूनही अनेक प्रार्थनागीतेही मला भावलेली आहेत. त्यातील चार (निवडत न बसता जशी सापडली तशी ) इथे जोडतो आहे. गीतरामायणामध्ये जसा शब्द-सुरांचा अजोड मिलाफ आहे, तसेच इथे निवडलेल्या चार गाण्यांमध्ये शब्द नि सूर दोन्हींचा मेळ अतिशय एकजीव होऊन गेला आहे.

हे पहिले गाणे आहे ते उबुंटू चित्रपटातले. हे कधीही ऐकले तरी डोळे ओलावल्याखेरीज राहात नाहीत. हे गाणे मी अनेकदा ऐकले. क्वचित फेसबुकवर शेअर केलेही असेल. गंमत म्हणजे या गीताचा गीतकार/कवी समीर सामंत हा फेसबुकमधील मित्रयादीत होता. त्याच्याशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर तिथे बोलणेही होई. पण हाच मनुष्य आपल्या आवडत्या गाण्याचा गीतकार आहे याचा मला फेसबुकवरुन निवृत्ती घेतल्यावरच पत्ता लागला. एरवी एखादा जाहीर कार्यक्रम सादर केला, वा चार गाण्यांचा अल्बम काढला, तरी समाजमाध्यमांवर स्वत:च्या नावापुढे गीतकार वा संगीतकार म्हणून पदवी लावणारे नमुने तिथे बरेच सापडतात. या भाऊगर्दीत हा माणूस- अधूनमधून आपल्या कविता वा गाणी शेअर करत असला, तरी असे मिरवत नसल्याने मी चक्क चकलो होतो.

ग्रेसने ’पाणकळा’ असा शब्द वापरला आहे. हे गाणे ऐकताना त्याची अनुभूती न चुकता येत असते.

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने, माणसाशी, माणसासम वागणे

धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर, शुद्धतेचे चांदणे
माणसाने, माणसाशी, माणसासम वागणे

भोवताली दाटला, अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा, उद्या उगवेल आहे खातरी,
तोवरी देई आम्हाला, काजव्यांचे जागणे
माणसाने, माणसाशी, माणसासम वागणे

लाभले आयुष्य जितके, ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे, जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता, तो पुन्हा ना लाभणे
माणसाने, माणसाशी, माणसासम वागणे

- oOo -

दुसरी प्रार्थना आहे गुरु ठाकूर यांची. यांनी 'नटरंग’मध्ये लावण्या लिहिल्या, 'टाईमपास’मध्ये ’ही पोरगी साजुक तुपातली’ लिहून दोन-तीन गणेशोत्सवांच्या दणदणाटात आपला हिस्सा मिळवला. लोकमान्य, डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारख्या चरित्रपटांसाठीही गाणी लिहिली.

मराठीमध्ये कवी आणि गीतकार अशी जातिव्यवस्था मानण्याची एक वाईट पद्धत आहे. ’फुकट लिहिणार्‍यांस थेट प्रवेश’ अशी पाटी लावलेल्या माध्यमांत दोन चार बेमुर्वतछंदातल्या... आय मिन मुक्तच्छंदातल्या कविता छापून स्वत:ला 'कवी' म्हणवणाराही चित्रपट वा मालिकांसाठी गाणी लिहिणार्‍या गीतकारापेक्षा स्वत:ला चार आणे श्रेष्ठ समजत असतो. गुरू ठाकूर यांच्यासारखा गीतकार, कवी याला सणसणीत उत्तर असतो. त्यांच्या किमान दोन कविता या जुन्या प्रसिद्ध कवींच्या समजून अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहे.

त्यांची ’आयुष्याला द्यावे उत्तर’ ही कविता विंदाची समजून त्यांच्या फोटोसह इतकी फिरली की त्यांना नाईलाजाने दहा ठिकाणी याचा खुलासा करावा लागला. गंमत म्हणजे ही कविता बालभारतीच्या इयत्ता ७वीच्या पुस्तकात त्यांच्या नावे प्रसिद्ध झालेली असूनही हा गोंधळ झाला. इथे जोडलेली कविताही ’डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटात वापरली गेली आहे. यू-ट्यूबवरील काही मंडळींसह अन्यत्रही ही कविता प्रकाश आमटे यांच्या नावेच फिरते आहे.

तू बुद्धि दे, तू तेज दे
नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा,
आजन्म त्याचा ध्यास दे…

हरवले आभाळ ज्यांचे
हो तयांचा सोबती,
सापडेना वाट ज्यांना
हो तयांचा सारथी,
साधना करिती तुझी जे
नित्य तव सहवास दे…

जाणवाया दुर्बलांचे
दुःख आणि वेदना,
तेवत्या राहो सदा
रंध्रातुनी संवेदना,
धमन्यातल्या रुधिरास या
खल भेदण्याची आस दे,
सामर्थ्य या शब्दांस
आणि अर्थ या जगण्यास दे…

सन्मार्ग आणि सन्मती
लाभो सदा सत्संगती,
नीती नाही भ्रष्ट हो
जरी संकटे आली किती,
पंखास या बळ दे नवे
झेपावण्या आकाश दे…

- oOo -

प्रार्थनागीत म्हटले की ’उंबरठा’मधील अजरामर ’गगन-सदन तेजोमय’चा समावेश अपरिहार्य आहे. तिलक-कामोद रागाची बंदिशच म्हणावी इतके हे गीत त्या रागाला सोबत घेऊन जाते आहे. अगदी रागसंगीताच्या चाहत्यांनाही तिलक-कामोद म्हटल्यावर कोणत्याही बंदिशीआधी हे गाणेच आठवते. फारतर ’वितरी प्रखर तेजोबल’ या दीनानाथ मंगेशकरांनी गायलेल्या नाट्यगीताची आठवण होईल.

पण ही दोनही गीते ज्या 'परमपुरुषनारायण' या बंदिशीवरुन बांधली आहेत ती आज कुणाला आठवतही नाही. या मूळ बंदिशीवरुन वझेबुवांनी 'रणदुंदुभी'तील वीर वामनराव जोशींचे पद बांधले नि दीनानाथांनी ते गायले. वडिलांच्या त्या पदावरुन हृदयनाथांनी ही प्रार्थना संगीतबद्ध केली. रात्रीच्या मैफली आता सरकारी वटहुकूमानुसार बंद झाल्यामुळे, आणि प्रहरांचे गणित मोडून अन्य वेळी तो गाण्याचे ’पाप’ गायक मंडळी करत नसल्याने, हल्ली तो राग ऐकायला मिळणे दुरापास्तच झाले आहे.

वर गीतरामायणासंदर्भात दोन परस्परविरोधी विचारांच्या कलाकारांच्या साहचर्याचा उल्लेख आला आहे. हे अविस्मरणीय गीतही राष्ट्रसेवादलाच्या पठडीतले वसंत बापट आणि सावरकरांच्या हिंदुत्ववादाचा वारसा सांगणार्‍या मंगेशकर कुटुंबियांच्या सहकार्याचे फलित आहे.

गगन-सदन तेजोमय
तिमिर हरून, करुणाकर
दे प्रकाश, देई अभय

छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वाऱ्यातुन, ताऱ्यांतुन
वाचले तुझेच नाम
जग, जीवन, जनन, मरण
हे तुझेच रूप सदय

वासंतिक कुसुमांतुन,
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतून,
प्रेमरूप भासतोस
कधी येशील चपल-चरण
वाहिले तुलाच हृदय

भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठतील स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकलशरण, मनमोहन
सृजन तूच, तूच विलय 

- oOo - 

ही चौथी आणि अखेरची प्रार्थना अरुण म्हात्रेंची. अरुण म्हात्रे यांनी गीते लिहिण्यापूर्वीपासून मी त्यांना कवी म्हणूनच ओळखतो. कवी निरंजन उजगरे, अशोक बागवे, अशोक नायगावकर, नलेश पाटील आणि महेश केळुसकर या तेव्हाच्या ताज्या दमाच्या कवी मंडळींना सोबत घेऊन त्यांनी 'कवितांच्या गावा जावे’ हा कविता-वाचनाचा कार्यक्रम राज्यभर लोकप्रिय केला होता. त्यातील निवडक कवितांचे पुस्तकही प्रकाशित झाले. पुढे या सहा जणांचे वैयक्तिक कविता-संग्रहदेखील वाचण्यात आले. त्यांतील निवडक कविता यथावकाश ’वेचित...’ वर प्रसिद्ध करेनच.

मार्ग लाभो पावलांना ही तृणाची याचना
लाभु दे ऐसा वसा की जन्म होवो प्रार्थना

जन्मती जन्मासवें काही रूढींची बंधने
दोर नियमांचे जखडती, हे मनाचे चांदणे
संपु दे त्याच्या व्रताने ही युगाची वंचना

जाणत्यांचा धर्म असतो माणसाला जाणणे
आपल्या आतील दु:खे स्वेतरांतून वाचणे
सार सार्‍या धर्मपंथांचे असे सहवेदना

काय जे जमिनीवरी आहेत ते मातीतले?
का तयांना वर्ज्य हे आनंद या वार्‍यातले
लाभु दे अवकाश त्यांसी ही मनाला सांत्वना 

- oOo - 

या चारपैकी ही शेवटची प्रार्थना प्रथम संग्रहित केली होती. मग इतर दोन सापडल्यानंतर त्यांची अशी एकत्र मोट बांधण्याचा निर्णय घेतला.

या चारही गीतांना शेअर करताना मूळ चित्रपट अथवा मालिकेतील प्रसंग हेतुत:च घेतलेला नाही. प्रार्थना ही डोळे मिटून अनुभवण्याची गोष्ट आहे. समोर दिसणार्‍या फाफटपसार्‍याकडून लक्ष काढून घेऊन फक्त तिच्यावरच लक्ष केंद्रित करायचे असते.

- oOo -


संबंधित लेखन

२ टिप्पण्या: